बाललीला

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
15 Apr 2009 - 11:18 pm

पोरगी सध्या तिच्या मधल्या मावशीकडे गेलेय. दोन दिवस मुक्कामाला. (आता राजा-राणीला रान मोकळं म्हणून चहाटळ कॉमेंट करू नका! रात्री साडेबाराला घरी जातोय रोज. नि सकाळी दोन तास फक्त राजा-राणीला मोकळे असतात. त्यातही स्वयंपाक, धुणीभांडी, केरवारे यातच जीव जातो. असो!) आज सहज फोन केला, तर तिच्या मावसभावाच्या उखाळ्यापाखाळ्या करत होती. ढकललं, मारलं, थुंकी उडवली वगैरे वगैरे. नेहमीचंच! आता "डायरेक्‍ट' उद्या घरी येतेय म्हणते.

manu in shilpa's wedding-14[2].02.09 011
सांगायचा मुद्दा काय, की कार्टीला शिंग फुटल्येत हल्ली. नि प्रश्‍नही पडायला लागलेत भयंकर. ~X( त्यांची उत्तरं देता देता नाकी नऊ येतात. परवा आईला विचारत होती - "आई, कैरी आंबट का असते?' आईनं लगेच नवऱ्याचा "सोर्स' वापरला. (अडल्यानडल्याला लागते गरज अशी!) मीही एसएमएसवरून उत्तर दिलं - "आंबा गोड व्हावा, म्हणून देवबाप्पा कैरी आंबट करतो.' खरं तर या उत्तराला काही लॉजिक नव्हतं. पण त्या वेळी खपून गेलं असतं. पण पोरीनं आम्हा दोघांची दांडी गुल करून स्वतःच स्वतःच्या गहन प्रश्‍नांच निराकरण करून टाकलं. - "अगं, देवबाप्पा ती आंबट करतो!' 8>
तिच्या शाळेत तिला सांगितलंय, तुम्ही घरी दंगामस्ती करता, ते आम्ही "जादूच्या टीव्ही'तून बघत असतो. त्यामुळं मुलांवर जरा वचक राहतो, असा शिक्षकांचा आणि पालकांचा (गैर)समज. :S आता तिला सुटी लागल्यावर परवा म्हणते, "आई, आता शाळेला सुटी आहे म्हणजे बाईंचा जादूचा टीव्ही पण बंद असेल नाही?' :)
---
अलीकडेच तिला घेऊन दोनदा "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' पाहिला. जवळपास पाठ झाल्यासारखाच झाला होता तिचा. तिला मारामारी आवडत नाही, तरी अफजलखान वध वगैरे सहन केलं. पण शेवटी सचिन खेडेकरला दगड का मारतात, सिद्धार्थ जाधव त्या काकाला गोळ्या का झाडतो, तो माणूस चांगला आहे, तर मग त्याला सगळे का मारतात, या प्रश्‍नांना उत्तरं देता देता नाकी नऊ आले. वर एकदा मला विचारते, "बाबा, तो शिवाजी भोसले (दिनकर भोसले) रोज मासे का खातो?' मी म्हटलं, अगं, त्याला आवडतात म्हणून खातो. मग तिचं म्हणणं, "आवडतात, तर नुसता वास घेऊन ठेवून द्यायचे ना! खायचे कशाला?' मी गार! "तुला नागडा करून खिडकीतून फेकून देईन' असं तो काका का म्हणतो, असा प्रश्‍न विचारून तिनं आईलाही भंडावून सोडलं होतं!! :|
