जागतिक महिला दिनानिमित्त लेखमाला लिहिण्याचा मानस आहे. त्यात तेजस्वी कर्तृत्त्व असलेल्या काही महिलांबद्दल लिहिले आहे. त्यातले हे पहिले पुष्प.
शालेय विद्यार्थ्या पासून वृद्धापर्यंत बहुतेकांना ज्ञात असलेले नाव मादाम क्यूरी. मूळ नाव मारिया श्क्लोदोव्स्का - Maria Sklodowska नंतर मारी क्यूरी या नावाने जगभर ख्यातकीर्त. जन्म पोलंडमधील वॉर्सॉ इथे दि. ७ नोव्हेंबर १८६७. शालेय पाठ्यपुस्तकापासून तिचे नाव रेडीयम या मूलद्रव्याशी आणि किरणोत्सर्जनाशी जोडलेले आहे. किरणोत्सर्जनाचा भौतिकी दृष्टीकोनातून अभ्यास हा तिचा संशोधनविषय. मानवी इतिहासातली स्त्रीजातीतली एक प्रखर, तळपती शलाका असे तिचे वर्णन जर मी केले तर ते वावगे होणार नाही असेच तिचे कर्तृत्त्व आहे.
प्रथम तिचे मननीय उदगार देतो. त्यावरून तिचा विज्ञानाला सामोरे जाणारा दृष्टीकोन समजून घेण्यास मदत होते. "विज्ञानात अपार सौंदर्य आहे. प्रयोगशाळेतला वैज्ञानिक हा केवळ एक तंत्रज्ञ नसतो. परीकथातील चमत्कारांप्रमाणे त्याच्यावर गारूड करणार्या नैसर्गिक घडामोडींची कोडी सोडवणारा, अंगी भरपूर कुतूहल, जिज्ञासा असलेला असा तो एक अवखळ बालक असतो." (हा स्वैर अनुवाद आहे)
नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिलीच स्त्री वैज्ञानिका. भौतिकी आणि रसायन अशा दोन वेगळ्या विषयात दोन नोबेल मिळवणारी पहिली स्त्री. पती पिअरे क्यूरी समवेत Pierre Curie केलेल्या प्रयोगातून पोलोनिअम आणि रेडियम या नव्या मूलद्रव्यांचा शोध लागला. पिअरेच्या निधनानंतरच्या तिच्या प्रयोगातून क्ष किरण निर्माण कसे होतात त्याचे स्पष्टीकरण मिळाले. विल्हेम रॉन्टजेन याने क्ष किरणांचे अस्तित्त्व सिद्ध केले होते. क्ष किरणांची ची निर्मिती करणारे उपकरण १८९५ साली बनवून शरीरांतर्गत अवयवांच्या क्ष किरण छायाचित्रणाची पद्धत विकसित केली. त्याबद्दल त्याला १९०१ सालचे भौतिकीचे नोबेल पण मिळाले. परंतु क्ष किरण कुठून आणि कसे निर्माण होतात याचे सैद्धान्तिक स्पष्टीकरण मात्र त्याच्याकडे नव्हते.
जाता जाता क्यूरी या कुटुंबाबद्दल थोडेसे. क्यूरी हे कुटुंबच एकमेव असे अफलातून आहे. दुधात साखर या न्यायाने मेरीचा पती पिअरे याला देखील नोबेल मिळालेले आहे. तर अ चेरी ऑन केक या न्यायाने मारी-पिअरे यांची कन्या आयरीन जोलिओत क्यूरी हिने देखील आपला पती फ्रेडरीक जोलिओत याच्यासमवेत नोबेल पटकावले. मारी, पिअरे, आयरीन आणि फ्रेडरीक जोलिओत अशी एकंदर चार नोबेल पारितोषिके आणि मारीचे स्वतःचे रसायनशास्त्रातले एकटीचे पाचवे अशी एकंदर पाच नोबेल पारितोषिके या कुटुंबात आहेत. नोबेलविजेती पहिली महिला, दोन वेगवेगळ्या विज्ञानातली दोन नोबेल मिळवणारी पहिली आणि एकमेव व्यक्ती आहे मारी क्यूरी. हे सारे अविश्वसनीय वाटावे इतके काव्यमय आहे. सत्य हे कल्पिताहून अद्भुत असते ते असे. असो.
मारिया श्क्लोदोवस्काचे आईवडील दोघेही शिक्षक होते. पाच मुलांपैकी मारिया हे शेंडेफळ. जोफाया, जोसेफ, ब्रॉन्या आणि हेला यांची सर्वात धाकटी बहीण. पोलिश नावे आणि लाडकी नावे वाचून गंमत वाटते. लाडके नाव म्हणजे ऐश्वर्याचे जसे ऍश. सर्वात मोठी १८६२ सालची सोफाया Zofia. तिचे लाडके नाव सोश्या कदाचित सोफ्या असाही उच्चार असू शकतो. Zosia. माझे उच्चार कदाचित चुकीचे असतील कारण पोलिश भाषा मला येत नाही. पण गंमत म्हणून याकडे पाहायला हरकत नाही. १८६३ सालचा जोसेफ. लाडके नाव जोश्यो. हे कदाचित योसेफ आणि योश्यो असेही असू शकते. तिसरी १८६५ सालची ब्रॉनिस्लावा Bronisława. लाडके नाव ब्रॉन्या. आईचे नाव देखील ब्रॉनिस्लावाच. आहे की नाही आणखी गंमत. चौथी १८६६ सालची हेलेना. लाडके नाव हेला. तर १८६७ सालच्या लेखविषय मारियाचे लाडके नाव मान्या Mania. जोश्या आपल्या सगळ्या खोड्या जोश्योवर ढकलत होती असेल का? आमच्या घरात आमची एक धाकटी बहीण लहानपणी अतरंगी होती आणि एक भाऊ तेव्हा खोडकर आणि व्रात्य होता. त्याने काहीही खोडी काढली की ती काहीतरी वस्तू पाडून किंवा फोडून त्याच्यावर आळ घेत असे. असो, अर्थात याकडे केवळ एक गंमत म्हणून पाहावे.
