सरपण

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
11 Jan 2021 - 9:21 pm

सरपण

लहानपणी गावी वीज नव्हती.गॅस नव्हता.स्टोव्ह नव्हते.
स्वयंपाक ,पाणी तापवणे चुलीवरअसे.त्या दिवसांची आठवण आली अन सरपण आठवले. लिहायला इंधन मिळाले.सरपण नसले तर घरची चूल पेटणे शक्य नसे.मजूरीसाठी जाणार्या बाया बापड्या संध्याकाळी कामावरून परतताना वाटेत मिळेल त्या लाकूडफाट्याचा भारा डोक्यावर आणत.अजूनही आणतात.सुस्थितीतील घरच्या स्त्रियांना सरपण जमा करण्याचे कष्ट नसत. पुरूषांना त्याची काळजी.सरपणा साठी ,इमारतीसाठी,शेतीचीअवजारे,औत,कोळपे ,बैलगाड्या तयार करणे इ.साठी,लाकूड हवेच.मग शेतातल्या जुन्या,वहितीला अडचण असणारे झाडांची कटाई होई.झाडे जास्त व मोठी असली तर तोडायचा गुत्ता/ ठेका दिला जाई. दोन तीन जण मिळून कुर्हाडी,करवतीचे साहाय्याने ते काम पार पाडीत.
सरपणासाठी कापलेल्या लाकडांचे ओंडके बैलगाडीने घरासमोर आणून टाकत.वाड्याचे भिंतीला लागून दोन तीन मोठे ओंडके कायम पडलेले असत.घरातले सरपण संपत आले की,ओंडके फोडण्यासाठी,गावातील किसन,बाबू किंवा त्यांचे कुणी भाईबंदांना बोलावले जाई.कधी त्यांचे हाताला  काही काम नसे.अशा वेळी,ते येऊन काम मागत.त्यांना लाकूड फोडायचे काम दिले जाई.अंगातला सदरा,डोईचा पटका किंवा टोपी काढून उघड्या अंगाने,तो गडी फोडायचा ओंडका मोकळ्या पटांगणात घेई. त्याचे निरिक्षण करून तो उभा फोडायचा ,की आडवा हे ठरवे.मग दोन्ही हातांनी कुर्हाड घट्ट पकडून डोक्यापर्यंत उचलायची अन वेगाने खाली
आणत लाकडावर घाव घालायचा.फार मेहनतीचे काम.
ओंडका बाभळीचा असेल,त्याला गाठ असेल तर ते आणखी कठीण.मधे मधे थोडा विसावा घेत ,सोबतच्या भांड्यातील पाण्याचा घोट घेत,पटक्याने घाम पुसत ,पुन्हा घावावर घाव घालत, लाकडाची खांडोळी करायची अन मगथांबायचे. विशिष्ट लयीत चालणारे हे काम बघायला मौज वाटे .लाकूड फोडताना कधी त्याचे  बारीक तुकडे (धिलप्या)उडत.ते लागतील म्हणून मुले भितीने दूर पळत.लाकूडफोड्या इतरांना सावध करे पण स्वतः मात्र  बिनधास्त असे. लाकूड फोडून झालेले छोटे तुकडे,धिलप्या,चुरा जमा करून घरातल्या बोळात टाकायचे.कामाच्या बदल्यात मिळालेली ज्वारी,धोतरात बांधायची आणि ती दळून घेण्यासाठी गिरणीत जायचे.हातावर पोट म्हणजे काय याचा अर्थ कळायचे ते माझे वय नव्हते.