---
शाहरुख खान तिचा फेवरेट हिरो आहे. त्याला भेटण्याची तिला अनिवार इच्छा आहे. तशी मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधवशी तिची भेट मी करून दिली, पण शाहरुख खानला भेटणं तिला तिच्या बापजन्मात शक्‍य नाहीसं दिसतंय! तिला मात्र हे काही केल्या पटत नाही. तो मुंबईला राहतो, लोकांना भेटत नाही, खूप बिझी असतो, लांब राहतो, खूप गर्दी असते' वगैरे कारणं तिचं समाधान करू शकत नाहीत. एकदा मला म्हणाली, "बाबा, तुम्ही असं करा, शाहरुख खान आणि गलगलेला (भरत जाधव) एकत्र भेटायला बोलवा.' मी म्हणालो, "अगं, शाहरुख खान गलगलेला ओळखत नाही.'
तिचं उत्तर - "मग मी त्याला सांगेन ना, हा गलगले नि हा शाहरुख खान म्हणून!' 8}
मी कपाळावर हात मारून घेतला!
त्यामुळं कधी मुंबईला जातो, असं सांगायचीही चोरी आहे. ती लगेच मागे लागेल, शाहरुख खानला भेटायचंय म्हणून!
शाहरुख खान "दर्दे डिस्को' गाण्यात उघड्या अंगानं नाचतो, म्हणून हिलाही उघड्या अंगानं फिरायचं असतं दिवसभर! X( काय सांगायचं आता या पोरीला?
---
बाकी रस्त्यावरून जाताना तो अमका लाल सिग्नलला का थांबला नाही, बाबा तुम्ही पांढऱ्या रेषेवर गाडी का उभी केलीत? डावीकडे जायला हिरवा सिग्नल नसताना का पुढे गेलात? तमका रस्त्यावर का थुंकला? सिग्नल तोडणाऱ्यांना पोलिस काका का पकडत नाहीत...एक ना अनेक प्रश्‍न! :(
---
तिला दुपारी अजिबात झोपायचं नसतं नि मला (तास-दीड तास!) डुलकी काढल्याशिवाय करमत नाही. मग "मला त्रास देऊ नकोस' असा दम देऊन, आतल्या खोलीचं दार ओढून घेऊन मी झोपतो. परवा असाच झोपलो होतो, तर एकदम केविलवाणा चेहरा करून रडतरडत माझ्याकडे आली. मी दचकून जागा झालो. कळेचना, काय झालंय! हाताला लागलं म्हणत होती. काय झालं विचारल्यावर म्हणाली, औषधाची बाटली फुटली. मी बाहेर येऊन पाहिलं, तर तिला आत ठेवायला सांगितलेली काचेची बाटली कार्टीनं पाडून फोडली होती. होमिओपथीच्या गोळ्यांचा सगळा कचरा बाहेर झाला होता. मला कळू नये, म्हणून हिनं फुटलेल्या काचा सुपलीत भरून कचऱ्याच्या डब्यात गुपचूप टाकल्या होत्या. त्या भरतानाच काहीतरी हाताला लागलं होतं. पण जखमबिखम नव्हती. बिचारी घाबरली होती. मग तिचीच समजूत काढावी लागली. :(
दोन दिवस पोरगी घरात नव्हती, तर घर जरा शांत होतं. सगळी कामं विनाअडथळा होत होती. आता उद्यापासून पुन्हा चिवचिवाट नि शंकांचा सुळसुळाट सुरू होईल! :)

