|| जय जय रामकृष्णहरी ||
लोकहो,
आज माघ शुद्ध दशमी. आपल्या तुकोबारायांना याच दिवशी गुरूकृपा झाली. त्यादिवशी गुरूवार होता.
त्यामुळे आजचा दिवस आमच्यासारख्या वारकर्यासाठी अत्यंत मोलाचा. त्यासंबंधी लोकांना माहिती व्हावी म्हणून हा लेखनप्रपंच.
ज्ञानेश्वर महाराजांचे गुरू श्री निवृत्तीनाथ, एकनाथमहाराजांचे श्री जनार्दनस्वामी तसे आमच्या तुकोबारायांचे गुरू बाबाजी होते. हे बाबाजी कोण होते, काय होते, कुठे होते याचा उल्लेख कुठेही नाही. पण तुकोबारायांनी त्यांच्याच एका अभंगात त्यांचा उल्लेख केलेला आहे.
लोक असं समजतात की तुकाराम महाराजांच्या पाठी गुरूपरंपरा नव्हती. पण तसे नाही. खुद्द तुकाराम महाराजांनी बाबाजीचैतन्य यांचा उल्लेख स्वतःच्या अभंगात करून ठेवल्यामुळे विरोधकांची थोबाडे बंद झाली आहेत.
तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे |
अवघियांचे काळे केले तोंड ||
( मंडळी....हे असं असतं आमच्या महाराजांचं लिहिणं. म्हणून आम्ही त्यांचे दिवाणे. चांगुलपणानी कोणी वागलं तर फार चांगले. अतीशहाणपणा करायला गेला की झाली त्याची.
" भल्यासाठी देऊ | कासेची लंगोटी | नाठाळाचे काठी | हाणू माथा ||
हे असं आहे सगळं. असो.)
तर मंडळी,
तुकाराम महाराजांना श्री बाबाजीचैतन्य यांच्याकडून माघ सुद्ध दशमीच्या दिवशी मंत्र घेतला. बाबाजीचैतन्यांनी तुकोबारायांच्या मस्तकावर हात ठेऊन "रामकृष्णहरी" हा "उघडा मंत्र" तुकोबारायांना दिला. तुळशीच्या माळेची खूण सांगितली आणि ते अदृष्य झाले.
याच मंत्राचा जप करून आणि अवघे आयुष्य पांडुरंगाच्या सेवेत घालवून तुकोबाराय " जगद्गुरु" पदाला जाऊन पोहोचले.
"जगद्गुरू तुका, अवतार नामयाचा
सांप्रदाय सकळांचा, येथोनिया"
असं आहे मंडळी. आज तुकाराम महाराजांचे स्मरण करु. धन्य ते तुकोबाराय आणि धन्य ते बाबाजी चैतन्य. तुकाराम महाराजांच्या चरणी आमचा साष्टांग दंडवत.
तुकोबारायांनी यासंबंधी लिहिलेला अभंग येथे देतो.
सत्यगुरूराये | कृपा मज केली |
परि न घडली | सेवा काही ||
सापडविले वाटे | जाता गंगास्नाना |
मस्तकी तो जाणा | ठेविला कर ||
भोजना मागती | तूप पावशेर
म्हणून का फार | त्वरा झाली ||
राघवचैतन्य | केशवचैतन्य |
सांगितली खूण | माळिकेची || ( तुळशीमाळेची खूण -- कंठी मिरवा तुळशी | व्रत करा एकादशी |)
बाबाजी आपुले | सांगितले नाम |
मंत्र दिला "रामकृष्णहरी "|| ( वारकरी संप्रदायाचा मंत्र दिला. )
माघ शुद्ध दशमी | पाहोनी गुरूवार |
केला अंगिकार | तुका म्हणे ||
आपल्या सद्गुरूंचे वर्णन महाराजांनी वरील अभंगात केले आहे. ते नवनीत आम्ही आमच्या अल्पबुद्धीनुसार येणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुकले असेल तर क्षमा असावी.
लेखाचा शेवटही तुकाराम महाराजांच्या अभंगानेच करतो
बोललो लेकुरें | वेडी वाकुडी उत्तरे ||
क्षमा करा अपराध | महाराज तुम्ही सिद्ध ||
नाही विचारिला | अधिकार म्यां आपुला ||
तुका म्हणे ज्ञानेश्वरा | पाया राखावें किंकरा ||
आपला,
(वारकरी) धोंडोपंत
प्रतिक्रिया
15 Feb 2008 - 10:44 am | विसोबा खेचर
वा धोंड्या, किती छान लिहिलं आहेस! खूप बरं वाटलं वाचून..
तुकोबारायांच्या चरणी आमचाही दंडवत...
आपला,
(तुळशीमाळेतला, अबीरबुक्क्यातला) तात्या.
15 Feb 2008 - 10:49 am | व्यंकट
हारि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम!!!!!
15 Feb 2008 - 11:36 am | धमाल मुलगा
जय जय राम कृष्णहाssरी....
बोला पु॑डलीक वरदा हाssरी विठ्ठल !
15 Feb 2008 - 6:46 pm | वरदा
माझाही साष्टांग दंडवत...
15 Feb 2008 - 8:48 pm | प्राजु
धोंडोपंत काका,
पुढच्या महिन्यात मी संत तुकाराम या विषयावर इप्रसारणवर कार्यक्रम करणार आहे. या तुमच्या लेखाची मदत होईल मला त्याचे स्क्रिप्ट लिहिताना. धन्यवाद.
- प्राजु
16 Feb 2008 - 6:40 am | झंप्या
प्राजु, धोंडोपंत काकांच्या सेवा बर्याचदा 'सशुल्क' असतात हा! तेव्हा स्क्रिप्ट लिहायच्याआधी त्यांची परवानगी घे.
16 Feb 2008 - 7:41 pm | पिवळा डांबिस
वा, वा धोंडोपंत!
छान लिहिलंय तुम्ही.
तुमचा तुकोबांचा अभ्यासही दांडगा आहे. असंच चालू राहू द्या...
तुका म्हणे ऐसा| साधनी जो राहे||
तोचि ज्ञान लाहे| गुरूकृपा||
आपला,
पिवळा डांबिस
16 Feb 2008 - 5:59 am | गुंडोपंत
वा आपटेसाहेब,
सुंदर लेख.
शेवटाचा अभंग आवडला..
बोललो लेकुरें | वेडी वाकुडी उत्तरे ||
क्षमा करा अपराध | महाराज तुम्ही सिद्ध ||
नाही विचारिला | अधिकार म्यां आपुला ||
तुका म्हणे ज्ञानेश्वरा | पाया राखावें किंकरा ||
तर विट्ठला चरणी हीच प्रार्थना इतका विनय असण्याची बुद्धी मला दे.
आपला
गुंडोपंत