विदेशी कथा परिचयमालेतील या आधीचे लेख :
१. कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी !
२. एका आईचा सूडाग्नी
३. कुणास सांगू ?
४. ‘भेट’ तिची त्याची
..................
विदेशी कथा परिचयमालेच्या पाचव्या भागात सर्व वाचकांचे स्वागत !
या भागासाठी जे अमेरिकी लेखक निवडले आहेत ते जागतिक कीर्तीचे आहेत. त्यांच्या हयातीत ते लेखक, पत्रकार, खेळाडू, शिकारी आणि योद्धा म्हणून खूप गाजले होते. आता त्यांच्या मृत्यूला ६० वर्ष उलटलीत तरीही त्यांचा अमेरीकी जनमानसावरील पगडा अजून कायम आहे. तिकडे ‘पापा’ या लाडक्या नावाने त्यांचा उत्सवी उल्लेख सतत होत असतो. आता तुमची उत्सुकता अधिक ताणत नाही.......
हे लेखक महोदय म्हणजे अर्नेस्ट हेमिंग्वे !
विसाव्या शतकातील एक थोर साहित्यिक. त्यांनी मुख्यत्वे कादंबरी आणि कथालेखन केलेले आहे. ते साहित्यातील पुलित्झर आणि नोबेलविजेतेही आहेत. त्यांच्या लेखनाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अल्पाक्षरत्व. त्यांनी स्वतः या गुणाला ‘आईसबर्ग थिअरी’ असे म्हटले होते. त्यांच्या कथांमध्ये व्यक्ती व प्रसंगांचे वर्णन मोजकेच असते. काही गोष्टी सूचक असतात. लेखनाचा गर्भितार्थ काढायचे काम ते वाचकांवर सोपवून देतात. त्यांची एक कथा तर अवघ्या सहा शब्दांची आहे आणि ती हृदयस्पर्शी व बहुचर्चित आहे. समकालीन लेखकांत त्यांनी स्वतःची स्वतंत्र पिळाची लेखनशैली निर्माण केली. अनेक साहित्यप्रेमींनी हेमिन्ग्वेंच्या लेखनाचा अभ्यास केलेला आहे. काहींच्या मते निरागसता हा त्या लेखनाचा आत्मा आहे तर अन्य काहींच्या मते गुंतागुंत हेच त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य आहे.
त्यांची अनेक मार्मिक वाक्ये साहित्यजगतात प्रसिद्ध आहेत. ती आपल्याला स्वतःचे पाय जमिनीवर घट्ट रोवून आत्मपरीक्षण करायला लावतात. त्यापैकी एक वाक्य माझे खूप आवडते आहे.
स्वतःसंबंधी एका संपादकांना लिहीताना हेमिंग्वे म्हणाले होते,
“मला जे काही यश लेखक म्हणून मिळालं, त्याचं कारण म्हणजे मला नीट माहीत असलेल्या विषयांबद्दलच मी लिहिलं”.
हे वाक्य माझ्यासाठी नेहमी मार्गदर्शक ठरले आहे.
एकेकाळी इंग्लिश साहित्यात, “शेक्सपियरच्या मृत्यूनंतरचा सर्वश्रेष्ठ लेखक”, असे कौतुक त्यांच्या वाट्याला आले होते. अशा या अभिजात लेखकाने स्वतःचे आयुष्य स्वतःच्या हातानेच संपवले. त्यांच्या मृत्यूचा दुखवटा अमेरिका, रशिया आणि व्हॅटिकन सिटी या तिन्ही परस्परविरोधी सत्ताकेंद्रांनी जाहीर केला होता. ही घटना देखील अभूतपूर्व म्हणावी लागेल.
आता त्यांच्या प्रस्तुत कथेबद्दल.
कथेचे नाव आहे ‘Hills Like White Elephants’
कथा घडते स्पेनमधील एका रेल्वे स्थानकात.
बार्सिलोनाहून येणारी (व माद्रिदला जाणारी) ट्रेन तिथे ४० मिनिटात यायची अपेक्षा आहे. तिची वाट पाहणाऱ्या प्रवाशांमध्ये एक अमेरिकी पुरुष व एक स्त्री यांचा समावेश आहे. ते दोघे एकमेकांशी गप्पा मारताहेत व एकीकडे बियर पीताहेत. स्थानकाच्या सभोवताली टेकड्या आहेत. त्या सूर्यप्रकाशात लख्ख शुभ्र दिसताहेत. त्यांच्याकडे पहात ती तरुणी त्याला म्हणते,
“त्या टेकड्या अगदी पांढऱ्या हत्तीप्रमाणे दिसत आहेत, नाही का”.
