जाहिरात जीवनाचं अविभाज्य अंग आहे. फार प्राचीन काळापासून जाहिराती केल्या जाताहेत. त्या आज वाचल्या की हसू येतं. जाहिरातदार सकाळपासूनच आपलं काम सुरु करतात. आपण आंघोळीला कोणता साबण वापरायचा, केसांना कुठलं तेल लावायचं म्हणजे ते'लंबे ,घने,काले'होतील. स्वयंपाकात कुठलं तेल वापरायचं की तुम्ही बटाटेवड्यासारखे चमचमीत पदार्थ नेहमी खाऊ शकाल. जीवनसाथी कसा निवडावा,त्यासाठी कोणत्या डॉट कॉम वर जायचं, गुंतवणूक कुठे करावी, कुठल्या जंतुनाशकानं फरशी स्वच्छ करावी,दात कशानं घासावेत म्हणजे दाताबरोबरच 'मसूडे'मजबूत होतील, क्रिम्स, डायपर, निळा रंग वापरून सँनिटरी पँडस्,चप्पल, शूज, लस्सी, दूध, कुकर,बिस्किट,नाश्ता! हुश्श! दमले. हे सगळं आपण वापरावं हे ते ठरवतात. किंवा सतत ऐकवत राहतात.
जाहिरातीत सॉफ्ट टारगेट म्हणजे मुलं आणि स्रिया. त्यांना एखादी वस्तू हवी असेल तर ती घरात आणावीच लागते हे गृहीतक. तेच मुख्य गिऱ्हाईक असं मानलं जातं. त्यामुळे जाहिरातीत मुलं (आगाऊ, ज्यादा शहाणी) आणि गृहकृत्यदक्ष स्त्रियाच असतात.
जाहीराती कर्कश वाटतात ते खरंच आहे. नॉर्मल कार्यक्रमापेक्षा त्या वरच्या स्केलवरच डब केलेल्या असतात. लोकांचं लक्ष वेधावं म्हणून.
आता आसपास कोरोना आहे तर प्रत्येक साबणाच्या वापरामुळं विषाणू नष्ट होतात, हे आवर्जून सांगितलं जातं. आत्मनिर्भर शब्दाची चलती आहे सध्या, त्यामुळे आपलं उत्पादन स्वदेशी आहे हे आवर्जून सांगितलं जातं. तसंही कुठलं उत्पादन स्वदेशी आणि कुठलं परदेशी हे सामान्य माणसाच्या लक्षात राहात नाही (माझ्याही). सामान्य ग्राहक जाहिरातीत जे नाव सतत पाहतो, ऐकतो ती वस्तू तो नकळत मागतो.
स्त्रीच्या देहाचं प्रदर्शन जाहिरातीत घडतंच. ही खूप जुनी गोष्ट झाली आता. पुरुषप्रधानता इथंही दिसते. जाहिरातीतला साबण नट्या प्रत्यक्षात वापरत असतील असं वाटत नाही. तुम्ही गोऱ्या दिसा, सुंदर दिसा, का ? तर तो जवळ घेईल. तुमची त्वचा मुलायम करा, का ? तर पुरुषाला स्पर्शसुख मिळेल.
जाहिरातीतल्या आया नेहमी सुंदर, फ्रेश, न कंटाळलेल्या, शर्टावर सॉस सांडलं तरी न रागावणाऱ्या असतात. 'इझी है' असं गोड हसून म्हणत त्या कपडे धुतात (लॉकडाऊनचा काळ नसतानाही) भांडी घासतात. मग वेळ वाचला म्हणून केक करतात. मुलानं ग्लास फोडला तरी चिडत नाहीत. मला माझी आई आठवते. कपड्यावर डाग पडला किंवा बशी फुटली तर ती महिषासुरमर्दिनीचा अवतार धारण करायची. मार तर इतका बसायचा की सांगता सोय नाही. माझ्या आईचं उदाहरण कशाला? माझंच उदाहरण देते ना. पोरांनी कुठे काही सांडणं, कपडे खराब करणं वगैरे केलं तर इतकी भयंकर वैतागायची.. माझी साडीसुद्धा झाडझूड करताना वर खोचलेली आणि पदर कमरेला आवळलेला, रौद्र रूप, केस विस्कटलेले मी कुठून सुंदर दिसणार जाहिरातीतल्या आईसारखी. मुलं घाबरणारच.
