विजयादशमी..!!

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जनातलं, मनातलं
25 Oct 2020 - 11:19 am

विजयादशमी...!!

मस्त आरामात पेपर वाचत असतानाच, चिरंजीव वही घेऊन आले. बाबा मला विजयादशमीचा निबंध सांगा. "अरे..आईला विचार रे राजा.." मी प्रामाणिक प्रेमाने म्हटले. अहो, दुसरीतच आहे तो.. पी.एच.डी.चा निबंध सांगत नाहीये. तेवढं जमेल तुम्हाला... माझ्या अस्मितेला लागलेला धक्का सावरत, मी 'हो' म्हटलं.. जुजबी माहिती सांगत लेकाचा पानभर निबंध पूर्ण झाला..
पण पुन्हा मात्र पेपर वाचनात मन रमेना. अरे, हे माझं सुट्टीच्या दिवशीचं वाचनाचं सुख हिरावून कोण घेतंयं..? रामदास स्वामींची आठवण झाली. जगी सर्व सुखी, असा कोण आहे.. आणि त्यांची गंमत वाटली. कारण याचं उत्तर त्यांनी दुसऱ्याच ओळीत पहिल्या शब्दात दिलं आहे. "विचारी" मना, तूची शोधूनी पाहे..! खरंच की, अविचारानं वागणाऱ्या माणसांना सुख लाभणार तरी कसं..? लेको, असे गालात हसू नका राव.. माझा, भाषा किंवा तत्त्वज्ञान विषय नाहीये. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. तोडण्या मोडण्यात आणि पुन्हा जोडण्यात पटाईत..!! पण रिव्हर्स इंजिनियरिंग, या आमच्या एका विषयाप्रमाणे, माझं डोकं मात्र उलट चालू लागलं ते असं.... तर, "विजयादशमी"...!!
उलट दिशेने जाऊ लागल्यावर.. 'दशमी' आणि 'विजया' दोन शब्द दिसले. त्यात पुन्हा 'मी' आणि 'दश', हे दोन भाग झाले. मी म्हणजे अहंकार आणि दश म्हणजे दहा इंद्रिये....!! पुरुष, प्रकृती, महत् तत्व आणि मग अहंकार हा क्रम तर तुम्ही सर्व जाणताच... सात्विक, राजस, तामस ह्या अहंकाराच्या तीन प्रकारांपैकी, पहिल्या दोन प्रकारांनी, एकमेकांच्या मदतीने पाच ज्ञानेन्द्रियं आणि पाच कर्मेंद्रियं उत्पन्न केली..!! आता इथे, "दश" आणि "मी" यांच्यामध्ये, एक न दिसणारं अकरावं इंद्रियं आहे.. आपलं "मन"..!! बघानां.. शब्दात सुद्धा लपलयं.. आहे, पण दिसत मात्र नाही... हे मन, उभयात्मक इंद्रियं आहे. कारण ते ह्या दशेंद्रियांचा समन्वय साधत असतानाच, स्वतः मात्र ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ह्या दोन्ही स्तरांवर कार्य करतं..! तर ही "सुपर बेस्ट इलेव्हन"... आपली 'अकरा इंद्रियं' हो... सांख्य असोत वा वेदान्ती, सर्वांना मान्य आहेत. श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या वेदांतसूत्रात, याचा उल्लेख केलाच आहे.. आणि भगवान श्रीकृष्ण तर म्हणतात, "इंद्रियाणां मनश्चास्मि"..! तेव्हा "मन" तर सर्वात महत्त्वाचं ठरतं. आत्म्याचा मनाशी, मनाचा इंद्रियांशी आणि इंद्रियांचा अर्थाशी, म्हणजेच विषयांशी संयोग होतो आणि आपल्याला ज्ञान होतं....!!
आता दुसरा शब्द, "विजया"...! दोन झोपाळ्याच्या वेण्या, आणि कानावर लाल रिबीनीची दोन फुलं... सॉरी सॉरी.. नाही नाही.. हे नव्हे...! भावा, गल्ली चुकली हं माझी..!! ही विजया आत्ता मनात नव्हती...
