योगक्षेमं वहाम्यहम्..खरा अर्थ.
काही दिवसापूर्वी मी भगवदगीतेमधील कर्मण्ये वाधिकारस्ते ..या दुसऱ्या अध्याया मधील श्लोकाबद्दल हा श्लोकाचा कसा विपर्यास होत गेला या बद्दल लिहिले होते. आता नवव्या अध्यायामधील एक श्लोकाचा विचार करू. हा सुद्धा एक विपर्यास झालेला श्लोक आहे.किवा आपण असे म्हणू शकतो कि अनेक लोकांनी आपल्या आळशीपणा किवा नाकर्तेपणा याचे समर्थन करण्यासाठी या श्लोकाचा आधार घेतला आहे.
१.० मूळ श्लोक आणि त्याचा अर्थ.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ ९-२२ ॥
भावार्थ.
जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो. ॥ ९-२२ ॥
२.० वेगवेगळ्या अभ्यासकांचे या श्लोकावरील भाष्य .
२.१. शंकराचार्य .
या श्लोकाबद्दल शंकराचार्य काय भाष्य करतायत ते पाहू या.
जे भक्तगण मीच सर्वत्र या चराचरात आहे आणि मी आणि ते भक्तगण एकच आहेत अश्या भावनेने ..अद्वैतपणे ...माझी उपासना करतात त्यांना त्यांच्याकडे जे नाही ते मी त्यांना उपलब्ध करून देतो आणि जे त्यांच्याकडे आहे त्याचे मी रक्षण करतो .
या श्लोकावर भाष्य करताना शंकराचार्य योगक्षेम या शब्दाचे दोन भाग करतात. योग म्हणजे जे भक्ताकडे नाही ते उपलब्ध करून देणे आणि क्षेम म्हणजे जे भक्ताकडे आहे त्याचे संरक्षण करणे. त्यांच्या नंतरच्या भाष्यकारांनी हाच अर्थ मान्य केलेला आहे.
( संदर्भ . The Bhagwat gita with commentary of Sri Sankaracharya. English Translated by Mr. Alladi Mahadeva Shastri .Published by Samata Books Madras .originally published in 1897. )
२.२ ज्ञानेश्वर .
आता ज्ञानेश्वर माउली या श्लोकाबद्दल काय म्हणतात याचा विचार करू या.
अध्याय ९ .ओवी ३३५ ते ३४३ या मध्ये माऊली या श्लोकाचा विचार करतात. ज्या प्रमाणे गर्भातील गोळा कोणत्याही उद्योगाला जाणत नाही त्या प्रमाणे ज्यांना माझ्याशिवाय आणखी दुसरे काही चांगलेच दिसत नाही त्यांनी आपल्या जगण्याला माझेच नाव ठेविले आहे अश्या रीतीने एकनिष्ठ चित्ताने चिंतन करून जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो. … ते पुढे असेही म्हणतात कि जे आपल्या पंचप्राणांची ओवाळणी करून माझी भक्ती करतात त्यांचे सर्वकाही मीच करतो. ...तसेच ...भक्त मनामध्ये जो जो भाव धरतात तो तो पुनः पुन्हा मी देऊ लागतो आणि मी त्यांना जे जे दिले त्याचे रक्षण तेही मीच करतो.
( संदर्भ. पान ४९८ ते ४९९. ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरी . प्रकाशक अध्यात्म प्रबोधन संस्था. पुणे .प्रथम आवृत्ती १९८८. )
२.३ ओशो.
आता ओशो या श्लोकाबद्दल काय म्हणतात ते पाहूया ,
“तो कृष्ण कहते हैं, जो अनन्य भाव से मेरे में स्थित हुए भक्तजन मुझ परमेश्वर को निरंतर चिंतन करते हुए निष्काम भाव से उपासते हैं, उन नित्य एकीभाव से मुझ में स्थित पुरुषों का योग- क्षेम मैं स्वयं सम्हाल लेता हूं।”
यात ओशो तीन गोष्टी सांगतात.
१.० निष्काम भावनेने .
२.० माझी उपासना करतात.
३.० त्यांचे योग क्षेम मी सांभाळतो.
१.० निष्काम भावनेने जे माझी उपासना करतात ..अतिशय कठीण आहे. आपली उपासनाच एक वासना आहे . आपण परमेश्वराजवळ जातोच काही तरी मागण्यासाठी . कोणी आजारी आहे ,मला बरे करा ,कोणी मी बेकार आहे मला नोकरी द्या ,कोणी मला मूल नाही मला मूल द्या अश्या अनेक कारणांनी ..अनेक मागण्या घेऊन परमेश्वराकडे जातो. असे लोक उपासना करूच शकणार नाही कारण जिथे वासना आहे तिथे उपासना अशक्यच आहे.
