न्याहारीचा पदार्थ उकरपेंडी

संजय अभ्यंकर's picture
संजय अभ्यंकर in जनातलं, मनातलं
18 Feb 2008 - 7:54 pm

१.
आपल्याकडे प्राजु, स्वातीजीं सारख्या सुग्रणी आहेत.
तसेच पेठकर साहेबांसारखे बल्लवाचार्य हि आहेत.

त्यांना एक प्रश्न:

महाराष्ट्रातला एक न्याहारीचा पदार्थ म्हणजे उकरपेंडी.
त्याची पाककृती आपण देऊ शकाल काय.

बरीच वर्षे पत्नीच्या मागे धोशा लावलाय, परंतु तीला काही ती कृती ठाऊक नाही.

२.
उत्तमोत्तम, स्वस्त आणि पोषक न्याहारीचे पदार्थ आपण लहानपणी खात असू. परंतु, आजच्या फास्टफूडच्या काळात ते पदार्थ जवळपास अस्तंगत होत चाललेत.

संपूर्ण भारत फिरल्यावर मला असे आढळते की, महाराष्ट्राची न्याहारी परंपरा दाक्षिणात्यां इतकीच संपंन्न आहे. पण उद्योगी शेट्टी लोकांनी आपल्या न्याहारीचा आपल्याला विसर पडेल इतपत परिस्थिती ह्या महाराष्ट्रदेशी निर्माण केली.

आपले खास (महाराष्ट्रीय) न्याहारीचे पदार्थ एका वेगळ्या चर्चे द्वारे आपण सर्व मि.पा. वासी येथे देऊ शकलो तर फार बरे होईल.

धन्यवाद.

पाकक्रियाचौकशी

प्रतिक्रिया

मनिष's picture

18 Feb 2008 - 7:57 pm | मनिष

उकरपेंडी हा वर्‍हाडी पदार्थ आहे. गव्हाच्या कोंड्यापासून बनवतात त्यामुळे 'फायबर रीच' असतो. आमच्या घरात हा बर्‍याच वेळा बनतो - विचारून पाककृती देतो.

संजय अभ्यंकर's picture

18 Feb 2008 - 8:25 pm | संजय अभ्यंकर

मनिषभाऊ, वाट पहातोय!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

18 Feb 2008 - 8:35 pm | प्रभाकर पेठकर

महाराष्ट्राची न्याहारी परंपरा दाक्षिणात्यां इतकीच संपंन्न आहे. पण उद्योगी शेट्टी लोकांनी आपल्या न्याहारीचा आपल्याला विसर पडेल इतपत परिस्थिती ह्या महाराष्ट्रदेशी निर्माण केली.

दाक्षिणात्य न्याहारींमध्ये (जेवढ्या मला माहित आहेत तेवढ्यात तरी...) एकदा चटणी सांबार बनवून ठेवले असले की मुख्य पदार्थ झटपट होतो, त्याचा निर्मिती खर्च एकदम अल्प असतो त्यामुळे ढोबळ नफा अधिक असतो. गिर्‍हाईकाला पदार्थ गरम्-गरम मिळतो, झटकन टेबलवर येतो, पचायला हलका स्वादीष्ट आणि रुचकर असतो. त्यामुळे तो प्रसिद्धी पावला.

गुजराथी न्याहारीत, पुरी-भाजी, खमण ढोकळा, पांढरा ढोकळा, सुरळीच्या वड्या, फापडा, भजीया, मेथी गोटे, कचोरी असे अनेक पदर्थ थोडे कष्टप्रद पण अत्यल्प निर्मिती खर्चाचे आहेत. त्यामुळे त्यांचेही बाजारात बर्‍यापैकी वर्चस्व असते.

मराठी न्याहारीत पोहे, बटाटावडा, वडापाव हे तीन(च) पदार्थ ह्या निकषांवर खरे उतरतात. तरी पण त्यात निर्मिती खर्च (तुलनात्मक दृष्टया) अधिक आहे. कष्ट अधिक आहेत. त्यामुळे बिचारे मागे पडले.