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

प्राजु's picture

15 Apr 2009 - 11:31 pm | प्राजु

मी ही याच स्टेजमधून जाते आहे.
लेकाने परवा उच्छाद मांडला होता. म्हणाला, "आई , व्हाय डोंट वी चेंज अवर लास्ट नेम? आय वॉन्टू चेंज माय लास्ट नेम. माय फ्रेन्ड्स कॅनोट प्रोनाऊन्स इट." असं म्हणत स्वत:च सांगितलं, " आज पासून मी अथर्व जॉर्ज आहे.." त्याची समजूत काढता काढता डोकं भणभणायला लागलं. #o
माझ्या नावाने एक पत्र आलं.. त्यावरचं माझं नाव वाचलं.. आणि म्हणाला, "हेऽऽ धिस इज माय लास्ट नेम.. हाऊ कम इट्स योर्स?" त्याचं आडनाव हे माझंही आडनाव आहे काही केल्या पटेना त्याला. :(
काय करायचं आता? :?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आपला अभिजित's picture

16 Apr 2009 - 10:20 am | आपला अभिजित

"हेऽऽ धिस इज माय लास्ट नेम.. हाऊ कम इट्स योर्स?"

छान! तुझ्या डोक्यावर मिर्‍या वाटणारेय लवकरच!

मयुरा गुप्ते's picture

16 Apr 2009 - 1:33 am | मयुरा गुप्ते

माझ्या भाचीने तर सरळ विचारलं होतं, तिच्या पुर्ण नावा मध्ये तिर्थरुपांच नाव कशाला? नुसतं पहीलं नाव आणि आडनाव का नाही. काय बरं सांगाव? बुद्धीमत्ता परिक्षेमध्ये पेपरात तिच्या बाबाला 'Odd man Out' म्हणुन तीने बाहेर काढलं होतं...आता बोला. सगळ्यांना खरतर धडा होता,कि ओफीस एके ओफीस केलं कि मुलं पण आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवतात्.....काय म्हणता खरं की नाही?

मदनबाण's picture

16 Apr 2009 - 2:12 am | मदनबाण

तिचं उत्तर - "मग मी त्याला सांगेन ना, हा गलगले नि हा शाहरुख खान म्हणून!'
हा...हा...हा स्मार्ट गर्ल. :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

रेवती's picture

16 Apr 2009 - 3:41 am | रेवती

आपल्या मुलीचा फोटो आधीच पाहिल्यामुळे हे सगळे उद्योग कोण करतय हे लगेच डोळ्यासमोर येतं.
वरील अनेक उदाहरणातूनही ती सगळं काही तिच्या बालवयानुसारच करते आहे असं वाटतय.;)
हीच तक्रार तिच्या आजी आजोबांसमोर करून दाखवा, लग्गेच नातवंडे चूक नाहीत हे दाखवून देतील.
अश्यावेळी आपण गप्प!

रेवती

विनायक प्रभू's picture

16 Apr 2009 - 6:05 am | विनायक प्रभू

असे आमच्या मनात काहीही नाही हॉ.
लेक लय भारी.
काळजी घ्या.
ऍनवेळी अवसानघात व्हायचा, मग त्या प्रश्नाची उत्तरे देणार कोण?
तिला मारामारी आवडत नाही म्हणुन म्ह्टले हॉ.

आपला अभिजित's picture

16 Apr 2009 - 10:21 am | आपला अभिजित

ऍनवेळी अवसानघात व्हायचा, मग त्या प्रश्नाची उत्तरे देणार कोण?

इश्श! काहीतरीच ब्वा तुमचं! :\

विनायक प्रभू's picture

16 Apr 2009 - 6:09 am | विनायक प्रभू

पोरगी म्हणु नका हो.
लेक म्हणावे.

आपला अभिजित's picture

16 Apr 2009 - 10:23 am | आपला अभिजित

मी `कार्टी' पण म्हटलंय. त्याचं काय?

(अरेच्चा! `पोरटी' म्हणायचं राहिलं का?)

अनिल हटेला's picture

16 Apr 2009 - 6:18 am | अनिल हटेला

बाललीला आवडल्या !! :-))

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

राघव's picture

16 Apr 2009 - 7:53 am | राघव

ती घरात असतांना डोकं उठतं असं तुम्ही कितीही म्हणालात तरी, २ दिवस,ती घरी नसल्याची चुटपुट तुम्हाला लागलेली कळाली आम्हाला. :) माझ्या कडून तिला मनापासून शुभेच्छा! (तुम्हाला नाय हां!! ;) )

(बालक)राघव

आपला अभिजित's picture

16 Apr 2009 - 10:25 am | आपला अभिजित

ती घरी नसल्याची चुटपुट तुम्हाला लागलेली कळाली आम्हाला.

अगदी खरं! एवढे कसे हो तुम्ही मनकवडे?

