लागा चुनरी मे दाग..

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
16 Jan 2021 - 9:31 pm

लागा चुनरी में दाग..

अनेक वर्षांपूर्वी घरात नविन टेपरेकॉर्डर आल्यावर मोहम्मद रफी, लतादीदी, आशाताई, मेहंदी हसन, गुलाम अली ह्यांच्या कॅसेट्सही लगोलग आल्यात. त्या वयात ह्या प्रभुतींचं गाणं ऐकल्यामुळे 'चांगलं' काय असतं ह्याची उमज येऊ लागली.

कॅसेट्च्या त्याच संचात रुपकुमार राठोड ह्यांच्या गझल प्रोग्रॅमची एक कॅसेट होती. ती कॅसेट बाबा वारंवार लावायचे.

वो रस्मे तोड के घर मेरे आने वाले है... मैं डर रहा हू के जालीम जमाने वाले है..!

दुल्हनिया की डोली कहारो ने लुटी..

ये सिला मिला है मुझको तेरी दोस्ती के पिछे...के हजार गम लगे है मेरे जिंदगी के पिछे !

छायी जितनी गुलो पे लाली है...उनके रुखसार से चुराली है..

वो अभी रो के गया है कितना ...क्या मेरा हाल बुरा है इतना..

अश्या एक से एक गझल त्यात होत्या. गझलांचे अर्थ कळण्याचं ते वय नव्हतं. पण तरीही किती वेळा ऐकल्या असतील याची मोजदाद नाहीये. त्या सगळ्या गझल्स, सोबतच रुपकुमारजींचं उर्दू शब्दांचा अर्थ सांगणं, मधातच एखादा शेर सांगणं हे अगदी तसंच्या तसं पॉझेससहित मला आजही पाठ आहे. मोठ्या भावालाही ते तसंच लक्षात असेल ह्याची खात्री आहे. आज जेंव्हा ह्या गझलांचा अर्थ कळतोय तेंव्हा हे ऐकत मोठं झालोय ह्याचा एक अभिमान आहे. त्यात सुरवातीलाच रुपकुमारजींनी 'लागा चुनरी में दाग' हे गाणं सादर केलं होतं. माझ्यासाठी आजही हे गाणं म्हणजे संगीताची सर्वोच्च सीमा आहे. आणि तिथं रुपकुमार राठोड विराजमान आहेत !

कोरी चुनरिया आत्मा मोरी..
मैल हे मायाजाल...
वो दुनिया मोरे बाबूल का घर..
ये दुनिया ससूराल..

हे ज्या उत्कटतेने रुपकुमार गायले आहेत त्यासमोर मला मन्नाडेंचं मूळ गाणं थोडं फिकं वाटतं. (हे लिहिण्याआधी स्वतःच्या कानाखाली मारून घेण्यात आलेली आहे त्यामुळे काळजी नसावी). कदाचित रुपकुमारांच गाणं मी आधी ऐकल्यामुळेही हे घडत असेल. ह्या गाण्याच्या शेवटी एक तराना आहे. तो मूळ गाण्यापेक्षा रुपकुमारजींनी खूप विस्ताराने गायला आहे. तो तराना ज्या नोटवर संपतो तिथं आपणही एका वेगळ्या विश्वात पोहोचलो असतो. हे गाणं सादर करण्याची हिंमत दाखवणंसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे.म्हणून आजही एखादा गायक जेंव्हा हे गाणं म्हणायचा प्रयत्न करतो तेंव्हा मी त्याला एक वैयक्तिक 'पदमश्री' देऊन टाकतो.

ह्यात एक गंमत अशी आहे की, हा गझल प्रोग्रॅम आमच्या गावात म्हणजे अमरावतीमध्येच झाला होता. त्यावेळी वडिलांच्या एका मित्राने हा पूर्ण प्रोग्रॅम रेकॉर्ड केला. आणि वडिलांनी कॅसेटची एक कॉपी आणखी करवून घेतली. आई-वडिलांचे जे अनंत उपकार माझ्यावर आहेत त्यातला हा एक पहिल्या पाचमध्ये येतो. कालांतराने कॅसेटच सीडीमध्ये रूपांतर झालं. नंतर पेनड्राइव्ह, मेमरीकार्ड वगैरे प्रकारातून ते पूर्ण रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलमध्ये आलं. आजही आहे.पण रुपकुमारजींना लाईव्ह ऐकण्याची इच्छा होती. तीसुद्धा काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या वसंतोत्सव मध्ये पूर्ण झाली.