पंजाबी न्याहारीत कष्ट आणि निर्मिती खर्चाचे वाढते प्रमाण ह्या मुळे ते पदार्थ जरा (आपल्याही) मागे आहेत.

उकरपेंड की उकडपेंड? (संभ्रमात).

मोहन's picture

19 Feb 2008 - 2:44 pm | मोहन

पुणे कोल्हापूर हायवे वर खंबाटकी घाट ऊतरलाकी एका विरंगुळा नावाच्या हॉटेलात बरेच मराठी पदार्थ मिळतात. उदा: मिसळ- साधी /उपासाची, बटाटा/कांदा/मिरची भजी, थालीपीठ, ऊपासाचे थालीपीठ तर अप्रतीम! सकाळ्च्यावेळात तर माझ्यासारख्या ऊड्प्यांना कंटाळलेल्यांची तूफान गर्दी असते. गे ल्या ४ - ५ वर्षात विरंगुळाची भरभराट पाहाण्या सारखी आहे.
आपले पदार्थ चांगले मार्केट झाले नाहीत हेच खरे.
आपला

मोहन

विसोबा खेचर's picture

19 Feb 2008 - 2:56 pm | विसोबा खेचर

आपले पदार्थ चांगले मार्केट झाले नाहीत हेच खरे.

हम्म! वरील वाक्याशी अगदी सहमत आहे...!

सूर्य's picture

18 Feb 2008 - 8:59 pm | सूर्य

असाच शब्द ऐकला आहे.
मी खालील प्रमाणे उकडपेंडी करतो.

गव्हाचे पीठ थोडे भाजुन घेतो. त्यानंतर तेल तापवुन त्यात मोहरी, कांदा, मिरची टाकुन फोडणी तयार करुन घेतो. त्यात तिखट, मीठ, व दही (भरपुर) टाकुन नंतर भाजलेले पीठ व थोडे पाणी त्यात टाकतो व हलवतो. सगळे व्यवस्थित मिसळले की झाकण ठेवुन वाफवतो. नंतर मिटक्या मारत खातो. ;-)

असो. हीच उकडपेंडी असा मात्र माझा दावा नाही ;-)). जाणकारांनी जरुर पाकक्रिया द्यावी.

आपला
(खादाड) सूर्य

लिखाळ's picture

18 Feb 2008 - 9:58 pm | लिखाळ

वा ! ही पाकृ चांगली वाटत आहे. आता करुन पाहतो.
कणिक घरी आणून नुसतीच फडताळात ठेवली आहे आणि पोळ्या करायचा कंटाळा करित आहे. या पाकृ मुळे थोडे गहु पोटात जातील.
पोळ्या करणे टाळण्यासाठी मी नेहमीच नवे उपाय शोधत असतो.
पाकृ साठी आभार.
--लिखाळ.

तिखट तर्री झेपत नसल्याने जादा पाव आणि मिसळ खाल्ल्यावर थंड ताक आम्हाला पाहिजे असते.

विसोबा खेचर's picture

19 Feb 2008 - 12:58 am | विसोबा खेचर

संजयभाऊ,

फार सुंदर आठवण करून दिलीत. उकरपेंडी हा पदार्थ मी एक दोनदाच खाल्ला आहे एका मित्राच्या मावशीच्या घरी. अतिशय सुरेख लागतो...

उत्तमोत्तम, स्वस्त आणि पोषक न्याहारीचे पदार्थ आपण लहानपणी खात असू. परंतु, आजच्या फास्टफूडच्या काळात ते पदार्थ जवळपास अस्तंगत होत चाललेत.

अगदी खरं आहे. आपण अगदी मर्मावर बोट ठेवलंत!

पण उद्योगी शेट्टी लोकांनी आपल्या न्याहारीचा आपल्याला विसर पडेल इतपत परिस्थिती ह्या महाराष्ट्रदेशी निर्माण केली.

हो, परंतु गरमागरम इडली आणि चटणी सकाळच्या वेळेत खायला फारच छान लागते हेही खरंच! सकाळच्या टायमाला दोनचार गरमागरम इडल्या आणि चटणी खाल्ली की अगदी समाधान होतं, खूप बरं वाटतं!

