बातम्या हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होऊन बसलेला आहे. सध्या तर वृत्तमाध्यमांचा अक्षरशः महास्फोट झालेला आहे. आपण विविध बातम्या रेडिओ, वृत्तपत्रे, टीव्ही आणि आंतरजाल या सर्व माध्यमांमधून ऐकत, वाचत किंवा पाहत असतो. असा एखादाही क्षण जात नसेल, की जेव्हा एखादी बातमी आपल्या पुढे येऊन आदळायची थांबली आहे. काही वेळेस तर हे अजीर्ण होते. एकंदरीत बातम्यांमध्ये नको एवढी संख्यात्मक वाढ झाल्यामुळे त्यांचा गुणात्मक दर्जा मात्र यथातथाच झालेला आहे. या मुद्द्यावर आपण अन्यत्रही यापूर्वी चर्चा केलेली आहे. पण आज तो विषय नाही. आज मी तुम्हाला टीव्हीपूर्व काळाकडे घेऊन जाऊ इच्छितो. तेव्हा सामान्य माणसासाठी बातम्या समजण्याचे दोनच मुख्य स्त्रोत होते - एक रेडिओ आणि दुसरी वृत्तपत्रे. रेडिओचा बातम्याप्रसार हा तसा पहिल्यापासूनच संयमित राहिलेला आहे. ते त्या माध्यमाचे अंगभूत वैशिष्ट्य आहे. वृत्तपत्रांमध्ये मात्र अगदी आमूलाग्र बदल दशकांगणिक झालेले दिसतात. त्याकाळी वृत्तपत्रे कमी पानांची असत. मुख्य म्हणजे वृत्तपत्राचे पहिले पान भल्यामोठ्या पानभर जाहिरातीने सुरू न होता खरोखरच महत्त्वाच्या बातम्यांनी उठून दिसे. सकाळी उठल्यानंतर घरी आलेले वृत्तपत्र आधी आपल्या ताब्यात यावे यासाठी कुटुंबीयांमध्ये देखील स्पर्धा असायची. बातम्या आवडीने, चवीने आणि बारकाईने वाचल्या जात.
अशा असंख्य बातम्या आतापर्यंतच्या आयुष्यात वाचल्या गेल्या आहेत. संस्कारक्षम वयामध्ये वाचलेल्या बातम्या अनेक प्रकारच्या होत्या. काही नेहमीच्या किरकोळ तर काही ठळक घडामोडींच्या. काही सुरस तर काही चमत्कारिक; काही थरकाप उडवणाऱ्या तर काही मनावर खोलवर परिणाम करणाऱ्या. अशा काही बातम्यांच्या निवडक आठवणी आज तुमच्यापुढे मांडत आहे. शैक्षणिक वयामध्ये आकर्षक वाटलेल्या अनेक बातम्यांची कात्रणे कापून ठेवलेली होती खरी, परंतु कालौघात आता ती कुठेतरी गडप झालेली आहेत. आता जे काही लिहीत आहे ते निव्वळ स्मरणावर आधारित आहे. त्यामुळे तपशीलात थोडाफार फरक झाल्यास चूभूदेघे.
सुरुवात करतो एका रंजक वृत्ताने. अंदाजे ४० ते ४५ वर्षांपूर्वीचे. बातमीचा मथळा असा होता:
“आंतरराष्ट्रीय टक्कलधारी संघटनेचे अधिवेशन”
‘ या संघटनेचे एक विशेष अधिवेशन अमुक तमुक ठिकाणी भरले होते. त्या परिषदेचे उद्घाटन भारताचे (तत्कालीन) राजदूत इंद्रकुमार गुजराल यांनी केले होते. या परिषदेत माणसांच्या- म्हणजे विशेषतः पुरुषांच्या- टक्कल या विषयावर रोचक चर्चा झाली. देशोदेशींचे अनेक टक्कलधारी लोक या परिषदेस आवर्जून हजर होते. त्यातील एका विशेष कार्यक्रमात विविध सहभागींना त्यांच्या डोक्यावरील टकलाच्या आकार व तजेल्यानुसार ‘सनशाइन’, ‘मूनशाइन’ अशा मानाच्या पदव्या देण्यात आल्या ! आपल्या अध्यक्षीय भाषणात गुजराल म्हणाले, की माझ्या घरात टक्कलाची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालू असून मला तिचा सार्थ अभिमान वाटतो. एकूणच टक्कल हे माणसाचे वैगुण्य न समजता वयानुरूप होणारा शोभिवंत बदल समजण्यात यावा या मुद्द्यावर चर्चेचे सूप वाजले.’
ही खूपच रंजक बातमी होती यात वाद नाही. आतापर्यंत मी अशी बातमी एकदाच वाचली. त्यानंतर या संघटनेची वार्षिक अधिवेशने वगैरे झाली का नाही, याची काही कल्पना नाही. जाणकारांनी जरूर भर घालावी.
एक बातमी आठवते ती शहरी स्त्रियांच्या वेशभूषेतील क्रांतिकारी बदलाबद्दलची. किंबहुना एका घटनेची जुनी आठवण म्हणून ती छापली गेली होती आणि माझ्या वाचनात आली. प्रत्यक्ष ती घटना घडल्याचा काळ माझ्या जन्मापूर्वीचा आहे. तो सामाजिक बदल आहे, शहरी स्त्रीने नऊवारी साडी झुगारून देऊन पाचवारी साडी आपलीशी केल्याचा. हे ज्या काळात घडले तेव्हा वृत्तपत्रातून अक्षरशः विविध विचार आणि मतांचा गदारोळ झालेला होता. त्यामध्ये स्त्रिया संस्कार विसरल्या इथपासून ते संस्कृती बुडाली, इथपर्यंत अगदी चर्वितचर्वण झालेले होते ! प्रत्यक्ष जरी तो काळ मी अनुभवलेला नसला, तरी या जुन्या आठवणींच्या बातमीने देखील माझ्या नजरेसमोरून त्याकाळचे वास्तव तरळून गेले.
अजून एक रोचक बातमी म्हणजे एकदा वृत्तपत्रात जुन्या काळातील, म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील लग्नपत्रिकांच्या आठवणींची बातमी तत्कालीन पत्रिकांसह छापून आली होती. त्यातील अगदी लक्षात राहिलेला एक मुद्दा फक्त लिहितो. तेव्हाच्या काही लग्नपत्रिकांमध्ये लग्न करण्याचा मूलभूत हेतू अगदी स्पष्टपणे नमूद केलेला असे ! त्याचा नमुना असा आहे:
“आमचे येथे श्री कृपेकरून हा आणि ही यांचा शरीरसंबंध करण्याचे योजले आहे आहे.... तरी आपण वगैरे वगैरे वगैरे.”
लग्नपत्रिकांचे बदलते स्वरूप आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. मात्र ही अजब व परखड वाक्यरचना वाचून खरोखर करमणूक झाली.
तारुण्यातील एक सर्वाधिक लोकप्रिय विषय म्हणजे क्रिकेट. त्याकाळी क्रिकेटच्या सामन्यांचे रेडिओवरील धावते समालोचन अगदी मन लावून ऐकले जाई. ते मनसोक्त ऐकलेले असले तरीही दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात त्याबद्दल जे सगळे प्रसिद्ध होई, तेही अगदी अथपासून इतिपर्यंत वाचले जाई. त्यावरील चर्चाही अख्खा दिवसभर होई. त्यामुळे क्रिकेट संदर्भातील एक दोन आठवणी तर लिहितोच.
अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी मनावर कोरली गेलेली बातमी आहे ती म्हणजे इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर झालेल्या भारताच्या दारुण पराभवाची. त्या कसोटी सामन्यामध्ये आपला दुसरा डाव चक्क सर्वबाद ४२ वर संपला होता आणि जवळजवळ दोनशेहून अधिक धावांनी आपला पराभव झालेला होता. तेव्हा आमच्या आठवणीतील हा सर्वात दारुण पराभव होता. मुद्दा तो नाही. मुद्दा बातमी कशी छापली होती हा आहे. सर्वसाधारणपणे वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर सर्वात वर काय असते ? तर अगदी ठळक टाईपात त्याचे स्वतःचे नाव. ही घटना घडली त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात “भारत सर्वबाद ४२” ही बातमी खुद्द वृत्तपत्राच्या नावाच्या डोक्यावर अशी सर्वोच्च स्थानी छापलेली होती. माझ्या आयुष्यात अशा प्रकारची बातमी मी प्रथमच पाहत होतो त्यामुळे ती कायमस्वरूपी लक्षात आहे.
त्या घटनेपूर्वी भारत कसोटी सामन्यात कधीही ५० च्या आत सर्वबाद झालेला नव्हता. मात्र अन्य काही देशांनी तो अनुभव चाखलेला होता. तेव्हा भारतही आता त्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला, असे बातमीत रोचकपणे लिहिलेले होते. बाकी संपूर्ण संघाच्या 42 धावसंख्येतील निम्म्या धावा एकट्या एकनाथ सोलकर यांनी काढलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता, हेही बारकावे आज आठवतात.
अजित वाडेकरांच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजमध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. कदाचित तो अभूतपूर्व प्रसंग असावा. त्यानंतर जेव्हा आपला संघ मायदेशी परतला तेव्हा झालेल्या त्यांच्या स्वागताच्या बातम्या बराच काळ झळकत होत्या. त्यांचेही तेव्हा खूप अप्रूप वाटले होते. ब्लेझर घातलेले फोटोतले हसतमुख वाडेकर आजही चांगले आठवतात.
आपल्या देशाच्या इतिहासात 1975 च्या दरम्यान पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली होती. ती प्रत्यक्ष लादण्यापूर्वीची रेडीओवरील एक बातमी चांगली आठवते. रात्री ८ च्या बातम्या लागलेल्या आणि एकीकडे रेडिओची खरखर चालू होती. त्यात बातमी सांगितली गेली, की
अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेवरील निवड अवैध ठरवली.
रेडिओवर बातम्या सांगण्याची एक पद्धत असते. ती म्हणजे आधी ठळक बातम्या, मग विस्ताराने आणि शेवटाकडे पुन्हा एकदा ठळक बातम्या. या तीनही वेळेस मी तो ‘अवैध’ शब्द ऐकला. अगदी पहिल्यांदाच ऐकला. त्याचा पटकन नीट अर्थबोध झाला नाही. आणि नंतर मी घरी विचारले सुद्धा की ‘रद्द केली’ असे न म्हणता ते ‘अवैध’ का म्हणत आहेत ? नंतर पुढच्या आयुष्यात अनेक अवैध गोष्टी पाहण्यात, वाचण्यात आणि ऐकण्यात आल्या, हा भाग अलाहिदा.
सध्या वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अगदी वरच्या भागात मधोमध राजकीय व्यंगचित्र असणे कालबाह्य झालेले आहे. परंतु एकेकाळी दर रविवारच्या अंकात तर ते हटकून असे. राजकीय आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातील एक व्यंगचित्र त्याकाळी खूप गाजले होते. ते आठवते. तेव्हा नुकताच काही कारणामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले होते. पहिल्या अध्यक्षांच्या कारकिर्दीत हेन्री किसिंजर हे परराष्ट्रमंत्री होते. पुढे नव्या अध्यक्षांनीही या गृहस्थांना त्याच मंत्रिपदी कायम ठेवले. या अनुषंगाने एक सुंदर व्यंगचित्र पहिल्याच पानावर ठळकपणे आले होते. त्यात हेन्री किसिंजर मस्तपैकी हात उडवून म्हणताहेत, की “ते गेले आणि हे आले, मला कुठे काय फरक पडलाय ? मी आहे तसाच मस्त आहे !” पुढे या घटनेचा दाखला अनेकजण तत्सम प्रसंगांत देत असत. अशी मार्मिक व्यंगचित्रे त्याकाळात बऱ्यापैकी बघायला मिळत.
शालेय वयात असताना ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये एक अत्यंत वाईट बातमी वाचनात आली होती. बातमी अशी होती:
“मासिक पाळी दरम्यान शरीर संबंधास पत्नीने नकार दिल्यामुळे पतीकडून तिची हत्या “
शरीरसंबंध या विषयाबाबत धूसर आणि चाचपडते ज्ञान असण्याचे ते माझे वय. तेव्हा ही बातमी वाचली आणि एकदम सुन्न झालो. ठराविक मासिक काळातील संबंधास नकार हा बातमीतला भाग माझ्या दृष्टीने तेव्हा न समजण्यातला होता. परंतु एवढ्या कारणावरून एक पुरुष चक्क आपल्या बायकोचा खून करतो याचा जबरदस्त हादरा मनाला बसला. त्यानंतरच्या आयुष्यात दहा वर्षातून एखादी या स्वरूपाची बातमी वाचनात आली; नाही असे नाही. परंतु सर्वप्रथम अशी बातमी वाचताना त्या वयात झालेली स्थिती आणि त्यात ते दिवाळीचे दिवस, या गोष्टी आजही मनाला कुरतडतात.
एखाद्या मोठ्या कालखंडातील बातम्यांचा लेखाजोखा सादर करणे हा काही या लेखाचा उद्देश नाही. तेव्हा आता माझ्या आठवणी थांबवतो. त्याचबरोबर तुम्हालाही एक आवाहन करीत आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात अशा रोचक, सुरस, धक्कादायक वगैरे प्रकारच्या बातम्या वाचलेल्या अथवा ऐकलेल्या असणारच. याबद्दलचे तुमचेही अनुभव लिहा. माध्यमांत अप्रकाशित घटनांबद्दलही लिहायला हरकत नाही.
पण एक करा...
नजीकच्या भूतकाळाबद्द्ल नका लिहू. तुमच्या आयुष्यात किमान वीस वर्षे मागे जा आणि तेव्हाचे असे जे काही आठवते ते लिहा. गुगल फिगल न करता आठवतंय तसेच लिहा. त्यातच खरी मजा असते. त्यातून स्मरणरंजन होईल. तेच या धाग्याचे फलित असेल.
************************************************
प्रतिक्रिया
6 Nov 2020 - 11:37 am | विजुभाऊ
कपिल देव ने पाकिस्तानात केलेल्या पहिल्या मॅचमधील कामगिरीमुळे म टा ने बातमीचे हेडिंग दिले होते
भारताचा ढाण्या वाघ.