   खरीप हंगामात शेतात तूर ,कापूस, तीळ,अंबाडी ची पीके असत.अंबाडीच्या पिकांची धांडे पाण्यात भिजवून ती सोलून काढायची.त्या सालापासून शेतीकामात उपयोगी  दोर बनवतात.अंबाडीची बीनासालीची वाळली धांडे म्हणजे सनकाड्या. तूर काढल्यावर उरणारे तुरीची धांडे(तुरांट्या),कापसाची बोंडे वेचल्यावर शिल्लक राहिलेली कपाशीची धांडे(पळाट्या),अन नख्या,उसाचीचिपाडे,तीळाचे धांडे ,अन सनकाड्या .हे सगळे अल्पजीवी तुलनेने किरकोळ,हंगामी,लगेच पेटणारे,भुरुभुरु जळणारे,पण उपयुक्त आणि पुरक असे सरपण .त्यांचे भारे बांधून ते शेतात ठेवले जात.लागेल तसे ,बैलगाडीने ते घरीआणले जात.घरात टाकून उरलेले सरपण गायवाड्यात साठवले जाई.होळीच्या वेळी त्या साठ्याचीच नाहीतर इतर लाकडाचीही राखण करावी लागे. गल्लीतलीच नाही तर गावतली उनाड उपद्रवी धाडशी पोरं आपापल्या होळीसाठी लाकडाच्या शोधात असत.दिवसा सोज्वळ पणे घरोघर फिरल्यावर होळीसाठी पुरेशी लाकडे मिळायची .क्वचित एखादा अडेलतट्टू सोडता कुणी नकार द्यायचे नाही. पण अहिंसक मार्गाने मिळालेल्या या सामुग्री वर पोरं समाधानी नसत.कुणाच्यातरी लाकडावर धाडसी डल्ला मारल्या  शिवाय होळीची मजा येत नसे.ज्याने लाकडे द्यायला नकार दिला त्याचेवर विशेष कटाक्ष असे.कूठे कुठे लाकडाचे साठे आहेत याची हेरगिरी करून माहिती काढली जाई. गुप्त बैठकीत चर्चा होउन मोहीम आखली जाई. रात्री मोहीम फत्ते केली जाई.चोरीचा माल गुप्त जागी लपवला जाई.होळी पेटल्यावर रात्री या चोरट्या मालाची होळीत आहुती पडे.ज्याचे नुकसान झाले तो दुसरे दिवशी  पोरांचे नावाने शिमगा करी.दिवस धुळवडीचा.रंगा पेक्षा  शेणाचीच फेकाफेक जास्त. In letter and spirit.शाब्दिक अन प्रत्यक्ष सुध्दा.
गावात गायी,म्हशी फिरताना पडणारे शेणाला माती लागू नये म्हणून, जमिनीवर  पडण्याआधी वरचेवर हातात झेलणारी बाया माणसे नीत्य दिसत.शेण गोळा करून त्यांचे भाकरी सारखे गोलआकार करून  घराच्या भिंतीवर थापायचे .असे वाळलेले "काउ डंग केक" म्हणजे गोवर्या,हे उत्तम आणि  बहुगुणी इंधन .जळाल्यावर उरणारी राख वा राखुंडी,दात घासायला,भांडी घासायला पण वापरायची.
   
