गावाकडचे नवरात्र

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
25 Oct 2020 - 9:42 am

स्मरण रंजन
नवरात्र
गावातील मोठ्या  चौकात,मध्यभागी एक मोठा आड.
चौकाभोवती  देशमुखांची पंधरा सोळा घरे.
देशमुख गल्ली.
दोन मोठी चिरेबंदी वाडे .
पैकी एक आमचा. 
भाद्रपद वद्य ( पितृपक्ष)
संपायच्या आधी चार पाच दिवस  ,म्हणजे
नवरात्र सुरू व्हायच्या आधी घराच्या
साफसफाईची लगबग  .
   ओसरी,स्वयपाक घर , ओसरी व माडीवरील
खोल्या, सगळ्यांच्या भिंतींचे सारवण.
स्त्री  मजुरांकडून.
अंगणाच्या भिंतींना पिवळी खडी.
अंबाडीचे कुंच्याने  किंवा पिकांवर,
डी.डी.टी. फवारणीचे फवार्राने.
बैठकीचे भिंतींना खालचे अर्ध्या भागास
निळा/हिरवा ऑईलपेंट. वरती  डिस्टेंपर.
छताच्या  लोखंडी  तुळया, लाकडी खांब,दरवाजे ,खिडक्यांना 
तेल पाणी .
यासाठी गडी (पुरुष मजूर).
    देवघराची स्वच्छता आणि सजावट आई कडे.
त्यासाठी पितळी मुख्य देव्हारातून देवांच्या प्रतिमा,
मुर्ती ओसरीवरील कोनाड्यात तात्पुरत्या स्थानापन्न.
देव्हारा व  पूजेच्या  भांडी, उपकरणे ,दिवे, समया ई.
साहित्याची  चिंचेचे पाणी,व रांगोळीने सफाई.
एकदम चकाचक.
देवघराला ऑईलपेंट. देव्हाराचे आजूबाजूला 
रंगीबेरंगी चमकीचे कागदाचे(बेगड) नक्षिकाम.
आई; फुलं,पानांचे, वेलबुट्टींचे छान छान आकार कापून
खळीने चिकटवायची.
देवघर ,ओसरी ,बैठकीतील 
तसबिरींच्या काचा रांगोळीने,व चौकटींची
तेलपाण्याने सफाई.
सारवणाचा, रंगाचा ,अन ऑईलपेंट चा गंध
अजूनही नाकात साठवलेला.
स्वच्छता मोहिमेनंतर
संपूर्ण घर उजळून निघे.
हे  घरोघरी.
   अश्विन शुद्ध प्रतिपदा. नवरात्राचा पहिला दिवस. घटस्थापना. सकाळपासून गडबड.
शेतातून नेहमीपेक्षा जास्त फुले यायची.
काळी माती पण.
  आई पूजेची साहित्य मांडून ठेवायची.फुलांचे हार.
घटस्थापनेची पूजा सांगणे साठी भटजी .
कुलदैवत  सप्तश्रंगी देवी.
  देवीचा अभिषेक,व पूजा सोवळ्यात.
वडिलांच्या हस्तेच.
देवघर उंचावर.त्या मुळे आजोबांना वर चढणे
शक्य नसे. पण ओसरीवरूनच पूर्ण लक्ष.
शेतातून आणलेली माती  देवासमोर एका  पत्रावळीवर
मांडून त्यावर  पाण्याचा  कलश. माती भिजवून
मंत्रोच्चारात विविध धान्यांची  पेरणी.
फुलांची माळ  सोडली जायची. नवरात्रात
प्रत्येक  दिवशी एक एक  माळ.
पूजा आणि नैवेद्यानंतर आरती.
पहिल्या  आणि नवमीचे दिवशी कुलाचार .
पुरणपोळीचा नैवेद्य.
दुपारचे  जेवणाचे पंक्तीला रोज  ब्राम्हण व
सवाष्ण.
आई  व आजी चे नऊ दिवस उपवास.
अष्टमीचे दिवशी सर्वांचा.
रोज  देवासमोर सप्तशितीचे  पाठ .
त्यासाठी  क्षेत्र मंजरथ हून  ब्राम्हण.विष्णूदेव.
इतरांचे घरी पण पाठासाठी ब्राम्हण.
मंजरथ ,माजलगाव हून.
पैकी अनेकजण आमच्या  बैठकीत मुक्कामाला.
पाठ , संपले की रिकाम्या वेळात त्यांच्या  चर्चा,वाद विवाद,चेष्टा ,गंजिफ्याचा खेळ रंगत असे.
रोज रात्री आरतीचा थाट.