त्यावर तो म्हणतो की त्याने पांढरा हत्ती काही अजून पाहिलेला नाही. त्यावर ती म्हणते,
“बरोबर, तू तो पाहिलेला नसणारच !”
नंतर त्यांच्या काही किरकोळ गप्पा होतात. एकदम तो म्हणतो,
“अगं, ती अगदी साधी सोपी शस्त्रक्रिया असते बघ. खरं तर तिला शस्त्रक्रिया सुद्धा म्हणता येणार नाही. तुला काही त्रास होणार नाही त्याने. त्यात मी तुझ्या सोबत असेनच ना. दहा मिनिटात ते तुला ‘मोकळी’ करतील. त्यावर ती म्हणते,
“पण मग त्यानंतर पुढे आपले काय ?”.
तो म्हणतो, “अगं नंतर आपण एकदम आनंदी असू, अगदी पूर्वीप्रमाणेच !” ह्या कटकटीमुळेच तर आपण त्रस्त आहोत. त्यातून एकदा मोकळे झालो, की सुटलो”.
पण ती मनातून धास्तावलेली आहे त्या शस्त्रक्रियेबाबत ती साशंक आहे. तो तिला खूप पटवतो,
“अनेक जण असे करून घेत असतात. त्यात काय एवढे. पण तरी तुला जर तसे करून घ्यायचं नसेल तर माझा आग्रह नाही बघ. पण करून टाकणे उत्तमच. ठरव तू आता.”
अजून तिची उलघाल चालूच आहे. पुन्हा त्या दोघांचा ‘हो की नको’ यावर काथ्याकूट होतो. एका बिंदूवर ती त्याला त्याची वटवट थांबवायला सांगते. दरम्यान त्यांची बिअर संपल्यावर ते Absinthe नावाचे एक कामोत्तेजक मद्यपेयही चवीने पितात.
तेवढ्यात तिथल्या बियर काउंटरवरची बाई त्यांना येऊन सांगते की त्यांची ट्रेन आता पाच मिनिटात येईल. मग तो त्या दोघांच्या ट्रंका उचलून प्लॅटफॉर्मवर नीट ठेवतो.
पुन्हा तिच्याजवळ येऊन तिला विचारतो, “काय गं, बरं वाटतंय का तुला आता ?”
त्यावर ती प्रफुल्लित चेहऱ्याने व आत्मविश्वासाने म्हणते, “हो अगदी ! मला काहीही झालेलं नाहीये. मी अगदी छान आहे बघ !”
..
बस. कथा इथेच संपते.
कथेतील अनुल्लेखित पण सूचित गोष्टी
१. त्या दोघांमध्ये तो अमेरिकी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे पण ती कुठली याचा उल्लेख नाही; फक्त the girl एवढाच ( ‘लेडी’ असा नाही हे विशेष).
२. त्यांच्या संदर्भातली शस्त्रक्रिया नक्की कुठली ? हे थेट लिहायचे टाळले आहे पण ती गर्भपात असणार हे चाणाक्ष वाचक ताडतातच.
३. त्या दोघांचे एकमेकांची नाते काय असावे ? विवाहबाह्य संबंध असावा.
४. कथेच्या शेवटी तिचा नक्की निर्णय काय झाला हे वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडून दिलेले दिसते.
विवेचन
ही कथा १९२७मधली आहे. तत्कालीन वातावरणानुसार त्यातील घटनांचे विश्लेषण करावे लागेल. इथे मुख्य मुद्दा हा गर्भपात आहे आणि त्या काळी ते कृत्य अनैतिक समजले जाई आणि बऱ्याच देशांत बेकायदेशीर होते. आता विविध अभ्यासकांच्या मतांचा आढावा घेऊ.
१. कथा स्पेनमध्ये घडताना दाखवण्यामागे काही कारण असावे. ‘तो’ त्याच्या देशाबाहेर असल्याने गर्भपातासारखा नाजूक व निषिद्ध विषय इथे बंधमुक्त वातावरणात मोकळेपणाने बोलू शकतो.
२. तिने गर्भ ठेवायचा की पाडायचा याचा नक्की निर्णय काय घेतला असेल ? तिच्या प्रफुल्लित चेहऱ्यामुळे, ठेवायचा निर्णय घेणे तर्कसंगत वाटते. पण याउलटही निर्णय असू शकतो आणि त्यामुळे तिला कदाचित हायसे वाटले असावे.
