गायी दूध देत नाहीत

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
7 Apr 2021 - 1:48 pm

गायी दूध देत नाहीत

एक शेतकरी लहान असताना त्याच्या मुलाला सांगायचा: - जेव्हा तू वयाच्या 12 व्या वर्षी पोचशील तेंव्हा मी तुला आयुष्याचे रहस्य सांगेन.

एके दिवशी जेव्हा सर्वात मोठा मुलगा 12 वर्षांचा झाला, त्याने चिंताग्रस्तपणे आपल्या वडिलांना विचारले की जीवनाचे तुम्ही रहस्य सांगणार होतात ते काय आहे.

वडील म्हणाले गाय दूध देत नाही.

"तुम्ही हे काय बोलताय?" मुलाला अविश्वासाने विचारले.

“बाळा, गाय दूध देत नाही, आपल्याला ते (दूध) काढावे लागते.

आपल्याला पहाटे 4 वाजता उठणे आवश्यक आहे, शेणाने भरलेल्या गोठ्या मधून चालणे आवश्यक आहे, गायीचे पाय, शेपटी बांधावी लागते, स्टूलवर बसावे लागते, बादली ठेवून दूध काढावे लागते.

तेच आयुष्याचे रहस्य आहे, गाय दूध देत नाही तुम्हाला ते काढावे लागते.

असेच बाजाराचे आहे.

आपल्याला समभाग कोणते चांगले आहेत याचा अभ्यास करावा लागतो

अचूक वेळेवर ते विकत घ्यावे लागतात

आणि

अचूक वेळेवर विकावे लागतात.

यापैकी हा शेवटचा भाग सर्वात महत्त्वाचा आहे आणि तोच दुर्दैवाने कोणताही पंडित हे तुम्हाला कधीही शिकवत नाही.

यामुळे काय होते.

जसे एखादे फळ तुम्ही काढता तेंव्हा ते एकतर कच्चे निघते किंवा अतिपक्व झालेले असते.

तद्वत एखादा समभाग तुम्ही घेता आणि तो चढला म्हणून खुशीने तुम्ही विकून टाकता आणि तो पुढे जाऊन मल्टी बॅगर होतो आणि तुमच्या दसपटीने नफा ( दुसऱ्याला) देतो.

याउलट तुम्ही एखादा समभाग अजून चढेल म्हणून ठेवता आणि तो पडत जातो आणि सतत सर्किट लागत राहते आणि तुम्ही विकेपर्यंत त्यांची किंमत तुमच्या खरेदी किमतीच्या अंशमात्र होते.

अशी स्थिती आपल्यासारख्या १०० % नाही तरी ९९ % सामान्य निवेशकांची कधीतरी किंवा बर्याच वेळेस होते.

उरलेले १ % ज्यांचे समभाग कधीच पडत नाहीत आणि त्यांना कायम नफाच मिळत जातो आणि कोट्याधीश होतात असे विद्वान हे अपवादात्मकच आहेत त्यांच्या बद्दल मी बोलत नाहीये.

मी यातून अनेक वेळेस गेलो आहे. उदा. मी टायटन या कंपनीचे समभाग २६० -२८० ला घेतले आणि ते वाढत वाढत जाऊ लागले. तेंव्हा ५०० आणि ६०० च्या मध्ये विकून टाकले. कारण सोने एवढे चढेल असे मला वाटलेच नाही आणि हे समभाग चढतच गेले आणि १५०० च्या वर गेले.

याच्या उलट पिपावाव शिपयार्ड नावाचे समभाग मी ५०- ५५ रुपयाला घेतलेले होते ते ९० -१०० च्या पुढे गेले म्हणून मी अजून थांबू या असा विचार करून थांबलो. हि कंपनी श्री अनिल अंबानी यांनी विकत घेतली आणि मी विकायचा विचार करेपर्यंत त्याला लोअर सर्किट लागले आणि ती किंमत एक आकड्यात येऊन थांबली. आता ते समभाग विकून काय मिळणार अशा विचाराने मी ठेवलेले आहेत.

तेंव्हा समभाग विकत घ्या आणि विसरून जा असे सांगणारे पंडित सुद्धा आपल्याला गाळात घालतात. १९८४ साली सेन्सेक्स १०० होता आणि आता जातो ५० हजार झाला आहे हे सांगणारे महापंडित एक विसरतात कि त्या वेळेस सेन्सेक्स मध्ये असलेलय ३० शेअर्स पैकी आता फक्त काही शेअर्स सेन्सेक्स मध्ये आहेत. आणि तेंव्हा तुम्ही ते समभाग घेऊन विसरून गेलात तर तुमचे पैसे बुडाले असते.

मी स्वतः जेवढे समभाग लोकांच्या टिप्स वर विकत घेतले आहेत किंवा विकले आहेत त्यात ९० % पेक्षा जास्त वेळेस नुकसानच झाले आहे. आणि हि माणसे मला बुडवण्यासाठी असे करत होती असे मुळीच नाही तर काही माझे चांगले मित्र आहेत किंवा नातेवाईक सुद्धा. एवढंच झालं कि त्यांचा स्वतःचा अंदाज सुद्धा चुकला.

उदा टाटा एलेक्सी हा समभाग मी २०० रुपयाला विकत घेतला होता तो चांगला २३०० पर्यंत गेला तेंव्हा माझ्या एका नातेवाईकाने जे स्वतः एका MNC मध्ये आय टी चे हेड आहेत त्यांनी या कंपनीचे व्यवस्थापन "भिकार" आहे असे सांगितले आणि त्यामुळे मी तो समभाग २३०० च्या आसपास विकून मोकळा झालो. यानंतर त्या कंपनीने एकास एक बोनस दिला आणि आता त्याचा समभाग २७०० च्या आसपास आहे. म्हणजे माझ्या साठी ५४०० पर्यंत गेला असता. हा मागच्या मार्च मध्ये मला घ्यायचा होता जेंव्हा तो ५००-५५० च्या आसपास होता पण इतर अनेक ब्लु चिप शेअर्स घातल्यामुळे माझ्याकडे पैसे नव्हते.

