भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण ३ - ज्ञानी

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
10 Jun 2020 - 9:49 am

स्वरूपबोधविषयक या प्रकरणात आपण 'ज्ञानी' या संकल्पनेविषयीचे रमण महर्षींचा उपदेश जाणून घेणार आहोत.

तत्पूर्वी भगवद्गीतेच्या अध्यात २ मधे स्थितप्रज्ञ कसा ओळखावा? त्याचे/ तिचे व्यावहारिक जगातले वर्तन कसे असते? या अनुषंगाने अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचे (भगवद्गीता श्लोक २.५४) सविस्तर उत्तर (भगवद्गीता २.५५ ते २.७२) तसेच भगवद्गीतेच्या अध्याय १२ मधे आलेले ज्ञानी भक्ताचे वर्णन (भगवद्गीता श्लोक १२.१३ ते १२.२०) वाचणे खचितच उपयुक्त ठरेल. हा संदर्भ सहज उपलब्ध असल्याने तसेच विस्तारभयास्तव तो इथे समाविष्ट केलेला नाही.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश थोडक्यात असा आहे:

रमण महर्षींची भेट घेणार्‍या कित्येक लोकांना आत्मसाक्षात्कारी स्थितीबद्दल कधीही न शमणारे कुतुहल असल्याचे दिसून येत असे. प्रामुख्याने ज्ञानी व्यक्तीला स्वतःविषयी आणि सभोवतालच्या जागतिक घडामोडींविषयी येणारा अनुभव कसा असेल या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून अधोरेखित होत असे. आत्मसाक्षात्कारी स्थितीविषयीच्या असलेल्या बहुसंख्य लोकांच्या चित्रविचित्र धारणा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून स्पष्टपणे दिसून येत असत. या प्रश्नांचा ढोबळमानाने पुढील चार प्रश्नात समावेश होऊ शकेल -

१ - चैतन्याच्या व्यापक जाणीवेत व्यक्तिगत 'मी' चा लय झालेला असला तरी ज्ञानी (अन्य सामान्य व्यक्तींप्रमाणे) आपले कार्य कसे करू शकतो?

२ - या जगात वावरताना इतरांना सतत कार्यरत असलेला दिसत असला तरी 'मी काहीच करत नाही' (नैष्कर्म्य स्थिती) असे ज्ञानी कसे म्हणू शकतो? (रमण महर्षी नेहेमी ज्ञानी अकर्ता असल्याचे विधान करत असत).

३. सभोवतालच्या जगाविषयी ज्ञान्याला काय प्रचिती येते? ज्ञानी व्यक्तीला जगाविषयी भान उरते का?

४. शरीर आणि मन अनुभवत असलेल्या जागृती, निद्रा आणि सुषुप्तीसारख्या सातत्याने बदल होत असलेल्या चैतन्याच्या अवस्थांशी ज्ञानी व्यक्तीच्या विशुद्ध् चैतन्यावस्थेशी नेमका कसा संबंध असतो?

हे सारे प्रश्न उपस्थित होण्यामागे एक गृहीतक दडलेले आहे, ते असे की ज्या प्रचितीला आपण स्वरूपबोध किंवा आत्मस्थिती असे म्हणतो ती स्थिती अनुभवणारी एक व्यक्ती (ज्ञानी) ज्ञानापासून पृथकत्वाने अस्तित्वात असते. हे गृहीतक मुळातच चुकीचे आहे. हे गृहीतक म्हणजे निव्वळ मनोनिर्मीत असलेली एक निराधार संकल्पना आहे. या संकल्पनेच्या आधारे ज्याला आत्मबोध झालेला नाही अशी व्यक्ती ज्ञानी व्यक्तीच्या प्रचितीबद्दल ठोकताळे बांधत राहते. 'ज्ञानी' हा शब्द देखील या चुकीच्या धारणेला बळ देणाराच ठरतो, कारण शब्दश: पाहता ज्ञानाचा अनुभव घेणारी किंवा ज्ञानाला जाणणारी व्यक्ती असाच त्याचा अर्थ निघतो. तरीही ही संज्ञा अज्ञान्यांकडून नित्यनेमाने वापरली जाते. अज्ञानी जन अशी कल्पना करून बसतात की मानवी जग सत्याला जाणून घेण्याची अभिप्सा असलेले (किंवा सत्याला जाणून न घेतलेले) साधक आणि सत्याचा बोध झालेले ज्ञानी अशा उभयतांनी बनलेले आहे; मात्र स्वरूपबोधामागचे सत्य असे आहे की तिथे ना ज्ञानी अस्तित्वात असते ना अज्ञानी, असते ते केवळ विशुद्ध ज्ञान!

रमण महर्षी ही गोष्ट कित्येक वेळा कधी थेटपणे तर कधी आडवळणाने निदर्शनास आणून देत असत, मात्र त्यांच्या विधांनामधे दडलेला गर्भितार्थ निव्वळ सैद्धांतिक पातळीवर देखील फार विरळ्या साधकांच्या लक्षात येत असे. साधकांच्या या मर्यादा लक्षात घेत महर्षी नेहेमी आपल्या संकल्पना श्रोत्यांच्या धारणा किंवा पूर्वग्रहांशी विसंगत होणार नाहीत अशा पद्धतीने रुपांतरित करून मांडत असत. ज्ञानी आणि अज्ञानी हा काल्पनिक भेद लक्षात घेत, त्या मागच्या चुकीच्या गृहीतकाला सतत आव्हान देत राहणे टाळून आपण ज्ञान्याची भूमिका घेत स्वरूपबोधाविषयीचा गर्भितार्थ महर्षी कसा उलगडून सांगत हे आपण पुढील भागात पाहणार आहोत.

प्रश्नः बद्ध आणि मुक्त (व्यक्ती) यात काय फरक असतो?
रमण महर्षी: सर्वसामान्य मानव तार्किक, बौद्धिक पातळीवर (मेंदू केंद्रित) जीवन व्यतित करतो, आपल्या वास्तविक स्वरूपात अंतःप्रेरणा, सहजस्थिती (हृदय किंवा अंत:करण) समाविष्ट आहे या विषयी तो बहुतांशी अनभिज्ञ असतो. ज्ञानसिद्ध व्यक्ती मात्र हृदयात चित्त स्थिर करत (अंतःप्रेरणेने, सहज स्थितीत) जीवन व्यतित करते. अशी व्यक्ती जेव्हा जगात वावरते, तसेच बाह्य सजीव आणि निर्जीव सृष्टीबरोबर व्यावहारिक संबंध ठेवते तेव्हा तिचा हा बोध सतत जागा असतो, की आपण जे काही पाहतो त्यातली एकही गोष्ट एकाच सर्वोच्च वास्तविकतेपेक्षा पृथकत्वाने नांदत नाही (सर्वं खल्विदं ब्रह्मम्). या सर्वोच्च सत्याचा किंवा ब्रह्माचा साक्षात्कार तिला हृदयचक्रात आपल्याच निजस्वरूपात होतो.

प्रश्नः असे असेल तर मग ज्ञानी व्यक्तीत अहंवृत्ती ('मी' पणाची जाणीव, किंवा स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा बोध) कसे कार्य करते?
रमण महर्षी: ज्ञानी व्यक्तीत ती (अहंवृत्ती) अजिबात कार्यरत नसते. ज्या आदिम, शुद्ध चैतन्याचा उपनिषदांमधे 'प्रज्ञान' असा उल्लेख केलेला आहे, त्या चैतन्याशी एकरूप झाल्याने आणि तदाकार झाल्याने ज्ञान्याचे निजस्वरूप हे हृदयच असते. प्रज्ञान हेच खरोखर ब्रह्म असते (प्रज्ञानं ब्रह्म), आणि ते इतके परिपूर्ण असते की त्या पलीकडे अस्तित्वात काहीही असणे संभवत नाही.

प्रश्नः स्वरूपात जगाचे प्रतिबिंब पडत नाही?
रमण महर्षी : प्रतिबिंब पडण्यासाठी एखादी वस्तु आणि तिची प्रतिमा असे द्वैत असावेच लागते. स्वरूप अशा द्वैतभावाचा स्वीकार करत नाही.

प्रश्न: आपण आम्हाला कित्येक गोष्टी करताना दिसता. मग मी कुठलेच कर्म करत नाही असे आपण कसे म्हणू शकता?
रमण महर्षी: (रेडिओकडे अंगुलेनिर्देश करत) हा समोरचा रेडिओ बोलतो आणि गायन करतो असे भासते, मात्र तो उघडून पहाल तर तुम्हाला दिसेल की आत कुणीच अस्तित्वात नाही. तद्वतच, माझे अस्तित्व हे निव्वळ एक अवकाश आहे, त्यातून रेडिओप्रमाणे हे शरीर बोलत असते. अंतर्यामी कर्ता या भूमिकेतून कुणीही कार्यरत नसते.

प्रश्नः मला हे समजायला अवघड वाटते आहे. भगवान, कृपया थोडे विस्तारपूर्वक सांगाल का?
रमण महर्षी: व्यावहारिक जीवन जगण्यासाठी आणि कार्यरत राहण्यासाठी मनाची नितांत आवश्यकता असली, तरी उन्मनी अवस्थेतला ज्ञानी देखील आपले जीवन कसे व्यतित करतो आणि कार्यरत कसा राहू शकतो हे समजवण्यासाठी शास्त्रांमधे कित्येक समर्पक दाखले दिलेले आहेत. असे पहा की विद्युत शक्तीवर चालणारा पंखा आपण विद्युतप्रवाह बंद केला तरी थोडा वेळ फिरत राहतो. तद्वतच, हे शरीर ज्या प्रारब्धामुळे अस्तिस्त्वात आले, ते प्रारब्धच शरीराला ते ज्या ज्या क्रियाकलापांतून जाण्यासाठी घडले आहे, तसे कर्तृत्व करण्यासाठी बाध्य करत असते. ज्ञानी देखील या सगळ्या कार्यकलापांमधे 'मी कर्ता आहे' अशी यत्किंचितही भावना न ठेवता आपली भूमिका पार पाडत असतो. हे कसे शक्य होते याचे बौद्धिक आकलन करून घेणे अवघड आहे. त्यामुळे शास्त्रांमधे असे उदाहरण दिले जाते की गाढ झोपेतून चार घास खाण्यापुरते जागे झालेल्या बालकाप्रमाणे ज्ञानी आपले कर्म करत असतो. सकाळी जाग येते तेव्हा आपण काय खाल्ले याची कुठलीही नोंद त्या बालकाच्या स्मृतीत नसते.

इथे हे अवश्य लक्षात घ्यायला हवे की ज्ञान्याकरता अशा कुठल्याच उदाहरणांची किंवा स्पष्टीकरणांची तिळमात्र आवश्यकता नसते. त्याचा बोध परिपूर्ण असतो आणि तो पूर्णपणे नि:शंक झालेला असतो. हा देह हे आपले स्वरूप नाही अशी सघन जाणीव त्याला असते, आणि शरीराकडून जरी एखादे कृत्य होत असेल तरी त्याचे कर्तेपण आपल्याकडे नाही असा निरंतर बोधही त्याच्या अंतर्यामी विनासायास जागृत असतो. सगळ्या स्पष्टीकरणांची गरज फक्त बघ्या लोकांना असते, ज्यांना ज्ञानी देखील देहतादात्म्य राखूनच कार्य करतो असे गृहीत धरणे भाग पडते आणि ज्ञानी विदेही स्थितीत वावरत असल्याचे काही केल्या लक्षात येत नाही.

प्रश्नः अध्यात्मिक दृष्ट्या उन्नत अवस्थेत असलेल्या व्यक्तींना ओळखण्यासाठी काही मूलभूत स्वरूपाचे निकष किंवा चाचण्या आहेत का? हा प्रश्न पडण्याचे एक कारण असे आहे की अशा व्यक्ती बाल, उन्मत्त किंवा पिशाच्चवत व्यवहार करतात असा एक सार्वत्रिक समज आहे.
रमण महर्षी: ज्ञान्याची आंतरिक स्थिती ही केवळ ज्ञान्यालाच समजू शकते. एखाद्या ज्ञान्याला यथास्थित समजून घ्यायचे असेल तर ते दुसर्या ज्ञान्यालाच शक्य आहे. ('अंतरस्थितीचिया खुणा अंतर्निष्ठ जाणती'). असे असले तरी एखाद्या सत्पुरूषाच्या सान्निध्यात जी विलक्षण मनःशांती नकळत अनुभवता येते, तीच एकमेव अशी खूणगाठ आहे जिच्या आधारे त्या सत्पुरूषाची महती साधकांच्या अनायास लक्षात येते. ज्ञान्याने बोललेले शब्द, त्याने केलेल्या कृती किंवा त्याचे बाह्यरूप या त्याच्या महत्तेच्या निशाण्या नसतात. ज्ञानी व्यक्तीच्या आंतरिक गोष्टी बहुतांशी सर्वसामान्य माणसाच्या आकलनक्षमतेच्या आवाक्याबाहेर असतात.

धर्मआस्वाद

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

11 Jun 2020 - 5:11 am | अर्धवटराव

आपल्या वास्तविक स्वरूपात अंतःप्रेरणा, सहजस्थिती (हृदय किंवा अंत:करण) समाविष्ट आहे या विषयी तो बहुतांशी अनभिज्ञ असतो.

मेंदु विरहीत अंतःकरण म्हणजे नेमकं काय ?

हा बोध सतत जागा असतो, की आपण जे काही पाहतो त्यातली एकही गोष्ट एकाच सर्वोच्च वास्तविकतेपेक्षा पृथकत्वाने नांदत नाही (सर्वं खल्विदं ब्रह्मम्).

हा बोध कुठे जागा असतो ? अंतःकरणात ?

या सर्वोच्च सत्याचा किंवा ब्रह्माचा साक्षात्कार तिला हृदयचक्रात आपल्याच निजस्वरूपात होतो.

हृदयचक्र म्हणजे काय म्हणायचं आहे महर्षींना ?

शरीराकडून जरी एखादे कृत्य होत असेल तरी त्याचे कर्तेपण आपल्याकडे नाही असा निरंतर बोधही त्याच्या अंतर्यामी विनासायास जागृत असतो

'आत' जर कुणीच नाहि तर अंतर्यामी बोध कसा आणि कुठे जागृत असतो ?

व्यावहारिक जीवन जगण्यासाठी आणि कार्यरत राहण्यासाठी मनाची नितांत आवश्यकता असली, तरी उन्मनी अवस्थेतला ज्ञानी देखील आपले जीवन...

मन 'शटडाऊन' वगैरे होत नाहि ना? विश्वाचे आर्त माझ्या 'मनी' प्रकाशले... असं वर्णन माऊली करतात. हे काहि वेगळं आहे का?

हे कसे शक्य होते याचे बौद्धिक आकलन करून घेणे अवघड आहे.

ज्ञानी व्यक्तीच्या आंतरिक गोष्टी बहुतांशी सर्वसामान्य माणसाच्या आकलनक्षमतेच्या आवाक्याबाहेर असतात.

कदाचीत हेच खरं असावं... म्हणजे मला कळण्याजोगं.. :)

मूकवाचक's picture

11 Jun 2020 - 11:07 am | मूकवाचक

अर्धवटरावजी, मनमोकळी प्रतिक्रिया दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
(लेखमालेतील उर्वरित प्रकरणांमधे आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांशी संबंधीत असे विवेचन आहे.)

> या सर्वोच्च सत्याचा किंवा ब्रह्माचा साक्षात्कार तिला 'हृदयचक्रात' आपल्याच निजस्वरूपात होतो.

उलगडा हा स्थान किंवा कालबद्ध नाही. त्यामुळे त्याचा कुणाच्या 'हृदयचक्राशी' वगैरे काहीएक संबंध नाही.

हृदय लेफ्टलाये का राइटला ? हा तर रमणांचा बेसिक झोल आहेच.

त्यामुळे अध्यात्मिक वाटेवर त्यांचे अनेक साधक लेफ्ट-राइट करत बसले आहेत.

शाम भागवत's picture

13 Jun 2020 - 10:01 pm | शाम भागवत

@मूकवाचक,
मस्तच जमलंय.
पंखा व प्रारब्धाचे उदाहरण तर अप्रतीम.
सगळंच कसं एकदम स्पष्ट होऊन जातं

अशी व्यक्ती जेव्हा जगात वावरते, तसेच बाह्य सजीव आणि निर्जीव सृष्टीबरोबर व्यावहारिक संबंध ठेवते तेव्हा तिचा हा बोध सतत जागा असतो, की आपण जे काही पाहतो त्यातली एकही गोष्ट एकाच सर्वोच्च वास्तविकतेपेक्षा पृथकत्वाने नांदत नाही (सर्वं खल्विदं ब्रह्मम्).

बोध सतत जागा राहातो, यालाच “भान” हा शब्द चपखल आहे असे वाटते.

मी जिवंत आहे हे भान मला सदैव असते. हे भान नक्की कुठे राहाते? ते सांगता येत नाही. ते भान कुठूनतरी मनात, बुध्दीत, मेंदूत येते व मग मी कार्य करतो असं काही होत नसावे असे वाटते.

तर ते फक्त असते. त्या भानात माझ्या सर्व क्रिया चाललेल्या असतात.
असो.
खूप छान लिहिलंय.

जसा वेळ मिळेल तसतसं वाचत जाईनच.
_/\_

मूकवाचक's picture

14 Jun 2020 - 4:38 pm | मूकवाचक

भागवत जी, आपण केलेल्या सूचनांशी पूर्णपणे सहमत आहे. मनःपूर्वक धन्यवाद.