गणपती, देवी,इतर देवांच्या आरत्या,सप्तश्रंगीची व नवरात्राची आरती. टाळ्या व  घंटेचा नादात.
बीडहून काका व इतर मंडळी गावी येत  सुटीचे दिवशी.
त्या दिवशी आरती जोरात.
आजोबांनी त्यांचे मोडी वळणाचे अक्षरात
कागदावर लिहिलेले 'श्रीसुक्ताचे'  सामुहिक पठण.
दुपारी,रात्री
आई देवीची गाणी सुरेल आवाजात म्हणायची. .
सकाळ, संध्याकाळ  देवघरातील कापूर, धुपाची
दरवळीने वेगळेच सात्विक वातावरण.
घर आणि  मन प्रसन्न .
नवमी पर्यंत देवासमोरील धान्य तरारून वर येई.
हिरवेच  ताजे तृणांकुर  .
त्यादिवशी पाठ संपवून,ब्रम्हवृंद आपापल्या
गावी निघून जाई.
दुसरे दिवशी दसरा. सीमोल्लंघन.
मोठा सण .
त्या दिवशी दैनंदिन जीवनात रोजीरोटी साठी
उपयोगी पडणारे साधनांची ,
  शेतीची अवजारे इ. पुजा असे.
वर्षातून एकदाच होणारी ,
नवीन कपड्यांची खरेदी दसरा सणा अगोदर  होई .
नवे कपडे कधी घालायला
मिळतील ही उत्सुकता .
दुपारी जेवणात श्रीखंड किंवा बासुंदीचे
भरपेट जेवण.
चार वाजल्यापासून सीमोल्लंघनाची तयारी सुरू 
नवे कपडे. टोपी.टोपीत देवासमोरील  तृणांकुराचे  तुरे.
देव, आई वडील व  घरातील  मोठ्या माणसांचे आशिर्वाद घेऊन,गल्लीतली सर्व घरी दर्शनासाठी जाणे
अत्यावश्यक. 
घरी दर्शनासाठी  येणारे लोकांसाठी 
विडे तयार करून ठेवले जात.
संध्याकाळी सीमोल्लंघनासाठी  गावातील पुरुष मुले
एकत्र  मिरवणुकीने गावाबाहेर.
ब्यांड, हालग्या ,तुतारी,
ताश्यांचे गजर. एकच धुम.
आपट्याचे  झाडाच्या फांद्या अगोदरच कोतवालाने
तोडून ठेवलेल्या.
त्यावर पोलीसपाटील
तलवारीने प्रतिकात्मक  वार करीत.
मग जनतेची  ते 'सोने 'लूटण्यासाठी झुंबड.
सर्वाना आपट्याची पाने  मिळाली की मिरवणूक
देवीचे देवळात.
तिथे दर्शन व सामुहिक आरती होई
    मग एखादा पराक्रम करुन आल्याचे थाटात
आम्ही घरी . घरातील स्त्रियांनी ओवाळल्यानंतर
घरात प्रवेश.
आधी देवदर्शन. मग स्त्रियांकडून औक्षवण.
एका तबकात
तांदुळाच्या बाहुल्या करून त्याचे पोटात एखादा सोन्याचा दागीना आधीच लपविलेला असे .त्या
बाहुल्याचे पोट चाकूने कापून तो  दागिना
मिळवायचा .या पराक्रमा बद्दल स्त्रीयांनी ओवाळल्यावर
बदल्यात
सोने म्हणून आपट्याचे पानांची ओवाळणी .
गोड पदार्थ खाऊन ही 'मोहीम 'साजरी व्हायची.
अंगावरचे
नवीन कपडे काढून ,घड्या घालून ट्रंकेत ठेवायचे.
येणारे दिवाळीत घालण्यासाठी.
    एकतीस  वर्षापूर्वी
वडील गेले .तेव्हाच न्यायाधीश म्हणून नियुक्ती  मिळाली .
नियमित बदलीची नोकरी  .
गावाकडचे घर बंद झाले.
घरातील देव बीडला काकांकडे.
आता नवरात्रात अधुन मधुन गावी
देवीचे दर्शनासाठी जाणे होते.
पण  ते  नवरात्र ,तो दसरा, अनुभवायला मिळत नाही .
ते उजळ्लेले घर ,धूपाचा गंध, उत्साह,चैतन्य,पाठाचे स्वर
आरत्यांचा गजर ,आता फक्त आठवणीतच.
                नीलकंठ देशमुख .
                 8793838080
       nilkanthvd1@gmail.com
     
