हा चित्रपट येऊन काही महिने उलटले तरी पहाण्याचा योग कालपर्यंत आला नव्हता. अनेक चित्रपट पाहिले जातात पण थोडेसेच लिहिण्यासारखे असतात. "लक बाय चान्स" हा त्यापैकी एक.
डिस्क्लेमर : पुढील काही परिच्छेदांत , चित्रपटाच्या कथानकादि घटकांबद्द्ल माहिती आहे. ज्यांना त्याबद्दल वाचायचे टाळायचे असेल त्यांनी वाचू नये.
हा चित्रपट एका होतकरू , चित्रपट-नायक बनू पहाणार्या तरुणाच्या - "स्ट्रगल"च्या दिवसांची कहाणी रेखाटतो. एका बिनचेहर्याच्या , बिननावाच्या अस्तित्त्वापासून पदार्पणाच्या यशापर्यंत त्याचा प्रवास कसा घडतो आणि या प्रवासादरम्यान त्याचे त्याच्या आजूबाजूच्या लोकांशी नाते कसे घडते ? हे झाले स्थूलमानाने कथानक. या सगळ्या नात्यांमधे त्याचे सगळ्यात महत्त्वाचे नाते (अर्थातच) त्याचे प्रेमपात्र असलेल्या , जवळजवळ त्याच्याइतक्याच नवी असलेल्या मुलीबरोबरचे. चित्रपटात असे वळण येते की चित्रपट या नायकाचा म्हणून सुरू तर होतो ; पण त्याच्या या प्रेयसीचा बघता बघता होऊन जातो .... मला वाटते , कथानक याच्यापेक्षा सांगणे अयोग्य होईल.
कथानक पूर्ण
चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन आहे झोया अख्तरचे. झोया म्हणजे जावेदसाबांची मुलगी आणि फरहानची बहीण. सिनेमाचा नायक आहे फरहान आणि नायिका आहे कोंकोणा सेन.
झोयाबाईना हा चित्रपट सुचला सुमारे ७ वर्षांपूर्वी. या संकल्पनेला प्रत्यक्षात यायला इतकी वर्षे गेली. दरम्यानच्या काळात नायक-नायिका बदलत गेल्या. शेवटी फरहान-कोंकोणा यांनी हा चित्रपट केला.
तर अशा या चित्रपटाबद्दल मुद्दामहून लिहावे असे काय ? तर अर्थातच , चित्रपटाची , कथानकाची हाताळणी.
सर्वप्रथम सांगायचे तर हा चित्रपट पहाणे हा अतिशय आनंददायक अनुभव बनला , याचे कारण , चित्रपटाच्या टायटल्स पासून शेवटच्या प्रसंगा-फ्रेम पर्यंत जपलेली अर्थपूर्णता. (सटल्टी ला योग्य मराठी शब्द काय ?) हिंदी चित्रपट बर्याचदा गाळून गाळून पहावा लागतो. अर्थहीन तण कापत कापत. इथे म्हणजे प्रत्येक प्रसंग आस्वाद घ्यावा असा.
या चित्रपटाचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल केलेली ही एक टिप्पणी आहे. आणि ही टिप्पणी आहे अर्थातच , नर्मविनोदी. इथल्या माणसांमधल्या , त्यांच्या व्यवहारांमधल्या विसंगती, स्पर्धा, स्वार्थ , असूया , खोटेपणा , यशापयश, नातेसंबंध, त्या संबंधांमधला तात्पुरतेपणा इ. इ. बद्दलची टिप्पणी. आणि यात कुठेही , भडक, बटबटीतपणाचा स्पर्श नाही. म्हणजे , प्रसंगी माणसे बटबटीत वागतात, ढोंगीपणा दाखवतात ; पण त्याचे चित्रण मात्र अगदी अलगदपणे केलेले आहे. किंवा एरवी ढोंगी , बटबटीत वागणार्या कुणाचे ठसठसते दु:ख कधीकधी व्यक्त होते. या चित्रपटाचा मला सगळ्यात आवडलेला पैलू म्हणजे , ही नजाकत. अशा छोट्या छोट्या क्षणांना शब्दबंबाळपणा किंवा आचरटपणा यांचा शाप नाही.
