खूप वर्ष झाली असतील, राजमाचीचा पहिला ट्रेक कधी केला ते आता नेमकं आठवत नाही. किंबहुना पहिल्यांदाच राजमाचीच्या त्या नितांतसुंदर वाटेवर जाऊनही तेव्हा माचीला न जाता सरळ पुढे गेलो होतो ते म्हणजे ढाकच्या बहिरीला.
पिंपरीहून रात्री ९:२५ च्या लोकलने आम्ही ५/६ जण निघालो होतो ते तासाभरात लोणावळ्यात पोहोचलो. पुढच्या राजमाचीच्या कित्येक सफरींना हीच ९:२५ ची लोकल आमची सहसोबती होणार होती हे तेव्हा माहीत असणं शक्यच नव्हतं. मग पुढे लोणावळा स्टेशनवर चहा पिणे वगैरे सोपस्कार उरकून आम्ही पुढे चालू लागत असू. एसटी स्टॅण्डच्या पुढे आल्यावर जुना मुंबई-पुणे महामार्ग लागत असे. भारत पेट्रोलियमचा पंप हा तिथला लॅण्डमार्क. त्या पंपाच्या इथूनच वाट तुंगार्लीला जाई. तुंगार्ली गाव संपता संपता द्रुतगती महामार्गाच्या खालून तो रस्ता जाई तो समोरच्या एका पहाडावर. त्याच्या पायथ्याची बंगल्यांची रांगच आहे. त्या पहाडाचा तीव्र चढ चढला की तुंगार्ली धरण आलंच. तुंगार्ली धरणाची भिंत त्या अंधारात भयप्रद वाटे. डाव्या बाजूला दाट झाडी आणि त्यातूनच खालच्या दरीत लोणावळ्यातल्या दिव्यांचा प्रकाश झिरपत असे. राजमाचीच्या असंख्य सहली केल्या पण रात्री तुंगार्ली धरण्याच्या भिंतीवरुन फक्त एकदाच गेल्याचं आठवतंय मला. धरणाची भिंत, रात्रीच्या अंधारात चमकणारं काळंशार पाणी मोठं गूढ वातावरण निर्माण करत असे. तसंही धरणाच्या भिंतीवरुन जाणे म्हणजे मुख्य रस्ता सोडून उजवीकडचा एक लहानसा चढ चढून भिंतीवर येणे असे.
सध्याची वाट आणि समोर दिसणारे माचीवरील श्रीवर्धन, मनरंजन
धरणाच्या ४/५ फर्लांगावर पांगळोलीची ठाकरवाडी. रात्री इथून जातांना खूप भिती वाटे ती इथल्या कुत्र्यांची. दिवसा शामळू भासणारी कुत्री रात्री विलक्षण शूर होतात आणि सर्व बाजूंनी गलका करुन अंगावर येऊ बघतात. इथून जाताना हाती काठी असणे अगदी जरुरीचे असे. पांगळोलीची आदिवासी वाडी अगदी लहानशी आहे, ती संपल्यासंपल्याच तिथूनच ती सुप्रसिद्ध घळ सुरु होई. घळीच्या सुरुवातीलाच ते राजमाचीचे आवळेजावळे बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन दिसत. तीव्र उताराची ती झाडीभरली घळ उतरणे एकदम मौजेचे असे. मधूनच एखादा वन्यप्राणी बाजूंच्या झुडपांतून खसफसत जाई. ती घळ संपल्यावर मात्र एकाएकी सपाटीची वाट येई.
पांगळोलीच्याच डाव्या बाजूच्या डोंगरावर एक टॉवर होता, आजही आहे. त्यावर लाल दिवा चमकत असे. हा टॉवर बहुधा विमानांसाठी दिशादर्शक असावा. हा टॉवर लोणावळ्याच्या परिसरात कुठूनही दिसतो. अगदी भाजे लेणीवरुन, लोहगड, विसापूर किल्ल्यांवरुन, ड्युक्स नोज वरुन, वाघदरीच्या इथून, कुठूनही. आणि जेव्हा जेव्हा तो टॉवर बघतो तेव्हा तेव्हा राजमाचीच्या आठवणी दाटूत येतातच. तो टॉवर आणि भारत पेट्रोलियमचा पंप पाहिल्यावर कट्टर भटक्यांना राजमाचीचीच आठवण होईल ह्याला कुणाचेही दुमत नसावे.