  
        
  

 
       

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

सनईचौघडा's picture

25 Oct 2020 - 10:42 am | सनईचौघडा

वा खूप छान. तुमचे लेख खूप छान असतात.
पण आता यातलं काहीच राहिलं नाही.
मी माझ्या आई वडिलांना हा लेख वाचून दाखवला. मी त्यांना त्यांच्या लहानपणी कोकणात त्यांच्या गावांत सगळे सण कसे साजरा करतात ते सविस्तर विचारात असतो अधूनमधून.

कोकणातही पूर्वी खूप उत्साहात सगळे सण साजरे केले जायचे पण आता काहीच नाही कारण घरटी फक्त एक माणूस राहिलाय.

नीलकंठ देशमुख's picture

26 Oct 2020 - 10:30 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

तुषार काळभोर's picture

25 Oct 2020 - 12:37 pm | तुषार काळभोर

आमचं गाव अन गावातली सगळी घरं अजूनही गावपण टिकवून आहेत.
प्रत्येकाच्या हातात ओप्पो पडून ऍपल पर्यंत स्मार्टफोन, दारात किमान अॅक्टिवा ते पुढं ब्रेझा, क्रेटा, इंडेव्हर, फॉर्चूनर सगळं आहे.
पण अजून सगळ्या गोष्टी, घरातल्या देव्हाऱ्यापासून, गावातल्या अंबरनाथ मंदिरापर्यंत वडिलांच्या लहानपणी, पन्नास साठ वर्षांपूर्वी, जसं व्हायचं तसच अजूनही होतं.

गाव दहा किलोमीटर वर असल्यामुळं आमच्या घरात , गावी राहत नसून सुध्दा सगळं तसच होतं.

सगळीकडे आधुनिकता आली आहे. त्याला पर्याय नाही. पण जमेल तितकी परंपरा पण जपली जातेय.

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नीलकंठ देशमुख's picture

26 Oct 2020 - 10:31 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

पॉइंट ब्लँक's picture

25 Oct 2020 - 2:37 pm | पॉइंट ब्लँक

मन तीस वर्ष मागं नेवून ठेवलत राव. आमाच्याकडे अजुन एक प्रथा होती. देव्हारर्‍यात वरती कडाकण्या दोरीने बांधुन ठेवलेल्या असत. सगळे कार्यक्रम झाले की शेवटचा सोहळा म्हणजे त्या कडाकण्या तोडुन आणने. देव्हारर्‍यातीम नंदादीपामुळे धुरकटलेल्या त्या कडाकण्या खाण्यात काही तरी वेगळीच मज्जा होती :)

तुषार काळभोर's picture

26 Oct 2020 - 6:05 am | तुषार काळभोर

ji अजूनही पाळली जाते.
दसऱ्याला संध्याकाळी घरातील सर्व विवाहित स्त्रिया पुरुषांना अन् मुलांना सुद्धा ओवाळतात. ओवळताना म्हणतात, ' खेळत खेळत गेले दर्याच्या काठी, आणा माणिक मोती, टाका आमच्या ताटी.' आणि मग आम्ही ताटात सोनं टाकायचं.

हे वरचं जे वाक्य आहे, ते अजुन कुठं म्हटलं जातं माहिती नाही.

नीलकंठ देशमुख's picture

26 Oct 2020 - 10:31 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

दुर्गविहारी's picture

25 Oct 2020 - 7:48 pm | दुर्गविहारी

खुप जुन्या आठवणी.यातील कित्येक गोष्टी अनुभवल्या नाहीत.

चौथा कोनाडा's picture

25 Oct 2020 - 8:42 pm | चौथा कोनाडा

छान मस्त वर्णन !
जुन्या काळात फिरवून आणलेत !
माझ्या गावचा दसरा आठवला !
गेले ते अपुर्वाईचे दिवस !

नीलकंठ देशमुख's picture

26 Oct 2020 - 10:32 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

सिरुसेरि's picture

25 Oct 2020 - 10:51 pm | सिरुसेरि

गावाकडील वातावरणाची सुरेख आठवण . प्रवासामधे वाटेत अनेकदा लहान मोठी गावे लागत असत . या गावांमधील दगडी घरे , त्या घरांच्या भितींवर रंगवलेली "जेथे डास , तेथे हिवताप " , "गप्पी मासे पाळा , मलेरिया टाळा " अशा सरकारी आरोग्य विषयक जाहिराती आठवल्या .

नीलकंठ देशमुख's picture

26 Oct 2020 - 10:32 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

महासंग्राम's picture

26 Oct 2020 - 2:53 pm | महासंग्राम

सुंदर आठवणी पण लेख तुटक वाटतो,वाक्य मधातच तुटल्यासारखे वाटतात.