चित्रपटात उपरोक्त सर्वात महत्त्वाच्या दोन पात्रांशिवाय अक्षरशः डझनावारी पात्रे आहेत. ऋषि कपूर, डिंपल , जुही चावला , संजय कपूर , हृतिक रोशन आणि नवतारका इशा श्रावणी यांच्या भूमिका या दोघांच्या खालोखाल महत्त्वाच्या. यांच्या व्यतिरिक्त शाहरुखखान पासून आमीर खान पर्यंत आणि करीनाकपूर पासून बोमन इराणी पर्यंत अनेकानेक लोकांची एकेका प्रसंगापुरती हजेरी आहे. या सार्यांना "ओम शांति ओम" सारखे , एकाच लांबच लांब गाण्यात गुंफण्यापुरते आणलेले नाही , तर या सर्वांच्या प्रसंगांना चित्रपटाच्या "थीम" च्या संदर्भात अर्थपूर्ण स्थान आहे. या मोठ्या मोठ्या स्टार्स च्या "कॅमीओज" इतकेच महत्त्वाचे आहेत अनेक इतर , अनोळखी सहकलाकारांचे छोटे छोटे प्रसंग. मग ती एखादी नायिकेची मैत्रीण असो , नायकाचे मित्र असोत , कुणाचे पी ए असोत , एखादी नृत्यदिग्दर्शिका असो ... कोणाच्याही छोट्याशा संवादामधे आनंद घेण्यासारखे , काहीतरी नर्मविनोदी किंवा अर्थपूर्ण असे काहीतरी आहेच. सगळ्यांना आपल्या मिळालेल्या तुकड्याचे चीज करायला मिळाले आहे. संजय कपूर , ऋषि कपूर यांना माझ्या मनात फार मोठे अभिनेते म्हणून स्थान नव्हते. मात्र या चित्रपटात त्यांना मिळालेल्या महत्त्वाच्या भूमिकेत ते फिट्ट बसतात , त्यांना मिळालेले प्रसंग खरोखरच एंजॉय करण्यासारखे.
अर्थात , उपरोल्लेखित वास्तववादी चित्रण , किंवा अर्थपूर्ण हाताळणी हाच काही या चित्रपटाचा एकमेव मानबिंदू नव्हे. किंबहुना , त्याच्याइतकेच महत्त्वाचे आहेत काही असे चर्चिलेले मुद्दे जे कथानकाच्या ओघाने येत रहातात. हे मुद्दे जुने आहेत - जसे , "तकदीर की तदबीर ?" म्हणजेच , "नशीब की कर्तृत्व ?" किंवा " फेट् की चॉइस?" . मात्र चित्रपटात चितारलेल्या एकूण अनिश्चिततेच्या , उमेदवारीच्या , जीवघेण्या स्पर्धेच्या चित्रणात , एकूण कथानकात हे प्रश्न अलगदपणे गोवले जातात . म्हणूनच अर्थपूर्ण वाटतात.
जवळजवळ सगळा चित्रपट नायकाच्या पर्स्पेक्टीव्हने मांडला जातो. मात्र शेवटच्या प्रसंगात नायिकेचा नि नायकाचा जो संवाद होतो तो प्रसंग सोन्याचा. त्या एका प्रसंगाने नायिकेच्या पात्राला एका निराळ्य प्रतलावर नेऊन ठेवतो - आणि चित्रपटाच्या एकंदर परिणामालाही.
कोंकोणा सेन आणि फरहान अख्तर दोघांचीही कामे उत्तम यात वेगळे सांगायला नको. मात्र शेवटी काहीही झाले तरी हा चित्रपट झोया अख्तरचा आहे. चित्रपटाच्या संकल्पनेपासून एकेका फ्रेमवर तिचे गोंदण उमटलेले आहे. आणि एकेक पैलू निरखून पारखून घेतलेला.
इतके सगळे गुणगान गाइल्यावर अर्थातच काही न आवडलेले रहातेच. काही बाबींवर अगदी काहीच इलाज नाही. उदा. फरहान अख्तरचा आवाज. या नटाचा पडद्यावरचा वावर एकदम जबर. पण तो बोलायला लागतो आणि अर्रर्रर्रर्र.... आपण हुकतो एकदम. एखाद दोन गाणी टाळली असती तर बरे झाले असते. त्या गाण्यांच्या चालींमधेही फार काही लक्षात ठेवण्यासारखे नाही. आणि माझे चुकत नसेल तर कोंकोणाताई अंमळ "खात्या-पित्या घरच्या" दिसतात. ( यात काही चूक आहे असे नाही ; पण मला व्यक्तिशः थोडे खटकले खरे. )
असो. हा चित्रपट मला आवडला. तुम्हाला आवडेल याची शाश्वती नाही. पण कुणी पाहिला असल्यास त्यांच्या मताशी ताडून पहायला नक्की आवडेल.