आता एक आणखी इच्छा आहे.... थोडी गमतीशीर !!

सरफरोश सिनेमा ज्यांनी पाहिला असेल ते गुलफाम हसनला विसरू शकत नाहीत. 'होशवालो को खबर क्या' ही गझल सगळ्यांच्याच प्लेलिस्टमध्ये असेल.

सरफरोश हा एक क्राईम थ्रिलर म्हणून जितका अप्रतिम सिनेमा आहे तेव्हढंच त्याची सांगीतिक बाजूसुद्धा अप्रतिम आहे. अजय राठोड आणि गुलफाम हसन ह्यांचातलं तरल सांगीतिक नातं फार सुंदर आहे. ह्या नात्याची सुरवातही संगीतानेच होते. गुलफाम हसनचं एक खूप जुनं गझल रेकॉर्डिंग अजयजवळ असते. ते तो भेट म्हणून गुलफाम हसन ह्यांना देतो. गुलफाम ह्यांच्यासाठी तो 'बेशकिमती तोहफा' असतो. त्याबदल्यात ते अजयला नजराणा म्हणून त्यांच्या दोस्तीचा प्रस्ताव देतात.

आता रुपकुमार राठोड ह्यांचं जे रेकॉर्डिंग माझ्याजवळ आहे ते अमरावतीत इतरही कोणाजवळ असू शकेल. पण पूर्ण जगात ते फक्त माझ्याचजवळ आहे असा एक समज मी करून घेतलेला आहे. न जाणो कुठेतरी, कधीतरी रुपकुमारजी भेटतील आणि त्यांना ते रेकॉर्डिंग मी भेट म्हणून देईल. मग कदाचित तेही मला म्हणतील,

"ये गाने उस जमाने के है जब हम सिर्फ अपने लिये गाया करते थे. अब तो बस दुसरो के लिये....!

परमेश्वरा...हे एकदा तरी घडावं !!

आणि कधीतरी घडेल ह्या आशेवर मी मोबाईलमधून दुनिया डिलीट करेल पण ते रेकॉर्डिंग डिलीट करणार नाही !!

समाप्त

(ता.क. : सरफरोशमध्ये अजय आणि गुलफाम हसन ह्यांची भेट सोनाली बेंद्रेमुळे होते. आता ते वय जरा मागे पडलं असलं तरी माझी आणि रुपकुमारजी ह्यांची भेट घडवायला एखादी सोनाली बेंद्रे आली तरी माझी हरकत नाही. तेवढ्या वेळापुरतं बायकोला म्हणेल.... डोन्ट माईंड !!)

--चिनार

गझललेख

प्रतिक्रिया

खेडूत's picture

16 Jan 2021 - 10:47 pm | खेडूत

मस्त!
रुपकुमार यांची सगळी गाणी आवडतात.
ते गाणं शेअर करून लिंक दिलीत तर सगळ्यांनाच ऐकता येईल.

बाकी सोनाली येणं म्हणजे व्याख्या. वुख्खू...आणि वेख्खे!!

चांदणे संदीप's picture

16 Jan 2021 - 11:01 pm | चांदणे संदीप

भाग्यवान आहात, अमूल्य ठेवा जवळ आहे.
लेख नेहमीप्रमाणेच मस्त.
रूपकुमार राठोड यांच एक वेगळं गाणं आहे म्हणजे ते ज्या पद्धतीचं म्हणतात त्यापेक्षा वेगळं ते जेव्हा कधी चुकून रेडीओला लागतं तेव्हा मी हातातलं काम बाजूला ठेऊन ते गाणं ऐकून घेतो. ते गाणं म्हणजे, 'दिलको तुमसे प्यार हुआ, पहली बार हुआ' रहना है तेरे दिल मे मधलं. त्या चित्रपटातली बाकीची गाणी जास्त गाजल्यामुळे हे गाणं जरासं मागे पडलं. त्यात ते चित्रपटात हिरोच्या तोंडी नाहीये त्यामुळेही असेल कदाचित. अजून एक त्यांचं आवडतं गाणं म्हणजे, 'तेरे लिए हम है जिए होटोंको सिए, दिलमे मगर जलते रहें चाहत के दिए' चित्रपट वीर-झारा.