राजमाचीला जाताना वाट चुकायची शक्यता अत्यंत नगण्य. तुम्ही एकदा त्या द्रुतगती महामार्गाच्या खालून जाऊन तुंगार्ली धरण्याच्या वाटेला लागलात तर एकतर राजमाचीला पोहोचाल नाहीतर थेट ढाकच्या बहिरीला भिडाल. घळीत जरी असंख्य फाटे असले तरी मुख्य पायवाट सोडायची नाही, ती थेट खालच्या सपाटीलाच आणून सोडते. सपाटीला लागते ती कुणे गावारुन येणारी वाट. ही वाट म्हणजे माचीला जाणारी गाडीवाट. डावीकडे पाचेक किलोमीटरवर कुणे गाव तर सरळ जाणारी वाट राजमाचीला जाई. लगेचच डाव्या बाजूला सह्याद्रीची खोल दरी होई तर उजव्या बाजूला खड्या कातळाची लांबच लांब भिंत. त्या वाटेच्या सुरुवातीलाच एक कठडा होता. तिथं आम्ही सर्वजण एक छोटा थांबा घेऊन थोडक्या गप्पा मारत असू. इथून पुढे बरीचशी वाटचाल सपाटीवरुनच होई. डाव्या बाजूची दरी अधिकच खोल खोल होत विस्तारत जाई तर उजवीकडची कातळभिंती दूर दूर जात असे. मधूनच दरीपल्याडच्या डोंगरातून रेल्वे जाताना दिसे. रात्रीच्या गडद अंधारात ते दृश्य मोठे विलक्षण भासे. काही वेळा रेल्वे बोगद्यांतून प्रवास करत असता तिचे इंजिन व सुरुवातीचे काही डबे दृश्यमान असत, मधला भाग बोगद्यामुळे झाकोळून जाई तर मागचे काही डबे उठून दिसत. अशा वेळी एकामागोमाग दोन रेल्वे जात असल्याचा भास होईल. मधूनच त्या डोंगरावरल्या काळोख्या आभाळात एखादं विमान लुकलुकत जाताना दिसे. त्या सर्व अंधार्या पार्श्वभूमीवर समोरच दिसणारे, अगदी जवळ भासणारे ते दोन्ही बालेकिल्ले अगदी मनोरम भासत.
त्या वाटेवरुनच पुढे गेल्यावर उजव्या बाजूस झाडीत एक अगदी लहानशी आदिवासी वस्ती आहे, ती म्हणजे फणसराई. तशी ती एकदम आतल्या बाजूला झाडीत, त्यामुळे त्या राईत कधी जाणं झालं नाही. इथं क्वचित कुत्र्यांचे भुंकण्याचे आवाज यायचे. इथूनच पावसाळ्यात डोंगरावरुन येणारे पाणी कातळधार धबधब्याला मिळते. ह्या धबधब्यापाशी जाणे मोठे कठीण, जाऊही नये. मात्र ह्याचे अतिशय सुंदर दृश्य राजमाची किल्ल्यावरुन दिसते. राजमाचीच्या ह्या नितांतसुंदर रस्त्याने चालत जात असताना दूरवर भेकरांचे भुंकणे तर रातव्यांची किचकिच कायम सोबतीला असे. ह्या कातळधारच्या पुढे आतापर्यंत समोरील बाजूस दिसणारे बालेकिल्ले आता अगदी डाव्या बाजूला शेजारीच आलेले दिसत. पुढे एक फाटा येई. राजमाचीला जाताना हा फाटा चुकवून चालणारच नाही, सरळ रस्ता वळवंडच्या वाडीला जाऊ पुढे ढाकला जातो तर डावीकडचा रस्ता हा माचीला जातो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी पहिल्यांदा ह्या वाटेवरुन गेलो तो ढाकला. अर्थात रस्ता चुकला नसून ढाकच करायचा होता. लोणावळा ढाक हे बरेच लांब अंतर आहे, जवळपास तीस-पस्तीस किमी. मध्ये वळवंडला शाळेत मुक्काम करुन परत पुढे ढाकची १२/१३ किमीची वाटचाल. हल्ली बहुतांश जण ढाकला जांभिवली कोंडेश्वर मार्गे जातात पण ज्यांना सह्याद्रीचे अस्सल रूप आणि असंख्य विभ्रम पाहायचे असतील ह्या लोणावळा-तुंगार्ली-फणसराई-वळवंड मार्गाशिवाय पर्याय नाही. ढाकला गेलो तो एकदाच पण नंतर कित्येकदा माचीला आलो ते ह्याच वाटेवरुन. फक्त सरळ न जाता फाट्यावरुन डावीकडे घुसत गेलो. आता हे शेजारी दिसणारे बालेकिल्ले चक्क आपल्या पाठीमागे दिसू लागत. त्यांच्या दरम्यान खोल दरी असल्याने तसेच पुढे चालत राहूनच दरीच्या वरच्या बाजूने जाऊन वळसा मारुनच माचीला पोहोचता येते.