कुशाग्र बुद्धीची मारिया शाळेत असतांना जिज्ञासू वृत्तीची होती. अभ्यासात तिने चांगलीच चमक दाखवली. आपले वडील व्लादिस्लाव Wladyslaw यांच्या पावलावर पाऊल ठेवत तिने बालवयातच गणित आणि भौतिकी हे विषय शिकवण्यास सुरुवात केली. म्हणजे झाले असे की पोलंड हे रशियन साम्राज्याचा भाग होते. मारीयाचे बाबा वॉर्सा शरातल्या दोन शाळात पदाधिकारी होते. पोलंडची भरभराट होऊ नये म्हणून रशियनांनी पोलिश शाळातून विज्ञान विषय शिकवणे बंद करायला लावले. मग मारीयाच्या बाबांनी प्रयोगशाळेतली उपकरणे घरी आणली. पोलिश मुले विज्ञानात मागे पडू नये म्हणून ते विज्ञान विषय स्वतःच्या घरी शिकवू लागले. त्यांना साहाय्य म्हणून मारीया पण शिकवीत असे. मारीयाच्या बाबांची पोलिश अस्मिता रशियनांना काही रुचली नाही. त्यांनी मारीयाच्या बाबांना कमी पगारावर दुय्यम पदभार दिला. मिळकत कमी झाली. त्यात खड्ड्यात खड्डा म्हणून त्यांनी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीत पण त्यांना फटका बसला.
मारियाची आई ब्रॉनिस्लावा Bronislawa ही वॉर्सातले अतिशय प्रतिष्ठेचे समजले जाणारे बोर्डींग स्कूल फॉर गर्ल्स इथे संचालिका होती. मारीयाच्या जन्मानंतर हे काम तिने सोडले होते. हाही आर्थिक स्रोत आता बंद झाला. बाबांनी आता घराला आर्थिक हातभार म्हणून घरीच मुलांचे वसतीगृह सुरू केले. त्यातल्या एका मुलाला विषमज्वर झाला होता. तो संसर्ग मग मारीयाची सर्वात मोठी बहीण सोफाया हिला झाला असावा. सोफाया विषमज्वराने वारली तेव्हा मारिया उण्यापुर्या आठ वर्षांची होती. नंतर वयाच्या अवध्या १०व्या वर्षी तिला मातृशोक झाला. तिच्या आईचे क्षयरोगाने निधन झाले.
मारियाचे बाबा नास्तिक होते तर आई श्रद्धाळू कॅथलीक. परंतु अगोदर थोरल्या बहिणीच्या आणि नंतर आईच्या मृत्यूचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला. ती निरीश्वरवादी - ऍग्नोस्टीक बनली.
दहा वर्षांची मारिया जे. सिकोर्की बोर्डिंग स्कूलमध्ये होती. त्यानंतर ती तिथल्या कन्याशाळेत गेली. इथून तिने १२ जून १८८३ रोजी पदवी मिळवतांना सुवर्णपदक पटकावले. नंतर मात्र बहुधा तिला औदासिन्य आले आणि वर्षभर तिने वडिलांच्या नातेवाईकांबरोबर खेडेगावात घालवले. कारण एकच. उच्च शिक्षणात स्त्रियांना स्थान नव्हते आणि ती कुठेही उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थिनी म्हणून आपले नाव नोंदवू शकली नाही. त्यापुढील वर्ष वडिलांबरोबर वॉर्सॉमध्ये. इथे तिने थोडेफार अध्यापन केले खरे पण तशी तेव्हा ती निष्क्रीयच होती.
तत्कालीन युरोपमध्ये वैचारिक क्रांती - रेनेसॉं जरी झाली होती तरी स्त्रीपुरुष भेदभाव मात्र तीव्र होता. माध्यमिक शाळेतली मारिया सर्वात कुशाग्र विद्यार्थीविद्यार्थिनींमधली जरी असली तरी वॉर्सा विद्यापीठ फक्त पुरुषांसाठीच असल्यामुळे मारियाला उच्च शिक्षणासाठी वॉर्सा विद्यापीठात मात्र प्रवेश मिळू शकला नाही. जाता जाता स्त्री वैज्ञानिकांना आलेल्या लिंगभेदी अनुभवांबद्दल थोडेसे. जनुक फेम रोझलिंड फ्रॅंकलीनचा ज्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नसे त्या थोर ब्रिटीश साम्राज्यातला अनुभव असा की किंग्ज कॉलेज लंडन इथल्या प्रयोगशाळेतील जेवणघरात - लंचरूममध्ये खाण्यास स्त्रियांना मज्जाव होता. तर हिटलरच्या साम्राज्यातील सेवकवर्ग लिझ मेईटनर ही मान्यवर वैज्ञानिका तिच्या कनिष्ठ सहकार्यांसोबत संस्थेच्या इमारतीतल्या मार्गिकेमधून चालत जात असतांना त्या सहकार्यांना सुप्रभातसारखे जर्मन अभिवादन करतांना लिझकडे पाहातही नसत, का? तर ती स्त्री होती आणि त्यातूनही ती ज्यू होती. असो.
अशा कर्मठ लिंगभेदी वातावरणात उच्च शिक्षणाशिवाय सडण्याऐवजी तिने Warsaw's "floating university" अर्थात ‘वॉर्सॉचे तरते विद्यापीठ’ म्हणून ओळखल्या जाणार्या गुप्तपणे शिक्षणाचे अनौपचारिक धडे देणार्या संस्थेतून अध्ययन सुरू ठेवले. परदेशी जाऊन पदवी घेणे हे मारिया आणि ब्रॉन्या या भगिनींचे स्वप्न होते. परंतु त्यांच्याकडे तेवढे पैसेच नव्हते. तरीही त्यामुळे खचून न जाता मारियाने आपल्या बहिणीसमवेत बरीच मजल मारली. तिने काम करून ब्रॉन्याला शिक्षण घ्यायला मदत केली आणि त्याची परतफेड ब्रॉन्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण झाल्यावर करावयाची होती.
