शिक्षणाचे मानसशास्त्र - प्रश्नोपद्व्याप - काव्यत्मक काव काव

राजा वळसंगकर's picture
राजा वळसंगकर in जनातलं, मनातलं
22 Nov 2020 - 8:06 pm

कसा करावा विचार;
उपजत असे का हा प्रकार;
शिकून प्राप्त होईल ज्ञान अलंकार;
विधी सांगोनि करी उपकार ।।1।।

सांगतो हे सर्वश्रुत असले तरी,
खाज विचाराची नाठाळ खरी,
उभा बोहोल्यावर मी जरी,
वाटे वधुपेक्षा का करवली बरी ।।2।।

जिज्ञासा कुतूहलाचा घेऊन आधार;
गरज, हौस, वृत्ती आणि विकार;
मनी शंकाबीज घेई आकार;
पहा किती सहज सुरू झाला विचार ।।3।।

शंका मनी असे प्रथम चरण;
द्वितीय शंकेचे विश्लेषण;
मग प्रश्नांची जडण घडण;
अभ्यासू मनाचे हे लक्षण ।।4।।

जाणून प्रश्नांची रचना आणि प्रकार;
विणून शब्दांची माळ जाणकार;
शास्त्र सिद्ध योजनेचा घेऊन आधार;
उत्तम विचारा देतो आकार ।।5।।

सत्य तथ्य मिथ्य बरळ नाठाळाची;
चाळून सांगावी पटकथा प्रश्नाची;
पण लावू नका माळ अलंकार शब्दाची;
अति तेथे माती उक्ती श्रेष्ठी जनाची ।।6।।

विषयास धरुन मूळ प्रश्न असावा;
पाहुनी उत्तर प्रश्न पुढचा जुळवावा;
जोडुनी अशी प्रश्नोत्तराच्या माळा;
इंद्राय सह तक्षकाय स्वाहा ।।7।।

बंद प्रश्ना सडेतोड मिळे उत्तर;
पण विचार थांबतो इथेच सत्वर;
खुला प्रश्न संधी विस्तार सविस्तर;
वेसण नसता भटके निरंतर ।।8।।

सूचक प्रश्न सांगे उत्तर हवे मला असेे;
अलंकारयुक्त प्रश्न स्वगत तर नसे?
विचार करण्यास यांचा उपयोग नसे;
बोले तयाची अक्कल मात्र दिसे ।।9।।

कधी प्रश्नात दडे उपप्रश्नाचे कीडे;
तर जड कधी माहितीचे पारडे;
कधी प्रश्नात असे उपदेशाचे विडे;
द्यावे उत्तर कसे विवंचना पडे ।।10।।

प्रकार विकार प्रश्नाचे असतील अजून;
सांगेल किती कसे केव्हा कधीतरी कोणी मोजून;
करा विचार धर्म अर्थ काम मोक्ष वाटेल ते रांधून;
प्रश्न नाही तिथे जीवन संपेल गंजून ।।11।।

रटाळ जरी हे व्याख्यान भयंकर;
जिवंत मृता मधले सांगे अंतर;
प्रश्नोत्तराचा हा खेळ चाले निरंतर;
असेल माझ्या तुमच्याही नंतर ।।12।।

शैक्षणिक साहित्यामधे काव्य हे एक महत्वाचे साधन आहे. कविता (विषेशता गाणी) दीर्घ काळ लक्षात राहातात म्हणून मी हा प्रयत्न केला होता. जमलय का नाही हे तुंम्ही ठरावा आणि सांगा , पण लिहिण्याची हौस, क्रिएटिव्हीटी वापरून जितके भावनिक / ललित / पाक क्रुति साहित्य आहे तितके आधुनिक आणि व्यावसायिक शास्त्र मराठीत व्हावे असे वाटते.

कविताविचार

प्रतिक्रिया

गोंधळी's picture

25 Nov 2020 - 8:48 pm | गोंधळी

कविता वाचुन काय प्रतिसाद द्यावा हा प्रश्न पडला आहे.

राजा वळसंगकर's picture

25 Nov 2020 - 11:52 pm | राजा वळसंगकर
राजा वळसंगकर's picture

25 Nov 2020 - 11:53 pm | राजा वळसंगकर

छान, बेस्ट, आवडली ... यापैकी काहीही चालेल. :-) The answer will only be as good as the question. पुढाऱ्यांचे भाषण, शिक्षकांचे कथन, व्याख्यान ... सगळीकडेच उपयोगी. आणि आज उद्या ई लर्निंग जम बसणारच आहे, तिथे तर हा फारच महत्वाचा घटक आहे. म्हणून प्रश्न प्रकारावर थोडा विचार व्हावा, अभ्यास व्हावा आणि त्यावर लेखन व्हावे, साहित्य निर्मित व्हावे असे वाटते.

गोंधळी's picture

26 Nov 2020 - 10:47 am | गोंधळी

👍