करोना माहात्म्य ||२||
तुमच्या प्राणप्रिय व्यक्तीची तुम्हीच हत्या करू नका
मनुष्य मरणाला भीत नाही आणि हाच करोनाशी लढताना सगळ्यात मोठा अडचणीचा भाग ठरणार आहे. जो मरणाला भीत नाही, तो स्वतः बेसावध असतो आणि दुसर्याचे जीवनही बेसावधपणे धोक्यात घालू शकतो. मनुष्य शौर्यवान असतो हा त्याचा उपजत गूण असतो पण हाच उपजत गूण करोनाशी लढताना नुकसानकारक ठरणारा आहे. कालपर्यंत माणसाची जी शक्तिस्थाने होती तीच शक्तिस्थाने आज रोजी करोनाने दुर्बलस्थाने करून टाकलेली आहेत. मनुष्याने वाघ, सिंह, हत्ती यासारख्या बलाढ्य आणि हिस्त्र प्राण्यावर विजय मिळवला, तेव्हा शौर्याची आवश्यकता होती. साधने वापरायला शौर्य आवश्यक असते पण करोना हे संकटच मुळात आगळेवेगळे असल्याने कालपर्यंतची सर्व मापदंड आज रोजी रद्दबातल झालेली आहेत. त्यामुळे माणसाला आपल्या एकंदरीतच लढण्याच्या व संरंक्षणाच्या कौशल्याची नव्याने आखणी करावी लागणार आहे. आज मापदंड इतकी बदललेली आहेत की, कालचे कौशल्य, गुणवत्ता, प्रावीण्य आज याक्षणी पूर्णतः निरुपयोगी झालेले आहेत.
जेव्हा जेव्हा समाजावर सार्वत्रिक संकट येते तेव्हा उपाययोजनात्मक प्रबोधनाची सक्त आवश्यकता भासते पण करोंनाने यासंदर्भात सुद्धा होत्याचे नव्हते करून टाकले आहे. जनप्रबोधन करायचे असेल तर एक सोशल मीडिया सोडला तर बाकी सर्व मार्ग बंद झालेली आहेत. लाऊडस्पीकर लावून दहावीस हजार लोकांची सभा घेऊन त्यांना विषय समजून सांगणे, त्यांचे प्रबोधन करणे वगैरे आजच्या घडीला शक्य राहिलेले नाही. यानंतर कधी शक्य होईल तेही सांगता येत नाही, अशा विचित्र परिस्थितीमध्ये करोनाने जगाला आणून सोडले आहे. मी जिथे राहतो ते एक छोटेसे खेडेगाव. केवळ अडीच हजार लोकसंख्येचे. एक दवंडी देऊन किंवा लाऊडस्पीकर लावून पूर्ण गाव एकत्र गोळा करून तासाभरात त्यांना जे सांगणे सहज शक्य होते ते आज अशक्य झाले आहे.
मी सध्या दररोज गावात फिरतो आणि केवळ पाच-सहा लोकांना एकत्र करून अर्थात सोशल डिस्टन्स राखून त्यांच्याशी संवाद करतो. त्यांना याविषयी जे माहित नसेल ती माहिती देण्याचा प्रयत्न करतो. फेसबुक आणि व्हाट्सअप यासारखे संवादाचे माध्यम जवळ-जवळ घरोघरी पोचले असल्याने आणि त्यावर करोना विषयक भरपूर माहिती व मजकूर घरोघर पोहोचत असल्याने पुन्हा लोकांना भेटून वेगळी माहिती द्यायची काय गरज आहे? असा अनेकांना प्रश्न पडतो. पण एक लक्षात घेतले पाहिजे की, निव्वळ साधनांच्या आधारे माणसाला संबंधित विषयाची माहिती पूर्णपणे करून प्रशिक्षित होता आले असते तर शाळा-कॉलेज चालवण्याची काय गरज होती? विद्यार्थ्यांना पुस्तकेच देऊन सोशल मीडिया व वेबसाईटच्या माध्यमातून माहिती पुरवून मोकळे होता आले असते. पण माणसाचा माणसाशी थेट संवाद याचा वेगळा प्रभाव असतो. प्रबोधन हे तसेच काहीसे असते. एखाद्या विषयाची एखाद्या माणसाला किती माहिती मिळाली आणि किती ज्ञान प्राप्त झाले यापेक्षा त्याला ज्या माहितीची अनिवार्य गरज आहे, ते मुद्दे कळले की नाही, हे जास्त महत्त्वाचे असते.