( “निष्काम भाव से जो मुझे उपासते हैं। कठिन है बहुत। यही उपासना और वासना का भेद है। हमारी उपासना भी वासना ही है। हम परमात्मा के पास भी जाते हैं, तो परमात्मा के लिए नहीं, कारण कुछ और ही होता है। कोई बीमार है, इसलिए मंदिर में जाता है। कोई बेकार है, इसलिए मंदिर में जाता है। कोई निर्धन है, इसलिए मंदिर में जाता है। कोई निस्संतान है, इसलिए मंदिर में जाता है। जो किसी भी कारण से मंदिर में जाता है, वह मंदिर में पहुंच ही नहीं पाता है। शरीर भीतर प्रवेश कर जाएगा, मूर्ति सामने आ जाएगी, लेकिन उपासना संभव नहीं है। क्योंकि जहां वासना है, वहां उपासना संभव ही नहीं है।)
२.० उपासना म्हणजे काय ? परमेश्वराजवळ असणे. मी जेव्हा पैसे मागण्यासाठी परमेश्वराजवळ जातो तेव्हा मी पैश्याच्या जास्त जवळ असतो. आपण आपल्या मागणीच्या जास्त जवळ असतो ..ज्याच्या जवळ ती मागणी करतो तो लांब आसतो. परमेश्वर माझी मागणी मान्य करत नसेल तर मी ,कोणीतरी बाबा ..किवा महाराज गाठेन ..कारण मला माझी मागणी महत्वाची आहे . ज्याच्याजवळ ती मागणी मी करतो तो तर फक्त एक साधन आहे.
(“उपासना का अर्थ होता है, परमात्मा के पास होना। और जब मैं धन मांगने के लिए उसके पास जाता हूं तो मैं धन के पास होता हूं; उसके पास कैसे होऊंगा? मेरी मांग ही मेरी निकटता है। जो मैं चाहता हूं वही मेरे निकट है, और जिससे मैं चाहता हूं, वह तो केवल साधन है। अगर परमात्मा पूरा कर दे, तो ठीक है; अगर पूरा न करे, तो फिर मैं वहा नहीं जाऊंगा। कोई और पूरा कर दे, तो उसके पास जाऊंगा। जहां मेरी वासना पूरी होगी, वहां मैं जाऊंगा। परमात्मा कर सकता है, तो वहा भी तलाश कर लेता हूं! लेकिन परमात्मा मेरी इच्छा का हिस्सा नहीं है। मेरी इच्छा कोई और है।”)
३. मी योगक्षेम सांभाळतो म्हणजे काय ?
जे काही होईल ते माझ्यासाठी क्षेम आहे अशी भावना असणाऱ्या भक्तांचे. त्यांना काही संकटच येणार नाही ..दररोज सकाळी परमेश्वर चेक घेऊन त्याच्या दारात उभा असेल असे नक्कीच नाही . जे जे मिळेल ते ते भगवंताचा प्रसाद आहे ,मला तो स्वीकार्य आहे अश्या भावनेने परमेश्वराची उपासना करणाऱ्या भक्ताची मी काळजी घेतो.
आणि जो परमेश्वराची निष्काम उपासना करतो त्याला परमेश्वर प्राप्ती साठी काही ताप नको ,काही साधना नको. परमेश्वर त्याला सहजतेने उपलब्ध होतो.
(“योग- क्षेम मैं ही सम्हाल लेता हूं कृष्ण कहते हैं।
उतने भाव से, फिर जो भी हो, वही क्षेम है, ध्यान रखना आप! इसका यह मतलब नहीं है कि वैसे व्यक्ति को कभी मुसीबत न आएगी। इसका यह मतलब भी नहीं है कि उसे रोज सुबह चेक उसके हाथ में आ जाएगा! ऐसा कोई मतलब नहीं है। अगर इसे ठीक से समझेंगे, तो इसका मतलब यह है कि सुबह जो भी हाथ में आ जाएगा, वही उसका क्षेम है। जो भी उसे आ जाएगा हाथ में-भूख, तकलीफ, सुख, दुख-जो भी, वही परमात्मा के द्वारा दिया गया क्षेम है। वह उसे ही अपना क्षेम मानकर आगे चल पड़ेगा।
और योग और भी कठिन बात है। कृष्ण कहते हैं, वह भी मैं सम्हाल लेता हूं।
उसका मतलब? ऐसे उपासक को न साधना की जरूरत है, न साधन की जरूरत है; न तप की जरूरत है, न यश की जरूरत है, न किसी विधि की जरूरत है, न किसी व्यवस्था की जरूरत है। ऐसे व्यक्ति को परमात्मा से मिलने के लिए कुछ भी करने की जरूरत नहीं है। अगर निष्काम उपासना उसका भाव है, तो मैं उसे मिल ही जाता हूं। वह मिलने का काम मैं सम्हाल लेता हूं।”)
( संदर्भ . गीता दर्शन भाग ४ . अध्याय ९.. )
परमेश्वराची उपासना निष्काम भावनेने करणे हे आजकाल जवळ जवळ अशक्य आहे. .निष्काम भावनेने उपासना हे जे भगवान कृष्ण सांगत आहेत ही पूर्व पीठिका नसेल आणि तुम्ही जर अद्वैत भावनेने परमेश्वरा जवळ जात नसाल ..म्हणजे तुम्ही एकच आहात मग कोण कुणाकडे काय मागणार ? माझ्या मते अद्वैत भावनेत निष्काम भावना गृहीत आहे मग अर्थात अद्वैत आणि निष्काम भावना नसेल तर भगवान कृष्ण तुमचे योगक्षेम पाहणार नाही. ते तुमचे तुम्ही पहा.