6 Nov 2020 - 3:49 pm | बबन ताम्बे
घरी लोकसत्ता यायचा तो साधारण मी इयत्ता सातवी आठवी असताना वाचायला सुरूवात केली. फार काही कळत नव्ह्ते पण तेंव्हा नुकत्याच १९७७ च्या लोकसभा निवडणूका झाल्या होत्या. मुंबईहून मृणाल गोरे खासदार म्हणून निवडुन आल्या होत्या. त्यांचा महागाई प्रश्नावर महीलांचा लाटणे मोर्चा आणि पाण्यासाठी हंडा मोर्चा यामुळे त्या खूप फेमस होत्या.
त्यांच्या विजयानंतर आणि इंदीरा गांधींच्या रायबरेलीतील पराभवानंतर लोकसत्तेने मथळा दिला , " दिल्ली वाली बाई पानी में, पानीवाली बाई दिल्ली में "
6 Nov 2020 - 4:28 pm | प्राची अश्विनी
लहानपणी वाचलेल्या बातम्यांंमध्ये भोपाळ दुर्घटनेची बातमी आठवते.
6 Nov 2020 - 4:54 pm | सर टोबी
राजकीय धाग्यांवर जेंव्हा धुळवड खेळली जाते तेंव्हा येणार तुमचा धागा सुखावह आणि आश्वासक वाटतो.
जेंव्हा केंव्हा चटपटीत शीर्षकं देण्याचा विषय मनात येतो तेंव्हा आणीबाणीनंतर वर्तमानपत्रांनी जी कात टाकली त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. एवढेच नाही तर त्या दरम्यान कोणत्या वर्तमानपत्रांनी लक्षवेधक बातमी दिली याची नंतर शहानिशा केली गेली आणि काही वर्तमानपत्रांचा गौरव करण्यात आला असे आठवते.
चटपटीत शीर्षकं देण्यामध्ये जाहिरातदारांचा हात कोणी धरू शकेल असे वाटत नाही. राष्ट्रकुल बॅडमिंटन स्पर्धेत जेंव्हा प्रकाश पदुकोण अव्वल ठरला तेंव्हा एअर इंडियाने जाहिरात दिली ती अशी: "Singles or doubles, service is ours!". अशाच चटपटीत जाहिरातींमध्ये ब्रिटिश एअरवेजच्या जाहिराती अतिशय लोभस असायच्या. एका जाहिरातीत एक एक्सिक्युटीव्ह लांबच्या प्रवासाहून घरी येतो तेच आपल्या जुळ्या मुलांना भेट देण्यासाठी टेडी बेअरची जोडी घेऊन. आणि शीर्षक आहे: "Come home prepared for that important presentation!".
जेंव्हा एका बाजूला असे मनोरंजक किस्से आठवतात तेंव्हा दुसरीकडे काही हलवून सोडणारे प्रसंगही आठवतात. भोपाळ दुर्घटनेचा सर्वात गाजलेले रघु राय यांचे प्रकाश चित्र असेच खूप काही बोलून जाते.
6 Nov 2020 - 5:21 pm | कुमार१
वरील सर्वांना धन्यवाद !
>>> अगदी !
>>> होय, खूपच गाजले होते.
>>> Union Carbide आणि नंतरही अनेक लबाड्या...
>>> केवळ सुंदर !
6 Nov 2020 - 6:46 pm | सौंदाळा
लगान चे सकाळ मधील परिक्षण :
'इतिहासात कधीही न झालेला फसलेला क्रिकेटचा सामना'
आणि खाली चित्रपटाचे वाभाडे काढले होते.
मात्र पुढे या चित्रपटानेच इतिहास घडवला
6 Nov 2020 - 6:52 pm | कुमार१
लगान >>> सही !
यावरून ‘सत्यम शिवं सुंदरम’ च्या एका परीक्षणाचे शीर्षक आठवले :
‘लताच्या आवाजाने *नतला झाकण्याचा प्रयत्न !’
7 Nov 2020 - 6:53 am | चौकटराजा
१९६२ - भारताचा भारत चीन युद्धात नेफा आघाडीवर दारूण पराभव
१९६४ नेहरूंचे निधन
१९६५ भारतीय सेना लाहोर पासून अगदी जवळ
१९६५ सिमला करार ---- लाल बहादूर शास्त्री यांचा ताश्कन्द येथे गूढ म्रुत्यू
१९६६ गारफिल्ड सोबर्से चा विन्डीज सन्घ भारतात ..क्लाईव्ह लॉईड नावाचा २० वर्शाचा मुलगा त्या सन्घात .
१९६९ मानव चन्द्रावर -- कोयनेचा भूकम्प - दख्खन पठार देखील भूकम्पाच्या शक्यते पासून मुक्त नसल्याची जाणीव .
१९७१ जनरल नियाझी यान्ची शरणागती पकिस्तानचे दोन तुकडे
१९७३ महाराष्ट्रात भीषण दुष्काळ
१९७५ आणीबाणी
१९७६ पुंण्यात जोशी अभ्यन्कर हत्याकांड
१९७७ कोन्ग्रेसचा लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव
१९८२ भारतात टी व्ही चे आगमन
१९८५ भारतात पी सी चे आगमन
१९९१ अर्थिक उदारीकरणाचा पाया
7 Nov 2020 - 12:41 pm | रानरेडा
१९८२ भारतात टी व्ही चे आगमन झाले नाहि - बऱ्याच आधी टीव्ही होते , माझ्याकडे पण होता
१९८२ ला एशियाड बरोबर रंगीत प्रसारण सुरु झाले
१९८५ आधी भारतात भारतात पीसी नव्हते ?
7 Nov 2020 - 12:46 pm | कुमार१
रानरेडा >> +1
भारतातील टीव्हीचे ‘आगमन’ शहरानुसार झालेले आहे. दिल्लीत तो खूप वर्षे आपल्या आधी होता.
महाराष्ट्रातील शहरांत बहुतेक १९७४ ?
7 Nov 2020 - 6:23 pm | सुबोध खरे
मुंबईत दूरदर्शनचे आगमन २ ऑक्टोबर १९७२ साली झाले
दिल्लीत नियमित प्रक्षेपण १९६५ सालापासूनच होते.
2 Oct 2022 - 11:43 am | कुमार१
उद्घाटन झाल्याला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त हा रंजक लेख इथे आहे
असं झालं मुंबई 'दूरदर्शन'चं उद्घाटन
11 Apr 2024 - 5:45 am | nutanm
मुंबईत १९७२ ला t.v.आला.तेव्हा मि शाळेत असताना एका श्रिमंत मैत्रिणिकडे तेव्हा लगेच घेतला व मी मआझआ बहिण आमहि अजित वआडेकर,विश्वनाथ, गावस्कर यआचयआ संघआचि क्रिकेट मच तयआवर पाहिलि। मुंबईत t.v. १९७२ लआ आल्याच आठवतय
8 Nov 2020 - 2:28 am | केदार-मिसळपाव
शिर्षक गीत आहे का कोणाकडे?
"आओ चले, क्यु चले डगर सफर देखो हम जब चले....."?
7 Nov 2020 - 7:38 am | विजुभाऊ
तेलगी चा घोटाळा उघडकीस येत होता त्याच वेळेस झी न्यूज ने एक जोरदार बातमी कव्हर केली होती.