तर, आजची 'विजया' म्हणजे, दुर्गा देवीचं अमोघ शक्तीशाली रूप..!! सप्तशती पाठातल्या वर्णनाप्रमाणे, दुर्गादेवीने नऊ दिवस युद्ध करून अखेर दसऱ्याच्या दिवशी महिषासुराचा वध केला. म्हणून या दशमीला "विजयादशमी" असं नाव पडलं. आता आपल्या जीवनातले असूर म्हणजे, अहंकार आणि षडरिपू... त्यांचा नाश करायचा तर शक्ती (दुर्गा) हवीच.. त्यासाठी आपल्याला मनच उपयोगी पडतं. आपण उपासनेने मनाची शक्ती, म्हणजे "मनोबल" वाढवलं, तर ह्या असुरांचा नाश होणारच आहे. पण "मनसस्तु परा बुद्धिः।" या श्लोका प्रमाणे, बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे. तिची व्याख्या सुद्धा, "निश्चयात्मिका बुद्धिः।" अशी केली जाते. ईश्वराने दिलेल्या या बुद्धिरुपी देणगीचा, जर विवेकाने वापर केला, तर आपण खरंच सुखी होऊ शकतो...
जाऊ दे.. फाssर जड होतयं हे सगळं...नाही का...? तेव्हा माझा मुद्दा असा आहे की, आपल्याला जगात सर्वात सुखी व्हायचं असेल तर, चांगलं विचारीपणे, अर्थात विवेकाने वागलं पाहिजे. पण मनाच्या कोलांट्या, षडरिपूंची आक्रमणं आणि अहंकार, हे आपलं सुख, क्षणोक्षणी लुटून नेत राहतात.. आणि दुःख, मनस्ताप, नैराश्य यांचा भरघोस आहेर न चुकता देऊन जातात... रामदास स्वामींनी तर मनाला इतका परोपरीने उपदेश केला केलायं, पण मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेत जिंकण्याच्या पलीकडे जाऊन, त्यातले विचार कृतीत आणण्याचे कष्ट आपण कधीच घेत नाही. सध्याच्या या वेगवान आयुष्यात आपण फक्त प्रवाहपतिताचे काम करतो. आणि मला सुख नाही म्हणून नशिबाला बोल लावतो. अहंकाराचं एक मोठसं रिंगण म्हणा, कुंपण म्हणा... आपणच आपल्याभोवती निर्माण करतो. आणि आत गुदमरतोय अशी निरर्थक ओरड करतो. सहानुभूती मिळवतो. पण स्वतःचा शोध मात्र कधीच घेत नाही....!!
थोडं डोळे मिटून, ह्या मायावी बाह्य जगाशी संपर्क तोडून, आत जाऊया का...? "सोsहं.." तो मीच आहे.. याची जाणीव होण्यासाठी मनानेच पुढाकार घेऊन, बुद्धीच्या मदतीने आता सीमोल्लंघन केलं पाहिजे. तरच "आत्मस्वरूपाचं अनमोल सुवर्ण" हाती लागण्याची शक्यता.....
"अहो... श्रीखंडात जायफळ पुरे का...?" आमची मुलुखमैदान कडाडली. जठरातल्या अग्निनारायणांना जर रोज "दशमी" चा नैवेद्य दाखवायचा असेल.. तर गृहलक्ष्मीची प्रत्येक गोष्ट मनापासून ऐकावी आणि तिला कायमच "विजया" घोषित करावं..!
आलो.. गं ..आलो.. चला मित्रहो, अस्मादिकांच्या उलट-सुलट आणि वेगळ्या विचारांची ही नौका, जनसागरात पाठवली आहे खरी.... तुम्हीही तिला अग्रेषित(फॉरवर्ड) करून गती द्या. पण काही कारणांनी ती मध्येच बुडली... तर अर्थातच (मानभावीपणे) इदं न मम।, असं म्हणायला मी मात्र निस्पृहपणे मोकळाच राहणार बरं का..!!
या वैचारिक प्रयोगपरीक्षेचं शेवटचं अनुमान लिहायचं राहिलं.. ते असं... मनुष्यजन्माचे सार्थक करताना विजयी व्हायचं असेल तर.. दश (दहा इंद्रियं), मी (अहंकार) यांच्यावर विवेकी मनाचा अंकुश असणं, नितांत गरजेचं आहे.. "अहो...येताय ना..?" अरे देवा.. नाटकाची दुसरी घंटा झाली.. निघतो आता..!
निरोप घेताना गोंदवलेकर महाराजांची आठवण येते. "अभिमान शत्रू मोठा.." असं आपल्याला कळकळीने विनवताना ते म्हणतात.. "स्वार्थ खरा साधा रे, नित्य तुम्ही नामगायनी जागा । हाचि सुबोध गुरूंचा, मीपण जाळोनिया जगी वागा ।। तेव्हा,.. "मी" चा आसरा सोडला, तर दसरा नक्कीच हसरा होईल .‌.. आणि एकदा का ह्या "मी"चं मांडलिकत्व संपून, त्यावर आपली सत्ता प्रस्थापित झाली, की मग रोजच "विजयादशमी"... तुमची, माझी आणि सर्वांचीच....!!