प्रथम मारियाने वॉर्सॉमधल्या एका घरी खाजगी शिकवणी घेतली. त्यानंतरची दोन वर्षे Szczuki (उच्चार करायचा प्रयत्न केला तर जीभ लुळी पडेल) येथील एका झोराव्स्की नावाच्या जमीनदाराकडे गव्हर्नेस म्हणून. पूर्वीच्या हिंदी सिनेमात आपल्याकडील धनाढ्य जमीनदार मुलांना सांभाळायला, वळण लावायला आणि इंग्रजी भाषेबरोबरच ब्रिटीश रीतीरिवाज शिकवायला खडूस ख्रिस्ती महिला गव्हर्नेस म्हणून ठेवलेल्या दाखवीत. ललिता पवारने अशा गव्हर्नेसच्या काही भूमिका अजरामर केलेल्या आहेत. असो. हे झोराव्स्की मारियाच्या बाबांचे स्नेही होते. मारिया या झोराव्स्कीच्या काझिमिएर्झ नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली. हा काझिमिएर्झ पुढे एक गणितज्ञ म्हणून ख्यातकीर्त झाला. कफल्लक बापाच्या मुलीला आपली सून करणे या धनाढ्य झोराव्स्कीने नाकारले म्हणून त्यांचा विवाह होऊं शकला नाही. पदवी परीक्षेतले सुवर्णपदक वगैरे सारे विवाहासाठी तरी फोल होते. हा प्रेमभंग दोघांसाठीही दुःखदायक होता. काझिमिएर्झ नंतर क्रॉकॉव विद्यापीठात प्राध्यापक झाला. वृद्धापकाळी वॉर्सॉ पॉलीटेक्नीकचा हा प्राध्यापक रेडीयम इन्स्टीट्यूटसमोरच्या मारीयाच्या पुतळ्यासमोर चिंतनमग्न मुद्रेत बसून राहात असे. मारीयानेच ही संस्था १९३२ साली स्थापन केली होती आणि त्यासमोरचा हा पुतळा संस्थेने तिच्या मृत्यूनंतर १९३५ साली उभारला होता. वयाने जर तो मारियाच्या बरोबरीचा मानला तर १९३५ साली त्याचे वय ६८ भरते. म्हणजे तेव्हा तो सत्तरीच्या आसपासचा असावा.
सन १८८९च्य सुरुवातीला ती वॉर्सॉला आपल्या बाबांच्या घरी परत आली. ब्रॉन्याचा विवाह काझिमिएर्झ ड्लुस्की नावाच्या एका डॉक्टरशी झाला. पुन्हा काझिमिएर्झ हेच नाव पण माणूस दुसरा. तिथे नावांची टंचाई असावी वा तिथले धर्मगुरू सांगतील तेच नाव अवजात अर्भकाचे ठेवत असावेत. मारियाच्या आईचे आणि बहिणीचे नावही एकच होते. असो. हा गृहस्थ सामाजिक आणि राजकीय चळवळ्या होता. विवाह होऊन जेमतेम काही महिनेच झाले असतील आणि सन १८९० च्या सुरुवातीला ब्रॉन्याने तिला पॅरीसला यायचे आमंत्रण दिले. परंतु विद्यापीठात अध्यापन करणे मारियाला परवडणारे नव्हते. हवे तेवढे पैसे जमवायला त्यामुळे तिला दीड वर्ष जास्त लागले असते. मग तिला भरपूर पगाराची नोकरी मिळवायला तिच्या वडिलांनी मदत केली. हा सर्व काळ तिने ज्ञानार्जनात घालवला. वाचन, पत्रलेखन आणि अध्ययन! बस्स! दुसरे काही नाही! निर्धार म्हणजे निर्धार.
सन १८९०-९१ मध्ये ती गव्हर्नेसचे काम करीत राहिली. तरत्या विद्यापीठात अध्ययन आणि अध्यापन दोन्ही केले. जुन्या वॉर्सॉजवळच्या एका प्रयोगशाळेत रासायनिक प्रयोगतंत्राचे प्रशिक्षण घेणे तिने सुरू केले. जोसेफ बोगुस्की या तिच्याच एका दूरच्या भावाने ती प्रयोगशाळा चालवली होती. पीरीऑडिक टेबल ऊर्फ अणुक्रमांकनिहाय मूलद्रव्य आवर्तसारिणी बनवणारा सुप्रसिद्ध रशियन शास्त्रज्ञ दिमित्री मेन्डेलीफ याच्याबरोबर त्याचा साहाय्यक म्हणून पीटर्सबर्ग इथे या बोगुस्कीने काम केले होते. १८८३ मध्ये सुवर्णपदकासह पदवी मिळवल्यानंतर तब्बल ७ वर्षांनी प्रथमच तिला शिक्षणाची संधी मिळाली होती असे दिसते. अतीव आंतरिक ओढ असलेले शिक्षण आणि पहिले प्रेम या दोन्हीपासून वंचित झालेल्या बिचार्या मारियाला ही सात वर्षे किती कठीण गेली असतील!
नंतर सन १८९१च्या उत्तरार्धात मात्र पॅरीस विद्यापीठात तिची उच्च शिक्षणासाठी नावनोंदणी झाली. आता तिने मुळीच वेळ न दवडता बहिणीचे आमंत्रण स्वीकारले. नंतर लौकरच तिने सोयीचे असे पॅरीसमधल्याच लॅटीन क्वार्टरचे ठिकाण राहण्यासाठी निवडले. मात्र इथे हलाखीच्या परिस्थितीत तिची बरीच आबाळ झाली. पॅरीसच्या कडाक्याच्या थंडीत ती काही वेळा भुकेमुळे बेशुद्धावस्थेत जात असे.
दिवसा अध्ययन आणि संध्याकाळी खाजगी शिकवण्या शिकवणे असा तिचा दिनक्रम आता सुरू झाला. अखेर १८९३ साली तिला भौतिकीतली मास्टर्स पदवी मिळाली आणि प्राध्यापक गॅब्रिएल लिपमन यांच्याबरोबर औद्योगिक प्रयोगशाळेत काम करायची संधी तिला लाभली. उच्च शिक्षण मात्र तिने सुरूच ठेवले. शिष्यवृत्तीमुळे तिला आर्थिक आधार देखील मिळाला. सन १८९४ मध्ये तिला दुसरी मास्टर्स पदवी प्राप्त झाली. आता विषय होता गणित.
