आधुनिक निष्काम कर्मयोग

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
3 Mar 2020 - 12:11 pm

                                  आधुनिक निष्काम कर्मयोग.

  कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
  मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ४७

 जवळ जवळ सर्वमान्य अर्थ : तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा असू नये. ; त्याच बरोबर हे सुद्धा लक्षात ठेव की  कर्म न करण्यात सुद्धा तुझी आसक्ती नको.
 याचा काय विपर्यास झाला ?  
  भगवतगीतेबद्दल इतर काहीही माहित नसले तरी हा श्लोक मात्र बऱ्याच जणांना माहित असतो. आता माहित असतो म्हणजे तो बरोबर माहित असतो का?  आणि त्याचा अर्थ बरोबर समजला असतो का ? असा प्रश्न विचारला तर बऱ्याच लोकांच्या बाबतीत त्याचे नकारात्मक उत्तर द्यायला लागते. माझे तर असे मत आहे की आपल्या हिंदू धर्मांच्या सगळ्या धर्मग्रंथात येवढा कुणालाही न समजलेला किवा चुकीचा समजलेला श्लोक नसेल.  पिढ्यान पिढ्यामध्ये अनेकांना निष्क्रिय करण्यामध्ये या श्लोकाचा खूप मोठा हात आहे. अर्थात यात ह्या श्लोकाचा दोष अजिबात नाही . दोष असेल तर कोणत्याही गोष्टीतून आपल्याला पाहिजे तेवढे घ्यायचे आणि बाकीचे सोडून द्यायचे ह्या मानवी स्वभावाचा असू शकतो . 
“ असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी”
“ फळाचीच जर अपेक्षा करायची नाही तर कर्म तरी कशाला करायचे? मला जर पगारच मिळण्याची अपेक्षा नसेल तर मी नोकरी तरी कशाला करायची ? ..नाही तरी प्रभूच्या मनात असेल तेच होईल मग मी काहीही केले नाही तरी ते होणारच ..”
“माणसांनी असेल त्यात समाधान मानावे.”
“ भगवानको देना है तो वो छप्पर फाडके देता है .( देवाच्या मनात असेल तर तो छप्पर फोडून देईल ..म्हणजे मला काहीही प्रयत्न करायची गरज नाही ..”)

