तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति
कोव्हीड काळातील तीन अनुभव
१) आमचे एक कौटुंबिक परिवार( family friend) मित्र. नवरा आणि बायको उच्च शिक्षित आणि दोघेही बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर. माझी पत्नी त्यांची फॅमिली डॉक्टर. आमची मैत्री बऱ्याच वर्षांपासून १३-१४ पेक्षा जास्त.
एक दिवस हि मैत्रीण माझ्या पत्नी कडे आली आणि सांगू लागली, आमच्या बाबांचे इच्छापत्र (will) केलेले आहे. त्यावर त्यांनी हे इच्छापत्र (will) मानसिक सुस्थितीत असताना केलेले आहे अशी डॉक्टर म्हणून तुझी सही पाहिजे.
हिचे सासरे किमान १२ वर्षांपासून अंथरुणावर खिळून आहेत आणि नैराश्याच्या(depression) आजारासाठी मनोविकार तज्ञाकडून गेली ५-६ वर्षे औषध घेत आहेत.
(हि गोष्ट त्यांनी पत्नीला सांगितली नव्हती पण मागे एकदा दोनदा पत्नी त्यांना घरी तपासण्यास गेली असता औषधे कोणती चालू आहेत हे विचारल्यावर ते समजून आले).
पत्नी ने विचारले कि सासऱ्यांची मानसिक स्थिती पूर्ण सुदृढ आहे हे कसे लिहून देणार? कारण ते गेली काही वर्षे मानसिक सुस्थितीत नाहीत.
मैत्रीण सांगू लागली कि आम्ही त्यांना सांगितले आहे कि इच्छापत्रात काय लिहिलंय ते आणि त्याला त्यांची संमती आहे.
पत्नी म्हणाली पण तुझ्या नणंदेने आक्षेप घेतला तर? मैत्रीण म्हणाली नाही ती आक्षेप घेणार नाही, मला माहिती आहे.
पत्नी म्हणाली, 'उद्या तुझ्या नणंदेने न्यायालयात सांगितले कि गेली ५-६ वर्षे आमचे बाबा नैराश्यावर उपचार घेत आहेत त्यामुळे त्यांनी केलेले इच्छापत्र कमकुवत मानसिक स्थितीत केलेलं आहे म्हणून अग्राह्य आहे तर मी तोंडघशी पडेन आणि खोटे प्रमाणपत्र दिल्याबद्दल उगाच कायद्याच्या कचाट्यात पडेन.
मैत्रीण नाही असं काहीहि होणार नाही. पत्नी म्हणाली कि त्या मनोविकार तज्ज्ञाकडून जो गेले ५-६ वर्षे इलाज करतो आहे त्याच्याकडून तू ही सही घेऊ शकतेस.
पत्नीने असे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला.
यानंतर गेले ७-८ महिने हे कुटुंब आमच्या संपर्कात नाही. त्यांनी आमच्याशी बोलणे बंद केले आहे. अन्यथा आठवड्यात एखादे वेळेस फोन तरी होत असे
२) एक आमच्या वडिलांचे स्नेही अतिवरिष्ठ नागरिक (वय ८० च्यावर) .अतिशय अहंमन्य आणि अतिशहाणा माणूस असे वडिलांचे मत. माझी पत्नी त्यांची फॅमिली डॉक्टर. याना बऱ्याच वर्षांपासून मधुमेह आहे. नियंत्रणात नाही म्हणून पत्नीने त्यांना अनेक वेळेस तज्ञ माणसाकडे दाखवा असे सांगितले होते पण हे महाशय स्वतः संस्कृतचे अभ्यासक असल्याने स्वतःच आयुर्वेदाची पुस्तके वाचून स्वतः वर उपचार करत होते.
याना खोकला झाला. पत्नीने त्यांना कोव्हीडची चाचणी करायला सांगितली आणि त्यांना तुमचा मधुमेह पण नियंत्रणात आणा असे सांगितले. या महाशयांनी दर्पोक्ती केली कि मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयात यांचा एक विद्यार्थी तज्ञ आहे त्याला नुसता एक फोन केला कि तो घरी येऊन माझा इलाज करेल. त्यांनी पत्नीसमोर त्याला फोन लावला त्याने तो उचलला नाही म्हणून यांनी त्याला संदेश पाठवला. त्याने तो (पुढचे सात दिवस तरी) वाचलाही नव्हता त्यांनी कोव्हीडची चाचणी केली नाही.
तीन दिवसांनी त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तेंव्हा यांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यांच्या मुलाने पत्नीला सांगितले, त्यावर पत्नी म्हणाली त्यांची कोव्हीड चाचणी केलेली नसेल तर त्यांना रुग्णालयात घेणार नाहीत.
मग त्यांनी चाचणी केली तिचा अहवाल संध्याकाळी आला त्यात तो पॉझिटिव्ह आला. ऑक्सिजनचे प्रमाण ९० च्या खाली आले होते.
त्यांना रुग्णालयात भरती करायला सांगितले. यांचा मुलगा म्हणाला आम्ही फोर्टिस मध्ये भरती करतो. पत्नी म्हणाली तुम्हाला हवे तेथे पण लवकरात लवकर भरती करा. पण फोर्टिस मध्ये जागा नव्हतीच. मग हा मुलगा परत फोन करून फोर्टिस मध्ये खाट मिळवून द्या सांगू लागला.
त्याला सांगितले कि सध्या तुम्हाला मिळेल तिथे भरती व्हा. याचि आणि याच्या वडिलांची तयारी नव्हती. पत्नीने कळकळीने सांगितले कि पहिल्याने भरती व्हा मग कुठे हलवता येईल का ते पाहू.
यांनी काहीच केले नाही.
मग रात्री १० वाजता श्वास घ्यायला अधिकच त्रास होऊ लागला.ऑक्सिजन ची पातळी ८५ च्या खाली आलेली म्हणून परत यांनी फोन केला.
पत्नीने माझ्या मित्राला सांगून दुसऱ्या रुग्णालयात त्यांच्या भरतीची सोय केली. तेथले तज्ञ म्हणाले नाही तरी त्यांना तुम्ही हलवता आहात तर त्यांचा सीटी स्कॅन करूनच या. त्यासाठी रात्री १२ वाजताची सीटी स्कॅनची अपॉइंटमेंट घेतली. सी टी स्कॅन झाल्यावर रात्री साडे बारा वाजता त्याचा कच्चा रिपोर्टहि घेऊन हे भरती झाले. तेथे त्यांना ऑक्सिजन लावला गेला. डेक्सामेथासोन, रेम डेसीव्हीर, क्लेक्झेन इ सर्व उपचार सुरु झाले.
रुग्णालयात केलेल्या चाचण्यांत यांच्या रक्तातील ग्लुकोज ३८० पर्यंत पोहोचलेली होती. एच बी १ सी १०.५ होते (म्हणजेच गेल्या तीन महिन्यातील सरासरी रक्तातील ग्लुकोज २५० च्या वर होती).
दुसऱ्या दिवशी त्यांना थोडा आराम वाटू लागला. तेंव्हा हे महाशय तेथे आरडा ओरडा करू लागले. सिस्टर माझ्याकडे लक्ष देत नाहीत. काल रात्रीची चादर अजून बदलली नाही. रुग्णालय स्वच्छ नाही. मला घरी पाठवा मी तेथे आपोआप ठीक होईन.
यावर यांच्या चिरंजीवांनी मला फोन केला आणि म्हणाले त्यांना तेथून फोर्टिस मध्ये हलवा. मी त्यांना स्वच्छपणे सांगितले कि फोर्टिस मध्ये अजिबात जागा नाही. पण तुम्हाला जायचे असेल तर "तुम्ही तेथे जागा मिळवा" आणि खुशाल जा. त्यावर ते मला दोष द्यायला लागले कि हे रुग्णालय चांगले नाही तुम्ही कशाला इथे पाठवले? यात तुमचा निष्काळजीपणा आहे. तुम्ही त्यांना ऑक्सिजन लावून घरी पाठवा.
मग मात्र माझा संयम सुटला.
मी त्या चिरंजीवांना स्पष्टपणे म्हणालो कि एकतर तुमच्या वडलांना रक्तातील साखर अफाट वाढलेली असताना तज्ञ माणसाला दाखवायला सांगून तुम्ही दाखवले नाही. त्यावर तो म्हणाला "एकच दिवस झाला. त्यांनी संदेश पाहिला नाही".
मी आवाज चढवून म्हटले कि तीन महिन्याची साखर २५० च्या वर आहे याचा अर्थ तुमच्या वडिलांनीच नव्हे तर तुम्ही पण निष्काळजीपणा दाखवला आहे आणि उगाच आमच्यावर दोष टाकू नका.
वडिलांना ऑक्सिजन वर घरी पाठवले तर त्यांची काळजी कोण घेणार आहे आणि तुम्हाला सर्वाना क्वारंटाईन केलेले आहे.तुमच्या आईचा पण rtpcr पॉसिटीव्ह आहे म्हणू तिचा घरी उपचार चालू आहे.