असो, न्याहरीच्या पदार्थात मिसळपाव ही माझी नेहमीच प्रथम पसंती आहे.. त्यानंतर अर्थातच मऊभात ही दुसरी पसंती..! आणि त्यानंतर पानगी, इडली, वगैरे वगैरे वगैरे...

आपले खास (महाराष्ट्रीय) न्याहारीचे पदार्थ एका वेगळ्या चर्चे द्वारे आपण सर्व मि.पा. वासी येथे देऊ शकलो तर फार बरे होईल.

संजयदादा, अहो आम्ही देवगडातली गरीब कोकणी माणसं! कलमी आंब्याचे लहानसे बागायतदार! थोडीफार सुपारी आणि कोकमांची उलाढाल! आमच्या घरी कोकणात न्याहरीला पानगी किंवा मऊभातच बरं का!

छानशी, प्रसन्न अशी देवगडातली सकाळ आहे. दत्तू अभ्यंकराकडची मंडळी उठली आहेत, घरात हासण, खिदळणं, गप्पा टप्पा सुरू आहेत. आंगण्यात छानसं सारवलेलं आहे. आंब्याफोफळीच्या वाडीतनं शिपणाचा आवाज ऐकू येतो आहे, रहाटाची करकर मन प्रसन्न करते आहे. आते-मामे-चुलत-मावस भावंड सुट्टीत जमली आहेत त्यांची किलबील सुरू झालेली आहे. कुठल्यातरी मावशीची भलतीच देखणी पुतणी प्रथमच कोकण पाहायला आलेली आहे. ती प्रत्येक गोष्टीकडे नवलाईने बघते आहे. लहानसहान गोष्टींची कारणमिमांसा मोठ्या कुतुहलाने तात्याला विचारते आहे. तात्या संध्याकाळी समुद्रावर हिला एकटीलाच कसं घेऊन जाता येईल या विचारात पडला आहे. घरातल्या कुठल्यातरी मोठ्या काकूने 'आंघोळीपांघोळी केल्याशिवाय कुणीही व्यापार किंवा झब्बू खेळायला बसायचं नाहीये!' असा समस्त बच्चेकंपनीला दम भरलेला आहे, घरातल्या मंडळीत 'काल रात्री आंगण्यातून राखणदार सळसळत गेला, तुम्हाला दिसला का?' अशी चर्चा होते आहे, आणि अश्यातच...

केळीच्या पानातली पानगी समोर येते आहे. सोबत लोण्याचा गोळा नी फोडणीची मिरची!

किंवा,

केळीच्या पानावर मस्त घोटलेला मऊमेतकूट भात, वर तुपाची धार, आंबोशीचं लोणचं, आणि सोबत भाजलेला पोह्यचा पापड! :)

संजयभाऊ, अहो यापेक्षा अजून काय उत्तम न्याहरी पाहिजे तुम्हाला, बोला!!

असो..

आपला,
(मऊभातातला आणि पानगीतला!) तात्या देवगडकर.

तात्या,

फार आठवणी काढु नका, जीवाला लई तरास होतो.
मी माळव्यातला असलोतरी बायको देवगडची आहे, त्या मुळे घरात माळवी आणी कोकणी अश्या दोन्ही कडचे पदार्थ बनतात.

परंतु, सासुने बनवलेलेच आयते आणी मऊभात फार छान लागतात (बायकोच्या अपरोक्ष सांगतोय..).
सासुने आणलेल्या (फुकट) साजुक तुप व मेतकुटा शिवाय मऊ भाताला मजा नाही.

(पण ह्या नोकरीमुळे आम्हाला कोकण कधीतरीच पहायला मिळते.)

ता.क.:
आठळ्यांची भाजी आणी तांदळाची भाकर खाऊन बरेच दिवस झालेत.
फार दिवस झाले, ओल्या काजुगरांची उसळही जीभेला लागलेली नाही.
(उन्हाळ्याची चातका सारखी वाट पहातोय).