आज दुपारी येईल पिडायला! बहुधा, ४/५ गोष्टींची लाच दिल्याशिवाय गप्प बसायची नाही. पण आईनं नवी भातुकली आणल्येय. तिच्यात आठ दिवस जातील बहुधा.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Apr 2009 - 10:42 am | परिकथेतील राजकुमार

बाललीला एकदम मस्तच :)

त्यातही स्वयंपाक, धुणीभांडी, केरवारे यातच जीव जातो. = कोणाचा ? ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

आपला अभिजित's picture

16 Apr 2009 - 10:54 am | आपला अभिजित

असले भोचक प्रश्न विचारून माझ्यासारख्या `प्रतिष्ठित' व्यक्तीची अब्रू वेशीवर टांगणं तुम्हाला शोभत नाही.
तुमचा जाहीर निषेध!
(संपादकांनी क्रुपया अशा प्रक्षोभक प्रतिक्रियांची नोंद घेऊन अशा सदस्यांना भर चौकात भांडी घासण्याची शिक्षा लावावी. वर अशा कार्यक्रमांना त्यांच्या ऑफिसातल्या नवथर, आकर्षक टवळ्यांना बोलावण्याचीही व्यवस्था आम्ही करू!!)

ऋष्या's picture

16 Apr 2009 - 10:48 am | ऋष्या

आवडल्या.
चार-पाच वर्षे वयाची पिल्लं ज्या ज्या घरात आहेत तिथे थोड्याफार फरकाने असेच चाललेले असते. त्यात आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या. मग काय मजाच मजा.
ही कारटी प्रश्न विचारून केव्हा आपले दात आपल्याच घशात घालतील सांगता येत नाही. "हे असं का?" हा आवडता प्रश्न. लॉजिकल आणि पटण्यासारखे उत्तर देता देता नाकी नऊ येतात.
तुमच्या लेकीला अनेक आशिर्वाद.

क्रान्ति's picture

16 Apr 2009 - 1:13 pm | क्रान्ति

:) छोकरीचा फोटो, तिचे प्रश्न, बाललीला आणि त्याचं तुम्ही केलेलं सहज वर्णन, सगळंच मस्त! मुलं मोठी झाल्यावर ही मजा नाही येत पण! अशा वेळी त्यांच बालपण आठवत रहात.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

जागु's picture

16 Apr 2009 - 2:06 pm | जागु

मुलगी गोड आहे.

माझी मुलगीही असेच काही काही प्रश्न विचारत असते. आणि आपण तिला काहीही प्रश्न विचारले तरी काहीही जुळवुन ती उत्तर देते. अग्गुबाई ढग्गूबाईची सिडी मी तिच्यासाठी नेली तेंव्हा तिने त्या गाण्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ विचारला. हल्ली सकाळी ती माझ्याबरोबर पुजा करताना असते तेंव्हा मी देव पुसण्यसाठी खाली पाटावर ठेवते जरा इकडे तिकडे झाल की लगेच माझी चुक काढते.
तिला गाण्याची खुप आवड आहे. रोज आम्ही जेवायला बसलो की हिचा प्रोग्राम सुरू. मग स्वत: अनाउन्स करते आता आपल्या समोर येत आहे - पहिला स्वतःच नाव मग मुग्धा होते, सगळे पंचरत्न होते. रविवारी स्वप्नील बांदोडकरचा प्रोग्राम बघितला आणि मला म्हणाली आई आता परत स्वप्नील बांदोडकरचा प्रोग्रॅम असला की मला नेशील ? मी त्याच्या स्टेजवर जाऊन गाणे बोलेन आणि नाचेन पण. मी हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता.

परवा तिच्या मामाकडे गेली. आम्ही रात्री तिला घेउन येणार होतो. पण ती तिथेच झोपली. आम्ही तिला १२.१५ ला आणायला गेलो. कारण तिच्या बाबांना आणि मला दोघांनाही घर खायला उठल.