बाहेरचा कोण माणूस येउन त्यांची काळजी घेणार आहे? उगाच उंटावरून शेळ्या हाकू नका. आणि त्यातून तुम्हाला त्या रुग्णालयातून डिस्चार्ज घययचा असेल तर वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध( against medical advice) घ्या आणि जेथे उपचार करायचेत ते करा. मला काहीही घेणं देणं नाही.
मग यांचा आवाज खाली आला.
पुढचे चार दिवस अक्षरशः दिवस रात्री अपरात्री केंव्हाही फोन करून त्यांनी आम्हाला सळो कि पळो करून सोडले. आठवड्याभराने जेंव्हा वडील डिस्चार्ज घेऊन घरी आले. तेंव्हा या महाशयांचे चिरंजीव मोठ्या आढ्यतेने म्हणाले कि तुम्हाला फोनवर त्रास दिला त्याबद्दल मी तुम्हाला ३ हजार रुपये देणार आहे.
त्यावर माझ्या पत्नीने सांगितले कि तुमचे पाच दिवसात ३५ फोन कॉल झाले आहेत. इतर वेळेस मी ३०० रुपये घेते पण ते माझे जुने पेशंट आहेत म्हणून २०० रुपये प्रमाणे तुम्ही मला सात हजार रुपये द्यायचे.
यावर हे महाशय एवढे पैसे होतात कसे होतात म्हणून विचारत होते?
पत्नी म्हणाली रात्री बारा वाजता तुमची सीटी स्कॅन ची अपॉइंटमेंट घेऊन त्याचा अहवाल रात्री साडे बारा वाजता तुम्हाला माझे मिस्टर रेडिओलॉजिस्ट आहेत म्हणून मिळाला. रुगालयात अपरात्री एक वाजता त्यांनी माझ्या शब्दामुळे बेड रिकामा ठेवला होता. रुग्णालयात तुमचे बिल किती झाले हे तुम्हाला माहिती आहे. माझे वाजवी दर सुद्धा तुम्हाला जास्त वाटत आहेत?
दुसऱ्या दिवशी त्यांनी ७ हजाराचा चेक आणून दिला. वडिलांच्या प्रकृतीबद्दल किंवा तुमच्या मुळे गोष्टी सुसह्य झाल्या याबद्दल एक शब्द नाही.
याला आता ६ महिने होऊन गेले यांनतर हे महाशय पत्नीकडे परत आलेले नाहीत.
मी तर पत्नीला म्हणालो कि असला रुग्ण नाही आला म्हणून आपणच आनंद साजरा करायला पाहिजे.
३) आमच्या घराच्या समोरच्या घरात राहणारे कुटुंब सख्खे शेजारी. आम्हाला सर्वाना ऑगस्ट मध्ये करोना झाला म्हणून आम्ही सर्व १७ दिवस क्वारंटाईन होतो.
तेंव्हा यांनी एकदाही साधे विचारले नाही कि साधा एक फोनहि केला नाही कि तुम्हाला काही हवे आहे का?
यानंतर यांची पत्नी गरोदर राहिली. त्यांच्या स्त्रीरोग तज्ञाने सोनोग्राफी साठी माझ्याकडे पाठवले. तेंव्हा बाळाची वाढ नीट होत नाहीये असे सोनोग्राफीत मला दिसून आले. यावर त्यांच्या स्त्रीरोग तज्ञाने संपूर्णपणे विश्रांती( complete bed rest) घ्यायला सांगितले आहे.
सध्या १८ एप्रिलपासून मुंबईत लॉकडाऊन लावले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्व घरकामाला येणारी मुलगी कळव्या वरुन येत असे तिला लोकल ने प्रवासास बंदी केली आहे.
यासाठी हे महाराज आमच्या कडे येऊन विचारू लागले कि तुम्ही तिला सर्टिफिकेट द्याल का? पत्नीने विचारले कसले सर्टिफिकेट?
त्यावर हे महाराज म्हणाले कि "ती तुमच्या दवाखान्यात काम करते आहे" म्हणून सर्टिफिकेट दिले तर तिला लोकल ने प्रवास करता येईल.
पत्नी म्हणाली असे सर्टिफिकेट कसे देता येईल?
एक तर माझ्या दवाखान्याच्या लेटरहेड वर ते सर्टिफिकेट द्यावे लागते त्यावर तिचा फोटो आधार कार्ड नंबर ती माझ्या कडे केंव्हा पासून कामाला आहे असे सर्व लिहून द्यावे लागते.
त्यातून अशी खोटी सर्टिफिकेट घेऊन लोक प्रवास करतात यामुळे आठवड्यात दोन वेळेस रेल्वेत तपासणी होते तेथे हि मुलगी काय सांगणार? तिने खरे सांगितले कि पोलीस माझ्या दवाखान्यात येऊन खोटे सर्टिफिकेट दिल्याबद्दल मला जबाबदार धरुन कार्यवाही करणार आणि तुम्ही मात्र नामानिराळे राहणार.
हे सर्व कशाला तर तिला बसप्रवासाचे पैसे द्यायला नकोत म्हणून?
तो मान खाली घालून निघून गेला.
पत्नी मला म्हणाली कि एक तर त्याने आपल्याला गरज होती तेंव्हा साधा फोन करण्याचे सौजन्य दाखवले नाही आणि असे खोटे सर्टिफिकेट द्या म्हणून बिनधास्तपणे आपल्याला विचारायला याची जीभ कशी रेटली?
मी तिला म्हणालो चमडी जाये पर दमडी न जाये अशा मनोवृत्तीची हि माणसं आहेत. याना जनाचीच नाही तर मनाचीही लाज नसते.
तिन्ही उदाहरणे गेल्या आठ महिन्यातील आहेत.
लबाडी त्यांनी करायची आणि त्याची लाज किंवा टोचणी तुम्हालाच लावायची कि एवढी साधी गोष्ट तुम्हाला डॉक्टर म्हणून आमच्यासाठी करता येत नाही
तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति
आत्मानं पीडयेत यच्च तत्प्रयत्नेन वर्जयेत.
म्हणजेच
असेच काम करा ज्याने तुमच्या आत्म्याला संतोष पोचेल
आणि
ज्याने तुमच्या आत्म्याला क्लेश होईल असे काम प्रयत्नपूर्वक टाळावे
प्रतिक्रिया
5 May 2021 - 2:04 pm | टवाळ कार्टा
सुशिक्षित भि***ट....अशी उदाहरणे कोविडकाळात जास्त दिसत आहेत
5 May 2021 - 2:18 pm | तुषार काळभोर
एकेका ओळीने संताप वाढत होता.
सर्वाधिक डोक्यात जातात, तज्ञांपेक्षा आपल्याला जास्त कळत असल्याचा आविर्भाव मिरवणारे आणि निर्लज्जपणे तोंडावर पडूनपण मीच कसा खरा हे दाखवणारे गेंड्याच्या कातडीचे लोक.
तिसऱ्या अनुभवातील उदाहरणासारखे दमडी चा विचार करणारे ... यांची फार कीव येते.
वाचताना मनस्ताप होत होता, तुम्हाला अनुभवताना कसं वाटलं असेल कल्पना करवत नाही.
5 May 2021 - 8:05 pm | सुबोध खरे
तज्ञांपेक्षा आपल्याला जास्त कळत असल्याचा असल्याचा आविर्भाव मिरवणारे
हे तर रोजचेच आहे.
गणपती उत्सवाच्या वेळेस वहिनीला पाळी पुढे ढकलण्यासाठी दिलेली गोळी नवरात्रात स्वतः पाळी पुढे ढकलण्यासाठी घेतली आणि नंतर तीन महिने पाळी आली नाही म्हणून माझ्याकडे सोनोग्राफी करायला आलेली अशीच एक स्त्री.
तिला मी सांगितले कि तुम्ही गरोदर आहात. तर त्याच मला उलट तपासणी करत विचारत होत्या असं कसं झालं?
मी शांतपणे त्यांना विचारलं कि हि गोळी तुम्हाला लागू पडेल असं तुम्हाला कसं वाटलं. स्त्रीरोगतज्ञाकडे जाण्यासाठी लागणारे थोडे पैसे वाचवण्यासाठी स्वतः इलाज करताय तर आता त्याचा दुष्परिणाम पण भोगायला तयार व्हा.
तुमच्या पोटात गर्भ आहे जे मला दिसते आहे तेच तुम्हाला दिसते आहे. काही केलं नाही तर गर्भ मात्र मोठा होत जाईल. वेळेत इलाज करा.
5 May 2021 - 2:27 pm | कॉमी
अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आपापल्या ओळखीच्या अतिशहाण्यांना लेखाची लिंक पाठवायला पाहिजे.
5 May 2021 - 2:29 pm | यश राज
डॉ. लोकांना कोविड काळात सगळ्यात जास्त ताण आणि त्रास आहेच व असल्या ### लोकांपाई मनस्ताप पण सहन करावा लागतोय.
काय एकेक नमुने असतात.. हद्द आहे. माझा चुलत भाऊ आणि त्याची पत्नी हे दोघेही डॉक्टर आहेत आणि त्यांचे ही अनुभव जवळपास आपल्यासारखेच आहेत.