या अनुभवानंतर मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे मी स्वतः विकत घेतलेले बरेचसे समभाग चांगले होते आणि टिप्स वर घेतलेले बहुतेक सगळे समभाग भिकार निघाले. तेंव्हा आता "ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे"

माझ्या एका मित्राने मला आमची जमीन विकताना एक साधी गोष्ट सांगितली. तू जेंव्हा एखादा समभाग विकतोस तो कुणीतरी का घेतो? कारण तो अजून वर जाईल असे त्याला वाटत असते किंवा खात्री असते. अन्यथा त्याने तो घेतलाच नसता.

हि साधी गोष्ट ऐकून माझे डोळे खाडकन उघडले.

तेंव्हा तुम्ही समभाग विकत घ्या आणि विसरून जा हा सल्ला सुद्धा पूर्णपणे उपयोगी नाही.

मी एक निश्चय केला कि गायीचे दूध काढत राहिले पाहिजे अन्यथा गाय केंव्हा भाकड होईल हे सांगता येत नाही. प्रत्येक समभाग हा एका विशिष्ट पातळीच्या वर गेल्यावर आपले भांडवल त्यातून काढून घ्यायचे मग तो कितीही वर खाली गेला तरी तुम्ही नुकसानीत जात नाही.

दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे बाजार दर चार पाच वर्षातून एकदा जबरदस्त आपटी खातो त्यावेळेस उत्तमातले उत्तम समभाग विकत घायचे आणि ते पुढच्या पाच वर्षात उच्च पातळीला गेल्यावर विकायचे आणि आपले पैसे मोकळे करायचे. बाजारात हि वृत्ती मला गेल्या १३-१४ वर्षात तीन वेळेस सर्वात जास्त पैसे देऊन गेली आहे.

उदा. आता मार्च अखेर २०२० मध्ये करोनामुळे बाजार जबरदस्त पडला होता तेंव्हा मी टी सी एस, लार्सन, स्टेट बँक सारखे अनेक समभाग घेतले जे आज एक वर्षात १०० % च्या आसपास परतावा देतील.

बाजारातील पंडित तुम्हाला एस आय पी करत राहा हे उच्चरवाने सांगत राहतात.

परंतु हे घेतलेले समभाग कधी विकायचे हे कोणीही सांगत नाही. यासाठी एक तर आपल्याला याचा चांगला अभ्यास करणे आवश्यक आहे किंवा एक चांगला वित्त सल्लागार ठेवणे आवश्यक ठरते

यासाठी दुर्दैवाने कोणताही ठोकताळा किंवा यशस्वी फॉर्मुला मला तरी माहिती नाही.

कोणाकडे समभाग केंव्हा विकायचा याचे काही गणित असेल तर ते मी घेण्यास उत्सुक आहे.

सध्या तरी एखादा भरपूर चढलेला समभाग मी विकायचा असेल तर बाजारातील पंडितांनी सांगितलेली किंमत असेल तर त्याच्या ८५ ते ९० टक्के भाव आला कि विकून टाकतो आणि हा एक फॉर्म्युला मला बऱ्यापैकी किमत देतो आहे असे जाणवले.

कारण शेअर खान प्रभुदास लीलाधर सारखे ब्रोकर आपल्या ग्राहकाला रुपयाला १५०० चा समभाग घ्यायला सांगतात आणि १९०० ला विकायला सांगतात. पण बाहेर मुलाखत देतात तेंव्हा हा समभाग आता २१०० -२२०० पर्यंत जाणार आहे अशी मुलाखत देतात( आवई उठवतात).

हा समभाग २००० कधीच पार करत नाही आणि १८०० ला हा समभाग चढतो आहे हे पाहून बाजारात शिरलेले अनेक हवशे नवशे आत येतात आणि आतच अडकतात. तेंव्हा मी माझ्या विकत घेतलेल्या समभागापैकी काही टक्के समभाग १८०० पासून विकायला काढतो आणि १९५० पर्यंत त्याचा मोठा भाग विकून मोकळा होतो.

उदा फायझर या कंपनीचा समभाग मी ८०० रुपयाला घेतला होता तो चढत चढत ३५०० च्या वर गेला तेंव्हा पंडित लोकांनी हा ६००० पर्यंत जाईल अशी २०१९ मध्ये बातमी दिली होती. तेंव्हा हा समभाग मी तुकड्यातुकड्यात ३८०० ते ४४०० मध्ये विकून टाकले आणि यानंतर हा समभाग साधारण दोन वर्षात ५००० च्या आसपास फिरत आहे.

यात एक दुसरा आडाखा असा आहे कि प्रत्येक अर्थवस्तू (asset) उदा फ्लॅट किंवा समभाग हि सिग्मोईड कर्व्हने वर चढते. आपण या चढत्या आलेखाच्या सुरुवातीस (toe) ती घेतली आणि वरच्या टोकावर( shoulder) वर विकली पाहीजे म्हणजेच या दोन बिंदूंमध्ये सर्वात जास्त नफा मिळवता येतो. उदा फायझरचे समभाग विकून मी ग्रॅन्युल्स इंडिया चे समभाग घेतले जे २०१९-२० मध्ये ८०-९०-च्या आसपास होते ते आता ३०० च्या वर आहेत म्हणजेच ते समभाग तिप्पट झाले आहेत पण फायझर मात्र २५ % च वाढला आहे. फायझर ४००० चा १२,००० (तिप्पट) होण्याची शक्यता पुढच्या ५ वर्षात तरी नगण्य आहे.

माझ्या कडे कोणताही यशस्वी फॉर्मुला नाही कि माझा तसा दावा हि नाही. गेल्या १४-१५ वर्षात मी अनेक समभागात नुकसान केले आहे आणि अनेक समभागात भरपूर नफा सुद्धा केलेला आहे. गेल्या वर्षी विकत घेतलेल्या समभागामुळे सध्या मला बाजारात गेल्या १३ वर्षात सरासरीने १३-१४ टक्के नक्त नफा आणि त्यावर मिळणारा लाभांश धरल्यास १५-१६ % दरवर्षी मिळतो आहे.

जेंव्हा जेंव्हा बाजार चढतो तेंव्हा मी त्यातून पैसे काढून घेतो आणि घेतलेलं कर्ज फेडून टाकतो. यात दोन वेळेस घेतलेलं सोनोग्राफी यंत्राचे कर्ज येते, दोन गृहकर्जे येतात आणि एक कारचे कर्ज येते. हि कर्जे नेहमी स्थिर टक्केवारीनेच असतात. याउलट बाजार बराच चढउतार करतो. त्यामुळे आपल्याला हवे तेंव्हा भरपूर परतावा मिळेल याची खरी नसते.

म्युच्युअल फंडात सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन सुद्धा असतो असे मी ऐकले आहे. त्याचा कितपत फायदा मिळतो याची मला कल्पना नाही. सध्या माझ्या कडे १ रुपयाचे सुद्धा म्युच्युअल फंड नाहीत.

मी डे ट्रेडिंग मुळीच करत नाही किंवा फ्युचर & ऑप्शन मध्ये सुद्धा अजिबात नाही. डे ट्रेडिंग साठी तुम्ही नऊ ते साडे तीन पूर्ण वेळ आपल्य संगणकासमोर असणे आवश्यक आहे. हे मला शक्य नाही.

माझा सब ब्रोकर माझ्याच इमारतीत आहे तेंव्हा बरेच निवृत्त लोक तेथे रमणा करायला येत असत. एकदा माझ्या दवाखान्यात रुग्ण नसताना मी तेथे थांबलो होतो. तेथे चढणाऱ्या बाजाराचा जल्लोष चालला होता. तेवढ्या मला रुग्ण आल्याची वर्दी फोनवर मिळाली म्हणून मी उठलो तर तेथील एक निवृत्त सद्गृहस्थ म्हणाले "डॉक्टर कुठे चाललात? आता तर बाजार चढतो आहे".

मी त्यांना एक इसापनीतीतील गोष्ट सांगितली.
एकदा एका लांडग्याने एक गाढव धरले. त्याला तो खाणार एवढ्यात गाढव म्हणाले, हे बघ, माझ्या मागच्या पायात काटा घुसलेला आहे तो काढ म्हणजे मला खाताना तुला काटा टोचणार नाही. लांडगा काटा कुठे आहे बघत होता तोच गाढवाने त्याला जोरदार लाथ मारली आणि त्याचे सगळे दात पडले.

लांडगा म्हणाला "बरं झालं, मला अद्दल घडली."

माझ्या बापाने मला खाटकाचा व्यवसाय शिकवला होता हा वैद्यकाचा व्यवसाय करायची मला काय गरज होती?.

मी त्या सद्गृहस्थाना सांगितले कि माझ्याकडे येणारा रुग्ण मला १०० % पैसे देऊन जाणार आहे. बाजार चढेल तसा पडेलसुद्धा.

मी १२ वी नंतर साडे आठ वर्षे अभ्यास करून वैद्यकशास्त्र शिकलो आहे त्यानंतर ३० वर्षे अनुभव गाठीस आहे तेंव्हा त्यातून मिळणाऱ्या पैशाकडे मला पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. त्यावर माझा चरितार्थ चालतो. तेथे दुर्लक्ष करणे मला परवडणारे नाही.

तेंव्हा बाजाराकडे लक्ष देण्यासाठी स्वतःच्या मूळ व्यवसायाकडे दुर्लक्ष करणे कुणालाच परवडणारे नाही

हा लेख विस्कळीत आणि तुकड्या तुकड्यात आहे. याला मिपावरील वित्त तज्ज्ञ सुधारून देतील तर बरे होईल.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

लेख आवडला. सल्लेही पटले.
आपण आपल्या ब्लॉगवर बोलावले नाही हे सर्वात छान वाटले. :))

असेच माझे पूर्वी मारुती, एल अँड टी बाबत होई. आता अनुभवाने सुधारले. आपला स्वतःचा अभ्यास महत्त्वाचा.

टाटा एलेक्सी सोबत मी दीर्घकाळ काम केले, आणि व्यवस्थापन चांगले आहे हे म्हणू शकतो. त्याउलट त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणवणाऱ्या काही उथळ कंपन्या बेभरवशाच्या आहेत त्यापासून सावध असावे.

व्यवस्थापन चांगले असू दे की वाईट, कंपनीच्या नफ्यावर त्याचा परिणाम दिसून येण्यास काही महिने ते वर्षेही लागू शकतात. Markets can stay irrational longer than you can stay solvent.

त्या टिप्पणीचा धागा विषयाशी संबंध नाही.
कुणीतरी व्यवस्थापन ' भिकार' आहे असं लेखकास सांगितलं त्याविषयी आहे. मी तिथे अनेक वर्षे काम केल्याने तसे नाही म्हणालो इतकेच.

बाकी टाटा किंवा अंबानी आवडतात म्हणून त्यांच्या सगळ्या कंपन्यांचे शेअर्स कुणी घेत नाहीच! :)

चांगले लिहिले आहे.. फक्त खुप मोठा लेख झालाय.

कोणाकडे समभाग केंव्हा विकायचा याचे काही गणित असेल तर ते मी घेण्यास उत्सुक आहे.

मला वाटते technical अभ्यास केल्यास कधी घ्यावा आणि कधी विकावा ह्या दोन्ही गोष्टीं त्यातून कळतात..

बऱ्याचदा आपण विकल्यावर share वाढतो.. पण आपण आपल्याला profit झाल्याशि मतलब असेच रहावे..
माझे तर म्हणणे आहे माझ्याकडून जो तो share विकत घेईल त्याचा हि profit व्हावा.. मला दिलेत ना थोडे कमवून त्याला हि मिळावा थोडा नफा.. हा विचार मला चांगला वाटतो...

