खरा गुन्हेगार (एक रहस्य कथा)

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जनातलं, मनातलं
29 Jun 2020 - 3:51 pm

खरा गुन्हेगार (एक रहस्य कथा)

मी केतन!  केतन देशमुख. आज मी पूर्णपणे तटस्थ राहून, ती घटना सांगणार आहे. ना मला कोणाबद्दल आकस आहे. ना कोणाबद्दल ममत्व. या घटनेत गुंतलेल्या प्रत्येक पात्रापासून मी एकदम अलिप्त आहे. तसे ते मला परके आहेत, पण व्यावहारिक पातळीवर मात्र ते माझे मालक आहेत. मी त्यांचा पूर्णवेळ कामगार आहे. त्या पात्रातील एकाचा खासगी ड्रायवर असल्यामुळे, त्यांचा आणि माझा खूप जवळचा संबंध आलेला आहे. ते ऐकून चौघे आहेत. आणि त्यांचे निःपक्षपातीपणे परीक्षण करणारा मी चौथा आहे. खरतर त्यांचा मी खासगी ड्रायवर असलो तरी, त्यांच्या खासगी गोष्टीत नाक खुपसण्याचा मला बिलकुल अधिकार नाही. आणि पुन्हा वरून त्या गोष्टी तुमच्या समोर अशा खुलेआम प्रकट करण्याचा तर मुळीच नाही. पण ते पातक मला करावेच लागणार आहे. माझ्या समोर दहा मीटर अंतरावर घडलेल्या त्या घटनेचा मी प्रत्यदर्शी  साक्षीदार आहे. त्यामुळे मी ते अगदी तंतोतंत, प्रथमपासून सांगू शकणार आहे!

आज निश्चितच काहीतरी होणार याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही. माझ्या पेक्षा सहा सात वर्षांनी मोठे असणारे माझे साहेब, एवढे कष्टी झालेले मी यापुर्वी कधीच पाहिले नव्हते. कष्टी होण्याचे कारणही समजत नव्हते. क्रोधीत आणि दुखी मुद्रेने ते जेव्हा गाडीत बसले. तेव्हा काहीतरी अपशकुन घडला आहे. हे मी लगेच ताडले.
'धाडकन्sss'
असा जोरात आवाज करत त्यांनी गाडीचा दरवाजा बंद केला. मी केवढ्याने तरी दचकलो. हातातील पेपर बाजूला सीटवर टाकून, मी गाडी सुरू केली.

मी गाडी गांधी रोड वरील बंगल्याचा दिशेने वळवली. आणि गाडीला वेग दिला. गाडीने वेग पकडला होता. दुपारचा चारचा सुमार असल्याने वातावरण थंड गरम जाणवत होते. साहेब पाठीमागे शांतपणे विचारमग्न अवस्थेत बोटात बोटे घालून बसले होते. त्यांची अस्वस्थतता, त्यांच्या चेहर्‍यावरची चलबिचल मला मिरर अधून स्पष्ट दिसत होती. नेमके काय घडले आहे. हे कळत नव्हते. आणि साहेबांना ते विचारणे मला शक्य नव्हते. मी गाडी चालवत चालवत केवळ अंदाजाचे मनोरे बांधु शकलो असतो. पण नेमकेपणाने अंदाजही बांधता येईना. शेवटी सगळे विचार डोक्यातून काढत, मी गाडी चालवन्यावर लक्ष केंद्रित केले.
गाडी राजाराम पुलाजवळ आली. पूल ओलांडला की, अर्ध्या तासाच्या अंतरावर बंगला होता. गाडी पुलाच्या अगदी मधोमध आली होती. रस्त्यावर वर्दळही थोडी कमी जाणवत होती.
अचानक पाठीमागून साहेबांचा आवाज आला.
"केतन, गाडी बाजूला घे."
अशा अचानक गाडी थांबवायच्या हुकुमाने मला आश्चर्य वाटले. पुलाच्या अगदी मधोमध अचानक गाडी थांबवायचा अर्थ काय?
साहेबांचा आजचा नूर पाहता, अशा पुलाच्या मधोमध गाडी थांबवायचा निर्णय, मनात शंका उत्पन्न करणारा वाटला. पण आता त्यांचा निर्णय डावलणार कसा?
मागेपुढे पहात मी गाडी बाजूला घेतली.
साहेबांनी जसा दरवाजा जोरात बंद केला होता, त्याच पद्धतीने तो जोरात उघडला. आणि गाडीच्या बाहेर येऊन, पुलाच्या डाव्या बाजूच्या कठड्याकडे ते जायला वळाले. माझ्या मनात पुन्हा एकदा शंकेची पाल चुकचुकली. मी त्यांच्या पाठोपाठ त्या कठड्याजवळ पोहोचलो. जरा सावध होऊन, त्यांच्या बाजूला थांबलो. साहेबांनी काहीही हालचाल केली की, त्यांचा बचाव करता यावा या हेतूने! मी असाच सावध राहणार होतो.
शेवटी त्यांच्या उपकाराचे ओझे माझ्या शिरावर होतेच ना.
वर्षभरापूर्वी मी आणि माझा भाऊ कबीर, साहेबांकडे कामाला लागलो होतो. कबीर माझ्यापेक्षा चार-पाच वर्षांनी लहान आहे. आम्ही दोघंही चाणाक्ष आणि हुशार होतो. कबीर व्यवहारात हुशार होता. परिस्थितीनुसार त्याची बुद्धी चाणाक्षपणे चालत असे. साध्या परिस्थितीत वाढलो असल्याने, आम्हा दोघांनाही सगळ्या गोष्टींची जाणीव होती. एकंदरीत आम्ही दोघे भाऊ स्वभावाने सभ्य आणि व्यवहारात हुशार असल्याने, साहेबांनी आम्हा दोघांना नोकरीवर ठेवले. मी स्वतः साहेबांच्या गाडीवर आणि कबीर साहेबांच्या पत्नी शैला मॅडम यांच्या गाडीवर ड्राईव्हर म्हणून नोकरीला लागलो. खूप दिवस बेकार राहिल्यामुळे, कोणतीही नोकरी करण्याची आमची तयारी होती. त्यामुळे ड्रायवरच्या नोकरीवरही आम्ही खुश होतो. आम्ही दोघही आहे या नोकरीवर समाधानी होतो.
विचाराची ही मालिका अशीच सुरू राहिली असती, पण साहेबांचा पुलाच्या रोलींगवर हात आपटल्याचा आवाज आला. आणि माझी विचारमालिका तुटली. मी भानावर आलो. आताच्या बिकट परिस्थितीची जाणीव झाली.
साहेब कठड्याच्या रोलींगवर हात ठेऊन, पुलाखालच्या नदी प्रवाहाकडे पहात होते. नजर शून्यवत त्या प्रवाहाच्या पाण्यावर खिळली होती. त्यांच्या मनातील चाललेली खळबळ चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. मुद्रा निर्विकार बनली होती. एखाद्या आजाराचे पूर्वलक्षने ज्याप्रमाणे, रोग्याच्या शरीराच्या हालचालीवरुन कळून येतात. अगदी तसेच लक्षणे पुढील पाच दहा मिनिटांच्या परिस्थितीचे, मला साहेबांच्या चेहर्‍यावर दिसू लागले. वातावरण काहीसे तंग होऊ लागले. आजूबाजूची हवेतली मोहकता कमी होऊन भेसूरता वाढू लागली. रोडवरच्या रहदारीचा आवाज काहीसा मंद होऊन, एकदम नाहीसा झाला होता. माझ्या मनात 'सावध रहा' या जाणिवांचे संकेत उमटू लागले. माझ्या शरीराने पूर्वतयारी  कधीच करून ठेवली होती. एकदम वेगात हालचाल झाली पाहिजे, असा पावित्रा घेऊन मी साहेबांच्या मागे, चार पावलांवर उभा राहिलो. साहेबांना माझी चाहुल लागली असावी. त्यांनी मागे वळून बघीतले. त्यांच्या चेहर्‍यातला निर्विकारपणा पाहून, मी अजूनच सावध झालो. त्यांना मी त्यांच्या एवढा जवळ आलेला पाहून नवल वाटल. त्यांना माझी ती उपस्थिती खटकू लागली. मी त्यांना अडथळा ठरणार होतो.
" केतन, तेवढी गाडीतून पाण्याची बाटली घेऊन ये."
त्यांनी हुकमी आवाजात मला आज्ञा केली. त्यांच्या आवाजाची ती जरब एवढी जाणवली की, मी लगेच गाडीकडे पाणी आणायला वळलो. पण माझ्या मनाने पुन्हा आग्रह केला की, 'तू इथेच थांब. तुझी इथेच जास्त जरुरी आहे. इथून तू चार पावले हलला तरी, तुला नुसता शोक व्यक्त करत बसावं लागेल. त्यामुळे इथून इंचभरसुद्धा हलू नकोस.'
मी जागेवरच उभा असल्याचे पाहून, त्यांनी पुन्हा एकदा मला त्याच जरबेच्या आवाजात पाणी आणायला सांगितले. आता मात्र माझा नाईलाज झाला. त्यांची आज्ञा डावलने माझ्या आवाक्याबाहेरचे होते. मी तसाच पाठीमागे वळलो, आणि दोन पाऊले गाडीच्या दिशेने टाकून, थोडा वेळ जागेवरच थांबलो. थोडीशी मान तिरकी करून साहेबांचा कानोसा घेतला. आता साहेबांचा चेहरा खाली नदीच्या प्रवाहाकडे होता. ते उडी मारण्याच्या तयारीत दिसले. उजव्या हाताने कठड्याच्या पाईपवर जोर देत त्यांनी, डावा पाय हवेत उचलला. त्याच्या मागून पुन्हा उजवा पाय हवेत तरंगला. आता त्यांचे शरीर एकदम हवेत तरंगलेले दिसले. माझ्या हातात केवळ तीन चार सेकंदाचा अवधी होता. माझे आणि साहेबांचे अंतर जेमतेम, सहा सात फुट असेल. मी आधीच सावध पवित्र्यात असल्याने. परिस्थिती अनुकूल झाली. मी एका अवधीत साहेबांच्या जवळ जाऊन पोहोचलो. एक दोन सेकंदाचा अवधी मला भेटला. तेवढा अवधी मला पुरेसा ठरला. मी पाठीमागून साहेबांचा डावा हात धरला, आणि पूर्ण जोर लाऊन तो मागे खेचला.

साहेब आणि मी चरफडत खाली जमिनीवर पडलो. माझ्या अशा अचानक खाली ओढल्याने ते प्रथम हडबडून गेले.  स्वतःला सावरत आम्ही दोघे उभे राहिलो. मी सरळ उभा राहताच, त्यांनी माझ्या अगदी जवळ येऊन, एक सणसणीत  थप्पड माझ्या गालावर मारली.  त्यांच्या या कृतीने मी एकदम हबकूनच गेलो. या माणसाचा मी जीव वाचवलाय, आणि वरून हा माझ्याच श्रीमुखात भडकावतोय. मी गाल चोळत चोळत पाठीमागे सरकलो.
"कशाला आडवलास माझा हात! चांगला मरत होतो ना! काय गरज होती तुला? मला वाचवायची! तुला पाणी आणायला पाठवलं होत ना? मग ते न आणता तू येथे कसा आलास? अरे! आता सुखाने जगू शकत नाही! तर सुखाने मरू तरी दे! काय ठेवलंय या जिंदगीत! ज्या भरवशावर ही जगण्याची इमारती बांधत होतो. ज्या इमारतीचे इमले मी वर्षानुवर्षे रचत होतो. ज्या इमारतीच्या भव्यदिव्यतेचा  मला सर्वार्थाने अभिमान होता. त्याच इमारतीचा पाया डळमळीत आहे, हे कळल्यावर काय अवस्था होते. कळते का तुला! अरे जिच्या विश्वासावर मी बिनधास्त जगत होतो. भविष्याचे मोठे स्वप्न पाहत होतो. तीच माझी पत्नी शैला, जर विश्वासघातकी निघत असेल. तर मी कोणत्या आशेवर जगू. कोणत्या तोंडाने समाजात अभिमानाने मिरवु! सांग ना?
आज रोजी माझ्या लग्नाला पाच वर्षे झालेत. तिला पाच वर्षांपासून मी खुश ठेवतो आहे. तिला जे हवं ते मिळत गेल.  या पाच वर्षात असे कधीच घडले नाही, की तिने मला काहीतरी मागितल, आणि मी तिला ते दिलं नाही. तरी तिने माझ्या सोबत असे अप्रामाणिकपणे वागावे. माझा विश्वासघात करावा. माझ्याच व्यवसाय पार्टनरसोबत कुठे कुठे फिरावे. त्याच्या सोबत अनैतिक संबंध ठेवावेत. तो पण विश्वासघातकी निघाला! हरामखोर!! व्यवसायाचे एवढे मोठे साम्राज्य निर्माण करण्यात, मी दिवस-रात्र कष्ट उपसले. व्यवसायाला मोठे केले. आज या उत्तुंग उंचीवर व्यवसाय पोहोचवला. त्याने व्यवसाय पार्टनर म्हणून, त्याची जी कर्तव्य होती. ती कधीच पार पाडले नाहीत. कंपनीच्या कामाचा बहाणा सांगून नुसता मोकाटपणे फिरत राहिला. मला शंका आहे. यानेच शैलाला फुस लावली असणार. पण ते काहीही असो. मी तर पार उद्ध्वस्त झालो आहे. स्वतःच्याच नजरेत पडलोय मी. एवढ्या मोठ्या कंपनीच्या साम्राज्याला सावरणारा साहेब. साधा स्वतःच्या पत्नीलाही सावरु शकला नाही! उद्या हा टोमणा, कोणी माझ्या तोंडावर बोलून दाखवला तर! मी काय उत्तर देऊ? कोणा कोणाच्या प्रश्नाला उत्तर देऊ?कोणा कोणापुढे शरमेने मान खाली घालू? हे सगळे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. त्यामुळे माझ्यापुढे आता एकच मार्ग शिल्लक होता. आत्महत्या!! आणि तोही सफल झाला नाही. इथेही अपयशी ठरलो मी.
साहेब भावनावेगात  खूप काही बोलून गेले.
डोळ्यातून अश्रु वाहत होते. मला माहित होते. साध्यासुध्या अपयशाने रडणारा हा माणूस नाही! कारण काहीतरी मोठेच असले पाहिजे. कारणही मोठेच निघाले.  शैला मॅडम असं वागतील हे मला पटत नव्हते. पण साहेब सांगत आहेत तर ते सत्य असलेच.
साहेब बराच वेळ त्या सुन्न अवस्थेत उभे होते. भावनावेगात मनातील वेदना, दुःख त्यांनी माझ्या पुढ्यात मांडले होते. जरा वेळाने ते थोडे सावरल्या सारखे वाटले. डोळ्यातील पाणी त्यांनी पुसले. जरा ठाकठीक होऊन, त्यांनी पूर्ववत होण्याचा प्रयत्न केला. कितीही मोठे संकट असो, त्यातून लगेच सावरण्याची शक्ती, त्यांच्यात कदाचित या कार्पोरेट क्षेत्रातील अनुभवावरून आली असावी. कारण एवढ्या अल्पावधीत कोण स्वतःला सावरू शकतो? स्पर्धा, धावपळ अनुकूलता, प्रतिकूलता, आधुनिकता या सगळ्यात टिकून राहण्यासाठी, माणसाला कणखर बनावे लागते.  त्या परिस्थितीशी अनुरूप व्हावे लागते. त्यासाठी संवेदनशीलता,भावनिकता , मानसिक बांधिलकी या गोष्टींचा काही प्रमाणात त्याग करावा लागतो. कदाचित साहेबांनी ते केले असावे. म्हणून तर एवढ्या अल्पावधीत ते सावरले.

