सर्व तयारी झाली.
होता करता प्रत्यक्ष कोर्टात जाउन, जज समोर माझी बाजू मांडण्याचा दिवस आला.
-------------------------------------------------------------------------------------------
कोर्टात हजर राहण्यासाठी जेव्हा कामावरुन सुटी घेण्याची वेळ आली, तेव्हा मनात परत एकदा विचार आला की आपण उगाच याच्या मागे लागलो आहोत का ?
एवढे करुन काही तरी फायदा होणार आहे का? पण बहुदा कुणीतरी आपल्यावर चुकीचा आरोप केला आहे ही कल्पना माणसाला सहन होत नसावी.
मी पुन्हा एकवार नीट आठवून पाहिले की आपण अनवधानाने तर सिग्नल तोडला नसेल ना ? पण माझ्या आठवणीनुसार अन तर्कानुसार सुद्धा मला हेच आठवले की मी सिग्नल वर थांबलो होतो अन मग त्या मुलाने संकेत दिल्यानंतर निघालो. त्यामुळे अनवधानाने पण अशी चूक झालेली नसावी.
अशी मनाची खात्री झाल्यावर मग मी शांत डोक्याने कोर्टाकडे जायला निघालो.
तिथे पोहोचलो तर तिथे एक मोठी जत्रा असल्यासारखी गर्दी होती.
मिळालेली नोटिस घेउन मी तिथल्या प्रवेशद्वारापाशी असणार्या छोट्या रिसेप्शनपाशी गेलो. त्या व्यक्तीने मग मला एका मोठ्या कोर्टरुम मधे जायला सांगीतले.
तिथे बहुदा अशा किरकोळ केसेस असणारीच सर्व मंडळी असावीत. पुढच्या बाजूला ऊंचावर जज आणी ऊजव्या बाजूला त्यांचे कारकून बसण्याची जागा होती.
समोरच्या बाजूला खुप सार्या बाकड्यांवर माझ्यासारखे लोक बसले होते. थोडे मागे वळून पाहिल्यावर मला बरेच पोलिसही तिथे असल्याचे दिसले.
सर्वसाधारणपणे जर तुमच्या केस-वरचा पोलिस तिथे त्याची बाजू मांडायला हजर नसेल तर आपसूक निकाल तुमच्या बाजूने लागतो हे मी वाचले होते.
मी मला तिकिट देणार्या पोलिसाला शोधत होतो पण मला ती काहि सापडली नाहि. माझ्या मनात थोडी आशा निर्माण झाली !
थोड्या वेळानंतर जज साहेब आले अन एकदम सर्वांना उभे राहण्याची जोरदार घोषणा झाली.
मग हळुहळु एक एक केस वाचली जाउ लागली अन ज्याच्यावर आरोप आहे त्याला जज विचारणा करु लागले की तुम्हाला गुन्हा मान्य आहे का ( Guilty OR no Guilty ). यात अनेक रोचक केसेस होत्या.
एका माणसाला - हा बहुदा बेघर व्यक्ती असावा अन डाउनटाउन मधे फुट्पाथ वर रहात असावा - असा आरोप होता की तो त्याचा सिग्नल नसताना रस्त्यावर पायी चालत होता ( Jaywalking ). त्याने पुष्कळ कट्कट केली की त्यावेळी तिथे कुठलीही रहदारी नव्हती आणी पोलिस उगाच त्याला त्रास द्यायला म्हणून हे करत आहेत. शेवटी जजने त्याला जो काही दंड केला होता, त्यावर त्याने पैसे नाहित असे सांगून हात वर केले. मग जजने त्याला समाज-सेवा (Community Service) करण्याचा हुकूम दिला.
माझ्या मनात आले .. या व्यक्तीसाठी, अशा समाज-सेवेने काहितरी फरक पडेल काय ? किंबहुना अशाच लोकांची काहि-तरी सोय करण्याच्या समाज-सेवेची गरज आहे अन अशा फुटकळ गोष्टींसाठी त्यांनाच जबाबदार धरण्यात अन असली काहितरी सजा देण्यात काहीच अर्थ नाही. उगाच कोर्टाचा अन सर्वांचा वेळ वाया !