For eg. माझ्याकडे आधी ८२० रुपयाने ४० heg होते
मी ते ९७० ने विकले.
नंतर ९३५ ने पुन्हा घेऊन पुन्हा १२०० ला विकले.
आणि तरी तो वाढतच गेला.

मग पुन्हा थोडा खाली आल्यावर १४६० ला घेतले आणि काल ३००rs profit per share ला मी gtt लावला होता तो auto हिट होऊन विकला गेला.

पण तो आज हि ३०० रुपये per share वाढलाय..

Market हे अंदाज नसते.. अभ्यास असतो..
पण अभ्यास चुकू शकतो..

पण एक लक्षात ठेवायचे दुसऱ्यांच्या म्हणण्याने नाही तर स्वतःच्या अभ्यासावर, स्वतःच्या विचाराने share घ्यायचे आणि विकायचे..
आपल्याला थोडाच profit झाला तरी त्यात समाधान माणायचे, तोटा झाला तर काय चुकते ते पाहायचे..

कोणी काही शिकवण्या पेक्षा आपण काय शिकतो याकडे जास्त लक्ष द्यायचे..

आता जो माझा technical धागा दिलाय त्यात घ्यायची आणि विकायची दोन्ही गोष्टीं सांगितल्या आहेत.. त्यामुळे कोणी असे नेमके सांगत नाही असे नसते..

पण माझे म्हणणे आहे आपण तो अभ्यास करावा.. आणि तेच महत्वाचे..
तुम्ही हि हेच सांगत आहात...

अमर विश्वास's picture

7 Apr 2021 - 2:37 pm | अमर विश्वास

तेंव्हा बाजाराकडे लक्ष देण्यासाठी स्वतःच्या मूळ व्यवसायाकडे दुर्लक्ष करणे कुणालाच परवडणारे नाही >>>>

अशाच लोकांसाठी (त्यात मी ही आलो) म्युच्युअल फंड्स आणि SIP आहेत.

डे ट्रेडिंग / पोझिशन / फ्युचर्स हे सर्व करता करता गेले १२ वर्षे SIP करतो आहे ... आज त्याची योग्य फळे मिळत आहेत

यावर तपशीलवार लिहितो आहे ....

राजेंद्र मेहेंदळे's picture

7 Apr 2021 - 3:17 pm | राजेंद्र मेहेंदळे

मग येउद्या बाराखडी

बिटाकाका's picture

7 Apr 2021 - 3:30 pm | बिटाकाका

तुमचा अनुभवावर आणि जमिनी तथ्यांवर आधारित लेख आवडला आणि बहुतांशी मतांशी सहमत पण आहे.

मी स्वतः जेवढे समभाग लोकांच्या टिप्स वर विकत घेतले आहेत किंवा विकले आहेत त्यात ९० % पेक्षा जास्त वेळेस नुकसानच झाले आहे.

सौ टके की बात! मी दुसऱ्यांचे ऐकून शेअर घेणे काही वर्षांपूर्वीच सोडून दिले. आता कुणी एखाद्या शेअर बद्दल सांगितले तर मी त्याचे फंडामेंटल्स बघून त्याला वॉचलिस्ट मध्ये टाकतो आणि काही दिवस/महिन्याच्या निरीक्षणानंतरच बाय लिस्ट मध्ये आणतो.

मुक्त विहारि's picture

7 Apr 2021 - 6:27 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

माझ्या बापाने मला खाटकाचा व्यवसाय शिकवला होता हा वैद्यकाचा व्यवसाय करायची मला काय गरज होती?

ह्या एकोळीत, बरेच काही आहे...

राघव's picture

7 Apr 2021 - 6:58 pm | राघव

छान लिहिलंय.
लोकांचं ऐकून स्वतःचा अभ्यास न करता पैसे गुंतवणं म्हणजे अनोळखी व्यक्तीला घराची चावी देऊन ठेवण्यासारखं आहे. आणि साधारणपणे जेवढ्या सक्सेस स्टोरीज ऐकायला मिळतात त्याहून कितीतरी जास्त प्रमाणात फेल्युअर स्टोरीज असतात, पण त्या फार कोणी सांगत नाहीत.

जेव्हा आपण आयटीत एखादे सोल्युशन बनवतो तेव्हा त्याच्या उपयुक्ततेआधी त्याच्यातल्या लूप होल्स बद्दल विचार करतो. जसं मोबाईल अ‍ॅप बनवतांना सिक्योरिटीचा विचार अगदी प्राथमिक असायला हवा. तसं न करून चालत नाही. तद्वतच आपल्या स्ट्रॅटेजीतले लूप होल्स आपल्याला माहित असायलाच हवेत आणि त्याबरहुकूम उपाय सुद्धा
ठरवायला हवेत.

पण एकुणात तुम्ही म्हणतात तसंच, मार्ग उपलब्ध आहेत अन् चालून गेलंच नाही तर इष्ट स्थळी पोहोचणार कसं? हे अगदी मान्य आहे!

भृशुंडी's picture

7 Apr 2021 - 7:29 pm | भृशुंडी

तुम्ही जे समभागांबद्दल लिहिलं आहे ते बरचसं खरं आहे.
पण "समभाग (शेअर्स) म्हणजेच गुंतवणूक" हे समीकरण खरं नाही.
समभाग हा हाय रिस्क हाय रिवार्ड प्रकार आहे आणि त्यात पैसे गुंतवणं हे धोकादायक समजलं जातं.

त्याउलट इंडेक्स फंड - जे शेअर मार्केटच्या निर्देशांकाला बांधलेले असतात, त्यात दर महा थोडे पैसे गुंतवणं हे दीर्घकालासाठी लाभदायक आहे.
त्यात समभागांएवढा धोका नसतो, पण तितका फायदाही नसतो - तरीही चलनफुगवट्याच्या दरापेक्षा जास्त दराने परतावा मिळू शकतो (१०+ वर्षांसाठी)

विविध प्रकारच्या गुंटवणूकी, त्यातला धोका/परतावा आणि दीर्घकालीन गुंतवणूक ह्याच्या तुलनेसाठी नर्डवॉलेटचा हा लेख वाचनीय आहे -
https://www.nerdwallet.com/blog/investing/invest-savings-short-intermedi...