"केतन, मला माफ कर.
तुझ्यावर मी हात उचलायला  नको होता."
साहेब माझ्याकडे अपराधीपणाने बघत म्हणाले.
"त्यात काय साहेब ,
मला त्याचे काहीच वाटले नाही."
मी हलकेच हसत म्हणालो . खरंतर मला साहेबांना काही विचारायचे होते .पण मघाची परिस्थिती विचित्र होती. म्हणून काही बोललो नाही. पण आता परिस्थिती थोडी अनुकूल होती. थोडासा कानोसा घेत मी म्हणालो,
"पण साहेब,
शैला मॅडम असं काही करतील,
हे शक्य वाटत नाही. आणि तुमचे व्यवसाय पार्टनर,
सारंग सर सुद्धा स्वभावाने सभ्य वाटतात."
माझ्या प्रश्नाने साहेब परत क्रोधीत झाले. पण पुन्हा स्वतःला सावरून ते बोलू लागले,

"केतन,
सभ्य चेहऱ्यामागेच असभ्य चेहरे लपलेले असतात.
फक्त ते कधी कधी बाहेर येतात.
जेव्हा त्यांना समाजात सुसंस्कृत म्हणून मिरवायचे असते.
तेव्हा ते सभ्य चेहरे धारण करतात.
आणि याउलट जेव्हा त्यांना चंगळवाद भोगायचा असतो, त्यावेळी ते असभ्य चेहरे बाहेर काढतात.
कदाचित मीही त्याला अपवाद नाही. परंतु चंगळवादालाही काहीतरी सीमा असते. काही मर्यादा असतात. चंगळवाद म्हणून जर तुम्ही दुसर्‍यांचे संसार उध्वस्त करत असाल तर, तुम्ही खूप मोठे पापी ठरता. तो तुमचा अक्षम्य गुन्हा असतो. आणि गुन्हा करणार्‍याला दंड केला जातो. आजही तो मिळणार. तो माझा व्यवसाय पार्टनर असला तरी, तो गुन्हेगार आहे. आणि गुन्हेगाराला दंड आवश्य मिळणार."

त्यांनी एकदा श्वास घेतला. आणि पुन्हा पुढे बोलू लागले,

" मला शैलावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे तर मी तिला मुक्त स्वातंत्र्य दिल होत. पण याच स्वातंत्र्याचा तिने गैरफायदा घेतला. मला या गोष्टीवर विश्वास नाही. परंतु मागील काही दिवसांपासून, शैलाच्या स्वभावातील बदल, तिच्या घराबाहेरील वाढलेल्या फेर्‍या, आमच्यातील वाढलेला वाद, फोनवरील वाढलेले संभाषण, अचानक राहणीमानात वाढलेला टापटीपपणा, आमच्यात कमी झालेली शरीरसुखाची ओढ, या सगळया गोष्टी कशाचा सूचक आहेत ? मला हळूहळू तिच्यावर शंका येत होती. परंतु कदाचित आज त्या शंकेचे रूपांतर खात्रीत होऊ शकते. 
आज सकाळी मला एक निनावी फोन आला होता. केवळ त्या दहा सेकंदाच्या फोनने मला, पार मुळापासून हादरून टाकले."
"तुमची पत्नी शैला, आणि तुमचा व्यवसाय पार्टनर सारंग पवार, आज संध्याकाळी सहाच्या सुमारास, शहराबाहेरील दुर्गाटेकडी वर भेटणार आहेत. त्यांना पकडण्याची ही तुम्हाला नामी संधी आहे."
सलगपणे असं बोलून, त्या निनावी व्यक्तिने फोन ठेवून दिला. शेवटचे ते वाक्य उच्चारताना साहेबांचे चेहरा काळवंडून गेला होता. आपली पत्नी, आज दुसऱ्या व्यक्तीला भेटणार आहे,हे एखाद्या परक्या व्यक्तीला सांगणे सोपे थोडीच असते?
आज मला या गोष्टीची खात्री करायची आहे. त्या फोनवरच्या व्यक्तिच्या बोलण्यातून जाणवत होते, की तो सत्य बोलत आहे."
साहेब बराच वेळ बोलत गेले. बर्‍याच खासगी, अनपेक्षित गोष्टी, घटना सांगत गेले. एखाद्या अनोळखी इसमासारखा मी, त्या गोष्टी ऐकत गेलो.

क्षण दोन क्षण निघून गेले. अचानक साहेबांनी पवित्रा बदलला. आधी दुःखीकष्टी असणारे साहेब ,आता कुठल्यातरी निर्धाराने पेटल्यासारखे वाटले .त्यांनी एक नजर मनगटावरील घड्याळ टाकली. 'चार चाळीस' असे स्वतःशीच पुटपुटत त्यांनी नजर माझ्याकडे वळवली.  एकदम निकडीच्या आवाजात ते म्हणाले,
"केतन, चल गाडी काढ. गाडी सरळ दुर्गा टेकडीकडे घे. रोज तलवारीसारखा टोचणारा तो शंकेचा काटा, आज एकदाचा काढून टाकणार आहे. एकतर माझी शंका खरी ठरेल, नाहीतर शैला निर्दोष ठरेल. किंवा सारंगचे कृष्णकृत्ये कुठल्या पातळीवर गेलेत हेही समजेल. काहीही होऊ, पण एकदाचा निर्णय लागायला हवा. शंकेचा मनोरा स्वतःच्या मानगुटीवर किती दिवस पेलून धरू?
राजाराम पुलावरून गाडी, थेट दुर्गा टेकडीच्या दिशेने धावू लागली. साहेबांचा एकूणच आजचा नूर पाहता, आज दुर्गा टेकडीवर नक्कीच काहीतरी घडणार आहे, याचा अंदाज मला येऊ लागला. जर तेथे खरंच सारंग सर आणि शैला मॅडम असतील, तर मात्र त्या दोघांची आता खैर नाही. कारण साहेब नेमकेच, आत्महत्येच्या मार्गावरून परत आले आहेत. जो माणूस एवढ्या मोठ्या कारणाने आत्महत्या करू शकतो. तो त्याच मोठ्या कारणासाठी, एखाद्याची हत्या करायलाही मागेपुढे पाहणार नाही.  ते दोघे टेकडीवर असतील तर, टेकडीवर त्या दोघांना पाहून, त्यांचा राग वेगाने वर उफाळून येणार, यात यत्किंचितही शंका नव्हती. पुढच्या तास दोन तासात काय वाढून ठेवले आहे काय माहीत? कोणाच्या हत्येचा साक्षीदार होण्याची, पाळी येऊ नये एवढे झाले म्हणजे बरं! हत्या होणार आहे हे तर नक्की! कारण हे सगळे वातावरण, परिस्थिती, साहेबांचा नूर हे त्याच अघटिताचे संकेत  होते. भीती, उत्सुकता, कुतूहल, हुरहुर या सगळ्या संमिश्र भावनांनी माझ्या मनात गोंधळ माजवला होता. तिकडे टेकडीवर काही अघटीत घडले तर, त्यात आपणही अप्रत्यक्षपणे सामील असू, याची भीती वाटत होती. तर दुसरीकडे, 'आता पुढे काय होईल? खरंच सारंग सर आणि शैला मॅडम एकमेकांना भेटतील का? साहेबांनी त्यांना असं सोबत पाहिल्यावर, साहेबांची पहिली कृती काय असेल? या सगळ्या गोष्टींची उत्सुकता लागली होती.

दुपारचे बारा- सवा बारा वाजले असतील. सारंग पवार आपल्या कंपनीच्या सब डिव्हिजन ऑफिसमध्ये बसला होता. खरंतर त्याला आज विशेष असे काही काम नव्हते. बरेच काम आधीच पूर्ण झालेले होते. त्यामुळे सध्यातरी तो निवांत होता. डिस्कव्हरी चॅनेलवर, त्याचा आवडता 'मॅन व्हर्सेस वाइल्ड' चा प्रोग्राम पाहण्यात, तो गुंतून गेला होता.
तेवढ्यात बाजूचा फोन खणखणला. 'कोणाचा फोन असेल', असे स्वतःशीच पुटपुटत त्याने फोन रिसीव्ह केला.

"तुला भेटायच आहे. आज ठीक संध्याकाळी सहा वाजता, दुर्गा टेकडीवर ये. आणि येताना कोणी पाहू नये, याची काळजी घे. अजून एक, बरोबर वेळेवर ये. मी तेथे वाट पाहतेय. एकटाच ये!"
एवढ सगळ एका दमात बोलून समोरचा फोन कट झाला. रिसीव्हर निर्जीव झाला.
तो निर्जीव रिसीव्हर तसाच त्याच्या हातात राहिला. ही कोणती बोलण्याची पद्धत! फोन उचलला की 'हॅलो' अस प्राथमिक अभिवादन झाल की, मग पुढच संभाषण होत असत! एवढ साधही या व्यक्तिला कळू नये? एकतर्फी चार - पाच वाक्यं सलग बोलून फोन डायरेक्ट कोणी बंद करत का? वरची भुवई उडवत, त्याने हातातील रिसीव्हर खाली ठेवला.
पलीकडून बोलतय तरी कोण? हा विचार डोक्यात आला. पण दुसर्‍याच क्षणी त्याने तो ओळखला. पलीकडे शैला होती! त्याच्या व्यवसाय पार्टनर श्रीकांतची(साहेब) पत्नी.
तिचा थोडासा घोगरा आवाज त्याच्या दाट परिचयाचा होता.
पण तो जरा विचारमग्न झाला. तीने एवढ्या तातडीने दुर्गा टेकडीवर का बोलावले असेल? असे काय तातडीचे काम आहे? पण तिच्या बोलण्यातून काम महत्वाचे असले पाहिजे, असे जाणवत होते. जास्त विचार न करता त्याने ताबडतोब जाण्याचा विचार पक्का केला.