5 May 2021 - 3:34 pm | मुक्त विहारि
रुग्ण म्हणून डाॅक्टरांशी कसे वागले पाहिजे?
ह्यावर मेंदूची जळमटे काढणारा लेख ....
एक विनंती आहे,
अशीच उदाहरणे अजून येऊ द्या...
5 May 2021 - 4:35 pm | स्मिता.
जगात असेही लोक असू शकतात याचं फार म्हणजे फारच आश्चर्य वाटतं. अश्या लोकांवर काय संस्कार झालेले असतात देव जाणे!
तिसर्या उदाहरणातल्यासारखे कवडीचुंबक मात्र ठिकठिकाणी भेटत असतात. चांगल्या सधन घरातले, मासिक गलेलठ्ठ पगार, इ. असलेले लोक चिंधीचोरीकरता अनेक बेकायदेशीर कृत्य करतांना दिसतात.
5 May 2021 - 5:06 pm | सुरसंगम
सुंभ जळला तरी पिळ जात नाहीत अशी हे माणसे. यांना कितीही बोला पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
5 May 2021 - 5:21 pm | बापूसाहेब
सुशिक्षित अडाणी लोकं.. यांना कितीही समजवून सांगितले तरी हि लोक सुधारणार नाहीत..
माझ्या आयुष्यात अश्या माणसांना मी काडीचाही थारा देत नाही. एकदा अश्या प्रकारचा अनुभव आला की फोन सुध्दा उचलणे बंद करून टाकतो.. किंवा फोन त्यावेळी न उचलता नंतर करतो. . यात काही फार जवळचे नातेवाईक सुध्दा आहेत ज्यांनी अर्थिकदृष्ट्या वडिलांना अक्षरशः लुटले आहे पण अजूनही मला किंवा माझ्या कुटुंबाला थोडीशी जरी आर्थिक मदत लागली तर हीच लोकं वासाला सुध्दा जवळ येणार नाहीत...!!
5 May 2021 - 5:49 pm | गॉडजिला
आपण खरोखर खरे नसता तर लोकांनी तुम्हाला असे गृहीत धरायचे साहस केले नसते. तुमचे काम, अनुभव, हुशारी, जेष्ठता व तरीही असलेला साधेपणा, हे लोक कधीही समजु शकणार नाहीत. देव करो आणी त्या लोकांनीही हा लेख वाचो...
5 May 2021 - 5:51 pm | सिरुसेरि
कसोटी पाहणारे गंभीर अनुभव .
5 May 2021 - 5:55 pm | सरिता बांदेकर
तुम्हाला मी त्रास दिला म्हणून ३०००₹ देत आहे
हे वाचताना तर माझे हात शिवशिवत होते.एक कानाखाली द्यावीशी वाटत होती.
डॅा म्हणजे काय वाटतं? जेव्हा डॅा. सांगतात तेव्हा दुर्लक्श करायचं. का तर म्हणे यांचं रॅकेट असतं.आणि गळ्याशी आलं तरी कृतद्यता नाहीच.
असे अनुभव नक्की लिहा... जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लेख पोचला पाहिजे.
5 May 2021 - 6:15 pm | योगी९००
बापरे... फार वाईट अनुभव. अशी लोकं केवळ तुम्ही डॉ. आहात म्हणून संबंध ठेवतात.
माझी पत्नी पण डॉ. आहे आणि तिलाही असे बरेच अनुभव आलेत. थोडक्यात सांगायचे झाले तर एरवी समोरून मुद्दामओळखसुद्धा न दाखवणारी माणसे कोवीड काळात रात्री अपरात्री कधीही अगदी साध्या कारणांसाठी फोन करायची. डॉ. फी विचारणे तर नाहीच (तशी आम्हाला असल्या लोकांकडून फी नकोच होती. उगाच मग आम्हाला विकत घेतल्यासारखे वागतील मग...).
5 May 2021 - 6:49 pm | उपयोजक
कृतघ्न आणि स्वार्थी
5 May 2021 - 7:38 pm | पिनाक
काय बोलावे समजत नाही. परदेशातील लोक नॉर्मली अशा बाबतीत चांगले वागणारे असतात. भारतातच असे हरामखोर कसे काय मोठ्या संख्येने असतात कळत नाही. कोव्हीड मध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी होऊन असे लोक कमी होतील अशी मला आशा होती. पण हे लोक मरत ही नाहीत लवकर.
5 May 2021 - 7:44 pm | मुक्त विहारि
एक उदाहरण देतो ...
आपल्या कडे, शुगर आणि हीमोग्लोबिन चेक करायला काहीच त्रास पडत नाही ....
250 ते 300 रुपयांत आणि एका दिवसांत होते आणि त्यासाठी डाॅक्टरचे नांव सांगीतले तरी पुरते ....
परदेशांत ही रिस्क कुणीही घेत नाही ....
आपल्या देशांत अजूनही डाॅक्टरला देव मानणारी माणसे आहेत.
5 May 2021 - 8:00 pm | कंजूस
ठेवणारे लोक आहेत.
१) बिलं घेणे. हा प्रकार इतका वाईट आहे की ते एक कमाईचे साधन म्हणून पाहतात. जेव्हा जागा बदलतात तेव्हा नवीन ठिकाणी बिले देणारे कोण आहेत ही शोधाशोध सुरू करतात. ( त्यांनी जुन्या ठिकाणी काही फिक्सींग केलेले होते.) तर ते माझ्या भागात आल्यावर मला असं कोणी आहे का विचारले. मी त्यांना तीन नावे सांगितली आणि यांच्याकडे जाऊ नको सांगितले तरीही ते गेलेच. तिघांनीही हाकलले . "तुम्ही चुकीच्या जागी आला आहात" हे सांगितले.
एक डॉक्टर कायम वेळच्या वेळी दवाखाना उघडून बसायचा पण एकही पेशंट नसायचा. त्याला याने स्पष्टच विचारले की असेही पेशंटस दिसतच नाहीत तर काही कमाई होईल तुम्हाला आणि मलाही. यावर तो डॉक्टर म्हणाला की मी डॉक्टर आहे पण माझा व्यवसाय वेगळा आहे तो इथे बसून करतो.
5 May 2021 - 8:06 pm | कंजूस
कुठे काही ओळखीने बिनबोभाट काम होईल ही अपेक्षा राखून असतात. आणि नाही म्हटलं की संबंध तोडून टाकतात.
7 May 2021 - 8:05 pm | सुबोध खरे
हाच सर्वात मोठा प्रश्न आहे.
डॉक्टरकडे अवाजवी मागण्या केल्या जातात. यात माझे स्वतःचे वर्गमित्र आहेत. शेजारचे लोक आहेत.
ज्यांनी मला लहानपणापासून पहिले आहेत असे अनेक वरिष्ठ नागरिक आहेत. जेंव्हा मी लष्करात होतो तेंव्हा मी लहानपणी राहत असलेल्या सोसायटीत शेजारी पाजारी याना फुकट सल्ला देत होतो. परंतु जेंव्हा मी माझ्या ४० महिन्यांचा पगार टाकून एक १५० चौ फुटांचा दवाखाना याच सोसायटीत विकत घेतला तेंव्हा मला सोसायटीने एक रुपया सवलत दिली नाही. आणि दवाखाना सुरु केल्यावर याच लोकांची अपेक्षा होती कि मी याना फुकट तपासावे.
तसे न केल्यानंतर आता सुबोध पैशाच्या मागे लागला आहे असेही माझ्या पाठीमागे बोलताना ऐकले आहे.
यानंतर अनेकांनी खोटे मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी मागणी केली होती. असे कोणतेही खोटे सर्टिफिकेट मी देत नसल्याने जेथे लहानाचा मोठा झालो अशा ५६ फ्लॅटच्या सोसायटीत माझी पत्नी फार तर ६-७ फ्लॅटच्या कुटुंबाची फॅमिली डॉक्टर आहे.
यासाठी लष्करातील माणसे तिरसट असतात या समाजातील साधारण समजुतीचा मी फायदा घेतो.
कोव्हीड काळात तर लोकांच्या कोत्या आणि अत्यंत स्वार्थी मनोवृत्तीचे इतके अनुभव आले आहेत कि तेच तेच परत परत उगाळून आपला मूड खराब करण्यात मला रस वाटत नाही.
5 May 2021 - 8:25 pm | बोलघेवडा
कोणताही डॉक्टर आणि शिक्षक असो मला त्याच्याविषयी नितांत आदर आहे. लोक अस कसं वागू शकतात हा प्रश्न पडतो.
मी नुकताच हॉस्पिटल मधून बरा होऊन बाहेर पडलो. त्या वेळी उपचार करत असलेल्या डॉक्टर ला सर्वांसमोर वाकून नमस्कार केला.
दुसरा देवच तो!!
5 May 2021 - 11:25 pm | सुक्या
दुसरा देवच तो!!
सहमत ...
माझ्या गावात एक मंदीर आहे. लॉकडाउन मधे ते बंद होते. तिथे लिहिलेली एक पाटी खुप छान होती ..