तात्पर्य - चलनफुगवट्याच्या दरापेक्षा जास्त दराने पैसे वाढवायचे असल्यास शेअर मार्केटमधे काहीतरी गुंतवणूक असणं अपरिहार्य आहे. त्यात समभाग घेणं- ही सर्वात जोखमीची गुंतवणूक आहे, तर इंडेक्स फंडात पैसे गुंतवणं ही त्यातल्या त्यात कमी जोखमीची गुंतवणूक आहे - जिचा परतावा १०+ वर्षांनंतर मिळू शकतो.

चौकस२१२'s picture

8 Apr 2021 - 5:23 am | चौकस२१२

आपले तात्पर्य बरेच पटले ...फक्त एक कि आपण जे रिटायरमेंट फंड म्हणून म्हणतो ते सुधाच शेवटी बाजारातील धोका पत्करत अस्तततच ( भारतातील माहिती नाही परंतु बहुतेक पाशात्य देशातील रिटायरमेंट फंड मधून आपण पण बाजारातील धोका देतच असतो अर्थात हे फंड व्यासायिक रित्या चालले जातायत आणि त्यातील काही संभागचं धोका ओपन घेतात काही नाही )

कंजूस's picture

7 Apr 2021 - 7:44 pm | कंजूस

म्हणजे की जागे करणारे लेख आहेत हे.

सुबोध खरे's picture

7 Apr 2021 - 7:46 pm | सुबोध खरे

पण "समभाग (शेअर्स) म्हणजेच गुंतवणूक" हे समीकरण खरं नाही.

हे म्हणणे मान्यच आहे.

सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नये हा तर त्रिकालबाधित विचार आहे.
आपले पैसे समभाग, म्युच्यूअल फंड ,मुदत ठेव , सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, स्थावर मालमत्ता, सोने अशा अनेक गुंतवणुकीच्या मार्गात विखरून ठेवणे आवश्यक आहे.

मी या धाग्यात फक्त बाजाराशी निगडित गोष्टींबद्दल सांगतो आहे. मग यात समभाग असतील किंवा म्युच्युअल फंड असतील.

दोन्ही गोष्टी एक वर्षांपूर्वी पार गाळात होत्या. अशा वेळेस आपल्याला पैशाची गरज पडली तर तो व्यवहार आतबट्ट्याचा ठरतो.

आपण चढत्या बाजारात काही गुंतवणूक काढून घेतली नाही तर पडत्या बाजारात पैसे लागले तर दोन्ही बाजूनी मार खाल्ला जातो.

गेल्या वर्षी अनेकांना करोनाची बाधा झाल्यावर आपला आरोग्यविमा असायला हवा होता असे वाटू लागले. तसेच बाजार चढत होता तेंव्हा पैसे बाजूला काढून ठेवायला हवे होते असे वाटायला लागले कारण काही लोकांचा रुग्णालयांचा खर्च लाखांत झाला आहे.

म्युच्युअल फंडातील पैसे मिळण्यास बराच कालावधी लागू शकतो. ( निदान मला आता आलेला अनुभव असा आहे)

काही दिवसापूर्वी मला पैसे पाहिजे होते आणि बाजार पण उच्चीत होता तेंव्हा मी आयुर्विमा मंडळात असलेली ULIP विकली तर ते पैसे मिळण्यासाठी मला २० दिवस लागले. दोन वेळेस त्यांच्या कार्यालयात खेप मारली, शेवटी माझा मित्र त्यांच्या मुख्य कार्यालयात आहे त्याला सांगितल्यावर त्याच दिवशी काम झाले.

तसेच निप्पोन या म्युच्युअल फंडाचे पैसे मिळण्यासाठी सात दिवस लागले.

याउलट मीच समभाग विकले तर तिसऱ्या दिवशी पैसे माझ्या खात्यात जमा होतात. ( माझ्या सबब्रोकरला सांगितले तर दुसऱ्या दिवशी सुद्धा)

अमर विश्वास's picture

7 Apr 2021 - 8:37 pm | अमर विश्वास

डॉक्टर साहेब

गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत आणि don't put all the eggs in one basket हे ही मान्य

गुंतवणूक करताना सामन्यतः या गोष्टी बघतो :

१. ROI किंवा परतावा (काही बाबतीत ग्रोथ पोटेन्शिअल )
२. कालावधी
३. कमीतकमी किती गुंतवणूक लागेल
४. तरलता (Liquidity)
५. तुमची जोखीम घेण्याची क्षमता

यानुसार वेगवेगळ्या असेट क्लास मध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरते

Asset Classes :
Equities (stocks), fixed Income (bonds), cash and cash equivalents, real estate, commodities, Gold, futures or other financial derivatives etc. etc...

अर्थात या सगळ्यात आपण गुंतवणूक करू शकत नाही (technically yes.. practically no)

युयुत्सु's picture

7 Apr 2021 - 8:17 pm | युयुत्सु

"पण "समभाग (शेअर्स) म्हणजेच गुंतवणूक" हे समीकरण खरं नाही.

हे म्हणणे मान्यच आहे."

अत्यंत अडाणी विधान! मुळात शेअर बाजार अस्तित्वात का आला, मोठमोठ्या बँका आणि तत्सम संस्था यात का उतरतात? लाभांश म्हणजे काय? उत्तम लाभांश देणा-या कंपन्या कोणत्या? याचा जराही शोध न घेता की अशी विधाने करायची बुद्धी होते याची गंमत वाटली.