ओशो पुढे म्हणतो “कृष्ण यह कहते हैं कि एक बार तू अपनी मांग छोड़, तो मैं सब सम्हालने को तैयार हूं। और जब तक तू मांग किए जाता है, तब तक मैं कुछ भी नहीं सम्हाल सकता हूं। न सम्हालने का कारण है। क्योंकि जब तक तू मांग किए जाता है, तब तक तू अपने को मुझसे ज्यादा समझदार समझे चला जाता है।”
अर्थात तुमच्या मागण्या सोडा ..तुमच्या वासना सोडा ..मी आणि तू हे नाहीच . अद्वैत ..मग मी योग क्षेम पाहायला तयार आहे.
जसे ज्ञानेश्वर म्हणतात कि जसा गर्भातील गोळा आईशी एकरूप असतो तेव्हा त्याला काही मागायचा प्रश्नच येत नाही. आई तिची काळजी घेते म्हणजेच आपल्या गर्भातील गोळ्याची घेते.
२.४ लोकमान्य टिळक.
लोकमान्य टिळक आपल्या गीतारहस्य या ग्रंथात थोडा वेगळा विचार मांडतात.
निष्काम भावनेने आणि अद्वैतपणे परमेश्वराची उपासना करणारा जो भक्त आहे तो अतिशय विरळा आहे . त्याला सिद्ध किवा स्थितप्रज्ञ असे म्हणता येईल . त्याला ब्रम्हज्ञानी किवा बुद्ध यांच्या भाषेत निर्वाण स्थितीत आलेला असेही म्हणता येईल. याचे योगक्षेम भगवान कृष्ण पाहतात असे वचन त्यांनी दिले आहे. परतू “ ज्ञानी पुरुषाने सर्व प्रापंचिक कर्मे निष्काम बुद्धिने करून सामान्य जनास सद्वर्तनाचा प्रत्यक्ष धडा घालून दिला पाहिजे “ असे लोकमान्य टिळकांचे मत आहे. म्हणजे त्याने सुद्धा कर्म टाकून उपयोग नाही .
पण सामान्य माणूस ..त्याने काय करायचे ? तर त्याने कर्मयोग पाळायचा . सिद्ध पुरुषांच्या ज्ञान योगापर्यंत पोचायचे आहे पण तो पर्यंत कर्मयोग आवश्यक आहे. आपल्या वाट्याला जे कर्म आले आहे ते अतिशय कुशलतेने आणि श्रद्धेने करायचे आहे .
या संदर्भात मी ऐकलेली एक गोष्ट मला आठवली. ती खरी आहे कि नाही मला कल्पना नाही पण त्यातील तत्व मात्र नक्कीच खरे आहे.
अर्जुन जेव्हा द्रौपदीच्या पणाप्रमाणे पाण्यात पाहून वर फिरणाऱ्या माश्याचा डोळा फोडायला सज्ज होतो तेव्हा कृष्णाचा आशीर्वाद घेण्यासाठी जातो. कृष्ण त्याला सांगतो ..तुझे पूर्ण लक्ष माश्याच्या डोळ्याकडे असू दे ..त्याचा फिरण्याचा वेग आणि तुझ्या बाणाचा वेग याचे गणित करून बाण सोड . अश्या अनेक सूचना त्याला देतो.
अर्जुन कृष्णाला म्हणतो ,
“ अरे तू माझा सखा ,माझा गुरु ..तू मला जे जे सांगतो आहेस हे सगळेच जर मी करायचे आहे तर तू काय करणार ?”
कृष्ण त्याला म्हणतो,” अरे अर्जुना जे तुला जमणार नाही ते मी करणार ! तू ज्या पाण्यात पाहून बाण सोडणार त्या पाण्यात लहरी उठणार नाहीत याची मी व्यवस्था करणार …”
३.० या श्लोकाचा मग नेमका अर्थ काय ?
माझ्या मते या श्लोकाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी या श्लोकातील “ निष्काम , अद्वैत आणि मी आणि माझी उपासना करतात “ या शब्दांचा अर्थ समजून घेतला पाहिजे.
३.१ मी स्वतः ..माझ्या भक्तांना योगक्षेम प्राप्त करून देतो .
या श्लोकातील “मी” हा फार महत्वाचा आहे. चराचरामध्ये मी भरून राहिलो आहे अश्या अनन्य भावनेने जे माझी उपासना करतात …
हा मी म्हणजे कृष्ण नाव असलेला ..सावळे रूप असलेला ..तो देह धारी कृष्ण ? गीता त्याच्या मुखातून बाहेर पडली पण तो फक्त त्या मागे असलेल्या निर्गुण रूपाचे सगुण रूप आहे.
मुण्डक उपनिषदा मध्ये एक प्रसिद्ध वाक्य आहे.
“ ब्रम्ह वेद ब्रम्ह एव भवती ..” (जो ब्राम्हविद्या जाणतो तो ब्रम्हमय होऊन जातो. )
परमेश्वराची उपासना करणे यात तीन पायऱ्या अपेक्षित आहेत.
जवळ जाणे ,तदाकार होणे आणि तन्मय होणे.
परमेश्वराशी तन्मय होणे म्हणजे तोच होणे, त्याच्यात विलीन होणे.
कृष्ण अर्जुनाला अतिशय गुह्य आणि काही योग्य व्यक्तींना ज्ञात असलेली राजविद्या या नवव्या अध्यायात सांगत आहेत. हीच ब्रम्ह विद्या आहे. कृष्ण योगेश्वर आहेत ,ते हि ब्रम्ह विद्या पूर्ण पणे जाणतात ..म्हणजेच या उपनिषदातील वाक्या प्रमाणे ते स्वतःच ब्रम्ह झाले आहेत. अद्वैत अवस्था त्यांनी साध्य केली आहे. जिथे फक्त एकच ब्रम्ह आहे. तिथे मी म्हणजे अहंकार युक्त मी शिल्लक उरत नाही . अश्या अवस्थेत जेव्हा कृष्ण मी म्हणतात तेव्हा ब्रम्ह त्यांच्या मुखातून बोलत असते.
