जातं

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
17 May 2020 - 3:12 pm

माणूस जात्यात पडतो किंवा टाकला जातो. जातं फिरत राहतं निरंतर स्वत:च किंवा नियंत्याकडून. दोन भागांच्या मध्ये तितकीशी जागा नसते ऐसपैस आणि नसते अगदीच कमी सुद्धा. कुणी सहज सामावून जातो किंवा कुणी अडून बसतो. जातं अडत नाही, फिरत राहतं. स्थिरावलेल्यांची सोलतं कातडी आणि हिसकावून घेतं जास्तीची जागा. फटीतली जागा बदलत राहते आणि बदलतात सोबती, सुख-दु:ख दोन्हींतले. जातं तेच राहतं. मार्ग तोच राहतो पण बदलते गती. दिशा एकच असते नेहमी, वळणं ओळखीची नसतात. जात्याला असतात खाचाखोचा घडवलेल्या किंवा घडलेल्या. त्या अवघड जागा आकार देतात जीवनाला चांगला‌ किंवा वाईट, पण‌ नवा. जात्यात काहीच नष्ट होत नाही, होते ती पुनर्मांडणी; जात्यात जास्त काळ जावा म्हणून. रूप पालटलं तरी स्वत्व सदैव स्थिर, गतीला मानत नाही ते किंवा मानवत नाही. पीठ होतं जात्यात धान्याचं आणि माणसांची होते जडणघडण. विखुरलेल्या स्वरूपात किंवा एकसंध तुकड्यांत. पीठ झालं की हलकं होतं धान्य टरफलाच्या वजनाशिवाय. माणूस हलका होतो उतारवयात, तारूण्याचं टरफल गळालं की. सुपात पाखडून धान्य उडवून लावतात निरूपयोगी भाग.‌ नियतीचा सुप‌ सदैव पाखडत राहतो आपले जीव. कुणी सुपात राहतं कुणी सुपलीत जातं. मातीतून आलेलं सारं पुन्हा मातीतच जातं.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

स्वच्छंद's picture

24 May 2020 - 3:07 pm | स्वच्छंद

काय सुंदर रूपक आहे.

प्रमोद देर्देकर's picture

25 May 2020 - 9:05 pm | प्रमोद देर्देकर

सुंदर आवडले