राजमाचीला अगदी अमावास्येच्याही अंधारात जाताना बॅटरी लागते ती फक्त २/३ ठिकाणी. तुंगार्लीच्या भिंतीजवळून जाताना, पांगळोलीच्या पुढच्या घळीत, आणि ह्या फाट्याच्या पुढे. इथूनच पुढे अगदी दाट जंगल आहे. इथल्या गडद अंधारात अगदी काहीही दिसत नाही. इथे जाताना विजेरीचा प्रकाश अगदी आवश्यकच. इथेच बॅटरीच्या प्रकाशात चालताना आम्हाला एका वेलीवरुन लटकणारा हरणटोळ अगदी समोरच दिसला होता. इथलं जंगल अगदी सुंदर आहे. चहूबाजूंना गच्च दाट झाडी. इथूनच काहीसं पुढं गेल्यावर एक ओढा आहे. तो ओढा लागला की राजमाची आता टप्प्यात आलाच अशी भावना होई. हा ओढा पावसाळ्यात ओलांडणे खूपच कठीण होई. पाण्याचा वेगवान प्रवाह इथून वाहात जाऊन पुढे काही अंतरावर असलेल्या एका खोल दरीत उडी घेई. हा ओढा ओलांडताच एक तीव्र चढ सुरु होई. हाच तो माचीवर जाताना लागणारा शेवटचा चढ. मधूनच दाट झाडीतनं तर कधी उघड्यावरुन जाणारा हा शेवटचा चढ दमछाक करणारा असे. जवळपास अर्ध्या तासाची ही तीव्र चढण पार केली की राजमाची अगदी टप्प्यात येई. अगदी शेजारीच उजवीकडे श्रीवर्धनचा काळाकभिन्न उत्ताल कडा दिसे तर डावीकडे खोल गेलेल्या दरीचे दर्शन होई. पुढे काहि क्षणातच एक वेस लागत असे. आजमितीस तिथं भग्न भिंती तितक्या शिल्लक आहेत. वेशीजवळच एका झाडाखाली एक पार बांधला होता तिथेच एक हनुमानाची मूर्ती असे. तिथं क्षणभर बसून वेशीतून आत प्रवेश करावा. मात्र तरीही तिथून उधेवाडीला पोहोचायला वीसेक मिनिटांची सुखद चाल असे.
श्रीवर्धनचा उत्ताल कडा
उधेवाडी
उधेवाडीच्या अगदी सुरुवातीसच असणारं रामचं खोपट आमची निवार्याची हक्काची जागा. पहाटे साडेतीन-चारच्या आसपास आम्ही तिथं पोहोचत असू. गावात शिरुन कुणाची झोपमोड करण्यापेक्षा रामच्या खोपटात पसरणं आम्हाला सोयीचं होई. राम सकाळी तिथं माल लावायला येई. त्याला रामराम करुन तिथंच चहा घेऊन त्याला आम्ही पोहे करायला सांगत असू. मस्त गरमागरम पोहे खाऊन परत चहा भरुन मग आम्ही किल्ला हिंडायला निघत असू.
माचीला आतापर्यंत किमान १५ वेळा तरी नक्कीच जाणं झालंय, पण मनरंजनवर गेलो तो फक्त एकदाच. दरवेळी जाणे झालेय ते श्रीवर्धनलाच. श्रीवर्धन उंचीने अधिक, मनरंजन थोटका. उधेवाडीच्या बाजूला मनरंजनच्या पोटात पाण्याची काही प्राचीन खोदीव टाकी आहेत. टाक्यांच्या रचनेवरुन ती सातवाहनकालीन असावीत. दोन बालेकिल्ले असणारा राजमाची हा अतिशय प्राचीन दुर्ग. ह्याच्याच पोटात महाराष्ट्रातल्या सर्वात जुन्या लेण्यांपैकी एक अशी कोंडाणे लेणी दडलेली आहेत. खुद्द श्रीवर्धनवरही काही अत्यंत प्राचीन लेणी आहेत. साहजिकच हा दुर्ग किमान दोनेक हजार वर्ष जुना असावा. दुर्गांच्या संरक्षणाखाली लेणी खोदल्यात आल्या की लेणींच्या संरक्षणासाठी दुर्गनिर्मिती करण्यात आली हा तसा विवादाचाच मुद्दा आहे.
श्रीवर्धनावरील लेणी
मनरंजनाच्या पोटातील लेणी
मनरंजन आणि श्रीवर्धनाच्या बेचक्यात भैरवनाथाचे राऊळ आहे. ज्यांनी कुणी ते पाहिलं असेल त्यांना ती किती मनोरम जागा आहे ह्याची कल्पना असेलच. गच्च झाडीत असलेले हे मंदिर विलक्षण रम्य आहे. रावळात काही शिवकालीन मूर्ती असून दगडी ठाणवई आहे आणि बाहेर दगडी घोडा, वीरगळ, स्तंभ, काही तोफा आणि दिपमाळ आहेत. मंदिराच्या पुढ्यातूनच श्रीवर्धनला जायचा मार्ग आहे. अगदी १५ मिनिटातंच पायवाटेने आपला गडावर प्रवेश होतो. तशी गडावर पाण्याची टाकी असंख्य आहेत पण पिण्याजोगी अशी दोन आहेत, एक वरच्या झेंडाकाठीच्या बुरुजालगत तर दुसरे तिथून उजवीकडच्या दरीच्या बाजूने उतरल्यावर भिंतीलगत लागते. गावकरी पाणी पितात ते मनरंजनच्या टाक्यांचे.