अजून एक मजेदार केस होती. एका माणसाला सीट-बेल्ट न लावल्याबद्दल तिकिट मिळाले होते. त्याचे म्हणणे असे होते कि तो फक्त त्याच्या घरासमोर लावलेली गाडी गराज-मधे लावत होता... त्यावर जज ने विचारले की तुझ्या घरासमोरचा रस्ता खाजगी आहे की सिटीचा ( म्हणजे सरकारी ) आणी त्यावर बाकी काही वाहतूक चालते का ? त्याने हो म्हटल्यावर जज ने त्याचा दंड कायम ठेवला. बिचार्याला केवळ दोन मिनीटे सीट बेल्ट न लावल्याबद्दल शे-दोनशे डॉलरचा भुर्दंड पडला !
काहि लोकांनी दंड भरण्यास असमर्थता दाखवल्यावर जजने त्यांना महिन्यावारी हप्त्याने दंड भरण्यासाठी सवलत दिली. काहि लोकांनी त्यालाही नाही म्हंटल्यावर त्यांनाही समाज-सेवेचा दंड केला.
असे होता-करता, माझा नंबर आला. मी गुन्हा मान्य नाहि म्ह्टंल्यावर जज ने मला विचारले की तुला केस ट्रायल करायची आहे का? मी हो म्हटल्यावर त्याने मला तिकिट देणार्या पोलिसाला बोलविण्यास सांगीतले. माझ्या दुर्दैवाने ती पोलिस अधिकारी तोपर्यंत तेथे आली होती. तिला विचारण्यात आले की तुला ही केस ट्रायल मंजूर आहे का ? तिने जर नाही म्हंटले असते, तरी माझ्या बाजूने निकाल लागून तिथेच किस्सा संपला असता. पण तिने हो सांगीतले. त्यावर जजने मला सांगीतले की ट्रायल नंतर जो काहि निकाल लागेल त्यात दंडाची रक्कम / स्वरुप बदलू शकते ! याबद्दल मी आधी वाचले होते की जर या सुनावणी दरम्यान कळलेल्या माहितीवरुन जर जज ला वाटले की आधी सुनावलेला दंड कमी किंवा जास्ती आहे तर तो/ती ते बदलू शकतात. मनात म्हंटले, आता जे होईल ते पाहू !
मग जज ने काहितरी नंबर सांगून आमची रवानगी एका दुसर्या कक्षात केली.
तिथे जाउन परत बराच वेळ वाट बघत बसावे लागले. तो कक्ष म्हणजे एक साधीशीच खोली होती. पुढे एक टेबल अन खुर्ची होती ज्यावर जज बसणार अन बाकी समोर बर्याच खुर्च्या होत्या पण हे सर्व एकाच लेवल वर होते. तेथे गेल्यावर माझे दडपण थोडे कमी झाले. बहुदा एकदम ऊंचावर बसलेल्या जजसमोर बोलण्यापेक्षा माझ्या मनाला असे समोरा-समोर बोलणे थोडे सोपे असे वाटले असावे. मागच्या बाजूला बरेच पोलिस अन बहुदा खाजगी वकिल असावेत. इथे अशी रहदारीच्या गुन्ह्याची केस लढणारे बरेच खाजगी वकील असतात.
थोड्या वेळाने तिथल्या स्री जज साहेबा आल्या. इथे माझाच पहिला नंबर होता.
मग त्यांनी मला आणी पोलिस अधिकार्याला पुढे बोलवले व पोलिस अधिकार्याला नक्की काय झाले होते व कशाबद्दल तिकिट दिले आहे ते सांगायला सांगीतले.
तिने स्पष्टपणे मला स्टॉप साईनचा शाळेजवळील नियम तोडताना बघितल्याचे सांगीतले. आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी तिनेहि गूगलचे नकाशे आणून त्यावर माझी , तिची अन रहदारी नियंत्रक मुलांची अशा सर्व जागा हे व्यवस्थीतपणे आखून आणल्या होत्या. जज ने मला विचारले की हा नकाशा आणी या सर्वांच्या जागा योग्य आहेत का ?