सं - दी - प

तुम्ही फार भारी लिहिता. नेहमी आवडतं.

त्या रिकॉर्डिंगची mp3 करुन इथे एम्बेड करता येईल का?

अनन्त अवधुत's picture

17 Jan 2021 - 4:57 am | अनन्त अवधुत

आवडले.

प्राची अश्विनी's picture

17 Jan 2021 - 9:03 am | प्राची अश्विनी

मस्त ! खूप आवडलं.
तुमची इच्छा नक्की अगदी नक्की पूर्ण होईल.
( " मधातच..." शब्द वाचल्यावर अमरावतीकर असावे अशी शंका आलीच होती. पुढे लगेचच निरसन झालं:))

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jan 2021 - 11:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

हा शब्द नागपुरकरांकडुन जास्त वेळा ऐकलाय. बाकी लेख तर मस्तच आहे हेवेसांनल

आनन्दा's picture

17 Jan 2021 - 10:13 am | आनन्दा

छान लिहिलेत..

बाकी
हल्लीच्या काळात कॅसेट पोचवायला लागत नाहीत.. youtube वरती किंवा ड्राईव्ह वरती अपलोड करून लिंक इमेल केली की झालं.

तुम्ही पाठव तशी लिंक त्यांना, आणि सीसी मध्ये मला ठेवा की झालं.. लिंक त्यांना पोचल्यातच जमा आहे :)

रुपी's picture

17 Jan 2021 - 12:33 pm | रुपी

फारच सुंदर लेख!

गझल या प्रकारात मला खरं तर अजून फार गती नाही :(
म्हणजे ऐकायला आवडते, पण अर्थ कधीकधी कळत नाही.

तुम्ही एवढं सुरेख लिहिले आहे.. शक्य असेल तर तुम्ही ते रेकॉर्डिंग आमच्या बरोबर शेअर करा :)

बाकी योगायोग म्हणजे आजच वीर झारा मधले 'तेरे लिए' ऐकत होते. लता दिदींचे सूर जितके सुंदर, तेवढेच (किंवा थोडे जास्तच) रूपकुमार राठोड यांचे सयंत गाणे अहाहा!
दिवसाची सुरुवात त्या गाण्याने आणि आता झोपण्याआधी हा लेख.. वाह!

कानडाऊ योगेशु's picture

17 Jan 2021 - 1:26 pm | कानडाऊ योगेशु

सुंदर लेख व आठवण.
संदेसे आते है मध्येही मला रुपकुमार राठोड सोनु निगमपेक्षा उजवा वाटला होता.बहुदा सोनु निगमलाही हे फिलिंग आले असावे कारण जेव्हा त्यासाठी फक्त सोनु निगमला उत्कृष्ठ पार्श्वगायनाचा पुरस्कार मिळाला तेव्हा त्याने तो रुपकुमार राठोड व त्याला असा विभागुन मिळावा असा प्रस्ताव ठेवला होता व तो मान्य नाही झाला तेव्हा तो पुरस्कारच नाकारला होता.

मुक्त विहारि's picture

17 Jan 2021 - 8:29 pm | मुक्त विहारि

कारण, अर्थच समजत नाही

पण, लेख आवडला

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jan 2021 - 8:40 am | ज्ञानोबाचे पैजार

मनोगत फारच छान लिहिले आहे.
रुपकुमार राठोड यांची (उपलब्ध असलेली) सगळी गाणी ऐकली आहेत. माझ्या अतिशय आवडत्या गायकां पैकी एक.
पण असे काही जर असेल तर ऐकायला नक्की आवडेल.
बघा जमले तर शेअर करा इकडे
पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jan 2021 - 8:48 am | ज्ञानोबाचे पैजार

https://www.youtube.com/watch?v=0eRP-VFIPLM

पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jan 2021 - 9:03 am | ज्ञानोबाचे पैजार

https://www.youtube.com/watch?v=PueyXgCLgwM

पैजारबुवा,