३. तिचा निर्णय काय व पुढे त्यांचे काय ठरले असावे, याबाबत चार शक्यता संभवतात :
a. ते गर्भपात करवतील आणि एकमेकांचा कायमचा निरोप घेतील.
b. ते गर्भपात करवतील आणि पुढे पहिल्यासारखेच मैत्रीपूर्ण संबंध ठेवतील
c. ती मुलाला जन्म देईल आणि या पुरुषापासून फारकत घेईल.
d. मुलाला जन्म द्यायचा निर्णय ते संयुक्तपणे घेतील आणि एकत्र नांदतील.
म्हणजेच, कथेतील माहिती जाणीवपूर्वक अपुरी ठेवून वाचकांना कल्पना ताणायला भरपूर वाव ठेवलेला आहे.
कथेतील प्रतीके
१. कथेत सुरुवातीस डोंगरांमधील दरीचा उल्लेख आहे. दरीच्या दोन बाजू म्हणजे जीवनशैलीचे दोन भिन्न प्रकार - मस्त बेधुंद आयुष्य आणि जबाबदार गृहस्थाश्रम.
२. आता कामोत्तेजक पेयाबद्दल. वरवर पाहता ‘स्पिरिट’ प्रकारातील हे पेय त्या दोघांच्या मुक्त, बेधुंद आयुष्याचे प्रतीक आहे. तर दुसरा दृष्टिकोण सूक्ष्म आहे. मादक पेय हे सुरुवातीस भुरळ पाडणारे असते पण अंतिमतः ते नुकसानकारकच ठरते. त्यानुसार कथांतानंतर त्यांची मैत्री संपुष्टात आली असावी.
३. आता ‘हत्ती’ या शब्दवापराबाबत.
‘the elephant in the room’ हे इंग्लिश भाषेतील एक रूपक आहे. जेव्हा स्त्री-पुरुष संबंध ताणले जातात आणि गंभीर पेचप्रसंग उद्भवतो तेव्हा ते वापरले जाते. मैत्री कायमची तुटणे, घटस्फोट, गर्भपात अशा गुंतागुंतीच्या प्रसंगी त्याचा वापर लेखनात केला जातो.
४. अजून एक रोचक विचार. कथेतील तिचे गरोदरपण नकोसे असल्याने त्या पुरुषाच्या दृष्टीने त्या अपत्यास जन्म देणे हे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. ती मात्र गोंधळलेली आहे. म्हणून त्याचा हा विचार तो तिच्यावर लादू पाहतोय.
५. “तू पांढरा हत्ती पाहिला नसणारच”, हे तिचे वाक्य बरेच काही बोलते. “त्याला मजा मारता येते, पण संभाव्य अपत्याची जबाबदारी घ्यायची अक्कल कुठे आहे ?” हा त्यातील ध्वनित अर्थ असावा. एकंदरीत त्या दोघातील संबंध हे प्रस्थापित नसून उथळ स्वरूपाचेच असावेत असा त्यातून अर्थ काढता येतो.
कथेचा साहित्य प्रवास
तिच्या लेखनानंतर सुरुवातीस ती बऱ्याच संपादकांनी नाकारली होती. तत्कालीन विचारसरणीनुसार ‘ही कथा नसून निव्वळ एक किस्सा आहे’, असा त्यावर शिक्का बसला होता. या कथेत लेखक पूर्णपणे अलिप्त असून त्याचा ‘आवाज’ कुठेच ऐकू येत नाही हा त्यावरील मुख्य आक्षेप होता. तसेच गर्भपात आणि तत्कालीन पाश्चात्त्य समाजावरील कॅथलिक विचारांचा पगडा हा मुद्दाही विचारात घ्यावा लागेल.
कालौघात १९९० नंतर मात्र अचानक या कथेचे भाग्य उजळले. तेव्हा प्रकाशित झालेल्या अनेक निवडक कथासंग्रहात तिचा समावेश झाला. आता तिला नव्याने लोकप्रियता लाभली. किंबहुना, वाचकांच्या या नव्या पिढीला त्यातील माहितीचा अपुरेपणाच रंजक वाटला असावा. कथेतील त्या दोघांची वये काय आहेत, ते कोण व कुठले, त्यांचे लग्न ठरले होते काय, इत्यादी पारंपरिक माहिती ( चांभारचौकशा !) दिलेली नसणेच त्यांच्या दृष्टीने रंजक ठरलेले दिसते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ही कथा स्त्रीवादी आहे की स्त्रीवादविरोधी, या वादात अडकली होती. १९९०मध्ये ती खऱ्या अर्थाने ‘मोकळी’ झाली असे म्हणता येईल. लेखकाने कथा संपवल्यावर वाचकाच्या मनात पुढील कल्पनांचे इमले रचले जाणे यातच त्या कथेचे यश सामावले आहे. हेमिंग्वे यांच्या अल्पाक्षरी पण प्रभावी लेखनशैलीचा प्रत्यय त्यातून येतो.