कबीर यांचे एक प्रसिद्ध वचन आहे.
“ कहै कबीर मैं पूरा पाया सब घटी साहब दीठा”
तुम्ही चैतन्य स्वरूप झालात ..तुम्हाला सर्व मिळाले याची कसोटी काय ? कोणीही परमेश्स्वरूप झाला हे कसे ओळखायचे ? कबीर म्हणतात.
साहब दीठा ..मी नाहीसा झाला .सगळीकडे तोच भरून राहिला आहे असे ज्याची भावना निर्माण होते .
याचाच अगदी सरळ अर्थ असा आहे कि योगेश्वर कृष्ण जेव्हा म्हणतात कि मी त्यांचे योगक्षेम पाहीन तेव्हा इथे मी च्या जागी हे ब्रम्ह तुमचा योगक्षेम बघेल असा अर्थ घेतला पाहिजे.
३.२. माझी उपासना करतात.
गीतेतील हा ९.२२ श्लोक भगवान कृष्णाच्या तोंडी आहे. शंकराचार्यांच्या भाषेत “ जे भक्तगण मीच सर्वत्र या चराचरात आहे आणि मी आणि ते भक्तगण एकच आहेत अश्या भावनेने ..अद्वैतपणे ...माझी उपासना करतात त्यांना त्यांच्याकडे जे नाही ते मी त्यांना उपलब्ध करून देतो आणि जे त्यांच्याकडे आहे त्याचे मी रक्षण करतो .”
पुन्हा इथे या “मी” मुळे घोटाळा झाला आहे. माझे योगक्षेम परमेश्वराने पहावे म्हणून इथे श्रीकृष्ण या व्यक्तीची ..त्यांच्या नाम रुपाची उपासना सुरु झाली आहे. तो ज्या अव्यक्त ब्रम्हाचे व्यक्त स्वरूप आहे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष होते आहे. आणि इथे तरी ओशो म्हणतो तशी उपासना कुठे आहे ? फक्त वासना आहे. मग ती वासना पुरी होत नाही म्हणून रडगाणे आहे .
३.३ निष्काम कर्म करा म्हणजे कामच करू नका असे नक्कीच नाही.
भगवान कृष्णच जर माझी सर्व काळजी घेणार असतील तर आपण कामच का करा ? असा एक युक्तिवाद आलस्यात रमणारे करत असतात. त्याला भगवान कृष्णाने गीतेत दोन तीन ठिकाणी उत्तर दिले आहे. .
३.३..१ नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः।
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः॥३-८॥
भावार्थ . तुझी जी निहित कर्मे आहेत ती तू करत रहा. कर्म करणे हे अकर्म या पेक्षा श्रेष्ठ आहे. तू जर काम केले नाहीस तर तुला तुझ्या शरीराचीसुद्धा काळजी घेता येणार नाही .
३.३.२ यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते॥३-७॥
भावार्थ . इंद्रिये मनाने आवरून अनासक्त बुद्धिने कर्म करणाऱ्याची योग्यता निश्चितच विशेष आहे.
या श्लोकात सुद्धा निष्काम बुद्धिने कर्म करण्याचे महत्व सांगितले आहे.
३.३ ३ . न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि॥३-२२॥
भावार्थ. या तिन्ही लोकात मला करण्यासारखे काहीच कर्तव्य मला उरलेले नाही. तसेच मिळवण्यासारखे मला काहीच राहिले नाही . तरी सुद्धा हे अर्जुना मी काम करतच आहे.
या श्लोकात तर भगवान श्रीकृष्ण स्वतःचेच उदाहरण देवून कर्म करण्याचे महत्व सांगतात.
४.० योगक्षेम वहाम्यहम .. श्लोकाचा नेमका अर्थ आणि निष्कर्ष.
४.१ माझ्या मते या श्लोकाचा नेमका अर्थ समजण्यासाठी चार प्रश्नांची उत्तरे आपण आत्तापर्यंत केलेल्या चर्चेतून यायला हवीत.
योगक्षेमं वहाम्यहम् हे वचन कुणी दिले आहे ? आणि ते कुणाला दिले आहे ? या वचनाचा अर्थ भगवान कृष्ण योगक्षेम पाहणार म्हणजे आम्ही काहीही करायचे नाही असे आहे का ? सध्या तुमचे योगक्षेम कोण पहात आहे ?
कुणी दिले आहे ?
माझ्या मते हे वचन ब्रम्ह देते आहे. कृष्णाच्या सगुण रुपात देते आहे .
“ ब्रम्ह वेद ब्रम्ह एव भवती ..” (जो ब्राम्हविद्या जाणतो तो ब्रम्हमय होऊन जातो. ) या वाक्याप्रमाणे कृष्ण ..ज्या गोष्टीमुळे भगवान या पदाला उपलब्ध झाला आहे ..ते ब्रम्ह मय होऊन जाणे . या अद्वैतामुळे कृष्णाच्या मुखातून जरी बाहेर पडले असले तरी हे वचन ब्रम्ह देते आहे.
कुणाला दिले आहे ?
ज्याच्या मध्ये आणि ब्रम्ह या मध्ये अद्वैत निर्माण झाले आहे आणि जो ब्रम्हमय झाला आहे त्याला. हे अद्वैत निर्माण झाल्यामुळे त्याला सर्वच मिळाले आहे त्या मुळे तो आपोआपच निष्काम झाला आहे.
भगवान कृष्ण योगक्षेम पाहणार म्हणजे आम्ही काहीही करायचे नाही ?
अजिबात नाही. याचे उत्तर भगवान कृष्णानी ठामपणे नाही असेच असेच दिले आहे. तुम्ही कर्म करत रहा असेच ते सांगत आहेत .
सध्या तुमचे योगक्षेम कोण पहात आहे ?
हे ब्रम्हच तुमचे योगक्षेम पहात आहे. ते कसे ते पाहूया. हे जे ब्रम्ह आहे याला अनेक नावे आहेत. पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील अनेक विचारवंतानी अनेक नावानी या कडे निर्देश केला आहे. सगळ्यांना हे पूर्ण समजले असेल असे नाही ..पण निर्देश नक्की केला आहे.
ब्रम्हन. विश्व (Universe). अस्तित्व (Existence or Presence ).क्षेत्र (The field ) अशी अनेक नावे दिली आहेत. आज तुम्हाला जे काही मिळत आहे ..अन्न ,वस्त्र ,निवारा आणि बाकी सर्व हे तुम्हाला या विश्वाकडूनच येत आहे . त्या मुळे हे ब्रम्हच तुमचे योग क्षेम पहात आहे. कारण हे ब्रम्हच फक्त आहे . बाकी काहीच नाही.
पण इथे तुम्हाला पाहिजे ते फळ तुम्हाला का मिळत नाही ? तुम्हाला तुमच्या पूर्वकर्मा प्रमाणे फळ मिळते आहे.
( टीप. अनेक अमेरिकन आणि युरोपिअन लेखक आहेत ज्यांनी असा सिद्धांत मांडला आहे की हे विश्व एका प्रकारच्या लहरींनी बनले आहे आणि तुम्ही जर या लहरींशी सलग्न होऊ शकलात तर हे विश्व तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करू शकते.. किवा बरेच जण असेही मानतात कि या जगात एक सर्व व्यापक शक्ती आहे(Energy Field) जीच्याशी तुम्ही संवाद साधू शकलात तर तर तुम्हाला हवा तेवढा पैसा ,तुम्हाला हवी ती गाडी ,बंगला वगैरे तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल. पण या सगळ्यात एक धागा समान दिसतो . या जगात सर्व काही उपलब्ध आहे आणि तुम्ही फक्त संपर्क साधलात कि तुम्ही जे मागाल ते मिळेल. (Ask and you shall receive ..of course within reason ) असो. ते सगळे या ब्रम्ह बद्दलच बोलत आहेत यात मला शंका नाही पण तो एक वेगळा विषय आहे.)
४.२. मूळ प्रश्नांची उत्तरे मिळाली आता आणखी काही प्रश्नांचा विचार करू.
जे ब्रम्हमय झाले नाहीत अश्या बाकीच्यांनी काय करायचे ?
मी कोण याचा शोध घायचा . अहंकार सोडून कर्मयोगाचा अनन्य भक्तिपूर्वक अंगीकार करायचा . आपल्या वेदांतात चार पुरुषार्थ सांगितले आहेत.
धर्म ,अर्थ ,काम आणि मोक्ष.
हे चारही पुरुषार्थ सिद्ध करायचा प्रयत्न करत रहायचे आहे.
आणि जो ब्रम्हमय झाला आहे त्याने सुद्धा आपली निहित कार्ये कर्मयोगी होऊन करत रहायचे आहे. पण ते फलाशा न धरता ,निष्काम भावनेने .
भगवान कृष्ण परमेश्वर आहेत मग ते आणि ब्रम्ह यात फरक काय ?
काहीच नाही . प्रत्येक धर्मामध्ये असे अनेक प्रेषित आहेत ज्यांनी मीच परमेश्वर आहे असे घोषित केले आहे. हिंदू धर्मात सुद्धा अनेक योगी आहेत ज्यांनी मी परमेश्वर आहे ..सगळे जग हे माझ्या मुळेच चालते ..मी शिव आहे ..मी विष्णू आहे ..अश्या घोषणा केल्या आहत .
माझ्या मते ते सर्व ब्रम्हमय झाले आहेत .हे सगळे हेच सांगत आहेत ..अहंम ब्रम्हास्मि...
मग आम्ही भगवान कृष्णाची उपासना केली त्याची पूजा केली तर काय बिघडले.?
तुमचा मूळ हेतू हा त्या निर्गुण आणि निराकाराला जाणून आपण स्वतःच तसे होणे हा आहे किवा असायला हवा . तुम्ही सुरवात जरी सगुण रूपापासून केली तरी केव्हातरी त्या रुपात न अडकता त्या पुढे निर्गुण निराकारा कडे जाणे म्हणजेच ब्रम्ह जाणणे आणि स्वतःच ब्रम्हमय होणे हेच अपेक्षित आहे.
तुम्ही एकदा सगुण रूपाच्या मागे लागलात कि त्यातून सुटून निर्गुण निराकाराकडे जाणे हे रामकृष्ण परमहंसांना सुद्धा अवघड गेले. तुमची उपासना निष्काम आहे का ? हा सुद्धा मुद्दा आहेच.