मुंबईत हे कोण बनवतो?..

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Feb 2008 - 8:44 pm | llपुण्याचे पेशवेll

खरेतर आम्ही फणसाच्या भाजीला कशालातरी लावून खायचा पदार्थ समजत होतो पण आमच्या आजीने हा आमचा भ्रम गावी गेल्यावर पहील्याच दिवशी दूर केला. 'तुला इकडे पोळ्या करून घालायला कोण आणणार आहेस?कोण नाही ना मग दिले आहे ते खा मुकाट्याने' असा कोकणी टोमणेयुक्त दम भरला. आणि तो पदार्थ मी तोंडात घातला..आहाहा! काय चव. ती फणसाची खाकटून केलेली भाजी होती. 'इकडे लोक न्याहारीला हेच खातात. गेल्या वर्षी भात चांगले झाले नाही. मग लोक दिवस काढत आहेत असे खाऊन.' अशी अधिक माहीती पण मिळाली.
पण काही म्हणा ती भाजी मला फार आवडली. लाल सुक्या मिरचीची फोडणी देऊन, काळे वाटाणे घालून केलेली ती फणसाची भाजी फार फार आवडली. (तसेच उकडगर्‍याची पण भाजी करतात ती पण मला फार आवडते.)

(दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचे गाववाले-पोंभुर्लेकर)
डॅनी.
पुण्याचे पेशवे

अनिला's picture

19 Feb 2008 - 10:42 am | अनिला

जाडसर गव्हाचे पीठ १ वाटी
तेल पाव वाटी
मोहरी, कान्दा, कधिपता, ताक्(गोड नाही)
तेल तापवा, मोहरी हिन्ग घाला, कान्दा,हळद , हि.मिरची, कधिपता फोड्णी घाला जाडसर गव्हाचे पीठ घाला खूप परता. सुन्दर वास आला की त्यात ताक घाला, भराभरा परता, गोळे होऊ देऊ नका. मीठ घाला. वाफ येऊ द्या. गरम खा.
वि.सु.=उपमा करताना जास्त पाणी/ताक घालतात ते रवा शोशून घेतो, तसेउकरपेन्डीचे नाही. येथे जरा बेताने घालावे. चुकुन जास्त झाले तर झाकण ठेऊ नये.

संजय अभ्यंकर's picture

21 Feb 2008 - 3:28 pm | संजय अभ्यंकर

सुर्यजी आणी अनिलाजी,

आभारी आहे! दोघांच्या पाककृती चविष्ट झाल्या.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

अनिला's picture

19 Feb 2008 - 10:45 am | अनिला

जसे कणीक पोळ्यासाठी भिज्विताना पाणी किती घलावे याचे माप नाही, तसे उकरपेन्डी ला ताक कुश्ल्तेनेच घालावे

संजय अभ्यंकर's picture

19 Feb 2008 - 12:58 pm | संजय अभ्यंकर

अनिलाजी फार फार आभारी आहे.
तुमची पाककृती आत्ताच प्रिंट काढुन घेतली.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मनस्वी's picture

19 Feb 2008 - 12:22 pm | मनस्वी

तांदळाच्या पीठाची गरम गरम उकड पण छान लागते!

उकरर्पेंडी प्रथमच ऐकला (वाचला).. लवकरच करून बघणार!

मनस्वी

अजून काही न्याहारीचे मराठी पदार्थः

मिसळ

पोहे

सांजा (उपमा)

शिरा (मला केळं घालून आवडतो.)

उकड

थालिपीठ

चकुल्या (वरणफळं)

फोडणीचा भात (फोभा)

फोडणीची पोळी (फोपो)

धिरडी

सुशिला (चुरमुर्‍याचा पोह्यांसारखा पदार्थ - मी अक्कलकोट, सोलापूरला खाल्ला होता.)

बटाटेवडा

साबुदाणा वडा

साबुदाणा खिचडी

शिंगोळ्या (माहित नाही कसा करतात. भाजणी उकडून केला असावा. मावशीकडे खाल्ला होता. प्रचंड पौष्टीक असतो म्हणे!)