संध्याकाळचा सुमार झाला. शहरापासून दहा बारा किमी, मेगा एक्सप्रेस वेच्या बाजूचा दुर्गा टेकडीचा परिसर मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी न्हाऊन निघाला होता. शहरी गजबजाटापासून परिसर दूर असल्याने, अतिक्रमणापासून बचावलेला होता. हिवाळ्याचे दिवस असल्याने, त्यातच मावळत्या सूर्याचे सोनेरी किरणे आसपासच्या परिसरात विखुरल्याने, वातावरण गरम आणि थंड अशा संमिश्र स्वरूपाचे बनले होते. एरव्ही पर्यटनासाठी येणारे लोक आज दिसत नव्हते. दिवसा लोकांचा दिसणारा गजबजाट आता पार नाहीसा झाला होता. कदाचित दिवस मावळतीला लागला म्हणून, सगळे पर्यटक, लोकं पांगले असतील.

पण हेच वातावरण, हीच परिस्थिती, हीच नीरव शांतता या सगळ्यांच्या पथ्यावर पडणार होती. साहेब, शैला मॅडम, सारंग सर यांना तरी कुठे गजबजाट हवा होता! त्यांना हीच शांतता हवी होती. हाच एकांत हवा होता. शांतता, एकांत स्थिर पाण्यासारखा असतो. शांत दिसणारे पाणी, खाली किती खोल असते, याची जाणीव त्या पाण्यात उतरल्याशिवाय कळणार नाही! त्याच धर्तीवर या भयाण शांततेत आता काय घडेल, काय होईल, हे या शांततेच्या उरात गेल्याशिवाय कळणार नाही. पुढच्या काही काळात घडणारे, महानाट्य या शांततेचा किती उद्रेक उडवेल! हा परिसर कसा दणाणून सोडेल ! हे सगळे प्रश्न सध्या तरी अनुत्तरीतच होती. पण त्यांचे उत्तर मिळणार आहे. सगळे प्रश्न सुटणार आहेत. ती वेळ जवळ येत आहे.

आमची काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू एक्सप्रेस वे सोडून, दुर्गा टेकडीच्या कच्च्या रस्त्याला लागली. साहेब पाठीमागे तणावग्रस्त अवस्थेत बसलेले होते. त्या तणावाने गाडीचे तापमान वाढल्यासारखे जाणवत होते. साहेबांनी टायची गाठ सैल केली. 'पुढे काय वाढून ठेवले आहे.' हा विचार आमच्या दोघांच्याही मेंदूत चालला होता.
आजूबाजूचे वातावरण कोमल संधीप्रकाशाने न्हाऊन निघाले होते. त्या संधिप्रकाशात टेकडीचा परिसर उजळून निघाला होता. दुर्गा टेकडीचा परिसर मोठा होता . टेकडीच्या तीन बाजूंनी मोठमोठ्या दऱ्या होत्या.चौथ्या बाजूला चढणीची वाट होती. टेकडीच्या माथ्यावरुन चोहोबाजूंनी पसरलेला सह्याद्री पर्वत भव्यदिव्य दिसत होता. पश्चिमेकडच्या टोकावरून खाली पाहिले की, एक रुंद आणि खोल दरी नजरेत भरत होती. त्या दरीच्या वरच्या टोकावर, कुठेतरी एक नदी उगम पावत होती. उगमाजवळ तीचे पात्र अरूंद दिसत होते. पुढे बरेच अंतर पार केल्यावर, तिचे पात्र रुंद झालेले दिसु लागले. हिरव्या चित्रावरून एखादी पांढरी रेष ओढावी, त्याप्रमाणे ते नदीचे पांढरे पाणी, त्या हिरव्या परिसरात उठून दिसत होते. त्या नदीपात्राकडे  एकटक बघत शैला उभी होती .
शैला! जेमतेम तिशीची असेल . कदाचित दोन तीन वर्ष जास्तही असतील. किंवा मग कमी पण असु शकतात. गौरवर्ण, सतेज चेहरा ,उठावदार अवयव, प्रमाणित बांधा, कमनीय देह, रेखीव मूर्तीवर कोरावे असे प्रमाणबध्द अवयव, धनुष्याचा आकार असलेले पण कोमल असे ओठ ,आणि चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास अशा सर्वगुणसंपन्नतेमुळे ,खरंतर तिच्या वयाचा अंदाज बांधणे कठीण होऊन जाते .ती कोणाला पंचविशीची वाटू शकते. तर कोणाला अगदी विशीचीच!
वय काहीही असो! पण सुंदरतेचा एक उत्तम नमुना देवाने बनविला आहे, यात यत्किंचितही शंका नाही.
पण एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूल करावीशी वाटते .
तिच्या चेहऱ्याकडे निरखुन पाहीले की, त्या सुंदर आत्मविश्वासी चेहऱ्यामागे अजून एक चेहरा दिसुन येतो.

बेरकी,स्वार्थी ,खुनशी, कारस्थानी, बेफिकीरी अशा कित्येक कित्येक नकारात्मक गुणांनी तो  चेहरा व्यापित झालेला दिसेल .तिच्या प्रेमात पडतांना साहेबांना केवळ तिचा, सुंदर चेहरा दिसला असेल .आणि ते तिच्या प्रेमात पडले असतील. पण आता तिचा दुसरा चेहरा ,त्यांच्या समोर आला तेव्हा त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली होती. एवढा घातकी चेहरा घेऊन ,शैला मात्र मजेत त्या नदीकडे बघत उभी होती. त्या नदीच्या सौंदर्याचा आस्वाद घेत ती सारंगची वाट बघत होती. तिची पांढऱ्या रंगाची मर्सिडीज पाठीमागे शंभर मीटर अंतरावर एका झाडाखाली लावली होती. थोडासा अंधार पडल्यामुळे ती अंधुक पांढुरकी दिसत होती. थोडासा संधिप्रकाश , वातावरणात प्रकाशाची पखरण घालत होता.
अचानक पाठीमागून गाडीचा आवाज आला .लाल रंगाची ऑडी क्यु सेव्हन तिच्या दिशेने येत होती. गाडी सारंगची होती. तिने संथपणे पाठीमागे वळून बघितले .गाडीतुन खाली उतरून ,सारंग झपझप पावले टाकत, शैला उभी होती त्या ठिकाणी पोहोचला. त्याने शैलाकडे एक मादक कटाक्ष टाकला. तीनेही एक लाघवी हास्य ओठावर आणत, त्याला प्रतिउत्तर दिल.
"आलास?"
त्याच्याकडे वळत, हसत ती म्हणाली.
"आलो! तू एवढ्या तातडीने बोलावले मग यावेच लागले ना!"
तोही हलकेच हसत म्हणाला.
"कशी आहेस?" - तो
"मी मजेत! तू सांग? - ती
"मीही मजेत. - तो 
एकमेकांच्या हातात हात देऊन अभिवादन झाले .त्या साध्या कृतीतही त्याला एक मोहकता जाणवली. तिच्या  हाताचा तो अंगावर शहारे आणणारा स्पर्श , काळ्याभोर डोळ्यातील सुन्न करणारा एक वेगळाच आत्मविश्वास, बोलण्याची हालचालींची, हसण्याची आकर्षक शैली, क्षणभर त्याच्या अंगात एक थंडीची लहर उमटून गेली. सभोवतालचे वातावरण त्या परिस्थितीला अनुकूल बनत चालले होते. वातावरणातील ती मोहक धुंदी हळुहळू दोघांच्या शरीरभर भिनत चालली होती. हवेतील गारवा क्षणाक्षणाला वाढत जात होता. त्या गारव्याने शरीरावर अलगद काटे उभे राहत होते. हात,पाय,ओठ आणि सारे शरीर थरथर कापत होते.  दोघांच्या नजरा एकमेकांत गुंतल्याने ,त्यांना सभोवतालच्या थरथर कापणाऱ्या थंडीचे काहीच जाणवत नव्हते. कदाचित डोळ्यातील औष्णिक गरमीने त्यांना ऊर्जा येत असावी. किंवा मग, एकमेकांतील नजरांनी अंगभर पसरत जाणारी गरमी, कदाचित बाहेरच्या थंडीला दाद लागू देत नसेल. बाहेरची थंडी वाढत जाऊ लागली. थंडीच्या समांतर त्यांच्यातील आंतरिक उष्णताही वाढत होती. किती क्षण, किती पल ते एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते हे सांगणे कठीण झाले असते. आता अंगातील उष्णता उच्च कोटीला पोहोचली होती. आता एक प्रकारची अधीरता दोघांना लागली होती. कोणीतरी ती अधीरता  नष्ट करायला हवी होती. कोणीतरी आधी पुढाकार घ्यायला हवा होता. सारंग दोन पावले पुढे झाला. त्याचीच प्रतिकृती करत शैलानेही दोन पावले पुढे टाकले. दोघात आता केवळ एक पावलांचे अंतर उरले होते. तेही अंतर त्यांना आता नको होते. सारंगने अधीरतेने, तेही अंतर कमी केले. शैलाने एकदा मनगटातील सोनेरी घड्याळावर नजर टाकली. स्वतःशीच गूढ हसत, तीने सारंगला अलगद मिठी मारली. तिच्या हसण्याचा अर्थ त्याला कळालाच नाही. तिच्या त्या मादक स्पर्शापुढे, त्या गूढ हास्याकडे, त्याचे कधीच दुर्लक्ष झाले होते.

टेकडीवरचे एक डावे वळण मागे टाकून, आमची गाडी टेकडीच्या सपाट माथ्यावर आली. प्रखर दिव्यांचा झोत टेकडीवर पडल्याने, आजूबाजूचा सगळा परिसर उजाळून गेला. अजून पूर्ण अंधार पडलेला नव्हता. थोडासा संधिप्रकाश वातावरणाचा स्थिर होता. अचानक गाडीच्या त्या प्रखर दिव्यांच्या झोतात, एक दृश्य डोळ्यावर पडले. जे नको होते तेच समोर उभे होते. माझे स्टेरिंग वरचे हात कंप पावत होते. पाठीमागे बसलेल्या साहेबांकडे, मी नजर वळवली. त्यांच्या चेहऱ्यावरचा क्रोध, प्रचंड वेगाने बाहेर उफाळून येत होता. त्या समोरच्या दृश्याकडे ते एकटक बघत होते. एखाद्या मोठ्या शक्तीच्या चुंबकाने, एखाद्या क्षीण शक्तीच्या लोहकणाला जखडून ठेवावे, तसेच साहेब गाडीच्या सीटवर स्तब्ध होऊन बसले होते. ना हालचाल, ना कंपन. एकदम स्थिर अवस्थेत असल्यासारखी, त्यांची समाधी लागली होती. मोठा मानसिक धक्का बसल्यावर होते, तशी अवस्था आता त्यांची होती.
टेकडीच्या एका कडेला, गाडीच्या दिव्याच्या अगदी समोर, शैला मॅडम आणि सारंग सर एकमेकांच्या मिठीत विसावलेले दिसले. समोरचे ते दृष्य मनःपटलावर उमटायला, पाच दहा सेकंदाचा अवधी लागला. पण तेवढ्याच अवधीत साहेबांची अवस्था बधिर होऊन गेली. क्रोध, दुःख, आवेग, आश्चर्य, वेदना या सगळ्या नकारात्मक भावना, सरसर चेहर्‍यावर उमटून गेल्या. ते जागेवरच सुन्न झाले. पण त्याक्षणी पुढच्या दृश्याचा त्यांना बोध झाला. वेगाने गाडीचा दरवाजा उघडून ते बाहेर गेले. मी अजूनही पुढचे ते दृष्य पाहण्यात गुंतून गेलो होतो. नेमके अशा अवस्थेत काय करावे? हेच कळेना. गाडीतून उतरून साहेबांना सावरावे! की गाडीतच बसुन समोर घडेल ते गपगुमान पहावे!
तेवढ्यात अचानक काही शब्द कानावर आले.

"केतन, गाडीच्या बाहेर येऊ नकोस. जे घडणार आहे, त्यात अजिबात  हस्तक्षेप करू नकोस. पुन्हा आता कोणाचा, जीव वाचवायचा प्रयत्न करू नकोस! मी ते खपून घेणार नाही. आहे तिथेच बसुन रहा."
साहेब माझ्याकडे बघत म्हणाले.
मागचा प्रसंग पुन्हा येथे घडेल. पुन्हा मी इथे कोणाच्यातरी मरणाच्या आडवा येईल. अस त्यांना कदाचित वाटत असेल.  म्हणून त्यांनी  मला आधीच धमकी दिली. मग काय! मी तसाच गाडीत बसून राहिलो. काचेतून समोर घडणारा देखावा पाहण्यात दंग झालो.
अचानक समोर साहेबांना बघून सारंग हडबडून गेला. त्याला हे अगदी अनपेक्षित होते. शैलाच्या मिठीत क्षण दोन क्षण अनुभवलेलं  सुख, कुठल्या कुठे निघून गेलं. त्या जागी आता प्रचंड भीती निर्माण झाली. आपण रंगेहात पकडले गेलो, ही वेदनाच असह्य होती. त्याचा चेहरा अपराधीपणाने काळवंडून गेला. पण अगदी त्याउलट शैलाच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते. अगदी निर्विकार चेहऱ्याने ती उभी होती. ती येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याच्या पूर्ण तयारीत असल्यासारखी भासली. जणू काही हे घडणार आहे, हे तिला आधीच माहित होते. तिला हे सगळे अपेक्षितच होते, एवढी निर्विकार उभी होती ती. सर्व काही सुनियोजित असल्यासारखे वातावरण तयार झाल होते.

"सारंग! हरामखोर!! नीच, नालायक!!
हे असे अक्षम्य पाप करण्या अगोदर, तुला थोडी शरम वाटली नाही का? तुझ्या बायकोच्या बाहुपाशात मी असा पहुडलो असतो, आणि तू मला तशा अवस्थेत पाहिले असते तर, ज्या वेदना तुला झाल्या असत्या, त्या वेदना मला याक्षणी होत आहेत. किंवा मग अशाच पद्धतीने एखाद्या मोकळ्या मैदानावर, आम्ही एकमेकांच्या मिठीत सापडलो असतो तर तुला कसे वाटले असते? तू त्याक्षणी माझा जीव घ्यायला, माझ्यावर तुटून पडला असतास. तू खूप मोठा गुन्हा केला आहेस. खूप मोठे पाप केले आहेस. या जगात पुरुष काहीही सहन करू शकेल. कितीही मोठा पराभव स्वीकारू शकेल. पण स्वतःच्या बायकोला असा, परपुरुषाच्या बाहुपाशात पाहू शकणार नाही. कधीच नाही! या महापातकाचा दंड तुला मिळणार! तो मीच देणार! "