सूहास's picture

16 Apr 2009 - 3:16 pm | सूहास (not verified)

सुहास
मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..

श्रावण मोडक's picture

16 Apr 2009 - 3:28 pm | श्रावण मोडक

या 'मुग्धा'चा चेहरा केविलवाणा? डोळ्यांपुढं तो आला तेव्हा कसंसंच झालं यार...

कुंदन's picture

16 Apr 2009 - 7:09 pm | कुंदन

पुर्वी माझी लेक ( वय २० महिने) , दुध प्यायला वा जेवायला कुरकुर करायची तेंव्हा आम्ही तिला सांगायचो"लवकर दुध पी/जेवण कर्,नाहीतर बुवाला बोलाविन".

आता तर अधुन मधुन तिच मला विचारते "पपा, बुवाला बोलावु का?"

आपला अभिजित's picture

16 Apr 2009 - 10:34 pm | आपला अभिजित

कन्या दुपारी घरी डेरेदाखल झाली. आईनं आणलेल्या नव्या भातुकलीत रमून गेली. :) "पोळ्या' करायला पीठ मागून घेतलं. मग त्यात पाणीबिणी घालून घरभर पसारा करून ठेवला. "पराठे' करायला म्हणून माझ्याकडे पिठात घालायला काहीतरी मागत होती. घरातला बेळगावी "कुंदा' तिला खायला दिला होता. तोच मिसळायला लागली पिठात. म्हणून मग तिला हाताशी आलेली मोहरी दिली. नंतर मी वामकुक्षीकडे वळलो.
मध्येच मला उठवायला आली - "बाबा, मी काय खाऊ केलाय बघा!' तसंच झोपेतून मला उठवून तो "खाऊ' पोटभर खायला घातला. काय असेल तो? तिला टेबलवर ठेवलेलं खोवलेलं खोबरं मिळालं होतं. ते, त्यात जवसाची चटणी आणि कच्ची मोहरी! बरं, "नाही' म्हणायची सोय नव्हती. तीन-चार चमचे खायलाच लागला! :O घरी आल्यावर आईलाही हा "प्रसाद' भरवला!! :S
दुपारी मी तिच्याशी जरा वेळ खेळून झाल्यावर तिला विचारलं, "मी जरा झोपू का?'
तर मला म्हणते - "झोपा बाईसाहेब, झोपा! तेवढाच तुमचा उपयोग आहे!!' :(

टिउ's picture

17 Apr 2009 - 12:34 am | टिउ

"झोपा बाईसाहेब, झोपा! तेवढाच तुमचा उपयोग आहे!!'

=))

बाकी मुलं हे जे काही आगाऊ बोलतात ते त्यांनी घरातच कधीतरी ऐकलेलं असतं...ह.घ्या!

आपला अभिजित's picture

17 Apr 2009 - 7:57 am | आपला अभिजित

बाकी मुलं हे जे काही आगाऊ बोलतात ते त्यांनी घरातच कधीतरी ऐकलेलं असतं...ह.घ्या!

अजिबात ह. घेणार नाही!!
एखाद्याचे असे जाहीर वाभाडे काढणं तुम्हाला अजिबात शोभत नाही! तुमचंही एके दिवशी लग्न होईल, असा शाप मी तुम्हाला देत आहे!! X( आणि त्यावर उ:शाप नाही!!!

बेसनलाडू's picture

17 Apr 2009 - 12:39 am | बेसनलाडू

मजेशीर प्रकार आहेत एकंदरीत :)
(बालसुलभ)बेसनलाडू

शितल's picture

17 Apr 2009 - 1:29 am | शितल

बाललीला मस्त आहेत.:)
माझ्या लेकाच्या लिला तर चार लोकांच्या समोर सांगण्या सारख्या नाहीत. :(

आपला अभिजित's picture

17 Apr 2009 - 7:51 am | आपला अभिजित

लीला कोण?
मैत्रीण का?? ;)