पण मग मी जी कृष्णाची किवा इतर देवांची पूजा अर्चा करतो ,नाम स्मरण करतो तसेच वेगवेगळ्या तीर्थ क्षेत्राला जातो त्याचा मला काहीच फायदा नाही ?
तुम्ही ज्ञान योग ,कर्मयोग अथवा भक्ती योग काहीही अनुसरण करा पण मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे ,परमेश्वराची उपासना करणे यात तीन पायऱ्या अपेक्षित आहेत.
जवळ जाणे ,तदाकार होणे आणि तन्मय होणे.
परमेश्वराशी तन्मय होणे म्हणजे तोच होणे, त्याच्यात विलीन होणे.
परमेश्वरात विलीन होणे म्हणजेच तुमचा अहंकार पूर्ण पणे विलीन होणे. कारण तिथे तुम्ही आणि तो असे दोन असणे अशक्यच आहे .
मग माझी पूजा अर्चा ,ध्यान धारणा , जपजाप्य याने काहीच होणार नाही ?
तुम्हाला मानसिक समाधान जरूर मिळेल. पण तुम्हाला तुमच्या पुर्वाकर्मा प्रमाणेच फळ मिळणार आहे. हे सर्व तुम्ही जे करता त्या मुळे तुमचा अहंकार कमी होतोय कि वाढतोय हा खरा प्रश्न आहे. मी किती पूजा करतो ,मी किती दान करतो ,मी किती नाम स्मरण करतो हा” मीच “जर वाढणार असेल तर तुम्ही जे करताय त्याचा उपयोग फक्त मानसिक समाधान.
कबीर म्हणतो तसे ,“ कहै कबीर मैं पूरा पाया सब घटी साहब दीठा”
“ मी” शून्य झाला तर तुम्हीच ब्रम्ह होणार . शून्य बरोबर अनंत असे हे विचित्र समीकरण आहे.
***********************
जयंत नाईक .
प्रतिक्रिया
30 Apr 2020 - 7:41 pm | Prajakta२१
निष्काम कर्म हेच अत्यंत कठीण आहे तर निष्काम उपासना हि तर अजून लांबची गोष्ट
एक शंका:कर्म करायची बुद्धी देणारा परमेश्वर आहे तर चांगल्या वाईट दोन्ही कर्मांची जबाबदारी परमेश्वरावरच जाते मग पूर्वकर्म कसे काय अँप्लिकेबल?
तसेच एखाद्याचे चांगले कर्म दुसऱ्यासाठी वाईट ठरले तर काय?
1 May 2020 - 10:18 am | Jayant Naik
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
1 May 2020 - 10:19 am | Jayant Naik
आपल्या शंकांचे निरसन कोहमसोहम यांनी केलेलेच आहे.
6 May 2020 - 2:29 pm | संजय क्षीरसागर
कर्मसिद्धांत लोकांच्या मनात मॉरल पोलिस उभा करण्यासाठी आहे, त्यामुळे प्रत्येकी एक पोलिस नेमण्याची पंचाईत दूर होते.
साधा विचार करा, जर प्रत्येकाला त्याच्या कर्माप्रमाणे पुढचं आयुष्य द्यायचं झालं तर सगळ्यांच्या सर्व कर्मांचा डेटाबेस ठेवायला हवा. परत तो मॅनेज करुन इंप्लिमेंट करायची अत्यंत काँप्लिकेटेड जवाबदारी निभावणारी स्वतंत्र यंत्रणा हवी. शिवाय हे करणार्यांच्या कर्मावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा हवी. पुन्हा ती निरिक्षण यंत्रणा योग्य कर्म करते का यावर नजर ठेवणारी आणखी एक वरिष्ठ यंत्रणा हवी.......... असं हे न संपणारं चक्र आहे आणि ते वास्तवात कुठेही नाही.
तस्मात, फक्त शुद्ध हेतू ठेवून कोणतंही कर्म केलं तर त्याचा कोणताही पश्चात्ताप करावा लागत नाही; थोडक्यात अशा कर्माचा कोणताही लेप कर्त्याला लागत नाही. इतका साधा आणि सोपा जगण्याचा फंडा आहे.
1 May 2020 - 5:35 am | कोहंसोहं१०
सुंदर लेखन आणि गहन विचार. तुमचे अध्यात्मावर अधिक लिखाण वाचायला आवडेल.
"बुद्धी देणारा परमेश्वर आहे तर चांगल्या वाईट दोन्ही कर्मांची जबाबदारी परमेश्वरावरच"-----> Prajakta२१, परमेश्वराने बुद्धी दिली आहे परंतु त्या बुद्धीचा वापर करणारे आपण (अहंकार) आहोत त्यामुळे येणाऱ्या कर्माची जबाबदारी पण आपलीच. जेंव्हा आपल्याकडून कर्मे परमेश्वराशी तन्मय होऊन केली जातात तेंव्हा आपोआपच ते कर्म आपण (अहंकार या अर्थाने) करत नसतो तर परमेश्वर ते आपल्याकडून योग्य मार्गदर्शनद्वारे करवून घेत असतो. त्यावेळी आपण फक्त निमित्तमात्र. तेंव्हा अशी कर्मे आपल्याला बाधित नाहीत. परंतु रोजच्या जीवनात आपण अनेक कर्मे अहंकारयुक्त होऊन (त्या कर्माचा करता मी आहे असे मानून) स्वतःच्या सीमित बुद्धीच्या आधारे घेतो तेंव्हा त्याची जबाबदारी आपल्यावरच येते आणि कर्म, कर्मफळ, आणि त्यानुसार जीवन यांची साखळी सुरु राहते
1 May 2020 - 10:25 am | Jayant Naik
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार. आपल्याला माझा कर्मण्ये वाधिकारस्ते या श्लोकावर लिहिलेला लेख नक्की आवडेल . http://www.misalpav.com/node/46172/backlinks