सुबोध खरे's picture

7 Apr 2021 - 8:19 pm | सुबोध खरे

म्हणजेच

हा शब्द ठळक का केला आहे हे आणि यात च चा अर्थ काय आहे हे सोप्या मराठीत समजावून घ्या मग बोलू

उगा काहितरीच's picture

7 Apr 2021 - 8:57 pm | उगा काहितरीच

लेख बराचसा पटला. पण MF बद्दल नाही पटलं. MF कामाच्या व्यापामुळे वा इतर काही करणांमुळे शेअर मार्केट कडे सातत्याने लक्ष न देऊ न शकणाऱ्या लोकांना प्रत्यक्ष लक्ष न देता शेअर मार्केट मधे पैसे गुंतवणूक करण्याची संधी देते. SIP मुळे थोडीफार शिस्त रहाते.

हं हे मान्य कि, प्रत्यक्ष गुंतवणूकीपेक्षा MF मधे २-५% कमी रिटन्स मिळू शकतात पण हे २-५% जास्तही होऊ शकतात.

अडचणीच्या वेळी पैसे काढताना मुद्दल /वाढ कमी असल्यामुळे काढायला अडचण दोन्ही प्रकारात येऊ शकते. MF मधे पैसे मिळायला थोडा जास्त कालावधी लागू शकतो.

सुबोध खरे's picture

7 Apr 2021 - 11:08 pm | सुबोध खरे

मी केवळ मला म्युच्युअल फंडा बद्दल आलेला अनुभव लिहिला आहे. यात म्युच्युअल फंडाचा परतावा किंवा इतर फायदे तोटे याबद्दल काहीच म्हणलेले नाही.

ज्याला बाजारात स्वतः अभ्यास करणे शक्य नाही त्यांनी म्युच्युअल फंडातर्फे निवेश करावा हे सर्वमान्य तत्व आहे. त्याबद्दल दुमत नसावें

प्रसाद गोडबोले's picture

7 Apr 2021 - 9:25 pm | प्रसाद गोडबोले

लेख उत्तम परंतु ह्या लेखावरुन फायन्नास हे तुमचे क्षेत्र नाही इतकेच ठळकपणे स्पष्ट होते.

गाय दुध देत नाही ते आपल्यालाच काढावे लागते ह्यात शंकाच नाही. काहीजणांना ते व्यवस्थित काढ्ता येईल काही जणांना नाही काढता येणार ! सक्सेस चे डिस्ट्रिब्युशन नॉर्मल नसतेच , कधीही , कोणत्याही क्षेत्रात , डिस्ट्रिब्युशन परेटोच असते . हे जितकं फायनास मध्ये सत्य आहे तितकेच डोक्टरकी, फार्मसी, मॅन्युफ्यॅक्चरिंग आयटी सर्व्हिसेस अगदी स्थनिक घाऊक व्यापार ... सर्वच क्षेत्रात सत्य आहे !

फायन्नास हा मेडीकल सायन्स इतकाच सखोल विषय आहे !
फंडांएंटल अ‍ॅनालिसिस , थ्री स्टेटमेंट अ‍ॅनालिसिस, एव्ही बाय ईबिड्टा मॉडेल, मॉडर्न पोर्ट्फोलिओ थेरी, मीन व्हेरियन्स ऑप्टिमायझेशन, ब्लॅक लिटर्मन मॉडेल, इलियट वेव्ह थेरी , बाय्नॉमियल ऑप्शन प्रायसिन्ग मॉडेल, ब्लॅक स्चोल मॉडेल, स्टोक्यॅस्टिक कॅलक्युलस, ऑप्शन ग्रीक्स , आर्च् मॉडेल , गार्च मॉडेल्स , अरिमा सरिमा मॉडेल्स .... शिकु तितके कमी आहे !

शिकण्यासारखं खुप आहे , आणि ज्याला जमतं त्याला जमतंच !! जिम सायमन ह्यांचा पोर्ट्फोलिओ पहा

https://en.wikipedia.org/wiki/Jim_Simons_(mathematician)
https://en.wikipedia.org/wiki/Renaissance_Technologies

J

(प्लीझ नोट : ही इमेज ऐर्‍यागैर्‍या साईट वरची नसुन हार्वर्ड बिजनेस रिव्हु वरील आहे .
https://digital.hbs.edu/platform-digit/submission/renaissance-technologi...
)

फायन्नस हे तुमच्या डॉक्टरी क्षेत्रासारखेच आहे . प्रचंड अभ्यास करावा लागतो आणि त्यांनंतरही ग्यॅरंटीड यश मिळेलच ह्याची खात्री नसते . " अब इन्हे दवा कि नही , दुवा की जरुरत है. " हे ह्या क्षेत्रातही व्हॅलीड आहे !
फक्त फरक इतकाच आहे कि डॉक्टरकी जितक्या कडक पणे रेग्य्लेटेड आहे तितक्या कडकपणे फायनान्शियल अ‍ॅडव्हायझरी रेग्युलेटेड नाही म्हणुन उठ्सुट कोणीही अ‍ॅडव्हायझर होऊ शकतो आणि म्हणुनच ह्या क्षेत्रात "देवमाणुस" लोकांचे प्रमाण जास्त आहे !

मी स्वतः ह्या क्षेत्रात काम करत आहे , पण स्टॅइस्टिकली सिग्निफिकंट ठरण्याकरता मला एक नव्हे दोन नव्हे तब्बल आठ वर्षे प्रॉफिटेबल रिटर्न दाखवता आले पाहिजेत . हे जमले तरच स्वतःची अ‍ॅडव्हायझरी सुरु करेन म्हणतो !
अभ्यासोनी प्रकटावे | ना तरी झाकोनी असावे | प्रकटोनी नासावे | हे बरे नव्हे ||

इत्यलम .

गणेशा's picture

7 Apr 2021 - 10:39 pm | गणेशा

अप्रतिम

सुबोध खरे's picture

7 Apr 2021 - 11:16 pm | सुबोध खरे

फायनान्स हे माझे क्षेत्र नाहीच.
तसे आहे असा माझा दावा कधीही नव्हता किंवा नाही.
मी नेहमीच चांगला अर्थ सल्लागार पहा असेच मत मांडले आहे.