भैरवनाथाचे राउळ, पाठीमागे मनरंजन
श्रीवर्धनच्या माथ्यावरुन दिसणारे भैरवनाथाचे राऊळ
श्रीवर्धनचा प्रवेशमार्ग
एकदा असंच माचीवर आलो असता दोघे मित्र निवांत भैरवनाथाच्या रावळात बसले होते तर आम्ही दोघे श्रीवर्धनच्या झेंडाकाठीवर, सर्वोच्च बुरुजावर जाऊन बसलो होतो. वरुन अफाट देखावा दिसतो. समोरील बाजूस लोणावळ्याकडून आली ती संपूर्ण वाट एका टप्प्यातच सामोरी येते. नागफणीचा सुळका, वाघदरी, पाठीमागे उठावलेला कोरीगड अगदी स्पष्ट दिसतात. तर मागील बाजूस मांजरसुंब्याचे आभाळात घुसलेले टोक आणि त्याच्याही पलीकडे ढाकची अभेद्य कातळभिंत अगदी सहजीच नजरेत भरते. तर डावीकडे मनरंजन त्यावरील दारुकोठारासह सुस्पष्ट दिसतो.
मांजरसुंबा आणि ढाक
नागफणीचे सुळके
श्रीवर्धनचा चिलखती बुरुज ही आमची अगदी आवडती जागा. दुहेरी तटांचं संरक्षण लाभलेला हा बुरुज अतिशय देखणा आहे. कमानदार भुयारी मार्गाने पायर्या उतरत चिलखतात आपण प्रवेश करतो. तिथल्या तटांवर बसून तिन्ही बाजूंची खोल दरी निरखत बसणे मोठे आनंददायी असे.
चिलखती बुरुज
बुरुजातील मार्ग
एकदा माचीवर आलो असता सकाळी सकाळीच भैरवनाथाच्या बाजूनं बिबट्याचं डुरकणं ऐकू आलं होतं. वाघरं तशी ह्या रानाला नवीन नाहीत पण सध्या बिबट्यांनी डोंगरदर्या सोडून उसाचाच आश्रय जास्त प्रमाणावर घेतलाय त्यामुळे सध्या त्यांचे दर्शन इकडे दुर्लभच झालंय. एकदा भैरवनाथाच्या रावळात बसलो असताना समोरच एका माकडाने दोन पायांवर दोन पायांवर उभे राहून मस्तपैकी पोझ दिली होती. मोरांची केकावली इथं नेहमीचीच, भल्या सकाळी इथल्या झाडोर्यांतून मोरांचा मियाउं मियाउं आवाज सतत येत असतो.
एकदा माचीवर कॉलेजच्या दोस्तांसवे आलो होतो. मी सोडून इतर सर्वच जणांचा हा पहिलाच राजमाची दौरा. त्यात कुणाला इतके चालण्याची सवय नाही. सर्वजण थकून गेले, नेहमीप्रमाणेच रामच्या खोपटामध्ये निजलो. सकाळी उठून गावात जाता दोघे जण एका घराच्या समोरील पडवीखालील गवताच्या गंजीखाली मस्तपैकी सारवलेली जमीन पाहून शिरले तर ते नेमके कंबरभर शेणाच्या खड्ड्यात बुडाले. गावकर्यांनी खड्डा करुन त्यात शेणाचा साठा करुन ठेवला होता. त्यांना तिथून बाहेर काढून थेट नळाखाली बसवले. नंतर बराच काळ त्यांच्या अंगाला शेणाचा वास येत असे.
एकदा माचीवर आलो असताना गोधनेश्वराला जाताना लागते त्या आमराईत खास आंबे काढायला गेलो होतो. उन्हाळ्याच दिवस होते. गच्च कैर्या लगडल्या होत्या झाडांना, कैर्या तोडतांना काही भान राहिले नाही, भरपूर गोळ्या केल्या, इतकं ओझं घरी नेणं जिकीरीचं होऊन गेलं तेव्हा परत गावातच त्या देऊन टाकल्या. एकदा असंच माचीला गेलो असताना उधेवाडीतून भैरवनाथाच्या चढावर जाताना गवताला लागलेली आग दिसली, भराभर झाडाच्या फांद्या तोडून ती आग फटाफट विझवली होती.
गोधनेश्वराचा तलाव
कॉलेजच्याच दोस्तांसवे एकदा आलेलो असताना परतीच्या मार्गावर चालून चालून मित्राच्या मांड्यांमध्ये वळ उठले, बिचार्याला दोन पावले सुद्धा कष्टाने चालता येईना. कशीबशी ती पांगळोलीची घळ चढून आल्यावर अचानक एक बुलडोझर दिसला जो लोणावळ्यालाच निघाला होता. चालकाशी बोलून मित्राला बुलडोझरमध्ये बसवले व आम्ही सर्व चालत लोणावळ्याला पोहोचलो.
मे महिन्याचे अखेरचे दिवस होते, भारत पेट्रोलियमवरुन वळसा मारुन तुंगार्लीला लागलो. झाडंच्या झाडं झगमगू लागली होती. एका विशिष्ट लयीत काजव्यांच्या प्रकाशाची उघडमीट होत होती. ती झगमगती झाडे पार राजमाचीपर्यंत वाटेवर प्रकाश पेरत होती.
