कडं

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
16 May 2020 - 2:37 am

मध्यानरात्रीच्या काळोखात ते टुमदार फार्महाऊस भयाण भासत होते. आजूबाजूची मोठाड झाडे सळसळ करत हलक्या वाऱ्यात झुलत होती. हॅलोजनचा एक बल्ब पोर्चमध्ये जळत होता. मधूनच सुरु झालेल्या धप्प धप्प आवाजाने आता तिथली शांतता भंग पावत होती.

टिकाव हातात धरून घामाने डबडबलेला सुरेंद्र जरा वेळ थांबला. त्याला धाप लागली होती. मान वर करून त्याने छातीत हवा भरून घेतली. कोपराच्या बाहीने त्याने घाम पुसला. खड्डा आता चांगलाच रूंदावला होता.

"बस झाला एवढाच" मिनल खड्ड्यात वाकून बघत म्हणाली. तिच्या हातात टॉर्च होता. आणि म्हटलं तरी तीही आता थकली होती.

"नाही.." मान हलवत सुरेंद्र म्हणाला. त्याच्या आवाजातही धाप जाणवत होती. "थोडं पाणी आणतेस का?"

"मी नाही बाबा आत जाणार आता.." मिनलच्या आवाजात कंप होता. तिने खाली बसून हातातल्या पाटीत खड्ड्यातली माती भरायला सुरूवात केली. पण तिला ते जमेना. तिच्या नाजूक हातांवर ओरखडे उमटायला लागले.

"तू बस पायऱ्यांवर, मी करतो.." सुरेंद्र तिच्या हातातली पाटी घेत म्हणाला. त्याने खोऱ्या घेऊन माती खरवडली आणि पाटीत भरून बाजूला ओतली. मिनल शांतपणे बघत राहिली.

पुन्हा एकदा धप्प धप्प आवाज रात्रीच्या शांततेत घुमत राहिला. सळसळ करणारी झाडेही जणू तो आवाज ऐकूण चिडीचूप शांत झाली. दुरून येणारे घुबडाचे आवाज तसे नित्याचेच होते. टिकाव चालू लागला. सुरेंद्र पहाडासारखा तुटून पडला. प्रत्येक घाव हा काळजावर पडल्यासारखा आतवर खोल जात होता.

अचानक किचनमध्ये खळ्ळss आवाज झाला.

"मांजर असेल.." पायऱ्यावंर बसलेली मिनल तातडीने म्हणाली.
"हा हा हा.. घाबरलीस की काय?" टिकावाचा घाव अर्ध्यावर ठेवत सुरेंद्र म्हणाला. खरंतर तो ही चकीत झाला होता. "केवढ्या मोठ्याने ओरडलीस!"

"नाही रे, मी असल्या गोष्टींना नाही घाबरत.." उठून आळोखे पिळोखे देत मिनल म्हणाली. तिने जवळ येऊन खड्ड्याची खोली तपासली. हा खरंच एवढा मोठा खड्डा खणेल असं तिला वाटलं नव्हतं.

"मघाशी पाणी आण म्हटलं, तर का नाही गेलीस मग" सुरेंद्र अशावेळीही तिची थट्टा करण्याच्या मूडमध्ये होता.

"बरं, घाबरले मी, बसं?" तिचा नेहमीचा लटका राग. मिनल आहेच तशी. लटक्या रागाच्या तिच्या आवाजात कोणीही पाघळावे. दोघांनाही ताण जरासा हलका झाल्यासारखे वाटले. गेले कित्येक तास ते प्रचंड तणावाखाली होते. एकमेकांची थट्टा सोडा, बोलणंही टाळत होते.

"ए पण तू कॉलेजमध्येही किती घाबरट होता. माहित्येय मला.." डोळे मिचकावत ती म्हणाली.

"इथे घसा कोरडा पडलाय किती वेळापासून, आणि तुला कॉलेजचे दिवस आठवतायत!" सुरेंद्रने टिकाव खाली टाकत पुन्हा शर्टाच्या बाहीने घाम पुसला.