1 May 2020 - 2:38 pm | Prajakta२१
धन्यवाद
1 May 2020 - 11:26 am | अभ्या..
योगक्षेमं वहाम्यहम्..खरा अर्थ : जगलात तर तुमचे पैसे आम्हाला, मेलात तर तुमचे तुम्हाला. :)
1 May 2020 - 4:10 pm | Jayant Naik
मस्त प्रतिसाद . आवडला.
1 May 2020 - 12:19 pm | djmakarand@gmail.com
खूप छान प्रयत्न केला आहे.... अभ्यास पूर्ण...
खालील बाबी विषयी असेच अभ्यासपूर्ण लिखाण केले तर आनंद होइल....
१) भगवंताला अभिप्रेत असलेला " योगक्षेम " कोणता ?
२) देह बुध्दी ने केलेले विचार आणि आत्म बुध्दी ने केलेले विचार यामध्ये काय आणि कोणते फरक असू शकतात.
३) गीतेचा अभ्यास व चिंतन मनन कोणती बुध्दी केन्द्र स्थानी ठेऊन करावयास हवे.
मकरंद
3 May 2020 - 9:44 am | Jayant Naik
तुमच्या वेगवेगळ्या प्रश्ना बद्दल.
१ योगक्षेम या बद्दल मी माझ्या लेखात लिहिले आहे त्या मुळे इथे वेगळे काही सांगावे असे नाही. तथापि माझ्या मते हे तुमच्या योग्यतेवर अवलंबून आहे. तुम्ही अद्वैत साधले असेल तर सर्व काही नाही तर काहीही नाही. म्हणजे भगवान वेगळे काही करणार नाही तुमच्या योग्यते प्रमाणे आणि पूर्व कर्माप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल.
२ आणि ३. हा थोडा वेगळा विषय आहे त्या वर सविस्तर केव्हा तरी लिहीन.
6 May 2020 - 10:59 am | संजय क्षीरसागर
म्हणून उत्तर देतो :
२) देह बुध्दी ने केलेले विचार आणि आत्म बुध्दी ने केलेले विचार यामध्ये काय आणि कोणते फरक असू शकतात.
> आत्मबुद्धी म्हणजे आपणच सत्य आहोत हा उलगडा झाल्यावर देह आणि मनाचा होणारा वापर. अशी व्यक्ती इंट्यूशननं जगते. इंट्यूशनचा सुरेख मराठी अर्थ तात्कालिक ज्ञान असा आहे.
स्वतःला व्यक्ती समजणार्याला, आधी विचार आणि मग क्रिया याच बंधनातून निर्णय घेत जगावं लागतं. त्यामुळे प्रत्येक निर्णयाला मनात विविध पर्याय उमटतात आणि त्या गोंधळातून एक निवडावा लागतो. निर्णय चुकेल ही धास्ती कायम असते आणि तो योग्य झाला तरी मनाची सरशी झालेली असते, कारण तुम्ही निवडलेला पर्याय मनानं दिलेला असतो.
रुपकात्मकतेनं हा मुद्दा सहज लक्षात येईल. जीवनाच्या रथाचं सारथ्य अर्जुनाकडे (मनाकडे) असतं आणि लगाम कृष्णाकडे (म्हणजे आपल्याकडे) येण्याची शक्यता सुतराम नसते.
स्वरुपोलब्ध व्यक्तीचा निर्णय इंट्यूशननी होतो; त्यामुळे क्रियेत, देह आणि मन एकसंध असतात. निर्णय मानसिक उहापोहातून झाला नसल्यानं इतर विकल्पांचा विक्षेप नसतो. त्याची क्रिया एकमार्गी (युनी-डिरेक्शनल) असते.
थोडक्यात, आत्मबुद्धी म्हणजे इंट्यूशन आणि देहबुद्धी म्हणजे आपण देहच आहोत या धारणेतून केलेले विचार आणि जगलेलं आयुष्य.
३) गीतेचा अभ्यास व चिंतन मनन कोणती बुध्दी केन्द्र स्थानी ठेऊन करावयास हवे
> बुद्धी ठिकाणावर ठेवायची असेल तर गीतेचा अभ्यास न केलेला बरा !
(असं जयंताची नम्रपणे माफी मागून सांगतो)
7 May 2020 - 9:41 am | Jayant Naik
"बुद्धी ठिकाणावर ठेवायची असेल तर गीतेचा अभ्यास न केलेला बरा !
