कोरोना- एक इष्टापत्ती ?

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
25 Jun 2020 - 12:10 pm
गाभा: 

काही दिवसांपुर्वी व्हॉसॅप्पवर एका मित्राचा स्टेटस दिसला :

Coronavirus epidemic didn't break the system, it exposed already broken system.

प्रथमदर्शनी , "ह्यॅ , कैच्याकै" असे म्हणुन हसण्यावारी नेला तो संदेश. पण शांतपणे विचार केल्यावर थोडं थोडं पटायला लागलं आहे. कित्येक निरर्थक आणि अनाकलनीय गोष्टी आपल्या आजुबाजुला चालु होत्या आणि आपण त्या "नॉर्मल" म्हणुन स्विकारल्या होता. करोनामुळे अशा कित्येक गोष्टींवर गडांतर आले आहे आणि खरेच ह्या गोष्टी इतक्या आवष्यक होत्या का असे वाटायला लागले आहे.
उदाहरणार्थ :

१.ट्रेकिंग बिझनेस ( पर्यटन आणि काजवा मोहोत्सव वगैरे)

विचार करायला लागलो तेव्हा सगळ्यात पहिला विचार आला तो हा. ट्रेकिंग बिजनेस. ट्रेकिंग ग्रुप्स चे अक्षरशः पेव फुटलेले पुण्या मुंबैत. थोडीथोडकी नाही तब्बल शे दोनशे टाळकी जमवुन गडकिल्ल्यांवर गर्दी जमवणारे हे लोकं. त्यांना ना इतिहासाची आत्मियता आहे ना सह्याद्रीचे प्रेम आहे. फोटो काढुन लोकांना दाखवणे आणि शनिवार रविवार उन्माद करणे हाच काय तो गहुतांश जणांचा उद्देश ! ( आणि ट्रेक ग्रुप्स त्यातुन अव्वाच्या सव्वा पैसा छापायचे ति बात तर अलहिदाच)
गडकिल्ल्यांचे आणि पर्यावरणाचे नुकसान न झाल्यास च आश्चर्य ! (मिपावरील बरेच लोकं ट्रेकिंग करत नसावेत, पण त्यांना आमचा उद्वेग समजावा म्हणुन ही लिन्क देत आहे हरिहर गडावरील गर्दीची , जरुर पहा : http://thewandereryogi.com/worst-harihar-trek-experience/)
ह्या कोरोना मुळे हे सगळे थांबेल किमान काही दिवस तरी प्रमाण कमी होईल अशी आशा आहे.

२. फुटेपर्यंत फुगलेली आणि आजुबाजुची गावं खात चाललेल्ली शहरं, लोकल ट्रान्स्पोर्ट
नुसती लोकं वाढत चाललीत , बघावं तिकडे गर्दी, लोकल मध्ये ३ च्ता सीट्वर ४ जण बसलेत मधलया गॅप मध्ये ४ जण उभे आहेत , दरवाज्यात २० लोकं उभी आहेत , स्टेशन आला कि आरडा ओरडा नुसता राडा. बोलाल तितकं कमी. खालील विदीओ मध्ये दाखवलं आहे ही १००% वस्तुस्थिति आहे ,

स्वतः दिल्ली मुंबई बंगलोर चेन्नई मध्ये स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे, सर्वत्र हीच कथा आहे. ( कलकत्ता मध्ये ह्याचाहुन वाईट आहे असे ऐकुन आहे.) आणि हिंजवडी झाल्यापासुन हे असलं पुण्यात अन पिंपरीचिंचवड मध्येही सुरु झालंय . :(
बरं , शहरं तर शहरं पण आता शेजारचीही गावे खात सुटली आहे ही गर्दी. भिकार आणि भकास अन प्लॅन्ड आणि कॅन्सरर्च्या गाठी सारखे वाढलेले सब अर्बन भाग पाहिले की अक्षरशः किळस येते. पिंचिं मध्ये तर एके काळी ५०% पेक्षा जास्त बांधकामे अनधिकृत होती म्हणे. मुंबईचा ठाण्याचा तर विचारच करायला नको.
आधी बोरिवली ते ठाणे हा प्रवास पवई मार्गे एकदम जंगल प्रवास होता आता तर घोडबंदर मार्गे गेलो तरी देखील सिमेंटच्यी जंगले सोडुन दुसरे काही दिसत नाही .

३. किडामुंगी सारखं आयुष्य जगणारी गर्दी

बरं ह्या शहरांमध्ये येणारी लोकंही व्यवस्थित जगत असती , एक स्टँडर्ड मेन्टेन करत असती तर चांगले होते पण तेही नाही. अ‍ॅबन पॉप्युलेशन प्लॅनिंग चे कडक नियम का नसावेत ह्याला एकमेव कारण म्हणजे लोकशाही. कोठेही या , कोठेही पथारी पसरा, आमच्या वॉर्डात आलात तर आम्ही रेशन्कार्ड अन आधार काढुन देतो म्हणजे आम्हाला मते फिक्स ! लोकल इन्फ्रास्ट्रक्चर वर लोड पडतोय त्याची कोणाला काय पडलीये ? दिसली मोकळी जागा की टाका झोपडी, चार अजुन झाल्या की लावा बोर्ड झोपडपट्टी बचाव समीती अन लावा लोकल खासदार / आमदाराचे नाव , मग कोण कुठला जिल्हाधीकारी अन कोण पोलीस आयुक्त ! आणि त्यातुन पुढे जाऊन विषिष्ठ रंगाचा झेडा लावला कि कामच तमाम . बोलायचा विषयच येत नाही !
बरं आपण काय दर्जाचं आयुष्य जगतोय ह्याचा विचारच नाही , काढा पोरं अन वाढवा मतदार !