लोकांची संवाद साधत असताना ३५ वर्षाच्या एका धडधाकट तरुणाने मला सांगितले की, मी काहीही काळजी घेणार नाही. जे व्हायचे ते होईल. जगायचे असेल तर जगेल आणि मरायचे असेल तर मरेल. मी मरायला सुद्धा तयार आहे. माणसाचे असेच असते. त्याला असे वाटते की मला सर्व कळलेले आहे पण नेमके जे कळायला हवे तेच त्याला कळले नसते. करोनामुळे एखादा तरुण मरणाची भीती सोडून जर बेशिस्त वागत असेल आणि त्यामुळे जर त्याला करोना संक्रमण झालेच तरी तो मरेलच अशी काहीही शक्यता जवळ जवळ नाही. गेल्या चार महिन्यातली आकडेवारी असे सांगते की करोनामुळे सगळ्यात जास्त भीती १० वर्षाच्या आंतील मुलांना आणि ६० वर्षावरील व्यक्तींना जास्त असते. १० ते ६० या वयोगटातील व्यक्तींचे मरण्याचे प्रमाण जवळजवळ अत्यल्प आहे. म्हणजे एखाद्या ३५-४० वर्षाच्या धडधाकट व्यक्तीने बेमुर्वतपणे वागून जर करोना घरात नेला आणि पूर्ण कुटुंबाला संक्रमित करण्यास हातभार लावला तर जो मरणाला भीत नाही त्याला मरण येण्याची शक्यता कमी आणि कुटुंबातील जी करोन्याची गुन्हेगार नाहीत, ज्यांनी पूर्णपणे शिस्त पाळली, घराच्या बाहेर पडले नाही, इतरांशी वागताना, बोलताना तोंडाला मास्क लावला, सोशल डिस्टन्स सांभाळले, वारंवार हात धुतले तरीसुद्धा त्यांचेवर गंडांतर येणार आहे. घरातील निष्पाप आणि निर्दोष बालक आणि वृद्ध धोक्यात येणार आहेत.
कुणी स्वतः मरणाला भीत नसेल तर हरकत नाही पण त्या व्यक्तीला त्याचा लहानसा मुलगा मरण पावला चालेल का? त्याचे वृद्ध आई-वडील त्याला मेलेले चालतील का? याचे उत्तर अगदी स्पष्ट आहे की त्याला हे अजिबात चालणार नाही. त्याचे त्याच्या कुटुंबावर, मुलावर, आईवडिलावर अपार प्रेम असते. जर आपल्या काळजाचा तुकडा मरून गेला तर जगणारा मनुष्य आयुष्यभर सुखाने आणि समाधानाने जगू शकणार नाही. ही अवस्था मरणापेक्षाही वाईट अशी अवस्था असते. यापूर्वी अनेक महामारी आल्यात. प्लेग, कॉलरा, देवी या महामाऱ्यांनी शतकापूर्वी प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे. गावच्या गाव उद्ध्वस्त झालेली आहेत. अनेक गावांमध्ये फक्त मारुतीची देऊळ उरले आणि बाकी पूर्ण गाव व सर्व कुटुंबे सरसकट मृत्युमुखी पडलेली आहेत. आजही सर्वत्र रानावनात एकटे मारुतीचे मंदिर दिसते, ज्याला आपण रीठ म्हणतो; तो सारा प्लेग, कॉलराचे प्रताप आहेत. पण करोना वेगळा आहे. संक्रमण झालेल्या पैकी २,३,४,५ टक्केच लोकं मरण्याची शक्यता आहे आणि बाकीची सर्व वाचण्याची शक्यता आहे. जे मरतील त्यात कुणाचा बाप, कुणाचा मुलगा, कुणाची बायको तर कुणाचा नवरा मरणार आहे आणि ही माणसाच्या आयुष्यातली सर्वात क्लेशदायक व पीडादायक अवस्था आहे. जर अशा अवस्थेला पोहोचायचे नसेल तर माणसाला तातडीने स्वतःला बदलावे लागेल. नव्याने नवी जीवनशैली अंगीकारावी लागेल. त्याशिवाय अन्य पर्याय नाही. इथे एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी की, बाहेरचा करोना तिथून उचलून घरात आणण्याचे पाप मुख्यत्वे १० ते ६० या वयोगटातील व्यक्तीच करणार आहेत आणि त्याचे पाप मात्र १० वर्षाखालील व ६० वर्षावरील व्यक्तींना भोगावे लागणार आहे. हे कृत्य म्हणजे आपल्याच प्राणप्रिय व्यक्तीची आपणच हत्त्या करण्यासारखे आहे.