२३ जुलै, शनिवार, प्रचंड पावसात एकदा राजमाचीला निघालो होतो. तुंगार्ली पार करुन पांगळोलीची घळ उतरलो. धुव्वाधार पाऊस सुरुच होता. घळीत असंख्य स्वयंप्रकाशी किटक होते. चमचमत्या अळ्या झाडीत, घळीतल्या दगडांवर सरपटताना दिसत होत्या. काजवे नक्कीच नव्हते. तसे दृश्य नंतर कधीच दिसले नाही. घळ उतरल्यावर त्या कठड्यावर जाऊन बसलो. जवळाच एक धबधबा आहे, त्याचा रौद्र कोसळता आवाज कानांवर रोरावत होता. इतक्या पावसात पुढे गडावर जाण्यात काही हशील नाही म्हणून तिथूनच परत निघालो. लोणावळा स्टेशनवर बाकड्यांवर पहुडलो व पहिल्या लोकलने घरी निघालो. पाऊस तेव्हाही कोसळतच होता. हाच पाऊस पुढे तीन दिवस थांबलाच नाही, यातूनच पुढे २६ जुलैचा प्रलय निर्माण झाला. तारीख लक्षात राहण्याचे कारण ते हेच, २६ जुलै २००५.
एकदा असंच पावसाळ्यात त्या धबधब्यावर भिजण्यासाठी घळ उतरुन खाली आलो होतो. तेव्हा इकडे काही गर्दी नसायची, वर्षाविहार उरकून घळ चढायचा कंटाळा आला म्हणून कुणेनामामार्गे जायचे ठरवले तर ते अधिक त्रासदायक ठरले, सुरुवातीच्या दरी डोंगरातील सुखद चालीनंतर ५/६ किमीची डांबरी रस्त्यावरील वैतागवाणी चाल, कुणं सोडल्यावर खंडाळा आणि तिथून परत लोणावळ्यापर्यंत चालत जाणे.
राजमाचीवर कित्येकदा गेलोय पण जाणे येणे नेहमीच झाले ते लोणावळ्याकडून, एकदा मात्र कोकण दरवाज्याने उतरायचेच म्हणून खास त्या बाजूने उतरलो. उढेवाढीकडून साधारण अर्ध्या तासाच्या चालीवर कोकणदरवाजाची पायवाट सुरु होते. वाटेत एका हुप्प्याने जोरदार किच्च करुन किंकाळी फोडली. सुरेशकडे जेवून दुपारी दोनच्या आसपास निघालो होतो, केवळ उतरायचे आहे म्हणून पुरेसे पाणी सोबत घेतले नव्हते तर सह्याद्रीने हिसका दाखवला. तो घळघळीत उतार संपता संपेनाच, आम्ही सतत उतरतोय तरी पायथा अजून लांबच दिसतोय. राजमाचीच्या कोकणच्या बाजूने चार पाच थरांचा आहे. उतार, प्रत्येक थरावर काहीशी सपाटी, परत उतार सुरु असे सतत चालू होते. वाटेत कोंडाणे लेणी लागली, लेणीच्या इथून पायथा केवळ अर्ध्या तासावर पण वाट चुकलो. सर्वच जण पाण्याविना डिहायड्रेट झाले होते. ढोरवाटांनी जाता जाता एक इमू फार्म लागला, तिथं थोडंसं पाणी मिळालं. तिथून कोंदिवड्यात गेलो, तिथं मात्र भरपूर पाणी मिळालं. नंतर सहा आसनीने कर्जत आणि तिथून कुठलीतरी एक्स्प्रेस पकडून लोणावळ्यात आलो.
कोंदिवड्यातून दिसणारा मनरंजन
२००९ सालच्या सुमारास राजमाचीला उतरणारी नवी वाट घळीच्या बाजूने करण्यात आली. अगदी बैलगाडी जाईल अशी. मात्र गाड्यांसाठी अजूनही ही वाट नाहीच. ह्या वाटेमुळे घळीचा वापर बंद झाला आणि ती वाट पूर्णपणे मोडली. आज ही घळीची वाट झाडोर्याने पूर्णपणे भरुन गेलीय. आता गतवर्षीच ती वाट पाहण्याच्या मिषाने घळीच्या मुखाशी गेलो होतो, पूर्वी अगदी परिचित असणारी वाट आज पूर्णपणे अपरिचित वाटत होती. घळीच्या मुखापाशीच एक रिसोर्ट उभं राह्यलंय. आज इथल्या भागाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून गेलाय. जिथून तुंगार्ली धरणाचा चढ सुरु होतो तिथूनच आता कच्च्या रस्त्याऐवजी पक्का डांबरी रस्ता थेट पांगळोलीपर्यंत आलाय. घळीपासची नवी वाट मात्र अजूनही कच्चीच आहे आणि ती तशीच राहावी. राजमाचीला आता कुणेनामामार्गे सर्रास गाड्या येतात जातात, गर्दी वाढतेय, झाडी कमी होतेय तरीही राजमाचीचे सौंदर्य अजूनही उणावले नाही.