…………………………………………..
1. मूळ कथा येथे वाचता येईल : https://faculty.weber.edu/jyoung/English%202500/Readings%20for%20English...
2. लेखातील चित्र जालावरून साभार !
प्रतिक्रिया
16 Jul 2021 - 10:13 am | ज्ञानोबाचे पैजार
जोपर्यंत तो हत्तीचा फोटो पाहिला नव्हता तो पर्यंतचा सगळा भाग डोक्यावरुन चालला होता, फोटो पाहिल्यावर सगळे संदर्भ जुळले आणि मग गोष्ट समजली आणि आवडली.
पैजारबुवा,
16 Jul 2021 - 10:31 am | कुमार१
अगदी सहमत. याची कल्पना होती.
काही शब्दप्रयोग आणि वाक्प्रचार हे खास पाश्चात्त्य संस्कृतीचे आहेत. म्हणूनच जालावरून हे निवडक चित्र शोधले आणि लेखात समाविष्ट केले.
16 Jul 2021 - 11:16 am | Bhakti
अगदी
हत्तीचं चित्र आणि संदर्भ वाचल्यावर गोष्ट समजली.
कुमारजी अत्यंत अभ्यासपूर्ण लिहलंय! खुप छान!
हेमिंग्वे परिचित नाव होते पण लेखन वाचलं नाही.
16 Jul 2021 - 11:50 am | कुमार१
भक्ती, धन्यवाद.
हेमिंग्वे यांची एक छान लघुकादंबरी सुचवतो :
द ओल्ड मॅन अँड द सी.
तिचा पु ल देशपांडे यांनी एका कोळीयाने असा मराठी अनुवाद केलेला आहे.
16 Jul 2021 - 2:01 pm | Bhakti
नक्की.
16 Jul 2021 - 2:02 pm | Bhakti
नक्की.
16 Jul 2021 - 12:46 pm | सौंदाळा
उत्तम कथेची ओळख करुन दिल्याबद्दल आभार.
खरं तर तुम्ही केलेलं रसग्रहण, स्पष्टीकरण पण तितकच सुंदर आहे
16 Jul 2021 - 5:02 pm | गॉडजिला
चटकन अभिप्राय देणे अवघड आहे यावर...
धन्यवाद कुमारजी
16 Jul 2021 - 7:14 pm | स्मिताके
आपण खूप अभ्यासपूर्ण परिचय करुन दिल्यामुळे अर्थ नीट समजायला मदत झाली.आभारी आहे.
16 Jul 2021 - 7:24 pm | कुमार१
सौंदाळा, गॉजि, स्मिता,
आभारी आहे !
>>>>>याचे श्रेय सर्वस्वी हेमिंग्वे यांनाच !
मी फक्त तुमच्या पुढे कथेचा सारांश ठेवला आहे
18 Jul 2021 - 4:42 pm | सतीशम२७
सुंदर , अप्रतीम !!!
"अल्पाक्षरत्व " +++
मला नीट माहीत असलेल्या विषयांबद्दलच मी लिहिलं”. ==> अगदी आजही लागू...+१००++
the elephant in the room , + एकेकाळी इंग्लिश साहित्यात, “शेक्सपियरच्या मृत्यूनंतरचा सर्वश्रेष्ठ लेखक”, असे कौतुक त्यांच्या वाट्याला आले होते. अशा या अभिजात लेखकाने स्वतःचे आयुष्य स्वतःच्या हातानेच संपवले. त्यांच्या मृत्यूचा दुखवटा अमेरिका, रशिया आणि व्हॅटिकन सिटी या तिन्ही परस्परविरोधी सत्ताकेंद्रांनी जाहीर केला होता. ही घटना देखील अभूतपूर्व म्हणावी लागेल. ==> हे माझ्याकरिता नवीन , धन्यवाद सर !!
" विजयस्तंभ" - वि. स. खांडेकर ची कथा ह्याच प्रकारात आहे का (?) ... हम्म.
18 Jul 2021 - 4:52 pm | कुमार१
सतीश, धन्यवाद !
'विजयस्तंभ' बद्दल मला काहीच माहित नाही.
तुम्ही वाचली असल्यास थोडक्यात सांगू शकता.
18 Jul 2021 - 4:52 pm | कुमार१
सतीश, धन्यवाद !