असं म्हणत असतानाच, साहेबांनी पाठीमागे शर्ट खाली लपवलेली बंदूक बाहेर काढली. सहा गोळ्यांची, काहीशा सोनेरी रंगाची ती बंदूक बघुन, सारंग  थरथर कापत मागे सरकला. हात जोडत म्हणाला,
"श्रीकांत (साहेब) हे बघ, माझ अगोदर ऐकून तरी घे.
आधी तू ती बंदूक खाली ठेव."
"तू एक शब्दही बोलू नकोस .
तुझी बाजू ऐकून घेण्याच्या मनस्थितीत मी नाही."
असं म्हणत साहेब अजून दोन पावले पुढे गेले.
"श्रीकांत क्षणभर माझ ऐकून तरी घे.
यात माझा काहीच अपराध नाही.
मी शैलाला आयुष्यात अस एकांतात प्रथमच भेटतोय. आमची केवळ जुजबी ओळख आहे.
तीनेच फोन करून मला येथे बोलावले.
काहीतरी निकडीचे काम असेल म्हणून इथे आलो.
पण इथे आल्यावर, शैलाचा अविर्भावच असा होता की, आम्ही एकमेकांच्या बाहुपाशात अडकलो.
खऱ्या - खोट्याची जरातरी शहानिशा कर.
श्रीकांत माझी  सगळी बाजू तरी ऐकून घे."
सारंग भीतीच्या सावटाखाली बरंच काही बोलत गेला. पण क्रोधाने पेटलेल्या साहेबांच्या कानावर, त्या शब्दांचा काहीच अर्थबोध झाला नाही. त्यांनी एकवार शैलाकडे नजर टाकली. तिच्या चेहर्‍यावर हास्याची एक लकेर उमटलेली त्यांना दिसली. कदाचित तिला वाटत असावे,
' हा काय गोळी चालवणार! गोळी चालवायला मोठी हिंम्मत लागते. अशा अशक्त माणसाकडून हे काम होणे शक्यच नाही. कदापि शक्य नाही!'
तिच्या चेहर्‍यावरचे ते भाव कदाचित साहेबांना कळाले असतील. त्यांच्यातील क्रोधाचा  अजून स्फोट झाला. डोळ्यात विस्तवाचे निखारे फुलावेत, तसा लाल रंग उतरला. सोबतच काही अश्रू दाटून आले. दुःखाचा, क्रोधाचा एक प्रचंड उमाळा वेगाने मेंदूतून बाहेर आला.
बंदुकीचा चाप ओढला गेला. फट्ट असा आवाज करत, गोळी  सारंगच्या कवटीतून बाहेर पडली. सारंगचा निष्प्राण देह खाली जमिनीवर आपटला. शैलाच्या तोंडून एक मोठी किंकाळी बाहेर पडली.

बंदुकीच्या गोळीचा आवाज ,आणि त्यापाठोपाठ शैलाच्या किंकाळीचा आवाज, हवेच्या गतीने माझ्या कानापर्यंत आला.
एक हास्याची लकेर माझ्या ओठावरउमटली .संकेत आला होता! आता माझी बारी होती . पुढील कृती माझी होती .काय समजायचे ते मी समजलो .गाडीचा दरवाजा उघडून मी बाहेर आलो. टेकडीच्या त्या टोकावर पोहचायला मला एक-दोन मिनिटांचा अवधी लागला असेल. तेथे पोहोचलो तेव्हा, तेथील दृश्य सुन्न करणारे होते. सारंगचा निष्प्राण देह खाली जमिनीवर पडलेला होता .डोक्याच्या मधोमध गोळी लागल्यामुळे, डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होते. रक्ताचा डोह बाजूला साचला होता. बिचारा सारंग हाकनाक बळी गेला. क्षणभर शैलच्या मिठीत राहण्याची एवढी मोठी शिक्षा त्याला मिळाली होती. साहेबांनी शैलावर बंदूक रोखलेली होती . दोघांमध्ये जेमतेम आठ नऊ फुटांचे अंतर असेल. साहेबांच्या डोक्यात अजूनही तेवढाच क्रोध होता.

"साली ! तुझ्यासारखी बाई जन्मालाच का येते ?
एका माणसाने तुझी भूक भागली नाही का ?
तुझ्यासाठी एवढा जीव ओवाळून टाकला. आणि तू एवढा मोठा विश्वासघात माझ्याशी केला .तुला ज्या गोष्टीचा मोह झाला, ती तुझ्या पुढ्यात आणून दिली. गाडी ,बंगला, तसेच लागतील त्या भौतिक सुविधा तुला दिल्या. शरीरसुख दिले. फिरणे , शॉपिंग ,टूर सगळं काही तुला सोबत घेऊन केलं. मग काय कमी राहिले तुला? शरीराची भूक भागविण्यासाठी ,तु ह्या सारंग सोबत संबंधात राहिलीस. नीच! साली !! "
साहेब मनातील खदखद तिच्या पुढ्यात मांडत होते .बंदूक तिच्यावर रोखून होती .तिच्यावरचे लक्ष त्यांनी तसूभरही हलू दिले नाही. ती घातकी आहे .काहीही करू शकते. ही जाणीव त्यांना असावी. साहेबांनी शैलावर बंदूक रोखलेली माझ्या नजरेत पडली .माझ्या डोक्यात एकदम सणक गेली. रक्त वेगाने वर उफाळून आले. साहेबांचा काही नेम नव्हता ते प्रचंड क्रोधात होते.
शैलावर कधीही गोळी झाडून शकतात. ही जाणीव माझ्या मेंदूत उमटली . शैलावर गोळी! माझ्या प्राणप्रिय शैलावर गोळी!! मी असताना असे घडेलच कसे. मी ते खपून घेईल का? शैलावर गोळी चालवायच्या अगोदर, साहेब संपले पाहिजेत. हो संपलेच पाहिजेत! ते नाही संपले तर ,शैला कशी वाचेल. आमची योजना कशी सफल होईल? आम्ही आखलेला तो, ना भूतो ना भविष्य! असा मेगाप्लॅन कसा यशस्वी होईल?  शैला वाचलीच पाहिजे! निदान माझ्यासाठी तरी. आमच्या प्रेमासाठी तरी! वाचलीच पाहिजे!
आधीच पूर्वतयारी म्हणून, शर्ट खाली लपवलेली ती काळ्या रंगाची बंदूक माझ्या हातात होती. समोर शैलावर बंदूक रोखलेला साहेबांचा हात होता. फटsss असा आवाज झाला. पाठोपाठ एक किंकाळी घुमली. ती वेदनेने तडफडत असलेल्या साहेबांची होती. माझ्या गोळीने काम केले होते. नेम अचूक लागला होता.  साहेबांचा उजव्या हाताचा पंजा चेंदामेंदा झाला होता. त्यांच्या हातातील बंदुक लांब जाऊन पडली होती.
क्षण दोन क्षण काय झाले काहीच कळले नाही. साहेब वेदनेने तडफडू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना ,आश्चर्य, भीती दाटून आली. शैलाचा वेध घेणारी गोळी त्यांच्यावर कशी उलटली?  हेच त्यांना कळेना. नेमके काय झाले?कसे घडले? माझ्या हातात बंदूक कशी आली? कुठून आली?याचा क्षणभर बोधच होईना. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली. माझ्या हासर्‍या चेहर्‍याकडे त्यांची नजर गेली. मी जोरजोरात हसत होतो. आता माझ्या हसण्यात शैलाचाही आवाज मिळाला .आम्ही दोघेही त्यांच्या चेंदामेंदा झालेल्या हाताकडे बघून, हसू लागलो. आमच्या हसण्याचा आवाज टिपेला पोहोचला .आमच्या हसणाऱ्या चेहऱ्यांकडे, ते अगदी वेड्यासारखे बघू लागले. त्यांच्या चेहर्‍यावर अनेक प्रश्‍नांचे जाळे उमटले होते. हे काय घडलं? मी त्यांच्यावर गोळी का चालवली? हे सगळे प्रश्न त्यांना पडले असावेत. माझ्या हातातील बंदुक, शैलाचे आणि माझे हसणे, हसत हसत शैलाने मला मारलेली मिठी , हे सगळे पाहिल्यावर त्यांना काहीतरी कल्पना आली असावी .साहेबांनी धडपडून उठायचा प्रयत्न केला. कसतरी ते उभे राहिले .पण हाताची वेदना मेंदूपर्यंत गेली .पुन्हा धडपडून ते खाली पडले. तशाही अवस्थेत त्यांनी तो प्रश्न केलाच,
"ही सगळी योजना तुमच्या दोघांची होती ना?
मला आणि सारंगला तुम्ही सापळ्यात पकडलं ना?
सारंग फक्त तुमचा मोहरा होता .खरा गुन्हेगार तर तू होतास. केतन! विश्वासघातकी! तू आणि ही शैला!"
या प्रश्नांनी पुन्हा ,मी आणि शैलजा मनमुराद हसलो.  आमच्या हसण्याने, साहेब चवताळून माझ्या अंगावर धावून आले. माझी कॉलर एका हाताने पकडून, मला जोरात हिसके देत बडबडू लागले,
"का केलसं हे? तुझा काय अपराध केला होता मी? अरे रस्त्यावर बेकार फिरत होतास , तू आणि तुझा भाऊ. त्यावेळी मी कामावर ठेवले तुम्हाला. तुला माझा खाजगी ड्रायवर केल मी. केवढा विश्वास टाकला तुझ्यावर. सन्मानाने वागवल तुला. लागेल ती मदत केली. तरीपण तू हे पातक कराव! का केलंस अस? सांग? सांग?"
त्यांनी हाताने माझी कॉलर धारली. त्यांच्या चेंदामेंदा झालेल्या हाताचे रक्त माझ्या शर्टवर लागले .मी एक धक्का देत त्यांना खाली ढकलले. पुन्हा एकदा हसत त्यांच्याकडे बघत म्हणालो,