मी हो सांगीतल्यावर त्यांनी विचारले की तुला काय म्हणायचे आहे. मी वर लिहिल्याप्रमाणे सर्व सांगीतले व हेही सांगीतले, की यात मुलांच्या गड्बडीमुळे असे झाले असावे. त्यावर जज ने पोलिस अधिकार्याला विचारले की मुलांनी काहि गड्बड केली असे तु काही पाहिले का ? त्यावर तिने नाहि असे सांगीतले व ती मुले योग्य प्रकारे सर्व रहदारी नियंत्रीत करत होती असे प्रशस्तीपत्र देउन टाकले !
मी पुन्हा एकदा तिथे असणारी गर्दी, मुलांची त्या मोठ्या दिशा-दर्शकांना सांभाळाताना होणारी कसरत, त्यांचे शिट्टीचे संकेत अन त्यामुळे बहुदा घोळ झाला असण्याच्या शक्यतेवर जोर दिला. मी वेग-वेगळ्या वेळी काढलेले फोटो दाखवून, त्यावेळी नक्की काय झाले असावे हे फक्त एका बाजूने पाहून समजणे शक्य नाही, हे जज ला सांगायचा प्रयत्न केला. पण जजने माझ्या बोलण्यावर काहिही विश्वास ठेवण्यास नकार दिला. मी आधी वाचलेल्या इतर लोकांच्या अनुभवातही हेच लिहिले होते, हे मला आठवले.
शेवटी मी तांत्रीक बाबींचा आधार घेण्याचे ठरवले आणी जज ला एक नियम-पुस्तीका काढून दाखवली.
त्यात एक नियम असा होता की अशा प्रकारचे मुलांचे पथक हे पाचवी अन सहावी च्या मुलांचे बनवावे.
पण योगायोगाने माझ्या मुलाच्या शाळेत फक्त पाचवी पर्यंतच वर्ग होते ! त्यामुळे अशा पथकामधे सहावीची मुले असण्याचा प्रश्नच नव्हता.
मी हि तफावत जज च्या नजरेस आणून दिली व सांगीतले की हे वाहतूक नियंत्रण नियमानुसार होत नाहि तेव्हा त्यांच्या नियंत्रणाअंतर्गत असलेला कुठला नियम तोडणे, हे शिक्षेसाठी पात्र ठरू नये.
यावर पोलिस अधिकारी मोठ्या आवाजात तावा-तावाने सांगू लागली की मी पाहिले, ती मुले अत्यंत योग्य प्रकारे वाहतूक नियंत्रीत करीत होती.
जजने तिला विचारले की तू त्या शाळेच्या मुलांच्या पथकाशी संलग्न आहेस का किंवा तू त्यांना यापूर्वी प्रशिक्षण दिले आहेस का ?
यावर तिने सांगीतले की नाहि , मी फक्त तिथे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी गेले होते.
यावर जज ने परत माझ्या कडून नियमांची प्रत मागवली आणी हि कुठुन मिळवलीस असे विचारले. मी दुसर्या एका कागदावर सर्व नियमपुस्तीका ज्या सरकारी वेबसाईट वरुन घेतल्या होत्या हे लिहून ठेवले होते. मी तो कागद जजला दिला.
बहुदा एवढ्यावर जजचे समाधान झाले असावे. त्यांनी आपला निकाल सांगीतला कि ज्यावेळी तुला हे तिकिट मिळाले त्या वेळी वाहतूक नियंत्रण नियमानुसार होते की नाहि हे नक्की न कळल्यामुळे तुला या दंडातून माफी मिळत आहे !!
अन तिने त्या तिकिटाच्या नोटिसवर एक शिक्का मारून मला कोर्टाच्या ऑफिस मधे देण्यास सांगीतले. माझ्या मनावरील ताण एकदम हलका झाला.
मी बाहेर आल्यावर एका मिनिटात ती पोलिस अधिकारीही बाहेर आली .. मी तिला अभिवादन करून धन्यवाद म्हटल्यावर, तिने अस्सा काहि एक जळजळीत कटाक्ष माझ्याक्डे टाकला अन काहिहि न बोलता तडक दाण-दाण पावले टाकीत निघून गेली.
