हस्ताक्षर..

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
23 Jan 2021 - 11:33 am

जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने लिहिलेलं काहीतरी..

मी लिहायला सुरवात केल्यावर 'काहीतरी लिहिणं' ते 'काहीतरीच लिहिणं' या प्रगतीला फार वेळ लागला नाही. मग 'काहीच्या काही लिहिणं' या पुढच्या टप्प्याकडे वाटचाल सुरु झाली.

पण स्वतःच्या अद्वितीय अक्षरांमुळे ते हस्तलिखित कोणालाही दाखवायच्या लायकीचे नसायचे.अद्वितीय अश्यासाठी की एकदा काढलेले कोणतेही अक्षर मी परत कधीही तसेच्या तसे काढू शकत नाही. दरवेळेला अक्षराच्या स्वभावाचे आणि आकाराचे विविध कंगोरे कागदावरच उलगडून दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. त्या अर्थाने माझं लिखाण खरंच 'युनिक' आहे. लोकं आकडेमोड करतात तशी मी अक्षर'मोड' करतो. मला वर्तुळाचे दोन टोक सुद्धा नीट जुळवता येत नाही. परीक्षेत मी घाईघाईत लिहिलेला शून्य हा आकडा फुटक्या अंड्या सारखा जास्त दिसत असल्यामुळे आमचे सर मला वर्तुळाचे दोनही टोक व्यवस्थित जुळवून शून्य मार्क द्यायचे. 'अरे किमान अंड्यांची साईझ तरी एकसारखी ठेव रे सगळीकडे' हा शेरा त्यांनी मला ऐकवला होता. त्यामागचा व्यावसायिक दृष्टीकोन सरांना कधी कळला नाही ह्याची खंत वाटते. शिक्षण हे व्यवसायाभिमूख असावं हे स्वतःच्या कृतीतून मी तेंव्हापासून दाखवत आलोय.

असो. पण माझ्या हस्ताक्षरांच्या अवस्थेला तत्कालीन शिक्षणव्यवस्था जबाबदार आहे असं ठाम विधान मी नोंदवू इच्छितो. तसंही 'अवस्थे'चं खापर नेहमीच 'व्यवस्थे'वर फोडायचं असतं.

तर व्हायचं काय की शाळेत असताना शुदधलेखनाची वेगळी वही असायची. त्यात रोज एक उतारा शुद्धलेखन असा गृहपाठ द्यायचे. त्यामुळे शुद्धलेखन हे फक्त त्याच वहीत करायचं असतं अशी माझ्या बालमनाने समजूत करून घेतली त्यात गैर ते काय ??

असो. तर हस्तलिखिताचं काय करायचं हा प्रश्न कायम होता. मग हिंमत करून तो कागद मी एकाला वाचायला दिला त्याच्याकडून "काय लिहिलंय यार!" अश्या प्रतिसादाची अपेक्षा होती. पण त्याऐवजी ,"काय लिहिलंय यार?? असा प्रतिसाद मिळाला. त्याच्या मते, कागदावर खरडण्यापेक्षा मी शिलालेख लिहिलेत तर जास्त बरं होईल. कारण तसेही शिलालेख समजायला अवघड असतात. त्यात माझ्या अक्षरांचं अवघडलेपण सहज खपून जाईल.

म्हणूनच फेसबुकच्या भिंतीवर शिलालेख लिहिणं सुरु झालं.

समाप्त

मुक्तकशुद्धलेखनविरंगुळा

प्रतिक्रिया

किल्लेदार's picture

9 Feb 2021 - 2:19 am | किल्लेदार

धमाल लिहिता बुवा तुम्ही. आणि इथे लिहिण्याऐवजी टंकायचे असल्यामुळे वाचायला त्रास होत नाही.

राघव's picture

9 Feb 2021 - 2:24 am | राघव

मी लिहायला सुरवात केल्यावर 'काहीतरी लिहिणं' ते 'काहीतरीच लिहिणं' या प्रगतीला फार वेळ लागला नाही. मग 'काहीच्या काही लिहिणं' या पुढच्या टप्प्याकडे वाटचाल सुरु झाली.

भारीच.. !! =))

सुक्या's picture

9 Feb 2021 - 3:53 am | सुक्या

हे हे हे . . . भारी आहे . . .
मला "अरे हे अक्षर आहे कि कोंबडीचे पाय?" असा प्रश्न नेहेमी विचारला जाइ.

चौथा कोनाडा's picture

10 Feb 2021 - 5:50 pm | चौथा कोनाडा

मस्तच !
आमच्या हस्ताक्षरा नावं ठेवायचे ते अपमानास्पद अनुभव आठवले !
आमचं हस्ताक्षर सुधारण्यासाठी खालेले फटके आठवले वेळ निघुन गेलीय.
गेली दोन-तीन दशके टंकनच करतो आहे !

बाकी "फेसबुकच्या भिंतीवर शिलालेख" हे झकासच !