" सांगतो साहेब!सांगतो ! पण ऐकण्याची शक्ती आहे का तुमच्यात? येथे घडलेली प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग आमच्या योजनेचा भाग होता . सारंग तर आमच्या योजनेचा एक मोहरा होता. केवळ एक बळीचा बकरा. तुम्हाला जाळ्यात अडकवण्यासाठी बांधलेला बकरा. आणि तुम्ही त्या जाळ्यात अडकलेच. साहेब! शैलाचा खरा प्रियकर मी आहे! मी! सारंग नाही. एक वर्षांपूर्वी आमचे एकमेकांवर प्रेम जडले. तुम्ही तुमच्या व्यवसायात व्यस्त असायचे. तेव्हा आम्ही एकत्र आलो. दिवसेंदिवसआमच्यातील प्रेम वाढत गेले. आम्हाला आता स्वातंत्र्य हवे होते. मोकळेपणा हवा होता. मनसोक्त सुख उपभोगण्यासाठी पैसा हवा होता. पण आमच्या प्रेमात ,तुम्ही अडसर ठरत होता. आम्हाला तुमचा पैसा हवा होता. पण तो तुम्ही संपल्याशिवाय मिळणार नव्हता. त्यासाठी तुम्ही आणि तुमचा पार्टनर सारंग संपणे गरजेचे होते.  खूप विचार करून आम्ही एक योजना बनवली. ज्या योजनेत तुम्ही दोघे संपले पाहिजे. आणि तुम्हीच एकमेकांना संपवले पाहिजे. आणि अगदी तंतोतंत तशीच योजना आम्ही बनवली. जी आता पूर्णपणे यशस्वी झाली आहे. तुम्हाला तो निनावी फोन मीच केला होता. सारंग तर आयुष्यात प्रथमच शैलाला भेटला. तोपण मूर्ख! मागचा पुढचा विचार न करता, बिनधास्त तीच्या मिठीत शिरला. आणि हाकनाक बळी गेला. साहेब तुमच्या मार्फत आम्ही सारंगला संपवले. आणि आम्ही तुम्हाला संपवणार. म्हणजे  तुम्ही व्यवसायाचे दोन्ही मालक नष्ट होणार. आपसूकच व्यवसायाची सगळी मालकी शैलाकडे येणार. माझ्या शैलाकडे! आणि हो, तुम्हाला पुन्हा एक प्रश्न पडला असेल. मग मी तुम्हाला आत्महत्या करण्यापासून का वाचवल?  तर साहेब, त्यालाही कारण आहे. तुम्ही जर तेथे आत्महत्या केली असती, तर सगळा व्यवसाय सारंगकडे गेला असता. तसेच तुमच्या आत्महत्येची चौकशी शैलापर्यंत आली असती. तेच आम्हाला नको होते. म्हणून तर एवढी धडपड करून  तुमचा पुलावर जीव वाचवला .सारंगला तुम्ही मारलेच आहे. आता आम्ही तुम्हाला मारणार .म्हणजे तुम्ही दोघंही संपणार. व्यवसायाच्या वादातून तुम्ही एकमेकांना संपवलं, हे न्यायालयात सिद्ध करायला आम्हाला काहीच कठीण जाणार नाही. सगळं कसं योजनेनुसार उत्तमरीत्या घडवून आणले."

  साहेब हे सगळं ऐकून स्तब्ध झाले. शैला आणि मी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन , त्यांना संपवतोल हेच कदाचित  त्यांना सहन होत नसावे. मागचा-पुढचा विचार न करता, आपण सारंगला गोळी घातली. याचा त्यांना पश्चाताप होऊ लागला. त्यांनी एक नजर शैलाकडे टाकली. पुन्हा माझ्याकडे ती नजर वळवली. त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळेच उमटलेले मला दिसले. मी सावध झालो. त्यांनी एकदम, त्यांच्या हातून खाली पडलेल्या ,त्या बंदुकीवर झडप घातली. ती उचलण्याचा प्रयत्न केला. पण ती बंदुक त्यांनी हातात घेण्यापूर्वीच, मी माझ्या बंदुकीतुन गोळी त्यांच्या दिशेने झाडली. गोळी साहेबांच्या छातीतून आरपार झाली. शरीराला दोन तीन हीचके देऊन, साहेब निष्प्राण होऊन खाली जमीनीवर पडले. साहेब संपले होते.

आमची सगळी योजना यशस्वी झाली होती. शैला धावत माझ्या मिठीत येऊन विसावली. आम्ही आता निर्धास्त होतो. आमचे पुढचे भविष्य सोनरी होते. आम्ही जिंकलो होतो. येथून पुढे आमचेच राज्य होते.
आमच्यावर शंका येईल, असा प्रत्येक पुरावा आम्ही नष्ट केला. थोडे तणावग्रस्त असलेले वातावरण सैल झाले. आम्ही निघण्याची घाई केली.

पण आता सभोवतालचे वातावरण काळवंडून आले होते. आजूबाजूचा थंडावा वाढला होता .कदाचित बाजूलाच दोन निष्प्राण देह पडलेले असल्याने अस वाटत असेल.  वातावरणातील गंभीरता वाढू लागली. आजूबाजूचा परिसर कमालीचा शांत बनू लागला . सारंग संपला होता .साहेबही त्यापाठोपाठ संपले होते. आता शैला आणि मी केवळ दोघांचेच अधिराज्य होते. सोबत गडगंज पैसा मिळणार होता.एवढे सगळे असतानाही त्याचा आनंद मुळीच जानवेणा. काय होतय काहीच कळेना. वातावरणात एक प्रकारची भीती निर्माण झाली होती. अंधारात एखादा शत्रू दबा धरून बसला आहे ,अशी जाणीव मेंदूतून उमटू लागली. शरीरात घुसमट वाढू लागली. तेवढ्यात शैलाने अलगद मला पाठीमागुन मिठी मारली .पण त्या मिठीने मला आनंद होण्याऐवजी वेदनाच झाल्या. श्वास गुदमरल्यासारखा झाला. मी धडपडत स्वतःला तिच्या मिठीतुन सोडून घेतले . माझी घुसमट वाढूच लागली . एवढी थंडी असूनही शरीर ओले ओले वाटत होते .कदाचित घाम आला असावा .पण एवढ्या थंडीत घाम तरी कसा येईल? गळ्याभोवती तर खूपच ओले ओले लागत होते.  थोडेसे ओले, थोडेसे गरम असे काहीसे जाणवत होते.माझी घुसमट आता खूपच  लागली. त्याबरोबर वेदनाही वाढू लागली .मी हात गळ्याजवळ नेला. गळा तर पूर्ण ओला झाला होता. गळ्याला लावलेला हातही पूर्ण ओला झाला होता. एवढा घाम अचानक कसा आला? मी हात अगदी डोळ्यासमोर आणला. आणि भीतीची एक सणक मेंदूपर्यंत गेली. हात रक्ताने ओला झाला होता. गळ्याला मोठी चीर पडली होती. त्यातून भळाभळा रक्त वाहत होते.  ते सगळे अंगभर पसरले होते. त्यानेच सगळे शरीर ओले ओले जाणवत होते. शरीरातील शक्ती क्षीण होत चालली होती. वेदना प्रचंड वाढत होती. आता मला प्रत्यक्ष मृत्यू समोर दिसत होता. हे कसं झालं? हाच प्रश्न लाखो इंगळ्या डसाव्यात, तसा मनाला डसु लागला.
आणि अचानक त्या प्रश्नाचा उलगडा मला झाला.आत्ताच काही क्षणापूर्वी, शैलाने पाठीमागून मारलेली मिठी मला आठवली.हो तिचीच मिठी! त्यानंतरच शरीर ओले ओले झाले होते. मी धडपडत शैलाकडे वळालो. माझ्यापासून सात-आठ फूट अंतरावर शैला उभी होती. तिच्या चेहऱ्यार तेच ते नेहमीसारखे गूढ हास्य होते. तेच ते घातकी हास्य जे  सारंगला, साहेबांना आणि आता मला मरण्यापूर्वी दिसत होते. आणि तिच्या उजव्या हातात दीड फूट लांबीचा तो सुरा होता. तीने पाठीमागुन मिठी मारली ती यासाठीच. ती मिठी नव्हतीच. ती माझ्या गळ्यावरून सुरी फिरविण्याची लकब होती. मला आता आश्चर्य, संताप ,भीती ,वेदना, उत्सुकता या सगळ्या प्रश्नांनी घेरले.  माझ्या हातात केवळ काही अवधीच शिल्लक होता. मरण्यापूर्वी एका प्रश्नाचे उत्तर मला हवे होते. "शैला असं का केलंस?"
अगदी सारंगला आणि साहेबांना मरण्यापूर्वी पडलेला हाच प्रश्न, आता मला पडला होता.