मी पलिकडे असलेल्या ऑफीस मधे जाउन शिक्का मारलेली नोटिस दिली.
तेव्हा तिथल्या कारकुनाने त्या नोटिस कडे पाहिले अन माझ्या कडे पाहून म्हणाला .. " You are a fighter, Mr. ! "
मनात विचार आला .. केवळ माझ्या मनात मी काहिहि चूक केलेली नाही, हे पक्के असल्याने मला हि छोटिशीच का होईना, पण माझ्या दृष्टीने तात्वीक, अशी लढाई करण्याचे बळ मिळाले. त्या दिवशी मलाच माझ्याबद्दल काहितरी नवीन कळाले !
-पहाटवारा
प्रतिक्रिया
18 Jun 2020 - 10:32 am | विनिता००२
छान :) लढलात हे महत्वाचे!
18 Jun 2020 - 10:38 am | शा वि कु
वाचायला मजा आली.
18 Jun 2020 - 10:56 am | बेकार तरुण
छान अनुभवकथन .. वाचायला मजा आली..
19 Jun 2020 - 12:38 pm | रातराणी
असेच म्हणते ( वाचायला आणि ऐकायला बरे वाट्तात असे अनुभव. प्रत्यक्श हे काम तडीस न्यायला भरपूर चिकाटी पाहिजे. )
18 Jun 2020 - 11:33 am | संजय क्षीरसागर
> त्यात एक नियम असा होता की अशा प्रकारचे मुलांचे पथक हे पाचवी अन सहावी च्या मुलांचे बनवावे.
पण योगायोगाने माझ्या मुलाच्या शाळेत फक्त पाचवी पर्यंतच वर्ग होते !
नाही तर आरोपीला आपण गुन्हा केला नाही.
हे सप्रमाण सिद्ध केल्याशिवाय सुटका नसते.
18 Jun 2020 - 11:55 am | योगी९००
मस्त किस्सा...
वकिल म्हणून नाव काढाल. पण तयारी मात्र छान केली होती तुम्ही.
18 Jun 2020 - 12:25 pm | प्रचेतस
एकदम रोचक किस्सा.
खूप आवडला तुमचा लढा.
18 Jun 2020 - 3:53 pm | मराठी_माणूस
अभिनंदन
18 Jun 2020 - 4:27 pm | अभिजीत अवलिया
आवडला तुमचा किस्सा.
18 Jun 2020 - 4:41 pm | ज्ञानोबाचे पैजार
हमेरीकन पोलिसाची जिरवली हे फार म्हणजे फारच आवडल्या गेले आहे
पैजारबुवा,
18 Jun 2020 - 9:37 pm | वीणा३
आवडली तुमची केस, अभिनंदन जिंकल्याबद्दल !!!
18 Jun 2020 - 10:38 pm | पहाटवारा
धन्यवाद मंडळी !
-पहाटवारा
18 Jun 2020 - 10:50 pm | गणेशा
ग्रेट...
माझ्या india मध्ये अशी स्तिथी दंड आणि स्वच्छ कारभार असावा असे मला खुप मनापासुन वाटते..
19 Jun 2020 - 12:10 am | मनो
गणेशा, इतकं सरळ साधे नाहीये ते. इथे अमेरिकेतल्या पोलिसांच्या 'काळ्या' बाजू खरोखर फार वाईट आहेत. आपण भारतीय साधारण सुखवस्तू आणि सुशिक्षित असल्याने अश्या फुटकळ प्रकरणात आपला संबंध येतो, म्हणून ते बरं वाटतं ऐकायला, पण ते दुरून डोंगर साजरे आहेत ते कसे ते सांगतो. इथे पोलिसांना सैन्याच्या वरताण प्रशिक्षण दिले जाते, आणि तशी हत्यारे आणि तंत्रही वापरू दिले जाते. म्हणजे घरात घुसताना ते हातात भरलेली बंदूक समोर ठेऊनच शिरतील. अगदी थोडा संशय आला तरी पहिल्यांदा गोळी झाडतील आणि मग प्रश्न विचारतील. त्यामुळे एखादा झोपेत असेल किंवा सवयीने एखादी हालचाल करू जाईल तरी त्याला थेट आपले प्राणच गमवावे लागतात, ते ही कोणताही अपराध नसताना. यासारखे अनेक प्रसंग आजवर झाले आहेत आणि या प्रकारातूनच सध्याचे आंदोलन सुरु आहे. दुसरा भयाण प्रकार म्हणजे सिव्हिल forfeiture. जर पोलिसांना असा संशय आला कि एकादी मालमत्ता गुन्ह्यासाठी वापरली जाते (फक्त संशय बरं का, कोर्टात सिद्ध होणे जरुरी नाही) तर ते ती ताब्यात घेऊन विकू शकतात. यातून मिळणारे पैसे हे त्याच पोलिसांना मिळतात. म्हणजे एखाद्या माणसाचे घर, गाडी, जवळ असलेली कॅश असं काहीही सोयीस्कररित्या पोलीस स्वतः लांबवतात. किरकोळ चोरी, म्हणजे एखाद्याची सायकल गेली तर हेच पोलीस काहीही करत नाहीत कारण त्यातून त्यांना प्राप्तीची काही आशा नसते. हे प्रकार ऐकून आपले पोलीस त्या मानाने बरेच सभ्य आहेत असे म्हणावे लागते.
19 Jun 2020 - 1:01 am | गणेशा
ओह मला हे माहीत नव्हते.. चुकीचे आहे, न्याय व्यवस्था पोलिस हातात घेऊ नाही शकत...
मला सिग्नल पाळणारे, नाही पाळला तर दंड.. त्याची भीती.. या संदर्भात बोलायचं होतं ते..
19 Jun 2020 - 11:27 pm | पहाटवारा
अगदी अगदी .. अमेरिकेतल्या पोलिसांच्या काळ्या बाजूच्या उपलब्ध माहितीवर तर एक स्वतंत्र लेख होइल. मनो यांनी म्हटल्यानुसार आप्ल्या-सारख्या लोकांचा फारसा संबध येत नाही म्हणूनच हे असे क्वचीत प्रसंग जरी झाले तरी आपल्याला त्याचे अप्रूप वाटते.
19 Jun 2020 - 2:50 am | कोहंसोहं१०
काळाबाजार कमी अधिक प्रमाणात सगळीकडेच असतो पण एकूणच अमेरिकेत कोर्ट कचेरी कारभार वर्षानुवर्षे लांबत नाही. आणि पोलिसाला लाच देऊन पळायचा प्रयत्न फार कमी होतो. आपल्याकडे कोर्टकचेरीचा कारभारच असा आहे की साधारण माणूस बेजार होऊन जातो. अमेरिकेत त्या मानाने निर्णय पटकन लागतात. निर्णय विरोधात गेलाच तर एकदाच मनस्ताप. केस साधी असेल तर उगाच तारीख पे तारीख करत लटकून राहत नाही हा प्लस पॉईंट.
19 Jun 2020 - 4:38 am | सुमो
किस्सा आणि कथन आवडलं.
19 Jun 2020 - 6:43 am | मिसळपाव
तुम्हाला दंड भरायला नाही लागला कबूल पण तुम्ही खटला जिंकला असं नाही वाटत. सहावीतली मुलंच त्या शाळेत नाहीत तर त्याना वहातूक नियनम करता येत नाही हे तुम्ही त्या शाळेच्या व्यवस्थापनाच्या नजरेला आणून दिलं का? त्यानी काय केलं त्यावर? अजूनही पाचवीतली मुलंच वहातूक नियमन करताहेत का? त्या मुलांकडून "नियमन नीट होत नाहीये" अशा स्वरूपाचं अजून काही तुमच्या निदर्शनास आलं होतं / आहे की हा एखादाच असा प्रसंग होता?
खाणाखुणा करण्यात काही घोटाळा झाला असावा असा तुमचा कयास आहे. त्याबद्दल तुम्ही शाळेच्या व्यवस्थापनाशी काही बोलला का? तुम्ही ऑलरेडी हे केलं नसलं तर निदान एव्हढं तरी ताबडतोब करावं की जेणेकरून भविष्यात अशा गोंधळातून गंभीर स्वरूपाचा अपघात, किंवा कोणाला ईजा होणार नाही.