ही किवा अश्या प्रकारची विचारसरणी आपला समाज पिढ्या न पिढ्या अवलंबत आहे.  आणि याचे समर्थन म्हणून हा गीतेतील श्लोक सांगितला जातो .असे कृष्णाने म्हणजे भगवंतानेच सांगितले आहे हे सुद्धा ठासून सांगितले जाते.  पण आपण फक्त अर्धा श्लोक सांगतोय आणि या श्लोकाच्या पुढच्याच भागात कर्म न करण्यात तुझी आसक्ती नको असे अर्जुनाला भगवंतानी सागितले आहे या कडे पूर्णपणे आणि  सोयीस्कर पणे दुर्लक्ष केले जाते.  
आता आजकालच्या युगात निष्काम कर्मयोग ..म्हणजे फळाची आशा न धरता कर्म करा असा कोणी उपदेश करायला लागला तर तो उपदेश एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देणारेच जास्त असणार .कारण आजकाल जे काही कर्म केले जाते ते फळाच्या इच्छेने केले जाते.  किवा मग हा उपदेश आपल्या सारख्या लोकांसाठी नाही फक्त संन्यासी लोकांसाठी आहे असे समजणारे बाकीचे. पण माझ्या मते आपण समजतो तसा ह्या निष्काम कर्मयोगाचा अर्थ अजिबात नाही. 
पण मग  भगवान कृष्णाना  नेमके काय म्हणायचे आहे? 
मुळात कृष्णाने गीता अर्जुनाला का सागितली ? 
युद्धात हात पाय गाळून मी आता युद्ध करणार नाही असे म्हणून स्वस्थ बसलेल्या अर्जुनाला क्रियाशील करून युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे मग ..कृष्ण निष्क्रियतेचा ..काहीही न करता हरी हरी करीत बसण्याचा सल्ला कसा बरे देतील  ? आणि का देतील ? 
भगवान कृष्ण जेव्हा कर्मा वर तुझा अधिकार आहे .फळावर नाही असे म्हणतात  तेव्हाच त्यांच्या लक्षात आले असणार की आपल्या या वाक्याचा विपर्यास करून अर्जुन आणि हे वाक्य ऐकणारे सगळेच निष्क्रियतेच्या जाळ्यात सापडणार आहेत म्हणून तो लगेच पुढे म्हणतो . “पण कर्म न करण्यात तुझी आसक्ती नको .” 
आता एवढे सगळे सांगून सुद्धा आपला समाज या  जाळ्यात अडकलाच. 
  कर्मावर तुझा अधिकार आहे आणि त्याच्या फळावर अधिकार नाही याचा नेमका अर्थ काय आहे ? 
एक निश्चित आहे की कर्म केले म्हणजे  त्याचे फळ असणारच . फळ नाही असे नाही . फक्त तुमचा त्यावर अधिकार नाही . पण असे का ? या प्रश्नाचे उत्तर गीतेवर भाष्य करणारे  बरेच जण समाधानकारक देत नाहीत . आणि दिले तरी काही तरी गुळमुळीत उत्तर देतात. 
ओशो आपल्या गीता दर्शन या भाष्यात त्यातल्या त्यात तर्क शास्त्राला धरून उत्तर देतात . ते  म्हणतात की कर्म तुम्ही करता पण त्याचे फळ हे समस्त ब्रम्हांडा कडून येते ,म्हणून त्यावर तुमचा अधिकार नाही . 
हेच असेही सांगता येईल .  तुम्ही जे काही करता जे अनुभवता  ते या क्षणी ..वर्तमानात करता ..त्याचे फळ हे पुढच्या क्षणात येते पण ते जेव्हा येते तेव्हा ते वर्तमान होऊन येते. . वर्तमानात कार्य करणे एव्हडेच तुमच्या हातात असते. भविष्य तुमच्या हातात नसते. 
  Nothing ever happened in the past; it happened in the Now. Nothing will ever happen in the future; it will happen in the Now. What you think of as the past is a memory trace, stored in the mind, of a former Now. When you remember the past, you reactivate a memory trace - and you do so now. The future is an imagined Now, a projection of the mind. When the future comes, it comes as the Now. When you think about the future, you do it now. Past and future obviously have no reality of their own. Just as the moon has no light of its own, but can only reflect the light of the sun, so are past and future only pale reflections of the light, power, and the reality of the eternal present. Their reality is "borrowed" from the Now.  .The Power of Now. By. .Eckhart Tolle
एक साधे उदाहरण घेऊ. 
तुम्ही अगदी योग्य  योजना करून शनिवारी संध्याकाळी मित्रांबरोबर एका हॉटेल मध्ये ठराविक वेळी भेटायचे ठरवता. तिथे आरक्षण सुद्धा करता. हे तुमचे कर्म तुम्ही केले. आता त्याचे फळ मिळण्यासाठी ..म्हणजे तुम्हा सर्व मित्रांची भेट यशस्वीपणे घडण्यासाठी .. अनेक गोष्टी तुम्हाला हव्या त्या प्रमाणे  घडायला हव्यात. 
१. तुम्ही त्या शनिवारी संध्याकाळी जिवंत असायला हवे. 
२. तुमची गाडी योग्य प्रकारे चालू झाली पाहिजे  ..तुम्हाला त्या हॉटेल पर्यंत जाता यायला हवे ..मध्ये वाहतुकीने तुम्हाला अडथळे निर्माण न करता  योग्य वेळी तुम्हाला तिथे जाता यायला हवे. 
३. अती वृष्टी किवा ..दंगल वगैरे  होता कामा नये. 
४. त्या हॉटेल मध्ये संप असता कामा नये...वीज जाऊन वा पाणी न येण्याने हॉटेलच बंद पडता कामा नये. 
५. तुमच्या सगळ्या मित्रांच्या बाबतीत सुद्धा कसलेही अडथळे येता कामा नयेत. 
आता अश्या किती तरी घटना सांगता येतील ..पण मुळात काय तर यातल्या किती तरी गोष्टींवर तुमचे नियंत्रण नाही …
म्हणून फळ हे समस्त ब्रम्हांडा कडून येते असे समजले पाहिजे. 
आता अनेक जण  म्हणतील की कोणतीही गोष्ट ठरवताना सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. काय घडू शकेल याचा विचार करून प्रत्येक  घडू शकणाऱ्या गोष्टीबद्दल आपल्याकडे उत्तर तयार पाहिजे. 
अगदी बरोबर . काय काय घडू शकेल याचा विचार करून  तुम्ही तुमची योजना करायलाच हवी ..पण यातले नेमके काय घडेल हे माहिती नाही ..म्हणजे थोडक्यात काय तर ज्याला रिस्क अनालिसिस म्हणतात ते तुम्ही तयार ठेवायला पाहिजे. म्हणजेच काय झाले म्हणजे काय करायचे याची पूर्ण योजना तुमच्याकडे तयार पाहिजे . हे असे सांगणारे ..कृष्ण भगवान सांगत आहेत  तेच म्हणतायत. काय होणार हे तुमच्या हातात नाही . तुम्ही काय करायचे ते फक्त तुमच्या हातात आहे. कर्मावर तुमचा अधिकार फळावर नाही . 
कर्म आणि योग यांचा काय संबंध आहे ? 
 आता थोडे खोलात शिरून या श्लोकाच्या पुढचे एक  दोन श्लोक पाहूया. . . 
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय ।
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ४८

