परवड !

अभिनव प्रकाश जोशी's picture
अभिनव प्रकाश जोशी in जनातलं, मनातलं
18 Apr 2020 - 10:45 am

तो एक शनिवार होता. राजाभाऊ साठे, दामलेंच्या श्री सीता-राम बुक डेपोत कामाला असत. शनिवारची सुट्टी असून सुद्धा आज दामल्यांनी त्यांना फोन केला व दुकानावर येऊन नवीन आलेली बुके दाळावयास व त्यांचा हिशोब करण्यास सांगितल्याने झक मारीत त्यांना दुकानात जावे लागले होते. दुकान म्हणजे तसें जवळही नव्हते. दुकानात पाऊल ठेवण्यासाठी त्यांना फॉण्ड्यावरून ३० किमी. दूर पणजीला जावे लागायचे. रोजच्याप्रमाणे राजाभाऊ पणजीला जायला निघाले. वाटेवर जाताना त्यांनी साधलेंच्या दुकानावरून रोजचा पेपर घेतला व राशी भविष्य असलेले वर्तमानपत्राचे दुसरे पान उघडले. सगळ्या बारा राशीतली नेमकी कर्क रास त्यांनी शोधून काढली व ते भविष्य वाचू लागले. ''कर्क रास- आजचा दिवस तुमच्यासाठी खूप भारी असणार आहे.संकटे येण्याची शक्यता. सावधगिरी बाळगा.'' भर पावसात राजाभाऊंना घाम फुटल्यासारखे दिसले, अन क्षणातच त्यांना वाटले कि आपले पूर्ण शरीर घामाने भिजले आहे!. पण तेव्हाच साधले काकांनी भर पावसात पन्हाळीखाली उभे राहून भिजलेल्या राजाभाऊंना भानावर आणले व राजाभाऊ धाडकन भानावर येऊन त्यांनी छत्री उघडली. २ पाऊले चालतात न चालतात तोच गाडीने आपल्याच धुंदीत जाणारया शंभू धोब्याने आपली गाडी पाण्याने भरलेल्या शेजारच्या खड्ड्यातून न्हेली व राजाभाऊंची अवस्था होळी खेळलेल्या एखाद्या पोऱ्यासारखे झाले. राजाभाऊंनी रागात येऊन एक जोरदार शिवी हासडली, जी भर पावसात कोणालाच ऐकू गेली नाही.
शंभू धोब्याने आपले मार्गक्रमण चालूच ठेवले. राजाभाऊंच्या दिवसाची सुरुवातच अशी काही झाली होती कि संपूर्ण दिवसाची त्यांना कल्पनाच करवेना . राजाभाऊंनी सावधतेने मागे वळून कानोसा घेतला. कोणतीच गाडी वगैरे येत नसल्याचे पाहून त्यांनी दाणदाण पावले मारीत बस स्टॅन्ड गाठला. एव्हाना पाऊस थोडासा मंदावला होता. दुरून राजाभाऊंना ''म्हापश्या म्हापश्या'' असा आवाज ऐकू आला व त्यांनी जाणले कि म्हापश्याची बस आता सुटणार आहे, त्यामुळे पणजीची बस यायला थोडासा उशीर आहे. राजाभाऊंनी आपल्या पावलांचा वेग थोडासा कमी केला. शर्टावर उडालेले शिंतोडे रुमालाने पुसत,े राजाभाऊ प्रासावर पोहोचले. हरी आपट्याच्या हॉटेलातील गरम गरम भज्यांचा सुटलेला वास नाकात, मनात व जिभेवर घोळवून राजाभाऊ बसस्टोपवर पोहोचले. शेवटी एकदाची पणजीला जाणारी ''सरगम'' बस आली व राजाभाऊ आत चढले. एव्हाना पावसाने जोर धरला , छत्रयांची उघड- झाप झाली, बसच्या दाराकडे गोंधळ उडाला व पाऊस थोडासा ओसरला. सुरवातीला पुढे-पुढे करणारे आत शिरले व राजाभाऊंचा मार्ग मोकळा झाला. राजाभाऊंनी पटकन आत शिरताच त्यांच्या पुढचेच सीट धरले व त्यांनी सामानाची आवराआवर केली. कमीत कमी सीट तरी मिळाली ह्याच्या आनंदात त्यांनी समोरच्या महादेवाच्या देवळीला नमस्कार केला.