19 Jun 2020 - 11:12 pm | पहाटवारा
एका अर्थी तुम्ही काय म्हणता आहात ते कळते आहे. मी नियम मोडला की नाही, हे या खटल्याने सिद्ध झाले नाही. सर्व इत्यंभूत माहिती देण्यामागे माझा तोच विचार होता की न्याय-व्यवस्था ज्याचा पुरावा आहे त्याच गोष्टिंवर विश्वास ठेवते - पण हा नियम फक्त सर्व-सामान्य व्यक्तीबाबत दिसतो आहे. कारण तसे पाहायला गेले तर पोलिस अधिकार्याच्या तिकिट देण्यामागे तिने तसे पाहिले याव्यतीरिक्त काहिहि पुरावा नव्हता. हिच गोष्ट जेव्हा मी, एक सर्व-सामान्य व्यक्ती, फक्त बोलून माझे म्हणणे मांडतो, तेव्हा ते ग्राह्य मानले जात नाही. तिथे केवळ पुरावा लागतो. त्यामुळे माझ्याकडे इतर परीस्थीतीजन्य पुरावा गोळा करण्याव्यतीरिक्त काहिहि उपाय नव्हता.
अन तुमच्या दुसर्या मुद्द्याबाबत - नंतर मी शाळेच्या व्यवस्थापकांना जेव्हा हि गोष्ट सांगीतली, तेव्हा त्यांनी मला सांगीतले की जरी एका दुसर्या पोलिस अधिकार्याच्या प्रशिक्षणाखाली त्यांचे वाहतूक पथक काम करत असले तरी त्या पथकाच्या सदस्यांना कुठल्याहि प्रकारचा दंड करणे याचे अधिकार नाहित. माझ्या केस मधे त्यांनी हे तिकिट दिले नाही अन इतर पोलिस अधिकारी या पथकाच्या कामानुसार तुम्हाला तिकिट देउ शकता की नाहि याबाबत ते काहि करु शकत नाहित.
सहावीच्या मुलांअभावी हे असे नियंत्रण कायदेशीर नाहि हे मी सांगितल्यावर त्यांनी हे आम्ही मुलांच्या अन पालकांच्या भल्यासाठीच करत आहोत असा पवित्रा घेतला. थोड्या चर्चेनुसार शेवटी दुसर्या एका शिक्षकांनी असे सुचवले की फक्त मुलांऐवजी त्यांच्या जोडिला काहि पालक स्वयंसेवक ठेवता येतील. अन माझी अशा स्वयंसेवक पदी नेमणूक करुन टाकली :)
यापुढे साधारण एखादे वर्ष आम्ही तिथे राहिलो, तोपर्यंत तरी पालक स्वयंसेवक, त्या मुलांसोबत असत.
20 Jun 2020 - 8:49 pm | मिसळपाव
तुम्हाला दंड भरायला नाही लागला कबूल पण तुम्ही खटला जिंकला असं नाही वाटत, but it certainly seems like you honored the spirit of the law! एकतर तुम्ही याबाबत शाळेच्या व्यवस्थापकांशी बोललात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे "जिरवली त्या पोलिसाची" या पलीकडे जाऊन "पालक स्वयंसेवक मुलांसोबत रहायला लागले" ही गोष्ट सुरू झाली (thumbs up).
"पोलीस अधिकार्याचं सांगणं at face value ग्राह्य धरलं जातं पण तुम्हाला मात्र काटेकोरपणे परिस्थितीजन्य पुरावे द्यायला लागतात" हे कटकटीचं, आणि पोलीसांकडून त्यांच्या अधिकाराचा गैरवापर होण्याच्या ईतक्या केसेस सध्या अधोरेखित होत असताना, साफ अन्यायकारक वाटणं सहाजिकच आहे. आता बॉडी-कॅमसारख्या तंत्रज्ञानाने तीही त्रुटी कमी करायचा प्रयत्न चालू आहे. पण सगळेच पोलीस वाईट नसतात, कामाचा भाग म्हणून आपला जीव धोक्यात घालतात, मानसिक ताण सहन करतात ....... सध्या सुक्याबरोबर ओलं पण जळतंय.