"व्हिस्की घेणार?" मिनल आपल्या घराकडे पाहत म्हणाली. तशी त्याला कधी तिने ऑफर नव्हती केली. पण आज वेळ वेगळी होती.

"हो चल " सुरेंद्रने एकदा खड्ड्यात वाकून पाहिले. " आता जवळपास झालंय. खुप खोल गेलाय."

पहाटेचे तीन तरी वाजत आले असावेत.
टकाटक शुज वाजवत दोघे डायनिंग रूममध्ये गेले. महागड्या व्हिस्कीचे दोन चार घोट घेऊन सुरेंद्र रिलॅक्स झाला. रिमोट घेऊन त्याने एसीही वाढवला.
"खरंतर आधीच घ्यायला हवी होती"

"हो म्हणजे तू मध्येच कुठेतरी लुडकला असतास... हा हा हा.." चार घोट घेऊन मिनलही आता फ्रेश झाली होती. ती नेहमीच चार घोट घ्यायची. जास्त घेतल्यावर होणारा हॅंगओव्हर तिला मुळीच नको होता.

"मिनल, आपण लग्न केलं असतं, तर आजचा दिवस कधीच उगवला नसता.." थोडं गंभीर होत सुरेंद्र म्हणाला.

"आय नो, बट आय एम अल्वेज युवर्स.... " त्याच्या अगदी जवळ येत, ओठांवर हलकेले चुंबन घेत मिनल म्हणाली. कितीही वेळा पाहिलं तरी तिच्या डोळ्यात एक वेगळीच नशा असायची. "सकाळ होईल एवढ्यात, उरकूया का?"

टुमदार फार्महाऊसमध्ये आता थंडगार वारे वाहू लागले होते. मोठाड झाडे पुन्हा सळसळू लागली. हॅलोजनचा तप्त दिवा झळाळून निघत होता. हॉलच्या बाजूने पुढे येत दोघे सिटींग रूममध्ये आले.

"गुड मॅन विथ बॅड लक" मिनल खाली वाकत गळ्यातून चिरत गेलेल्या जखमेकडे बघत म्हणाली.

"तुला ते बघू तरी कसे वाटते?" सुरेंद्रन बॉडी गोणपाटावर ठेवत कसाबसा म्हणाला.

"थांब थांब, हा सुरा तरी टाक आतमध्ये" खुर्चीखाली पडलेला सुरा उचलत मिनल म्हणाली.

"वेडी की काय, सुरा दुसरीकडे लांब कुठेतरी फेकून द्यायला हवा.." बॉडीबरोबर गोणपाट त्याने गुंडाळायला घेतले.

रक्त सगळ्या रुममध्ये उडाले होते. बॉडीच्या पोटावर जागोजागी सुरा खुपसल्याच्या खुणा होत्या.

"बरं झालं याला भरपूर व्हिस्की पाजली." मिनल अजूनही बॉडीच्या जखमांकडे पाहत होती. एखादं ऑबस्ट्रॅक्ट चित्र पहावे तसे.

"हे सोन्याचं दिसतंय.." सुरेंद्र बॉडीच्या हातात असलेल्या कड्याकडे पहात म्हणाला.
"कालंच घेतलं होतं त्यानं कुठुणतरी, हे असले याचे शौक. सोन्याचे कडे म्हणे. बायकोकडे थोडंही लक्ष नाही!" मिनल फणकाऱ्यानं म्हणाली.

सुरेंद्रनं ते कडं हातातून काढून घेतलं. खूपच भरजरी डिझाईन असलेलं ते कडं, मोठं महागडं, मौल्यवान वाटत होतं.

"हे तुझ्याकडे ठेवून घे" मिनलकडे कडं देत तो म्हणाला.
"अरे पण?"
"असू दे.. तुलाच गिफ्ट दिलं होतं त्यानं असं समज.."

बॉडीला गोणपाटात गुंडाळून त्यांनी खेचत बाहेर आणले. पायऱ्यांवरून धडधडत नेताना बरीच मेहनत घ्यावी लागली. कसेबसे त्यांनी ते प्रेत अखेर खड्ड्यात टाकले. खोऱ्यानं माती सारली गेली. अगदी जमीनीची लेवल होतेय की नाही हे ही तपासून झाले. आजूबाजूची माती थोडी भुसभुशीत करून त्यावर पाणीही शिंपडले.

"आपल्याकडून काही सुटलं तरी नाही ना?" मिनल म्हणाली. तिला आता सिटींग रुममधले पसरलेले रक्त चांगले घासूनपुसून स्वच्छ करायचे होते. आणि त्यांचे रक्ताने माखलेले कपडेही शक्य तितक्या लवकर जाळायचे होते.

"सगळं ठरल्याप्रमाणे झालंय. तसंही त्याने मला परवा एक ईमेल केली होती. 'तुझं आणि मिनलंच अफेयर समजल्यामुळे आत्महत्या करावीशी वाटते. दूर कुठेतरी निघून जावसं वाटतेय.' असंच काहिसं लिहीलंय त्यात. योग्यवेळी आपल्याला त्याचा फायदा होउ शकतो"

दोघेही आता चिकार थकले होते. पायऱ्यांवरती बसून त्यांनी क्षणभर विश्रांती घेतली. भल्यासकाळी कोवळं ऊन आता त्यांच्या सोबतीला आले होते.

क्रमशः

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

16 May 2020 - 8:31 am | प्रचेतस

नवी दमदार कथा..लैच भारी.

गणेशा's picture

16 May 2020 - 9:04 am | गणेशा

जव्हेरगंज भाऊ,

काय सुंदर लिहित आहात.. वाचून एकदम खिळवून ठेवणारे लिखान..
रात्रीचे वर्णन.. साधे साधे प्रसंग पण त्यांचे खुलवून सांगण्याचे कसब, क्या बात..

हा पहिला भाग दिसला आणि पटकन वाचायला घेतला, सुटकेस सारखे नको उगाच.

पुढील लेखनास शुभेच्छा..

खुप छान सुरुवात आजची.. तुमची हि आणि या दिवसाची हि

विजुभाऊ's picture

16 May 2020 - 9:59 am | विजुभाऊ

येस्स. इंटरेस्टिंग आहे कथा

अनिंद्य's picture

16 May 2020 - 10:09 am | अनिंद्य

दृश्यम विथ ट्विस्ट :-)

नावातकायआहे's picture

16 May 2020 - 11:45 am | नावातकायआहे

जै बात...

पु. भा. प्र.

बोलघेवडा's picture

16 May 2020 - 2:30 pm | बोलघेवडा

क्रमशः बघून आनंद झाला. वा वा वा जव्हेरगंजसाहेब!!! मेजवानी आहे आमच्यासाठी!!!
पुढील भागासाठी उत्सुक.

तुषार काळभोर's picture

16 May 2020 - 3:27 pm | तुषार काळभोर

नवीन करकरीत कडक स्टोरी.
पहिल्या बॉल वर षटकार ठोकलाय!!

राजाभाउ's picture

18 May 2020 - 10:41 am | राजाभाउ

+१

सौंदाळा's picture

16 May 2020 - 6:35 pm | सौंदाळा

जोरदार सुरुवात, मस्तच

जेम्स वांड's picture

16 May 2020 - 7:07 pm | जेम्स वांड

पोलीस टाईम्स जास्तच वाचताय का जव्हेरभाऊ ?

जव्हेरगंज's picture

16 May 2020 - 9:05 pm | जव्हेरगंज

पोलीस टाईम्स कशाला! सकाळ, लोकमत, मटा सगळं असल्याच बातम्यांनी भरून वाहतंय.. ;)

चांदणे संदीप's picture

16 May 2020 - 8:34 pm | चांदणे संदीप

कडं कुणाची कड लावतंय ते बघायचं आता. (ह्यात पुढच्या कथानकासाठी सुचवणी नाही बरका जव्हेरभौ.)

पुभाप्र

सं - दी - प

योगी९००'s picture

17 May 2020 - 6:41 pm | योगी९००

छान सुरूवात...

पण खून केल्यानंतर कोणी इतके सहजपणे संवाद करत असतील असे वाटत नाही..

विजुभाऊ's picture

17 May 2020 - 9:39 pm | विजुभाऊ

कशावरून म्हणताय