मनातला चैत्रं...!!!

स्मिता श्रीपाद's picture
स्मिता श्रीपाद in जनातलं, मनातलं
12 Apr 2009 - 1:27 pm

उन्हाळा सुरु झाला...कडक उन्हं पडायला लागली..मोगर्‍याचे गजरे...कैरीची डाळं-पन्हं या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली की माझं मन १०-१२ वर्ष मागं धावतं...दरवर्षी एप्रिल मे च्या सुमारास मला माझी उन्हाळ्याची सुट्टी आठवते..माझं कर्‍हाड आठवतं..कृष्णाबाईचं देउळ आठवतं...आमचा लाडका घाट आठवतो..आणि सगळ्यात तीव्रतेने आठवतो,तो म्हणजे चैत्रातला कृष्णाबाईचा उत्सव...!!!

आमचं कर्‍हाड हे तसं छोटंसच गाव....(म्हणजे आता पुण्यात रहायला लागल्यापासुन मला कर्‍हाड छोटं वाटतं...:-) ) दोनचं मुख्य बाजारपेठा....आणि त्याच्या आजुबाजुला पसरलेली वसाहत....चावडी चौक ते दत्त चौक आणि चावडी चौक ते पांढरीचा मारुती ईतपतच आमचं विश्वं पसरलं होतं....आजकाल विकसित झालेला विद्यानगर हा भाग, त्यावेळी मुख्य भागापासुन फार फार दूर वाटायचा....कृष्णा नदीच्या पलिकडचे विद्यानगर म्हणजे कर्‍हाडच्या शेजारचं दुसरं गावच आहे की काय असं वाटायचं मला लहानपणी...सोमवार पेठ,कन्या शाळेचा परिसर,पंतांचा कोट..आणि सर्वात महत्वाचं म्हणजे "प्रितीसंगम" आणि कॄष्णाबाईचा घाट एवढचं माझं वर्तुळ होतं.

आमच्या घरापासुन अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर "प्रितीसंगम" होता.कॄष्णा आणि कोयना नदीचा सुरेख संगम प्रितीसंगम म्हणुन प्रसिद्ध आहे.या दोन्ही नद्या समोरासमोरुन येतात आणि एकमेकींना भेटतात...आणि मग या दोन मैत्रिणी एकमेकींच्या गळ्यात गळे घालुन,एकरुप होवुन,पुढच्या जगाला प्रसन्न,पवित्र करण्यासाठी,मैत्रिच्या संदेश सगळ्यांपर्यंत पोचवण्यासाठी पुढे जातात्..."कॄष्णा" असं एकचं नाव धारण करुन.....!

अथांग पसरलेलं नदीचं पात्रं... नदीशेजारचं विस्तिर्ण वाळवंट.. नदीकडे तोंड करुन उभं राहिलं की डावीकडे स्वर्गीय श्री.यशवंतरावजी चव्हाण यांची सुरेख बांधलेली संगमरवरी समाधी..आणि नगरपालिकेने फुलवलेली सुरेख बाग आहे.समाधीच्या आजुबाजुला छोटी छोटी रेखीव मंदीरे आहेत. ही सगळी मंदिरे १९६७ साली आलेल्या प्रचंड मोठ्या पुरातुन वर आली असं लोक सांगतात. उजवीकडे ग्रामदेवता कॄष्णाबाईचे मंदीर आहे..या देवळासमोरुन थेट नदीच्या वाळवंटापर्यंत उतरत जाणार्‍या घाटाच्या पायर्‍या आहेत. काळ्याभोर दगडातुन या विस्तीर्ण पायर्‍या बांधल्या आहेत....पायर्‍या जिथे संपतात तिथे मोठे दगडी बुरुज आहेत.. कृष्णाबाईच्या देवळाच्या आजुबाजुला गणपती,शंकर,कृष्ण अशी विविध मंदीरे आहेत.