'विजयस्तंभ' बद्दल मला काहीच माहित नाही.
तुम्ही वाचली असल्यास थोडक्यात सांगू शकता.
18 Jul 2021 - 5:22 pm | सतीशम२७
'विजयस्तंभ' ही कथा १९९६ ला दहावीच्या अभ्यासक्रमात होती....
तुमचा कथा परिचय वाचताना मला ती "क्लीक " ( माफ करा... मराठी शब्द नाही येत) झाली .
"विजयी" झालेला राजा आपल्या राज्यात परततो , तेव्हा विजयाचे प्रतीक उभारण्याकरिता ( प्रजेचे दु:ख , यद्धमुळे होरपळलेली प्रजा याला दुर्लक्षीत करून) " विजयस्तंभ" उभारण्याचे ठरवतो. त्यावेळेस खनन करताना जुन्या विजयस्तंभा चे अवशेष भेटतात...... असा कथेचा गाभा आहे.
18 Jul 2021 - 5:32 pm | कुमार१
चांगली कथा दिसतेय.
धन्यवाद
19 Jul 2021 - 11:48 pm | चामुंडराय
छान कथा आणि रसग्रहण.
परंतु ती जर गर्भवती असेल, ती शस्त्रक्रिया गर्भपाताची असेल आणि तिला गर्भपात करायचा असेल / नसेल तर गर्भवती असताना तिने मद्यपान करणे उचित आहे का असा विचार मनात तरळला खरा!
"द ओल्ड मॅन अँड द सी" वाचून युगे लोटली.
आता पुन्हा वाचणे आले.
20 Jul 2021 - 8:01 am | कुमार१
>> +११
या कथेचे अजून एक स्पष्टीकरण असे वाचण्यात आले :
तो दोघांना पिण्यासाठी मुद्दामच ते पेय निवडतो. त्यातून तिला गुंगीसारखे वाटते आणि त्या प्रभावाखाली तो तिच्यावर गर्भपात करावा असे मत लादत असतो.
20 Jul 2021 - 10:51 pm | विजुभाऊ
हेमिंग्वे ची ही कथा कधीच वाचली नव्हती.
21 Jul 2021 - 3:04 pm | पाषाणभेद
कथेची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद, पण कथा पटली नाही.
21 Jul 2021 - 4:29 pm | कुमार१
,
>>>> काहीच हरकत नाही ! लेखात म्हटल्याप्रमाणे कित्येक संपादकांनी ती नाकारली होती व त्यावर आक्षेप घेतले होते.
......
हेमिंग्वे यांच्या गाजलेल्या ६ शब्दांच्या कथेबद्दलही दोन्ही मते आहेत. काही लेखकांनी त्या कथेतून गहन अर्थ काढून त्यावर लंबेचौडे लेख लिहिलेले आहेत. तर काहींनी, “सहा शब्दांची कुठे कथा असते का ? ती वाचकाला गुंगवून ठेवू शकत नाही,” असे आक्षेप घेतलेले आहेत.
25 Jul 2021 - 4:14 pm | सुधीर कांदळकर
कथापरिचय. कथा समजायला फार कठीण आहे. आपण कथासार वा अर्क अचूक समजून नेमक्या पण सोप्या शब्दात मांडलात. तेही रंजकपणे. असा की कथा मुळातून वाचल्याशिवाय राहवणार नाही. खरे सांगायचे झाले तर मुळातून वाचून ती मला कथा कळली नसती. वा!!!
एक असामान्य कादंबरी लिहिणारा सामान्य लेखक असे हेमिन्ग्वेबद्दल मी एके ठिकाणी वाचले होते ते चुकीचे आहे हेही ध्यानात आले.
घरातल्या हत्तीचे प्रतीक ठाऊक नव्हते. ते सांगितलेत, कथेचे प्रोग्नॉसिस लेखक कसे वाचकावर सोडतो तेहि वैशिष्ट्य समजावलेत. छान! धन्यवाद.
मासिकात वाचलेल्या तत्कालीन नवोदित लेखकांच्या - बहिष्कृत विषयावरील - काही अनवट मराठी कथा/एकांकिका आठवल्या. एका सर्जनशील लेखिकेचे नावही आठवते आहे. वसुधा वाकडे.
मस्त कथापरिचयाबद्दल अनेक अनेक धन्यवाद. पुलेशु.
25 Jul 2021 - 5:05 pm | कुमार१
सुधीर,
नेहमीप्रमाणेच चिकित्सक आणि उत्साहवर्धक प्रतिसाद !
खूप आवडला. वसुधा वाकडे यांच्याबद्दल माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे.