गंमत म्हणून हा धागा. शाळेत गाळलेल्या जागा भरायचो तसंच. खाली अर्धवट लिहिलेली ओळ आहे - ती अनुष्टुप छंदामध्ये पूर्ण करता येते का बघा. दिलेल्या उदाहरणात माफक बदल केलात तरी चालेल. शब्द आकलनीय राहीपर्यंत लघु गुरु मध्ये स्वातंत्र्य आहे. बाष्कळपणाचे स्वागत.
.
आकृतिबंध पहिल्यांदा संदर्भासाठी देतोय. अधिक माहितीसाठी हा धागा पहा www.misalpav.com/node/47283
.
पुढची पातळी - काव्यशक्तीला ताण द्यायचा असेल तर एखाद्या गुरु अक्षराऐवजी दोन लघु अक्षरं वापरून बघा.
.
(आकृतिबंध - XXXX लगागागा XXXX लगालगा)
1) पावसाने _ _ _ _ _ _ _ _ _ साठले ('पाणचट' उदाहरण - पावसाने हद्द केली, तळे हे काय साठले!)
२) चहाच्या _ _ _ _ _ _ _ _ _ काय ही!
३) रस्त्यावरी _ _ _ _ _ _ _ _ _ _ नसे
४) महारोगांवरी _ _ _ _ _ _ _ _ कुठे?
५) घरी _ _ _ _ _ _ झालो मी _ _ _ _ _
६) जिथे जावे तिथे _ _ _ _ _ _ _ __ _
७) स्वतःची उदाहरणं तयार करा आणि इतरांना पूर्ण करण्यासाठी द्या!
.
लिहून झालं की भीमरूपीच्या चालीत गाता येतंय ना हे नक्की पडताळून बघा.
प्रतिक्रिया
10 Aug 2020 - 4:34 pm | दुर्गविहारी
यातील फार काही कळत नाही. एक व्हॉटस ऍप फॉरवर्ड आहे. पेस्ट करतो.
कविता करण्याचे शास्त्र म्हणजे छंदोरचना म्हणजे पद्यरचना. छंदोरचनेच्या मुळाशी भाषेतील ध्वनींची विशिष्ट रचना त्याचप्रमाणे विशिष्ट लयबद्धताही असते. छंदोरचना गायला अतिशय सोपी असते. वेदांमध्ये छंदोबद्ध मंत्र आहेत. पिंगलनाग ऋषींचे छंदःसूत्र, शौनक ऋषींचे ऋक्प्रातिशाख्य, कात्यायन ऋषींचे सर्वानुक्रमणी, शांखायन ऋषींचे
श्रौतसूत्र हे ग्रंथ छंदोविषयक माहिती देतात. बहुतेकवेळा ऋषी स्त्रोत्र संपवताना हे कोणत्या छंदात लिहिले आहे याचा उल्लेखही करतात. जसे की अनुष्टुभ्. ॐ हा एकाक्षरी दैवी गायत्री छंद आहे.
अक्षरगणवृत्तात लघू म्हणजे र्हस्व उच्चार होणारी अक्षरे आणि गुरू म्हणजे दीर्घ उच्चार होणारी अक्षरे. यांचा क्रम रचनेतल्या प्रत्येक ओळीत पाळण्याचा नियम आहे. यामध्ये ४ ओळींची गण रचना सारखी असते, २ ओळींची सारखी असते अथवा सर्वच ओळींची वेगळी असू शकते.
*अक्षरगण वृत्तांची लक्षणगीते आणि उदाहरणे*
*भुजंगप्रयात*
लक्षणगीतः
क्रमानेच येती य चारी जयात, म्हणावे तयाला भुजंगप्रयात ।
पदी अक्षरे ज्याचिया येत बारा, रमानायका दुःख माझे निवारा ॥
यमाचा यमाचा यमाचा यमाचा , यमाचा यमाचा यमाचा यमाचा ।
उदाहरणः
रामदास स्वामींनी रचलेले मनाचे श्लोक ह्याच वृत्तात लिहिले आहेत.