जयगंधा..
२५-१०-२०२०.

कथालेख

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

25 Oct 2020 - 3:52 pm | सोत्रि

सात्विक, राजस, तामस ह्या अहंकाराच्या तीन प्रकारांपैकी

?

सांख्यशास्त्रानुसार सात्विक, राजस, तामस हे तीन गुण प्रकृतीचे आहेत.
पुरुष आणि प्रकृतीचा जेव्हा संयोग होतो तेव्हा बुद्धी, मन आणि अहंकार हे उत्पन्न होतात.

- (विद्यार्थी) सोकाजी

शा वि कु's picture

25 Oct 2020 - 4:18 pm | शा वि कु

गूगल प्रमाणे, ज्याला तुम्ही प्रकृती म्हणता, त्याचे इंग्रजी लेखांमध्ये "इगो" असे वर्णन केले आहे, आणि पुन्हा इगोचा वापर "अहंकार" असा केला आहे. (चूक कि बरोबर वापर ?)
https://www.freepressjournal.in/cmcm/the-ahankara-three-forms-of-ego

- (टेक्निकल) शाविकु

उत्तर देण्यासाठी विलंब झाला, क्षमस्व.

प्रकृती त्रिगुणात्मक आहेच. त्यापैकी सत्वगुण आणि तमोगुण हे, स्वतः क्रियाशील नाहीत. क्रिया व गती हा रजोगुणाचा धर्म आहे. पुरुष संयोगाबरोबर, प्रकृतीमधील रजाचा क्रियाशीलतेचा धर्म कार्यान्वित झाला. सत्वगुण हा लघु, ज्ञान, प्रकाश या धर्माचा आहे. त्यामुळे रजाच्या प्रेरकधर्माने, प्रथम लघु धर्माचा सत्त्वगुण विकसित झाला. पुढे आला, आणि कारणानुरूप कार्य, या सत्कार्यवादाच्या नियमाने.. सत्वगुणाचे ज्ञान, प्रकाश, लघुत्व हे धर्म असलेले "बुद्धीतत्त्व" किंवा "महत्त् तत्व", प्रकृतीमधून प्रथम व्यक्त झाले.
त्याचेही 'सात्विक बुद्धी' आणि 'तामस बुद्धी' हे दोन भाग आहेत. सात्विक बुद्धीमध्ये अध्यवसाय, म्हणजे योग्य तर्क करण्याची, आशय समजून घेण्याची शक्ती, वैराग्य, ऐश्वर्य(सामर्थ्य) हे गुण दिसतात. तामसबुद्धि मध्ये अनध्यवसाय म्हणजे, तर्क क्षमता नसणे, आसक्ती किंवा अवैराग्य व अनैश्वर्य (बुद्धीची असमर्थता) ही लक्षणे दिसतात.