मी फक्त माझे स्वकष्टार्जित पैसे बाजारात निवेश करून जमेल तसा नफा मिळवायचा प्रयत्न करत आहेआणि यामार्गावर मला माझे समाधान होईल इतके पैसे मिळत आले आहेत.
माझ्यापेक्षा कितीतरी जास्त दराने नफा मिळवणारे आणेल लोक होते आहेत आणि असतीलच.

जसे स्वतःच्या शेतातून काढलेले पीक स्वयंपाकघरात वापरताना जो आनंद होतो तोच आनंद मला मिळतो. त्यात आलेल्या अनुभवाचा लोकांना काही फायदा झाला तर बरं अशा विचाराने हा लेख लिहिला आहे.

बाकी उत्तम अन्न सर्वत्र मिळू शकतंच!

तुमच्या लेखातून पण ते जाणवत आहे...

गाईचे उदाहरण चपखल दिले आहे .....

मुले आता आपापली गाय शोधत आहेत...

आमच्या गाईने, ह्या वर्षी चांगले दूध दिले...

युयुत्सु's picture

8 Apr 2021 - 6:43 am | युयुत्सु

"...ह्या लेखावरुन फायन्नास हे तुमचे क्षेत्र नाही इतकेच ठळकपणे स्पष्ट होते."

हा हा हा हा हा!

हे सुबोध खरे यांनी, आधीच स्पष्ट पणे लिहिले आहे ....

बाय द वे,

तो कोट्याधीश करण्याचा विडा कधी उचलणार आहात?

बबन ताम्बे's picture

7 Apr 2021 - 10:26 pm | बबन ताम्बे

मारुतीचा पहिला आय पी ओ 2003 की चार साली आला तेव्हा डेअरिंग करून 1000 शेअर्सना अँप्लाय केले. 125 रुपयांनी 350 शेअर्स मिळाले.
मी नवखाच होतो त्यावेळी. 200 रूपयापर्यंत शेअर गेल्यावर हर्षवायू झाला आणि सगळे विकून टाकले. नन्तरचा त्या शेअरचा इतिहास सर्वाना माजित आहे.

अभिजीत अवलिया's picture

7 Apr 2021 - 11:07 pm | अभिजीत अवलिया

200 रूपयापर्यंत शेअर गेल्यावर हर्षवायू झाला आणि सगळे विकून टाकले

:). मला असे हर्षवायूचे बरेच झटके येऊन गेले. नंतर शहाणा झालो बर्यापैकी.

Rajesh188's picture

8 Apr 2021 - 2:22 am | Rajesh188

कोणती ही गुंतवणूक ( व्यवसाय,उद्योग सोडून)ही पैसे कमावण्याचा मुख्य मार्ग कधीच नसतो.
पैसे कमावण्यासाठी उद्योग,व्यवसाय ,नोकरी हे मार्ग आहेत..
बाकी शेअर,mf,fd, हे जोड धंदे आहेत ..
त्या मधून फायदा झाला तर ठीक आणि नुकसान झाले तर गळ्यापर्यंत येवू नये .सोसायची तयारी आणि ताकत असावी.
आज काल सर्वच ठिकाण manage करता येतात काही अवघड नाही .
मार्केट मधील चढ उतार हे नैसर्गिक च असतील असे नाही
कृत्रिम पने ही बाजार कसा पण फिरवता येतो .
त्या मुळे किती ही अभ्यास करा अंदाज चुकीचा ठरण्याची जास्त शक्यता असते.

त्या मुळे किती ही अभ्यास करा अंदाज चुकीचा ठरण्याची जास्त शक्यता असते.

जास्त हा शब्द चुकीचा वाटतो.. तुम्ही systematic पणा.. पेशंन्स.. आणि नियमितता हे गुण वाढवून ह्या जास्त शब्दावर मात करू शकता..

गाईचे दूध जरी काढावे लागत असले तरी ती काढण्याची पद्धत.. संयम.. आणि अनुभव ह्या वरून हि तुम्ही दूध कसे काढता हे अवलंबून आहे..
उद्या काहीच माहिती नसलेल्याला, काय फक्त बादली खाली ठेवून पिळायचे एव्हडे सांगितले आणि त्याला दूध काढायला बसवले तर त्याचा कपाळमोक्ष ठरलेला असेल..

युयुत्सु's picture

8 Apr 2021 - 7:55 am | युयुत्सु

तुम्ही systematic पणा.. पेशंन्स.. आणि नियमितता हे गुण वाढवून ह्या जास्त शब्दावर मात करू शकता..

१०० मधल्या ९९ लोकांना वरील वाक्याचे महत्त्व कळत नाही. मग ते ताक फुंकून पितात ...

कि डॉक्टरकी जितक्या कडक पणे रेग्य्लेटेड आहे तितक्या कडकपणे फायनान्शियल अ‍ॅडव्हायझरी रेग्युलेटेड नाही म्हणुन उठ्सुट कोणीही अ‍ॅडव्हायझर होऊ शकतो आणि म्हणुनच ह्या क्षेत्रात "देवमाणुस" लोकांचे प्रमाण जास्त आहे !

१००%
यात खास करून "ट्रेडिंग शिकवणे " हा धंदा फारसा रेग्युलेटेड नाही ब्रोकेरजे धंदा आहे बऱयापैकी रेग्युलेटेड पण त्यात सुद्धा कितीतरी सब ब्रोकर ..चालक सल्लागार म्हणून काम करातात त्यांना खरं तर फक्त व्यवहार करून देण्याचा परवाना असतो सल्ला देण्याचा नाही !