जाहिराती जागा व्यापतात. वेळ व्यापतात. पंधरा मिनिटांचा प्रत्यक्ष एपिसोड तर पंधरा मिनिटं जाहिराती. टी.आर.पी. वाढला की जाहिराती वाढतात. टी.आर.पी.वाढण्यासाठी तडजोडी कराव्या लागतात. जाहिराती सिझनल असतात. थंडीत कोल्डक्रिम.उन्हाळ्यात शीतपेयं,एसी,कूलर्स.रवरीप ,रब्बी हंगामापूर्वी खतं बियाणं. वेळेनुसार त्या बनवून लोकांवर आदळत राहणं म्हणजे कष्टच.
पण एवढे कष्ट करुन,एवढे पैसे खर्च करुन बनवलेल्या जाहिराती प्रेक्षक बघतात का? तर बहुधा नाही. ते ब्रेक आला की टीव्ही म्यूट करतात. लहानलहान कामं उरकतात. ताटं वाढून आणणे, गादी घालणे, पाणी पिणे, शू ला जाऊन येणे, फोन करणे, मेसेज पाठवणे, प्लेटस् सिंकमधे ठेवणे, रात्रीचे ब्रशिंग करणे. खरं की नाही? तुम्हीही करता ना? हाईट ऑफ इट म्हणजे अँकर म्हणतो "कही जाईएगा मत। हम जल्दही वापस आ रहे है।"
म्हणजे प्रेक्षक जाहिराती बघत नाहीत हे अँकर खुल्लमखुल्ला कबूल करतो. ज्यांनी पैसे दिल्यामुळे, ज्यांच्या जिवावर प्रेक्षक मालिकेचा तो एपिसोड बघतात, त्याच जाहिराती लोक बघत नाहीत हे अँकर कबूल करतो. त्यावर कोणताही जाहिरातदार निषेध,आक्षेप नोंदवत नाही? का तेही स्वतःच्या जाहिराती बघत नाहीत? हा यातला आंतर्विरोध आहे.
लहानपणी मी आईबरोबर सिनेमा पाहायला जायची. सिनेमाच्या आधी जाहिराती आणि फिल्म डिव्हिजनची डॉक्युमेंटरी असायची. त्यावेळी मला जाहिराती फार आवडायच्या. सिनेमा समजायचा नाही त्यामुळे आवडायचा नाही. लहानपणचा काळ गेला. आता जाहिराती आवडेनाशा झाल्या. त्या डोळ्यांवर, कानावर आदळतात. मी म्यूट करुन डोळे बंद करते आणि मालिकेसाठी अंदाजाने डोळे उघडते.
आपण वयाने मोठे झालो पण जाहिराती आहेतच.
जाहिरातींशिवाय आपल्याला बाजारात कोणती नवी उत्पादनं आली आहेत , हे कसं समजणार?तेव्हा जाहिराती होत्या,आहेत आणि पुढेही असणार आहेत. त्या म्हणजे एक नेसेसरी इव्हिल आहेत.
प्रतिक्रिया
18 Jun 2020 - 12:37 pm | चांदणे संदीप
मस्त कॉमेडी लिहिलंय! मज्जा आली.
लहानपणीच्या जाहिराती आतापेक्षा मजेशीर वाटतात. कदाचित लहानपणी टिव्हीत येणारी प्रत्येक गोष्ट मन लावून बघत असल्यामुळे. आता माझ्या मुली रोज घरात स्वयंपाक चालू असताना कणीक घेऊन खेळतात आणि खेळताना, "घाला पिठामध्ये तेल, मग कोन बनवा रे...." म्हणत असतात. =))
सं - दी - प
18 Jun 2020 - 10:12 pm | वीणा३
मस्त लिहिलंय आजी. आपण नाही पण लहान मुलं प्रचंड मन लावून जाहिराती बघतात. मला भारतीय जाहिराती खरं तर आवडतात, अमूल, फेविकॉल, टायटन (मेंन विल बी मेन सिरीज ). छोटीशी कॉमेडी गोष्ट ३०-४० सेकंड मध्ये सांगितलेली असते.
18 Jun 2020 - 10:52 pm | पहाटवारा
काही जाहिराती खरंच एकदम बघण्यालायक असतात आणी उत्तम जाहिरात बनवणे कौशल्याचे काम आहे.
18 Jun 2020 - 11:00 pm | Prajakta२१
छान लिहलेय काही जाहिराती चांगल्या वाटतात
आणि काही खरेच गंडलेल्या आहेत
19 Jun 2020 - 10:28 am | सुबोध खरे
पंधरावी विद्या आणि पासष्टावी कला - जाहिरात कला असे याचे सार्थ नामाभिमान आहे.