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच सोशित जावे ।
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांस रे नीववावे ॥
विचारून बोले विवंचून चाले, तयाचेनि संतप्त तेही निवाले ।
बरे शोधल्यावीण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥
*इंद्रवज्रा*
ती इंद्रवज्रा म्हणिजे कवीने
ता ता ज गा गा गण येति जीने
त्या अक्षरे येति पदात अक्रा
'तारी हरी जो धरि शंखचक्रा
*उपेंद्रवज्रा*
उपेंद्रवज्रा म्हणतात तीला'
ज ता ज गा गा गण येती जीला
रावणविरचित शिवतांडवस्तोत्र हे काव्य *पञ्चचामर* वृत्तात बांधलेले आहे.
जटा कटाहसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी । विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि ॥ धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके । किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम ॥
*पृथ्वी*
१. सदैव धरिते जसाजसयलाग पृथ्वी पदी
२. आहे वृत्त विशाल म्हणती सू़ज्ञ पृथ्वी तया |
आधी जसज त्या पुढे सयलगा ही येती तया ||
* मंदाक्रांता*
उदा० १
१. मंदाक्रांता म्हणति तिजला, वृत्त हे मंद चाले |
ज्याच्या पादीं म भ न त त हे, आणि गा दोन आले ||
२. मंदाक्रान्ता मभनततगा गागणी मंद चाले ||
मंदाक्रांता उदा० ३
मेघांनी हे गगन भरतां गाढ आषाढमासी
होई पर्युत्सुक विकल तो कांत एकांतवासी
तन्निःश्वास श्रवुनि रिझवी कोण त्याच्या जिवासी?
मंदाक्रांता सरस (की ललित?) कविता कालिदासी विलासी....माधव ज्युलियन
*मंदारमाला*
मंदारमाला कवी बोलती हीस कोणी हिला अश्वघाटी असे
साता तकारी जिथे हा घडे पाद तेथे गुरू एक अंती वसे.
*मालिनी*
न न म य य गणांनी मालिनी वृत्त होते.
उदा० अनुदिनि अनुतापे,तापलो रामराया
परमदिनदयाळा नीरसी मोह माया |
*वसंततिलका*
१. जाणा वसंततिलका व्हय तेचि वृत्त
येती जिथे त भ ज जा ग ग हे सुवृत्त
२. येता वसंततिलकी तभजाजगागी
3. ताराप भास्कर जना सजनास गा गा । ताराप भास्कर जनास जनास गा गा ॥
* शार्दूलविक्रीडित*
मंगलाष्टके म्हणताना ची चाल वापर्रोन हे म्हणा.
१. आहे वृत्त विशाल त्यास म्हणती शार्दूलविक्रीडित
मा सा जा स त ता ग येति गण हे पादास की जोडित.
२. मासाजा सतताग येति गण ते शार्दूलविक्रीडिती
३. मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा
म्हातारी उडता न येचि तिजला माता मदीया अशी।
कांता काय वदो नवप्रसव ते साता दिसांची तशी॥
मंगलाष्टके शार्दूलविक्रीडित वृत्तात असतात.
*शिखरिणी*
१. तया वृत्ता देती विबुधजन संज्ञा शिखरिणी
जयामध्ये येती य म न स भ ला गा गण गणी.
२. जयामध्ये येती य म न स भ ला गा शिखरिणी|
३.यमानासाभाला ग गण पदि येता शिखरिणी ।
४. यमाचा मानावा नमन समरा भास्कर ल गा । यमाचा मानावा नमन समरा भास्कर ल गा ॥
आशा आहे डोक्याला जरा व्यायाम मिळेल आणि येथून पुढे काव्याचा आनंदा चांगला घेता येईल.
12 Aug 2020 - 8:42 pm | Gk
शिव तांडव पंच चामर मध्ये आहे की कलिंद नंदिनी ?
ह्याच वृत्तात हेही बसतात
अजीब दासता है ये कहा शुरू कहा खतम
पुकारता चला हूं मै गली गली बहार की
बहुतेक , कलिंद नंदिनी हे मात्रा वृत्त असावे , कुठेकुठे 2 लघु बरोबर 1 गुरू येते
12 Aug 2020 - 8:42 pm | Gk
शिव तांडव पंच चामर मध्ये आहे की कलिंद नंदिनी ?
ह्याच वृत्तात हेही बसतात
अजीब दासता है ये कहा शुरू कहा खतम
पुकारता चला हूं मै गली गली बहार की
बहुतेक , कलिंद नंदिनी हे मात्रा वृत्त असावे , कुठेकुठे 2 लघु बरोबर 1 गुरू येते
11 Aug 2020 - 10:13 am | निनाद
फार पुर्वी येथे अजून एक चर्चा झाली होती.
https://www.misalpav.com/node/4555
12 Aug 2020 - 10:35 am | धष्टपुष्ट
दुसरी ओळ पूर्ण करण्यासाठी अनंत वाटा आहेत हे उघडच. मुद्दामच बाष्कळ उदाहरण देतोय. एकदा हा छंद डोक्यात बसला की आपण छांदिष्ट बनतो!
2) चहाच्या या कपामध्ये साठली साय काय ही
किंवा
चहाच्या किटलीमध्ये पडली पाल काय ही
किंवा
चहाच्या वखताला हो वाजली काय बेल ही
किंवा थोडा बदल करून
चहाचिया कपाभौती मुंग्यांची रांग काय ही
.
आता बाकीच्या उदाहरणांना हात घाला बरं.
12 Aug 2020 - 7:09 am | निनाद
आकृतिबंध - XXXX लगागागा XXXX लगालगा वापरून प्रयत्न करतोय पण जमेना.
अजून कुणी प्रयत्न केला का?
12 Aug 2020 - 10:17 am | Gk
https://www.maayboli.com/node/21889
12 Aug 2020 - 10:43 am | धष्टपुष्ट
दुसरी ओळ पूर्ण करण्यासाठी अनंत वाटा आहेत हे उघडच. मुद्दामच बाष्कळ उदाहरण देतोय. एकदा हा छंद डोक्यात बसला की आपण छांदिष्ट बनतो!
2) चहाच्या या कपामध्ये साठली साय काय ही
किंवा
चहाच्या किटलीमध्ये पडली पाल काय ही
किंवा
चहाच्या वखताला हो वाजली काय बेल ही
किंवा थोडा बदल करून
चहाचिया कपाभौती मुंग्यांची रांग काय ही
.
आता बाकीच्या उदाहरणांना हात घाला बरं.
12 Aug 2020 - 11:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आम्हाला असे वृत्तात राहणे कधीच झेपले नाही. आम्ही आपले मुक्तवाले.
बाकी,लेखन माहितीपूर्ण आहे, आभारी आहे. लिहिते राहा. समजून घेतोय.
-दिलीप बिरुटे
12 Aug 2020 - 11:11 am | ज्ञानोबाचे पैजार
प्रणील पर्जन्याचे प्रावरण
पावसाने पावसाला, पावसातच गाठले
धगधगीत धरणीला, हायसे मग वाटले
सरसरुनी सर आली, चिंब सारे भिजले
झडझडून झड झाली, रान हे झिम्माडले
चातकाने चोच भरुनी, जिवनामृत चाखिले
कोवळासा कोंब करीतो, नयन अपूले किलकिले,
भुमीवरती भुछत्राने, छत्र कैसे उघडीले
प्रदोशकाली पश्चिमेला, इंद्रधनुकले प्रगटले
टपटपीत टाकळा अन, अघाडा दुर्वा फुले
पायवाटेच्या कडेने, पाय चूंबू लागले
जिवतीचा जीव हरखे, पाहूनी हे सोहळे
जीवनाने जीवनाला, शुभाशीष ऐसे दिले
पैजारबुवा,
प्रावरण
12 Aug 2020 - 11:16 am | रातराणी
अय्यो!! माऊली साष्टांग दंडवत आपल्याला _/\_
आमच्या प्रतिभेने चहाच्या कपातच मान टाकली :)
12 Aug 2020 - 2:40 pm | संजय क्षीरसागर
छंद आणि कल्पनेचा मस्त मेळ जमवलायं !
12 Aug 2020 - 4:20 pm | प्रचेतस
एकच नंबर माऊली,
धन्य आहात.
12 Aug 2020 - 4:41 pm | अनन्त्_यात्री
तुम्ही हे काव्य नेटके?
__/\__
12 Aug 2020 - 8:20 pm | धष्टपुष्ट
12 Aug 2020 - 8:14 pm | धष्टपुष्ट
सुरेख. चार पाच गोष्टी आवडल्या:
१) प्रास (alliteration) आणि नादानुकरण (onomatopoeia) उत्तम जमले आहेत
.
२) अनुष्टुभ छंदात सहसा यमक नसतं, आपण अन्त्ययमक साधून अजून गेयता आणली आहे
. ३) मधून मधून एक गुरु अक्षर = दोन लघु अक्षरे योजून त्याला मात्रा वृत्तासारखा पोत आला आहे. उदा - नयन अपुले (गालगागा), धगधगीत (गालगाल).