माझ्या घरापासुन ते घाटापर्यंत संपूर्ण उताराचा रस्ता होता.ज्या दिवशी परीक्षा संपेल त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांच्या सायकली त्या उतारावरुन सुसाट सुटायच्या...ते थेट घाटावर . मग आम्ही सगळ्याजणी नदीपात्रात जायचो.नदीत मोठे मोठे दगड होते..खोल पाण्यात असलेला सगळ्यात मोठा दगड पकडण्यासाठी आमची शर्यत लागायची.दगडावर बसुन पाण्यात पाय सोडुन गप्पा चालायच्या...पाण्यातले छोटे छोटे मासे पायावरुन सुळकन फिरायचे...पायाला गुदगुल्या करायचे..पाण्यात हात घालुन मासा पकडायचा असफल प्रयत्न करायचो ...पण ते कुठले हातात यायला...आता आठवुन लिहितानाही पायाला गुदगुल्या होतायतं :-)..पाण्यात पाउल गोरेदिसते आणि पाण्याबाहेर काढलं की कमी गोरं दिसतं..असं का?..यावर चर्चा व्हायची.मग कोणाचे पाउल जास्त गोरं आहे यावर दंगा ... एकमेकींच्या अंगावर पाणी उडवायचा खेळ व्हायचा ...पाण्यात बुडणारे केशरी सूर्यबिंब पाहत अचानक सगळ्याजणी स्तब्ध व्हायच्या...आणि मग झुपकन कोणी अंगावर पाणी उडवायची...आणि परत दंगा सुरु...
मग वरती बागेत येउन पळापळी,लंगडीपळती,आंधळी कोशींबीर असे खेळ व्हायचे.खळुन खेळुन दमलो की मग मोर्चा खाउकडे...भेळ,पाणीपुरी,पावभाजी ,बटाटेवडा..अशा पदार्थांचा फाडशा पडायचा.

आमच्या शि़क्षण संस्थेच्या दोन्ही शांळांची परीक्षा एकच दिवशी संपायची.त्यामुळे त्या दिवशी घाटावर सगळीकडे मुलामुलींची गर्दीच गर्दी दिसायची..
अचानक अमच्या शाळेतल्या सगळ्या भिंती गायब झाल्या आहेत...बेंच काढुन टाकले आहेत आणि त्याऐवजी सगळीकडे हिरवळं पसरली आहे...शाळेच्या वरचे छतं अचानक उडुन गेले आहे...आणि खांबांची मोठमोठी झाडे झाली आहेत...असं काहीतरी वाटायला लागयचं...घाट म्हणजे जणु दुसरी शाळाच...:-)

गुढीपाडवा नेहेमी परिक्षेच्या काळात यायचा..त्यामुळे मग मस्त आम्रखंड खाउन झोपावं म्हटलं तर अभ्यासाचं भूत डोळ्यासमोर नाचायचं...पण रामनवमी होता होता परिक्षा संपलेली असायची आणि चैत्रोत्सवाची चाहुल लागायची...तिजे दिवशी गौरीचे देव्हार्‍यात आगमन व्हायचे..आता पुढचा एक महीना गौराबाई देव्हार्‍यात पेश्शल आसनावर विराजमान व्हायची..आई दारात चैत्रांगण काढायची...तिजे दिवशीच गौरीसाठी अंब्याची डाळं आणि पन्हे असा नैवेद्य व्हायचा...आणि मग कृष्णाबाईच्या उत्सवाची वाट पाहणं सुरु व्हायचं...