अर्थ : हे धनंजय अर्जुना, तू आसक्ती सोडून, तसेच सिद्धी आणि असिद्धी  म्हणजे यश आणि अपयश यांमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्यकर्मे कर. समत्वालाच योग म्हटले जाते.
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ५०

अर्थ : समबुद्धीचा  म्हणजे जो यश आणि अपयश हे दोन्ही समान समजतो आणि असा पुरुष पुण्य आणि पाप या दोहोंचाही याच जगात त्याग करतो. अर्थात् त्यापासून मुक्त असतो; म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून रहा. हा समत्वरूप योग म्हणजेच  कर्मांतील कौशल्य आहे. तसेच हाच कर्मबंधनातून सुटायचा उपाय आहे. 
समत्व रूप योग हा कायमस्वरूपी कसा उपलब्ध होतो हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे पण त्या  मुळे तुम्ही समबुद्धीचे होता. यालाच वर्तमानात कायम उपस्थित असणे असे म्हणता येईल . आपण हातात घेतलेल्या कामात  जर तुम्ही स्वतःला पूर्ण झोकून दिले तर तुम्ही त्या क्षणापुरते तरी या समत्व रूप योगाला उपलब्ध होता.म्हणजे हा एक समत्व रूप योगाला  थोडा वेळ का होईना गवसणी घालण्याचा सोपा मार्ग आहे.  
तुम्ही लहान मुले आपल्या आवडत्या खेळात गुंग होऊन खेळताना जर पाहिलीत तर तुम्हाला जाणवेल की  ती संपूर्णपणे त्या क्षणाचा आनंद घेत असतात. त्यांना बाहेरील जगाचे भान सुद्धा नसते. 
या श्लोकावर भाष्य करताना ओशो एक महत्वाची गोष्ट सांगतात, तुम्ही कार्य करताना जेव्हडे कौशल्याने आणि स्वतःला पूर्ण झोकून कराल तेवढी  तुमच्या यशाची शक्यता वाढेल.
कार्य करण्याच्या  क्षणी तुम्ही फक्त कार्य कौशल्याने करणे हेच ध्येय ठेवायला पाहिजे. 
मला यश मिळेल का नाही ?..मला यश मिळाले तर माझा असा सन्मान होईल ..मला अपयश मिळाले तर माझा असा अपमान होईल असे विचार मनात अजिबात न आणता ..म्हणजे समत्व बुद्धिने कार्य करत राहिले पाहिजे. 
हे असे पूर्ण पणे झोकून देऊन कार्य करण्याचे कौशल्य तुम्हाला योगामुळे अर्थात समत्व रूप योगाने येते. किंबहुना समत्व रूप योग आणि कर्मातील कौशल्य या एकाच नाण्याच्या  दोन बाजू आहेत. ( या योगाला काही जण बुद्धी योग असेही म्हणतात. )
एक उदाहरण घेऊ. 
विराट कोहली ९९ धावावर खेळत आहे.  त्याने कोणता खेळाडू कुठे क्षेत्ररक्षणास आहे याचे अवलोकन केले आहे. खेळपट्टी कशी आहे ..चेंडू कशी आणि कुठून उसळी घेईन याचा अभ्यास केला आहे. गोलंदाज कोण आहे ? तो आता काय प्रकारचा चेंडू टाकेल याचा विचार केला आहे ..म्हणजे त्याने आपले पूर्ण ज्ञान पणाला लावले आहे. तो शांतपणे चेंडूचा सामना करायला सज्ज आहे. पण त्या क्षणी , माझे शतक पूर्ण झाले तर माझा असा सन्मान होईल ..माझ्या नावावर इतकी शतके जमा होतील याचा  अजिबात विचार करत नाही . मागच्याच चेंडूवर आपण चूक केली ..याचा तो विचार सुद्धा न करता .. हा येणारा चेंडू योग्य तह्रेने खेळायचा हा विचार सुद्धा न करता ..तो चेंडूचा सामना करतो आणि त्या क्षणी येणारा चेंडू पाहून तो योग्य निर्णय घेतो ..कोणताही धोका न घेता आपले शतक पूर्ण करायचा प्रयत्न करतो . पुढच्या चेंडूला तो बाद ही होऊ शकतो किवा आपले शतक ही पूर्ण करू शकतो . .पण त्या क्षणी मात्र आपले पूर्ण कौशल्य पणाला लावून चेंडूचा सामना करणे इतकेच त्याच्या हातात आहे. त्या क्षणी जर तो आपण शतक पूर्ण झाल्यावर कसा आनंद साजरा करू ..माझा किती सन्मान होईल वगैरे विचार मनात आणत राहिला  तर तो पुढच्या चेंडूला बाद होण्याची शक्यताच जास्त. तसेच त्याने जर असा विचार केला की ,नाही तरी शतक होणे आपल्या हातात नाही मग खेळा तरी कशाला ? तर त्याचे शतक नक्कीच होणार नाही . किंबहुना तो खेळाडूच होणार नाही . 
म्हणून भगवान कृष्ण म्हणतात ..कर्मावर तुझा अधिकार आहे ...फळावर नाही . पण तू अकर्माला चिकटून बसू नकोस. 
म्हणजे चेंडूचा सामना करण्याआधी सखोल विचार  ..चेंडू येताच फक्त पूर्ण कौशल्य . फळाचा विचार सुद्धा नाही . 
आपण परत या  ४८ आणि ५० या श्लोकाकडे वळूया. या  श्लोकात भगवान कृष्ण दोन महत्वाच्या गोष्टी सांगतात. 
१.०  कार्य करताना यश आणि अपयश या कडे लक्ष न देता समत्व बुद्धिने कार्य करत रहा. 
२.० कार्य करताना पूर्ण कौशल्याने कार्य करत रहा. हाच समत्वरूप योग आहे. 
जे. कृष्णमूर्ती एकदा असे म्हणाले . “ तुम्हाला माझे गुपित माहित आहे का ? (माझ्या आयुष्याबद्दल )… I do not mind what happens.”  काहीही घडो ..मला त्याची काळजी नाही . 
ते समत्व योग सांगत आहेत. . जे घडत आहे ते  वास्तव आहे. ते समत्व बुद्धिने स्वीकारून पूर्ण कौशल्याने कार्य करत राहणे हेच कर्मयोगाचे रहस्य आहे. पण वास्तवाचा पूर्ण स्वीकार म्हणजे निष्क्रियता नव्हे हे बरेच लोक विसरतात.   वास्तवाचा पूर्ण स्वीकार, पुढच्याच क्षणी पूर्ण कौशल्याने कर्म करण्यासाठी लागणारी उर्जा तुम्हाला उपलब्ध करून देते. ती उर्जा वास्तवाचा अस्वीकार करून त्याच्याशी झगडण्यात खर्च होत नाही . 
सारांश काय ? 
कर्म करताना  यश अपयश याचा विचार करू नका. पूर्ण विचार करून कर्म करा. कर्म हे वर्तमानात असते त्या मुळे तेव्हडेच तुमच्या हातात असते. कर्माचे फळ भविष्यात.  ते तुमच्या हातात नाही . 
ओशो म्हणतात ..जे फळाची जितकी जास्त अपेक्षा करतात तितके ते कर्मा मध्ये कमी लक्ष केंद्रित करतात. आकांक्षा करण्यात ते  इतकी शक्ती खर्च करतात की कर्म करायला त्यांच्याकडे शक्तीच उरत नाही . 
साराश काय तर तुम्ही आपली जितकी  शक्ती ..आपली जितकी उर्जा कर्मावर केंद्रित कराल तेवढे  तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता जास्त. 
  हाच  माझ्या मते आधुनिक कर्मयोग आहे.  

