झोपाळ्याचा कुरकुरणारा आवाज अजूनही अंगणातून येत होता. मध्यानापासून आता सांजवेळ होत आली तरी गोपाळराव अजूनही झोपाळ्यावर तसेच बसले होते. झोपाळ्याच्या नक्षीदार लाकडी खांबावर मुंग्यांची रांग थबकत चालत होती. गोपाळराव मात्र आपल्या धोतराकडे रोखून बघत बसले होते.धोतरावरचा परवाचा दौतीचा निळा डाग अजूनही तसाच होता. त्या डागाशेजारीच आज नवीन डाग पडला होता. गर्द लाल रंगाचा तो उठून दिसत होता. खांबावरची एक मुंगी गोपाळरावांच्या हाताला डसली आणि त्याची तंद्री मोडली.
हाताशेजारच्या पिस्तूलकडे त्यांचे लक्ष गेले. पिस्तुल हातात घेऊन तिची नळी गोपाळराव निरखून बघू लागले.
आज ह्याच पिस्तुलाची चाचणी गोपाळरावांनी घेतली होती.त्याचीच साक्ष धोतरावरचा तो लाल डाग देत होता. क्षणार्धात गोपाळराव उभे राहिले. ती पिस्तुल त्यांनी मन लावून तयार केली आणि समोरच्या कंदिलाकडे रोखली. 'धाड....' आवाज पूर्ण वाड्यात घुमला.
आवाजाने आतून संगिता धावत बाहेर आली. गोपाळराव अजूनही पिस्तुल रोखून तसेच उभे होते. समोरचा कंदिलही तसाच होता. तोही गोपाळरावांकडे उपहासाने रोखून बघत होता.
रागाने गोपाळरावांनी ती पिस्तूल झोपाळ्यावर फेकली. " अहो .. काय हे ? " संगिता पुटपुटली. " अहो पुर्ण नऊ रुपये मोजलेत या पिस्तुलीसाठी. शिंचीचा नेम लागेल तर शप्पथ! आज एका काळविटाचा वेध घ्यावा म्हटले , म्हणून पिस्तूल घेऊन वेशीबाहेर पडलो होतो. बार काढल्यावर काळविट पडला खरा पण जवळ गेल्यावर कळाले की पायाला जखम झाली होती , पण तो जिवंतच होता. हे बघा त्याचे रक्ताचे डाग पडले आहेत धोतरावर.
"अहो पण कुणी सांगितली ही नसती उठाठेव ? चांगली सरकारी नोकरी आहे तुमची. इंग्रज्यांच्या मर्जीतला माणूस म्हणून गावात ओळख आहे तुमची. " " हीच ओळख कधी जिवावर उठेल याचा भरवसा नाही. गावात इंग्रजांविरुद्ध वातावरण तयार होत आहे. बंडाची वेळ आलीच तर आपलीही त्यातून सुटका नाही. म्हणून घेतली ही पिस्तूल. " "पण भेटली कुठे म्हणायची ही बंदूक ? " "बंदूक नव्हे पिस्तूल आहे ती. आणि तुम्हाला का नसत्या चौकश्या ? जा जेवणाचे पहा "
हात पाय धूवून गोपाळराव आत आले. मेजवरची असंख्य पुस्तके त्यांच्या बुद्धीचा आवाका दाखवत होती. इंग्रजीवरचे प्रभूत्व , मुसुद्दीगिरीपणा आणि इंग्रजांवरची अढळ निष्ठा यामूळे ते इंग्रज्यांच्या खास मर्जीतले बनले होते. मेज शेजारच्या दिव्याची वात त्यांनी मोठी केली. एव्हाना पितळी पेल्यात संगिता पाणी घेऊन आली होती. दिव्याच्या प्रकाशात तो पेला आता सोन्यासारखा चमकू लागला होता. गोपाळराव एक घोट घेतात न घेतात तोवर संगिता बोलू लागली , " मी काय म्हणते , का करावी ही गुलामी ? आपली शेती दिलीच आहे कसायला. त्यातून भागेलच की."