एका अंगाने विचार केला तर मला करोना एखाद्या सज्जन पुरुषासारखा, निरूपद्रवी ऋषिमुनीसारखा आणि न्यायप्रवीण न्यायाधीशासारखा दिसतो. करोना निर्दोष व्यक्तीला हानी पोहोचवत नाही पण जो स्वतःहून त्याच्या पर्यंत चालत जाईल आणि त्याची गाठभेट घेण्याचा गुन्हा करेल त्याला अजिबात सोडत नाही. म्हणजे "करेल तो भरेल" आणि "जैसे ज्याचे कर्म" या थीमवर तो तंतोतंत काम करतो. हा एकंदरीतच प्रश्न धास्तीचा नसून केवळ काळजी घेण्याचा आहे. घराबाहेर पडू नये, पडायची गरज पडलीच तर डोळ्यात तेल ओतून पुरेपूर काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स राखावे आणि वारंवार साबणाने हात धुवावे...... इतकी साधी काळजी ज्या माणसाला घेता येणार नसेल तर त्याचा किंवा त्याच्या कुटुंबीयांपैकी कुणाचा तरी घात होण्यापासून त्याला त्याची विद्वत्ता, त्याचे प्राविण्य, त्याचीडिग्री, त्याची अपरंपार हुशारी, त्याचा धर्म, त्याची जात, त्याचा पक्ष, त्याचा देव, त्याचे विज्ञान, त्याची साधने, त्याची मालमत्ता, त्याची संपत्ती वगैरे यापैकी कुणीही त्याला वाचवू शकणार नाही कारण त्याची गाठ अन्य कुणाशी नव्हे तर थेट करोनाशी आहे. इतके कायम लक्षात ठेवलेच पाहिजे कारण पक्षपातीपणाने तुम्हाला झुकते माप द्यायला करोना म्हणजे तुमच्या जातीचा पुढारी नव्हे आणि तुमच्या आवडीचा तुमचा प्राणप्रिय पक्षही नव्हे...!
गंगाधर मुटे, आर्वीकर
दि. ०७/०४/२०२०
(क्रमशः)
=============
टीप : हा लेख आपण माझ्या नावासकट किंवा माझ्या नावाशिवाय किंवा तुमचे नाव घालून कुठेही शेअर किंवा कॉपी करून पेस्ट करू शकता.
=============
प्रतिक्रिया
8 Apr 2020 - 11:22 am | गवि
अनेक मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. लेखाबद्दल धन्यवाद.
8 Apr 2020 - 11:39 am | तुषार काळभोर
आपण धडधाकट असलो आणि आपल्याला कोरोना चा धोका नसला तरी आपल्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तींना धोका होऊ शकतो (आई वडील, आजी आजोबा, घरातील आजारी व्यक्ती).
हा विचार ' बिनधास्त' व्यक्तींनी आवर्जून करायला हवा.
8 Apr 2020 - 12:41 pm | सुबोध खरे
बाडीस
अशा दीड शहाण्यांना विचारा कीआपल्याला रोग होईल; पण आपण त्यात मरणार नाही हे बरोबर पण आपल्यामुले आपल्या आईला हा रोग झाला आणि त्यांचे काही बरे वाईट झाले तर चालेल का? आणि तुमच्या मुले इतरांना रोग प्रसार झाला तर त्याची जबाबदारी तुम्ही कशी घेणार?
असा दीड शहाणपणा करणाऱ्या माणसावर खटला भरून त्याला ६ महिने आत टाकणेच आवश्यक आहे.
8 Apr 2020 - 12:04 pm | मोदक
मी सध्या दररोज गावात फिरतो आणि केवळ पाच-सहा लोकांना एकत्र करून अर्थात सोशल डिस्टन्स राखून त्यांच्याशी संवाद करतो
सध्याच्या संकटसमयी तुम्ही समाजजागृतीसाठी आवर्जून घेत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. या चांगल्या कामात गांव पातळीवरील स्थानिक पोलिस किंवा पुढारी यांचे तुम्हाला हवे तसे सहकार्य मिळत आहे का..?