प्रतिक्रिया
17 Apr 2009 - 7:11 am | विनायक प्रभू
फाउंटन = झोया
17 Apr 2009 - 7:20 am | मेघना भुस्कुटे
मी अजून पाहिलेला नाही. राहिला, राहिला, राहिलाच. पण आता बघावा लागणारसे दिसते.
अवांतरः कोंकणा खात्या-पित्या घरची असल्यासारखी दिसते ते मला आवडते. (नाही, साधर्म्यामुळे नुसती जवळीक वाटते असे नव्हे!) एकाच छापातल्या अंगावरचे मांस खरवडून काढल्यासारख्या दिसणार्या आणि एकाच प्रकारच्या बिकिनीप्राबल्याच्या भूमिका करणार्या अनेकींपेक्षा ती वेगळी असल्याची ही आणखी एक खूण आहे. 'अभिनय खणखणीत आणि निरनिराळ्या प्रकारच्या भूमिका निवडण्याचे कौशल्य + धाडस हवे - शरीर हे निव्वळ माध्यम, त्याला त्यापेक्षा महत्त्व नको' हे सूत्र त्यातून स्पष्ट दिसते. (मला आवडणारी आएशा टाकियाही अंमळ गुबगुबीत आहे, हा योगायोग म्हणावा की सुसंगती?!) अर्थात कोंकणाचे वजन जर सिनेमातल्या कुठल्याही गोष्टीला मारक / विसंगत ठरणारे असेल, तर ते नजरेला खुपणे स्वाभाविक आहेच.
17 Apr 2009 - 7:24 am | मुक्तसुनीत
मी उपरोक्त मांडलेला मुद्दा ही सर्वार्थाने मला जाणवलेली बाब आहे. चित्रपटाला ही गोष्ट मारक आहे (किंवा इतर कुणाला मारक वाटेल) असे मला म्हणायचे नाही. आणि एकूण जमाखर्च लक्षात घेता ही अतिशय नगण्य बाब आहे हेही मी म्हणतो. या नटीचे हे काम तिच्या इतर अनेकानेक आवडलेल्या कामाइतकेच चांगले झाले आहे.
बाय द वे , वजनाच्या बाबतीत आमचे नाते सध्याच्या ऋषि कपूर बरोबर आहे हे नमूद केलेले बरे. :-)
17 Apr 2009 - 7:31 am | मेघना भुस्कुटे
मी उपरोक्त मांडलेला मुद्दा ही सर्वार्थाने मला जाणवलेली बाब आहे.
आस्वाद किती सब्जेक्टिव्ह गोष्ट असते नाही? केवळ याचसाठी मी वर्तमानपत्रातली समीक्षणे (परीक्षणे?) बिनदिक्कत धुडकावून माझ्याशी जुळणार्या आणि न जुळणार्या लोकांची सिनेमाबद्दलची मते बघूनच सिनेमाला जाणं ठरवते. अर्थात तरीही अनपेक्षित गोष्टी होतातच. पण तितपत चालायचंच.
17 Apr 2009 - 7:34 am | भडकमकर मास्तर
.. परीक्षण मस्त आहे...बराचसा सहमत आहे....
( कुठलाही प्रसंग न लिहिताही कशाला स्पॉइलर ऍलर्ट टाकता हो?)
का कोण जाणे, मला फरहानचा आवाज सुद्धा आवडतो. ;)
...
या सिनेमावर लिहिणार होतो ...राहून गेले होते... आता जरा घाईत आहे..दुपारी खरा स्पॉइलर ऍलर्ट टाकून भरपूर लिहितो ... :)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
17 Apr 2009 - 7:49 am | प्राजु
या विकेंडलाच बघू. :)
परवाच्या शुक्रवारी संदीप चित्रे आणि कुटुंब घरी आलेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत "आलू चाट" पाहीला.
भन्नाट आहे सिनेमा. अतिशय कॉमेडी.. कुठेही वाह्यातपणा नाही. किंवा त्यातला नटीला कुठेही अर्ध्यानुरध्या कपड्यात दाखवलेली नाही. संपूर्ण सिनेमाभर ती सलवार कमीज मध्ये हिंडते.