"मंदीर बंद आहे कारण देव आत नाही. तो जवळच्या रुग्णालयात कोविड वर उपचार करतो आहे"
6 May 2021 - 10:46 am | सुबोध खरे
कृपया डॉक्टरना देव समजू नका कारण त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षा निर्माण होतात.
ती पण तुमच्या सारखीच हाडा मांसाची भावना असणारी माणसेच आहेत.
केवळ शरीरशास्त्राबद्दल अभ्यास केल्यामुळे ते या विषयात तज्ञ म्हणून काम करतात आणि त्यांना मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग ते आजार बरा करण्यासाठी करतात.
प्रत्येक बरा न होऊ शकलेल्या रुग्णाचा त्यांनाही तितकाच मानसिक त्रास आणि ताण होत असतो.
काही जण तो व्यक्त करतात आणि काही जण ते ओझे मनात बाळगल्यामुळे नैराश्य रक्तदाब हृदयविकारासारख्या आजाराला बळी पडतात.
6 May 2021 - 11:24 am | मुक्त विहारि
डाॅक्टरला देव समजल्यामुळे, रोग्याची मानसिक ताकद वाढत जाते. (वैद्यकीय भाषेत, प्लासिबो इफेक्ट)
काही काही रुग्णांना विशिष्ट डाॅक्टरच हवा असतो ...
---------'
दुसरा मुद्दा म्हणजे, डाॅक्टरांना देव समजल्या मुळे, सर्वसामान्य माणूस, डाॅक्टरांना मारहाण करत नाही...
6 May 2021 - 11:54 am | सुबोध खरे
डाॅक्टरांना देव समजल्या मुळे, सर्वसामान्य माणूस, डाॅक्टरांना मारहाण करत नाही
हे अजिबात मान्य नाही
देवावर श्रद्धा असलेलं लोक जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर देवाच्या मूर्ती विहिरीत टाकण्याची अनेक उदाहरणे आहेत.
जेंव्हा श्रद्धेला ठेच लागते तेंव्हा माणसे अविवेकी वागतात हे सर्वत्र दिसते.
6 May 2021 - 6:30 pm | मुक्त विहारि
ही टक्केवारी, जास्तीत जास्त, 5% टक्क्यांच्या वर नसेल ...
असो,
तुम्ही आधी स्वतःला माणूस समजता आणि मग डाॅक्टर
तर
आम्ही तुमच्या सारख्या मंडळींना आधी डाॅक्टर समजतो आणि मग माणूस
----------
माझे मेहुणे डाॅक्टर आहेत आणि त्यांचे पण मत, तुमच्या सारखेच आहे.
दोघांचेही दृष्टिकोण आपापल्या जागी परस्पर विरोधी आणि योग्यच आहेत... त्यामुळे मी थांबतो ...
21 May 2021 - 7:02 am | गुल्लू दादा
डॉ.ना देव समजणे चूक. अवाजवी अपेक्षा खरंच तयार होतात. शिकत असताना अनेकदा वरिष्ठांना मारहाण झालेली बघितलेली आहे. 'हा कसला देव याला तर चपलाने मारलं पाहिजे. नुसते पैसे पाहिजेत ह्यांना.' आता तुम्हीच सांगा सरकारी रुग्णालयात लोकांना चार्जे पडतो फक्त 10 रु. आणि डॉ. चा पगार सुद्धा फिक्स असतो मग पैसे पाहिजेत हा विषय आला कुठून. आणि आपण म्हणता की डॉक्टरांना देव समजल्याने मारहाण होत नाही...अहो साहेब काही लोक तर देवांना मानतच नाहीत..काही तर धर्म असे आहेत जे देवाला शिव्या घालतात. मग त्यांनी डॉ. दिसला की शिव्या चालू कराव्यात कारण तो देव आहे. अवाजवी अपेक्षा म्हणजे काय हे डॉ. म्हणून काम केल्याशिवाय समजणे अवघड.
6 May 2021 - 9:49 pm | सुक्या
तुमचे म्हणने ही बरोबर आहे ... परंतु आमच्या सारख्या लोकांना डॉक्टर हे देवासारखेच असतात. खरं सांगायचे तर नोबेल प्रोफेशन म्हटले की डोळ्यासमोर डॉक्टर / शि़क्षक / सैनिक हेच उभे राहतात ..
राहीली गोष्ट अवास्तव अपेक्षा निर्माण होण्याची. ती साधारण्पणे तुम्ही वर्णन केलेल्या लोकांकडुन होते. बहुसंख्य लोक डॉक्टरही माणुस आहे त्यालाही मर्यादा आहेत, सर्व काही त्यांच्या हातात नाही हे जाणुन असतात. खाली लिहिल्याप्रमाणे मारहाण किंवा त्रास देणे असले प्रकार माजुरड्या लोकांकडुन होतात ज्यांना मंदीरातही स्पेशल ट्रीटमेंट हवी असते.
7 May 2021 - 9:15 am | योगी९००
डॉक्टरांना देव म्हणावे तरी प्रॉब्लेम, माणूस म्हणावे तरी प्रॉब्लेम....
आता तर देवमाणूस म्हणावे तरीही प्रॉब्लेम.....
7 May 2021 - 9:28 am | सुबोध खरे
माणूस म्हणावे तरी प्रॉब्लेम
??
7 May 2021 - 9:38 am | मुक्त विहारि
भृणहत्या करणारे, किडनीचा व्यापार करणारे आणि इतरही अवैध धंदे करणारे काही डाॅक्टर आहेतच....
अशा डाॅक्टरांच्या बाबतीत बोलत आहेत ....
7 May 2021 - 9:44 am | सुबोध खरे
ते नराधम
7 May 2021 - 9:45 am | सुबोध खरे
माणूस म्हटले कि त्याला येणारे सर्व गुण दुर्गुण त्याबरोबर आलेच
7 May 2021 - 9:24 pm | गॉडजिला
म्हणजे प्रसंगी माणसाचे दुर्गुणही प्दरी घ्यावे हीच अपेक्शा...
5 May 2021 - 8:48 pm | मदनबाण
माजुरडे मस्तवाल लोक... हल्ली यांची देशात संख्या देशात जरा जास्तच झाली आहे !
ते कोण तरी सांगुन गेलय ना... समाजा मध्ये मुर्खांना किंमत आल्याने सज्जनांना त्रास झाला.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Raja
5 May 2021 - 11:19 pm | सुक्या
पैशाची सुज आलेले माजुरडे लोक हे असले भिकारी धंदे करतात.. असल्यांचा चार चौघात मस्त अपमान केला पाहिजे ...
माझ्या ओळखीतले एक प्रकरण आहे ..
हे साहेब आनी त्यांचे कुटुंब दिल्लीत राहातात. पैशाचा प्रचंड गर्व. घरात करोना घुसला आणी पैसे घेउन रुग्णालये फिरले. पंचतारांकीत / तीन तारांकीत रुग्णालये भरलेली. नाइलाजाने सरकारी रुग्णालयात जावे लागले ते त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसे नव्हते ... या सार्या प्रकारात मुलीची (वय ३२ फक्त) प्रक्रुती नाजुक झाली. सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन लाउन डॉक्टरांनी तिला स्थीर केले ...
लगेच ये क्य हॉस्पिटल है .. यहा तो कुच है ही नही .. एसी भी नही .... वगेरे तक्रारी सुरु ... डॉक्टरांविषयी चांगला शब्द नाही . . .
कुठेतरी पैसे देउन खाट मिळवली ... सरकारी दवाखाण्यातुन निघाले ... तिथे जाइपर्यंत दुसरा सिरियस रुग्ण तिथे भरती झाला ... पैसे परत दिले हॉस्पिटल ने... आता ?
पुन्हा सरकारी दवाखाना ... तिथेही जागा नाही ... ६ तास पुन्हा इकडे तिकडे खाटा शोधायला धावाधाव ...
त्या सार्यात मुलगी ऑक्सिजन न मिळाल्याने पुन्हा सिरियस झाली ... आनी त्यातच दगावली ...
आता काय करणार त्या पैशाचे??
वाईट वाटले ... फुकाच्या स्टेटस पायी एक जीव गेला ... तो ही उने पुरे फक्त ३२ वर्षे जगुन ...
6 May 2021 - 10:41 am | मुक्त विहारि
जाऊ दे...
6 May 2021 - 10:59 am | Bhakti
सुशिक्षित अडाणीपेक्षा , अशिक्षित माणूसकी असणारे बरे !
6 May 2021 - 11:56 am | सुबोध खरे
सुशिक्षित अडाणीपेक्षा , अशिक्षित माणूसकी असणारे बरे !
माणुसकी चा आणि शिक्षणाचा अजिबात संबंध नाही.
उलट अशिक्षित माणसे अत्यंत टोकाची भूमिका सहज घेऊ शकतात.
काही विशिष्ट समाजाची मसने याचे उत्तम उदाहरण आहे.
6 May 2021 - 11:59 am | अनुप ढेरे
अजून एक हलकटपणा पाहण्यात आला आहे. घरातील कोणी व्यक्ती पोझिटिव्ह असल्यास कामवाल्या बायकांना ते न सांगणे. का तर त्या कामाला यायला नाही म्हणाल्या तर काय!
