शब्देविण संवादिजे...

अशोक गोडबोले's picture
अशोक गोडबोले in जे न देखे रवी...
19 Feb 2008 - 8:54 pm

सोंग झोपेचे घेऊन
स्वप्न सुंदर पडेना
देह-भूमिती जाणून
मन-गणित सुटेना

पडे पैशाचा पाऊस
सूर कोरडा राहिला
घाट बांधायाची हौस
देव दगड जाहला

भरी रांजण स्वार्थाचे
घुसे मग तो दिंडीत
टाकी रुपये चोरीचे
वारकर्‍याच्या झोळीत

पापपुण्याचा करावा
हिशेब ना कधी कोणी
गणिकेच्या गळ्यातून
येती गंधर्वाची गाणी

डोके चालविण्या आधी
भिंत चालवावी लागे
हीच ग्यानबाची मेख
करी झोपलेल्या जागे

शब्देविण संवादिजे
असा अधिकार त्यांचा
बाकी सार्‍यांनी आणिला
आव श्रवणभक्तीचा

--अशोक गोडबोले, पनवेल.

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

19 Feb 2008 - 8:59 pm | लिखाळ

सोंग झोपेचे घेऊन
स्वप्न सुंदर पडेना
देह-भूमिती जाणून
मन-गणित सुटेना

शब्देविण संवादिजे
असा अधिकार त्यांचा
बाकी सार्‍यांनी आणिला
आव श्रवणभक्तीचा

वा वा ..सुंदर कविता. फारच सुंदर.

--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

विसोबा खेचर's picture

20 Feb 2008 - 6:49 am | विसोबा खेचर

भरी रांजण स्वार्थाचे
घुसे मग तो दिंडीत
टाकी रुपये चोरीचे
वारकर्‍याच्या झोळीत

पापपुण्याचा करावा
हिशेब ना कधी कोणी
गणिकेच्या गळ्यातून
येती गंधर्वाची गाणी

क्या बात है! सुरेख कविता...!

तात्या.

नंदन's picture

20 Feb 2008 - 7:33 am | नंदन

कविता, अतिशय आवडली.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय's picture

20 Feb 2008 - 9:04 pm | धनंजय

गेय अष्टाक्षरी.

प्राजु's picture

21 Feb 2008 - 7:12 am | प्राजु

डोके चालविण्या आधी
भिंत चालवावी लागे
हीच ग्यानबाची मेख
करी झोपलेल्या जागे

शब्देविण संवादिजे
असा अधिकार त्यांचा
बाकी सार्‍यांनी आणिला
आव श्रवणभक्तीचा

या ओळी खूपच आवडल्या...!

- प्राजु