नाशीक मधे एका बंगल्यात नोटांनी भरलेली , नाणी तिकिटे यांनी भरलेल्या पेट्या सापडल्या होत्या.
अगदी पाच पाच रुपयांची बंडलेही होती त्यात.मात्र तो बंगला अशा नोटांनी पूर्ण भरलेला होता. अगदी छतापर्यंत ढीग लागलेले दाखवत होते
छगन भुजब़ळांवर संशयाची सुई जात होती.
मात्र ही बातमी अगदी अल्पजीवी ठरली. दोनच दिवसातच कोणताच गाजावाजा न होता ती बातमी रहस्यमय रीत्या अदृष्य झाली
7 Nov 2020 - 7:58 am | कुमार१
चौरा,
सुरेख आढावा.
या निमित्ताने पुन्हा एकदा 1972- 73 मधली एक आठवण जागी झाली. तेव्हाच्या महादुष्काळानंतर लग्न समारंभांवर अशीच बंधने होती. एका मंगल कार्यालयाबाहेरच्या पाटीवर लिहिलेली एक पाटी मला अजून आठवते. त्यानुसार फक्त 40 लोकांना लग्नाचे जेवण द्यायला परवानगी होती.
प्रत्यक्ष समारंभाचे ठिकाणी एक सरकारी अधिकारी येऊन ही पाहणी करीत असे.
या काळात कापड देखील रेशनच्या रांगेत उभे राहून विकत घेतले होते.
.....
विभा,
>>> खूप गाजलेले प्रकरण !
7 Nov 2020 - 9:50 am | आग्या१९९०
१९८३ चा क्रिकेटचा वर्ल्डकप भारताने जिंकला तेव्हा एका वृत्तपत्रात ' एक दूजाँ के लिए ' असे त्या बातमीचे शिर्षक होते , कारण जेफ्री दूजॉने चिकाटीने फलंदाजी केली होती . तो बाद झाल्यावर भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला .
7 Nov 2020 - 12:13 pm | उपयोजक
भरपूर प्रतिसाद यावेत.
7 Nov 2020 - 6:10 pm | अनिंद्य
सुंदर आठवणी. टकलू संमेलन तर लय भारी :-)
माझ्या काकांना कात्रणवह्या बनवण्याचा छंद होता त्यांच्या तरुणपणी. त्यामुळे जुन्या अनेक बातम्यांची वृत्तपत्रातील कात्रणे वाचली आहेत - भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधींचा खून, बुल्गानीन क्रुश्चेव्ह भारतभेट आणि त्यांची मिरवणूक, बांगलादेश मुक्तीयुद्ध, राकेश शर्माची अंतराळ मोहीम... अनेक
7 Nov 2020 - 6:31 pm | कुमार१
छान आठवणी.
.....
>>> यावरून हे डकवतो :
7 Nov 2020 - 6:41 pm | ज्ञानोबाचे पैजार
वरच्या पेपर वर १९४८ - १९६० असे लिहिले आहे त्याचा अर्थ काय असावा?
तसेच बातमी लिहिण्याची पध्दत पण एकदम संयमीत आहे.
शिवाय इतकी महत्वाची बातमी असून सुध्दा त्याच पानावर इतर बातम्याही छापल्या आहेत. आताच्या पध्दतीप्रमाणे गांधीजींचा पानभर आकाराचा फोटो आणि पेपरच्या नावाच्या वरती हेडलाईन छापली नाही.
पैजारबुवा,
7 Nov 2020 - 7:04 pm | बाप्पू
मराठा फ्रॉम पुना
यामध्ये मराठा असं का लिहिण्यात आलं असेल?? म्हणजे त्यावेळी मराठा ही जात संबोधली जात होती कि महाराष्टातील प्रत्येकाला मराठा म्हणायची पद्धत होती.. ??
7 Nov 2020 - 7:07 pm | कुमार१
बहुतेक असेच. "मराठी माणूस' या अर्थी .
13 Nov 2020 - 5:21 pm | तुषार काळभोर
मागील चाळीस-पन्नास-साठ वर्षे सोडली तर मराठा हा नेहमीच प्रदेशवाचक शब्द होता.
अगदी पेशवे राज्यकर्ते होते, तेव्हाही अटकेपर्यंत धडक 'मराठ्यांनी' मारली होती. पानिपतात पराभव 'मराठ्यांचा' झाला होता. पेशवे व इंग्रज यांच्यातल्या लढाया अँग्लो-मराठा नावाने संदर्भित केल्या जातात. आणि त्याचं कारण, सिंहासनावर मराठा व्यक्ती होती हे नव्हतं.
आता जी मराठा जात आहे, त्यांना कुणबी, पाटील अशी नावे होती. मागे (बहुधा) शशिकांत ओक यांनी एक लेख लिहिला होता, ज्यात लोणी-कंद गावातील ब्रिटीशकालीन काही कागदपत्रांच्या संदर्भाने लेखन होते. त्यात एक कागद जातीनिहाय लोकसंख्या व कर असलेला होता. त्यात सुद्धा कुणबी अशी नोंद होती.
काही ब्रिटीश गॅझॅट्स मध्ये मराठा हा शब्द शक्यतो सैन्य, राज्य या संदर्भात वाचला आहे. उदा. मराठ्यांचं सैन्य. तर शेती करणार्यांत माळी आणि कुणबी अशी वर्णने वाचलीत.
(रोचक अवांतर - आमचे नगरसेवक आमदार नावापुढे "पाटील" लावतात अन "कुणबी" दाखला काढून ओबीसी जागेवर निवडून आलेत. वरती परत "मराठा" मोर्चात पण असतात)
7 Nov 2020 - 6:50 pm | कुमार१
ज्ञा पै,
अगदी अपेक्षित आणि चांगली शंका.
टाईम्स ऑफ इंडियाने त्यांच्या शतक किंवा त्यापुढच्या एखाद्या महोत्सवानिमित्त काही स्मरणिका अंक प्रकाशित केले होते.
त्यापैकी हा एक आहे !
8 Nov 2020 - 10:28 am | कुमार१
1983 मधील एका बातमीची नोंद माझ्याकडे आहे. बातमी अशी आहे :
पाकिस्तानात एका तरुणीला विवाहपूर्व संबंधातून मुलास जन्म दिल्याबद्दल फटक्यांची शिक्षा न्यायालयात सुनावण्यात आली. परंतु, नंतर बर्याच महिलांच्या विनंतीवरून ती सक्तमजुरीवर आणण्यात आली.
…………………………
प्रत्येक दैनिकाच्या वयानुसार त्यामध्ये ‘पंचवीस/ पन्नास किंवा शंभर वर्षांपूर्वी’ अशी सदरे असतात. त्यात जुन्या काळचा काही रोचक मजकूर अथवा घटना दिलेल्या असतात.
1984 मध्ये मी ‘पन्नास वर्षापूर्वी’ या ‘सकाळ’च्या सदरात 1934 मधील एक बातमी वाचली होती. ती अशी:
‘प्रेमविवाह की विवाहोत्तर प्रेम यावर कॉलेजात परिसंवाद झाला’.
.................................