नहाणीघरा जवळचे चुलीवर,धुरामुळे मुळचारंग जाऊन काळे पडलेल्या पितळी भांड्यात(हंडा) पाणी तापवले जाई.सकाळी उठल्यावर घरातील स्त्रियांचे पहिले काम ही चूल पेटवायचेअसे.दोन तीन मोठी लाकडे व गोवरी चुलीत घालून त्यावर रॉकेल ओतायचे,आगकाडीने पेटवायचे, फुंकणीने फुंकायचे.लाकडे वाळलेली असली तरलगेच पेटायची. ओली असली तर धूर व्हायचा.तो डोळ्यात जाई. डोळे चुरचुरत .खूप फुंकावे लागे.तेव्हा कुठे लाकडे पेटत.थंडीचे दिवसात चुली जवळ शेकण्यासाठी बसायचे.आगीच्या ज्वाळा पाहात.त्यात वेगवेगळे आकार दिसत.चुलीतून उडालेली राख सगळीकडे पसरे.अंगावर  थर जमा होई.सगळ्यांच्या आंघोळी होईपर्यंत चूल पेटती राही.
स्वयंपाक घरातील चूल गृहिणीची आंघोळ झाल्यावर, न्हाणीघराजवळचे चुलीतील विस्तू(विस्तव),सनकाडी ,तुरांटीकिंवा तिथले जळत्या लाकूड आणून पेटवली जाई.स्वयंपाकघरात प्रकाश येण्यासाठी व चुलीतील धूर वर जाण्यासाठी सवणे (झरोका) होते.पण त्यातून पावसाचे पाणी चुलीवर पडे.पोळा,गणपती महालक्ष्म्याचे वेळी स्वयंपाक सुरूअसताना पाउस हमखास येई.सवणे होते माडीच्याही वरचे पत्र्यांवर .पाऊस आला की,पळत जाऊन पत्र्याचा तुकडा टाकून सवणे झाकणे हा एक उद्योग असे.कधी कधी आईलाच स्वयंपाकातून उठून ते काम करावे लागे.
चुलीतली लाकडे पाणी टाकून विझवली की येणारा चर्र‌ऽऽऽऽर् अशा मजेशीर आवाजा सोबत थोडा धूर निघे अन टोकाला कोळसा.'लकडी जली  कोयला बनी..'हे गाणे आठवायचे.
कोळसा शेगड्यांमधे जास्त उपयोगी.संक्रांतीच्याआधी,
घरोघरी मुली तीळाचा हलवा करत.छोट्या शेगड्या पेटवून त्यावर  छोटी परात ठेवून तीळ अन साखरेचा पाक टाकायचा व ते हाताने हलवत बसायचे.पाकाचे संगतीने तीळाचेचे रूप पालटून जाई.तीळावर काटेदिसत.ह्या कामात अनेकदा हात भाजत .पण हलवा पाहून होणारा आनंद भाजण्याचे वेदने हून मोठा.
   हुरड्याचे दिवसात शेतात छोटा खड्डा खणून गोवर्या ,
पिकाचे वाळलेले काड,लाकडे पेटवून आगटी केली जाई.
त्यात ज्वारीची कणसे  हरभरा, मक्याची कणसे,गव्हाच्या
ओंब्या ,भुईमूगाच्या शेंगा खरपूस भाजल्या जातात.आगटी पेटवण्यासाठी एखादा जुना म्हातारा गडी आपल्या बारबंदीच्या( गुंड्या ऐवजी बारा दोरांनी बांधायचा सदरा)
खिशातून चामडी पिशवीतून पांढरी गारगोट, छोटी लोखंडी पट्टी अन रुई (कापूस) काढे.गारगोटीवर रुई ठेवून त्याची छोट्या लोखंडी पट्टीशी चकमक केली की त्यातून ठिणगी उडे,ती कापसावर पडली की विस्तव तयार होई.ही 'चकमक 'आता फक्त लढाईच्या वर्णनातच .बाराबंदी अन ते म्हातारे गडी पण इतिहासजमा झाले.