४.जिम , सलून आणि मेकप बिझनेस

ह्या जीम बिझनेस चं पेव अचानक कधी फुटलं कळलं ही नाही. खरंतर शरीराला व्यायाम आवश्यक च . पण दर गल्लीत जीम , मग शाळा कोलेज सोडुन तितं चकाट्या पिटत बसणार्‍यांचे अड्डे , अन व्यायाम सोडुन गाड्या फिरवणे अन पार्ट्या करणे ह्यासठी ग्रुप जमला की पैसा वसुल. शिवाय त्या जीम च्या निमित्ताने फूड सप्लीमेन्ट्स चाही एक साईड बिजनेस जोरात वाढला. ह्या प्रोटीन पावडर्स चे कोणीतरी क्वालिटी टेस्टिंग किंव्वा क्लिनिकल ट्रायल्स केले आहेत का ? सरकार हे विकायची परवानगी कशी देते हे मला तरी अनाकलनीय आहे.
सलुन विषयी जास्त हरकत नाही पण दाढी कटिंग ला ५०० अन् १००० रुपये ??? आर यु किडिंग मी ? काय गरज काये सलुन मध्ये एसीची ? नुसते कैच्याकै दिखाऊ पणा करुन कस्टमर्स ना गंडवा. ह्याही विषयावर बोलायचं नाही - परत विषिष्ठ समाज अन त्यांचे नेते दुखावले जातात. जाल तिथे नुसतं राजकारण !
जी कथा जीम आणि सलुन ची तीच मेकप अन ब्युटीपर्लर बिझनएसची.
समजा एखाद्या ठिकाणी ४ ५ टाळकी जमुन बँन्क लुटायची प्लॅनिंग करत असतील तर त्यांच्यावर पोलिस कारवाई करतील की बॅन्क लुटली जाण्याची वाट पहातील? =))))
एका मुलीला साखरपुड्याला पसंत केले अन नंतर लग्नाच्यावेळेला तिने मेकप आर्टिस्ट बदलला, नवरा भर लग्नमांडपात " ही ती मुलगी नाहीच, ही दुसरीच कोणतरी आहे " असे म्हणुन निघुन गेलेला अशी स्टोरी ऐकली आहे. =)))) अतिषयोक्ती असेल कदाचित पण थोडेसें तरी तथ्य आहे त्यात. Women put on make-up and men lie. Just to look better than what they actually are. Both are philosophically similar things!

५.लग्न बिजनेस
लग्न हा एक अवाढव्य बिझनेस झालाय . केवळ लग्नच नव्हे तर सगळेच समारंभ बिझनेस झालेत. इतकी मांणसे आली कुठुन असा प्रश्न अजुनही पडतो कधी कधी.
असेच घरातील एका कार्यक्रमाविषयी बोलत होतो- ठणकाऊन सांगितलं की " मला अगदी जवळची मोजकी १० -२० लोकं हवी आहेत, गर्दी अजिबात चालणार नाही,"
तेव्हा उत्तर मिळाले की
"माहेरकडचा आणि सासरकडचा असे दोन व्हॉट्सप्प ग्रुप पकडुनच ५० च्या वर जातोय आकडा" .
मी खुर्ची वरुन खाली पडायचा बाकी होतो फक्त.
( त्यातही मग "माहेरकडच्या व्हॉट्सप्प ग्रुपला निमंत्रण नको द्यायला" असे बोलायची खुमखुमी आलेली पण सध्या बाहेर रेस्टॉरंट्स बंद आहेत म्हणुन बोललो नाही. =)))) )

बघावं तिकडं गर्दी आणि खर्च.

६. अध्यात्माचा उन्माद करणारी धर्मिक स्थळं आणि सण समारंभ

आजकाल मंदिरात इतकी गर्दी असते की बोलायला नको. अचानक इतकी आस्तिकता अन श्रध्दा कशी काय वाढीस लागली बुवा ? देव सुध्दा विचारात पडला असेल. आणि त्यावर कहर म्हणजे अंधश्रध्दा निर्मुलन अन तस्तम निश्रध्द, श्रध्दाभंजक समित्या नास्तिक लोकांना मंदिरात प्रवेश ह्यावा म्हणुन अजुन आंदोलने करत आहेत =))))
अहो इथे आधीच देवभोळ्यांची गर्द्दी झाल्याने मंदिराच्या गाभार्‍यातील आर्द्रता वाढुन मंदिराची अन मुर्तीची झीज व्हायला लागलीये अन त्यात तुम्ही अजुन भर घाला .

आला गणेशोत्स्तव काढा पावती पुस्तकं , पाडा रस्त्यात खड्डे अन उभारा मांडव, करा उभ्या डॉल्बीच्या भिंती. आणि हो ह्यातही राजकारण मिसळायला विसरु नका, काय तर म्हणे सार्वजनिक गणेशोत्सव देखील भटमान्य टिळकाने सुरु केला नाही. आपल्याला कसं मतं मिळ्याल्याशी मतलब. =))))

आता ह्या करोनाच्या निमित्ताने हे सारं थांबण्याची , किमान ह्यावर्षी तरी थांबण्याची चिन्हे आहेत, कायम स्वरुपी थांबेल असे काहीसे व्हायला हवे.
पुर्वी वारीला ५ ५० माणसे जायची ते ठीक होते आता ५ लाखाच्यावर गर्दी असते म्हणे , मागे मिपावरच कोणीतरी लेख काढलेला की वारी बंद करावी काय , तेव्हा पटले नव्हते ( आजही पटत नाहीच) पण ह्यावर्शी कशी शिस्तित मोजक्या गर्दीत वारी आहे तशी दर वर्षी व्हायला लागले एतर कित्ती सहज सोप्पे होईल सगळं .
अध्यात्माच ही तेच झालंय जे इतर क्षेत्रांचे झाले आहे , गर्दी वाढली सत्व डायल्युट झालं अन खिसेभरु गल्लाभरु गर्दीने त्याचा बिझनेस केला. काही काही जण तर कबुलही करतात की हो, आम्ही डोंबार्‍याचा खेळ मांडल्यासारखा अध्यात्माचा खेळ मांडतो, आमचा धंधा आहे हा =))))

उदाहरणे म्हणली तर कित्येक काढता येतील . पण मुळात थीम इतकीच खरेच ह्यातील कित्येक गोष्टी खरेच जीवनावश्यक आहेत आणि कित्येक केवळ चैन आहेत? खरेच ह्या आणि असल्या अनेक गोष्टी आयुष्यात नसल्या तर असा किती फरक पडेल? ह्या करोनाच्या निमित्ताने ही गर्दी आणि गर्दीवर अवलंबुन असलेली सरवच अर्थव्यवस्था कोसळावी अन सगळं परत बॅक टू बेसिक्स जावं असा विचार मनात येतो.
मांणसांची गर्दी कमी झाली तर आणि तरच जंगलांवर चाललेली अतिक्रमणे थांबतील, पर्यावरणाचा र्‍हास कमी होईल , वन्यजीवसंपदेचे झालेले नुकसान भरुन काढता येईल असे वाटते.

आणि हे सर्व जाणीव करवुन दिल्यामुळे करोना व्हायरसला इष्टापत्तीच - ब्लेसिंग इन डिसगाईज म्हणावे असे वाटायला लागले आहे.

तुम्हाला काय वाटते?

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

25 Jun 2020 - 1:08 pm | आनन्दा

सवडीने लिहितो.. बर्‍याच गोष्टी पटल्या आहेत यात शंका नाही.

कुमार१'s picture

25 Jun 2020 - 4:21 pm | कुमार१

हे सर्व जाणीव करवुन दिल्यामुळे करोना व्हायरसला इष्टापत्तीच -

>>>
काही प्रमाणात होयच.
मुद्दे छान !

शाम भागवत's picture

25 Jun 2020 - 7:44 pm | शाम भागवत

हो. पटतंय. प्रश्नच नाही.
सगळ्याच सारांश एकच. गरजा कमी करा. जितक्या गरजा कमी तितका माणूस सुखी. फक्त इथेही अतिरेक नको म्हणजे झालं.
मस्त लिहिलंय.
_/\_

चौकटराजा's picture

25 Jun 2020 - 9:10 pm | चौकटराजा

बेसिक्स हा शब्द महत्वाचा .....
आरोग्य, सार्वजनिक वहातुक व्यवस्था ,सम्पतीचे बर्यापैकी वाटप्,आटोपशीर निवास व्यवस्था ,आरोग्यपूर्ण खानपानाची व्यवस्था ,सर्वजनिक क्षेत्रावरील सर्व प्रकारचे आक्रमणाचे निर्दालन, फुकट वाटपाची संस्कृतीला आळा व हे सर्व होण्यासाठी कामाच्या सन्स्कृतीत आमूलाग्र बदल,निवडणूक व्यवस्थेत बदल, न्याय पालिका सुधारणा ई गरजेचे आहे. पण ते होणार नाही ! हे ही तितकेच खरे !

वीणा३'s picture

25 Jun 2020 - 9:23 pm | वीणा३

काही पटलं, काही नाही.
१. काजवा महोत्सव - यावर जे काय वाचलं त्यावरून हि गोष्ट बंद झाली पाहिजे, नाहीतर हळू हळू काजवे संपून जातील. जर करायचा असेल तर फार आवाज न करता, फार फोटो न काढता, त्यांना त्रास न देता करा.
२. ट्रेकिंग ग्रुप्स - जर हे लोक जाऊन गड किल्यावर अस्वच्छता करत नसतील, कचरा फेकत नसतील तर मला तर त्यात फार काही चूक वाटत नाही. काही ग्रुप्स तर येता जाताना वाटेतला कचरा उचलत जातात हे हि ऐकलं आहे. तेवढाच तिथल्या गावातल्या लोकांनाही रोजगार मिळेल. मी सिंहगड वर एकदा तिथे पिठलं भाकरी विकणाऱ्या बाई बरोबर बोललीये, तिचं सिंहगड उतरून उलट्या बाजूला (डोणजे नाही ) कुठेतरी गाव होतं, दर शनिवार रविवार ती आणि तिची मुलं सगळं जेवणाचं सामान घेऊन गडावर यायचे, जेवण विकायचे, तेवढेच पैसे मिळायचे.
३. प्रचंड गर्दी - लोकसंख्या कमी व्हायला हवी हे नक्की. किंवा अजून शहर मोठी तरी निर्माण व्हायला हवी.
४. किडामुंगी सारखं आयुष्य जगणारी गर्दी - पटलं, काहीतरी नियम असावेत आणि ते कडकपणे पाळले जावेत.
५. जिम , सलून आणि मेकप बिझनेस - यात प्रोटीन पावडरच क्वालिटी टेस्टिंग आणि क्लिनिकल ट्रायल केली पाहिजे हे पटलं. पण बाकी काय चूक आहे हे फारसं कळलं नाही. जाणाऱ्या प्रत्येकाला माहित असतं साधारण पैसे किती असतात. नसेल माहित तर बसायच्या आधी मला अबक गोष्टी करायच्या आहेत, पैसे किती होतील, हे विचारावं आणि ते पटले तरच काम करून घ्यावं. प्रत्येकाची कंजुषी, काटकसर, खर्च आणि उधळपट्टी याची व्याख्या फार वेगळी असते. मला वाटतील त्याच गरजा बरोबर आणि इतरांच्या गरजा म्हणजे उधळपट्टी असा दृष्टिकोन मला बरोबर नाही वाटत. आणि जिथपर्यंत लोक्संख्या कमी होत नाही तोवर, पैसे असणाऱ्या लोकांची काटकसर म्हणजे पैसे नसणाऱ्या लोकांची उपासमार असाही समीकरण असू शकतं.
६. लग्न बिझनेस - मला स्वतःला फार मोठं लग्न नको वाटतं, पण म्हणून अंबानीने करूच नये असं काय वाटतं नाही. उलट जरूर करावं म्हणजे पैसा खालपर्यंत पोचेल. ज्याला आवड असेल आणि पैशाने जमेल त्याने जरूर मोठं लग्न करावं.
७. आध्यत्मिक उन्माद - कडक नियम पाहिजेत, एकूणच थोडी शिस्त असेल तर मला तरी गणेशोत्सव आवडेल. पण यात आलेलं राजकारण बघता हे जरा कठीण दिसतंय. मलातरी गणेशोत्सव, वारी, नवरात्र बंद करण्यापेक्षा ते चांगले मॅनेज केले तर आवडतील.

ह्या करोनाच्या निमित्ताने ही गर्दी आणि गर्दीवर अवलंबुन असलेली सरवच अर्थव्यवस्था कोसळावी - अम्म यापेक्षा मीच उठून कुठल्यातरी खेड्यात जाऊन राहीन, माझ्या गरजा कमी करण्यासाठी इतरांना का त्रास देऊ.

प्रसाद गोडबोले's picture

26 Jun 2020 - 12:03 am | प्रसाद गोडबोले

अम्म यापेक्षा मीच उठून कुठल्यातरी खेड्यात जाऊन राहीन, माझ्या गरजा कमी करण्यासाठी इतरांना का त्रास देऊ.

तुम्हाला खोटं वाटेल पण मी अ‍ॅक्च्युअली सह्याद्रीच्या कड्यावर वसलेल्या एका खेड्यात जाऊन आलो, समोर पसरलेली कौलारु घरं अन भातशेती पाहुन वाटलं की हेच बेस्ट ठिकाण आहे, आणि इथला खर्चही आटोपशीर असेल अगदी नक्की परवडेल आपल्याला.
असा विचार करे पर्यंत मागुन कर्णकर्कशश हॉर्न वाजवत एक बाईक पुढे निघुन गेली, गावातलीच पोरं होती, आणि बाईक तीही साधी सुधी नाही , के टी एम आर सी २०० , म्हणजे जवळपास २.५ - ३ लाख पेक्षा महागडी बाईक. "विकासाचं " पेव इथपर्यंत पोहचलं आहे पाहुन सखेद आश्चर्य आठवलं .

देऊळ चित्रपटात दिलिप प्रभावळकर आणि नाना मध्ये एक अप्रतिम संवाद आहे तो आठवत रहातो - "आता ह्या गती मिळालेल्या चक्राला थांबवणं तुम्हालाच काय, कोणालाच शक्य नाही, ह्यातुन माघारी वाट नाही"

:(

कोहंसोहं१०'s picture

26 Jun 2020 - 4:28 am | कोहंसोहं१०

शहरातल्यांना गावकीची ओढ साहजिकच आहे पण गावातल्यांनाही आपण मॉडर्न आहोत म्हणून मिरवायला आवडते असे वाटते म्हणून असे उद्योग करतात.

खरंच साधा आणि सिम्पल जीवन जगायचं असेल तर नर्मदेकाठच्या खेड्यात जिथे अत्यंत कमी लोकवस्ती आहे, अजूनही दाट जंगल जिथे आहेत त्याच्या आसपासच्या

गावात, आणि ऊंच हिमालयात अश्याच थोड्या जागा शिल्लक आहेत बहुधा. पण अश्या ठिकाणी राहण्याचे त्रास वेगळेच बेसिक गरजा पण पूर्ण व्हायला खूप कष्ट पडतात.

माहितगार's picture

26 Jun 2020 - 9:34 am | माहितगार

Coronavirus epidemic didn't break the system, it exposed already broken system.

या मुद्द्यात तथ्य आहे पण मनमोकळ करण्याच्या भरात धागा लेख सुतावरून काही काही काही ठिकाणी भलतीकडेच ट्रेक करतो, तरीही मनमोकळ करण्याला आमची ना नाही :)

एक्स्पोज शब्दातील नाट्यमयता नेमक्या बारकाव्यांचे राक्षस झाकले जात असतील गाडी भरकटत असेल तर त्याला परिणामकारी एक्सपोज म्हणता येईल का, अशी शंका निर्माण होते. एक्सपोज म्हणून भलत्याच गोष्टींवर मनमोकळ करणार असू तर एक्सपोज व्हायला हव ते नीटस एक्स्पोज झाल नाही असे म्हणणे नाईलाजाने भाग पडते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jun 2020 - 11:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनमोकळ करण्याच्या भरात धागा लेख सुतावरून काही काही काही ठिकाणी भलतीकडेच ट्रेक करतो, तरीही मनमोकळ करण्याला आमची ना नाही :)

हाहा उच्च होता. पण इतकं तितकं चालायचं. अभिव्यक्त होण्याशी मतलब.

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

27 Jun 2020 - 2:44 pm | प्रसाद गोडबोले

पण इतकं तितकं चालायचं.

एक्झ्यॅकटली !
आपल्याला आता कोणालाच काही पटवुन द्यायचे नाहीये , लिहावसं वाटलं म्हणुन लिहितो. त्यात कुठेही तर्कशुध्द लाईन ऑफ अर्ग्युमेन्ट्स मेन्टेन करायला पाहिजे ही मला अट नाही आता. :)

ओशो चे एक अप्रतिम वाक्य आहे - आय एम डेलिबरेटली इन्कन्सिस्टंट !
मी अजुन त्या लेव्हलला पोहचलो नाही पण सध्या तरी इतकेच म्हणतो - आय हॅव नो इन्टेन्शन्स टू बी कन्सिस्टंट !

आता सगळं अघळपघळच असणार कारण आता आपलं सगळं स्वान्तःसुखाय आहे .

:)

Prajakta२१'s picture

28 Jun 2020 - 2:43 pm | Prajakta२१

इष्टापत्ती नाही कारण
वरचे सगळे उद्योग बंद झाल्याने गुन्हेगारी वाढण्याची शक्यता
गुन्हेगारी विरहित मार्गाने पैसा कमावण्याच्या उदयोगांवर बंधने आल्याने माणसे गुन्हेगारी कडे वळण्याची शक्यता
तसेच नॉर्मल दैनंदिन आयुष्य जगताना कायम समोरच्या माणसाची (ह्यात सेवा पुरवठादार आणि नातेवाईक दोघेंही आले )धास्ती घेऊन वावरायचे
तसेच घरात generation गॅप मुळे नवीन वाद कारण बऱयाच ठिकाणी ज्येष्ठ नागरिक काही होत नाही ह्या भावनेनेच वागत आहेत
सारखे फिरावयास जाणे
sanitization चे नियम न पाळणे असे बऱ्याच ठिकाणी होत आहे घराघरांत
त्यांना समजावणे दिवसेंदिवस कठीण होत आहे
दैनंदिन गरजेच्या वस्तू,औषधे वापरताना ती स्वच्छ आणि निर्जंतुक आहेत ना ह्याचे टेन्शन ,नाहीतर वेळ घालवून ती स्वच्छ करायची
सतत भयगंडाखाली जगणे नाहीतर बिनधास्त जगायचे पण करोनाची तयारी ठेवणे हेच दोन पर्याय उरल्यावर करोना इष्टापत्ती मुळीच नाहीये
आजच सकाळ मध्ये सगळे नियम पाळूनही पिंपरी चिंचवड मधल्या आरोग्यसेवकांना करोनाची लागण झाल्याची बातमी आहे
https://www.esakal.com/pimpri-chinchwad/25-people-corona-infected-pimpri...