1980च्या दशकात शहरी भागात सुद्धा हुंडाबळी, महिलांना जाळले जाणे अशा घटना बऱ्यापैकी घडत होत्या. त्यासंदर्भात ‘जाळल्या जाणाऱ्या महिला’ हा केसरीचा चांगला अग्रलेख आठवतो.
22 Feb 2022 - 2:27 am | रामचंद्र
अंदाजे ८९-९० सालादरम्यान दूरदर्शनवर दुपारचे प्रक्षेपण सुरू होणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या (तेव्हाचे 'बैंगन राजा' इ. लहान मुलांसाठीचे कार्यक्रम इ.). त्यावरून 'सकाळ'मध्ये आता परदेशाप्रमाणे आपल्याकडेही 'इडियट बॉक्स'चे प्रस्थ वाढणार, अशा आशयाच्या जोरदार चर्चा झडल्याचे आठवते.
22 Feb 2022 - 8:45 am | कुमार१
+११ आठवतात.
टीव्हीवरील झगमगाटी जाहिराती पाहून नाहिरे वर्गाला काय वाटेल, अशा मुद्द्यांवरही काही लेख त्याकाळी यायचे.
9 Nov 2020 - 8:33 am | सुधीर कांदळकर
टक्कल संमेलन आवडले.
विद्याचरण शुक्ला आणीबाणीनंतरच्या निवडणूकीत पराभूत झाल्याची बातमी नभोवाणी बातमी वाचकांत फारच प्रिय ठरली कारण ते तेव्हां नभोवाणी मंत्री होते आणि त्यांनी नभोवाणी सेवकांना बहुधा बराच उपद्रव दिला असावा. प्रत्येक बातमी वाचक/वाचिका ही बातमी एकाच बातमीपत्रात अनेक वेळा ठासून ठासून सांगत होता/होती ते ऐकूनच हसू येत असे.
माझ्या मते कापड रेशनवर भारतात विकले जात होते ही बातमी चुकीची असावी. तो काळ मी अनुभवलेला आहे. राजकीय सूडातून उद्भवलेला गोबेल्स प्रचार असू शकतो. कृपया तपासून पाहावे. साम्यवादी देशात मात्र हे घडत होते अशा बातम्या होत्या. खर्याखोट्या कोण जाणे.
टाईम्स ऑफ इंडिया चे १५० वर्षे विशेषांक माझ्या संग्रही आहेत.
काही असो. लेख आणि त्यावरील सर्व प्रतिसाद आवडले. धन्यवाद.
9 Nov 2020 - 9:37 am | कुमार१
सुधीर,
धन्यवाद. छान आठवणी.
>>>>
अहो, ही निव्वळ बातमी नसून स्वानुभव आहे !101% खरा.
मी माझ्या आजोबांचा हात धरून कापडाच्या रेशनच्या रांगेत उभा होतो.
आम्हा भावंडांना आणलेले चौकडीचे शर्टाचे कापड अजूनही माझ्या पक्के स्मरणात आहे.
9 Nov 2020 - 8:32 pm | स्मिता.
हे रेशनवर मिळणारे कापड म्हणजेच गरिबी हटाव का? स्वानुभव नक्कीच नाही पण माझी आजी म्हणायची की तीने 'गरिबी हटाव'च्या साड्या नेसून संसाराचा गाड रेटला. या साड्या नेमक्या कोणत्या हे माहिती नसलं तरी अत्यल्प किमतीत मिळत असाव्यात असा माझा समज आहे.
9 Nov 2020 - 11:00 pm | Ranapratap
गरीबी हटाव ही साडी 10 की 20 रू ला मिळायची व शर्ट चे कापड 5 रू मीटर असायचे.
9 Nov 2020 - 8:37 pm | कुमार१
>> नाही हो. हे दुष्काळ परिस्थितीत आले होते. तसेच तेव्हा आयात केलेला निकृष्ट 'मिलो' (पोळीसाठी) खावा लागला.
9 Nov 2020 - 11:07 pm | Ranapratap
74-75 ्चा काल असावा, निना कुलकर्णी चे नाटक हमिदाबई ची कोठी, जाहिरात होती, मी नुकतेच वाचायला शिकलो होतो, जोरात वाचले, हमिदा बाई ची कोठी, अन् मोठ्या काका ला विचारले, अरे कुठे आहे ही कोठी, आपल्याला जायला पाहिजे एकदा, घरात भूकंप, माझा गाल लाल.
10 Nov 2020 - 1:07 am | मनो
गांधीहत्या आणि सावरकर याबद्दल लिहिण्याचं बरेच दिवस मनात आहे. केंव्हा मुहूर्त मिळतो पाहू. त्या लेखासाठी जमवलेल्या छायाचित्रातील ही काही इथे देतो आहे.
10 Nov 2020 - 7:41 am | कुमार१
राणाप्रताप,
रोचक आठवणी.
मनो,
छान कात्रणे. जरूर लिहा.
............................................
1996 साली महाराष्ट्रात ‘गोडबाबा’ नावाच्या एका भोंदूने धुमाकूळ घातला होता. त्याच्या मते त्याच्या शरीरातून गोड पदार्थ बाहेर पडत असतात वगैरे ! त्यामुळे त्याने ओंजळीतून सोडलेले 'गोड' तीर्थ पिण्यासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या !
त्या संदर्भातील हे कात्रण सापडले:
13 Nov 2020 - 3:11 pm | कुमार१
छापील भेटकार्डे हा प्रकार आता जवळजवळ संपुष्टात आलाय.
पूर्वी अनेक प्रसंगी अशी भेटकार्डे दिली जायची.
1990 च्या दशकात एका निवृत्त झालेल्या व्यक्तीला मिळालेले हे भेटकार्ड :
13 Nov 2020 - 7:10 pm | शा वि कु
सत्यकथा १९७०-७२ मधल्या काही जाहिराती.
(फोटोंची साईझ मोठी आहे, जर काही गडबड/त्रास होत असल्यास सं. मं. ने प्रतिसाद उडवून टाकावा.)
13 Nov 2020 - 7:26 pm | कुमार१
अहो, दिवाळीचा सुंदर फराळ दिलात तुम्ही !
छान स्मरणरंजन.
सत्यकथेची वार्षिक वर्गणी वाचून आता नक्कीच हसू येते .
सुंदर ! धन्यवाद आणि
सर्वांनाच दिवाळी शुभेच्छा !
14 Nov 2020 - 6:26 am | शा वि कु
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
13 Nov 2020 - 7:50 pm | गामा पैलवान
कुमारेक,
(स्मृती)रंजक धागा आहे. माझ्या आठवणीतला एक मथळा सांगतो.
१९८६ साली ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. तेव्हा मद्रासला (म्हणजे आजच्या चेन्नईत) कसोटी सामना चालू होता, तो बरोबरीत सुटला. शेवटल्या सत्रात मी स्वत: दूरदर्शनवर बघितला होता. अतिशय रोमांचकारी सामना झाला होता. पारडं क्षणाक्षणाला इकडे तिकडे झुकंत होतं.
अखेरीस मणिंदरसिंग पायचीत झाला व भारताचा डाव संपला. ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्रेग मॅथ्यूजने बराच रडीचा डाव खेळला होता. ऑस्ट्रेलियाकडनं पंचांवर दबाव टाकून, जवळजवळ धमकावून, अनुकूल निर्णय वदवून घेण्याचे प्रयत्नही घडले. तरीही भारतीयांनी डोकं थंड ठेवून लढत दिली.