गौरीच्या पहिल्या तिजेपासुन ते थेट अक्षयतृतीये पर्यंत रोज कुठे ना कुठे हळदीकुंकु व्हायचं...आणि याच काळात हनुमान जयंतीपासुन पुढे चार दिवस घाटावर चैत्रातला कृष्णाबाईचा मोठा उत्सव व्हायचा. नदीच्या वाळवंटात मोठा मंडप उभा रहायचा.आणि बुरुजावरती एक मोठं स्टेज बनवलं जायचं.विविध कलाकार चार दिवस तिथे आपली कला रसिकांसमोर सादर करायचे.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीची पालखीतुन मिरवणुक निघायची.देवी वाजत गाजत मिरवत नगरप्रदक्षीणा करायची....रस्तोरस्ती तिच्या स्वागतासाठी मोठमोठ्या रांगोळ्या रेखलेल्या असायच्या... चौकाचौकात पालखी थांबायची.. सुवासिनी देवीला ओवाळायच्या...ओटी भरायच्या...आणि मग देवी आता चार दिवस देउळ सोडुन नदीच्या शेजारी,खर्‍या कृष्णेला भेटायला,तिची विचारपूस करायला ,वाळवंटातल्या मंडपात जायची आणि उत्सवाला सुरुवात व्हायची.मग रोज दिवसभर भजन,किर्तन,प्रवचन असा भरगच्च कार्यक्रम मंडपात व्हायचा...आणि संध्याकाळी उन्हं उतरली की मग स्टेज वर विविध कलाकार कार्यक्रम सादर करायचे.मराठी गीतांचा वाद्यवॄंद,कथाकथन,एकपात्री प्रयोग,नाटके असे विविध कार्यक्रम पहायला लोकांची झुंबड उडायची...

त्या चार दिवसांपैकी सगळ्यात महत्वाचा दिवास म्हणजे "सार्वजनिक हळदीकुंकु".सगळ्या सुवासिनी देवीची ओटी भरण्यासाठी,तिला पन्हे आणि डाळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी यायच्या...आणि मग मंडपात भेटलेल्या ईतर स्त्रीयांना पण हळदीकुंकु द्यायच्या.अशा वेळी समोरची बाई ओळखीची नसली तरी चालायचं ... एकमेकींशी ओळख करुन घेणे एवढा एकच उद्देश असावा कदाचितं...आणि मग बोलताबोलता कुठुनतरी ओळख निघायचीच...."अगं बाई...तुमच्या जाउ बाई म्हणजे माझ्या मावशीच्या नणंदेची सूनच की हो...."असे संदर्भ सापडायचे...:-)

शेवटच्या दिवशी मोठी यात्रा भरायची फुगे,खेळणीवाले,बत्तासे,चुरमुरे,गाठी ची दुकाने सजायची....जिकडेतिकडे पिपाण्यांचे आवाज घुमायचे...आजुबाजुच्या खेड्यातले शेतकरी लोकं आपल्या बायकापोरांसोबत तालुक्याला फेरी मारायचे..देवीचा आशीर्वाद घ्यायचे...

घाटावरला कार्यंक्रम संपला की आमच्या घरातल्या हळदीकुंकवाचा दिवस ठरायचा.त्या दिवशी दिवसभर आईची धावपळ चालायची...गौरीसाठी मोठ्ठी आरास बनवायला मी आणि माझी बहिण आईला मदत करायचो.आमची लहानपणीची खळणी,बाहुल्या,घरातल्या शोभेच्या वस्तु बाहेर निघायच्या..गौरीची बैठक सजायची....तिच्या समोर लाडु,चकल्या,शेव,शंकरपाळे असा फराळ मांडला जायचा.कलिंगडाचे झिगझॅग त्रिकोण कापत आई सुरेख कमळं करायची....मोगर्‍याचा घमघमाट सुटायचा...अत्तरदाणी,गुलाबदाणी,पातेलेभर डाळं,पन्हे अशी जय्यत तयारी केली जायची....मग आई मला छान चापुनचोपुन साडी नेसवुन द्यायची...