6 May 2021 - 6:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टरसाहेब, अनुभव वाचत आहे. लिहिते राहा. पुलेशु.
-दिलीप बिरुटे
6 May 2021 - 9:53 pm | प्रचेतस
एकापेक्षा एक अनोखे अनुभव आहेत तुमच्याकडे
7 May 2021 - 11:41 am | प्रकाश घाटपांडे
याचे वैद्यकीय निकष काय आहेत? ते मानसोपचार तज्ञाव्यतिरिक्त अन्य डॉक्टर कसे देऊ शकतात?
7 May 2021 - 1:35 pm | सुबोध खरे
mental status examination and neurological examination.
या चाचण्या एम बी बी एस च्या पातळीवर शिकवल्या जातात आणि केल्या जातात. त्यासाठी मनोविकार तज्ज्ञाची अजिबात गरज नाही.
उदा गुढघ्यावर एक छोटी हातोडी मारून रिफ़्लेक्स तपासले जातात. तुमच्या हाताला आणि त्याच्या स्वतःच्या नाकाला आलटून पालटून स्पर्श करताना त्याचे स्नायूंचे संतुलन पाहता येते. साधी पंधरा अधिक सत्तावीसची बेरीज करता येते कि नाही. माणसाला स्वतःची सही व्यवस्थित करता येते का?
आज तारीख वार काय आहे. सद्यस्थिती काय आहे? आपले मुख्यमंत्री कोण? असे साधे प्रश्न विचारून त्या माणसाची मानसिक स्थिती तपासता येते.
वर उल्लेख केलेले सद्गृहस्थ गेली काही वर्षे अंथरुणावर पडून आहेत आणि बहुतेक वेळेस ग्लानीतच असतात.
त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती सक्षम नाही हे कोणीही सांगू शकले असते आणि त्यांच्या मूला सुनेलाही माहिती होते.
7 May 2021 - 11:53 am | चौथा कोनाडा
निगरगट्ट असतात लोक !
7 May 2021 - 2:21 pm | राघव
वाईट अनुभव आहेत. डोकंच फिरतं. :-(
डॉक, कोविडमधले काही चांगले अनुभव लिहा हो.
सध्या सर्वत्र होत असणार्या घटनांमुळे मन अगदी विटून गेलेले आहे. त्याला जरा उभारी येईल.
7 May 2021 - 9:27 pm | लई भारी
त्रासदायक अनुभव आहेत. बऱ्याच ठिकाणी असे बघितले आहे.
एक जवळचा मित्र डॉक्टर आहे. छोटे हॉस्पिटल आहे. खूप सचोटीने करतो, म्हणजे गरीब पेशंटची फी राहू दे, औषधे सुद्धा मोफत द्यायची व्यवस्था करतो.
त्याला आलेला एक अनुभव मांडतो इथे.
------------------------------------------------------------------------
पाच महिन्या पूर्वीची गोष्ट ...
पहिल्या खेपेची बाई प्रसुती साठी दवाखान्यात admit झाली. पहिल्या खेपेच्या बाई ला काही धोके नसतील व नॉर्मल डिलिव्हरी होणे शक्य असेल तर नॉर्मल डिलिव्हरी साठी पूर्ण प्रयत्न केला जातो. मात्र कुठलीही सहज सोपी वाटणारी गोष्ट प्रसुती दरम्यान गुंतागुंतीची होऊ शकते. आणि अशा वेळी डॉक्टरांची बुद्धी व शक्ति हे दोन्ही पणाला लागतात. दवाखान्यात कुठलीही पेशंट डिलिव्हरी साठी admit hotana normal delivery साठी पूर्ण प्रयत्न करू मात्र काही अडचण उदाभवल्यास बाळाचे ठोके कमी होत असल्यास emergency Cesarean तात्काळ करावे लागू शकते याची कल्पना सर्वांना दिली जाते. तशी या ही पेशंट व सोबत असणाऱ्या नातेवाईकांना हि दिली होती. Admit झाल्या झाल्या नॉर्मल प्रसुती साठी जी काही उपचार पद्धती असते त्यानुसार तातडीने उपचार सुरू झाले. दुर्दैवाने चार तासानंतर बाळाने पोटात शी केली.
हे निदान आम्हाला कसे समजते? डिलिव्हरी च्या वेदना सुटल्यावर कलेसोबत बाळा भोवतीचे आवरण छेदले जाऊन आतील पाणी बाहेर येते, बाळास काही त्रास नसेल तर हे पाणी पाण्यासारखे स्वच्छ दिसते. मात्र बाळाने शी केली असल्यास हे पाणी हिरवट बाहेर येते. नॉर्मली बाळ जन्मानंतर त्याची पहिली शी करते. मात्र प्रसुती कळa सुरू असताना बाळाला रक्तपुरवठा किंवा ऑक्सिजन पुरवठा यामध्ये अडथळा होत असेल व याचा बाळाच्या शरीरातील हृदय, मेंदू यंत्रणेवर ताण पडत असेल तर बाळ पोटात शी करते. व ते हिरवे पाणी म्हणून बाहेर येते.
हे हिरवे असणारे पाणी अगदी पातळ पाण्यासारखे असेल, बाळाचे ठोके व्यवस्थित असतील,गर्भपिश्र्विचे तोंड पूर्ण उघडलेले असेल व प्रसुती लवकरात लवकर करणे शक्य असेल तर आम्ही डॉक्टर्स नॉर्मल प्रसुती करतो. मात्र शी घट्ट असेल, पिशवीचे तोंड उघडलेले नसेल व बाळाचे ठोके अनियमित किंवा कमी होत असतील तर emergency Cesarean section चा निर्णय घ्यावा लागतो. कारण बाळाला meconium aspiration syndrome होऊन मोठा धोका उदभवू शकतो.
वरील नमूद केलेल्या रुग्णाच्या पिशवी चे तोंड केवळ २.५-३ cm इतकेच उघडलेले होते,( डिलिव्हरी होताना पिशवीचे तोंड पूर्ण म्हणजे १० सेमी इतके उघडे असावे लागते) बाळाने केलेली शी ही घट्ट होती. बाळाने पोटात शी केल्याचे निदान घरच्यांना सांगितल्यावर तिच्या आई स गेलेले हिरवे पाणी पेशंट जवळ नेवून (meconium) ही दाखवण्यात आले होते. बाळाचे ठोके अनियमित होत होते. Emergency Cesarean chi गरज लागणार असे सांगितल्यावर रुग्णाच्या भावाने वाद सुरू केला. त्यास शांतपणे समजावून बाळाला काय काय त्रास होऊ शकतो याची पूर्ण कल्पना दिली. तोपर्यंत बाळाचे ठोके नियमित राहावे म्हणून ऑक्सिजन, सलाईन infusion Ani तत्सम सर्व उपचार सुरू होतेच. बराच वेळ वाद करत नातेवाईक cesarean chi समती देईना. यादरम्यान नातेवाईकांचा कायम फोन सुरू होता व पलीकडील व्यक्ती डॉक्टर खोटे बोलत आहेत व meconium असेल तरी नॉर्मल होतेच हे सांगून भडकवत होती. इकडे बाळाचे ठोके प्रचंड अनियमित होऊ लागले. बाळास त्रास होतोय, ठोके अनियमित आहेत हे त्यांना बाळाचे कमी होणारे ठोके ऐकवून सुद्धा पटत नव्हते. बाळाचे कमी होणारे ठोके माझी अस्वस्थता वाढवत होती. वेळोवेळी सांगून काहीच उपयोग होईना, रुग्णाच्या भावाला भांडण्याशिवाय दुसरे काहीच बोलायचे नव्हते. एक दीड तास अविश्वास व वाद याने नको नको से झालेले. जर लवकरात लवकर बाळ गर्भाशयात तून बाहेर काढले नाही तर asphyxia किंवा दगावू सुद्धा शकते हे काही केल्या त्यांना कळेना. शेवटी " तुम्ही निर्णय देत नसाल तर होणाऱ्या संभाव्य बाळाच्या परी स्थितीस doctor किंवा हॉस्पिटल जबाबदार नसेल " अशी संमती घेतली गेली. तुम्ही नॉर्मल करणार नसाल तर patient आम्ही दुसरीकडे घेऊन जातो असे म्हणत त्या प्रसुती वेदनेने तळमळ नाऱ्या मुलीला घेऊन जाऊ लागले. बिचाऱ्या त्या मुलगी व आई चे त्या भावाच्या हट्टपुढे काही चालेना. refferal note देऊन रुग्ण व बाळाला पुढे अडचण नको म्हणून गेल्यावर तिथल्या डॉक्टर शी फोन वर बोलतो, काही गरज लागल्यास कळवा मदत करू असेही सांगितले. बाळाचे कमी होणारे ठोके या माणसाच्या हट्टापुढे हरणार याची मला भीती होती. दुर्दैवाने हॉस्पिटल मधून बाहेर पडताना पेशंट शुद्ध हरपून पडली. आम्ही पळत जाऊन तिला घेऊन आलो, बीपी कमी झालेला, तिला तातडीने योग्य ते उपचार सुरू केले. यावेळी तिची आई पाया पडून गयावया करू लागली. व cesarean घ्या अशी विनंती करू लागली. भावाने रागारागाने cesarean chi लेखी व तोंडी ( रेकॉर्डेड) संमती दिली. मात्र शी केल्याचा पुरावा हवा असे सांगितले. यानंतर ताबडतोब cesarean करण्यात आले. बाळ कसे असेल याबद्दल मला प्रचंड ताण होता. कारण मागच्या दोन तासापासून निरर्थक त्याच्या जीवाशी खेळ सुरू होता. बाळ बाहेर आल्यावर meconium aspiration झाले होते, बाळाच्या डॉक्टरानी शी केलेले तिच्या भावास आत बोलावून दाखवले सुद्धा. बाळ रडले परंतू श्वासास त्रास होत असल्याने बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. पुढील तीन ते चार दिवसात बाळास NICU तून आई कडे देण्यात आले. मी व माझा हॉस्पिटल स्टाफ पेशंट व बाळ सुखरूप असल्याने खुश होतो. पेशंट व तिची आई झाल्या प्रकाराबद्दल क्षमस्व होती. बाळाला distress असताना सुद्धा योग्य वेळी निर्णय न दिल्याने काचेच्या पेटीत हलवावे लागले याबद्दल भावाला वाईट वाटत असेल असा आमचा समज होता.' माझ्या आई ची ऐपत नाही' म्हणत बिलातले बरेच पैसे आम्ही माफ केले. पेशंट सुखरूप discharge झाली. तिच्या सोबत आम्हाला झालेला मानसिक त्रास सुद्धा आम्ही विसरलो. मात्र पेशंट चा भाऊ व नवरा यांचा राग इतके दिवस धुमसत असेल याची कल्पना आम्हाला नव्हती.