  "केतन! माझा प्रियकर केतन.इथपर्यंत योजना आपल्या दोघांची होती. पण आता इथून पुढे खरी योजना आम्हा दोघांची आहे. माझी आणि त्याची. माझ्या खऱ्या प्रियकराची आणि माझी. ती तिच्या गाडीकडे बोट करत म्हणाली. त्या पांढर्‍या रंगाच्या गाडीचा दरवाजा उघडला गेला. हळूच एक व्यक्ती बाहेर आला. अंधार असल्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता. पण मी, चालण्याच्या लकबीवरून त्याला ओळखू शकत होतो. हो नक्कीच ओळखू शकत होतो! का नाही ओळखणार. सख्ख्या भावाची चालण्याची लकब कोण नाही ओळखणार. दहा फुटांच्या अंतरावर तो आला. हो तोच! कबीर! माझा सख्खा भाऊ!  या सगळ्या योजनेचा खरा मास्टरमाइंड! खरा कर्ता!  शैला आणि कबीरच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बघत तुम्हाला ही घटना सांगून झाली. ती सांगता-सांगता माझा प्राण कधी निघून गेला हे कळलेच नाही...

**समाप्त
अभिप्राय नक्की सांगा.

वैभव देशमुख.
9657902283

कथालेख

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

29 Jun 2020 - 5:43 pm | कानडाऊ योगेशु

भन्नाट लिहिली आहे कथा! ट्विस्टवर ट्विस्ट...!
फ्कत एक खटकले...

हळूच एक व्यक्ती बाहेर आला

हळूच एक व्यक्ती बाहेर आली असे हवे आहे.

बाकी ह्या निमित्ताने मी पयला!

vaibhav deshmukh's picture

29 Jun 2020 - 6:33 pm | vaibhav deshmukh

खूप खूप धन्यवाद सर...
correction करतो.

बोलघेवडा's picture

29 Jun 2020 - 7:06 pm | बोलघेवडा

वा!!! वा!! मस्त कथा आणि ट्विस्ट भरी टाकले आहेत. एकदम डोळ्यासमोर आली. शेवटी टोटल परफेक्ट लागली आहे. येऊदेत अजून!!!

प्रमोद देर्देकर's picture

29 Jun 2020 - 9:03 pm | प्रमोद देर्देकर

मस्त कथानक आहे पण तुम्ही सगळं वर्णन न करता ही कथा लिहायला पाहिजे होती.
तुम्हाला व्यनी केलाय पहा.

कोण's picture

29 Jun 2020 - 10:12 pm | कोण

खूप छान कथा!

सर्वांचे अगदी मनापासून आभार.
पुढील लिखाणात तुमच्या सूचनांचा नक्की विचार करेल.

वीणा३'s picture

30 Jun 2020 - 2:06 am | वीणा३

छान कथा !!!

विजुभाऊ's picture

30 Jun 2020 - 5:54 am | विजुभाऊ

झकासच.
ट्वीस्टवर ट्विस्ट आहेत कथेत

तुषार काळभोर's picture

30 Jun 2020 - 8:57 am | तुषार काळभोर

आता गोष्ट वाचतो
आणि परत प्रतिसाद देतो. :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Jun 2020 - 4:14 pm | ज्ञानोबाचे पैजार

एखादा तमिळ सिनेमा पाहिल्यासारखे वाटले.... पण लैच कॉप्लीकेटेड आहे

आणि बर्‍याच गोष्टी अनकलनिय आहेत,

उदा सारंग पहिल्याच भेटीत टेकडीवर खुलेआम शैलाच्या मिठीत कसा काय बरं शिरला? येडा होता का तो? त्याला जरा सुध्दा संशय आला नाही?
मोठा बिझनेसमन असलेला (साहेब) नुसत्या एका फोन कॉलवर कोणतीही शहानिशा न करता डायरेक्ट राजाराम पुलावरुन उडी मारायला निघतो.
शैला केतनला आपल्या जाळ्यात का ओढते? अन मग शेवटी त्याला का मारुन टाकते?
अशा अजूनही काही गोष्टी खटकल्या.

आणि हो अजून एक, राजाराम पुलावरुन उडी मारुन जीव द्यायला त्याच्या खालुन काय गंगा नदी वहाते का? उडी मारलेला माणुस गुढगा भर पाण्यात उभा राहिल, फार तर कमरेइतक्या गाळात रुतेल पण आरामात चालत बाहेर येइल, त्या पेक्षा सारसबागेच्या तळ्यात उडी मारली तर माणूस पटकन मरेल.

पैजारबुवा,

सर राजाराम पूल काल्पनिक आहे. कथा पुण्यात घडते हे समजून चालू नका. आणि कथेत बर्‍याच गोष्टी गृहीत असतात. सगळ्याच गोष्टींचे स्पष्टीकरण कथेत टाकायचे म्हणले, तर कथेचा विस्तार उगाच वाढतो. कथा बरोबर बेचव होते. बर्‍याच गोष्टी गृहीत धराव्या लागतात. एकाच भेटीत प्रणय होऊ शकत नाही का? एकांत भेटला की काहीही शक्य आहे...

शैलावर साहेबांना आधीच शंका असते, आनि त्या फोन ने खात्री होते.

कपिलमुनी's picture

5 Jul 2020 - 11:48 pm | कपिलमुनी

>> पुण्यात घडते हे समजून चालू नका

किती हे धारिष्ट्य ! पुण्यात घडते हाच मेन टीआरपी होता ना .

गुल्लू दादा's picture

30 Jun 2020 - 11:10 pm | गुल्लू दादा

छान झालीये कथा.

रातराणी's picture

1 Jul 2020 - 12:56 am | रातराणी

मस्त कथा आवडली..

जेम्स वांड's picture

1 Jul 2020 - 1:19 pm | जेम्स वांड

वातावरणनिर्मिती आहे राव, खूप आवडलं लेखन, तुम्ही क्राईम पेट्रोल करता पटकथा लिहायचं मनावर घ्या मजा येईल पाहायला तुमची कला पडद्यावर साकारलेली.

अगदी मनापासून आभार आपले. तुमचा अभिप्राय लिहिण्याची अजून उमेद देत आहे.... thank you very much..

छान कथा !! कलाटण्यां वर कलाटण्या . सर्वात मोठी कलाटणी
निवेदक व प्रेक्षक केतन आहे असे वाटत असताना शैलाने
केतनला मीठी मारल्या वर त्याचे अंग ओले ओले व गरम वाट् लागले . तिथेच कळते की शेैला व कबीर खरे मास्टर माईंड आहेत. पण केतनला सुरयाचा स्पर्श किंवा वेदना जाणवत कशी नाही? अर्थात चुका काढणे सोपे. पण रहस्य कथा लिहित रहा, व अशाच धक्कादायक लिहित रहा. नूतनमा

कपिलमुनी's picture

5 Jul 2020 - 11:51 pm | कपिलमुनी

कबीर शैला ला मारतो आणि सांगतो ,
कबीर आणि सारंग च्या बायको चे लफडे आहे.
त्यांना इस्टेट आणि पैसे हवे म्हणून
श्रीकांत, सारंग , शैला मरायला हवेत त्यांच्या खुनाचा ब्लेम केतन वर जाऊन कबीर आणि सारंग ची बायको ऐश करणार

तुषार काळभोर's picture

6 Jul 2020 - 7:42 am | तुषार काळभोर

मला परत एकदा बघावं लागलं की नक्की सारंग कोण, श्रीकांत कोण, शैला कोण, कबीर कोण, बायको कोण....

पुण्यातच घडवावी लागेल कथा आता.टीआरपी चा प्रश्न आहे.