आलेल्या सगळ्या बायकांना हळदीकुंकु लावणे,अत्तर लावणे,गुलाबपाणी शिंपडणे,डाळ-पन्हं आणुन देणे ही सगळी कामं मी आणि माझी बहीण वाटुन घ्यायचो...आणि मग सगळ्यात शेवटी आई त्यांची भिजवलेले हरभरे आणि काकडीने ओटी भरायची....

चैत्र आला की या सगळ्या आठवणी येतात..परत एकदा लहान व्हावसं वाटतं...कर्‍हाडच्या त्याच घरी जावंसं वाटतं..आता माझं माहेर कर्‍हाड हुन पुण्यात आलं...अजुनही माझ्या माहेरी आणि सासरी आम्ही चैत्रातलं हळदीकुंकु उत्साहनं साजरं करतो...पण कृष्णाबाईच्या छत्राखाली,तिच्या साक्षीनं केलेल्या "त्या" हळदीकुंकवांची सर ईथे पुण्यात नाही... अजुनही या सगळ्या जुन्या आठवणी मनाला हुरहुर लावतात..

माझ्या मनातला चैत्र अजुनही तिथेच फुलतो....घाटावर...कृष्णेच्या काठी...!!

(नुकतेच तात्यांनी मिपावर हळदीकुंकु करण्याचा प्रस्ताव मांडला.आणि सौ रेवती पासुन सुरुवात झालीसुद्धा....त्यानिमिताने या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि मिपाकरांना सांगाव्याशा वाटल्या...त्याचसाठी हा लेखनप्रपंच...)

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

12 Apr 2009 - 1:57 pm | पर्नल नेने मराठे

आलेल्या सगळ्या बायकांना हळदीकुंकु लावणे,अत्तर लावणे,गुलाबपाणी शिंपडणे,डाळ-पन्हं आणुन देणे ही सगळी कामं मी आणि माझी बहीण वाटुन घ्यायचो...

मी पण नोस्ताल्गिक झ्हाले ;;)

चुचु

टारझन's picture

12 Apr 2009 - 7:07 pm | टारझन


नोस्ताल्गिक झ्हाले


आईशप्पथ .. हे वाचून मी काय काय नाय झालो त्याचा विचार करतोय =)) मिपावर कोणी ज्ञाणेश्वर आहे का हो ? ह्या अवघड आणि फक्त महाज्ञाणी लोकांना समजणार्‍या लिपीचं सुबोध मराठीत कोणी भाषांतर करेल काय ?

- टर्फल टेटे टरटे

मिसळभोक्ता's picture

12 Apr 2009 - 10:42 pm | मिसळभोक्ता

अबे, आपण स्निग्धहस्त होताना नाही का नोस्ताल्गिक होत ? (की नोस्ताल्गिक झाल्यामुळे स्निग्धहस्त होतो ? जे काही असेल ते. पण स्निग्धहस्ततेचा अणि नोस्ताल्गिकतेचा संबंध आहे, हे नक्की.) तसेच चैत्र आला की ह्या बायका नोस्ताल्गिक होतात.

- मल्मल मीमी मलाठी

-- मिसळभोक्ता

वल्लरी's picture

12 Apr 2009 - 2:06 pm | वल्लरी

>>>माझ्या मनातला चैत्र अजुनही तिथेच फुलतो....घाटावर...कृष्णेच्या काठी...!

खुप छान आठवणी .. :)

---वल्लरी

मीनल's picture

12 Apr 2009 - 4:45 pm | मीनल

मस्त लेख
मीनल.

स्मिता श्रीपाद's picture

13 Apr 2009 - 7:40 am | स्मिता श्रीपाद

पर्नल,वल्लरी,मीनल,
प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद.