काल पाच महिन्यानंतर ते दोघे क्लेम संदर्भात भेटायचे म्हणून ओपीडी त आले. मात्र पुढील एक तास असंबंध आरोप करत धमकीवजा भाषेत वाद घालू लागले. बाळाने शी केल्याचे पुरावे मागत होते. तिचा नवरा मी तुम्हाला सोशल मीडिया वर बदनाम करणार व तत्सम नको त्या बऱ्याच गोष्टी माझी पोहोच वरपर्यंत आहे सांगत बरळत सुटला. आई व बाळ दोघे सुखरूप आहेत याचे धन्यवाद मानावे की विनाकारण डॉक्टर ना मानसिक त्रास द्यावा! ज्या भावाला बाळाच्या डॉक्टर ने meconium दाखवले होते. तो मजा घेत हसत बसला होता. या विक्षिप्त माणसाला ' बाळाने शी केल्याचे पुरावे तथा माझ्यासमोर विनाकारण घालत असलेला गोंधळ व धमकी याचे उत्तर मला ' कायदेशीर पद्धतीने ' सहज देता येणार आहे. भावाने त्या वेळी घातलेला दंगा पाहता त्याचे photos, recording ,paper notes cesarean veli ch व्यवस्थित मांडलेले आहेत.
परंतु एकूण हा प्रकार पाहता, माझ्या सेवाभावी वृत्तीला नक्कीच प्रश्न पडणार ..झोप तहान भूक विसरून, मुल बाळ पाठी सारून, दिवस रात्र एक करून रुग्णांच्या सेवेसाठी आम्ही सतत झटत असतो. डॉक्टर वर इतका अविश्वास असेल आणि डोक्यात गैरसमज घट्ट रोवलेले असतील, तर रुग्णासाठी कितीही योग्य पद्धतीने उपचार सुरू असेल तरी असमाधानी वृत्तीचा अंधार कायम राहणार. शेवटी कावळा पांढराच असे जर यांचे न बदलणारे मत असेल तर अगदी धन्वंतरी देवता सुद्धा उपचारास अवतरली तरी तिला असे लोक अपमानित करतील...
आपण समाजासाठी सेवाभावी काम करत आहोत याचा डॉक्टर झाल्यावर फार आनंद असायचा... पण आता समाजाचे हे असे चेहरे पाहून दुःख होते..
8 May 2021 - 1:06 am | योगी९००
फारच भयानक अनुभव..
असल्या लोकांचे नाव देऊन अनुभव छापायला हवेत.
21 May 2021 - 7:16 am | गुल्लू दादा
अनुभव शेयर केल्याबद्दल.
20 May 2021 - 6:48 pm | सुबोध खरे
पहिल्या किश्श्यात लिहिलेल्या सद्गृहस्थाना स्वतःला रक्तदाब असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र हवे होते.
( अर्थात त्यांना रक्तदाब आहेच आणि त्यावर त्यांचा नियमित उपचार चालूआहेच, त्यामुळे प्रमाणपत्र देण्यात असे काही चूक नाही)
त्याबद्दल त्यांनी अगोदर व्हॉट्स ऍप वर संदेश टाकून ठेवला होता आणि आज येऊन जसं काही अगोदर झालंच नाही या थाटात गप्पा मारून प्रमाणपत्र घेऊन गेले.
माझ्या सारखा माणूस असता तर अगोदर असे वागल्याबद्दल मला भयंकर लाज वाटली असती आणि वैद्यकीय प्रमाणपत्र मागताना संकोचही वाटलं असता.
पण लोकांना काहीच वाटत नाही आणि ते निःसंग असतात याबद्दल आश्चर्य वाटले (आणि थोडी असूया हि वाटली).
21 May 2021 - 7:52 am | गुल्लू दादा
मला लहानपणापासून समाजसेवा करायची म्हणून डॉ. व्हायचे असे वाटायचे. वैद्यकीय शिक्षण झाल्यानंतर सुद्धा मनोभावे सेवा करायची हाच विचार होता. जसे जसे अनुभव येत जातात तसा डॉ. सुद्धा स्वतःमध्ये बदल करत जातो. हजारो रुग्ण सेवा केली आणि एक रुग्ण जरी मूर्खा सारखं वागून गेला तरी तो मूर्ख च लक्षात राहतो कारण त्याचा आपल्याला त्रास झालेला असतो. अर्थात आपण ते विसरून समोर कामाला लागायला हवं पण ते इतकं सोप्प नव्हे. डॉ.सुद्धा माणूस आहे त्याला देवाचा दर्जा देऊन तो सगळ्यांना माफ करेल आणि मार सुद्धा खाऊ शकेल ही अपेक्षा चूक. चूक माफी, पैसे माफी आणि मार देण्यासाठी जर तुम्ही त्याला देव करणार असाल तर नको ते देवपण. माणूस म्हणून वागवा त्यातही तो सुख मानेल. काही लोक तर घरून ठरवून आलेले असतात आज तमाशा करायचा हॉस्पिटलमध्ये म्हणून. अश्यांना काय करावे. पोलिस सुद्धा रुग्णाची बाजू घेताना पाहिलंय. कायद्या विषयी तर न बोललेले बरे. कठोर शिक्षेची अंमलबजावणी नसल्याने कायदाच नाव काढलं की गुन्हेगार निःस्वास टाकतो. त्याला माहित आहे कायद्याचे पुजारी च वाचवणार. घरी गडगंज संपत्ती असताना सुद्धा फीस माफीची अपेक्षा, त्याला कशी सूट दिली मग मला का नाही ही भावना. गरीब कोण? गरजू कोण? गरीब आणि गरजू तर सगळे हावरट लोक असतात त्याचा संपत्तीशी संबंध नसून तो नियतीशी असतो असे माझे मत. रात्री बे रात्री मदत मागणे नंतर आम्हाला गरज असताना दूर पळणे. खूप वाईट अनुभव आहेत. अश्या वेळी मग मन समाजसेवा म्हंटल की हे अनुभव डोळ्यासमोर येतात. सरकारी रुग्णालयात चांगल्या डॉ.ची कमतरता हे याच लोकांमुळे आहे. मी कितीही कमी पैश्यात सरकारी हॉस्पिटल मध्ये काम करण्यास तयार होतो पण लोकांची अरेरावी, तमुक पक्षाचे कार्यकर्ते, नेते, नातेवाईक सर्वांचा त्रास होतो. मग दिली सरकारी नोकरी सोडून. आता परत त्या वाटेला जाणार नाही असे सध्या तरी ठरवलंय. बघू समोर कधी निर्णय बदलालच तर...बाकी खरे सर लेख छान आहे चांगले अनुभव असतील ते सुद्धा जरूर लिहा. बरेच चांगले अनुभव सुद्धा येतात. आपली वाईट वेळ आल्यास चांगले लोक सुद्धा वाईट अनुभव देऊन जातात हा वेगळा विषय. कोविड काळात मी लोकांना फ्री सेवा दिली. नातेवाईकांना सुद्धा स्वतः जाऊन मदत केली. हे करत असताना मी सुद्धा कधी तरी पॉसिटीव्ही येणार हे माहीत असताना सुद्धा केली. घरचे ओरडायचे तरी केली, कारण मला समाजसेवा करायची होती ना. जेव्हा मी पॉसिटीव्ही आलो तेव्हा मला माझ्या जवळच्या नातेवाईकांनी डब्बा सुद्धा देण्यास चक्क मनाई केली. दुसऱ्यांनी मदत केली तर ते 2 वेळचा डब्बा एकदाच करून ठेवत. रुग्ण असताना सकस आहार लागतो म्हणे. अखेर मी समाजसेवा सोडून तसाच घरी आलो. आता नीट झालोय. अजून काय बघावे लागणार मला. बघूया कुठवर तग धरते आपली सहनशक्ती ते....बऱ्याच गोष्टी आहेत पण लिहायचा कंटाळा येतो. आणि लिहायचं कोणासाठी हा पण प्रश्न नाही का?
