सायकलचा प्रवास

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
25 Aug 2020 - 8:48 pm

१९९७.
पोलिस लाईन मध्ये राहणाऱ्या मित्राकडे किती भारी सायकल आहे याचं वर्णन बऱ्याच वेळा ऐकवून झालं होतं. एम एस ई बी तील दोन, वाड्याकडील आणि पेठेतील एक, अशा सर्वच मित्रांकडे एव्हाना सायकली अधून मधून दिसायला लागल्या होत्या. कधीतरी एखादी चक्करही मिळायची पण स्वतःची सायकल असली तर मनसोक्त हिंडता येईल असं नेहमी वाटायचं. झालं, शेवटी सायकल घेण्याच्या माझ्या हट्टाला घरातून हिरवा कंदील मिळाला आणि मग काय, सायकलच्या चर्चांना उधाण आलं. मित्र, शेजारी अशा सर्वांकडून माहिती गोळा करायला सुरुवात झाली. बी एस ए, हरक्युलस, ऍटलास, एम टी बी अशी नावं आपणच ठेवलीत, अशा थाटात चर्चा रंगू लागल्या. सायकल म्हणजे ऍटलास असं त्या काळातील समीकरण. इतर सायकली उंबराचं फुल दिसावं एवढ्या दुर्मिळ. त्यामुळे त्याविषयी कुतूहल जास्त. तालुक्याचं ठिकाण असूनही दुर्गम भाग आणि कमी लोकसंख्येमुळे नवीन सायकल दुकानात पाहायची जरी म्हटलं तरी पुण्याला जाणं क्रमप्राप्त होतं.

वडील आणि मी असे दोघेही सकाळी लवकर एसटीने पुण्याला जाण्यासाठी निघालो. एसटीच्या कॅबिनमधे बसायची त्याकाळी सहसा हिंमत व्हायची नाही, कारण ड्रायव्हरची प्रचंड भीती वाटायची. ड्रायव्हिंग बरोबर प्रवाशांच्या अंगावर धावून जाण्याचं प्रशिक्षण त्यांना देत असावेत कदाचित. कॅबिनला चिकटून असणाऱ्या सिटवर गुडघ्यांवर बसून, वळणांवर उगीचच हेलकावे घेत, स्टिअरिंग आपल्याकडेच आहे अशा आविर्भावात गाडी चालवण्याच्या अभिनयातील गंमत आणि कुतूहल शब्दांत मांडणं अवघड. प्रवासातील खरी उत्सुकता असायची ती कात्रज बोगद्याची. घाट चढताना दमछाक होऊन कुरकुरणारी गाडी बोगद्यातून मात्र डोंगर कोसळून आपण त्यात गडप होऊ की काय अशा भीतीनेच वेगात चालवीत असावेत असं मला नेहमीच वाटायचं.

असा ओळखीचा पण निसर्गरम्य प्रवास संपवून, पुण्यातील गर्दीतून वाट काढत गाडी स्वारगेट बस स्टँडवर पोहोचली. विचारपूस करून सिटी बस आणि काही अंतर पायी चालून आम्ही फडके हौद परिसरात दाखल झालो. सायकलची एवढी दुकाने एकाच ठिकाणी पाहून पुणेकर व्यापाऱ्यांचं मला भारी कौतुक आणि कुतूहल वाटलं. मोठ्या उत्साहात आम्ही बरीच दुकानं पालथी घातली. बऱ्याच पर्यायांचा विचार करून वडिलांनी आजपर्यंत ऐकिवात नसलेल्या हिरो ब्रँडची, ऍटलास पेक्षा दिसायला सरस आणि वजनाला जड सायकल ऐनवेळी निवडली. तिचं कॅरेज, स्टँड आणि रेडियम डिझाईन तर अगदी नावीन्यपूर्ण होतं. सायकल खरेदी झाल्यावर आम्ही दोघे सायकलवर कसबा पेठ, शिवाजी रस्ता, दगडू हलवाई गणपती मार्गे स्वारगेट बस स्टँड वर परतलो. मी आजपर्यंतचा पुण्यातून केलेला एकमेव सायकलप्रवास.

बराच वेळ वाट पाहिल्यानंतर एस टी फलाटावर आली. कंडक्टर आणि काही सहप्रवाशांच्या मदतीने सायकल टपावर ठेवली गेली. सायकल एस टी तून नेणार कशी या माझ्या मनातील उत्सुकतेची जागा आता एवढ्या लांबच्या प्रवासात सायकल टपावरून पडून तर जाणार नाही ना या भीतीने घेतली. सकाळच्या प्रवासातील हेलकावे खाणारी अभिनयाची गाडी आता सावकाश पण मोठ्या उत्सुकतेने धावू लागली.

संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पंचायत समितीसमोरील स्टॉपवर एस टी थांबली. आम्ही आणि इतर काही सहप्रवासी उतरलो. एव्हाना टपावरून कंडक्टर ओरडला, सायकल कुणाची आहे, घाई करा, उतरवून घ्या लवकर.
थेट पुण्याहून एवढा लांबचा प्रवास करून सायकल घरी अंगणात दाखल झाली खरी पण एसटीच्या टपावर असलेल्या सुकटाचा असह्य करणारा वास घेऊन. वाळलेल्या माशांच्या व्यापाऱ्याला पुण्यातून खरेदी करायला नेमका तोच मुहूर्त आणि गावी यायला नेमकी तीच गाडी सापडली होती. एव्हाना शाकाहारी नसणारे पदार्थ आजूबाजूला आहेत असं कळताच नाकच काय पण डोळेही बंद करणारे आम्ही आता मोठ्या धर्मसंकटात सापडलो. पाण्याने, साबणाने धुवून पुसून काढलं तरी नाक काही तयार होईना सायकल स्वीकारण्यास. शेवटी रॉकेलचा वापर करून नाकाची समजूत काढण्यात जेमतेम यश आलं. सायकलची साग्र संगीत पूजा झाली. आणि मग मी पहिल्यांदा माझी सायकल चालवली.

त्यानंतर मित्रांसोबत दररोज आम्ही साधारण पाच किमी फिरायला जाऊ लागलो. सकाळी लवकर उठून दोन किमी लांब असणाऱ्या डेअरीतून दररोज दूध आणायची जबाबदारी मी मोठ्या उत्साहाने माझ्याकडे घेतली. अगदी पावसाळ्यातही जवळच्या रस्त्याने पायी जाण्याऐवजी मी एक दोन किमीचा वळसा घालून किराणा, भाजी आणणे अशी कामे आनंदाने करून लागलो. मित्रांसोबत जवळपासच्या गावातील मित्रांना भेटण्याच्या निमित्ताने केलेली यथेच्छ भटकंती, प्रवासातील गमती जमती, इतकचं काय, दहावीचा शेवटचा पेपर संपल्यानंतर दहा किमी दूर असणाऱ्या परीक्षा केंद्राला मित्रांसोबत भेट दिल्याचे अजूनही आठवतं.

सुरुवातीला सायकलच्या देखभालीसाठी असणारं लक्ष वरच्या वर्गात गेल्यानंतर हळू हळू कमी झालं. कॉलेज, नोकरी, अशा धावण्याच्या शर्यतीत सायकलचा वेग मात्र कमी पडला. आणि मी भटकत असताना सायकल मात्र स्थिरावली ती आमच्या मूळ गावी.

कधी कधी भेट होते सायकलची.
"दिनांक १ नोव्हेंबर १९९७", त्या सोबत माझं नावं, सायकलच्या हॅण्डल वर गोंदलेलं...नकळत त्यावर हात फिरतो, धूळ बाजूला सारण्याकरिता. आणि सायकल सोबतचा मागील २३ वर्षांतील प्रवास, अनेक चढ उतार डोळ्यांसमोरून तरळून जातात. घरातून हाक येते आणि मी उत्तर देतो, "आलोच एक चक्कर मारून, सायकलसोबत..."

--------------------------------------
दिनांक: २५ ऑगस्ट २०२०
लेखक: गणेश ईश्वरदास पांडे

कथालेख

प्रतिक्रिया

Bhakti's picture

25 Aug 2020 - 10:38 pm | Bhakti

छानच!

सतिश गावडे's picture

25 Aug 2020 - 10:44 pm | सतिश गावडे

छान लिहीलं आहेस गणेशा. पण फोटो दिसत नाहीत.

अप्रतिम आठवणी..
लिहीत रहा..

श्रीगणेशा's picture

26 Aug 2020 - 1:52 am | श्रीगणेशा

धन्यवाद सर्वांचे!
एखादे दोन फोटो असतील संग्रहात. पण लगेच सापडणं अवघड आहे.
परत कधीतरी.

खूप छान आठवणी लिहिल्या आहेत.
पण पहिलीच सायकल आणि सुकटाचा वास हे फारच वाइट वाटलं. पूर्वी 'जड सायकल चांगली सायकल' असं वर्गमित्र म्हणायचा. काही जण तर त्यास सायकल रिक्षाचे टायर बदलून घेत. वेगापेक्षा वजन नेता येणे अधिक महत्त्वाचे समजायचे. शिवाय खडीचे रस्ते असत शहराबाहेर.

कुमार१'s picture

26 Aug 2020 - 8:59 am | कुमार१

छान लिहीलं आहे

सुमो's picture

26 Aug 2020 - 9:03 am | सुमो

लिहिलंय.

पु.ले.शु.