भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ५ - प्रचिती: प्रकरण १४ - समाधी

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
22 Jun 2020 - 4:28 pm

या प्रकरणापासून 'प्रचिती' या पाचव्या विभागाची सुरूवात होते. अध्यात्म हा वास्तविक पाहता प्रचितीचाच प्रांत आहे. या विभागातल्या पहिल्या प्रकरणात समाधीविषयीचा रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:

ध्यानसाधनेच्या प्रगत टप्प्यावर आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचे सजग भान येणे किंवा ध्यान साधत असताना अत्यंत उत्कटपणे ध्येय वस्तूत (उदा. नाम, प्रतिमा, मूर्ती इ.) अखंडपणे लीन होणे ही अवस्था साधकांना अनुभवता येते. पौर्वात्य जगतातल्या अध्यात्मिक साहित्यात ही प्रचिती दर्शवण्यासाठी 'समाधी' हा शब्द प्रचुरतेने वापरला जातो . नानाविध अध्यात्मिक संप्रदायांमधे तसेच विविध धर्मांमधे समाधीच्या वेगवेगळ्या अवस्था आणि नानाविध प्रकारांचे सविस्तर वर्णन केलेले आढळते. प्रत्येक संप्रदाय आपापली आगळीवेगळी परिभाषा वापरत असल्याचे तसेच आपापल्या पद्धतीने समाधीचे वर्गीकरण करत असल्याचे तसेच समाधीच्या विविध प्रकारांची प्रतवारी ठरवत असल्याचेही स्पष्टपणे दिसून येते.

श्री. रमण महर्षी समाधीचे ढोबळमानाने तीन प्रकारांमधे वर्गीकरण करत असतः

१. सहज निर्विकल्प समाधी: ज्याने/ जिने (अध्यात्मिक साधना सफल झाल्यावर) अंततः अहंतेला कायमचेच दूर सारले आहे, अशा ज्ञानसिद्ध व्यक्तीची ही निरंतर टिकणारी स्थिती असते. या समाधीचे वर्णन करत असताना वापरलेले सहज (स्वाभाविक) आणि निर्विकल्प (अचल, कुठलाही फरक न पडणारी) हे दोन्ही शब्द अत्यंत महत्वाचे आहेत. सहजस्थितीत असलेला ज्ञानी सामान्यजनांप्रमाणेच लौकिक जगतात सहजतेने कार्यरत राहू शकतो. स्वरूपबोध हीच सहजस्थिती झालेल्या ज्ञान्याला तो स्वतः इतरेजनांपेक्षा आगळा वेगळा आहे असे वाटत नाही. ज्ञान्याला तो स्वतः आणि बाह्य जगत हे विभक्त स्वरूपात न दिसता समग्र अस्तित्वाची एकरस आणि अखंड अनूभूति विनासायास येत राहते. अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट अविभाज्य असलेल्या स्वरूपाचेच प्राकट्य आहे अशी अनूभूती ज्ञान्याला मिळते (संत ज्ञानेश्वरांनी याच अनुभूतीच्या सैद्धांतिक विवेचनाच्या जोडीलाच 'चिद्विलास' - एकाच चैतन्याचा विलास या स्वरूपात नितांत सुंदर असे काव्यात्म वर्णन देखील केलेले आहे).

२. केवल निर्विकल्प समाधी: ही आत्मसाक्षात्कारापूर्वीची पायरी आहे. या स्थितीत असताना प्रयत्न न करताच स्वसंवेज्ञता अनुभवता येते, मात्र ती क्षणिक स्वरूपाची असते. या स्थितीत अहंकाराचा संपूर्ण नाश झालेला नसतो. केवल निर्विकल्प समाधीत साधकाचे देहभान हरपते. स्वरूपाची किंवा स्वसंवेज्ञतेची तात्पुरती झलक मिळत असली, तरी केवल निर्विकल्प समाधी स्थितीत कर्मेंद्रियांचा तसेच ज्ञानेंद्रियांचा योग्य तो उपयोग करणे किंवा व्यावहारिक जगात कार्यरत असणे साधकाला शक्य होत नाही.

३. सविकल्प समाधी: सविकल्प समाधी स्थितीत अथक प्रयत्न करून आत्मभान टिकवावे लागते. ती किती काळ टिकेल हे पूर्णपणे समाधी अवस्था टिकवण्यासाठी साधक करत असलेल्या प्रयत्नांवर अवलंबून असते. स्वरूपावरचे ध्यान डळमळीत झाले, की स्वसंवेज्ञतेची प्रचिती विरत जाते.