21 May 2021 - 3:42 pm | शाम भागवत
सगळ्याच क्षेत्रात तुमच्यासारखी थोडी माणसं असतात म्हणून अजूनही बरच काही सुरळीत चालू आहे नाहीतर .........
🙏
21 May 2021 - 4:49 pm | शलभ
+१
21 May 2021 - 3:49 pm | गॉडजिला
देख तेरेको जैसा समाजका जरुरत है >
.... वैसे समाजको भी तेरा जरुरत रेहता रे बाबा...
पर दुनिया साली सप्लाय डिंमांडकी मोहताज हे रे... तु नाही तेरे जैसे कितने है ये मॅटर करता इधर... समजले बात को और चिल्ल मार.
22 May 2021 - 12:23 pm | सुबोध खरे
डॉक्टरना समाजाची गरज आहे हि वस्तुस्थिती मान्य केली तरी आताशा स्वतःच्या शरीराला झीज लावून समाजसेवा करावी असे मला अजिबात वाटत नाही. सोसल तेवढीच सोशल सर्व्हिस करावी
दोन आठवड्यापूर्वी माझ्या पत्नीला रात्री १० वाजता तिच्या शाळेतील मैत्रिणीचा फोन आला. मैत्रिणीच्या भावाला कोव्हीड साठी औरंगाबाद मध्ये रुग्णालयात भरती करण्यासाठी खाट मिळत नव्हती यासाठी फोन केला. ( माझ्या पत्नीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून ( घाटी) एम बी बी एस केले आहे त्यामुळे तेथे तिचे बरेच वर्गमित्र व्यवसाय करत आहेत)
त्यासाठी माझ्या पत्नीने आपल्या दोन तीन मित्रांना रात्री फोन करून बेड मिळवण्यासाठी खटपट केली. एकाने सांगितले कि मी सोय करतो. तिला मला फोन करायला सांग.
पत्नीने तिला परत फोन केला तेंव्हा ती म्हणाली कि अग एक बेड मिळाला आहे पण तो चांगला नाही म्हणून मी तुला फोन लावला परंतु मी आपल्या वर्गातील अजून दोघा (डॉक्टरांना) ना फोन लावला त्यातील एकाने चांगल्या बेडची सोय केली आहे तेंव्हा आता मला बेड नकोय.
रात्री साडे अकरा वाजता पत्नीने फोन करून आपल्या वर्गमित्रांची त्रास दिल्याबद्दल माफी मागितली
माणसे वाईट परिस्थितीत हात पाय मारतात आणि मिळेल तेथून आणि मिळेल तशी मदत घेतात हे मान्य केले तरी ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये हे मात्र विसरतात. निदान बेड मिळाला आहे एवढा फोन करण्याचे सौजन्य असावे.
22 May 2021 - 1:13 pm | गॉडजिला
मी एका कोवीड इमर्जन्सी संबंधीत व्हाट्सप गृपचा सदस्य आहे, जो अर्थातच लोकांनी लोकांसाठी चालवलेला लोकांचा ग्रुप आहे... रात्री ९.३० ला मला आत्ते भावाचा फोन आला आरे प्लास्मा आणी टोसीलीझुमॅब हवयं... त्याच्या मित्राच्या आइ साठी.
अर्थातच लोक पॅनीक आहेत, साठेबाज अॅक्टीव आहेत हे मला माहीत होतं म्हणून मी त्याला आधी रिपोर्ट आणी आधारचा फोटो पाठव म्हणालो... १ तास काहीही रिप्लाय नाही. मग मिच विचारलं काय झालं ? तर त्याचे उत्तर मी तो मित्राच्या उत्तराची वाट बघतोय व आता तो स्वतःच फोन करुन बोलुन घेइल...झालं बोलुन फोनवर तर असे कळाले अजुन अधिक्रुत रिपोर्ट आलेला नाही पण एकंदर पेशंटची अवस्था बघता रिपोर्ट ही निव्वळ औपचारीकता असल्याने डोक्टरांनी औषधाची अरेंजमेंट करायला सांगीतले आहे.
मला माहीत होतं हे वास्तव आहे पण तरीही मी ग्रुपवर विंनंतीचा रिक्वेस्ट टाकायला नकार दिला कारण रिपोर्ट ही ऑथेंटीसीटी मला तरी वाटली... दुसर्या दिवशी दुपारी मीच फोन केला काय झाले रिपोर्ट आला काय ? संध्याकाळी मला मेसेजमधे रिपोर्ट अन आधार चे फोटो आले...
झालं मी ग्रुपवर मेसेज टाकला तातडीने गरज आहे प्लाज्मा अन औषधांची... एकाने मला फोन केला प्लाज्मा उपलबध आहे मी त्वरीत भावाला फोन करुन विचारले तर त्याने परत त्याच्या मित्राला फोन करुन मला कळवले अरे प्लाज्माची सोय झालीय औषधेच फक्त हवी आहेत. मी परत मेसेज टाकला प्लाज्मा मिळालाय औषधे हवी आहेत आहेत... त्यानंतर बराच वेळ फोनाफोनी या माणसाला फोन करा त्या मेडीकल वाल्याला फोन करा या फोनाफोनीच्या ढिगार्यात विवीध रेफरन्स घेत घेत आपल्या टारगेटवर पोचणे म्हणजे महान दिव्यच... मधेच नंबर एखाद्या भलत्याच शहरातील कोणी राजकीय वजनदार ( ?) व्यक्तीमत्व उचलणार (सुदैवाने सर्वाचे आवाजात मार्दव व मदतीची प्रामणीक इछ्चाही दिसली) मग तो आजुन दहा नंबर देउन माझा रेफरन्स द्या सांगणार व काय झाले ते मलाही कळवा म्हणणार मग एखादा औषधवाला आत्ताच औषध संपले हो पण याचे फलाना फलाना सब्स्ट्यीट्युट आहे ते पाठवु लगेच असे विचारणार सोबत त्याचे डिटेल्स त्याला कोणी पाठींबा दिला आहे त्याचे डिटेल्स पीडीएफ मधुन देणार व वरती लवकर सांगा स्टॉक संपत आलाय हे सुनवायलाही विसरणार नाही... मग मी ते परत भावाला देणार तो मित्राकडे विचारणा करणार मग रिप्लाय यायला दुसरा दिवस उजाडणार असा बराच घोळ झाला व शेवटी प्रत्यक्ष औषध उपलब्ध्द असलेल्या नेमक्या व्यक्तीशी फोनाफोनी झाल्यावर भावाने सांगीतले अरे सॉरी विनाकारण त्रास दिला औषध डोक्टरांच्या मदतीने मिळाले पण अजुन गरज लागली तर ऐनवेळी धावपळ नको म्हणून प्रयत्न चालु आहे... सुदैवाने पेशंटचे आरोग्य सुधारत आहे व बहुतेक चिंतेचे कारणही उरणार नाही...
झालं.. माझं डोकं सरकलं व मी फोन कट केला.
पहीलं म्हणजे त्याने शेवटपर्यंत त्याच्या मित्राशी मला बोलु दिले नाही ( का ते त्यालाच माहीत व कदाचीत औषध त्याने मिळवुन देणेही महत्वाचे असेल ) व पेशंट जर अत्यावस्थ न्हवता, औषध तर उपलब्ध्द होते तर कामाला का लावलं ? सगळ्या दुनियेच्या पाया पडून झाले माझ्या कडून ...
पण मीच समजुन घेतले, एकुणच अनावस्था, सरकारी गाइड्लाइन्सचा आभाव यामुळे कोवीड रुग्णाला आभाळ फाटल्याचा भास होतो... म्हणून पॅनिक मोडमधे ते मिळेल तो रिसोर्स वापरु पाहतात त्या नादात ते अजुन मोठी अव्यवस्था निर्माण करत आहेत हे त्यांच्या गावीही नसते... सारासार विवेक कूठींत झालेला हुशार माणुस जर मुर्खपणा करु शकतो तर जग तर अज्ञान गावीही नसलेल्या मुर्ख न्हवे महामुर्खानी भरलेले आहे त्यांचे कडुन अशावेळी काय अपेक्षा ठेवायची ?
म्हणूनच म्हणतो डॉक्टर साहेब आपला त्रास समजतो आहे, पण थोडं समजुन घ्या साहेब, लोकं सध्या पॅनिक मोडमधे आहेत त्यामुळे त्यांना नैतीकतेची भलीही चाड उरलेली नसेल तरी जसा धुरळा शांत होइल व आपण जर त्यावेळी उरलेलो असु तर सर्व गोष्टी सुरळीत होतीलच अनेकांना त्यांच्या कृतीचा पश्चातापही अवश्य होइल... तोपर्यंत होडोर(होल्ड द डॉर)...