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Jun 2020 - 9:33 am | ज्ञानोबाचे पैजार

यात अजून एक भर म्हणजे हॉटेल..

पुण्यात तरी शनिवार रविवार हॉटेल मधे एवढी गर्दी असते की तेवढी गर्दी चतुर्थीला सिध्दीविनायकाच्या मंदीरात पण होत नसेल. गर्दी बघून अर्धमेली झालेली भुक दरपत्रक वाचले की पूर्ण मरुन जाते.

रोटी कमीत कमी ४० रुपये, बटर रोटी ५० रुपये नान, कुलचा, पराठा त्याहुन जास्त, (गहु ४० ते ५० रुपये किलो आणि तयार पीठ ५० ते ५५ रुपये किलो)
कोणतीही भाजी कमीत कमी २५० ते ३०० रुपये प्लेट. (बर या प्लेटचा आकार हॉटेला गणीक बदलतो. कधी ती ३ लोकांना पुरते तर कधी १ माणूसही अर्धपोटी रहातो)
सँडवीच १०० रुपयांपासुन पुढे कितीही - बेकरीत ३० रुपयाला अख्खी ब्रेडची लादी मिळते
पावभाजी १०० रुपये त्यातही चीज पावभाजी, खडा पाव भाजी असे उपप्रकार आणून अजून भाव वाढवलेले आणि हद्द म्हणजे जादा पाव जोडी २० रुपये
मसाला पापड कमीत कमी ५० रुपये
साधा डोसा ७० ते १०० रुपये मसाला डोसा १०० ते १५० रुपये (५० रुपयाचे डोशाचे तयार पीठ आणले तरी घरी त्यात १५ ते २० डोसे होतात)
पाणीपुरी २० रुपये त्यातही फक्त ५ पुर्‍या, मसाला पुरीचे पैसे वेगळे, रगडा पुरी, शेवपुरी एसपीडीपी आणि भेळ ५० रुपये प्लेट पासुन पुढे सुरु होतात
सगळ्यात भारी प्रकार म्हणजे वडापाव १५ ते २० रुपये. (बटाटा २५ ते ३० रुपये किलो आणि ८ लादीपाव १५ रुपयांना मिळतात)

तीच गोष्ट थाळी हॉटेलची कमीत कमी ३०० रुपये थाळी? आणि त्या थाळीतले कमीत कमी ७०% पदार्थ निकृष्ट दर्जाचे असतात आणि तेच पुन्हापुन्हा आपल्याला न विचारता थाळीत वाढले जातात.

हिच गत नॉनव्हेज हॉटेलची आणि बारची पण आहे. तिकडली यादी तर या पेक्षा मोठी होईल. आणि या स्पर्धेत कोणतेही हॉटेल मागे नाही.

लुबाडायच्या आणि लुबाडून घ्यायच्या सर्व सीमा या व्यवसायने हजारो मैल मागे सोड्ल्या होत्या.

मागचे चार महिने हॉटेल मधे न गेल्याने कोणालाही काहीही फरक पडला नाही.

पैजारबुवा,

शाम भागवत's picture

26 Jun 2020 - 10:19 am | शाम भागवत

+११

दरपत्रक अगदी सही आहे आणि हीच वस्तुस्थिती आहे. प्रचंड जीव जळतो पण काय करणार. हॉटेलात मिळणाऱ्या जवळपास ९० टक्के डिशा मला घरी जमतात म्हणून पूर्ण लॉकडाऊन घराच्या खाण्यावर काढला.
पण हॉटेलात न गेल्याने काही फरक पडला नाही.
आमच्या अपार्टमेंट्स च्य दारात कधीही पाहिले तरी एकतरी डोमिनोज वाला डिलीव्हरी बॉय उभा असलेला दिसायचा. स्विगी वाले तर सगळ्यात जास्त फिरले.
माझा शेजारी मला सांगत होता लॉकदाऊन अजिबात परवडले नाही. कसे परवडणार? दारात रोज चार पाच दोमिनोज ची खोकी. रोज एक ब्लॅक ने घेतलेले १००० रू चे सिगारेट पाकीट. अजुन मेड यायला सोसायटीने अलौड केले नाही. पुढे किती दिवस माहीत नाही. नवरा बायको कामाला असणाऱ्या लोकांचे हाल बघण्यासारखे आहेत.

चौकटराजा's picture

26 Jun 2020 - 1:12 pm | चौकटराजा

हॉटेलात मिळणाऱ्या जवळपास ९० टक्के डिशा मला घरी जमतात म्हणून पूर्ण लॉकडाऊन घराच्या खाण्यावर काढला. @ अभ्या, ह्या येकदम झक झाला माला समाजला ते ! आता मास्क घालून येतो तू येक खोलीत बस मी यक खोलीत. पयशे दीन पाजीन तर ,भावा हाटलाचे कारन्जे ,गादी, एलीडी याचे पैशे कशाला द्याचे ! )))))

राघव's picture

26 Jun 2020 - 1:37 pm | राघव

आम्ही पण! :-)

मूकवाचक's picture

26 Jun 2020 - 10:40 am | मूकवाचक

+१

मला पडलाय.!!
वजन दहा किलो कमी झालंय.

mrcoolguynice's picture

26 Jun 2020 - 10:51 am | mrcoolguynice

कोरोना- एक इष्टापत्ती

हे जरी एकवेळ मान्य केलं,
तरी
इष्टापत्ती ही कोणासाठी ??

कोरोना संकट अनेक लोकांसाठी खूपच भयंकर आहे. ज्या लोकांना ते परिणाम भोगायला लागताहेत त्यांना सध्या तरी तो फक्त शापच वाटणार.

पण "भरपूर एक्स्ट्रा आहे रे" वर्गाला झटका देऊन अनेक गोष्टींचा विचार या साथीने करायला लावला हे अगदी खरं आहे. अनेक न्यू नॉर्मल्स तयार होतील. त्यातल्या किमान काही लाभदायक असतील अशी आशा.

अगदी काही नाही तरी लोक रांग लावायला शिकले तरी खूप होईल.

लेख आवडला.

रातराणी's picture

26 Jun 2020 - 12:56 pm | रातराणी

शब्दाशब्दाशी सहमत आहे.

प्रसाद गोडबोले's picture

26 Jun 2020 - 1:28 pm | प्रसाद गोडबोले

सहमत आहे गवि ...पण ....

कोरोना संकट अनेक लोकांसाठी खूपच भयंकर आहे.

मी म्हणतोय अनेक लोकं असणं हाच प्रॉब्लेम आहे. माझी आपली एक धारणा आहे थर्मोडायनॅमिक्स मधल्या पहिल्या सिध्दांतासारखी: जगात जेवढे केवढे बायोमास आहे ते कायम कॉन्स्टंट राहात असते, त्यात काही कमी जास्त होत नाही फक्त रुप बदलले जाते बस्स.
आता इतकी माणसे वाढलीत कारण आपण जंगलं तोडलीत, त्यातले प्राणी मारलेत, तिथं शेती केल्या, समुद्रातुन आजही इन्डर्स्ट्रियल फिशिंग च्या नावाखाली मासे ओरबडुन खातो आहेच, ही केवळ काही उदाहरणे आहेत आणि अजुन कित्येक उदाहरणे देता येतील , असे असले तर का नाही वाढणार माणसं !
कुठं तरी काहीतरी चुकलं आहे

अनेक न्यू नॉर्मल्स तयार होतील. त्यातल्या किमान काही लाभदायक असतील अशी आशा.

मलाही माफक अपेक्षा आहेत -
१.ट्रेकिंग बिजनेस >>> बंद पडावा, मोजकीच लोकं ज्यांना खरेच गडकिल्ल्यांविषयी आत्मीयता आहे अशा लोकांनी आणि तेही ७-८ जणांचा ग्रुप इतक्या कमी प्रमाणात ट्रेक करावेत. नफेबाजी करणारे सगळे ट्रेकिंग ग्रुप्स बॅन व्हावेत.

२.फुटेपर्यंत फुगलेली आणि आजुबाजुची गावं खात चाललेल्ली शहरं, लोकल ट्रान्स्पोर्ट >>>> सर्व शहरांनी एफेसाय प्रचंड वाढवावा, उंचच्या उंच बिल्डिंग बांधाव्यात जेणेकरुन आजुबाजुच्या खेड्यांवरी अतिक्रमण थांबेल. शहर आणि गावं मॅनेज्मेन्ट ने ऑक्युपन्सी विषयी अत्यंत कडक कायदे करावेत जसे न्यु योर्क न्यु जर्सीत आहेत. उदाहरणार्थ , शहरात १००० स्केवयर फुटाच्या घरात ५ पेक्षा जास्त लोकांना रहाता येणार नाही, आजुबाजुच्या गावात १०हजार स्केवयर फुट मध्ये ५ लोकं . असे काहीसे.

३. किडामुंगी सारखं आयुष्य जगणारी गर्दी >>> शहरात कोणत्याही सर्वजनिक ठिकाणी पथारी पसरण्यास सक्त मनाई करावी, शहरात येऊन नोकरी करण्यासाठी वर्क परमिट असावे जेणेकरुन बाहेरच्या प्रदेशातुन येणार्‍या लोकांवर नियंत्रण ठेवता येईल.

४. सार्वजनिक गणेशोत्सव कायमस्वरुपी बंद करावा, सार्वजनिक ठिकाणी कोणताही धार्मिक उन्माद, मग तो भगव्याझेंड्याचा असो कि हिरव्या कि निळ्या, उन्माद करण्यावर सक्त मनाई असावी. जे काही करायचे ते खाजगी जागेत करावे. मंदिर प्रवेशासाठी सोवळ्याओवळ्याचे अत्यंत कडक नियम करावेत जेणेकरुन लोकंच स्बत:हुन नाके मुरडतील आणि आणि दर्शनही मर्यादित लोकांनाच तेही अपॉईट्मेन्ट बूक करुनच दर्शनाचा लाभ द्यावा म्हणजे मंदिरातील गर्दी कमी होईल.

अर्थात हा सारा पोकळ आशावाद आहे हे मी जाणतो. एकदा सुरु झालेलं हे गर्दी आधारित अर्थचक्र थांबवणं कोणाच्याच हातात नाहीये....एक कोरोना सोडला तर :(

खरेच या अपेक्षा पूर्ण होवोत. विशेषतः २ आणि ३ क्रमांक मुद्दे (शहराबद्दल)

आयुष्य सुधारेल लोकांचं.

पण हे सगळं होण्यासाठी, देशावर,
पोलिटिकल इच्छाशक्ती असलेला धडाडीचा , बहुमतातील सरकार चालवणारा पंतप्रधान हवा असतो ना ? शिवाय त्याला सेटल व्हायला २ ते ३ वर्ष हवीत ...

विटेकर's picture

26 Jun 2020 - 11:35 am | विटेकर

आवडला लेख !

शोषण नव्हे दोहन .. हा भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र आहे ... ओरबाडण्याच्या नादात आपण खरा आनंद घेणे केव्हाच मागे टाकले आहे ...
माझे वडील मी लहान असताना अंबोळी खायला न्यायचे ... २-३ महिन्यातून कधितरी एकदा .. सोहळा असायचा तो !
त्यानंतर शेकडो प्रकारचे दोसे .. शेकडो ठिकाणी खाल्ले ... पण विट्याच्या विनोद काफे मधला तो चर्र् आवाज ... तो दरवळ ... तोंडात लाळ घोळ्वून केलेली प्रतिक्षा ... पुन्हा तशी मजा कधीच आली नाही !