"अहो , प्रश्न इथे पैशाचा नाही. ही पुस्तके बघ. विज्ञानमद्धे आपल्यापेक्षा कितीतरी पुढे आहेत ती. आपण देव देव सोडून केले तरी काय खास ? त्यांची बुद्धीमत्ता मला खूणावत आली आहे. आपण स्वतंत्र होऊन करणार काय आहोत ? ही गावातली भोळीभाबडी मंडळी भावनिक आवाहनांना बळी पडते. मी आपली प्रगती बघू शकतो इंग्रजांच्या अमलाखालची. इथे दिवसागणिक काम आणि जबाबदारी दोन्ही वाढत चालली आहेत. असो. पुरुषोत्तम कुठे आहे ? " " येईलच एवढ्यात तो. हा बघा आलाच. हात पाय धुतलेस ना रे? जा देवघरासमोर प्रार्थनेला. "
संगिता आता गोपाळरावांकडे प्रश्नार्थक चेह-याने पाहू लागल्या. अपेक्षेप्रमाणे गोपाळरावांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. ते केव्हाच समोरच्या पुस्तकात हरवून गेले होते. आज मात्र विषय काढायचाच हे ठरवून त्या गोपाळरावांच्या बाजूला जाऊन उभ्या राहिल्या." काय काम काढले आता ? " गोपाळराव बोलते झाले. "अहो जरा पुरुकडे लक्ष द्या. जरा पुजाप्रार्थनांचे शिकवण्याचे मनावर घ्या. " " हे पहा , तुम्हाला या आधीही सांगितले होते. सोवळे ओवळे याचे प्रस्थ मला माजवायचे नाही. तुम्हाला त्यास जे शिकवायचे आहे ते शिकवा , पण मला त्यात ओढू नका. " जर एवढाच तिटकारा असेल तर ते जानवे तरी कशाला आणि का घालता ती भिकबाळी ? संबाज राखले आहे ते कशासाठी ? त्या इंग्रजांसोबत राहून आपली संस्कृती का बुडवणार आहात ? " गोपाळराव आता गप्प बसले होते. एकीकडे इंग्रजांची आधूनिकता त्यांना मोहिनी घालत आली होती , पण लहानपणी अंगी पडलेले सोपस्करही त्यांना टाळता येत नव्हते. समोरच्या दिव्याकडे त्यांची नजर गेली आणि ते उद्गारले ," तो दिवा पाहत आहात समोरचा ? असाच दिवा तुम्ही देवघरातही लावला आहे. देवघरातील त्या दिव्यापेक्षा हा इथला दिवा मला जास्त महत्वाचा वाटतो. आणि राहिली गोष्ट संस्कृतीची तर त्यांचे कौतूक मला तरी नाही. जा , पुरुषोत्तम तुमची वाट बघत असेल. "
"गोपाळराव आहेत का घरी ? " वाड्याबाहेर कोणी आवाज देत होते. स्वताःचे धोतर सांभाळत गोपाळराव बाहेर आले. समोर शुभ्र सदरा आणि गांधी टोपी घातलेला इसम उभा होता. " तुम्ही ? अहो तुम्हाला इथे बघून माझी नोकरी जायची. " " काम तसे महत्वाचे होते. म्हणूनच आलो. " " या त्या झोपाळ्यावर बसा. " तो इसम झोपाळ्याकडे चालू लागला. सांजवेळी फेकून दिलेली पिस्तूल अजून तिथेच पडली होती. त्या इसमाने गोपाळरावांकडे पाहिले. गोपाळरावांनी केवळ होकारार्थी मान हलवली. त्या इसमाने आजूबाजूला बघितले आणि सद-याच्या खिशात ती पिस्तुल टाकून तो लगबगीने निघूनही गेला. त्याला जाताना पाहून गोपाळरावांच्या हृदयाचे ठोके वाढतच जात होते. स्वताःला कसेबसे सावरत ते मेजपाशी आले आणि पेल्यातील पाणी घटघट पिऊन संपवले. उद्याची पहाट त्यांच्यासाठी महत्वाची ठरणार होती. जेवण झाल्यावर गोपाळराव लगोलग झोपायला निघून गेले.
भल्या पहाटेच गोपाळरावांना जाग आली. ते अस्वस्थपणे वाड्यात फे-या घालत होते. कचेरीला जाण्याची वेळ जवळ येत होती. काही वेळानंतर कचेरीतील शिपाई वाड्याकडे धावत येताना त्यांना दिसला. त्यांना लगोलग कोट , पगडी चढवली आणि कचोरीच्या दिशेने धावले.
