बालकथा १
आजीची वामकुक्षी झाली होती आणि कडेला चार वर्षाच्या अनिशची चुळबुळ चालू होती.
आजी.....कधी उठायचं?
ही बघ उठलेच ....असे म्हणत आजी उठली.
आजी...आजोबा पण उठले...
हो रे बाळा....चल मी तुला आता दुध देते....असे म्हणत आजीने चहासाठी आधण ठेवले.
हे तू काय करतेस?? अनिश चिवचिवतच होता ...
चहा करतेय रे बाळा .....
आजी ..मला पण चहा ....
लहान मुलांनी चहा नसतो प्यायचा.....आजीने डोळे वटारले ..
मग मोठी माणसे का पितात?
हं....आजीबाई द्या आता उत्तर ...असे म्हणत आजोबा स्वयंपाकघरात आले...
बघा....चिमुरडा कसा शब्दात पकडतोय....असे म्हणत आजीने त्याला उचलून घेतले....व त्याची गोड पापी घेतली. “आधी हे दुध पी बघू.....मग देईन तुला थोडा चहा..!
अनिशचे दुध पिऊन झाले आणि आजोबांकडे वशिला लावत त्याला थोडा चहा पण मिळाला. आजी....मी कप धुतो. आजीच्या भोवती भोवती त्याचे चालूच होते.
बरं ..नीट जपून ने हं ..
हो आजी.....म्हणत अनिशने हळूहळू कप सिंक जवळ नेले....तेवढ्यात जोरात ओरडत अनिश आजीकडे धावत आला...
काय रे...काय झाले??
आजी.....सिंक मध्ये काहीतरी आहे ..
काय आहे ..बघू ...आजी अनिशला घेऊन सिंकजवळ आली...ते बघ....अनिश दाखवू लागला...तो किडा.....
सिंकमध्ये निळा –मोरपिशी-हिरवा असे चमकदार रंग असलेला आठ पाय असलेला व चिमुकले पंख असलेला किडा होता....!
आजी..तो चावेल...
नाही रे बाळा...अगदी चिमुकला आहे तो.....आपले सिंक अगदी गुळगुळीत असते ना... त्यावरुन त्याला चालता येत नाही.... आणि त्याचे चिमुकले पंख ओले झालेत. हा बघ मी कागद आणलाय ...असे म्हणत आजीने कागदाचा एक छोटासा तुकडा केला व त्या किड्याला कागदावर घेतले...अनिश घाबरून लांबूनच बघत होता...आजीने त्या कागदाची अलगद घडी केली त्या किड्याला बाहेर सोडून दिले.
गेला तो?? अनिशने विचारले...
हो गेला...
तो चावेल तुला...
नाही रे बाळा ..तो काही नाही करत आपल्याला...तो चुकून घरात आलेला...आता आपण त्याला बागेत सोडून दिला ना....तो राहतो झाडावर, पानांवर, फुलांवर ....तेच त्याचे घर ....त्याला घाबरायचं नसतं काही.....त्याचा रंग किती छान होता बघितलास??
हो छान होता....
मग आता नाही ना घाबरणार त्याला??
नाही...पण तू किंवा आजोबा जवळ असलात तरच...असे म्हणत अनिशने आजीला गोड मिठी मारली. आजीने पण त्याला प्रेमाने उचलून घेतले.
©स्मिता वैद्य
प्रतिक्रिया
30 Oct 2019 - 11:29 am | सोन्या बागलाणकर
छान बालकथा.
15 Apr 2020 - 9:32 pm | ऋतु हिरवा
धन्यवाद