फ्रेंच उद्योगाला चालना मिळावी म्हणून सरकारने चालवलेल्या संशोधनसंस्थेत मारिया विविध प्रकारच्या पोलादाचे चुंबकीय गुणधर्म अभ्यासण्याचे काम करीत होती. पण तिच्याकडे केवळ तिच्याच प्रयोगांना वाहिलेली अशी प्रयोगशाळाच नव्हती. आता तिला मोठ्या प्रयोगशाळेची गरज भासू लागली. भौतिकीचे एक पोलिश प्राध्यापक जोसेफ कोवाल्स्की यांनी तिची पिअरे क्यूरीशी ओळख करून दिली. प्रयोगशाळेसाठी तिला मोठी जागा तो मिळवून देईल असे त्यांना वाटले. वास्तविक तसे काही नव्हते. पण अशा रीतीने तिच्या आयुष्यात पिअरेचे आगमन झाले. नैसर्गिक विज्ञानाबद्दलच्या अतीव ओढीने त्यांना एकत्र आणले. पिअरे तेव्हा शाळेत भौतिकी आणि रसायन शिकवीत होता. त्याने तिला प्रयोगशाळेसाठी थोडीफार जागा मिळवून दिली खरी, पण नंतर पिअरेने तिला आपल्या हृदयातच जागा करून दिली. पिअरेने देऊ केलेला विवाहाचा प्रस्ताव तिने प्रथम नाकारला कारण अजूनही ती मायदेशी जायचे मनसुबे रचत होती अणि तसे प्रयत्नही करीत होती. इथे पिअरेचे मन किती विशाल होते हे दिसून येते. तो तिच्याबरोबर पोलंडला येण्यास देखील तयार होता. मग त्याचे कार्यक्षेत्र फ्रेन्च भाषा शिकवण्याइतपत सीमित राहिले असते तरी. असा जोडीदार मिळायला भाग्य लागते.
ज
मध्यंतरी सन १८९४ मध्ये मारिया मायदेशी जाऊन आली. तिला अद्यापही वेडी आशा होती की तिथे आपली करीयर बनेल. पण क्रॉकॉव विद्यापीठात स्त्रियांना प्रवेश नसल्यामुळे तिची उमेदवारी नाकारण्यात आली. पिअरेने तिला पॅरीसला येऊन पीएचडी करावी असे पत्र लिहिले. मारीच्या आग्रहावरून पिअरेने चुंबकीय गुणधर्मावरील त्याच्या संशोधनावर प्रबंध लिहिला आणि मार्च १८९५ मध्ये पिअरेला पीएचडी मिळाली. जसे पिअरेमुळे मारियाचे भाग्य उजळले तसेच मारीमुळे देखील पियरेचे भाग्य उजळले असे म्हणता येईल. पिअरेने आणि फ्रान्सने मारीला भरभरून दिले. मारीने त्या बदल्यात काय दिले असा विचार माझ्या मनी आला. मारी ही पिअरेसाठी स्फूर्तीदेवता होती. तिच्यामुळेच त्याने हा प्रबंध लिहिला आणि त्याला डॉक्टरेट मिळाली. पिअरेने आणखी बरेच संशोधन केलेले आहे त्याबद्दलचे तपशील आपण पिअरेवरील लेखात पाहू. विषय जनसामान्यांना सहज न समजणारे असल्यामुळे पिअरेच्या संशोधनाचा फारसा बोलबाला झाला नाही. परंतु त्याचे संशोधन तोडीस तोड असे दर्जेदार आहे एवढे नक्की. असो. आता त्याला प्राध्याकपदी - प्रोफेसरपदी - बढती मिळाली. लेक्चरर, रीडर, असिस्टन्ट प्रोफेसर, प्रोफेसर, प्रोफेसर एमिरेटस असा काहीसा क्रम बहुतेकांना ठाऊक असेलच. आता मात्र त्यात मोठे बदल झाले आहेत.
शिक्षण घेतांना चमकदार कामगिरी दाखवलेल्या या जोडप्यात आता प्रणय देखील सुरू झाला आणि ते एक अजोड असे धडपडे शास्त्रीय युगुल बनले.
२६ जुलै १८९५ रोजी त्यांनी विवाह केला. मारिया श्क्लोदोव्स्का आता मारी क्यूरी झाली. मारी क्यूरी हा पिअरेने लावलेला सर्वात मोठा शोध आहे असे कुणी तरी गमतीने म्हटलेले आहे. दोघांनाही धर्माबद्दल प्रेम नव्हते. विवाहप्रसंगी वधूवेषाऐवजी तिने एक निळा कोट घातला होता. हा कोट तिला अनेक वर्षे प्रयोगशाळेचा एप्रन म्हणून चालला. स्वतःचा भूतकाळ त्यांनी एकमेकांना सांगितला. सायकलीवरून दूरवर भटकणे आणि परदेशी फिरणे यामुळे ती दोघे मनाने एकमेकांच्या खूप जवळ आली. मारीला आता प्रेम मिळाले, जोडीदार गवसला, वैज्ञानिक साथीदार प्राप्त झाला आणि मुख्य म्हणजे ज्याच्या खांद्यावर डोके ठेवून निर्धास्त विसावावे असा जोडीदार सापडला.
मारी आणि पिअरे क्यूरी यांनी स्वतःला विज्ञानाला तर वाहून घेतले होतेच पण त्यांनी एकमेकांसाठी देखील स्वतःला वाहून घेतले होते. त्या कर्मठ लिंगभेदी जमान्यातील वेगळ्या विचाराबद्दल पिअरेचे आणि एकमेकांबद्दल ठेवलेल्या अर्पितभावनेबद्दल दोघांचेही अभिनंदन करावे तेवढे थोडेच. एक माणूस म्हणून दोघेही किती श्रेष्ठ होती ते यावरून दिसून येते.