- a good deed doesn't go unpunished :-)
21 Jun 2020 - 4:42 am | पहाटवारा
खरंतर "जिरवली पोलिसाची" असे नाहि वाटले .. किंबहुना जसे मी वर कुठेतरी प्रतीसादात लिहिले आहे की मला तर असे वाटले की, ना चूक माझी ना त्या पोलिसाची , पण परीस्थीतीजन्य देखावा त्या पोलिसाच्या बाजूने असा झाला असावा की जेणेकरुन मी नियम मोडतो आहे असे तिला वाटले. इथेही, कुठे मी पोलिसांनी अन्यायकारक वागणूक दिली किंवा मी कशी त्यांची जिरवली असे माझ्या लिखाणात तरी दिसत नसावे. शेवटी खटला संपल्यानंतर सुद्था जेव्हा मी अभिवादन करुन तिला धन्यवाद म्हणालो यातहि सर्व-सामान्य कर्टसी होती .. ना की तिला खाली दाखवायचे होते.. पण तिने हे असे घेतले नसावे.
दुसरी गंमत अशी की जेव्हा मी शाळेच्या व्यवस्थापकांबरोबर याविषयी बोललो तेव्हा खरं तर मला अशी अपेक्षा होती की जेव्हा हे वाहतूक पथक कायद्यानुसार नाही हे कोर्टात सिद्ध झाल्यानंतर, त्या पोलिसाने येउन शाळेला हे कळवले असावे. परंतु तिने असे काहिहि केले नव्हते. त्यावेळी मला जरुर असे वाटले की तिचा त्या दिवशी शाळेसमोर येउन वाहतूक नियंत्रीत करणे, मुलांची वाहतूकीच्या द्रुष्टीने काळजी घेणे, हा खरा हेतू होता की केवळ महिन्याकाठचे तिकिटांचे टार्गेट पूर्ण करणे होता काय माहित !
शेवटी पोलिसहि माणसेच असतात अन त्यातही उजवे-डावे व्हायचेच. त्यानंतर मला पोलिसांचे काहि खूप चांगले अनुभवही आले. तसेहि उगाच कुणालाहि "जनरलाईझ" करणे मला पटत नाहि.
21 Jun 2020 - 7:14 am | मिसळपाव
छे छे, 'जिरवली पोलिसाची' असं काही तुमच्या लिखाणात अजिबात दिसलं नाही. मला म्हणायचं होतं/आहे की तुमचा दंड रद्द करून घेण्यापलीकडे जाऊन मुळात "योग्यरित्या वहातुक नियंत्रण होतंय का" याचा पाठपुरावा केलात, ते महत्वाचं. हे सांगताना माझी शब्दयोजना जरा चुकली असं दिसतंय.
19 Jun 2020 - 11:33 am | आंबट चिंच
खाणाखुणा करण्यात काही घोटाळा झाला असावा असा तुमचा कयास आहे.>>> तेच बोलतो जर तुम्ही तेव्हाच त्या ड्युटीवर असलेल्या अधिकार्याच्या निदर्शनास आणुन दिले असतेत की याने आधी जा आणि नंतर थांबा असे सांगितले म्हणुन मी गाडी घेवुन निघालो तर ही एव् ढी खटल्यापर्यंत जाण्याची वेळ आलीच नसती. आणि एव्हढ्या लवकर ५ ते ६ च्या मुलांना वाहतुकीसाठी वापरुन घेतात हेच चुकीचे आहे त्यंचे खेळाण्याचे वय आहे ते. १० , १२ ची मुले एक्वेळ ठिक आहे चालली असती.
19 Jun 2020 - 11:19 pm | पहाटवारा
मी त्या सिग्नल पासून पुढे जायला अन पोलिसाने मला तिकिट द्यायला या मधे साधारण ५-१० मिनिटे गेली असावीत. कारण मी तिथून निघाल्यानंतर मग शाळेच्या आतल्या राउंड-अबाउट च्या इथे हळू-हळू सरकत मग दरवाज्या-पुढे मुलाला सोडवून मग पुढे आल्यावर पोलिसाने मला थांबवले. या सर्वांमुळे माझ्याहि हे लक्षात आले नाहि कि आपण त्या मुलांना थांबवून विचारावे. पोलिस शक्यतोवर असे कुणाला विचारायला जात नसावे अन तिने स्वतः पाहिले असल्याने बहुदा तिला तशी गरजहि वाटली नसावी. हे नक्की कसे घडले असावे याचा जेव्हा मी नंतर थोडा विचार केल्यावर मला ही अशी सुसंगत क्रमवारी लावता आली. त्या वेळी हे सुचले हि नाही अन बहुदा पोलिसाने ऐकलेहि नसते.
19 Jun 2020 - 11:49 am | सुबोध खरे
तुम्हाला दंड भरायला नाही लागला कबूल पण तुम्ही खटला जिंकला असं नाही वाटत.
मुळात पाचवीच्या मुलांना म्हणजे १०-ते १२ वर्षाच्या मुलांना वाहतूक नियमन करायला लावणं हीच गोष्ट चुकीची आहे. समजा त्या मुलांनी चूक केली आणि त्यातून अपघात झाला तर तुम्ही जबाबदार कुणाला धरणार?
हि केवळ पोलीस खात्याची बेजबाबदार वृत्ती आणि कायद्याचा सरळ सरळ दुरुपयोग आहे असेच मी म्हणेन.
अमेरिकेत लोक वाहतुकीच्या बाबतीत बऱ्याच प्रमाणात कायद्याने वागतात म्हणून हे चालून जाते.
खटला जिंकला म्हणजे गुन्हा सिद्ध झाला नाही असे नसून उपलब्ध पुरावे पुरेसे नाहीत असेही असू शकते.
परंतु सरकारी कर्मचारी विरुद्ध सामान्य नागरिक यामध्ये सरकारी कर्मचारीच बरोबर (SUMMARY POWERS) असे कायदा गृहीत धरतो. मग त्यांनी गुन्हा केला हे पुराव्यानिशी सिद्ध करणे पोलिसाला आवश्यक आहे. जेंव्हा एखादा नागरिक पोलिसांविरुद्ध न्यायालयापर्यंत जातो याचा अर्थ त्याच्यवर अन्याय झाला असण्याची शक्यता आहे असे खरं तर गृहीत धरणे आवश्यक आहे
असे असताना आपल्याला चुकीच्या तरतुदीखाली न्यायालयात खेचले असे श्री पहाटवारा यांनी सिद्ध केले याचा अर्थच त्यांनी खटला जिंकला असे होते.
त्यात पोलीस खात्याची शिरजोरी आणि मुजोरीच दिसू येते.
19 Jun 2020 - 12:02 pm | प्राची अश्विनी
अनुभव आवडला.
19 Jun 2020 - 12:07 pm | जेम्स वांड
च्यामारी
शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये
ही म्हण फक्त भारतातच लागू होते का काय असे वाटून गेले एकदम
19 Jun 2020 - 12:55 pm | सौंदाळा
वेगळाच अनुभव.
लिहिण्याची शैलीदेखील मस्तच, आम्हीपण तुमच्याबरोबरच कोर्टात बसलो आहोत असे वाटत होते. येत रहा, लिहित रहा.
19 Jun 2020 - 7:48 pm | गामा पैलवान
पहाटवारा,
तुमचा अनुभव रोचक आहे. इथे इंग्लंडमध्ये अपवादात्मक परिस्थिती असल्यामुळे चूक केली असं कबूल केलं तरीही लोकं सुटतात. पण अर्थात ते सर्वस्वी न्यायाधीशावर अवलंबून असतं.
मला वाटतं तुम्ही गाडीत एखादा चालकचक्षु ( = ड्याशक्याम ) बसवून घ्यावा. त्याचं मुद्रण बऱ्याच कटकटी वाचवेल.
आ.न.,
-गा.पै.
19 Jun 2020 - 11:22 pm | पहाटवारा
हा हा .. नंतर चालकचक्षु (मस्त नाव आहे ) बसवून घेतला पण त्याला दुसरेच कारण झाले. तो किस्सा परत कधी !