_/\_
22 May 2021 - 8:06 pm | सुबोध खरे
आपण म्हणताय ते मान्य केले तरीही डॉक्टर हा सुद्धा माणूस आहे हेच लोक विसरत आहेत.
केंव्हाही उचलून फोन करा कारण कॉल फुकट आहे. ( पूर्वी जेंव्हा कॉल ला पैसे पडत असत तेंव्हा असेच महाभाग मिस्ड कॉल देत असत.
लोकांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे कि जसे आपण फोन करतो तसेच इतर अनेक लोक डॉक्टरांना फोन करत असतीलच.
पण "समे कामान काम कामाय मह्यम" म्हणजेच सर्व कामात माझेच काम महत्त्वाचे असे समजणारे लोक कमी नाहीत.
माझ्या जवळच्या नातेवाईकांपैकी २८ जणांना कोव्हीड झाला होता आणि ते मला फोन करत असत. त्यातून अतिदक्षता विभागातील डॉक्टरांशी संवाद करून घेऊन त्याचा अहवाल आपल्या आप्तेष्टाना पाठवणे हे पण एक बरेच त्रासदायक काम असते. एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या इतर नातेवाईकांचा "असं कसं झालं" म्हणून सविस्तर माहिती घेण्यासाठी फोन येत राहतात. फोन उचलला तर लोक थोडक्यात आटपत नाहीत आणि त्या काळात दुसऱ्याचा फोन आला तर डॉक्टर आजकाल फोन उचलत नाहीत म्हणून आडून ऐकू सुद्धा येते.
असेच फोन मला इतर अनेक जण स्वतःच्या शंका समाधानासाठी रोजच करत असतात. मग आपले काम झाले तर निदान एक धन्यवाद म्हणून फोन करावा कि आम्हीच उलट त्यांच्या कामासाठी त्यांना फोन करावा? याचे तारतम्य असू नये.
मी येथे कोणतीही सहानुभूती मिळवण्यासाठी हे लिहीत नाहीये तर आपल्यापैकी काही जण उठसूट त्यांच्या डॉक्टरांना त्रास देत असतील तर त्या डॉक्टरांचा थोडा तरी त्रास कमी व्हावा यासाठी लिहीत आहे.
असो.
23 May 2021 - 5:54 pm | गॉडजिला
आपण म्हणताय ते मान्य केले तरीही जया अंगे मोठेपण तवं यातना कठीण ही उक्तीच इथे युक्तीदायक आहे. अर्थात तुमच्या वास्तवतेची जाण सुज्ञ बाळगतीलच.. ते ही आपणावर लेख लिहायची वेळ न आणता _/\_
21 May 2021 - 5:44 pm | सुरिया
पूर्वी लोक वर्तनाच्या समाधानासाठी शास्त्राधार हुडकत. आजकाल फक्त स्वतःची सोय कमीत कमी कष्टात, येन केन प्रकारेण करवून घेणे हेच साध्य बघतात. त्यासाठी एखादे नवीन तत्वज्ञानही तयार करण्याचा निर्लज्जपणा लोकांमध्ये आहे.
अशांशी वागतानाच एकदा काय ते विचार करुन वागायचे आणी नंतर विसरुन जायचे. बस्स.
कसे कसे लोक असतात ह्याच्या डेटाबेसमधे वाढ होते फक्त.
21 May 2021 - 6:27 pm | वामन देशमुख
@डॉ खरे, तिन्ही घटनांमधली तुमची भूमिका मला पटली.
डॉक्टर हा माणूसच आहे, माणसातले गुणदोष डॉक्टरांतही असणार आणि पेशंट, नातेवाईक यांच्यातही असणार.
एक वेगळ्या संदर्भातला किस्सा सांगतो.
माझ्या अगदी समोरच फ्लॅट असलेले, एका सरकारी आस्थापनात उच्चपदस्थ नोकरी करणारे, सुमारे पन्नासवर्षीय तेलुगू सद्गृहस्थ.
जवळचे शेजारी शक्यतो मित्र असावेत म्हणून इथे राहायला आल्यावर मी सुरुवातीला त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काही दाद दिली नाही. ते तसे माणूसघाणेच आहेत. (अर्थात हा काही तक्रारीचा मुद्दा नाही.) त्यांच्या पत्नीची आणि माझ्या पत्नीची मात्र बरीच चांगली मैत्री आहे. या अपार्टमेंटमध्ये माझे बरेच तेलुगू, मराठी आणि इतर मित्र आहेत.
मागच्या वर्षी दसऱ्याच्या सुमारास, एकदा पहाटे चार-साडेचार वाजता आम्ही झोपेत असताना दाराची बेल वाजली. पत्नीने दार उघडले.
या गृहस्थास तासाभरापासून अस्वस्थ वाटत होते. (हार्ट-अटॅक आला होता असे निदान नंतर झाले.) त्यांची पत्नी त्यांच्या ओळखीचे लोक, नातेवाईक, मित्र वगैरेंना फोन करून मदतीला बोलावत होती पण कुणीच आले नाही.
मग मी माझ्या दोन मित्रांना ताबडतोब बोलावले. ते गृहस्थ व त्यांची मुलगी यांना घेऊन आम्ही एका मित्राच्या गाडीने त्यांनी सांगितलेल्या इस्पितळात गेलो. माझा दुसरा मित्र त्या गृहस्थाच्या पत्नीला घेऊन पाठोपाठ आला. आम्ही त्यांना तिथे दाखल केले आणि डॉक्टरांनी पुढील सोपस्कार केले. तिथली सुरुवातीची फी मीच भरली.
चार दिवस उपचार घेऊन, बरे होऊन मग ते घरी आले. डॉक्टरांनी पंधरा दिवस आराम करायला सांगितलं. घरी आल्यानंतर, महिनाभराने, आठवण करून दिल्यानंतर, शेवटी मी फी भरलेले पैसे मला परत मिळाले. त्या चार दिवसांत त्यांच्या पत्नी आणि मुलीशिवाय इस्पितळात त्यांच्यापैकी कुणीही भेटायला आले नाही. मी आणि माझे मित्र दोन वेळा त्यांना भेटायला गेलो.
त्यांच्या पत्नीची आणि माझ्या पत्नीची मैत्री नसती तर त्यांना ऐनवेळी मदत मिळाली असती का असे मला वाटते.
22 May 2021 - 12:08 pm | सुबोध खरे
काल रात्री साडे दहा वाजता एका रुग्णाच्या नवऱ्याने माझ्या दवाखान्याच्या मोबाईल वर फोन केला. हा मोबाईल माझी स्वागत सहायिका घरी घेऊन जाते. तिला या महाशयांनी विचारले कि सर कन्सेशन देतील का? तिने सांगितले तुम्ही सरांशीच बोला.
त्यावर तो म्हणाला कि सर आहेत का मी बोलतो. यावर स्वागत सहायिका म्हणाली आता वाजले किती आहेत हे पाहिले का? सर आता कसे असतील?
आज हीच रुग्ण आली होती. हि मागच्याच वर्षी माझ्या कडे पूर्ण गरोदरपणात सोनोग्राफी साठी येत असे. नवरा उच्च शिक्षित असून आय टी कंपनीत बऱ्यापैकी पगारावर आहे. मी सवलत देत नाही हेही माहिती आहे, शिवाय कंपनीकडून वैद्यकीय उपचाराचा परतावा सुद्धा मिळतो पण काहीतरी सवलत मिळाली पाहिजे अशी विचित्र मनोवृत्ती आहे.
अशीच विचित्र वृत्ती काही वरिष्ठ नागरिकांची आहे. मुलाला कंपनीकडून वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण परतावा मिळतो पण तरी काहीतरी सवलत मिळेल का हे विचारतात.
मागे मी मिपावर लिहिले होते कि एक वरिष्ठ नागरिक मला तुम्ही वरिष्ठ नागरिकांना सवलत हक्क म्हणून दिली पाहिजे असे सांगत होता.
थोडा वेळ वाद झाल्यावर मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले कि तुम्ही माझ्यापेक्षा काही वर्षे अगोदर जन्माला आलात हे सोडलं तर तुमची अशी काय मोठी कामगिरी आहे कि मी तुम्हाला सवलत द्यावी? तो अवाक झाला कारण इतक्या थेट शब्दात त्याला कोणी असं सांगतलं नसावं.
22 May 2021 - 12:32 pm | अभिजीत अवलिया
भारतात by default जो वयाने मोठा तो जास्त अनुभवी, जास्त दुनियादारी बघितलेला, खस्ता खाल्लेला वगैरे वगैरे असतो. वयाने मोठे असल्याने अनावश्यक प्रिव्हिलेजेस पण मिळतात. बरेच ज्येष्ठ नागरिक वयाचा गैरफायदा घेऊन प्रचंड हेकटपणा करतात. वर त्यांना उलट उत्तर दिले की तुमच्यावर कसे सो काॅल्ड संस्कार नाहीत वगैरे आहेच.
14 Jun 2021 - 8:16 am | खटपट्या
चमत्कारीक लोक्स