स्वाती दिनेश's picture

12 Apr 2009 - 5:22 pm | स्वाती दिनेश

स्मिता, मनातला चैत्र आवडला, खूप मागे घेऊन गेला.
स्वाती

रेवती's picture

12 Apr 2009 - 6:09 pm | रेवती

मस्त आठवणी!
मलाही अश्याच हौसेनं केलेल्या हळदीकुंकवांच्या आठवणी आल्या.
आता दिवस बदलले म्हणजे इतके बदलले की आपण ऑनलाइन हळदीकुंकू करतो.;)

रेवती

प्राजु's picture

12 Apr 2009 - 7:21 pm | प्राजु

मनाचा एक कप्पा अशा आठवणींनी नेहमीच सुंगंधीत झालेला असतो... काही कारणाने त्या सुगंधाची प्रचिती येते आणि मग तो सुगंधीत राहण्या मागचं कारण आपण शोधून काढतो आणि त्यातून असा उत्तम लेख जन्माला येतो...
निव्वळ सुरेख!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्मिता श्रीपाद's picture

13 Apr 2009 - 7:44 am | स्मिता श्रीपाद

स्वातीताई,प्रतिसादाबद्दल धन्यु.

रेवती,
आता दिवस बदलले म्हणजे इतके बदलले की आपण ऑनलाइन हळदीकुंकू करतो.

खरं आहे तुझं..पण हेही नसे थोडके :-)
आणि या ऑनलाईन हळदिकुंकवामुळेच तर लेख लिहायची प्रेरणा मिळाली..
तात्या महाराज की जय :-)

प्राजु,
मनाचा एक कप्पा अशा आठवणींनी नेहमीच सुंगंधीत झालेला असतो... काही कारणाने त्या सुगंधाची प्रचिती येते आणि मग तो सुगंधीत राहण्या मागचं कारण आपण शोधून काढतो आणि त्यातून असा उत्तम लेख जन्माला येतो...

ईतक्या सुरेख प्रतिसादाबद्दल तुझे खुप खुप आभार :-)

प्रमोद देव's picture

12 Apr 2009 - 9:01 pm | प्रमोद देव

माझी आई देखिल चैत्रातले हळदीकुंकु खूप मोठ्या प्रमाणात करायची. त्यामुळे आई आणि माझी मोठी बहीण ह्यांच्याबरोबरीने आम्ही तिघे भाऊदेखिल ह्या हळदीकुंकवाच्या तयारीत मदत करत असू. आंब्याची डाळ करण्यासाठी आदल्या रात्री भिजत टाकलेली चण्याची मोठ्ठे पातेलेभर डाळ खलबत्त्यात कुटण्याचे किंवा कधी पाट्यावर वरवंट्याने वाटण्याचे आणि कैर्‍या किसण्याचे मेहनतीचे काम आम्ही तिघे भाऊ करत असू. तसेच बाजारातून फुले आणणे,पन्ह्यासाठी लागणार्‍या कैर्‍या, बर्फ इत्यादि आणणे वगैरे साठी आई-बहिणीबरोबर मोठ्या थोरल्या पिशव्या वाहून आणण्याची कामंही करत असू.

ही अशी कच्ची तयारी झाली की मग मात्र आमचा खाऊचा वाटा आम्हाला देऊन घराबाहेर पिटाळले जायचे. तिथे बायकांमध्ये आमचे काय काम? खरं ना? पण मी खूप लहान होतो तेव्हा एकदा दोनदा मोठ्या बहिणीचा तिच्या लहानपणचा फ्रॉक घालून हळदीकुंकवासाठी आलेल्या बायकांना अत्तरदाणीतले अत्तर लावणे आणि गुलाबदाणीतून त्यांच्यावर सुगंधित गुलाबपाणी शिंपडण्याचे काम केल्याचेही आठवतेय. :)

स्मिता, आठवणी मस्तच आहेत तुझ्या. तुझ्या आठवणींमुळे मी जणू माझ्या बालपणात पोचलो.....पार ४५-५० वर्षांपूर्वीचे सगळे आठवायला लागले. अर्थात माझे सगळे आयुष्य मुंबईतच गेले त्यामुळे नदी,घाट ,देवळे वगैरे सोडले तर बाकी उत्साह आणि आनंद तोच होता.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