(असं जयंताची नम्रपणे माफी मागून सांगतो)"
असे काही नाही. बाकी अगदी तुझे आहे तुजपाशी मधील काकाजींच्या भाषेत सांगायचे तर ," भलत्या वयात भलत्याच गीतेला धरून बसले " तर असे होत असावे कदाचित. पण मला नक्की माहित आहे कि भागवत गीता ,अष्टावक्र गीता अश्या अनेक गीतांचा अभ्यास करूनही आपली बुद्धी ठिकाणावर आहे आणि त्यात आपला सं गीताचा अभ्यास तर बराच आहे. तेव्हा कोणत्याही गीतेचा आणि डोके ठिकाणावर असण्याचा काहीही संबंध नसावा.
7 May 2020 - 3:51 pm | संजय क्षीरसागर
एका झेन स्टोरीमुळे सत्याचा उलगडा झाल्यावर मी अनेक अध्यात्मिक प्रक्रिया आणि ग्रंथांचं अध्ययन केलं.
गीता हा सर्वात मान्यताप्राप्त ग्रंथ असल्यामुळे त्याचा समग्रतेनं अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की कर्मयोग हा तिचा बहुचर्चित भाग साधकांचा कमालीचा गोंधळ उडवणारा आहे. त्यामुळे भारतीय मानसिकतेत कर्म कसं करावं, ते फलनिरपेक्ष कसं असू शकेल, इश्वराला समर्पित कर्म करायचं म्हणजे नक्की काय करायचं असे अनेकानेक प्रश्न पडले. तेच इथेही सदस्यांनी विचारले आहेत.
परिणामी समाजाचं कर्मनिहाय वर्गीकरण होण्यापासून ते व्यक्तीला त्याच्या कर्मावरुन जोखण्यापर्यंत परिस्थिती आली. शिवाय एकूणात कर्माची वाट लागायची ती लागलीच.
शिवाय यात एक बेसिक घोळ असा की इश्वर ही मानवी मनापलिकडे कुठेही वास्तविकता नसलेली, निव्वळ कल्पना आहे. या कल्पनेला कर्म समर्पित करण्याची कल्पना; एकतर मान्य होणं कठीण आणि तसं केल्यावर त्यातून काही निष्पन्न होईल, हे त्याहून कठीण !
त्यामुळे गीतेच्या बहुचर्चित कर्मयोगात काहीही तथ्य नाही.
सांख्ययोग, भक्तीयोग वगैरे विषयी लिहीणं विषयाला धरुन होणार नाही; तेंव्हा इथे थांबतो !
11 May 2020 - 9:58 am | राघव
३) गीतेचा अभ्यास व चिंतन मनन कोणती बुध्दी केन्द्र स्थानी ठेऊन करावयास हवे.
गीताच नाही, तर इतरही कोणत्याही विषयाचा अभ्यास/चिंतन-मनन करणं म्हणजे काय? लाख पुस्तकं वाचली तर अभ्यास झाला असं म्हणायचं काय?
अनेक पंडित, विद्वान, साधू जेव्हा वेगवेगळ्या अध्यात्मिक संकल्पनांच्या अर्थाचा आणि त्यातून सांगितलेल्या शिकवणीचा घोळ घालून वाद करायचे अन् त्यातून निष्पत्ती व्हायची नाही , तेव्हा ठाकूरांकडे यायचे आणि ते योग्य ते सांगून समाधान करायचे. कसं शक्य आहे? कारण ठाकूरांचा अभ्यास. मग अभ्यास नक्की कशाला म्हणायचं? असा प्रश्न डोकावतो. :-)
11 May 2020 - 11:04 am | संजय क्षीरसागर
परमहंसांनी निष्काम कर्माचा (किंवा किमान कर्मबंधाचा) प्रश्न कसा सोडवला होता हे सांगू शकाल का ?
6 May 2020 - 9:47 pm | Prajakta२१
> बुद्धी ठिकाणावर ठेवायची असेल तर गीतेचा अभ्यास न केलेला बरा !>>>>>>>>>>>>>हे मात्र बरीक खरंय
11 May 2020 - 9:48 am | राघव
लेख आवडला. खूप अभ्यासकरून लिहिलेला जाणवतो. :-)
कुणीही ठरवून निष्काम कर्म करणं शक्य नाही. हां, ते आपसूक होणं मात्र शक्य आहे.
एक प्रश्नः एकच कार्य एकानं कर्तव्य म्हणून करणं आणि दुसर्यानं एखाद्याच्या प्रेमापोटी करणं यात काय फरक? ते कर्म कोणतं होईल?
11 May 2020 - 12:38 pm | संजय क्षीरसागर
कारण तो आचरणात आणणं कदापी आणि कुणालाही शक्य नाही.
साधा विचार करा, पगार मिळणार नाही असं जाहीर केलं, तर लोक बिछान्यातून उठणार सुद्धा नाहीत.
> एकच कार्य एकानं कर्तव्य म्हणून करणं आणि दुसर्यानं एखाद्याच्या प्रेमापोटी करणं यात काय फरक? ते कर्म कोणतं होईल?
घरातल्या स्त्रीनं केलेला स्वयंपाक आणि हॉटेलच्या शेफनं केलेला स्वयंपाक असा तो फरक होईल. अर्थात, एखादी स्त्री तोच स्वयंपाक जवाबदारी पार पाडायची म्हणून करेल आणि स्वतःच्या कामात आनंद घेणार शेफ त्याचा सारा आनंद त्या पाककृतीच्या स्वादात आणेल.
थोडक्यात, प्रत्येक कर्म हे कायम व्यक्तीनिरपेक्ष आहे. कर्माचा आनंद हा व्यक्ती ते किती समरसून करते यावर आहे.