कचोरीसमोरच पांढ-या सद-यातील माणूस रक्तबंबाळ अवेस्थेत पडला होता. सद-यावरचे रक्त सुकून गेले होते. चेह-यावर उसने अवसान आणून गोपाळरावांनी शिपाईला विचारले , " कोण आहे हा ? आणि इथे मारले कोण त्याला ? " " मला कायबी माहिती नाही आत साहेबान तुम्हाला बोलावले आहे. " धडधडत्या ठोक्याने गोपाळराव आत गेले. समोर एक गोरा साहेब कसल्याश्या कागदात डोके खुपसून बसला होता. 'जॉर्ज विल्सन' अशी पाटी त्या टेबलवर डौलात विरासत होती.
हा साहेब वयाने पुरता पिकला होता. भारतीयांची नाळ हा पुरेशी ओळखून होता. संवाद साधता येईल इतपत नाही तर मराठीवर प्रभुत्व ठेवून होता.
गोपाळराव त्याच्या शेजारी जाऊन उभे राहिले. साहेबाने गोपाळरावांकडे पाहिले. घामाची एक धार कपाळापासून निघून डोळ्यापर्यंत पोहचली होती. "गोपाळराव आम्ही तुम्हाला आमच्याबाजूचे समजत होते. पण .. " " साहेब आपल्याच बाजूने आहे मी पहिल्यापासून . त्यामूळेच तर या इसमाची माहिती मी तुम्हाला दिली. " गोपाळराव कपाळावरच्या घामच्या धारा पुसत पुटपुटले. " पण गोपाळराव तुम्ही अर्थवट माहिती दिली आम्हाला. काल हा माणूस तुमच्या घरी आला होता ही माहिती तुम्ही लपवली. " " साहेब मी तुमच्या हल्यावरील माहिती काढण्यासाठी त्याला घरी बोलावले होते. " " तुम्ही बोलावले आणि तो आला ? आणि केवळ काही वेळातच तुम्हाला माहितीही कळाली ? " " साहेब मी फक्त आजचा तुमच्यावरील हल्याच्या कटात काही बदल झाला आहे का हे विचारण्यासाठी बोलावले होते. " " पण त्याकडे पिस्तोल आहे हे तुम्ही सांगितले नाही. केवळ त्या माणसाचा नेम चुकला म्हणून आम्ही बचावलो. " " मला पिस्तुलाची कल्पनाही नव्हती " गोपाळराव उत्तरलले. तो गोरा साहेब खुर्चीतून उठला आणि गोपाळरावांसमोर डोळ्यात डोळे घालून बोलू लागला. ," त्या फाटक्या माणसाकडे बंदूक आली कोठून ? आणि ती बंदूक आता कुठे आहे ? " " म्हणजे पिस्तुल सापडली नाही ? " या माणसासोबत अजून एक माणूस होता. ह्याला आम्ही मारताच तो बंदून घेऊन पळून गेला. तर गोपाळराव तुम्ही आता सांगा की तो कोण होता आणि त्यांच्याकडे बंदूक आली कुठून ?" " ते मला कसे माहिती असणार साहेब ? " " ते आत्ता कळेलच. चला. तुमच्या घरी धाड टाकून बघूया नेमके तुम्हाला काय माहिती आहे ते. " असे बोलत जॉर्ज लगोलग कचोरी बाहेर पडला. सोबत काही शिपाई होतेच. लगबगीत ते सगळे गोपाळरावांच्या वाड्यावर पोहचलले.