मिसळभोक्ता's picture

12 Apr 2009 - 10:45 pm | मिसळभोक्ता

पण मी खूप लहान होतो तेव्हा एकदा दोनदा मोठ्या बहिणीचा तिच्या लहानपणचा फ्रॉक घालून हळदीकुंकवासाठी आलेल्या बायकांना अत्तरदाणीतले अत्तर लावणे आणि गुलाबदाणीतून त्यांच्यावर सुगंधित गुलाबपाणी शिंपडण्याचे काम केल्याचेही आठवतेय.

लय भारी, पन फोटू कुठाय ????

(हल्ली त्याला क्रास-ड्रेसर म्हन्तात. पण मुलांना फ्रॉक घालण्यास बंदी, म्हणजे आपल्या प्राचीन संस्कृतीवर घाला आहे.)

-- मिसळभोक्ता

मिसळभोक्ता's picture

12 Apr 2009 - 11:29 pm | मिसळभोक्ता

डब्बल आला. स्वारी.

-- मिसळभोक्ता

स्मिता श्रीपाद's picture

13 Apr 2009 - 7:51 am | स्मिता श्रीपाद

प्रमोदजी,

आंब्याची डाळ करण्यासाठी आदल्या रात्री भिजत टाकलेली चण्याची मोठ्ठे पातेलेभर डाळ खलबत्त्यात कुटण्याचे किंवा कधी पाट्यावर वरवंट्याने वाटण्याचे आणि कैर्‍या किसण्याचे मेहनतीचे काम आम्ही तिघे भाऊ करत असू.

अरेच्चा या सगळ्या आठवणी लिहायच्या राहुन गेल्या....:-) पण तुम्ही लक्षात आणुन दिल्याबद्दल आभारी आहे....
आम्ही पण मिक्सर असुनसुद्धा खलबत्त्यात डाळ कुटायचो....कारण आईचं असं म्हणणं आहे की मिक्सर मधे वाटलेल्या डाळी पेक्षा खलबत्त्यात कुटलेली डाळ जास्त चवदार लागते....तेव्हा तिला मी हसायचे...पण आजकाल मलासुद्धा मिक्सर वर केलेल्या डाळीत काहितरी कमी आहे असं वाटतं...कमी म्हणजे काय तर आईच्या डाळीसारखी होत नाही :-)

असो..

सगळ्या आठवणी लिहायला सुरुवात केल्यावर माझी ईतकी धांदल उडाली....की काही गोष्टी लिहायच्याच राहुन गेल्या.पण तुम्ही आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. :-)

आंबोळी's picture

12 Apr 2009 - 11:42 pm | आंबोळी

स्मिता,
कर्‍हाडच्या आठवणी जाग्या केल्यास. उत्तम झालाय लेख.
बाकी व्यनीत बोलुच.

आंबोळी

स्मिता श्रीपाद's picture

13 Apr 2009 - 7:54 am | स्मिता श्रीपाद

आंबोळी म्हणजे तु "बॉम्बे उपहारगृहाची" आंबोळी का गं ? ;-)

व्यनी ची वाट पाहात आहे. :-)

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. :-)

दशानन's picture

13 Apr 2009 - 7:55 am | दशानन

माझ्या माहीती प्रमाणे आंबोळी ही आंबोळी नसून आंबोळा आहे =))

ह्याच्या कंदिलापासून स्वतःला जपा :D

आनंदयात्री's picture

13 Apr 2009 - 7:56 am | आनंदयात्री

ठ्ठोssss !!!
आंबोळ्याच्या डोक्यावर शंभर चिमण्या चिवचिव करत घिरट्या घालत असतील :)

आंबोळी अगं माझ्याशी मैत्री करशील का गं ?