शिळी तळलेली पोळी चहात बुडवून पण मस्त लागते.

- अजून आठवतील तसे लिहीन.

(शिंगोळ्या आवडलेली) मनस्वी

सृष्टीलावण्या's picture

19 Feb 2008 - 1:37 pm | सृष्टीलावण्या

ही एक पाककृति जी मराठी घराघरांत बनविली जाते.

कृती -

शिळी, बेचव भाजी जी संपायची सुतराम शक्यता नाही ती भज्याच्या सारणात घालून त्याची भजी किंवा भाजणीत बेमालूनपणे घालून त्याची थालीपीठे मुलांच्या पुढे सरकवायची आणि कमी आहेत असे आधीच सांगायचे म्हणजे मुले एकमेकांपेक्षा जास्त खायची स्पर्धा लावतात.

भज्यासोबत टोमॅटो सॉस द्यायला विसरू नये.

सख्याहरि's picture

19 Feb 2008 - 9:23 pm | सख्याहरि

अगदी लहानपणीची आठवण झाली...
आम्च्या मातोश्रिंनी केलेला हा पदार्थ..
१०-१५ वर्षांनन्तर यची आठवण करून दिल्याबद्दल आपले आभार...

शिळ्या भज्या, आमटी, भात, शेंगदाण्याचे कूट आणी तूप अणि वाट्ल्यास कैरिचे लोणचे..हे सर्व मिसलून गरम करावे
ह ही त्यातलाच प्रकार.. अत्यन्त सत्विक.. आणि चविष्ठ...

दूध नासले तर त्यात गूळ आणि वेल्दोडे घलून फार मस्त पदर्थ आमची आजी बनवीत असे..

(भुकेला) सख्याहरी

बापु देवकर's picture

19 Feb 2008 - 2:08 pm | बापु देवकर

फोडणीची पोळी म्हन्जेच शिळ्या चपाती/भाकरीचे तुकडे करुन त्याल दिलेली फोडणी..की अजून काही...

पोहे/थालिपीठ...वाचुनच पाणी सुटले हो तोन्डाला..
राज....

मनस्वी's picture

19 Feb 2008 - 2:24 pm | मनस्वी

दह्याबरोबर मस्त लागते.

मनस्वी

सख्याहरि's picture

19 Feb 2008 - 9:28 pm | सख्याहरि

फो.पो. म्हणजे शिळ्या चपाती/भाकरीचे तुकडे करुन त्याल दिलेली फोडणी..
कुर्कुरीत भाज्ल्यास मस्त लाग्ते.. चिमूट्भर सखर घलून पहा.. मस्त लागते.

वाचुनच पाणी सुटले तोंडाला..
-सख्याहरी

मनिष's picture

19 Feb 2008 - 10:26 pm | मनिष

पाककृती मिळाली तर!

संजय अभ्यंकर's picture

19 Feb 2008 - 10:29 pm | संजय अभ्यंकर

फोडणीची पोळी: ह्याला आमचे माळवी - मराठी लोक कुस्करा म्हणतात.
नांव कुस्करा दिले की हा प्रकार सर्वसमावेशक होतो. केवळ शिळ्या पोळ्याच नव्हे तर रात्रीचा उरलेला भात, पाव, पावचे स्लाइस (कुस्करुन) हे सुद्धा फोडणी देउन बनवता येते. जर वरिल पैकी एकाहून अधिक प्रकार (पोळ्या व भात इ.) उरले असतील, तर ते एकत्र करुन त्यास फोडणी दिली जाते.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

सूर्य आणि अनिला,
मी आज सकाळी आपण दिलेल्या पाकृनिसार उकरपेंडी करुन पाहिली.
अतिशय चविष्ट आणि खमंग असा पदार्थ आहे. मला महत्वाचे वाटते ते म्हणजे गव्हाचे पिठ पोटात जाते ते ! पोळ्या करायचा आळस असल्याने आता मी अनेकदा हा पदार्थ करिन.
आभार.
--लिखाळ.

'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.