8 Apr 2020 - 12:43 pm | सस्नेह
धागाकर्ते यांच्या उदात्त, धीरोदात्त आणि इन्नोवेटिव उपक्रमाला तुम्ही आपल्या कुत्सितपणाचा काळिमा फासून त्यांचा ऊत्साहभंग करू नये.
8 Apr 2020 - 1:29 pm | मोदक
सिरियसली कौतुक केले आहे हो.. आणि मुटे सर असे जनजगृती करत असतील तर बाकी लोकांचा कसा सपोर्ट आहे ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे फक्त..!
8 Apr 2020 - 2:25 pm | गंगाधर मुटे
गाव माझं आहे. गावातली माणसेही माझीच आहेत. पोलिसांची गरज मला नाहीच. त्यांचे काम ते स्वतंत्रपणे चांगले करत आहे.
(मी स्वतःच हलकापतला पुढारी असल्याने मला पुढाऱ्यांच्या मदतीची गरज नाही ;) )
8 Apr 2020 - 2:53 pm | मोदक
ओके. आणखी एकदा अभिनंदन..!
8 Apr 2020 - 12:37 pm | आनन्दा
करोना म्हणजे महाभारतातील नारायणास्त्र आहे.
त्याच्याशी लढाल तर फुकत मराल.
शस्त्रे खाली टाकुन शरणागती पत्कराल तर आणि तरच तो शांत होईल!
8 Apr 2020 - 2:01 pm | शाम भागवत
एकदा श्रीकृष्ण , बलराम आणि सुदामा शेजारच्या गावात एका गृहस्थाकडे जेवायला गेले होते. त्यांना तिथून निघायला उशीर झाला आणि परतीच्या वाटेत एक जंगल होत. गावातल्या लोकांनी भगवान श्रीकृष्णांना सांगितले की रात्री या जंगलात एक मोठ्ठा राक्षस येतो आणि तो लोकांना मारून टाकतो. अंधार झाला आणि हे तिन्ही जण जंगलात अडकले, रस्ता सुचत नसल्याने तिघांनी जंगलातच रात्रभर थांबण्याचा निर्णय घेतला आणि तिघांनी ठरवले की 2 जण झोपतील आणि 1 जण राक्षसाशी लढेल. त्याप्रमाणे बालरामाने लढायला सुरुवात केली आणि सुदामा व श्रीकृष्ण झोपले. त्या राक्षसाच एक वैशिष्ट्य होत, त्याच्यावर जेवढे वार केले जायचे तेवढाच तो मोठा व्हायचा त्यामुळे बलरामाने लढायला सुरुवात केल्यावर सामान्य मनुष्य एवढा असलेला तो राक्षस प्रत्येक वारामुळे मोठा होऊ लागला आणि काही वेळाने त्या भल्या मोठ्या रक्षासाशी लढायला आपण असमर्थ आहोत हे बलरामाच्या लक्षात आलं म्हणून त्याने सुदामाला उठवलं आणि बलराम झोपला सुदामाने वार केल्यावर तो काही वेळातच गगनभेदी झाला. त्यामुळे त्याला घाबरून सुदामाने श्रीकृष्णाला उठवले. श्रीकृष्ण उठले आणि त्यांनी त्या राक्षसावर वार केला आणि या जोरदार वाराने तो अधिक मोठा झाला श्रीकृष्णाला ही बाब त्वरित लक्षात आली आणि त्याने त्याच्यावर वार करणे बंद केले आणि त्याच्या वारा पासून बचाव सुरू केला. राक्षसानी वार केल्यावर तो कधी तिथून पाळायचा तर कधी झाडामागे लपायचा. त्याचा प्रत्येक वार चुकल्यावर तो आकाराने लहान व्हायचा असे त्याचे वार चुकवत चुकवत तो अगदी सुपारी एवढा झाला तेंव्हा त्याला श्रीकृष्णाने खिशात टाकलं आणि पुढे गोकुळात जाऊन त्याला छोट्या पिंजऱ्यात बंद केलं.
आजच युद्ध देखील असच आहे कोरोना रुपी राक्षस हा जेवढी जास्त लोक एकत्र होतील तेवढा तो मोठा मोठा होत जातो आणि जर आपण श्रीकृष्णा प्रमाणे त्याच्या समोर न जाता, गर्दीला चुकवत, घरात राहिलो तर त्याचे सगळे वार निकामी होतील आणि हा राक्षस हळूहळू छोटा होईल आणि आटोक्यात येईल.