स्मिता श्रीपाद's picture

13 Apr 2009 - 9:40 am | स्मिता श्रीपाद

माझ्या माहीती प्रमाणे आंबोळी ही आंबोळी नसून आंबोळा आहे

हम्म्....मग आंबोळी हे नाव जरा बदलायला हवं ;-)

"आंबोळी" पेक्षा "डोसा" नाव घेउ शकता..."ती आंबोळी"..."तो डोसा" :-)

आनंदयात्री's picture

13 Apr 2009 - 9:43 am | आनंदयात्री

अगायायाया !!!! डोसा ?!?!?!?!!?!?
आंबोळ्या काय रे ते ते कंदिलाचे टेरर .. अन काय हे डोसा वडा रे !!

तु मेंदु वडा नाव घे त्या पेक्षा !!

आंबोळी's picture

13 Apr 2009 - 11:33 am | आंबोळी

आंबोळी म्हणजे तु "बॉम्बे उपहारगृहाची" आंबोळी का
हो (का नंतरचा गं शिताफीने कॉपी केलेला नाही हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच)

आंबोळी अगं माझ्याशी मैत्री करशील का गं ?
(सँडल च्या धरतीवर) कंदील पाहिला का माझ्या कडचा?

तु मेंदु वडा नाव घे त्या पेक्षा !!
आंद्या त्यापेक्षा पिंड कसे वाटतय? घेउ का?

(धारी)आंबोळी

आनंदयात्री's picture

13 Apr 2009 - 11:37 am | आनंदयात्री

यवढ्या बारीला जाउंदे ना भो .. लगेच काय भो खंदिल काल्डा तुझा ..

-
आंद्या फट्टु

आनंदयात्री's picture

13 Apr 2009 - 7:51 am | आनंदयात्री

अहाहाहा .. काय सुरेख गाव जगवुन आणलात !!

>>अचानक अमच्या शाळेतल्या सगळ्या भिंती गायब झाल्या आहेत...बेंच काढुन टाकले आहेत आणि त्याऐवजी सगळीकडे हिरवळं पसरली आहे...शाळेच्या वरचे छतं अचानक उडुन गेले आहे...आणि खांबांची मोठमोठी झाडे झाली आहेत...असं काहीतरी वाटायला लागयचं...घाट म्हणजे जणु दुसरी शाळाच...

अ वा क !!
अत्यंत मोहक कल्पना .. चित्रदर्शी !!

बाकी लहानपणी हळदीकुंकवाला ने नेहमी हडळीकुंकु म्हणायचो :D
आत्त्या मावश्या बळजबरी इकडे तिकडे न्यायच्या मला .. माझे सगळे लक्ष लुटायच्या वस्तुंकडे असायचे .. छानसे स्केच पेनवैगेरे असेल तर आनंदाला पारावार रहायचा नाही !!

दशानन's picture

13 Apr 2009 - 9:43 am | दशानन

माझ्याकडे ह्या आठवणी नाहीत ह्याचे कधी कधी दुखः वाटते :(
खरं तर लहानपणी आमचे बाबा कडक होते त्यामुळे शक्यतो असल्या कार्यक्रमाला मला कधीच जाऊ दिले नाही म्हणायचे कशाला बायकांच्या कामात लुडबुड करायची ;) पण हदगा व फुगडी खुप खेळलो होतो हे आठवतं बाबांची नजर चुकवून गल्लीतील मुलीं सोबत कोल्हापुर मध्ये..... !
ते काय तरी होतं अलंमा पैलमा.. देवाच्या.. आता आठवत नाही आहे ! पण मजा होती... शाळेत पण मुली हदगा खेळत हे आठवलं !

* हगदा असे काही तरी नाव होते नक्की ते पण आठवत नाही आता !

स्मिता श्रीपाद's picture

13 Apr 2009 - 9:50 am | स्मिता श्रीपाद

ते काय तरी होतं अलंमा पैलमा.. देवाच्या.. आता आठवत नाही आहे ! पण मजा होती... शाळेत पण मुली हदगा खेळत हे आठवलं !