आतापर्यंत असंख्य किल्ले पाहिले पण त्यातले मनात घर करुन राहिले ते दोनच, एक म्हणजे रतनगड ते त्याच्या अनाघ्रात सौंदर्यामुळे, पाताळावेरी खोल दर्यांमुळे,त्याच्यावरील फुलांच्या अंगरख्यामुळे तर दुसरा राजमाची, तो तर अगदी हक्काचा, जीवाभावाचा सखा, त्याच्याविषयी जितकं लिहू तितकं कमीच.
खरं तर गणेश लेखमालेतील श्रीगणेश लेखमाला २०२० - राजमाचीचे दिवस.. ह्या अन्या बुद्धे यांच्या धाग्यावर माझ्या आठवणी प्रतिसाद म्हणून लिहायला घेतल्या होत्या पण लेखापेक्षा प्रतिसाद मोठा होऊ नये म्हणून ह्या आठवणी स्वतंत्र लेखाद्वारेच प्रकाशित केल्या.
प्रतिक्रिया
24 Aug 2020 - 1:18 pm | कंजूस
आवडलं आणि लिहू तेवढं थोडंच असा राजमाची परिसर आहे याबद्दल शंकाच नाही.
म्हातारपणापर्यंत ट्रेकिंग करता येण्याजोग्या ज्या काही जागा आहेत त्यातील एक. शिवाय वर्षभर केव्हाही जाऊ शकतो.
24 Aug 2020 - 1:56 pm | गणेशा
अप्रतिम,
मला राजमाची पावसाळ्यात जास्तच आवडतो.. वारा..ढग..पाणीच पाणी..
तुमच्या दोघांच्या धाग्यात, उन्हाळ्यातील फोटो आहेत.
माझ्याकडे मात्र कित्येक पावसातले फोटो आहेत, त्या मंदिराचे पावसातले रुपडे आणखिनच भारी.
त्या ओढ्यात येथेच्छ भिजलेले फोटो आहेत. जाताना, त्यात डुंबताना, उशिर झालेले कळाले नाही, आणि भर पावसात, किर्र अंधारात, बिना लाईटीचे लोनावळ्याकडे गेलेलो थ्रील वेगळेच.
तरी एक व्हिडीओ सापडला, ( त्यात, मला आणि माझ्या लहानपणीच्या मित्रांना सोडुन द्या)
पण राजमाचीला जाताना दिसणार हा कातळाधर धबधबा पण माझ्या आवडीचा आहे...
ढग आपल्या नेहमीच आवडीचे..
25 Aug 2020 - 7:25 am | प्रचेतस
राजमाचीला सर्वच ऋतूंत जाणे झालेय पण त्यावेळी कॅमेरे नसत त्यामुळे जे काही दृश्य साठवले जायचे ते नेत्रांनीच. :)
बाकी व्हिडिओ एकदम झकास आहे.
24 Aug 2020 - 2:03 pm | प्रशांत
छान लिहलय..!
24 Aug 2020 - 2:04 pm | महासंग्राम
जबरदस्त आठवणी मालक, बाकी
हे कसं ठरवतात याबद्दल माहिती द्याल का
25 Aug 2020 - 7:24 am | प्रचेतस
धन्यवाद.
सातवाहनकालीन टाकी म्हणजे खडकाच्या अंतर्भागात खोलवर खोदत नेलेली टाकी. आतल्या आत ही टाकी एकमेकांशी जोडलेली असतात. काही वेळा मध्ये खांब कोरून ती विभाजित केलेली आढळतात. जवळून ह्या टाक्यांचे मुख लहान दिसते पण आतमध्ये ही खूप विस्तारलेली असतात.
उदा. शिवनेरीचे गंगा यमुना टाके, कोरिगडातील शहापूर वाटेवरील कड्यात असणारे टाके, लोहगडावरील आजमितीस पिण्याच्या पाण्याच्या एकमेव स्रोत असलेले दर्ग्यानजीकचे खडकातले टाके.
अर्थात सातवाहनकालीन टाकी म्हणजे केवळ सातवाहनांनीच खोदलेली असे नव्हे तर त्या काळाच्या दरम्यान खोदली गेलेली टाकी. नंतरही बराच अशा प्रकारे टाकी खोदणे हे चालूच राहिले होते असे मानण्यास हरकत नाही.
शिवकाळात मात्र टाकी खोदण्याची ही कला लोप पावली आणि समतल जमिनीवर खडकात सरळ खड्डा करून त्यात पाणी साठवणे सुरू झाले.
24 Aug 2020 - 2:34 pm | गवि
पर्वतराजीची जबरदस्त थरारक दृष्ये. वर्णनही ओघवत्या शैलीत.
वाह. उत्कृष्ट.
बाकी उरते एक शंका. लेण्याचे संरक्षण करण्यास गड समजू शकतो, पण गडाचे रक्षण करण्यासाठी लेणी? कसे?
25 Aug 2020 - 7:28 am | प्रचेतस
गडाचे संरक्षण करण्यासाठी लेणी असे नसून गडाच्या संरक्षणाखाली लेणी असे लिहिले आहे, म्हणजे गडाच्या अधिपत्याखाली लेणींचे कोरीवकाम झाले.