मला स्वतःला (माझ्या नवर्याला आणि चित्रे कुटुंबाला) तरी खूप आवडला हा सिनेमा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Apr 2009 - 10:31 am | आपला अभिजित
मुक्त सुनीताने मुक्तछंदात उत्तम रसग्रहण केलंय चित्रपटाचं. बरेच दिवस त्यावर लिहायचं होतं, पण राहून गेलं होतं.
अलीकडच्या काळात मला आवडलेला एक अप्रतिम चित्रपट!
मांडणी, संयत हाताळणी, प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय, उत्तम पकड आणि उत्क्रुष्ट पटकथेचा नमुना म्हणजे हा चित्रपट.
सुनीताने बरेच काही लिहिलेच आहे.
मला सगळ्यात आवडलेले काही प्रसंग :
१. इशा शर्वाणी ही नवथर नटी फरहानच्या मोहात पडते आणि रात्री, सगळ्यांची नजर चुकवून त्याला भेटायला त्याच्या खोलीतच घुसते. त्या वेळचे संवादही अप्रतिम आहेत.
ती म्हणते, `ये कोट तुम्हारा है?' आणि मुद्दाम अंगात चढवते.
त्यावर तो म्हणतो, `यहां के सभी कपडे मेरे हैं . सिवाय उनके, जो तुमने पहन रखें हैं.`
त्यानंतरचा अपेक्षित प्रसंग आणि एकूण प्रसंगाचा मूड लक्षात आणून देणारा किती जबरदस्त संवाद आहे हा! `सूचक'पणे एकमेकांच्या भावना व्यक्त करणं, अंदाज घेणं, प्रतिक्रिया देणं नि आजमावणं, सगळंच दडलंय त्यात!!
२. फरहान `स्टार' होतो, नि त्याचा सिनेमा सुपरहिट होतो, तेव्हाचा प्रसंग.
कोंकणाने सर्वप्रथम त्याची शिफारस केली होती, हे तिचा गैरफायदा घेणार्या एका निर्मात्याला कळतं, तेव्हा त्याचा चेहरा गोरामोरा होतो. `अरेरे, तिला फसवलं नि आपण आता गोत्यात येणार' हे सगळं तो एका भावमुद्रेतून सांगून टाकतो!
मतलबी, स्वार्थी दुनिया केवढ्या छोट्या प्रसंगातून मांडलेय!!
३. फरहान नि आपल्या नात्याविषयी काहीबाही छापणार्या पत्रकार मित्राच्या ऑफिसात घुसून कोंकणा त्याला त्याच्याच मासिकानं बडवते, तो प्रसंगही असाच थरारक नि कमी वेळेत मोठा परिणाम साधणारा!!
झोया, फरहान नि कोंकणाला सलाम!
17 Apr 2009 - 10:41 am | मदनबाण
पाहिला हवा...
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
17 Apr 2009 - 10:49 am | नंदन
आवडले. एकच तक्रार की थोडे छोटेखानी आहे, अजून बोटे मोकळी सोडून लिहायला हवे होते :). चित्रपट पाहण्याजोगा आहे यात वादच नाही. सुरूवातीच्या अर्ध्या भागात टिपीकल हिंदी चित्रपटांची उडवलेली खिल्ली पाहताना अधूनमधून 'स्केअरी मूव्हीज' या चित्रपट-मालिकेची आठवण येत राहते. शेवटच्या प्रसंगातला 'पण यात तुझी तरी काय चूक' असा समजूतदारपणा दुर्मीळच (प्रत्यक्ष काय किंवा चित्रपटांत काय), पण कोंकोणा सेनने तो उत्तम वठवला आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Apr 2009 - 11:18 am | मनिष
हा बघायचा राहूनच गेला...डीव्हीडी मिळते का बघायला पाहिजे.
18 Apr 2009 - 3:38 am | एक
एक. जेव्हा हृतिक रोशन बंद काचेतून खेळणार्या मुलांकडे बघत असतो तो.
आणि शेवटचा जेव्हा शाहरूख खान हिरो ला उपदेश करतो तो. या प्रसंगात शाहरूख जेव्हढा कन्विन्सिंग वाटतो तेव्हढा तो मला त्याच्या आधिच्या कुठल्याच सिनेमात वाटला नाही.