एवढ्या प्रचंड जाहिराती करून टिनपाट सिनेमे एक दोन आठवड्यात १००-२०० कोटींचा गल्ला जमवतात यात काय तें समजून घ्या.
आजही मोठ्या मोठ्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून यशस्वी झालेले अभियंते व्यवस्थापनाच्या संस्थांमध्ये व्यवस्थापकीय विषयात विपणन (एम बी ए -मार्केटिंग) घेऊन पदवी / पदविका घेऊन आपल्या बुद्धीचा वापर लोकांच्या गळी आपला माल उतरवताना पाहून आश्चर्य आणि वैषम्य वाटतं.
पण ते WPM (whosoever pays me more) या नात्याने आपली अभियांत्रिकीची ४ वर्षे फुकट घालवून आवडीचे उत्पादन सोडून नावडीच्या विपणनाच्या मागे लागतात याचे मूळ कारण
त्यात असलेला पैसा
30 Jun 2020 - 11:41 pm | शशिकांत ओक
विदारक सत्य ..
19 Jun 2020 - 4:28 pm | चौथा कोनाडा
आजच्या जाहिरातींबद्दल काय बोलणार ? जुन्या जाहिराती पहिल्या , ऐकल्या की ओल्ड इज गोल्ड याची खात्री पटते !
नॉस्टेल्जिक करणारा लेख ! जुन्या जाहिराती क्लासिक गाण्यांप्रमाणे ऐकतो/पाहतो !
19 Jun 2020 - 4:58 pm | गवि
जाहिरातींमुळे काय ओळ तोंडात घट्ट बसेल सांगता येत नाही.
अगदी खूप वर्षांपूर्वी "दो बकेट पानी अब बचाना है रोजाना" बसलं होतं.
त्याआधी "डाबर जनम घुट्टी"
आता आता "आल्या बांगरच्या गोणी"
आणि अगदी लेटेस्ट "घाला पिठामध्ये तेल"
चालायचंच. नवीन काहीतरी आल्यावर आधीचं आपसूक बंद पडतं.
19 Jun 2020 - 6:16 pm | गामा पैलवान
गवि,
अगदी नेमकं बोललात पहा. आमच्या वेळेस कोणी 'काय झालं' म्हणून प्रश्न विचारला तर 'बाळ रडंत होतं' असा प्रतिसाद यायचा. कोणी जर विचारांत गढून गेला असेल तर त्याच्या पाठीवर थाप मारून विचारायचो की 'कसला विचार चाललाय रामू, गोठ्याला पत्रे कोणते बसवून घेऊ?'.
आ.न.,
-गा.पै.
19 Jun 2020 - 7:42 pm | गवि
हा हा खरंच, आठवलं.
थोड्या काळापूर्वी कार्यालयात सहज "क्या चल रहा है?" विचारलं की "फॉग चल रहा है" उत्तर यायचं.
19 Jun 2020 - 11:34 pm | पहाटवारा
अजून थोडे असेच जुने ...
अरे ये पीएसपीओ नही जानता !
पूरे घर के बदल डालूंगा !
आपकी पारखी नजर और निरमा सुपर ...
अन रेडिओवरचे अगदी लहानपणी ऐकलेले ..
"शिनोलेट नं आनलं पाणी .. शेतं पिकली सोन्यावाणी ! शिनोलेट ! " .. हे खरं तर फिनोलेक्स होतं पण लहानपणी शिनोलेट असंच ऐकु यायचं :)
19 Jun 2020 - 7:46 pm | गवि
बोगस किंवा बोरिंगशिरोमणी जाहिरातींत खालील काहींना ऐतिहासिक स्थान द्यावं:
एकेकाळी या जाहिराती एका ब्रेकमध्ये चार चार वेळा लावून लावून मेंदू बधीर करून टाकला होता.
एअरटेल , और ये दुनिया जो गोल नही है. एकूण एअरटेल आणि साशा चेत्री कॉम्बिनेशन.
आणि
सब कुछ उड गया लेकिन आपका परफ्युम नही उडा
20 Jun 2020 - 12:05 am | Prajakta२१
कॅडबरी फाईव्ह स्टार ची thankyou बेटा तू ने कुछ नाही किया
अशक्य लॉजिक आहे
हॉर्लिक्स ची नवरा बायकोची बाटली भरताना ची जाहिरात
कल्पना चांगली आहे
dettol liquid ची जाहिरात चांगली आहे
20 Jun 2020 - 8:30 am | जेडी
वोडाफोन चे जुजू चांगले लक्षात राहिले, त्यांचा कुत्राही. फेव्हिकॉल च्या अॅडस पण भारी वाटतात. लिज्जतचा कार्रुम कुर्रम म्हणतानाचा ससा नक्की लक्षात आहे, रसनाची मुलगीही गोड होती.
20 Jun 2020 - 9:10 am | mrcoolguynice
पण काही जाहीराती तर प्रबोधनात्मक वाटाव्यात....
उदा. (जाहिराती तील सिच्युएशन)
धार्मीक दंगली नंतर त्यातला फोलपणा लक्षात आल्यावर... गावातील लोक आपल्या फालतू अस्मिता कुरुवाळत बसण्या एवजी स्वतःची आयडेंटिटी आपला मोबाईल नंबर करतात...
सिंगल मदर्सच्या लग्नातील तिच्या मुलीचा सन्मानजनक सहभाग...
मासिक पाळ्यांचा अनाठायी केला जाणारा बाऊ...
बुलिंग करणाऱ्या विरुद्ध उठवलेला आवाज... गलेकी खिचखीच बाजूला सारून.
रिक्षाचालकाच्या मुलीने गरीब परिस्थितीत संघर्ष करून, बँकेत मिळवलेली नोकरी, आणि त्यामागील आपल्या गरीब बापाबद्दल आदर.
शाळेतील शिक्षक यांना त्यांच्या म्हातारपणी , विद्यार्थ्यांनी दिलेली भेट..
शहरी भागातील पाण्याचा अंदाधुंद वापर, तर ग्रामीण भागात ओंजळभर पाणी मिळण्यासाठी लागणारे भाग्य...
हा विरोधाभास...
५ वर्ष्या पूर्वी फेकुगिरी करून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या , येऊ घातलेल्या निवडणूक पूर्व दर्शना वर, त्याला गेल्या ५ वर्ष्यात काय दिवे लावले ? असं विचारण्याचा कर्तव्याचे स्मरण (कडक चहा पिल्याने)
आपल्या आनंदी सन समारंभात, एकट्या शेजाऱ्यां, इतर धर्मियांना, घरगडी/ड्रायवर/पोलीस/अग्निशामक दल
अश्या अहोरात्र झटणारे परंतु फेसलेस गटाला,
आपल्या आनंदात सहभागी करण्याचे म्यांनर्स, जाणीव, कृती..
स्वतः विदेशात राहून भारतीयांना देशभक्ती शिकवणाऱ्या दीड शहाण्यांपेक्षा, भारतात सध्या उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून खेड्यातील मुलांना अभ्यासा साठी लाईट पुरवण्याचे इनोव्हेशन करणाऱ्या बद्दल आदर.
रक्तदान, अवयव दान, स्वच्छता अशे अनेक फुटकळ सोशल मेसेज तर ढिगाने मिळतील जाहिरातीत...
20 Jun 2020 - 9:16 am | अभ्या..
कफ कॉलर अंडर आर्म
गंदे करते सुबह शाम.
.
तो क्या मै खेलू नाहि कुदू नाही बन जाऊ मै भोंदुराम
20 Jun 2020 - 11:38 pm | भीमराव
रेड लेबल च्या हिंदू फोबिया ने भरलेल्या झैराती औकातीबाहेरचा स्टंट होता. सरकारी झैराती सुद्धा कमी नसतात. बलबीर पाशा कोण होता अजून नाही समजलं. गुड न्यूज लाला गुड न्यूज मधे नाचरा मोर्चा अजुन सुद्धा आठवतोय. झैराती इतक्या महत्त्वाच्या आहेत ना, सरकार आलं अब की बार म्हणत. बेंबी सुद्धा पेप्सी बघुन बोलायला लागते ही क्रियेटीविटी जबरा होती. सौंदर्य साबुण निरमा म्हटलं कि आख्खा गाणं आठवतो राव. फेवीक्वीक, फेवीकॉल आणि सिमेंट वाले सुद्धा भरपूर मनोरंजन करायचे. सैराट पिच्चर आला तेव्हा बघावं तिकडे जाहिरात सोडून चित्रपटाची गाणी च वाजत होती, मराठी चित्रपटांची इतकी जाहिरात ना कधी झाली ना कधी होणार.
नेमकं सांगायचं तर झैरात म्हणजे झोलझपाटा आहे. आणि करणं भाग आहे. कारण बोलणार त्यच्या एरंड्या विकणार, गप बसणार त्याचे गहु सडणार.
24 Jun 2020 - 6:19 pm | शेर भाई
बरेच तास खरेदीसाठी एखाद्या मॉल मध्ये वेळ खर्चून जेव्हा आमचा नंबर येतो, आणि काउंटरची ताई आकडा सांगते, तेव्हा तिला Card देताना Visa ची ही जाहिरात हटकून आठवते आणि एकदम जेम्स बॉंड झाल्याची feeling येते.