मजा आणि माज यात फक्त आकार मात्रेचाच फरक आहे.

संवेदना जाग्रुत आहेत असे जे थोडे लोक आहेत त्याना करोनामुले जागे होतील बाकी ???

सिरुसेरि's picture

26 Jun 2020 - 4:58 pm | सिरुसेरि

+१ . करोना च्या संकटामुळे अनावश्यक हॉटेलींग , मॉल , मल्टिप्लेक्स , पार्टी , शो ऑफ अशा अनेक खर्चांना लगाम बसला आहे .

विकास...'s picture

27 Jun 2020 - 3:52 am | विकास...

दारू, पेट्रोल डिझेल चा वापर, चार चाकी गाड्या, फ्लॅट , शिक्षण , दवाखाने, मोबाईल , जाहिराती ,  मालिका , बातम्या वाढदिवस , जत्रा ,
याविषयी काही मते वाचायला आवडतील

इष्टापत्ती =  पैसा  किती मिळतो यापेक्षा तो कसा वापरला जातोय हे समजू लागलं तरी खूप झालं

अजून बराच वेळ आहे यातून बाहेर पडायला त्यामुळे अजूनही बदल होतील असं वाटतंय

विकास...'s picture

27 Jun 2020 - 4:13 am | विकास...

एक माझा अनुभव

२००३ - २००५ मध्ये  पुण्यात पायी चालत सहज ३-४ ठिकाणी फिरून येत असू.  यात सकाळी डेक्कन कॉर्नर ला नाश्ता, परत ज्ञान प्रबोधिनी जवळ लस्सी, तुळशीबागेतून मग सरळ (..) फॅशन स्ट्रीट तिथे दुपारचे जेवण. 
नंतर  swargate सारसबाग , टिळक रोड असे चालत  प्रभात रोड ला सुवर्णरेखा मध्ये संध्याकाळचे जेवण करून कोथरूड ला उजवी भुसारी... एकंदर  रुपये १६००/ - पगारात खूप आनंदी होतो

२०१९ मध्ये गाडी किंवा बस वापरून वरीलपैकी १-२ ठिकाणेच करता येत होती... आणि किती रुपये लागतील काही सांगता येत नव्हत

हा अनुभव वरील विषयाला धरून आहे कि नाही माहिती नाही पण आठवलं म्हणून लिहिलं

चौकटराजा's picture

27 Jun 2020 - 1:40 pm | चौकटराजा

माणूस दोन प्रकारचे जीवन जगत असतो. एक त्याचे अस्तित्व एक जीव म्हणून असते .यात गरीब श्रीमन्त, बुद्धीमान मन्द असा काही फरक नसतो. त्यातील प्रगति व ऐहिक प्रगती यात फरक अत्यन्त महत्वाचा असा आहे की एकात माणूस फक्त वस्तूमान व उर्जा यान्च्याशी सम्बन्धित सन्शोधन करून जगण्याचा आनन्द वाढवतो ज्याला आपण " लाईफ स्टाईल " असे म्हणतो. जैविक जगात आपण इतर प्राणी ,सूक्ष्म जीव, बुरशी ,विषाणू यान्च्या बरोबर लढत जगत असतो. माती , व धातू स्वतः चे असे काही संशोधन करीत नसतात कारण त्याना जैविक प्रेरणा नाही. ती प्राणीजगताला आहे म्हणून आपल्याप्रमाणे इतर स्पेशीजचे देखील सन्शोधन चालू असते. सबब आपल्याला फक्त अभियान्त्रिकी शोधात आपल्या मनासारखी प्रगति करून वरचष्मा जमतो. वैद्यकात सी टी स्कॅन तुम्हाला औषध देत नाही फक्त निदानाला मदत करतो. आपली खरी लाईफ स्टाईल ,वहाने, घरे, वहातूक ,होटेलिन्ग, कपडे ,दागिने ही नसून आरोग्य, स्वच्छता, स्वस्त वैद्यकीय शिक्षण, स्वस्त वैद्यकीय उपचार ई आहे. १०० वर्षानंतरच्या अभियात्रिकी उन्मदानन्तर मानवाला त्याची विश्वातील खरी जागा निसगातील जैविक जगताने दाखवून दिली आहे ! हे काय लस मिळण्यासाठी १० वर्षे ...? अस उद्वेगजनक प्रश्न अभियांत्रिकी जग विचारू शकते पण त्याला तोडीस तोड उत्तर मिळणे अशक्य आहे. कारण निसर्गाचे एक मूळ तत्व आहे मानवासह सर्व जीव सृष्टीला आपला बचाव करण्याचा अधिकार आहे !

वारी बद्दल मी लिहीलंहोतं हे अगोदर

http://misalpav.com/node/25109

प्रसाद गोडबोले's picture

27 Jun 2020 - 2:49 pm | प्रसाद गोडबोले

येस विजु भाऊ येस. मला आठवतं आहे .

तेव्हा आपले मतभेद झालेले हे देखील मला आठवतं आहे.
पण सात वर्ष होईन गेली , पुलाखालुन खुप पाणी वाहुन गेलंय.

मला ह्या करोनाच्या निमित्ताने आणि एकुणच कोणत्याही गर्दीचा तिटकारा आल्याने, तुमचेच मत योग्य आहे असे वाटायला लागले आहे :)

एकेकाळी तलाव, उद्यानांनी सुशोभीत असं बंगलोर शहर पार गटारात गेलं होतं.. करोनामुळे बरेचसे उद्योग बंद पडलेत, तेंव्हा तलाव सुद्धा पुष्क्ळ स्वच्छ झाले म्हणतात. पंजाबमधुन हिमशिखरे दिसणे, गंगा नदी स्वच्छ होणे असे बरेच काहि इअकायला येतय.

पण त्याच बरोबर अनेकांना जीवन-मरणाच्या लढाईला सामोरं जावं लागतय :(

पंजाबमधुन हिमशिखरे दिसतात, पण ती कनंड्डा
या देशाची असतात.