आता कर्मयोग म्हणताच लोकमान्य टिळकांचे गीतेवरील भाष्य आठवणारच. प्रा.  नरहर कुरुंदकरांच्या मते लोकमान्य टिळक भगवत गीतेबद्दल असे म्हणतात की , गीतेमध्ये  ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे.म्हणजे लोकमान्यांच्या मते कर्मयोग कसा असावा तर तो योग्य ज्ञानाने युक्त ,पूर्ण श्रद्धेने केलेला असा कर्म योग असावा. 

  माझ्या मते “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।” या श्लोकाचा मतितार्थ इतकाच आहे .. कायम वर्तमानात राहून पूर्ण विचारपूर्वक ..ज्ञानमुलक.. आपल्या ध्येयावर पूर्ण श्रद्धा ठेऊन ..भक्ती प्रधान .. आणि यश आणि अपयश याचा कर्म करताना विचार न करता ..निष्काम कर्मयोग ..आपल्या ध्येयाच्या दिशेने यश मिळेपर्यंत कार्य करत रहा. 

हाच मतितार्थ जर  आजच्या भाषेत सांगायचा  तर असा सांगता येईल . 
१.० आपले ध्येय काय आहे हे पूर्ण विचारांती ठरवा.( Goal definition. )
२.० ते कसे गाठायचे याचा पूर्ण आराखडा ठरवा.( Planning ,Process definition and resource mobilisation. )
३.० आपले ध्येय गाठताना काय काय अडथळे येतील आणि ते आले तर काय उपाय करायचे हे ठरवून ठेवा.
 ( Risk Analysis and Risk Management. . )
४.० आपण आपले ध्येय नक्की गाठणार या विश्वासाने कार्याचा आरंभ करा .(  Faith in your ability to achieve the goal in spite of obstacles. )
५.० वाटेत येणारा  अडथळा समत्व बुद्धिने स्वीकारून त्यातून मार्ग काढून आपल्या ध्येयाकडे चालत रहा. (Preparedness to deal with any situation which is nothing but “Perform until” you achieve goal. )
आणि या  पाचही गोष्टी पूर्ण कौशल्याने करा. 
आजकालच्या जगात यशस्वी झालेले अनेकजण याच मार्गाचा अवलंब करून यशस्वी झाले आहेत. म्हणजे ते निष्काम कर्मयोगाचेच  आचरण करत असतात. 
आपले दुर्दैव हेच आहे की आपल्या धर्मग्रंथात  संस्कृत मधून जे सांगितले आहे ते आपण समजून घेत नाही  त्याचा विपर्यास करतो .आणि तेच इंग्रजीत सांगितले म्हणून  आपल्या दृष्टीने संपूर्ण ज्ञान होते. 

