तसे आपण सर्वच काही ना काही गोष्टींना निर्ढावलेले असतो किंवा हळू हळू आपण त्या गोष्टींशी जमवून घ्यायला सुरुवात करतो. आपल्यातले काही जण तर सर्वसाधारण जाणीवांच्यापलीकडे जाऊन स्थितप्रज्ञ झालेले असतात. हॉस्पिटलमध्ये काम करणारा स्टाफ हा पेशंटच्या वेदना आणि अडचणी यांनी फारसा बाधित न होता आपले काम आणि आपले जीवन व्यवस्थित जगायला शिकतो. ज्या गोष्टींमुळे सामान्य माणसं हलून जातात तिथे हि माणसं निर्विकारपणे आपलं काम करीत राहतात. आणि असं निर्विकार होणं हे आवश्यक पण असते.
पण आपल्यातले बऱ्याच उदारमतवादिनीं काही काळ का होईना गेल्या काही वर्षात मोठे भावनात्मक आव्हान पेलले असण्याची शक्यता आहे. आणि आपापल्या वकुबानुसार चटकन ते मोठ्या कष्टाने हा निर्ढावण्याचा प्रवास केला असेल. तर असा माझा स्वतःचा निर्ढावण्याचा प्रवास मी येथे सांगत आहे.
सुमारे बारा वर्षांपूर्वी मिपाशी ओळख झाली. जी काही ओळख झाली ती काही फारशी सुखावह नव्हती. कुठल्यातरी चर्चेत 'या संस्थळावर गांधींना शिव्याच दिल्या जातील' अशा अर्थाचे, मिपाचे एकूणच धोरण स्पष्ट करणारे वाक्य वाचनात आले. तरीपण इतर चर्चा आणि खास करून राजकीय चर्चा या बऱ्याच मर्यादशील म्हणता येतील अशा असत.
२०१३ च्या उत्तरार्धात राजकीय क्षितिजावर ब्रह्मांडनायकांचा उदय झाला आणि त्याच दरम्यान कायप्पा विद्यापीठाची स्थापना झाली. ब्रह्मांडनायकांचा राज्याभिषेक होऊपर्यंत तर कायप्पा विद्यापीठात नवनवीन, दैदिप्यमान असे इतिहासकालीन आणि शास्त्रीय दाखले देणाऱ्या गिरण्याच सुरु झाल्या. यातील एक गिरणी तर ब्रह्मांडनायकांचे अर्थशास्त्रीय सल्लागार संजीव सन्याल चालवीत असत. याचा फार त्रास व्हावा इतका काही मी संवेदनशील नव्हतो. पण दुःखी व्हावे असे प्रसंग नंतर आले.
दोन-तीन वर्षांपूर्वी अचानक एका मित्राचा फोन आला. मी जी कंपनी सोडून जवळपास एक तप झाले होते त्याच्या माजी सहकाऱ्यांनी कायप्पा ग्रुप तयार केला होता. सुरुवातीला सर्व काही आलबेल होते. पहिल्या दोन-चार दिवसात तर मैत्रीच्या कारंज्याचा फव्वारा काही विचारायलाच नको. एकमेकांना टोपण नावांनी संबोधने, आपली घरे, मुलं यांचे फोटो टाकणं वगैरे सर्व झाले. आणि नंतर उजवीकडील मंडळी कार्यरत व्हायला सुरुवात झाली. आपलीच काही मित्रं दुखावू शकतात याचा विचार न करता आरक्षण, दंगली, अमुक धर्माचे लांगुलचालन वगैरे विषयावरील चिथावणीखोर संदेश यायला सुरुवात झाली. गरळ ओकताना अतिशय विखारी भाषा तर ब्रह्मांडनायकांचे कौतुक करताना तर इतकी मधाळ भाषा कि नजरदेखील उचलता येत नव्हती.
जेंव्हा निर्ढावलो नव्हतो तेंव्हा मुद्देसूद माहिती देऊन उजव्यांचे मतपरिवर्तन करण्याचा खुळचट प्रयत्न मी देखील केला. पण उजव्यांना आपण खोटं ठरतोय याची भीती नव्हतीच. 'हे सर्व इंग्रज आणि काँग्रेसनं मुद्दाम शिकविलेल्या इतिहासाचा परिणाम आहे' असा पवित्र मंत्र त्यांच्याकडे तयार असायचा. शेवटी या आणि अशा बऱ्याच कायप्पा ग्रुपवरून मी माघार घेतली. पण दुर्दैवाचे फेरे काही संपले नव्हते. ब्रह्मांडनायक मधुचंद्र संपवून नव्या जोमाने परत आले. माझ्यासाठी वाईट हे कि 'बघा! शेवटी सत्याचाच विजय झाला!!' अशा अर्थाचे संदेश मित्रांनी वैयक्तिकरीत्या पाठवले. तिकडे चेपुवर तर हि मंडळी सुटलीच होती. शेवटी तिथे पण या मित्रांना अनफॉलो करून टाकले.