सुरुवातीला त्यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांत संशोधन केले. मारीला फ्रेंच शास्त्रज्ञ हेनरी बेक्वेरेलच्या प्रयोगाबद्दल आकर्षण वाटले. युरेनियम या धातूतून काही प्रकारची किरणे निघतात असे त्याने १८९६ साली शोधून काढले होते. ही किरणे विल्हेम कोनराड रॉन्टजेन याने १८९५ साली शोधलेल्या क्ष किरणांपेक्षा कमकुवत होती. यूरेनियममधून रेडिओ किरणे बाहेर पडतात ही प्रक्रिया हेनरी बेक्वेरेलने दाखवून दिली. क्ष किरण यंत्राला बाहेरून वीज ऊर्जा दिली की क्ष किरण ऊर्जा मिळते. परंतु युरेनियममधून मात्र कोणतीही बाह्य ऊर्जा न देता प्रारणांच्या स्वरूपात ऊर्जा बाहेर पडते हे हेनरी बेक्वेरेलने दाखवून दिले. कशी याचे स्पष्टीकरण तो देऊ शकला नाही. क्ष किरण तसेच युरेनियमचे उत्सर्जन याचा एकत्रित विचार करणे हे अद्भुत होते. ही उत्सर्जने अणुगर्भातूनच होत असली पाहिजे हा मारी क्यूरीचा एक नावीन्यपूर्ण आणि क्रांतिकारक विचार होता. रेडिओ किरणे उत्सर्जित करण्याच्या या प्रक्रियेला क्यूरी दांपत्याने रेडिओ ऍक्टीव्हिटी - किरणोत्सर्जन असे समर्पक नाव दिले. त्याचबरोबर बाहेरून ऊर्जा न पुरवता युरेनियममधून प्रारण ऊर्जा कशी काय बाहेर पडते याचे सैद्धान्तिक स्पष्टीकरण पिअरे-मारी क्यूरींनी दिले. त्याबाद्दल बेक्वेरेल स्वतः, पिअरे क्यूरी आणि त्याची पत्नी मारी क्यूरी यांनी केलेल्या संशोधनाबद्दल हेनरी बेक्वेरेल आणि क्यूरी दांपत्य अशा तिघांना मिळून नोबेल पारितोषिक देण्यात आले.
युरेनियम बाहेर सोडत असलेल्या किरणांवर स्वतःचे प्रयोग रचून बेक्वेरेलचे संशोधन तिने काही पावले पुढे नेले. युरेनियमचे स्वरूप वा कायिक अवस्था धातू, क्षार वा पोटॅशियम युरेनिल सल्फेट्सारख्या K2UO2(SO4)2 (स्बस्क्राईब, सुपरस्क्राईब करता येत नाही) एखाद्या क्षाराचे द्रावण अशी कशीही असली तरी ही किरणे जशीच्या तशी राहतात. त्यांच्या गुणधर्मात काहीही फरक होत नाही हे तिने शोधून काढले. ही किरणे युरेनियमच्या आण्विक रचनेतून बाहेर येतात असा सिद्धान्त तिने मांडला. किरणोत्सर्गी समस्थानिके वेगळी करण्याचे (आयसोलेशन ऑफ रेडीओऍक्टीव्ह आयसोटोप्स) तंत्र तिने विकसित केले. माझ्या एका टोकाच्या स्त्रीवादी असलेल्या मैत्रिणीचे म्हणणे असे की केवळ मारीचा नवरा म्हणून पिअरेला नोबेल मिळाले, डोके सगळे मारीचे. पिअरेला फुक्कटचे श्रेय मिळाले. (तिला विज्ञानाचा गंधही नाही हा भाग वेगळा.) परंतु तसे नाही. यातला पिअरेचा वाटा बरोबरीचा आहे, फक्त खारीचा नाही. किरणोत्सर्जनाच्या यापेक्षा वेगळ्या परंतु तितक्याच महत्त्वाच्या पैलूवर पिअरेने संशोधन केले.
पोलोनियम आणि रेडियम वेगळे करण्याच्या कामात पियरेने मारीला साथसोबत केली. रेडिओऍक्टीव्हिटी हा शब्दच अगोदर नव्हता. हा शब्दप्रयोग या दोघांनी पहिल्यांदा केला. किरणोत्सर्जनाचा अभ्यास कसा करावा याचा वस्तुपाठच त्यांनी दिला. अर्थातच किरणोत्सर्जनाचे मानवी तसेच इतर जीवांच्या शरीराला असलेले धोके तेव्हा ठाऊक नसल्यामुळे त्यासंबंधीच्या दक्षतेचे नियम मात्र नंतर बनले. रेडियम कणांतून निघणार्या उष्णतेचा स्रोत अचूक ओळखून सगळ्यात अगोदर अणुगर्भीय ऊर्जेचे अस्तित्त्व हे पिअरे आणि त्याचा एक विद्यार्थी अल्बर्ट लबोर्द यांनी शोधून काढले. चुंबकीय क्षेत्राचा वापर करून त्यांनी दाखवून दिले की किरणोत्सर्गी पदार्थातून तीन प्रकारच्या प्रारणांचे उत्सर्जन होते. एका प्रकारचे प्रारण धन विद्युत्भारित, दुसरे ऋण विद्युत्भारित आणि तिसरे कोणताही विद्युत्भार नसलेले. या प्रारणांना अनुक्रमे आल्फा, बीटा आणि गॅमा प्रारणे म्हणतात हे आपल्याला ठाऊक आहेच.
किरणोत्सर्जन या क्रांतिकारी सिद्धान्तामुळे आण्वीय भौतिकी या नव्या विषयाची निर्मिती झाली आणि या किरणमंथनातून या सर्व घडामोडीचे व्यापक वर्णन करणारी radioactivity - किरणोत्सर्जन ही नवी संज्ञा पिअरे आणि मारी क्यूरी यांनी जन्माला घातली. सन १८९७ मध्ये मारी आणि पिअरे यांच्यात आता छोटी पाहुणी आली. कन्या आयरीनचा जन्म झाला. पण मारीच्या संशोधनकार्यात मात्र खंड पडला नाही. पिअरे आणि मारी आळीपाळीने पिच ब्लेन्ड ढवळत बसत असत असे मी बालपणी कुठेतरी वाचले होते. छोटीच्या संगोपनात त्यांनी कसे आळीपाळीने एकमेकांना साहाय्य केले असेल याचे मनोज्ञ कल्पनाचित्र उगीचच माझ्या डोळ्यांसमोर तरळून गेले. असो.
मारीला साहाय्य करण्यासाठी पिअरेने आता आपले स्वतःचे संशोधन काही काळ बाजूला ठेवले. आता मारीला तिच्या पिच ब्लेन्ड या खनिजावरच्या संशोधनात मदत करायला लागला. पिच ब्लेन्ड खनिजातल्या एका किरणोत्सर्गी द्रव्याला मार्टीन हाइनरिख क्लापरोथ या जर्मन वैज्ञानिकाने सन १७८९ मध्ये युरेनस या ग्रहाच्या नावावरून यूरेनियम असे नाव दिलेले होते. जुलै १८९८ मध्ये क्यूरींनी एक नवीनच मूलद्रव्य वेगळे केले. हल्ली एखादे साधे घराच्या साफसफाईचे काम देखील मिळून करतांना जोडप्यांचे कसे खटके उडतात ते आपण पाहातो. पतीपत्नीचे हे फ्यूजन काही वेळा फ्यूजन बॉंबएवढेच स्फोटक असते हे यावरून दिसते. पिअरे-मारी यांनी वेगळी केलेली पोलोनियम/रेडियम जरी स्फोटक असली या पतीपत्नीचे फ्यूजन मात्र या दृष्टीने स्फोटक निघाले नाही हे खरे. असो. या मूलद्रव्याचे क्यूरींनी मारीच्या मायदेशाच्या पोलंड या नावावरून पोलोनियम असे बारसे केले.
आतापावेतो पिचब्लेन्डमधून एकूण उत्सर्जन किती प्रमाणात होते, त्यातले युरेनियममधून किती तीव्रतेने होते, पोलोनियममधून किती तीव्रतेने होते, याचा उहापोह कुणीही केला नव्हता. डिसेंबर १८९८ मध्ये क्यूरी दांपत्याने ते दाखवून दिले. त्यातूनच उघडकीला आले की पिच ब्लेन्डमध्ये यूरेनियम, पोलोनियम यांच्याबरोबरच आणखी काही किरणोत्सर्गी द्रव्य असलेच पाहिजे. या द्रव्याला त्यांनी रेडियम असे नाव दिले. रेडीयम या लॅटीन शब्दाचा अर्थ आहे किरण. किरणे सोडणारे मूलद्रव्य ते रेडीयम. परंतु रेडीयमचे रासायनिक गुणधर्म पिच ब्लेन्डमध्ये असलेल्या बेरियमचे रासायनिक गुणधर्म बरेचसे समान होते. त्यामुळे बेरियमपासून रेडीयम तपासून ओळखणे वा एकमेकांपासून वेगळे करणे हे महाकर्मकठीण होते. सन १९०२ मध्ये क्यूरी दांपत्याने भागशः स्फटीकीकरण प्रक्रियेने ते वेगळे केले आणि जाहीर केले की त्यांनी १/१० ग्रॅम एवढे शुद्ध रेडीयम मिळवले आहे. यासाठी त्यांनी एक टन पिच ब्लेन्ड वापरले होते. हे बेरीयम नसून एक वेगळेच मूलद्रव्य आहे असे देखील त्यांनी दाखवून दिले.
सन १९०३ साली भौतिकीमधले नोबेल पारितोषिक मिळवून तिने नोबेल मिळवणारी पहिली महिला असा इतिहास निर्माण केला. हेनरी बेक्वेरेल आणि आपले पती पिअरे क्यूरी यांच्यासमवेत किरणोत्सर्जनावर केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना हा बहुमान प्राप्त झाला. विज्ञानातील अपूर्व कार्याबद्दल आता क्यूरी दांपत्याला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळाली. पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग त्यांनी संशोधनकार्यावरील खर्चासाठी केला.
पुढच्याच वर्षीं त्यांनी आणखी एका कन्यारत्नाला जन्म दिला. ईव्ह क्यूरी.
१९ एप्रिल १९०६. मारीवर दुर्दैवी दुःखाचा आघात झाला. एका घोडागाडीखाली सापडून पिअरेचा अंत झाला. पिअरेच्या डोक्यात नेहमी सत्राशे साठ कल्पना आणि गणिते घोंगावत असत. सन १९०६ साली नेहमीप्रमाणे विचारात हरवलेला पिअरे बेसावधपणे रस्ता पार करीत होता. मुसळधार पावसात घोडागाडीच्या चालकाला रस्ता धड दिसत नव्हता. विचारमग्न पिअरेला डोळ्यासमोरचे दिसत असेल की नाही हे तर नक्कीच सांगता येणार नाही. रस्ता पार करतांना पिअरे घोडागाडीखाली सापडला. त्याच्या डोक्यावरूनच चाक गेले, कवटीला तडा गेला आणि वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी पिअरेचा जागच्या जागी अचानक दुःखद मृत्यू झाला. मारी उध्वस्त झाली. किती कठीण गेले असेल तिला? दुःखाच्या सागरात असतांना अध्यापनात मन रमवण्यासाठी मारीने १३ मे १९०६ रोजी सॉरबॉन विद्यापीठात प्राध्यापकपद स्वीकारले. विद्यापीठातली पहिली महिला प्राध्यापिका असा बहुमान तिने आता प्राप्त केला. माझ्या एका मित्राच्या मते स्वप्ने डोळ्यात असलेल्या तरुण्तरुणींच्या सहवासातले प्राध्यापकीय आयुष्य हे सर्वात आनंददायी असते आणि दिवसभर रोग्यांची थोबाडे पाहात त्यांच्या तक्रारी ऐकत घालवावी लागणारी डॉक्टरकी ही मनःशांती घालवणारी सर्वात वाईट गोष्ट आहे. असो. मारीने दुःखावर चांगला उतारा निवडला हे खरे. वेतनाबरोबर आनंद फ्री. या व्यवसायाचा आणखी एक फायदा असा की बुद्धिमान संशोधक विद्यार्थ्यांकडून आपल्याच विषयाबाबत नवे दृष्टीकोन मिळतात. त्यांच्या संशोधनावर मार्गदर्शक म्हणून आपल्याला देखील श्रेय आणि प्रसिद्धी मिळते.
वर आले आहे की पिचब्लेन्डमधून एकूण उत्सर्जन किती प्रमाणात होते, त्यातले युरेनियममधून किती तीव्रतेने होते, पोलोनियममधून किती तीव्रतेने होते, याचा उहापोह क्यूरी दांपत्याअगोदर कुणीही केला नव्हता. सन १९१० मध्ये मारीने किरणोत्सर्जनाची तीव्रता मोजण्याची पद्धत विकसित केली. या पायावरच आज किरणोत्सर्जनाची तीव्रता जास्तीत जास्त किती असावी, नसल्यास कोणते उपाय करून ती कशी कमी करावी याविषयींचे आंतरराष्ट्रीय निकष उभे आहेत.
सन १९११ मध्ये मारीला आणखी एक बहुमान मिळाला. आता तिला रसायनातले नोबेल मिळाले. रेडियम आणि पोलोनियम या दोन मूलद्रव्यांचा शोध लावल्याबद्दल. विज्ञानाच्या भौतिकी आणि रसायन अशा दोन वेगवेगळ्या शाखातली नोबेल मिळवलेली पहिली वैज्ञानिक व्यक्ती असा एकमेव आणि असामान्य बहुमान. नंतर लीनस पाउलिंगला देखील दोन नोबेल मिळाली. परंतु त्यातले विज्ञानातील एकच होते. मारीला एकटीलाच जरी हा सन्मान मिळाला होता तरी हे पारितोषिक मी आणि माझे पती पिअरे असे दोघांचे आहे असे कृतज्ञतेचे उदगार तिने परितोषिक वितरण सोहळ्यावेळी काढले. इथे वाटते की तेव्हा पिअरे जर जिवंत असता तर नोबेलमधला भागीदार झाला असता. नोबेल पारितोषिक मरणोत्तर दिले जात नाही. नंतर रोझलिंड फ्रॅन्कलीनच्या बाबतीत पण असेच झाले असावे.
अल्बर्ट आईनस्टाईन, मॅक्स प्लान्क अशा मान्यवरांबरोबर सुप्रसिद्ध ‘सॉल्व्हे’ परिषदेत भाग घेण्यासाठी आता तिची निवड झाली. त्यांच्या क्षेत्रातील क्रांतिकारी संशोधनाबद्दल चर्चा करण्यासाठी ते एकत्र आले. सन १९११ मध्ये मात्र तिच्या कीर्तीला ओहोटी लागली.
जरी फ्रान्सने तिला कर्मभूमी दिली, पोलंडने नाकारलेल्या शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या संधीबरोबरच भरभरून सारे मानसन्मान मिळवून दिले तरी मारी आपल्या पोलिश मातीशी इमान राखून होती. पोलोनियम हे नाव पोलंडवरूनच ठेवले आहे. आपल्या मुलींना तिने पोलिश भाषा शिकवली होती. त्यांना ती पोलंडमध्ये पर्यटनासाठी पण नेत असे. त्यात तिच्या पतीचा एक विद्यार्थी पॉल लॅन्गविन याच्याबरोबरचे तिचे अनैतिक संबंध आहेत अशी टीकेची झोड राजकीय प्रभावाखालील काही माध्यमांनी उठवली. लॅन्गविनच्या बायकोचा संसार मोडणारी ज्यू स्त्री अशी आवई उठली. त्यावेळी युरोपात ज्यूविरोधी वातावरण होते. xenophobia - झेनोफोबिया म्हणजे परदेशी लोकांबद्दलचा भयगंड फ्रान्समध्ये निर्माण होण्यास तिच्या वलयांकित आंतरराष्ट्रीय कीर्तीचा अल्पसा का होईना हातभार लागला. यावेळी ती बेल्जियममध्ये होती. ती परत आली तेव्हा तिच्या घरासमोर प्रक्षुब्ध जमावाची निदर्शने सुरू होती आणि तिच्या दोन्ही छोट्या मुलींना आश्रयासाठी कॅमिल मार्बो या तिच्या मैत्रिणीकडे जावे लागले होते. आपले दुकान चालावे म्हणून वर्तमानपत्रे खर्याखोट्याची शहानिशा न करता कधीकधी सरळ बातम्या छापतात आणि राजकीय नेते तर प्रक्षुब्ध जमावाच्या आड राहून शक्तीप्रदर्शन करतांना कधीकधी कोणत्याही टोकाला जातात ते असे.
सन १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर तिने आपला वेळ आणि बळ युद्धकार्याला दिले. एका ठिकाणाहून सहज हलवून रणभूमीत दुसरीकडे नेण्यायोग्य असे पोर्टेबल क्ष किरण यंत्र वापरण्यात तिचा हातखंडा झाला. क्ष किरण यंत्र बसवलेल्या वाहनाला ‘Little Curies’ असे नाव पडले. युद्धातील जखमींसाठी क्ष किरण वापरल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले तसेच अनेकांना दीर्घकालीन यातनांपासून वा पंगुत्वापासून वाचवले. क्ष किरण यंत्र चालवणारी मारी क्यूरी ही परिचारिका आता सन १९१५ साली रेडक्रॉस संस्थेची संचालिका बनली.
सन १९२१ मध्ये फ्रेंच सरकारने तिच्य कार्याची बूज राखत तिला खास संशोधनशिष्यवृत्ती दिली. असा बहुमान यापूर्वी फक्त लुई पाश्चर याला १०० वर्षांपूर्वी मिळाला होता.
युद्धानंतर आपल्या प्रसिद्धीच्या वलयाचा तिने आपले संशोधनकार्य पुढे नेण्यसाठी केला. सन १९२१ मध्ये आणि १९२९ मध्ये तिने अमेरिकेचे दौरे केले. वॉर्सॉमध्ये रेडिय़म संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी रेडियम विकत घेण्यासाठी पैसा मिळवणे हा प्रमुख हेतू मनी ठेवून. अमेरिकेत तिचे तोंड भरून स्वागत झाले आणि तिला वॉर्सॉ रेडीयम इन्स्टीट्यूट उभारण्यासाठी सन्मानपूर्वक निधी देखील मिळाला. तिची बहीण ब्रॉनिस्लावा या संस्थेची संचालिका बनली. या सर्वांवर कडी चेरी ऑन केक म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तिला देणगीदाखल १ ग्रॅम रेडीयम दिले.
मारीच्या नेतृत्त्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली झालेल्या संशोधनातून आणखी चार संशोधनसंस्थातून नोबेल विजेते घडले. पॅरीसच्या रेडीयम इन्स्टीट्यूटमधली तिच्याच कन्याजावयांची आयरीन-फ्रेडरीक जोलिओत क्यूरी ही जोडी, कॅव्हेन्डीश लॅबोरेटरीचा अर्नेस्ट रदरफर्ड, व्हिएन्नाच्या इन्स्टीट्यूट फॉर रेडीयम रीसर्च मधला स्टीफन मेयर, कैसर विल्हेम इन्स्टीट्यूटचा ऑटो हान. हानबरोबरची ज्येष्ठ संशोधिका लिझ मेईटनर हिला मात्र नोबेलमधून डावलले गेले. मात्र तिला नोबेलपेक्षा मोठा समजणारा सन्मान मिळाला. एका मूलद्रव्यालाच मेईटनेरिअम असे नाव दिले गेले.
त्याकाळी किरणोत्सर्गाचे सजीवांच्या शरीरावरील दुष्परिणाम ज्ञात झाले नव्हते तरी दीर्घकाल किरणोत्सारी पदर्थांच्या सहवासात राहण्याची जबर किंमत मारी क्यूरीला मोजावी लागलीच. अपल्या प्रयोगशाळेतल्या एप्रनमधून रेडियमच्या द्रावणाच्या परीक्षानलिका - टेस्ट ट्यूब्ज ती इकडून तिकडे नेते असे बोलले जात असे. सन १९३४ मध्ये ती पासी इथल्या सान्चेलेमोझ आरोग्यकेंद्रात गेली. विश्रांती घेऊन आपले बळ पूर्ववत मिळवण्यासाठी. अखेर तिथेच तिने वयाच्या ६७व्या वर्षी चिरविश्रांती घेतली. लाल पेशींच्या कमतरतेमुळे निर्माण होणार्या रक्तक्षयामुळे - aplastic anemia. किरणोत्सर्गी वातावरणात दीर्घकाळ राहिल्यामुळे असे होऊ शकते. पिअरे देखील अकाली मृत्यू पावला म्हणून किरणोत्सर्गाच्या दुष्परिणामांपासून बचावला. नाहीतर त्याचीही तीच गत झाली असती असे म्हटले जाते.
आपल्या आयुष्यात तिने अनेक अशक्य वाटणार्या कामगिर्या केल्या. किरणोत्सर्जनाच्या रोगनिवारक वा औषधी उपचारावरील सर्वात प्रथम झालेले प्रयोग अर्थातच मारी क्यूरीच्या मार्गदर्शनाखाली झाले. हे प्रयोग अर्थातच किरणोत्सर्गी समस्थानिके - रेडिओ आयसोटोप्स वापरून झाले. पॅरीस आणि वॉर्सॉ इथे तिने क्यूरी शिक्षण/संशोधन संस्था स्थापन केल्या.
आपल्या विज्ञानप्रेमाचा वारसा तिने पुढील पिढीला देखील दिला. आयरीन जोलिओत क्यूरीने आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवीत सन १९३५ चे रसायनातील नोबेल पारितोषिक मिळवले. आपला पती फ्रेडरीक जोलिओत याच्यासमवेत नवीन किरणोत्सर्गी मूलद्रव्ये वेगळी करण्यासाठी वा प्रयोगशाळेत बनवणे synthesis of new radioactive elements या संशोधनासाठी.
मारी ही आजपर्यंतची सर्वात प्रसिद्ध अशी स्त्री वैज्ञानिका असे जर म्हटले तर ते वावगे होणार नाही. अनेक मरणोत्तर मानमरातब तिला लाभले. आजही कित्येक शैक्षणिक आणि संशोधन संस्थांना तसेच आरोग्यकेंद्रांना क्यूरीचे नाव दिले गेले आहे. यात पॅरीसमधील क्यूरी इन्स्टीट्यूट तसेच पिअरे ऍन्ड मारी क्यूरी विद्यापीठ या दोन संस्था आल्या. मी नोकरी करीत असतांना लेबनान मध्ये एक व्यापारी पत्र पाठवले होते त्याचा पत्ता होता अमुक अमुक इमारत, मादाम क्यूरी पथ, बैरूत, लेबनान. लेबनान हा देश एके काळी फ्रेन्च साम्राज्याचा भाग होता. मारी क्यूरीचे मानवजातीवरील ऋण लक्षात ठेवून फ्रेंच साम्राज्यातून बाहेर पडल्यावरही लेबनानने या रस्त्याचे नाव बदलले नाही. परंतु जरी जन्माने पोलिश असली तरी सर्वात मोठा फ्रेंच देवत्त्वाचा मान मात्र तिला मरणोत्तर पिअरेबरोबर जोडीने प्राप्त झाला. सन १९९५ मध्ये तिचे अणि पिअरेचे अवशेष पॅन्थिऑनमध्ये दफन करण्यात आले. फ्रान्समधील थोर विचारवंतांचे चिरस्मारक. या बाबतीत मात्र फ्रेंचांच्या न्यायबुद्धीला वाखाणावे तेवढे थोडेच. असा मान मिळवणारी मारी ही एकमेव स्त्री असावी. जोन ऑफ आर्कला हा किंवा तत्सम मान मिळाला की नाही ठाऊक नाही. पिअरे आणि आयरीन यांच्याबद्दल लिहिल्याखेरीज मारीबद्दलचा मजकूर अपुरा राहील. परंतु ते नेंतर वेगवेगळ्या प्रकरणात येईल.
प्रतिक्रिया
8 Mar 2020 - 10:51 pm | जालिम लोशन
मनसोक्त आस्वाद घेतला.
9 Mar 2020 - 10:54 am | कुमार१
विस्तृत परिचय.
आवडला. पु ले शु
9 Mar 2020 - 11:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडलं.
-दिलीप बिरुटे
9 Mar 2020 - 11:57 am | विजुभाऊ
खूप महान व्यक्तिमत्वाचा परिचय करुन दिलात
धन्यवाद.
स्त्रीयांच्या बुद्धीमत्तेची ज्या देशात कदर केली गेली आहे ते देश फार लवकर प्रगत झाले.
9 Mar 2020 - 12:41 pm | Rajesh188
मारी क्युरी ह्या महान संशोधक होत्या ह्या विषयी बिलकुल दुमत नाही.
त्यांच्या महान कार्याला सलाम.
पण आताच्या स्त्री वादी लोकांनी त्यांना
स्त्री शक्तीचे प्रतीक म्हणून वापरू नये .
समस्त मानव जातीच्या त्या आदर्श आहेत.
10 Mar 2020 - 8:44 am | सुधीर कांदळकर
जालो, डॉ.कुमार१, बिरूटे सर, विजूभाऊ आणि राजेश तसेच इतर स्र्व वाचकांस अनेक, अनेक धन्यवाद.