अजुन एक मजेदार प्रसंग म्हणजे मॅक मोहन ला त्याचा "हुकुमी" डायलॉग म्हणण्याची फर्माईश होते तो. काय भाव खाऊन म्हणतो तो :)
18 Apr 2009 - 3:48 am | बेसनलाडू
सौरभ शुक्ला हा एक क्यारेक्टर् माणूस आणि उत्तम अभिनेता आहे, असे मला वाटते.
चित्रपटातले त्याच्या ऍक्टिंग स्कूल मधले अभिनयाचे प्रशिक्षण देण्याचे प्रसंग, मार्गदर्शन वगैरे जाम धमाल आहे. मॅक् मोहन चा प्रसंग या स्कूलच्या पदविका/पदवी प्रदान सोहळ्यातला आहे ना?
(स्मरणशील)बेसनलाडू
मला या चित्रपटात ऋषी कपूर आणि जुही चावलाचे कामही आवडले :)
(जूही फ्यान्)बेसनलाडू
18 Apr 2009 - 5:01 am | अनामिक
...चित्रपटात असे वळण येते की चित्रपट या नायकाचा म्हणून सुरू तर होतो ; पण त्याच्या या प्रेयसीचा बघता बघता होऊन जातो....
मुक्तसुनीतांनी अगदी योग्य शब्दात चित्रपटाची ओळख करून दिली आहे. चित्रपटाची हाताळणी अतिशय चांगली असली तरी माझ्या दृष्टीने चित्रपट खूपच प्रेडिक्टेबल आहे... आणि थोडा कंटाळवाणा देखील, त्यामुळे नाहीच आवडला.
खरंतर या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, त्याचं कारण म्हणजे
१) कोंकणा सेन शर्मा - हिला कोणतीही भूमिका द्या, भूमिकेचं सोनं करते ही बया. अगदी सहज, सुंदर अभिनयाने हिने पहिलेपासूनच माझ्या मनावर कब्जा केलाय.
२) झोया अख्तरचा पहिला चित्रपट असल्याने, आणि फरहानची बहीण म्हणून तिच्यावरचं प्रेशरही वाढलेलं होत त्यामुळे असेल कदाचित.
३) सध्याच्या हिंदी चित्रपटसृष्टीवर आधारीत आहे अशी पहिलेपासून समज असल्याने मधुर भांडारकरच्या चित्रपटाची जशी वाट पाहतो तशीच पाहत होतो.
कोंकणा सोडलीतर चित्रपट फारसा नाहीच आवडला.... फरहानला नायक व्हायचं असतं पण त्याची जिद्द, तळमळ आपल्या पर्यंत पोचतच नाही. तो सुरवातीला जी काही धडपड करतो ती खूपच वरवरची वाटते.. म्हणजे कशी तर 'हं नायक झालो तर ठीक, अन् नाही तरी ठीक'. आणि त्यानंतर त्याला ज्याप्रकारे चित्रपट मिळतो ते तर आजच्या चित्रपटसृष्टीत अशक्याच्याही पलीकडचं वाटतं. हृतिक रोशनची भूमिका म्हणजे जशी दाखवण्यात आली ती फारच नाटकी वाटली... विशेषतः त्याचा आणि करन जोहरचा फोनवरचा संवाद... त्यानंतर तर चित्रपटात पुढे काय होणार ते खूपच अपेक्षीत आहे. न आवडण्याचं दुसरं कारण म्हणजे चित्रपटाची संथ गती... आधीच प्रेडिक्टेबल आणि त्यात संथगती असल्याने चित्रपट कंटाळवाणा होतो (म्हणजे मलातरी वाटला). दोघांचे अभिनय अगदी सहज आहेत हे मान्य, झोयाने अतिशय चांगल्या पद्धतीने चित्रपट हाताळलाय हे ही मान्य, पण तरीही कुठेतरी काहीतरी कमी आहे असं वाटतं... थेट आतपर्यंत पोचतच नाही चित्रपट (चित्रपट मनोरंजनात्मक नसले अन वास्तवदर्शी असले की ते आतपर्यंत पोचले पाहिजे असे माझे मत आहे). चित्रपटाची कथा ७-८ वर्षांपासून तयार होती म्हणे.... ७-८ वर्षांपूर्वी आला असता तर तेव्हाचा म्हणून आवडलाही असता कदाचित!
एकवेळ पाहून विसरण्यासारखा आहे अश्या मताचा मी आहे.
(चित्रपटप्रेमी) अनामिक