अर्थात लेणींचे संरक्षण असे ढोबळ अर्थाने न बघता व्यापारी मार्गांचे संरक्षण असे पाहिल्यास बरेच प्रश्न सुटतात. व्यापारी तांड्याबरोबरच भिख्खू प्रवास करत असत. लेणी म्हणजे त्यांची वर्षावासाची राहण्याची सोय.
24 Aug 2020 - 4:10 pm | बेकार तरुण
लेख आवडला
24 Aug 2020 - 5:02 pm | टर्मीनेटर
खुप छान लिहीलंय फोटोही मस्तच!
24 Aug 2020 - 9:11 pm | दुर्गविहारी
केवळ अप्रतिम लिहीले आहे.हे असे काही वाचले की आपण न लिहीलेलेच बरे असे वाटू लागते.
25 Aug 2020 - 9:05 am | ज्ञानोबाचे पैजार
मस्त आठवणी, लेख अतिशय आवडला...
कॉलेज च्या दिवसात आमचा ग्रुप एकदा या रस्त्यावर वाट चूकला होता. त्यावेळी माझ्या सारखे बरेच जण आमच्यातल्या एकावर विसंबून राजमाचीला पावसाळी सहली करता निघाले होते. आमचा लिडर त्या आधी ७ ते ८ वेळा इथे जाउन आलेला होता. अजून एक जण ही दोन तीन वेळा गेलेला होता. त्या मुळे आम्ही बिनधास्त होतो.
पण त्या दिवशी लोणावळ्यात भयाण पाउस पडत होता. इतका की अंगावर सपासप फटकारे बसत होते. ढग खाली उतरले होते त्यामुळे ५-१० फुटापलिकडे फारसे काही दिसत नव्हते. बरेच जण पुढे जायला तयार नव्हते पण त्यांना कसेबसे तयार करत आम्ही पुढे निघालो.
वाटेत कोणी भेटले की रस्ता विचारत होतो. प्रत्येक जण सांगायचा हे काय इकडे थोडेसे पुढे गेले की तुम्ही धरणावर पोचाल. बराच वेळ चालूनही धरण काही लागलेच नाही आणि जवळ जवळ दोन तास आम्ही एकटेच चालत होतो. आम्हाला रस्ता विचारायला सुध्दा कोणी भेटले नाही. मग हळूहळू एकेकाचा धीर खचायला लागला.
चुकत माकत धडपडत थोडे पुढे गेलो तर एके ठिकाणी एक प्रचंड मोठा धबधबा सापडला. मग तिथेच थांबायचे ठरले, पावसाने भिजलो होतोच तरी धबधब्या खाली परत भिजलो. तास दोनतास मस्ती केली. तिथेच थोडासा आडोसा पाहून डबे खाल्ले आणि परत निघालो. वाटेत एक ग्रूप भेटला ते म्हणत होते आमच्या बरोबर चला पण आमच्यातले कोणीच त्यासाठी तयार नव्हते.
जो रस्ता आम्ही चार ते पाच तास चालत होतो तोच रस्ता परत येताना तासाभरात संपला आणि आम्ही लोणावळा स्टेशनला परत आलो.
त्या नंतर बर्याच वेळा राजमाचीला गेलो पण तो धबधबा परत काही सापडला नाही.
पैजारबुवा,
25 Aug 2020 - 5:20 pm | चौथा कोनाडा
थरारक !
आम्ही येताना रस्ता चुकलो होतो, ज्याम फाटली होती !
26 Aug 2020 - 9:59 am | प्रचेतस
भारी अहे तुमचा अनुभव. तुंगार्लीच्या आसपासच कुठेतरी भटकत असाल तुम्ही.
25 Aug 2020 - 2:07 pm | कंजूस
वाट चुकल्याने थरारकपणा वाढतो. पण आपल्याबरोबर कुणी नवीन असल्यास चिडतो. त्याला डोंगरात हरवण्याची गंमत कळत नाही आणि "कुठून दुर्बुद्धी झाली आणि याच्यासरोबर गेलो" असे समजतो. "तुझे हाल झाले तेच माझेही होत आहेत" हे पटत नाही.
साधीसुधी इमारतीच्या गच्चीत फेरी मारुन परत आपल्या फ्ल्याटवर येऊन चहा घेऊ ही आइटीन्रीसुद्धा फेल जाते कारण किल्ली ज्याच्याकडे आहे तो सेक्रैट्री गायब असतो. मग सह्याद्रीतल्या डोंगळवाटांची पावसात काय ग्यारंटी देणार?
25 Aug 2020 - 5:14 pm | चौथा कोनाडा
जबरदस्त !
राजमाची ट्रेकचा एकदाच योग आलाय पण तो अनुभव आयुष्यभर पुरतोय !
असंच रात्रीच्या लोकलं पुण्याहुन निघुन पहाटे किल्ल्यावर पोहोचलो होतो !
हा धागा आणि फोटो पाहून ते क्षण आठवले !