Link: - https://www.youtube.com/watch?v=x73x8sv4zE8
26 Jun 2020 - 7:04 am | शाम भागवत
भारी आहे
:)
25 Jun 2020 - 1:10 pm | बेकार तरुण
छान लिहिले आहे.
वरील उल्लेखलेल्या बर्याच जहीराती खूप आवडतात.
ह्यात भर अमूल च्या जहीरातींची.
तसच मोबाईल फोन नवे होते तेव्हा एक जहीरात यायची - एक बाई कानावर उजवा हात ठेवुन बोलत असते. ती कोणाशी बोलत आहे हे न समजल्याने एक मध्यमवयीन पुरुष त्याच्याशीच बोलत आहे हे समजुन बोलायला जातो तर ती बाई फोन थांबवुन त्याला "वन ब्लॅक कॉफी"ऑर्डर करते.... कोणाला आठवत आहे का ही जहीरात.
25 Jun 2020 - 1:31 pm | mrcoolguynice
एरिकसन
26 Jun 2020 - 7:07 am | शाम भागवत
गारगाय. काय इन्स्टंट पुरावा!!
केवळ एवढ्यामुळेच तुम्ही नेहमी माझं लक्ष वेधून घेता. अफाट मेमरी आहे बाॅ तुमची.
26 Jun 2020 - 7:25 pm | मदनबाण
माझ्या अनेक जुन्या आवडत्या झैरातीं पैकी एक :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LYRICAL: Ghamand Kar | Tanhaji The Unsung Warrior
29 Jun 2020 - 7:29 pm | आजी
चांदणे संदीप-लहानपणी पाहिलेल्या जाहिराती मजेदार होत्या कारण त्या मन लावून बघितल्यामुळे लक्षात राहिल्या"हे तुमचं म्हणणं खरंच आहे.आत्ताच्या बऱ्याचशा जाहिराती मला आवडत नाहीत.
वीणा३-छोटीशी कॉमेडी गोष्ट तीस,चाळीस सेकंदात सांगतात."हे तर खरंच.तेच तर स्कील आहे. दहा सेकंदाच्या सुद्धा जाहिराती असतात.
पहाटवारा-जाहिराती बनवणं हे कौशल्याचं काम हे तुमचं म्हणणं पटलं
Prajkta२१-तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.
सुबोध खरे-'त्यात असलेला पैसा'हे तुमचं कळीचं वाक्य आहे. धन्यवाद.
चौथा कोनाडा- 'नॉस्टल्जिक करणारा लेख". - तुम्ही जुन्या जाहिराती क्लासिक गाण्याप्रमाणे ऐकता,पाहता हे ऐकून कौतुक वाटलं.
गवि-नवीन काहीतरी आल्यावर आधीचं आपसूक बंद पडतं." हे खरंच. लोकांची स्मरणशक्ती अल्पजीवी असते.
गामा पैलवान-'बाळ रडत होतं'आणि 'कसला विचार करताय रामण्णा'हे मलाही अजून आठवतं.
पहाटवारा-शिनोलेट(फिनोलेक्स)हा.हा.हा.
जेडी- मान्य.
Mrcoolguynice-तुम्ही सांगितलेल्या प्रबोधनात्मक जाहिराती खरंच चांगल्या होत्या.
अभ्या-भोंदुरामची जाहिरात मला आवडते.विशेषतः आई आणि मुलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव.
ईश्वरदास-"गप बसणार त्याचे गहू सडणार,बोलणार त्याच्या एरंड्या विकणार."हे तुमचं मत रोचक.
शेरभाई-गमतीदार कॉमेंट मि.जेम्स बॉंड.
शाम भागवत-धन्यवाद.
बेकार तरुण-मला आठवते. आवडलीही होती तुम्ही सांगितलेली जाहिरात.
Mrcoolguynice- तुम्ही तर फोटोच पाठवलाय जाहिरातीचा!तुमच्या तत्परतेला दाद द्यावीशी वाटते.आणि जरा एखादं सोपं स्पेलिंग असलेलं नाव घ्या ना.
मदनबाण: धन्यवाद
29 Jun 2020 - 11:18 pm | योगविवेक
याला म्हणतात निगरगट्टपणा!
त्या जाहिरातीत ते अमक्या अमक्या असे म्हणतात म्हणून मी ती वस्तू, सेवा घ्यायला उत्सुक होतो ही पण एक काल्पनिक अपेक्षा असते... असो.