दुसऱ्या बाजूला पुण्यातील खाऊ गल्यांच्या बाजूला होणारी गर्दी आणि उलट दिशेने वाहन चालवणारे हेही डोक्यात जात. आताशा असेच आपण संपायचे अशी समजूत करून घेऊन थोडी फार मनःशांती मिळवत आहे. सुख हे किती व्यक्तिसापेक्ष असते याचा अनुभव या निमित्ताने मिळतो. उजवे, खादाड आणि नियम तोडणारे यांच्या दृष्टीने तर सध्याचा काळ म्हणजे तर रामराज्यच!
प्रतिक्रिया
9 Feb 2020 - 11:59 am | आनन्दा
पूर्वी या धाग्याने हा हा म्हणता 3 शतकी मजल मारली असती.. पण सध्याच्या असहिष्णु काळात हा धागा 10 देखील पार करणे मला कठीण वाटते.
शुभेच्छा!
9 Feb 2020 - 12:23 pm | सुबोध खरे
फार जळजळ होते आहे का?
पुरोगाम्यांना कुणीही विचारत नाही आणि त्यांचं पितळ उघडं पडलंय म्हणून.
उगी उगी
10 Feb 2020 - 8:04 am | जोन
नाउ इफ नेम ओन्ली इज "सर टोबि" सो इट इज होलि डुटि टु लिफ्टिन्ग ब्रिटिश लेक्स....पौलिशिन्ग चम्चे शुज....
9 Feb 2020 - 12:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाट्सॅपचा प्रभाव संस्थळावर नक्कीच पडला. पण, वाट्सॅपचाही आता कंटाळा यायला लागलेला दिसतो. एक ठराविक लोक काथ्याकूट करत असतात, एक ठराविक लोक ते सर्व मेसेज क्लियर करीत असतात. दोनपाच पारंपरिक तळी उचलत असतात तर दोन चार आधुनिक विचार ओतत असतात आणि सायंकाळी वाचून एक थकलेपण यायला लागते. आता नको ते वाट्सॅप असा फील यायला लागला आहे. नवीन नवीन बरं वाटलं. अधून मधून ते हवंही असतं. पण आता बस अशी ही अवस्था माझीही.
०दिलीप बिरुटे
9 Feb 2020 - 12:42 pm | गवि
आपल्या मताशी न जुळणाऱ्या मताला बहुमत लाभू लागलं की थकवा येतोच जनरली.
आराम करावा अशावेळी आणि बहुमतालाच लोकशाहीत मान असतो हे मान्य करावं.
सर्वजण चुकताहेत आणि वाकड्या मार्गाला लागलेत. आपण एकट्याने किंवा आपल्यासारख्या मोजक्या चार लोकांनी त्यांना सन्मार्गावर आणायला हवेय हे "हाय मॉरल ग्राऊंड" सोडावे.
मनःशांती लाभेल.
9 Feb 2020 - 12:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंय. आपण एक टोक पकडतो आणि लोक दुसरं टोक पकडतात. बरं ढळढळीत चूक मत असूनही जेव्हा ते मान्य होत नाही,
तेव्हा उठून दोन मुस्काडात देऊन यावे असे वाटायला लागते, पण असं जेव्हा करता येत नाही, तेव्हा थकवाच येतो.
खरंय. सालं माझं ब्लड प्रेशर वाढतं अशा वेळी.
-दिलीप बिरुटे
9 Feb 2020 - 1:01 pm | गवि
मुद्दा मागे पडून हिंसक विचार येणे ही वैचारिक मुकाबल्यात पराभवाची पहिली खूण.
9 Feb 2020 - 1:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिंसक विचार केवळ वैचारिक हतबलता दाखविण्यासाठी व्यक्त केलेला आहे. लोक समजावण्याच्या समजून घेण्याच्या पलीकडे जातात आणि आपला हेका सोडत नाही, तेव्हा मानसिक थकवा येतो. इतकेच.