बस काही क्षणातच भरली व जराशीच पुढे सरकली. पुन्हा एकदा आपट्याच्या हॉटेलातील भज्यांचा वास सुटला व राजाभाऊंचा चेहरा खुलला. प्राणायाम करतात त्याप्रमाणे पुन्हा एकदा राजाभाऊंनी भज्यांचा वास साठवून घेतला. आपल्या बाजूला बसलेल्या अनोळख्याला नकळतच त्यांनी '' आमच्या आपट्याली भजी सामकीं A -१ हा '' असे सांगितले. अनोळख्याने साहजिकच कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शेवटी धर्मा कंडक्टर बशीत चढला व त्याने उभे असलेल्यांना नेहमी प्रमाणे पुढे सरकण्यास सांगितले. एक उत्साही आधीच १०० ची नोट देत होता त्याला दम दिला व धर्मा आणखी प्रवासी जमवू लागला. १-२ जणांना उगाचच आपले'' सीट आसा, येयात रे सीट आसा '' असं म्हणून आत घेतले व बशीने आपली वाट धरली. एव्हाना पुन्हा पाऊस झाला व खड्डड्ड -खड्डड करून सगळ्या लोकांनी खिडक्या बंद केल्या. पण नेमकी राजाभाऊंची खिडकी मात्र हलायला तयार नव्हती. २ मिनीटांच्या कष्टांनंतर ती ढिम्म खिडकी एकदाची बंद झाली व राजाभाऊंनी पुन्हा आपला रुमाल कामाला लावला.शेवटी बस फर्मागुडीला पोहोचली व त्यांचा तो अनोळखी शेजारी उतरला. त्याची जागा आता भानुदास नायकाने घेतली. ''भानुदास'' ह्या संताच्या नावाप्रमाणे भानुदास काही संत व्रुत्तीचा नव्हता. एका जाग्यावर काही त्याला बसवत नसे.काही ना काहीतरी उद्योग तो चालू ठेवत असे. बस गणपतीच्या देवळाकडे पोहचली व राजाभाऊंनी जाग्यावरूनच नमस्कार केला व हात वर करून तीन प्रदक्षिणा घातल्यासारखे केले. त्यांचे पाहून भानुदासानेही आपले हात वर करून फिरवायला सुरुवात केली व शेजारी उभे असलेल्या १-२ प्रवाश्यांना आपल्या हाताचा प्रसाद दिला. एवढ्यावर तो थांबला नाही त्याची तिसरी प्रदक्षिणा वर ठेवलेल्या पिशव्या व त्यात असलेले तेरे, आमाडे, तामडी भाजी, काकड्या, व एक छत्री खाली घेऊन आली.अर्थातच ओल्या छत्रीने राजाभाऊंवरच धार धरली. तोंड वाकडे करून राजाभाऊंनी छत्रीला पुन्हा जाग्यावर पोहोचवले व ज्याची पिशवी होती त्या प्रवाशाने तिला सामानासह ताब्यात घेतले. भानुदासाला मात्र घडलेल्या प्रसंगाची काहीईईई फिकीर न्हवती तो आपल्याच नादात होता. एव्हाना त्याने खिशातून दोन रुमाल काढले. एक त्याने बाजूला ठेवला व दुसरा २-३ दा असा काही झटकला कि सगळ्यांना पावसाची वावझड मारल्यासारखे झाले. सगळ्यांनी भानुदासांवर शिव्यांचा वर्षाव केला. भानुदास आपला निरागस चेहरा तसाच ठेऊन होता. आता त्याने तो रुमाल हात धरायच्या वरच्या हॅन्डल वर लीलया सुकत सुद्धा घातला. आता त्याने आपला मोर्चा त्या दुसऱ्या रूमालाकडे वळवला व आपले नाक जोरदार आवाजात शिंकरले. रुमालाने एक पोत चुरगाळून नाकात घालून १-२ शिंका काढल्या. राजाभाऊंना तर इतका वीट आला कि त्यांना भज्यांचा विसर पडला. शेवटी बस भोमाला पोहोचली व कोणतीही रिस्क नको म्हणून सगळ्यांनी भानुदासाला भोमाला उतरवले ! बाणस्तारिला धर्माने सगळ्यांकडून मोड वगैरे घेतली व तो दाराकडे जाऊन उभा राहिला. एव्हाना राजाभाऊंचा डोळा लागला. पण अचानक त्यांना आपल्या चेहऱ्यावर गरम हवेचा फवारा बसल्यासारखे झाले व आपल्या शेजारी बसलेल्या अगडबंब स्त्री- देहाची त्यांना जाणीव झाली. त्यांच्या विनंतीप्रमाणे सरकून सरकून राजाभाऊंना आपण बाहेर पडतोय कि काय असे वाटू लागले होते. राजाभाऊ फार पिचून गेले होते. त्यातच पुन्हा पाऊस चालू झाला होता. बस तशी जुनीच होती. बसचं छप्परही गळत होतं. राजाभाऊंवर वरूनही पाण्याचा मारा चालू झाला. राजाभाऊ हतबल झाले होते ...राजाभाऊंना केव्हा एकदा पणजी येते कि काय असं झालं होतं. शेवटी एकदाचं मांडवीचं पात्र दिसू लागलं व त्यांना लास्ट स्टॉप आल्याचा आनंद झाला. राजाभाऊ आपला बटवा घेऊन पणजी बसस्टँडवर उतरले व त्यांनी तिथल्याच एका दुकानावर चहा मागवला. दुकानावरचा पोऱ्या चहा घेऊन येतच होता जेव्हा तिथल्या एका कुत्र्याने त्याचावर, लाड करून घेण्यासाठी उडी मारली व पोऱ्याच्या हातातील चहाच्या कपाने व त्यातील गरम चहाने राजाभाऊंची पॅन्ट भिजवली. राजाभाऊंच्या कपाळावर आठ्या होत्या. त्यांनी पोऱ्याला काहीच म्हटलं नाही. फक्त फुकट मिळालेला आणखी एक कप चहा मुकाट्याने पिऊन ते वाट चालू लागले. ''अहो राजाभाऊ, कोठे चालला आहात?? आज पावसाने सर्व काही ठप्प केले आहे, चला आता घरीच जाऊया. काम उद्या-पर्वा बघू '' - असा आवाज आला. वळून पहातात तर साक्षात मालक दामले उभे होते. राजाभाऊ वरवरचेच हसले व मालकांसोबत ते पुन्हा 'सरगम' बशीत बसले. मालक व राजाभाऊ दोघेही एकाच सीटवर बसले. बस फॉण्ड्याला पोहोचली. राजाभाऊ घरची वाट धरतील एवढ्यात मालक म्हणाले- '' राजाभाऊ, इथे आपट्याच्या हॉटेलात भजी फार उत्तम मिळतात म्हणे, मी काय म्हणतो २-२ प्लेट खाऊनच जाऊ आपापल्या घरी '' ! राजाभाऊंनी पुन्हा एकदा प्रासावरील महादेवाच्या देवळीला नमस्कार केला ...!
समाप्त

कथालेख

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

18 Apr 2020 - 1:04 pm | सौंदाळा

मजेदार फोंडा - पणजी प्रवास घडवला राजभाऊबरोबर
बेगीन यें रे, बेगीन यें, चल वच रें राहिलं का ;)
फोंडा ते पणजी प्रवास नेहमी फोंडा ते मंगेशी, मंगेशी ते पणजी असाच केलेला - सौंदाळा

अभिनव प्रकाश जोशी's picture

20 Apr 2020 - 12:02 am | अभिनव प्रकाश जोशी

खूप खूप धन्यवाद ! ☺️ इतरही कथा वाचाव्यात, गोवेकरांची छाप असलेल्याच आहेत ; आवडतील अशी आशा बाळगतो !

ओल्या कपड्यांनी पुन्हा प्रवास करणे फारच जिकीरीचे आहे. राजाभाऊ कसे काय तयार झाले माहीत नाही.