जॉर्जने आपल्या शिपायांना इशारा दिला. शिपाई धावत वाड्यात घुसले. जॉर्ज गोपाळरावांसोबत बाहेर उभा होता. गोपाळरावांच्या हालचालीकडे त्याचे बारीक लक्ष होते. गोपाळराव निराकार होऊन सगळे बघत होते. जॉर्ज हळूहळू वाड्याच्या आत येऊ लागला . आत जाताच जॉर्जला झोपाळा दिसला. झाडाझडती होईपर्यंत तिथे बसावे म्हणून तो झोपाळ्यावर बसून झोके घेऊ लागला. त्याची नजर आजूबाजूला फिरत होतीच. वाड्याचा भाग भिंतींनी वेढलेला होता . हा भाग असाप्रकारचा होता की बाहेरून इथले काहीही दिसणे वा ऐकू येणे जवळपास अशक्यच होते. गोपाळराव पाणी आणण्याकरता आत गेले. जॉर्ज झोके घेत विचार करत बसला होता. त्याला एकदम एक खडा टोचला. जॉर्जने तो खडा हातात घेऊन बघितला. त्याला काहीशी शंका आली आणि तो त्याने नाकाला लावला. हा वास त्याचा ओळखीचा होता. गन पावडरचा हा वास. जॉर्जच्या डोक्यात आता अनेक प्रश्न पडू लागले ," म्हणजे तो गोपाळराव यात सामील आहे ? त्यांनीस त्या खुन्याला बंदूक दिली ? पण जर त्याला मला मारायचेच होते तर त्याने ती खबर मला का दिली ? एकीकडे हा मला सावध करतो आणि दुसरीकडे मला मारायला माणूस पाठवतो ? हा नेमका प्रकार काय ? आणि तो निसटून गेलेला माणूस कोण होता ? " असे असंख्य प्रश्न जॉर्जच्या मनात रुंजी घालत होते. झोपाळा पुन्हा पुन्हा कुरकरत होता.
क्रमशः
प्रतिक्रिया
7 Oct 2020 - 3:53 pm | दुर्गविहारी
जबरदस्त ! पुढील भाग लवकर टाका.
7 Oct 2020 - 3:57 pm | महासंग्राम
त्याला एकदम एक खडा टोचला.
इंग्रज अधिकाऱ्यांच्या पायात बूट असतात, ते घातलेले असतांना खडा टोचणे कसं शक्य आहे ? त्याला नेमका कुठे खडा टोचला एक शंका म्हणून विचारलं
7 Oct 2020 - 4:04 pm | कानडाऊ योगेशु
झोपाळ्यावर बसल्यावर खडा टोचला आहे त्यामुळे पायाला नसुन बुडाला टोचला असावा खडा!
7 Oct 2020 - 4:16 pm | महासंग्राम
जरा लेटच टोचला नै खडा :)
8 Oct 2020 - 11:06 am | राजाभाउ
जबरदस्त !!! पुभाप्र.
संवादांमध्ये कोण काय बोलतय हे चटकन लक्षात येत नाहीये, ते जरा बघा. बाकी उत्तम
8 Oct 2020 - 11:39 am | ज्ञानोबाचे पैजार
फक्त गोपाळारावांनी घरातच गोळीबार करुन बघितला, क्रांतीकारकाला घरी बोलावले इत्यादी तपशील फारसा पटला नाही.
माझी पणजी अभिनव भारत सोसायटीची सदस्या होती. तिने पण सशस्त्र क्रांतीत भाग घेतला होता. जॅक्सनच्या वधाच्या वेळी वापरलेली पिस्तुले तिने घरातच लोणच्याच्या बरण्यां मधे लपवली होती. इंग्रजांना संशय येउन त्यांनी घराची झडती देखील घेतली होती पण लोणच्या खाली पिस्तुले असल्याने त्यांना काही ती सापडली नाहीत. ती पिस्तुले योग्य माणसाच्या हाती पडे पर्यंत माझी पणजी कोणाला एक चकार शब्दही बोलली नव्हती. थोड्या दिवसांनी घरातील इतरांना तिने खरी हकिगत सांगितली.
हे सांगण्याचा उद्देश इतकाच की अत्यंत गुप्तपणे या क्रांतिकारकांच्या कारवाया चालत असत. प्रत्येक माणूस तोलून मापून पारखुन घेतलेला असे.
असे असताना कोणी इतक्या उघड उघड घरी पिस्तुल ठेवणे , क्रांतिकारकांना घरी बोलावणे इत्यादी गोष्टी करेल असे वाटत नाही. अर्थात दिशाभुल करण्यासाठी स्वतःविरुध्द असे पुरावे मुद्दाम निर्माण केले असतील तर तो भाग वेगळा.
पुढच्या भागात असेच काहीसे वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
पैजारबुवा,
9 Oct 2020 - 2:30 pm | डीप डाईव्हर
तुमची पणजी लैच ग्रेट होती कि 🙏
सुरवात भारी झाली आहे हो शब्दानुज साहेब 👍