लघुधर्मामुळे, रजाच्या प्रेरणेने सतत सत्वगुणचाच उत्कर्ष होत राहिला तर, इतर कोणत्या गुणाचे कार्यच व्यक्त होणार नाही. परंतु प्रकृतीक्षोभ हा विकासासाठी झालेला असतो. म्हणून सत्वोत्कर्षानंतर रजोगुणाच्या प्रेरणेने पाठोपाठ, तमोगुणाचा उत्कर्ष होऊ लागतो व तमाच्या नियमन या गुणामुळे, सत्वगुणाच्या उत्कर्षाचे नियमन केले जाते, आणि तमाचे आसक्ती, गुरुत्व, जडत्व हे धर्म दाखविणारे "अभिमान किंवा अहंकार" हे तत्त्व, बुद्धितत्वानंतर बुद्धीमधूनच व्यक्त होते.

अहंकार या तत्त्वामध्ये तमोगुणाचे आधिक्य असले तरी, सर्वच कार्य हे त्रिगुणांच्या संमिश्रणातून झालेले असल्यामुळे, रजोगुणाच्या प्रेरणेने, अहंकाराचे सत्वगुणप्रधान(सात्विक), रजोगुणप्रधान(राजस वा तेजस) आणि तमोगुणप्रधान (तामस वा भूतादी) असे तीन प्रकार होतात. यापैकी तामस अहंकारातून "पंच तन्मात्रा" म्हणजे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध.. उत्पन्न होतात. म्हणून त्याला "भूतादी अहंकार" असेही म्हणतात..

एका शब्दाचे अनेक अर्थ प्रचलित असतात. आपण संदर्भानुसार ते वापरत असतो. उदा. प्रकृती(निसर्ग)पासून दूर गेलं, की प्रकृती(शरीर प्रकृती) अस्वास्थ्य निर्माण होतं..!!

किंवा.. हिंदीतील सोपं उदाहरण.."शाम तो भूला, शाम का वादा..।"

तेव्हा या लेखातील विषयानुसार, प्रकृती आणि पुरुष संयोगातून महत् तत्वाची(बुद्धी) उत्पत्ती आणि त्यातून अहंकाराची निर्मिती.. हा क्रम आपण विचारात घेऊया ही नम्र विनंती..!!

सतिश गावडे's picture

2 Nov 2020 - 8:47 pm | सतिश गावडे

दशमी या शब्दाची अस्तित्वात नसलेली दश + मी अशी फोड करुन मग त्या दोन शब्दांचे/अक्षरांचे वेगळे अर्थ जोडून मूळ शब्दाला भलताच अर्थ देण्याचा प्रकार अतिशय वाह्यात वाटतो.

वीणा३'s picture

3 Nov 2020 - 1:18 am | वीणा३

आजकाल "आपले पुर्वज किती किती हुशार" वाल्या व्हत्सप्प मेसेज नि वात आणलाय. दसऱ्यानिमित्त तो आपट्याच्या पानांचा रस प्या वाली फॉरवर्ड परत आली होती. आपले पूर्वज डोक्यावर हात मारून घेतील आणि म्हणतील एवढा विचार आम्ही नव्हता हो केला, तुम्ही कायतरी विचार करत बसता आणि आमच्या नावाने खपवता.

लेख मजेशीर आहे, निदान प्रचंड माहितीपुर्ण सांगतिलंय असा आव तरी नाहीये.