    बीड च्या घरी पाणी तापवण्यासाठी असलेले पितळी बंब पण इतिहासजमा.तिथे बंबात घालायची लाकडे अन कोळसा
वखारीतून विकत आणावा लागे.रिकामे पोते घेऊन तिथे जायचे. तिथला माहौल वेगळाच. मोठ्या आवारात लाकडेच लाकडे अनओंडक्यांचे ढिग.आरा मशीनवर लाकूड कटाईचे काम सुरू असे.लाकडाचा भुस्सा,तुकडे पडलेले.लाकडाचा वास पसरलेला.मशीनचे आवाजापेक्षा मोठ्या आवाजात आपल्याला काय हवे ते सांगायचे.आपल्यावर उपकार करतो आहे असे भासवत तिथला अब्दुल किंवा हूसेन मोठ्या तराजूत लाकडाच्या धलप्या मोजून देई.मणाचे माप. कधी फळीसारखे लाकूड मिळे.ते क्रिकेटची बॅट म्हणून वापरायची. कोळसा घेताना हात काळे.तो ऐवज पोत्यात भरून सायकल रिक्षाने घरी आणायचा. कंटाळा आणणारा कार्यक्रम होता.
  आमचे शेजारी राहाणारे एकाने यावर मस्त उपाय शोधला होता. घरासमोर लिंबाचे झाड होते.उड्या वर उड्या मारत त्या झाडाचे वाळलेले फांटे तोडायचे अन त्यावर पाणी तापवायचे.दुसरा उपाय म्हणजे बादलीत पाणी भरून उन्हात ठेवायची.दुपारनंतर पाणी गरम जरी नाही तर किमान कोमट तरी व्हायचे.मग आंघोळ करायची.कशाला हवे विकतचे सरपण? सौरुउर्जेच्या वापराचे हल्ली फार कौतुक होते.त्याने तीन चार दशकापूर्वीच तो प्रयोग केलेला.पारंपारिक उर्जा स्त्रोतांचा असा  वापर करून पर्यावरण रक्षण केल्याबद्दल त्याचा मोठा सन्मान व्हायला हवा होता एखादी पदवी मिळायला हवी होती. याला सन्मान नाही पणआजूबाजूच्या लोकांकडून 'डांबरे'अशी पदवी मिळाली.डांबरा सारखा चिकट म्हणून, '
    कांही जुन्या आठवणी ही चिकटून असतात मनात.निघता निघत नाहीत.बत्तीस वर्षापूर्वी वडिलांचे,अन पंधरा वर्षापूर्वी आईचे जाणे.त्यांच्याअन अनेक आप्त,स्वकीय,मित्रांच्या शेवटच्या प्रवासाचे स्मरण; हे मानवाच्या क्षणभंगुर अस्तित्वाचेही स्मरण.माणसांची अचेतन शरीरं अग्नीच्या साथीने अन साक्षीने कायमची पंचतत्वात विलीन होताना सोबत असते चितेची,एका अर्थाने सरपणाचीच.सरपण तरी  कुठे चिरंजीव आहे? जळणे ,नष्ट होणे त्याचेही नशीबी आहेच.जळताना इतरांना उर्जा,उब द्यायची की भस्मसात करायचे हे सरपणाला माहिती नसते,अन हातीही नसते . आपल्याला मात्र ठाऊक ही असते,आणि निवडीचे स्वातंत्र्यही.
             नीलकंठ देशमुख
  