हे सगळं पुन्हा अनुभवायला मिळावं म्हणून मी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात तीच बातमी वाचून काढणार होतो. दुसऱ्या दिस्व्शी सकाळी लोकसत्ता आला. बातमीचा मथळा काहीतरी भव्य असेल अशी अपेक्षा होती. पण दणकून पोपट झाला. मथळा होता 'रोमांचक लढतीनंतर काव्यमय बरोबरी'.
अत्यंत सपक मथळा बघून बातमी वाचायची इच्छाच मेली. नंतर खूप वर्षांनी लक्षांत आलं की हा मथळा poetic tie after a thriller याचं निर्बुद्ध भाषांतर होतं.
असल्या निरर्थक कुबड्या हाती धरायला मराठी शब्ददरिद्री खचितच नाही. लोकसत्तेत मेकॉलेछाप खोगीरभरती झालेली असणार.
आ.न.,
-गा.पै.
13 Nov 2020 - 8:30 pm | कुमार१
अगदी हहपुवा भाषांतर !
भारी आठवण
13 Nov 2020 - 9:50 pm | चामुंडराय
>>> ओबामा यांनी यापूर्वी अनेक पुस्तके लिहिली आहेत, ज्यात ड्रीम्स फ्रॉम माई फादर, आणि 'चेंज वी कैन बिलीव इन' यांचा समावेश आहे. >>>
आजचा सकाळ - ग्लोबल मधील एक बातमी, सरळ सरळ हिंदीतून जशीच्या तशी उचल :)
14 Nov 2020 - 9:00 am | तुषार काळभोर
इंटरनेट वर हे एक सापडलं.
प्रौढ अविवाहितेसाठी संधी!
अरुस्टुक काउंटी, मैन मधील एक तरुण वधुसाठी स्वतःविषयी सांगतो -
अठरा वर्षांचा तरुण, चांगले दात, (अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष) अँड्र्यू जॉन्सन, Star Spangled Banner ( राष्ट्रगीत) आणि ४ जुलै (मूळ स्वातंत्र्यदिन) यांचा समर्थक (थोडक्यात, यादवी युद्धानंतर युनायटेड स्टेट्स चा नागरिक, बंडखोर राज्यांचा विरोधक), सरकारकडून जमिनीचा तुकडा मिळवला आहे, त्यातला मागील वर्षी अठरा एकर साफ सपाट केलाय आणि दहा एकरांवर पेरणी केलीय."
14 Nov 2020 - 11:11 am | टर्मीनेटर
१२-१५ वर्षांपूर्वी अशा मथळ्याची बातमी लोकसत्ता मधे वाचल्याचे आठवते... 'दारू दल' चे नोंदणीकृत कार्यालय एका बियर बार मधे आहे अशी मनोरंजक माहितीही होती बातमीत.
मद्यपींनी काढलेल्या त्या पक्षाचे पुढे काय झाले कोणास ठाऊक! 😀
28 Nov 2020 - 3:12 pm | अनिंद्य
निवडणुकीत (झिंगून) पडले असतील :-))
14 Nov 2020 - 4:59 pm | कुमार१
सरळ सरळ हिंदीतून जशीच्या तशी उचल >> +१
>>> भारीच !
23 Nov 2020 - 9:39 am | कुमार१
काही वर्षांपूर्वी सकाळच्या सप्तरंगमध्ये आलेला एक विशेष लेख आठवला.
त्या लेखाचे लेखक जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आलेले गृहस्थ होते. त्यांना ती शिक्षा खुनासाठी झाली होती.
शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर संबंधिताकडे समाजाने निव्वळ एक नागरिक म्हणून पाहावे अशी अपेक्षा असते. वास्तवात तसे होत नाही.
या पार्श्वभूमीवर सदर व्यक्तीस सकाळने लेखनाची संधी दिली हे विशेष.
20 Dec 2020 - 9:08 pm | कुमार१
1974 पासून कसोटी क्रिकेटमध्ये भारत सर्वबाद 42 ही नीचांकी धावसंख्या आठवणीत कायमची कोरली गेली होती.
आता ती काढून टाकून त्या जागी सध्याची भारत सर्वबाद 36 ही नवीन नोंद केली पाहिजे !
14 Feb 2021 - 11:45 am | कुमार१
डिसेंबर १८९५ मध्ये वैज्ञानिक Roentgen यांनी त्यांच्या बायकोच्या हाताचा एक्स-रे काढला. हा जगातील जिवंत माणसाचा पहिला एक्स-रे होता. या क्रांतिकारक घटनेचे वैज्ञानिक जगतात स्वागत झाले खरे. परंतु तत्कालीन सामान्यजनांनी या घटनेकडे साशंकतेने पाहिले होते.
लंडनच्या मार्च १८९६च्या Pall Mall Gazette मधल्या संपादकीयात याचे प्रत्यंतर येते. ते संपादक म्हणतात,
“मानवी शरीराच्या आतील गोष्टी अशा ‘फोटो’ काढून चव्हाट्यावर आणणे हे असभ्य आहे ! अशा अनैतिक तंत्रज्ञानावर राज्यकर्त्यांनी बंदी घालावी !! “
6 Mar 2021 - 8:18 pm | रंगीला रतन
ऐकावे ते नवल :)
3 Mar 2021 - 8:02 pm | कुमार१
१९७१ मधील भारताच्या विविध क्षेत्रातील विजयकथा आणि काही अविस्मरणीय फोटो इथे आहेत:
https://m-thewire-in.cdn.ampproject.org/v/s/m.thewire.in/article/politic...
15 May 2021 - 2:30 pm | कुमार१
1980च्या दशकात ही जाहिरात केल्याबद्दल डॉक्टर लागूंची वैद्यकीय नोंदणी परिषदेकडून रद्द करण्यात आली होती
7 Aug 2021 - 7:58 am | कुमार१
आणि
7 Aug 2021 - 9:55 am | सुबोध खरे
हायला
पुण्याचा छोटासा छापखाना सुद्धा जगदहितेच्छु (जगाच्या हितासाठी) असतो
7 Aug 2021 - 11:29 am | तुषार काळभोर
शंकाच नाही!
बाय द वे, आजही सरकारी दाखले, पोलीस पंचनामा, पोलीस तक्रार, न्यायालयीन अर्ज, वकिली कागदपत्र यातील भाषा अशीच असते.
.... येणेकरून अर्जदारास दाखला दिला असे.
.... सबब, अर्जदार यांसी विनंती कारणे अर्ज मंजूर करणे कामी मंजुरी दिली असे.
22 Aug 2021 - 6:56 pm | कुमार१
नुकतेच क्रिकेटवर ' १९७१ : द बिगिनिंग ऑफ इंडियाज क्रिकेटिंग ग्रेटनेस ' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
त्यामध्ये 1946 मध्ये इंग्लंडला गेलेल्या भारतीय संघाची दयनीय अवस्था वर्णिली आहे. तेव्हा आपल्या खेळाडूंना खेळाडूंची खायची मारामार झाली होती. तरीही क्रिकेट नियामक मंडळाने त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते.