-दिलीप बिरुटे
10 Feb 2020 - 10:57 am | सुबोध खरे
मुद्दा मागे पडून हिंसक विचार येणे ही वैचारिक मुकाबल्यात पराभवाची पहिली खूण.
ज्जे बात
9 Feb 2020 - 5:08 pm | चौकटराजा
मी व्यक्तीश: बोलघेवडा गप्पीश्ट आहे पण मी एकाही कायप्पा गटाचा सदस्य नाही. जो ग्रूप मी स्थापन केला होता त्याचाही नाही . माज़्या मते माहितीची देवाण घेवाण करायला हे मस्त साधन आहे पण ग्रूप .... आग बाबो ..नके रे बाबा ! शतेशू जायते शूर: प्रमाणे माणसात खरोखरीच स्वत: चे काही असलेले असे फार कमी लोक निसर्ग जन्माला घालतो असा माझा दावा आहे.
14 Feb 2020 - 10:59 am | राघव
कायप्पा गृप्स वात आणतात. बरं लोकं जबरदस्तीनं जोडतात ते वेगळंच.
अगोदर माझी चिडचिड व्हायची. पण नंतर लक्षात आलं की त्यात काही हशील नाही. तेव्हा जोडलंय तर काही दिवस मूक सदस्य राह्यचं आणि हळूच एक दिवस कल्टी मारायची. शक्यतो कुणाला लक्षात देखील येत नाही. :-)
एकूणच, ज्यांच्याशी तुमचा फेस-टू-फेस संबंध येतो अशाच लोकांच्या गृपमधे जरा तरी काळ काढता येतो. [आणि गरज पडली तर जरा खोपच्यातही घेऊन प्रेमसंवाद साधता येतो, फेस-टू-फेस!] तसंही मॅक्सिमम गृप्स २-३ दिवसांनी मेसेज क्लीअर करण्याचा परिपाठ ठेवला तर डोक्याचा शॉट कमी होतो असा अनुभव आहे.
चेपू वापरणे तर जवळजवळ बंद केलेलेच आहे. कायप्पाही वापरणे बंद केल्यास किती शांतता असेल जीवनात अशा विचारात आहे सध्या. ;-)
11 Feb 2020 - 5:14 pm | गामा पैलवान
सर टोबी,
लेख वाचून प्रश्न पडला की निर्ढावलेले कोणाला म्हणायचे? तुम्हाला की मोदींना? की दोघांनाही?
आ.न.,
-गा.पै.
13 Feb 2020 - 1:58 pm | वामन देशमुख
हे कळलं, पण
हे पटलं नाही.
तेवढं क्लिअर् करा, मग "फारशा सुखावह नसलेल्या" ठिकाणी राहण्यात अर्थ आहे की नाही ते पाहू.
14 Feb 2020 - 10:38 am | महासंग्राम
एक इनो पोस्टकार्ट्यासाठी आणि चिज पॉपकॉर्न माझ्यासाठी.
14 Feb 2020 - 11:13 am | राघव
तुमचे म्हणणे मान्य आहे. आपले योग्य मत कुणाला पटवून देता न येणे आणि त्याच बाबतीत दुसर्याचे चुकीचे मत समोरच्याला सहज मान्य होणे, यामुळे आत्यंतिक त्रागा होतो हा स्वानुभव आहे. त्यातून एवढे जरी शिकता आले की आपण सगळ्यांना समजावू शकत नाही, तर तो त्रागा तेवढाच कमीदेखील होतो हाही स्वानुभव आहे.
आपल्याला व्यक्तीचा फार उदो-उदो केलेला आवडत नाही, ते योग्यच आहे. मलाही आवडत नाही.
सरकार काय काम करते इतपतच विचार ठेवले तर, वैचारिक आवाका कमी केल्यामुळे, त्रागा कमी होईल.
आणि डावे-उजवे-मधले अशा चष्म्यांना बाजूला ठेवून, केलेले काम योग्य किंवा नाही असा रोख ठेवला तर आपणही बर्यापैकी तटस्थपणे लेखाजोखा मांडू शकतो. राष्ट्रवादासाठी कोणत्याही झापडा असण्याची गरज नसतेच. सरकारचे काम हे राष्ट्रवादावर तपासून बघीतले की त्यावर आपली भूमीका नेहमीच बरोबर राहील. मग सरकार कुणाचेही असो आणि लोकं काहीही म्हणोत.