सांगितले मी कुणातरी की शब्दाला आकार हवा
कुण्या कवीने म्हटले मजला, 'कुणाकुणाला मार हवा?'
'मीही आहे तयार' म्हटले, 'पण थोडेसे थांबा ना...'
विष काढण्याआधी जरासा नागाचा फुत्कार हवा
तिने पहावे, तिने म्हणावे - किती काम सांगशी तिला !
तीच अता कंटाळुन म्हणते, 'बसण्यासाठी पार हवा..'
रस्त्यावर टाळत असते अन घरी कधी भेटत नाही
स्वप्नी येउन हळूच म्हणते - तुजसारखा यार हवा..
चोरुन घेती शब्द कुणाचे अन खाऊनी जाती भाव
सलाम यांना करण्यासाठी निश्चित वेडा ठार हवा
औषध पिऊन तेच तेच कंटाळुन गेले कितीतरी
मदिरा नसते उपाय यावर - तुजला बाराक्षार हवा
दुर्मुखला चेहरा घेऊनि प्रेमाचे गुणगान करी
टाळ्या पडण्या यांना लाखों रसिक तसाच टुकार हवा
टेकडीवरी कुठल्या झाले प्रसन्न यांना देव म्हणे -
अरे खुळ्यांनो, प्रसन्न होण्या पर्वतही मंदार हवा
ध्यान लावुनी गुरू पहुडले हवेत काही फुटांवरी
टेकू लावुन चेले म्हणती - गुरूसही आधार हवा
पेल्यामधल्या ज्वाळेमधुनी कविता जळती चहुंकडे
विष पिऊनी मरण्यातरी तो पेला तुमचा गार हवा
अजुनी माझे रक्त चहुंकडे कवितेसाठी सळसळते
औषध तुमचे नकोच मजला, कवितेचा आजार हवा
('शब्द सारे भेटले' या माझ्या कवितासंग्रहातून)
प्रतिक्रिया
29 Mar 2009 - 8:18 am | प्राजु
ध्यान लावुनी गुरू पहुडले हवेत काही फुटांवरी
टेकू लावुन चेले म्हणती - गुरूसही आधार हवा
अजुनी माझे रक्त चहुंकडे कवितेसाठी सळसळते
औषध तुमचे नकोच मजला, कवितेचा आजार हवा
हे दोन शेर आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/