अतिशय सुंदर वर्णन, थरारक अनुभव आणि अप्रतिम फोटो !
प्रचेतस _/\_ जबरदस्त !
25 Aug 2020 - 8:30 pm | चौकटराजा
वेगवेगळ्या ऋतूत १५ वेळा ? बापरे .. मी लहानपणी गोनिदांच्या सहवासात ते दुर्गप्रेमी आहेत या अर्थाने काही सहवासात आलो नाही हे आता माझे दुर्भाग्यच म्हटले पाहिजॆ .मी अगदी २८ चा झालो त्यावेळी त्यांच्याकडे काही वेळा गेलो पण त्यांच्या बरोबर इतक्या लांबवर भटकन्ती झाली नाही. त्यांचे छंद ई वर आमचे बोलणे होई. प्रचेतस ,बुवा, किसन शिंदे ,प्रशांत यांचे बरोबर एक दोन गड पाहिले इतकीच माझी या बाबतीतली कमाई . मात्र भारतातील काही प्रसिद्ध भुईकोट किल्ले मी पाहिले आहेत. आता सध्या पाहात ही आहे.
राजमाचीवर प्रचेतस यांचे बरोबर बुवांना पीळ घालीत सतावत , निसर्ग पाहात . वात्रटपणा करीत जायचे स्वप्न आता अपुरे राहाणारसे दिसते. ( येत्या दिवाळीत ६८ लागेल). असो . लेख अगदी बहारदार व फोटू जबरी ! दोनेक वर्षांपूर्वी भर पवासाळ्यात सह कुटुंब राजमाची पॉईंट खंडाळा येथे गेलो .शाळेतील पावसाळी सहलीच्या आठवणी जाग्या झाल्या . पलीकडे दरीकडे धुक्यात लपलेला राजमाची कुटुंब सदस्यांना दाखवला. या लेखाबद्दल धन्यवाद !
26 Aug 2020 - 10:01 am | प्रचेतस
राजमाची कुठेही अवघड नाहीये काका, अगदी सरळासोट रस्ता आहे, तुम्हाला तर अगदी सहज जाता येईल. फक्त लांब पल्ल्याची चाल आहे, सुमारे १८ किमी. अर्थात किल्ल्यावरच जायला पाहिजे असंही काही नाही, ती घळ उतरुन गेलं दरीच्या कडेला तरी पुष्कळ बघता येतंच.
26 Aug 2020 - 10:27 am | कंजूस
चौराभाऊ जायची इच्छाच महत्त्वाची. पण १८ किमी फार आहेत. भिमाशंकरकडे हौस भागवून घ्या. वाहनं आहेत.
मीही १५ नाही पण १०वेळा नक्कीच गेलोय. हल्ली उन्हाळ्यातच जातो.
बाकी कल्याण कर्जतकडे ट्रेकिंगला जागांची लयलुट आहे.
26 Aug 2020 - 12:04 pm | चौकटराजा
दोनदा जाउन आलो भीमाशन्कर ला ! एकदा भावाबरोबर गेलो असताना भर पावसात धुक्यात वाट चुकलो होतो. ओल्या मातीत अधिक असे चिन्ह काढून चारही दिशा एकेक करून थोडेसे चालून पाहिले व एलिमिनेशन मेथड वापरून बस शोधली. आजही आठवतेय चक्क जमीनीवर वाकून थेट तोंडाने वहाते " आकाशत पतितं तोयं" प्यालो होतो .त्यानन्तर इतके स्वच्छ पाणी बनिहाल खिंडीत प्यालो होतो.
26 Aug 2020 - 9:14 am | सुमो
वर्णन.
फोटू विशेष उल्लेख करण्याजोगे.
उ त्त म.
26 Aug 2020 - 11:33 am | प्रसाद गोडबोले
अप्रतिम लेखन वली सर !
एकदा ऑफिसग्रुप सोबत जाउन आलोय राजमचीला . श्रीवर्धन मनरंजन दोन्हि किल्ले नीत पाहिले ! मजा आली .
मिपा ग्रुप सोबत जायचा योग आला नाही , बघु कधीतरि प्लन करु !
गोधनेश्वर च्या पुढील पठारावर टेन्ट ताकुन रहायला मजा येईल !!
26 Aug 2020 - 4:12 pm | सिरुसेरि
याही आठवणी मस्त आहेत . फोटोही बेस्ट .
1 Sep 2020 - 11:03 am | किसन शिंदे
गोनीदांच्या लेखणीचा प्रभाव दिसतोय लिखाणावर. गेल्या दहा वर्षात बरेच किल्ले फिरलो, पण राजमाचीने कायम हुलकावणी दिलीये. वल्ल्या, कधी जायचे बे राजमाचीला?
1 Sep 2020 - 11:13 am | गणेशा
किसना कसे बरे तुला जवळचे किल्ले हुलकावणी देतात रे..
आणि वल्लीच एकटा मित्र आहे का विचारायला, माझ्याबरोबर पण चल की..
1 Sep 2020 - 12:03 pm | किसन शिंदे
बरं, तुझ्याबरोबर जाऊ. कधी जायचं बोल?