शेवटी खेळाडूंना वृत्तपत्रात निवेदन द्यावे लागले की आमच्या खाण्याकडे लक्ष न पुरवल्यास भूकबळी पडतील.
हे वाचून वाईट वाटले.
आजची खेळाडू आणि नियामक मंडळाची श्रीमंती थक्क करणारी आहे !
22 Aug 2021 - 10:24 pm | तुषार काळभोर
He बहुधा ते वर्ष आहे जेव्हा सुनील गावस्कर या नवख्या फलंदाजाने वेस्ट इंडीजमध्ये होलसेल धावा केल्या होत्या.
आणि याच वर्षी अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात इंग्लंड मध्ये पहिली कसोटी मालिका जिंकली.
23 Aug 2021 - 5:18 am | कुमार१
+११
वेस्ट इंडीज आणि इंग्लंडवर लागोपाठ विजय असे ते वैशिष्ट्य 1971 चे .
तेव्हा संघ निवडताना पतोडी यांना डावलून अजित वाडेकर यांना कर्णधार केले होते. यावर खूप वाद झाला होता.
पण वाडेकर यांनी आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले
1 Sep 2021 - 7:04 pm | कंजूस
आजची खेळाडू आणि नियामक मंडळाची श्रीमंती थक्क करणारी आहे !
इतर आंतर राज्य/ शालेय खेळाडूंचे हाल पाहिलेत का? शाळांचे वर्ग बाकडी बाजूला करून राहायला देतात. शाळांचे टॉइलेट्स भयानक असतात. हे सर्व खेळ थंडीत असतात आणि काही सोयी नसतात. नेणारा मास्तर मात्र एका हॉटेल रुममध्ये राहतो. मागच्या एका प्रवासात खेळाडू भेटले होते त्यांनी सांगितले की सोयी फक्त क्रिकेटरांसाठीच मिळतात. बाकी खेळांना काही मिळत नाही.
1 Sep 2021 - 7:12 pm | कुमार१
होय
क्रिकेटपुरतीच आहे यावर दुमत नाही
1 Sep 2021 - 4:10 pm | कुमार१
शोले (१९७५) चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पींची मुलाखत काल ऐकली. त्यातला रोचक किस्सा:
सुरवातीस तो थेटरात खास चालत नव्हता. त्यामुळे ते निराश झाले होते. अशात एका थेटर मालकाने त्यांना प्रत्यक्ष खेळाचे वेळी बोलावले. त्यावर ते मालकांना म्हणाले, " अहो, मला तुम्ही काय रिकामं थेटर दाखवायला बोलावता आहात काय ?"
मालक हसून म्हणाले, या तर खरं !
मग सिप्पी तेथे पोचले.
चित्रपटाचा खेळ चालू झालेला होता. मालकांनी त्यांना आधी गप्पांमध्ये रंगवून ठेवले. चित्रपटाचे मध्यांतर झाले. आता मालक म्हणाले, चला माझ्याबरोबर.
मग त्यांना खाद्य खाद्य-पेय विक्री विभागात घेऊन गेले. बघतात तर काय, तिथे नुसते खाद्यपदार्थ तयार होते परंतु ते विकत घ्यायला चिटपाखरू सुद्धा नव्हते !
सिप्पींना तरीही कळेना, " मला काय दाखवताहेत ?"
मग मालकांनी खुलासा केला. "अहो, या खेळाची सर्व तिकिटे विकली गेलेली आहेत. आता मध्यंतर झालेले आहे. तरीसुद्धा एकही प्रेक्षक आतून बाहेर येऊन खाण्यापिण्यासाठी उत्सुक नाही. सर्वजण चित्रपटात खूपच रंगून गेलेले आहेत. त्यांना लवकरात लवकर त्याचा उत्तरार्ध पाहण्याची जाम उत्सुकता आहे. हेच तुमचे यश समजा !!"
हे ऐकल्यावर सिप्पी धन्य झाले !
1 Sep 2021 - 4:19 pm | टर्मीनेटर
रॊचक किस्सा! शॊलॆ हा आता नुसता चित्रपट राहिला नसुन दंतकथा झाली आहे :)
5 Sep 2021 - 5:28 pm | चौकस२१२
इंदिरा गांधी जनता पक्षात ?
पुण्यातील दुपारी निघनाऱ्या कोणत्यातरी ४ पानि दैनिकातील बातमी
यातील प्रश्चचिन्ह महत्वाचे
आत सविस्तर: "इंदिरा गांधी जनता पक्षात .. जातील का? " यावर चर्चा !
5 Sep 2021 - 5:30 pm | कुमार१
कठीण आहे बुवा !
21 Oct 2021 - 9:41 am | कुमार१
अलीकडेच एका वैद्यकीय नियतकालिकात वाचलेली ही सुरस बातमी :
13 Nov 2021 - 12:49 pm | कुमार१
आपला दिवाळी अंक वाचून झाला की इथे जरुर डोकवा:
आठवणीतले काही : अत्यंत रोचक !
'माणूस' साप्ताहिकाचा पहिला अंक १९६१ इथे :
https://dspace.gipe.ac.in/xmlui/bitstream/handle/10973/48031/1961-06-01-...
….
माणूसच्या पहिल्याच अंकात ब मो पुरंदरे, दि बा मोकाशी, श्री ग माजगावकर हे दिग्गज लेखक दिसत आहेत.
सांगत्ये ऐका हा चित्रपट जोरात चालत असल्याची जाहिरात आणि इतर अनेक धमाल गोष्टी आहेत.
एकंदरीत ही आठवणींची दिवाळी म्हणता येईल.
13 Nov 2021 - 7:33 pm | Nitin Palkar
अत्यंत रोचक! अगदी खरे. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. अंक डालो करून ठेवला..
13 Nov 2021 - 7:58 pm | कुमार१
माणूसच्या पहिल्या अंकात दि बा मोकाशी यांनी कथा लिहिलेली नसून रेडिओ व ट्रांजिस्टरचे कार्य याच्यावर तांत्रिक लेख लिहिला आहे.
त्यांचे स्वतःचे रेडिओ दुरुस्तीचे दुकान होते. लहानपणी माझ्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर मी ते पहात असे. त्यात एक मध्यमवयीन व्यक्ती मन लावून रेडीओ दुरुस्त करत बसलेली दिसे. पण ते कोण आहेत याबद्दल काहीच माहिती नव्हती.
पुढे कॉलेजला गेल्यावर त्यांच्या काही कथा वाचल्या आणि आवडल्या. एका वर्षी आमच्या कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन कथाकथन स्पर्धेला ते परीक्षक म्हणून आले होते. तेव्हा त्यांना अगदी जवळून पाहता आले.
मग कोणीतरी सांगितले की ते रेडिओ दुरुस्ती करतात ना, तेच हे लेखक ! हे कळल्यावर विलक्षण आनंद झाला होता.
7 Dec 2021 - 1:14 pm | कुमार१
माणूस :15 जानेवारी 1972
यातल्या काही विशेष गोष्टी :
१. एका लेखात मद्रास राज्य, मद्रासच्या माननीय आरोग्यमंत्री असे उल्लेख आहेत. परंतु त्याच लेखात तमिळनाडू असाही उल्लेख आहे.