कर्मयोगाचे इतके सुंदर तत्वज्ञान भगवान कृष्णानी सांगितले आहे (.ज्यांना खरे तर आद्य व्यवस्थापन सल्लागार Management Consultant म्हणायला पाहिजे )...त्या तत्वज्ञानाचा  विपर्यास करून आपला करंटा समाज अकर्माच्या मागे लागला आणि हरी हरी करत बसला. 

 आता तरी आपण खरे कर्म योगी होणार का?  हा खरा प्रश्न आहे. 

*************************************************************************

जयंत नाईक . 

संस्कृतीसमीक्षा

प्रतिक्रिया

रविकिरण फडके's picture

4 Mar 2020 - 9:58 pm | रविकिरण फडके

श्री. नाईकसाहेब,

आपण लिहिता, "जवळ जवळ सर्वमान्य अर्थ : तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा असू नये."

मूळ श्लोकात 'अधिकार' हा शब्द कर्म आणि फळ ह्या दोहोंसही उद्देशून वापरला आहे. आणि श्लोकाच्या ह्या भागाचा अर्थही, 'तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळांवर नाही' ह्या तुमच्या वाक्यात पुरेसा स्पष्ट आहे. म्हणून, त्यानंतरचे वाक्य, 'कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा असू नये' हे अनावश्यक ठरते, व गैरसमज* निर्माण करणारेही. कारण, जर काही उद्देशच नसेल तर कोणी झाले तरी काही कर्म करेलच कशासाठी? अर्जुनाने युद्ध करण्याचा निर्णय घेतला तो काही टाइम पास म्हणून नव्हे. युद्ध जिंकून आपले राज्य परत मिळविणे हे त्याचे उद्दिष्ट होतेच. गीता सांगायची वेळ आली ती अर्जुनाला आपल्या उद्दिष्टांच्या योग्यायोग्यतेबद्दलच शंका आली - किंवा नेमकेपणाने सांगायचे तर उद्दिष्ट साध्य झाले तरी त्याच्या 'साईड इफ्फेक्टस'ना तो घाबरला - म्हणून.

* गैरसमज निर्माण करणारे कसे? हे तुम्हीच पुढे स्पष्ट केले आहे. 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' ही वृत्ती निर्माण झाली त्याचे एक कारण, 'कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा असू नये' असा चुकीचा अन्वयार्थ असू शकेल का?

मी गीतेचा तज्ज्ञ वा अभ्यासक नाही, पण जिज्ञासू मात्र आहे. त्यामुळे, माझ्या वरील शंकेचा खुलासा करावा ही विनंती. धन्यवाद!

Jayant Naik's picture

5 Mar 2020 - 10:26 am | Jayant Naik

मी जो सर्व मान्य अर्थ दिलेला आहे तो मुळात वेगवेगळ्या भाष्यकरांनी दिलेला आहे. तो मी इथे जसाच्या तसा दिला आहे. माझ्या लेखाचा उद्देश हाच आहे कि हा श्लोक कसा चुकीच्या अर्थ लावण्यामुळे बदनाम झाला आहे. अकर्माचा ,आळसाचा हा जो भस्मासुर बोकाळला आहे किवा होता (आजची तरूण पिढी योग्य कर्माचे महत्व ओळखू लागली आहे.) ..त्याचे मूळ हा चुकीचा अर्थ . तुमची शंका अगदी रास्त आहे. माझा कर्मावर अधिकार आहे पण फळावर नाही ..ते परमेश्वराच्या हातात. मग तो देईल ते फळ मला मान्य आहे इथवर ठीक आहे . किंबहुना हा पूर्ण स्वीकार तुम्हाला त्यापुढील योग्य मार्ग चोखाळण्याची उर्जा प्राप्त करून देतो . पण मग मी कामच करणार नाही हा चुकीचा विचार पसरला. विचार चुकीचा आहे. हा श्लोक नाही. तेच मी या लेखात सांगायचा प्रयत्न करतो आहे. आपल्या प्रतिसादाबद्दल अतिशय आभार.