शहरातील परिस्थितीशी सहमत. तुमचा अनुभव शहरांचाच आहे.
खेड्यात उलट परिस्थिती असते. खेड्यात हॉटेल फारशी नसतातच. धाबे आहेत पण त्यात स्त्रिया जातच नाहीत. ११० रुपयात मटणाची थाळी मिळते.
मी खेड्यात वाढल्याने अजुनही बाहेर खाताना कानकोंड व्हायला होतं.
खेड्यातल्या मंदिरात देवाला साखर फुटाणे, शेंगदाणे चालतात. नारळ वर्षातुन एकदाच. तिथेही देवळात जाणार आपल्या सोईनुसार, सनासुदिला.
डॉमिनोज.. मॅकडोनाल्ड ...वैगेरे अगदी तालुक्यालाही नाहीत.
अजुनही तिकडच्या मुलांना पॉकेटमनी मिळत नाही. बड्डे पार्टी म्हणजे फारतर वडापाव किंवा भेळ असते.
कापडं नी माकडं हेच ते सत्य मानतात त्यामुळे खुप सारा खर्च कपड्यात करत नाहीत.
फक्त दिवाळीलाच नवीन कपडे मिळतात. अजुनही गावाकडे दहा वाजताच गाव गार होवुन जाते. अगदी एटीएम वैगेरे मोजकीच असतात.
शहरात येणे अपरिहार्य आहे कारण तिकडे नोकर्या नाहित. लोकसंख्येमुळे शेतीत भागणे अशक्य आहे. विकेंद्रीकरण होतच नाही. तिकडुन मुले जॉब करायला आली की सुरवातीला त्यांच्या घरचे त्यांना ३ के पण देवु शकत नाहीत मग जमेल तसे काढणे त्यांना भाग असते.
तिकडे २० लाखात खुप चांगला बंगला बांधता येतो, इकडे २० लाखात १ बीएचकेही मिळत नाही.
वारी गणेशोत्सव , दहिहंडी, इव्हेटस बंद व्हायला हवेत ह्यावर पुर्ण सहमत.

चौकस२१२'s picture

2 Jul 2020 - 6:04 pm | चौकस२१२

"लोकसंख्येमुळे शेतीत भागणे अशक्य आहे."
हे विधान सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत खरे नसावे ,,, काही कारणे असे वाटण्या मागे
१) लोकसंख्या वाढली कि मागणी वाढते , आणि अजून तरी शेतीत मोठ्या उद्योगांना सरळ घुसायला भारतात परवानगी नाही बहुतेक त्यामुळे मूळ शेतकरी जर तेवढाच (संख्येने) राहिला आणि मागणी वाढली तर मग प्रत्येकाला जास्त वाटा नाही का मिळणार?
२) तंत्रन्यानामुळे शेती तील बे भरवसा कमी झाला असावा
३) शहराच्या पासून काही ठराविक अंतरावर जे बागायती शेती करतात त्याला दिवस चांगलेहक असावेत ! खास करून मालाची ने आन आणि साठवणूक जास्त सोप्पे झाले आहे

चित्रगुप्त's picture

4 May 2021 - 3:13 am | चित्रगुप्त

लेख आणि प्रतिसाद वाचत आहे. सध्या पावती देऊन ठेवत आहे. नंतर आणखी लिहीन.

चौकस२१२'s picture

4 May 2021 - 7:34 am | चौकस२१२

इतर देशातील परिणाम

- जिथे मुळात गर्दी कमी ( भारतातातील गावे किंवा विरळ लोकसंखय असलेल्या देशातील मोठी शहरे काय ) तिथे परिणाम नाही .. एरवी हि प्राणी पक्षी दिसतात तसे लोकडवून च्या कालात हि ..
- भारताचं मानाने येथे अँप्स वापरून घरपोच पोचवणे हा प्रकार कमी होता तो वाढला ..
- उधारी वर खर्च चे प्रमाण वाढले आहोत घरी करा आप वर ऑर्डर ...
- देशाचे बरेच उत्पन्न येणाऱ्या पर्यटनावर होते त्यावर बराच परिणाम
- छोटा आणि स्थलांतरितांचा देश असल्यामुळे बऱ्याच क्षेत्रात २-३ जणांची मक्तेदारी होती त्यामुळे प्रवासी दलालातील एका कंपनी ला बऱ्यापैकी फटका कारण देशाबाहेर जायला परवांगी नाही , आणि जगाचं एका कोपऱ्यात असल्यामुळे परदेश प्रवास बऱ्यापैकी असायचा
- परदेशातील विद्यार्थ्यांकडून येणारे उत्पन्न, शिवाय ते येथे राहिल्याने अर्थव्यवस्थेत होणारी उलाढाल हं एक मोठा "निर्यातीचा" भाग होता, तो प्रचंड प्रमाणात कमी झाला .. त्यामुळे फटका
जसे "कोटा फॅक्टरी" तसे जणू मेलबर्न मधील मोनाश आणि इतर उपनगरे
- शेतीमालालाची पीक काढयनासाठी लागणारे तात्पुरत्या व्हिसा वर बोलवले जायचे ते कमी झाले त्यामुळे शेतकरी रखडला
- कोड्यात टाकणारी अर्थ व्यवस्था: करोना काळात बेकारी ५.% वरून १० च्या आसपास गेलेली आता परत ५.-६ मध्ये आली पण मग हे कस> आजची बातमी कि उपहारगृहाइ बंद कारण काम करायला लोक मिळत नाहीत
- स्वदेशी बनवा नुसते खनिजे विकू नका हे परत उघडकीला आले ( मेक इन इंडिया ची चेष्टया करणाऱ्यांनी कृपया लक्षात घयावे .. स्वावलंबन काही बाबतीत अश्या वेळी कामास येते )
- आयात केलेल्या भारतीय किराणा मालात फारसा बदल नाही
- देशावरील कर्ज वाढले ,, त्यामुळे देश लांब पल्याचा गरीब झाला आता अधिक नसर्गिक वायू आणि खनिजे विकून पुढील काही पिढ्या आहे ती श्रीमंती टिकवण्यासाठी धडपडणार