प्रश्नः सहज समाधीचा अनुभव साधकाला कधी प्राप्त करता येतो?
रमण महर्षी: अगदी सुरूवातीपासूनच. (याच नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की) केवल निर्विकल्प समाधी वर्षानुवर्षे अनुभवत आलेल्या साधकाने जर वासनांना मुळापासून नष्ट केलेले नसेल तर त्याला मुक्ती मिळत नाही.

प्रश्नः सहजावस्था प्राप्त होण्याआधी निर्विकल्प समाधीचा अनुभव येणे अनिवार्य आहे का?
रमण महर्षी: कुठल्याही प्रकारच्या समाधीमध्ये (मग ती निर्विकल्प असो अथवा सविकल्प) कायमचे स्थित होणे हीच सहजस्थिती असते. देहभान असे आपण कशाला म्हणतो? जड देहात चैतन्याचा आविर्भाव झाला की देहभान येते. अस्तित्वात आपल्याच ठायी परिपूर्णतेने नांदणारे असे एक विशुद्ध चैतन्य आहे. देह आणि देहभान या दोन्हींचा या विशुद्ध चैतन्यावर कुठलाही प्रभाव पडत नाही. देहभान असेल किंवा नसेल तरी ते निरंतर जसे आहे तसेच राहते. साधकाने जर या विशुद्ध चैतन्यातच स्वत:ची मांड पक्की केलेली असेल, तर मग देहभान हरपले काय किंवा जागृत राहिले काय, त्याने काय फरक पडणार आहे? समाधी अवस्थेची अत्यंत उत्कट प्रचिती येणे हा देहभान पूर्णपणे हरपण्याचा एक फायदा आहे, मात्र सर्वोच्च असलेली ज्ञानसिद्धी प्राप्त झाल्यानंतर देहभान असल्याने किंवा नसल्याने ज्ञानसिद्ध व्यक्तीला त्याने काहीच फरक पडत नाही.

प्रश्नः समाधी आणि (जागृती, निद्रा आणि सुषुप्तीपेक्षा वेगळी असलेली) चौथी अवस्था किंवा तुर्यावस्था एकच आहेत का?
रमण महर्षी: समाधी, तुर्या किंवा निर्विकल्प या सगळ्यांचा भावार्थ एकच आहे, तो म्हणजे आत्मस्वरूपाचे सतत भान असणे. जागृती, निद्रा आणि सुषुप्तीपेक्षा वेगळी असलेली चौथी अवस्था किंवा विशुद्ध चैतन्यमय अवस्था असा तुर्यावस्था या शब्दाचा अर्थ होतो. ही चौथी अवस्था चिरंतन असते आणि बाकी तीन अवस्था तिच्यातच ये जा करत राहतात. मन त्याच्या उगमस्थानामध्ये हृदयकेंद्रात विलीन होत असल्याची तसेच ते निश्चल होत असल्याची सजग जाणीव तुर्यावस्थेत असते. असे असले तरी माफक प्रमाणात का होईना विचारांचे अतिक्रमण तुर्यावस्थेत होत राहते. तुर्यावस्थेत इंद्रियांचे कार्य देखील काही अंशी का असेना सुरूच राहते . निर्विकल्प स्थितीत इंद्रिये पूर्णपणे शांतवल्याने तसेच विचारांचे काहूर पूर्णपणे थांबल्याने तिला एक अत्यंत उत्कट आणि आल्हासदायक स्थिती असे म्हणावे लागेल. सविकल्प समाधीतही तुर्यावस्था प्राप्त करता येते.

प्रश्नः समाधी अवस्था उल्हसित करणारी असते की ती हर्षोन्मादाचा अनुभव देते?
रमण महर्षी: प्रत्यक्ष समाधी अवस्थेत निव्वळ असीम शांतताच नांदत असते. समाधीतून बाहेर येत असताना मन पुनरूज्जीवीत होते, त्या वेळी समाधीतल्या शांततेच्या आठवणीने हर्षोन्माद अनुभवता येतो. भक्तीमार्गात हर्षोन्मादाचा अनुभव आधी येतो. आनंदाश्रू येणे, तनु रोमांचीत होणे, आवाज सद्गदित होणे इ. अष्टसात्विक भावांच्या स्वरूपात हर्षोन्मादाची भावस्थिती प्रकट होते. अंततः अहंता पूर्णपणे लयाला गेली आणि सहजस्थितीचा लाभ झाला की अष्टसात्विक भाव आणि हर्षोन्माद आपोआप नाहीसे होतात.