राघव's picture

6 Mar 2020 - 6:19 am | राघव

आवडले.

आपला अभ्यास असल्यास कृपया योगावरही लिहावे ही विनंती. :-)

Jayant Naik's picture

6 Mar 2020 - 9:29 pm | Jayant Naik

नक्की प्रयत्न करेन. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

सोत्रि's picture

6 Mar 2020 - 7:06 am | सोत्रि

फळाची अपेक्षा ह्यातला अपेक्षा हा शब्द महत्वाचा आहे. अपेक्षा ठेवली की अपेक्षाभंगाचे दु:ख पदरी पडते किंवा अपेक्षापूर्ती झाल्यास सुखप्राप्तीने आसक्ती वाढीस लागते. म्हणून, समत्व (Equanimity) साधण्यासाठी फळाची अपेक्षा करू नये!

हे बौद्धिक पतळीवर समजायला सोपे आहे. तस असूनही, हजारो वर्षांपासून गीता असूनही, समजाची ही अशी अवस्था का?

- (वर्तमानात राहून कर्म करणारा) सोकाजी

Jayant Naik's picture

6 Mar 2020 - 9:52 pm | Jayant Naik

अगदी बरोबर . अपेक्षा हे सर्व दुखाचे मूळ आहे. सम्यक योग याचे उत्तर आहे. म्हणजेच क्षणजीवी होणे. वर्तमानात राहणे. आपण विचारता समाजाची अशी अवस्था का ? अवघड प्रश्न आहे. मला काय वाटते ते सांगतो. बरोबर असेलच असे नाही. मी या लेखात लिहिल्या प्रमाणे आपला समाज केव्हातरी निष्क्रियतेच्या आहारी गेला. याची कारणे अनेक आहेत. ह्या श्लोकाचा यात हातभार आहे. आणखीन एक महत्वाचे कारण म्हणजे मुघालांकडूनआपल्या शिक्षण संस्थांची केलेली वाताहत. गुरु शिष्य परंपरा नष्ट केली गेली. आपले ज्ञान नष्ट केले गेले. किती हस्त लिखिते नष्ट झाली याची गणती नाही. गुरु शिष्य परंपरा संपली आणि योग्य ज्ञान प्रसार न होता अज्ञान वाढत गेले. असो. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

श्वेता२४'s picture

6 Mar 2020 - 3:00 pm | श्वेता२४

विचारप्रवृत्त करायला लावणारा.

Jayant Naik's picture

6 Mar 2020 - 9:53 pm | Jayant Naik

विचार तर हवाच पण कृती सुद्धा हवी.

जालिम लोशन's picture

13 Mar 2020 - 11:25 am | जालिम लोशन

ऊत्तम

Jayant Naik's picture

16 Mar 2020 - 9:41 pm | Jayant Naik

मुळात क्लिष्ट विषय ..त्यात एका वेगळ्या वाटेने जाण्याचा प्रयत्न . लोकांना कितपत आवडेल याची शंका होती. पण मला जे सांगायचे आहे त्या बद्दल शंका नव्हती . म्हणून मिसळपाव वर सादर केली. उत्तेजना दिल्याबद्दल धन्यवाद.

Jayant Naik's picture

16 Mar 2020 - 9:42 pm | Jayant Naik

मुळात क्लिष्ट विषय ..त्यात एका वेगळ्या वाटेने जाण्याचा प्रयत्न . लोकांना कितपत आवडेल याची शंका होती. पण मला जे सांगायचे आहे त्या बद्दल शंका नव्हती . म्हणून मिसळपाव वर सादर केली. उत्तेजना दिल्याबद्दल धन्यवाद.