* हगदा असे काही तरी नाव होते नक्की ते पण आठवत नाही आता !

अहो राजे....एकच शब्द दोन ठिकाणी वेगवेगळा लिहिलात आणि अर्थाचा अनर्थ केलात कि हो.... :-) :-)

हगदा.... =)) अरेरे..काय हा शब्दाचा अधःपात.... =))

असो...

खरा शब्द हादगा असा आहे..आणि त्याला भोंडला पण म्हणतात...
तुम्ही आपलं यापुढे "भोंडला" असं लक्षात ठेवा :-)

-स्मिता

दशानन's picture

13 Apr 2009 - 9:53 am | दशानन

=))

स्वारी स्वारी !

लक्ष्यात नाही आली चुक मी शब्द आठवण्याच्या चक्कर मध्ये टाईप मिस्टेक केली बघा ;)

हादगा बरोबर.... डब्ब्यात कुठला तरी पदार्थ ठेवत व त्याचे नाव शोधायचे असे काही तरी :D

विसोबा खेचर's picture

13 Apr 2009 - 12:12 pm | विसोबा खेचर

सु रे ख ले ख न!

तात्या.

स्मिता श्रीपाद's picture

13 Apr 2009 - 4:34 pm | स्मिता श्रीपाद

आनंदयात्री आणि तात्या,

प्रतिसादाबद्दल खुप आभार :-)

समीरसूर's picture

14 Apr 2009 - 7:31 am | समीरसूर

स्मिता,

खूप छान फुललाय तुझा चैत्र या लेखात!! खूप छान वाटले वाचतांना. कर्‍हाड अगदी जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहिले. घाटावरचे आल्हाददायक वातावरण, तिथल्या कृष्णामाईच्या मंदिरातले साधे आणि कुठल्याही अवडंबराविना पुलकित करणारे मांगल्य, पुलाखालून संथ वाहणारी कृष्णामाई....सगळे वर्णन अगदी सुरेख झाले आहे. मन अगदी उडत-उडत ८-१० वर्षे मागे गेले आणि पटकन कृष्णामाईच्या तीरावर जाऊन विसावले. छोट्या गावातला साधेपणा, तिथली मनाला भावणारी आयुष्याची संथ लय आणि हाती आलेल्या क्षणांचा पुरेपूर आनंद मिळवून देणारा निवांतपणा आठवून थोडं गलबलल्यासारखं झालं....पुण्यात हे सुख नाही. तसं पाहिलं तर सुख हे बाकी कशातच नसतं; ते मनात असतं. ते शोधायला वेळ लागत नाही; दृष्टी मात्र लागते.

अजून येऊ दे कर्‍हाडवरचे लेख!

--समीर

स्मिता श्रीपाद's picture

14 Apr 2009 - 7:57 am | स्मिता श्रीपाद

खुप खुप धन्यवाद....

तसं पाहिलं तर सुख हे बाकी कशातच नसतं; ते मनात असतं. ते शोधायला वेळ लागत नाही; दृष्टी मात्र लागते.

हे खासच :-)

-स्मिता

बेसनलाडू's picture

14 Apr 2009 - 9:43 am | बेसनलाडू

स्मृतीरंजन फार म्हणजे फारच आवडले. अगदी कर्‍हाडचे चित्र डोळ्यांसमोर उभे केलेत. प्रीतीसंगम, समाधी, वाळवंट, देऊळ वगैरे ... फारच छान! ज्यांनी कधी गावचे सुख अनुभवले नसेल, त्यांनी अगदी हे वाचून समाधान करून घ्यावे असे लेखन. अभिनंदन!
(शहरी)बेसनलाडू
बाकी चैत्र म्हटला की मला जीएंचा चैत्र प्रकर्षाने जाणवतो.
(वैशाखी)बेसनलाडू