किचकट ट्रेडिंग तंत्र कोणी प्रामाणिक पणे आणि पैसे आकारून शिकवत असेल तर त्यात गैर नाही पण जेव्हा " बघा कसा फायदा कमवता येतो " अशी जाहिरातबाजी केली जाते तेव्हा तो धंदा का रेग्युलेटेड नाही असा प्रश्न पडतो ( हे भारतातात हि तसेच (जरी कागदोपतृ सेबी चे नियम असले तरी) आणि अमेरिकेत पण "आओ जाओ घर तुम्हारा" अशीच जणू परिस्थिती , त्यामानाने ऑस्ट्र्रेलिया सिगापोर येथे थोडे कायदे कडक आहेत पण तरीसुद्धा लोक चालू गिरी करातात आणि सारासार विचार ना करता लोक फसतात )
एक साधा डिस्क्लेमर " हे सर्व फक्त शिक्षण म्हणून आहे आर्थिक सल्ला नाही " असे चिकटवले कि कोण्ही सौम्य गोम्या "ट्रेडिंग कसे करावे " याचाच धंदा सुरु करू शकतो
अजून एक गोष्ट मी पाहिलेली कि "गॅरंटीड प्रॉफिट आणि आर्बिट्राज " हे शब्द भारतातात इतक्या सहजपणे वापरले जातायत कि अश्या जाहिराती कोणी इतर काही देशात केल्या तर रेग्युलेटर त्याच्या बोकांडी बसेल
लोकांना हे कसे समजत नाही कि
१) गॅरंटीड प्रॉफिट असे असते तर तो माणूस / ती कंपनी त्यांचे शिक्षण, कसलं विकत बसेल स्वतः नाही का बाजारात शिरून गॅरंटीड प्रॉफिट कमवत बसेल
२) जो म्हणतो माझ्य कडे ट्रेडिंग ची गुरुकिल्ली आहे वैगरे तो मग लोंकांचे लाखो घेऊन अजून मोठा फ़ंड का नाही मॅनेज करीत? नि स्वतःचे पण पैसे जे बाजारात घातले त्याचा पूर्व का नाही देत --- ते करीत नाही कारण मग आपली स्ट्रॅटेजी खरंच काम करते कि नाही हे उघड होईल )

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 6:34 am | मुक्त विहारि

प्रतिसाद आवडला...

सुबोध खरे's picture

8 Apr 2021 - 10:04 am | सुबोध खरे

गॅरंटीड प्रॉफिट असे असते तर तो माणूस / ती कंपनी त्यांचे शिक्षण, कसलं विकत बसेल स्वतः नाही का बाजारात शिरून गॅरंटीड प्रॉफिट कमवत बसेल

तेच मी म्हटलं होतं.

मी एक लाख रुपये १ जानेवारीला एका "क" समभागात गुंतवले त्याचे ३१ जानेवारी ला मला १ लाख १०हजार मिळाले.

मग मी १ लाख १० हजार १ फेब्रुवारी ला "ख" समभागात गुंतवले आणि मला २८ फेब्रुवारी ला १ लाख २१ हजार मिळाले.

हे मी "ग" समभागात १ मार्च ला गुंतवले कि ३१ मार्च ला मला १ लाख ३३ हजार १०० रुपये मिळाले.

असे नुसते १२ महिने केले तर मला रुपये ३१३८४२/ ८४- इतके मिळतील

त्याला इतकं सगळं काथ्याकूट गरज नाही

एक लाखाचे तीन लाख एक वर्षात करण्याची ज्याला गुरुकिल्ली मिळाली आहे तो मिपा वर काथ्याकूट करत कशाला बसेल?

प्रकाश घाटपांडे's picture

8 Apr 2021 - 9:44 am | प्रकाश घाटपांडे

जर तुम्ही शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार असाल तर शेअर मार्केट मधे होणारे चढउतार हे तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करतात. अभ्यास व मॉनिटरिंग या बाबी अत्यंत तटस्थपणे व शांतपणे सातत्याने करणे अवघड असतेच. मग हातच सोडून पळत्याच्या मागे कुणी जायला सांगितलय. जेव्हा तुम्ही फायद्यात असतात तेव्हा कुणीतरी तोट्यात गेलेला असतो वा उलट परिस्थिती असते. अशी गुंतवणूक करा कि रात्री तुम्हाला शांतपणे झोप आली पाहिजे.
पैशाचे मानसशास्त्र हे आपले मिपाकर जयंत कुलकर्णी यांनी अनुवादित केलेले पुस्तक नुकतेच वाचले आहे

अमर विश्वास's picture

8 Apr 2021 - 9:59 am | अमर विश्वास

एकंदरीत शेअर्स / म्युच्युअल फंड्स याबद्दल फार मोठी अनास्था दिसून येते.

पोहता ना येणारे / काठा काठा ने पोहणारे उगाचच पाण्याची भीती घालत असतात ... याउलट पोहता येणारे पाण्याचा मनमुराद आनंद घेत असतात ...

बाकी काय म्हणायचे ते दुसऱ्या लेखमालेत लिहिलेच आहे

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 10:28 am | मुक्त विहारि

अज्ञान म्हणा किंवा तितकी बौद्धिक क्षमता नाही किंवा रिस्क घेण्याइतपत आर्थिक पाठबळ नसेल.

वैयक्तिक सांगायचे तर, माझ्याकडे कितीही पैसा आला तरी मी तो शेयर मार्केट मध्ये ओतणार नाही...कारण, तितकी माझी बौद्धिक क्षमता नाही आणि रिस्क घेण्याइतपत मानसिक ताकद नाही...

ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीचे सांगत आहात...

कारण, हा लेख मी माझ्या मुलाला दिला आहे आणि तो मनन करत आहे...

प्रकाश घाटपांडे's picture

8 Apr 2021 - 11:51 am | प्रकाश घाटपांडे

काही लोकांना रिस्क घेण्याची नशा असते. त्यात त्यांना आनंदही मिळतो. पुर्वी राजे राजवाडे दयूत खेळायचे. तो एक प्रकारचा जुगारच असतो. पण एक' डाव ' खेळण्याची लोकाना उर्मी असतेच. लास व्हेगास ची दुनिया अशीच असते असे लोक सांगतात.

मुक्त विहारि's picture

8 Apr 2021 - 11:56 am | मुक्त विहारि

कारण, माझे भाऊ ह्यात गुंतवणूक करतात ....

पण, गेली 25-30 वर्षे ते हेच करत आहेत...

माझ्याकडे तितकी बौद्धिक क्षमता नाही