.
४)
XXXX च्या ठिकाणी लघुगुरू च्या बर्याच वेगवेगळ्या योजना तुम्ही केल्या आहेत. त्यामुळे मंत्रघोषासारखा बंदिस्तपणा वाटत नाही.
५)भीमरूपी मध्ये समर्थांनी सुद्धा काही ठिकाणी छंदाचे बंधन सोडून तो लीलया वळवला आहे, आणि तरी गेयता तशीच राखली आहे. आपल्याही एक दोन ओळीत अशा आहेत (पाय चुंबू लागले - गालगागा गालगा आहे. गालगागा लगालगा नाही. माझ्या कानाला पहिल्यांदा फरक देखील समजला नाही)
.
.
पुढे कधी इंग्रजी काव्यशास्त्रावर लिहायचा माझा विचार आहे. शेक्सपियरच्या आवडत्या iambic pentameter मध्ये पण ठिकठिकाणी trochee, spondee अशी बंधेतर रूपं तो मिसळतो. यामुळे कवितेत छंदबद्ध परीटघडीऐवजी विस्मयमूल्य (surprise element) येतं.
खरंतर तोचतोचपणा अक्षरगणवृत्तामध्ये येऊ शकतो, पण अनुष्टुभ छंदाच्या आकृतिबंधात XXXX या ठिकाणी वेगवेगळी रूपं वापरायची मुबलक मुभा आहे. म्हणूनच मला हा खूप लवचिक वाटतो.
.
.
माझी टीप
आपला प्रयत्न बहुतकरून छंदबद्ध आहे. मनापासून अभिनंदन! मोजक्या ठिकाणी बदल करावा लागला. शेवटच्या कडव्यांमध्ये आपल्या शब्दांना धक्का न लावता सोयीस्कर पुनर्रचना करता आली नाही म्हणून "टाकळा टप् टपीत-ऐसा" असं थोडंसं बेडौल राहिलं आहे. क्षमस्व.
.
दाक्षिणात्य भाषांमध्ये द्वितीय अक्षर प्रास असा बराच लोभस प्रकार आहे. प्रायोगिक तत्त्वावर मी "तिजने भिजविले" अशी पुनर्रचना करून करमणूक म्हणून घुसवला आहे.
अर्थात न आवडलेली माझी मतं खिडकी सताड उघडून जोरात भिरकावून द्या.
.
.
.
पावसाने पावसाला, पावसातच गाठले
धगधगीत धरणीलाही, हायसे मग वाटले
सर येता सर्सरूनी, चिंब तिजने भिजविले
झड झाली झडझडूनी, रान हे झिम्माडले
चातकाने चोच भरुनी, जीवनामृत चाखिले
कोवळासा कोंब करितो, नयन अपुले किल्किले,
भूछत्राने भुईवरती, छत्र कैसे उघडिले
प्रदोषासी पश्चिमेला, इंद्रधनु हे प्रगटले
टाकळा टप् टपीत-ऐसा, अघाडा दुर्वा फुले
पायवाटेच्या कडेने, पाय चुंबू लागले
जिवतीचा जीव हरखे, पाहुनी हे सोहळे
जीवनाने जीवनाला, शुभाशीष असे दिले
12 Aug 2020 - 7:58 pm | Gk
लोकशाही साठ वर्षे नांदली होती जिथे
चिखल सगळा माजला हा भाजपा येता इथे
नोटबंदी जीडिपीला कडकडा डसली कशी
नोकरी टाकून जनता भजी तळती दशो दिशी
लक्ष ते पंध्रा कोठे उडुनी चालले पहा
विजय मल्ल्या शहा मोदी देतसे धन्यवाद हा
नको शाळा नको औषध नको ते पूल रेलवे
रंग बदला , नाव बदला चालले व्यर्थ सोहळे
कधी माता, कधी बंधू छायाचित्रे प्रकाशती
पण पुजेच्या समारंभी सुपारी का लागती ?
देशांतर कधी करतो , कधी वेशांतरी उभा
आलेख पोचला खाली तरी घेई सभा सभा
12 Aug 2020 - 8:04 pm | Gk
शीर्षक
12 Aug 2020 - 8:19 pm | धष्टपुष्ट
भारी.