 

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

11 Jan 2021 - 9:44 pm | प्राची अश्विनी

वाह! काय जबरदस्त लिहिलंय.

नीलकंठ देशमुख's picture

11 Jan 2021 - 10:23 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल

रंगीला रतन's picture

11 Jan 2021 - 9:59 pm | रंगीला रतन

लेख आवडला.

नीलकंठ देशमुख's picture

11 Jan 2021 - 10:23 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल

बाप्पू's picture

11 Jan 2021 - 10:08 pm | बाप्पू

छान.. तुमच्याकडे आठवणी शब्दबद्ध करण्याची कला आहे.
तुमचे आजवरचे सगळे लेख वाचलेत आणि प्रत्येक वेळी भूतकाळाच्या आठवणीत रमून गेलोय.
टाइम मशीन च जणू... !!!

नीलकंठ देशमुख's picture

11 Jan 2021 - 10:23 pm | नीलकंठ देशमुख

खूप धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल

Bhakti's picture

11 Jan 2021 - 10:39 pm | Bhakti

खुप छान आठवणी आहेत.. आणि सरपण या शीर्षकाखाली किती काही हळूहळू जोडल्या आहेत आगीची धग...पण शेवटचा परिच्छेद . .. निशब्द!

नीलकंठ देशमुख's picture

11 Jan 2021 - 11:01 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल

सरिता बांदेकर's picture

12 Jan 2021 - 2:32 pm | सरिता बांदेकर

लहानपणीची आठवण ताजी झाली.
मला पण आवडतं हे असं पूर्वीचे दिवस आठवायला.पण तुमच्यासारखं छान शब्दबद्ध करता येत नाही.
आम्ही मुंबईत रहायचो ते उपनगरात त्यामुळे हे चूल पेटवणे वगैरे करता येत होते तेव्हा.
धन्यवाद

नीलकंठ देशमुख's picture

12 Jan 2021 - 7:18 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. प्रयत्न करा निश्चित जमेल. तुमच्याआठवणी वाचायला आवडेल

जयन्त बा शिम्पि's picture

12 Jan 2021 - 3:12 pm | जयन्त बा शिम्पि

आजही आमच्या बोरिवली पूर्व मध्ये तांब्याचा बंब पेटविला जातो, हे मी पाहिले आहे. पूर्वी गावाकडे रहावयास असतांना, असे बंब आम्ही वापरले आहेत.जुन्या आठवणी
जाग्या केल्य्यबद्दल धन्यवाद. पुलेशु.

नीलकंठ देशमुख's picture

12 Jan 2021 - 7:19 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद

Rajesh188's picture

12 Jan 2021 - 3:15 pm | Rajesh188

तुमच्या कडे प्रसंग शब्दात उतरवण्याची उत्तम लेखन कला आहे.
वाचताना त्याच काळात वावरत आहे भास होतोच.
आमच्या घरी माझ्या लहानपणा पासूनच वीज होती.
वीज नव्हती ते दिवस मी अनुभवले नाहीत.
आमच्या कडे सरपण साठी जास्त प्रमाणात बाभळी च्या लाकडाचा जास्त वापर असायचा .
बाभळी ची मोमोठी झाड होती ती 2 वर्षातून एकदा खडसायला यायची.
त्यात शहाणी बाभळ असेल तर ठीक पण वेड्या बाभळी ल काटे खूप मोठमोठे असायचे.
धनगर हे बाभळी खडसायचे काम करायचे.
ह्याचे लाकूड भलतेच दमदार असते खूप वेळ जळते.
आणि सुकलेल्या लाकडावर कुऱ्हाड पण जास्त काम करायची नाही .
खूपच कडक लाकूड.

नीलकंठ देशमुख's picture

12 Jan 2021 - 7:20 pm | नीलकंठ देशमुख

खूप धन्यवाद. अशा प्रतिक्रिया वाचून उत्साह वाढतो. लिहायचा

मुक्त विहारि's picture

12 Jan 2021 - 4:01 pm | मुक्त विहारि

माणसाचा प्रवास... सरपणा पासून ते सरपणा पर्यंत

नीलकंठ देशमुख's picture

12 Jan 2021 - 7:21 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल.
शेवटी वास्तव तेच आहे

मराठी_माणूस's picture

12 Jan 2021 - 5:53 pm | मराठी_माणूस

मस्त.
तुमच्या लेखाची उत्सुकतेने वाट पहात असतो.

नीलकंठ देशमुख's picture

12 Jan 2021 - 7:21 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल. उत्साह वाढवतात अशा प्रतिक्रिया

NAKSHATRA's picture

12 Jan 2021 - 6:23 pm | NAKSHATRA

लहानपणीची आठवण ताजी झाली.

नीलकंठ देशमुख's picture

12 Jan 2021 - 7:22 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिक्रिया वाचून छान वाटले

सिरुसेरि's picture

13 Jan 2021 - 9:56 pm | सिरुसेरि

माहितीपुर्ण लेख . सरपण आणी सरपणाशी जोडले गेलेले ग्रामीण जीवन याचे यथोचित वर्णन . +१ .

नीलकंठ देशमुख's picture

14 Jan 2021 - 8:54 am | नीलकंठ देशमुख

प्रतिक्रिया वाचून छान वाटले