२. निरोधच्या जाहिरातीत त्याची किंमत "पंधरा पैशांना ३( सरकारी मदतीने) "असे लिहिले आहे.
३. तीन हिंदी चित्रपटांचे एकत्रित परिक्षण असून त्यात प्रत्येकाची जवळपास संपूर्ण कथा सांगितलेली दिसते. त्या लेखाचा शेवट-
"अशी ही तीन हिंदी चित्रपटांची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण"
अशी केली आहे !
४. दुकानाच्या जाहिरातीतील फोन क्रमांक ५ अंकी
22 Dec 2021 - 6:25 pm | कुमार१
हे एक सुरस आणि चमत्कारिक
२००७ पासून ही आहे असे दिसते
21 Feb 2022 - 7:22 pm | कुमार१
1987 सालातील एका महाविद्यालयीन वार्षिकाचे मुखपृष्ठ : अश्मयुग ते एकविसावे शतक छान चितारले आहे.
22 Feb 2022 - 5:42 pm | कुमार१
आजचा दिनांक वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणून इथेच ही नोंद करतो. दरवर्षी या दिनांकाला त्याची आठवण काढता येईल.
चित्रावरून तुमच्या लक्षात येईलच की ही संख्या डावीकडून वाचली काय किंवा उजवीकडून, ती एकसारखीच असते (palindrome).
...
पण इतकेच त्याचे वैशिष्ट्य नाही. ही संख्या पूर्णपणे उलटी केली असता सुद्धा पहिल्या प्रमाणेच दिसते (ॲम्बीग्राम).
4 Mar 2022 - 9:47 am | कुमार१
रशियाचा रुबल आणि भारताचा रुपया यांच्या विनिमयासंबंधी १८९७ पासून आजपर्यंतचा रोचक इतिहास :
27 Mar 2022 - 4:32 pm | कुमार१
पुरुषोत्तम आत्माराम चित्रे , दि पु चित्रे, 'अभिरुचि' या संबंधीचे सुरस किस्से इथे.
1 Apr 2022 - 8:54 pm | कुमार१
खरंच सुरस आणि चमत्कारिक चालू घडामोड !
एका तरुणाने अडीच लाखांची नवी मोटरसायकल निव्वळ एक रुपयाची नाणी देऊन विकत घेतली
23 Sep 2022 - 2:35 pm | mayu4u
घडा"मोड"!
24 Jun 2022 - 5:57 pm | कुमार१
(या माहितीसाठी वेगळा धागा नसल्यामुळे इथे लिहितो)
जिवाणू (Bacterium) आपल्या डोळ्यांना दिसत नाही हे झाले सर्वसामान्य ज्ञान. परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या माहितीनुसार पृथ्वीवरील सर्वात मोठा जिवाणू नुसत्या डोळ्यांना दिसतोय इतका मोठा आहे !
तो कॅरिबियन बेटामध्ये सापडला आहे.
वैज्ञानिकांनी त्याला जीवाणूमधल्या माउंट एव्हरेस्ट ची उपमा दिली आहे !
25 Jun 2022 - 12:48 am | गामा पैलवान
कुमारेक,
एकपेशीय जीव इतका मोठा असल्याचं नवल वाटतं. अंडं हा एकपेशीय जीव आहे, पण तो हालचाल करंत नाही.
आ.न.,
-गा.पै.
25 Jun 2022 - 5:48 am | कुमार१
खरंच नवल आहे.
अशा जीवाच्या बाबतीत 'सूक्ष्मजीव ' हा शब्द योग्य नसून त्याला नुसतेच जीव म्हटले पाहिजे.
4 Jul 2022 - 10:58 am | कुमार१
101 वर्षांपूर्वी डॉक्टर भास्कर केळकर यांना उच्च शिक्षणासाठी लंडनला जाण्यासाठी ब्रिटिश सरकारने दिलेला पासपोर्ट :
हा विशेष प्रक्रिया करून जतन केलेला आहे.
4 Jul 2022 - 5:55 pm | तुषार काळभोर
१. भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा भाग होता. तर भारतातून युके किंवा कोणत्याही इतर commonwealth देशात जाताना पासपोर्ट लागण्याची गरज का होती?
२. आधुनिक 'राष्ट्रे' -Nation States साधारण पहिल्या महायुद्धानंतर अस्तित्वात आली. पासपोर्ट हा प्रकार त्यानंतर सुरू झाला की त्याआधी?
4 Jul 2022 - 6:26 pm | कुमार१
१. माझ्याही मनात ती शंका आली होती.
बहुधा असे असावे :
जरी ब्रिटिश आपल्यावर राज्य करीत असले तरी त्यांचा मूळ देश आणि ते साम्राज्य करीत असलेले परकीय देश यात काहीतरी मूलभूत भेद केलेला असावा.
तत्कालीन भारतीय हे 'इंडियन' नागरिकच धरले जात असणार ना ?
4 Jul 2022 - 6:33 pm | कुमार१
कुठल्यातरी प्रकारचे 'पारपत्र' या प्रकाराचा उगम अगदी इसवीसन १४१४ पासून असल्याचे इथे म्हटले आहे.
5 Jul 2022 - 12:22 am | गामा पैलवान
तुषार काळभोर,
मला आठवतं त्याप्रमाणे स्वातंत्र्यापूर्व काळी कोणीही भारतीय नागरिक प्रवास करून ब्रिटनमध्ये जाऊ शके. अर्थात सरकारच्या परवानगीनेच. त्यासाठी पारपत्र असावे. तशीच सोय ब्रिटीश नागरिकांनाही होती.
मात्र भारत स्वतंत्र झाल्यावर भारत व ब्रिटन सरकारे एक राहिली नाहीत. त्यामुळे संमतीपत्र ( = व्हिसा ) आवश्यक पडू लागला.
आ.न.,
-गा.पै.
18 Jul 2022 - 7:01 pm | कुमार१
पाण्यासाठी दाही दिशा…..
1976 मध्ये इंग्लंडमध्ये देखील पाणी मिळवण्यासाठी रांगा लागल्या होत्या त्याची स्मृतीचित्रे इथे पाहता येतील:
https://www-express-co-uk.cdn.ampproject.org/v/s/www.express.co.uk/news/...
24 Jul 2022 - 4:22 pm | कुमार१
छान स्मरणरंजन:
मॅटिनीची मजा
14 Aug 2022 - 7:27 pm | कुमार१
१९६९ पासून सलग 53 वर्षे ओमान मध्ये नोकरी केलेल्या अशोक सभरवाल यांनी सांगितलेले अनुभव
तेव्हा या लोकांचे पगार लाल रंगाच्या भारतीय नोटांमध्ये होत असत आणि बँकेतले खाते पौंडांमध्ये असे.
25 Aug 2022 - 12:29 pm | कुमार१
1983 मध्ये भारतातील पहिलीवहिली मारुती 800 कार श्री हरपाल सिंग यांना विकली होती. त्या कारचे पुनरुज्जीवन करून ती मारुती उद्योगने आपल्या कंपनीत बघण्यासाठी ठेवली आहे
18 Sep 2022 - 11:05 am | कुमार१
मध्य प्रदेशातील इंदूरमधील जुन्या टाईपरायटर्सचे संग्रहालय सध्या कुतुहलाचा विषय ठरत आहे.