प्रश्नः (ध्यानाच्या प्रगत अवस्थेत) मन जेव्हा स्वरूपात विलीन व्हायला लागते तेव्हा कित्येक वेळा साधकांना भयगंड ग्रासून टाकतो असे दिसते.
रमण महर्षी: समाधी अवस्थेत प्रवेश करताना अल्पशा प्रमाणात अहंतेची जाणीव मागे शिल्लक राहिल्याने (अहंता स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी निकराचे प्रयत्न करत असल्याने) साधकांना भयग्रस्ततेचा तसेच शरीराचा थरकाप होत असल्याचा अनुभव येतो. जेव्हा कणभरही अवशेष मागे न ठेवता अहंतेचा पूर्णपणे नाश होतो तेव्हा साधक विशुद्ध चैतन्याने व्यापलेल्या विस्तीर्ण अवकाशात स्थिर होतो. असे स्थैर्य लाभले की भयग्रस्तता संपून फक्त आनंदच मागे उरतो. शरीराचा थरकाप होणे देखील थांबते.

प्रश्नः समाधी स्थितीचा अनुभव घेतल्यानंतर साधकांना सिद्धी देखील प्राप्त होतात का?
रमण महर्षी: सिद्धींचे प्रदर्शन मांडायचे असेल तर ते ज्यांच्यासमोर मांडायचे अशा इतरेजनांची (अर्थातच द्वैतभावाची) गरज भासणे अनिवार्य आहे . सिद्धींचे प्रदर्शन करत असलेल्या व्यक्तीकडे (अद्वैत/ कैवल्य) ज्ञानाचा अभाव असतो हे उघड आहे. त्यामुळे कवडीमोल सिद्धींबाबत विचार न केलेलाच बरा. ज्ञानप्राप्ती हेच साधकाचे अंतिम ध्येय असले पाहिजे, तसेच कैवल्य ज्ञान प्राप्त करण्याची एकमेव अभिप्सा त्याच्या ठायी असली पाहिजे.

प्रश्नः माझे मन त्या (समाधी/ निर्विचार) स्थितीत क्षणभरही बुडून जात नाही.
रमण महर्षी: त्या साठी "मी सच्चिदानंद स्वरूप आहे, माझे खरे अस्तित्व मन आणि इंद्रियगोचर घडामोडींपलीकडे आहे" अशी दृढ श्रद्धा असणे अनिवार्य आहे (श्रद्धावान लभते ज्ञानम).

प्रश्नः (मी सश्रद्ध आहे) असे असले तरी स्वरूपात लीन होण्याचे सगळे प्रयत्न उधळून लावणारा मन हा एक कधीच ताब्यात न येणारा चौखूर उधळलेला जणू उन्मत्त अश्वच आहे असा अनुभव मला येतो.
रमण महर्षी: मन सक्रिय राहिल्याने काय फरक पडतो? त्याचा सारा खेळ स्वरूपाच्या आधारानेच तर चालतो. मनाचे सारे खेळ एकीकडे सुरू असतानाच तुम्ही आपले लक्ष सजगपणे स्वरूपावर स्थिर ठेवा.

पुरवणी:

ध्यानधारणेच्या प्रगत टप्प्यावर साधकांना येत असलेल्या अनुभूतीचे पावसच्या प. पू. स्वामी स्वरूपानंदांनी असे वर्णन केले आहे:

इंद्रिये प्रबळ, सर्वथा ती जाण, मनाच्या आधीन, होती मग
प्राणामाजी मन, एकवटे पूर्ण, मिळो लागे प्राण, शून्यालागी
ऐसा योगाभ्यास, स्वभावे चि होय, नेणो कैसा काय, धनंजया
आणि तयाचिया, मनो-मंदिरात, येवोनि रहात, समाधी ती

सहजस्थिती प्राप्त व्हावी किंवा आत्मलाभ व्हावा या साठी लागणारी अर्हता स्वामीजींच्या शब्दात अशी आहे:
यापरी जो काम-, क्रोध लोभातून, मोकळा होवोन, राहे स्वस्थ
तयासि च लाभे, एवढे गहन, आत्मप्राप्ति धन, धनंजया

(संदर्भः स्वामी स्वरूपानंद कृत अभंग ज्ञानेश्वरी नित्यपाठ स्तोत्र)

धर्मआस्वाद

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

22 Jun 2020 - 5:50 pm | शाम भागवत

झकासच.
_/\_

सोत्रि's picture

22 Jun 2020 - 6:56 pm | सोत्रि

समाधीचे प्रकार आणि टप्पे सुंदर समजावले आहेत!

_/\_

- (मुमुक्षु) सोकाजी

कोहंसोहं१०'s picture

23 Jun 2020 - 1:20 am | कोहंसोहं१०

खूप सुंदर विवेचन....धन्यवाद लिहिल्याबद्दल!!

अर्धवटराव's picture

23 Jun 2020 - 10:10 am | अर्धवटराव

_/\_

मूकवाचक's picture

23 Jun 2020 - 2:47 pm | मूकवाचक

सर्वश्री शाम भागवत, सोत्रि, कोहंसोहं१० आणि अर्धवटराव, आपण आवर्जुन प्रतिसाद दिला त्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद.