एक जिलबी आठवणींची

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
21 Aug 2017 - 5:23 pm

एक जिलबी आठवणींची

पुर्वी दुरदर्शन आणी इतर टीव्ही वाहिन्यांवर फिलिप्स टॉप टेन , सुपरहिट मुकाबला , एकसे बढकर एक असे गाण्यांचे कार्यक्रम असत . यांमधे त्या आठवड्यात गाजत असलेली दहा हिंदी चित्रपटगीते प्रसिद्धीच्या क्रमवारीवर सादर केली जात . कधी काही कारणाने यातला कुठला एपिसोड बघता आला नाही तरी फारसे बिघडत नसे .
कॉलेजच्या हॉस्टेलमधुन एखाद दुसरा फेरफटका मारला तरी वेगवेगळ्या रुम्समधुन ऐकु येत असलेल्या गाण्यांवरुन सध्याची टॉप टेन गाणी कुठली आहेत याचा अंदाज येत असे .

ए. आर. रहमानच्या संगीताचे मायाजाल तेव्हा हळुहळु जनमानसाची पकड घेत होते . रोजा , बॉम्बे , हमसे है मुकाबला अशा चित्रपटांतील एका मागुन एक गाजलेल्या गाण्यांमुळे हे मायाजाल पसरतच चालले होते . "सुरुवातीला दोन , तीनदा ऐकली तरी हि रहमानची गाणी काही समजतच नाहित " अशी तक्रार करणारा हळु हळु तीच गाणी परत परत ऐकत असे . एक वेळ तर अशी आली की या टॉप टेन गाण्यांच्या कार्यक्रमात ४ / ५ गाणी हि एकट्या ए. आर. रहमानची होती . यातली १/२ गाणी हि टॉप टेन लिस्टमधे बराच काळ स्थिरावली होती . १/२ गाणी हि नुकतीच येउन अधल्या मधल्या पायदानपे पोचली होती . तर एखादे नवीन गाणे हे या लिस्टमधे हळुच शेवटुन चंचुप्रवेश करु पाहात होते .

कॉलेजच्या हॉस्टेलमधुन फिरताना याचीच प्रचिती येत असे . एखाद्या रुममधुन सबमिशन पुर्ण झाल्याच्या आनंदात उजव्या हाताचा अंगठा उंचावुन नाचत नाचत "तनहा तनहा यहांपे जीना ये कोई बात है " च्या तालावर जल्लोष केला जात असे . कुठल्यातरी रुममधे आपल्या खास क्लासमेटसना आठवुन कुणीतरी व्याकुळ होउन गात असे - "कोई यहां रुपमती , कोई यहां भानुमती , तुही बता कौन मेरी दिलरुबा " . अशावेळी त्या गाण्यात आपला ठेवणीतला आवाज मिसळुन आपल्या मित्राला त्याचा रुममेट धीर देत गात असे - "जो है माधुरी यहां , वोही तेरी दिलरुबा ."

कुठल्यातरी रुममधे जीटी मारताना कोणी तरी तल्लीन होउन शिट्टीवर गाणं वाजवत असे - " सुन ले ओ जानम , मै हुं परम सिवम , तु है पार्वती , मिलना जनम जनम "

तर पलिकडच्याच रुममधे कोणीतरी वीर आपण घेतलेल्या शपथेची जाहीर कबुली देत असे - "प्यार कभी ना तोडेंगे , साथ कभी ना छोडेंगे , कौन हमे रोकेगा बोलो , कौन हमे जीतेगा बोलो , गोरी तुमने जबसे दिल जीता "

नंतर तर कॉलेजच्या गॅदरींगलाही ग्रुप डान्स बसवताना ए. आर . रहमानच उपयोगी पडत असे . अशा वेळी गच्चीवर एका कॉर्नरला एक ग्रुप "छय्या छय्या " गाण्यावर डान्स बसवत असे . या गाण्यातला रेल्वेचा धडाड धडाड साउंड इफेक्ट हा डान्समधुन दाखवण्यासाठी वेळप्रसंगी एकमेकांवर धडकुनही होत असे .

तर पलिकडच्या कॉर्नरला दुसरा ग्रुप "जिया जले जां जले " या गाण्यावर तयारी करत असे . या गाण्यातील "कुरुवारी किरये कुरुघीर कुरुघीर कुंची वरदी कुइल्लारी कुडुवरद्दी कोतड्दी किनिये .. मारयिन्ने " ( चु. भु. द्या. घ्या .) अशा समजायला अवघड पण ऐकायला गोड वाटत असलेल्या ओळींवर तलवारींचे हात बसवले जात . त्यासाठी कुठुनतरी तलवारी आणी धोतीही मिळवल्या जात . या डान्ससाठी कॉलेजमधील बिल्डर पोरांना खुप डिमांड असे .

कॉलेजचे दिवस एकतर टॉपर लोकं तरी गाजवतात नाहीतर टपोरी लोकं तरी . पण यावेळी मात्र कॉलेजचे दिवस ए. आर . रहमानने गाजवले .

-------------------------------------------------------- समाप्त ----------------------------------------------------

संगीतलेख

प्रतिक्रिया

खाबुडकांदा's picture

21 Aug 2017 - 6:57 pm | खाबुडकांदा

तुम्ही इंजिनीअरींग डिप्लोमा वाले दिसताय ..
जी टी मारणे ही धम्माल होती खरी
आम्ही जरा आधीच्या काळातले . जितेंद्र श्रीदेवी तक्ती कपूल चा जमाना होता तो
बाकि हॉस्टेल गॅदरींग वगैरे वातावरण अगदी तसेच !

पगला गजोधर's picture

21 Aug 2017 - 7:26 pm | पगला गजोधर

मिलाओ हाथ, तुम्हीपण आमच्यासारखे रहमान इरा मधल्या इंजिनिअरिंग बॅचचे वाटत !!!!

tu

सतिश गावडे's picture

22 Aug 2017 - 11:36 am | सतिश गावडे

इंजिनियरिंगला असताना घरीच राहिल्यानं (कॉलेज ते घर 8 किमी) हॉस्टेलचा माहौल फारसा अनुभवता आला नाही. मात्र त्या काळात इतरत्रही हीच गाणी ऐकू यायची.

आजही कधी तरी सकाळी टीव्ही लावला की नव्वदीतील गाणी कुठे लागली आहेत का शोधत असतो. आताच्या गाण्यात काही दम वाटत नाही. (हेच आमच्या आधीच्या पिढीच्या लोकांना नव्वदीतील गाण्यांबद्दल वाटायचे)

अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आता गाण्यांचे ऑडीओ/व्हीडीओ अलबम येत नाहीत.

पगला गजोधर's picture

22 Aug 2017 - 12:08 pm | पगला गजोधर

कुठल्याही मनोरंजन अँप मधे प्ले-लिस्टा असतात, तिथे "बेस्ट ऑफ बॉलिवूड ९०" असं सर्च मारा....

जेम्स वांड's picture

23 Aug 2017 - 9:49 am | जेम्स वांड

यु ट्यूब वर '90s इंडी पॉप असं टाकलं तर शान, सोनू निगम, कलोनियल कझिंस (लेस्ली लुईस, हरिहरन) वगैरेंची जुनी गाणी सापडतात मस्त.....

सिरुसेरि's picture

8 Jan 2021 - 2:24 pm | सिरुसेरि

ए. आर. रहमान यांना ६ जानेवारीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा . ( यानिमित्ताने जुना धागा .... = जाहिरात )

टर्मीनेटर's picture

8 Jan 2021 - 2:38 pm | टर्मीनेटर

आठवणींची गोड जिलबी आवडली 👍

कॉलेजचे दिवस एकतर टॉपर लोकं तरी गाजवतात नाहीतर टपोरी लोकं तरी . पण यावेळी मात्र कॉलेजचे दिवस ए. आर . रहमानने गाजवले .

+१
आमचे कॉलेजचे दिवस आमच्या ग्रुपने चांगलेच गाजवले होते! आम्ही टपोरी तर होतोच त्याजोडीला ए. आर . रहमानचे भक्तही होतो 😀

टपोरी म्हणजे मेकॅनिकल ब्रँच का ? , कारण टपोरी आणी मेकॅनिकल ह्या पैकी कोणताही एक शब्द वापरला तरी चालतो असा आमच्या वेळेस सार्वत्रिक समज होता (आता आले की नाही ते माहीत नाही )आता ठरलं , अरेबियन नाईट्स सारख मेकॅनिकल नाईट्स वर एक लेख टाकणार :-) 

टर्मीनेटर's picture

12 Jan 2021 - 11:28 am | टर्मीनेटर

ऑलमोस्ट... 😀
मेकॅनिकल किंवा इंडस्ट्रीअल इलेक्ट्रोनिक्स माझी अनुक्रमे पहिली आणि दुसरी पसंती होती परंतु गुणतालिका पाहून कॉलेजने दोन्हीसाठी प्रवेश देण्यास असमर्थता दर्शवली होती. मग तद्न्य मंडळींनी दिलेल्या MTM मधे डिप्लोमा करून पुढे मेकॅनिकल मधे डिग्री करता येणे शक्य असल्याचा सल्ला शिरोधार्य मानून तसे केले. फर्स्ट सेम. मधेच ह्यात करियर तर होईल पण लाईफ जाम बोरिंग होईल असा साक्षात्कार झाल्यावर त्याला राम राम ठोकला आणि एक वर्ष अक्कलखाती जमा करून पुढच्यावर्षी साईडच बदलून टाकली! बाकी मेकॅनिकल नंतर टपोरी चा संबंध सिव्हीलशी आमच्यावेळी जोडला जाऊ लागला होता.

अरेबियन नाईट्स सारख मेकॅनिकल नाईट्स वर एक लेख टाकणार :-)

लवकर टाका, वाचायला नक्की आवडेल...

सिरुसेरि's picture

10 Jan 2021 - 8:46 pm | सिरुसेरि

बाकी टपोरी आणी मेकॅनिकल म्हणले की आरएचटीडीएम / मिन्नालेमधला मॅडी आठवला .

चौथा कोनाडा's picture

11 Jan 2021 - 1:29 pm | चौथा कोनाडा

आठवणींची झकास जिलबी !
पुन्हा त्या होस्टेलच्या दिवसात गेलो. रहमानची गाणी डोळ्या पुढं नाचायला लागली !
मुक्काला-मुकाबला आणि उर्वशी-टेक इट इझी पॉलिसी या गाण्यांचे तर आम्ही परमकोटीचे वेडपट फॅन, ओळी कानावर पडल्या की कुठंही नाचायला लागायचो !