अंधारछाया
चौदा
मंगला
अशी बोलली ही गधडी तडा तडा. मला सुचेना काय करावं! एरव्ही एक थप्पडच ठेऊन दिली असती. असं अद्वा तद्वा बोलली असती ती तर. पण शारीरिक त्रासानं आधीच बेजार त्यात अमावास्याची रात्र! मी ही आवरलं मनाला. बराच वेळ पुटपुटत होती काही काही. मग आम्ही गाद्या टाकल्या. पडलो. तरी मनातून काही केल्या जाईना तिचे बोलणं.
काकांनी पाठवली तिला अभ्यास करायला. तब्बेत सुधारायला. पण हिचं हे लचांड निस्तरता निस्तरता आलेत नाकी नऊ. बरं काकांना कळल तर म्हणतील तुला कोणी सांगितलं होते हे नसते धंदे. त्यांचा आधीच भुता-खेतांवर विश्वास कमी. शिवाय जप-जाप्य म्हणजे संतापाने त्यांना तिडीक येते. त्यांना जर हे कळलं लागिराच तर माझी तर होईलच खरडपट्टी. पण त्यांनाही बोलतील उलटसुलट.
पहाटे पहाटे पाहिलं हिचं अंथरूण, तर पडली होती मुरकुटं करून. केसांची वेणी विस्कटलेली, केस पिंजारलेले. हातापायावर बिब्याचे चरके दिल्यासारखे उठलेले डाग. साडी जरा ठीकठाक केली. अंगावरून पांघरूण घातले. तशी झोप चाळवली तिची. उठून बाहेर आले. जागेतून चक्कर मारली. पायरीवर बसले विचार करत.
किती दिवस चालणार हे असं? कालची ती रक्ताची उलटी! असं अंगाची लाहीलाही होणं, आधीच ही इतकी अशक्त. त्यात हे ताप, उलट्या. किती दिवस काढणार ही! असे उद्या झालं काही बरंवाईट तर आपलं कोणी ऐकणार नाही. दोष मात्र आपणावर येणार, हे आमचे उपद्व्याप म्हणून!
शशी
दुपारच्या वेळी आमचं क्रिकेट ऐन रंगात आलं होतं रस्त्यावर. बॉल मागे चिकात हरवला. तसे एक एक काही काही निमित्त काढून पळून गेले! मी बराच वेळ हुडकत होतो बॉल. अंगातून घामाच्या धारा वाहात होत्या. आजींची हाक ऐकू आली. ‘चहा प्यायला चला’ म्हणून आलो घरात, बॉलचा नाद सोडून.
हातपाय धुवून चहा बशीत ओतला, तर आई म्हणाली, ‘मावशीला हा दे चहा’. मी चहा घेऊन मावशीपाशी आलो. ‘च sss हा, बेबी मावशी’ तिला हालवलं. झटकन उठली. बसली. घेऊ लागली चहा.
बऱ्याच माळा व्हायच्या होत्या. मी मावशीला म्हणालो, ‘चहा झाल्यावर आपण दोघे मिळून करू का या माळा’? काही बोलली नाही. चहा झाला. मी मांडी ठोकली तिच्या शेजारी. चालू केला जप जोरजोरात म्हणायला. माझ्या पाठीवर बसला एकदम धपाटा! पाहिलं तर मावशी रागावली होती चेहरा भेसूर वाटला! आवाजाने सगळेच मधल्या खोलीत आले पहायला. पाहतात तो मावशी होती माझ्यावर हात उगारून पुन्हा मारायला!
‘अग अग, मुलांवर काय हात उगारतेस’? आई म्हणाली, तर मावशीने आईला दटावले, ‘तू चूप. बोलू नकोस एक शब्द!’
मी मावशीपासून लांब झालो. दादांजवळ जाऊन उभा राहिलो. दादांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मला हळूच म्हणाले, ‘जा आतून भस्म आण पाण्यात घालून’ मी आत सटकलो.
बाहेर आई मावशीला म्हणत होती, ‘बेबी, ती फार कमी जेवतेस सध्या. त्यात ते फोड, तळव्यांना होणारी आग. या सगळ्यामुळं तुझं डोकं झालय हलकं. म्हणून अशी संतापतेस. जरा शांत हो. आम्ही जप कर म्हणतो ते तुला बरं वाटाव म्हणूनच ना’?
म्हणाली, ‘मला तर मारणारच आहेस पण तिकडे काका मरायला टेकलेत याची तरी शुद्ध आहे का’?
‘बेबी? काय अशूभ बोलतेस, शुद्धीत आहेस का’?
‘मला बेबी नको म्हणूस. मी सांगते ते खर आहे! तुला खरं वाटत नसेल तर मी चालले पुण्याला त्यांना बघायला! काही झालं तरी माझे वडील आहेत ते! तुला जायचं नसणारच! दुष्ट आहेस ना तू!’
आई चिडली. एक मुस्काटात ठेऊन दिलीन मावशीच्या! पण मावशीला लागलेच नसावे. कारण हसत होती. गाल चोळण्याऐवजी म्हणाली, ‘खरं बोलले तर राग आला? मार, मार, मारून टाक. पण बापाला पहायला जाऊ नकोस पुण्याला! इथे तडफड! मी जाणार!’
पुढचं बोलण आईला सहन झाले नाही. डोळ्यांना पदर लाऊन आई तिथून गेली. आजी स्वैपाक घरात गेल्या. दादांनी मला बाहेर जायची खूण केली. तसा मी बाहेर पडलो घराच्या.
‘अहो, या पोरटीला घरातून घालवा बरं! माझ्याने आता सहन नाही होत. काय काय अभद्र बोलतेय ऐकलत ना? शशीला थोबाडीत लगावलीन, उद्या तुमच्यामाझ्यावर हात चालवायला कमी नाही करणार ही! झाली एवढी थेरं पुरे झाली. आत्ताच्याआत्ता हिचं सामान भरा आणि बसवून द्या गाडीत. मध्याला सांगा तिला ने. नाहीतर मीच जाते अन पोचवते पुण्याला. कोणी सांगितलीय ही विकतची डोकेदुखी!’...
‘मी काय म्हणतेय ऐकताय ना तुम्ही? ती तंबाखूची गुळणी टाका आणि बोला झडझडून!’ माझा संताप इतका झाला होता. हे आपले नुसते हू हूं करून ऐकत होते.
पिचकारी टाकू हे म्हणाले, ‘देऊया ना पाठवून, पण आत्ता नाही. थोड्या दिवसांनी. तुझे आधी संतापून झाले काय? मी काय सांगितले होते तुला गेल्या अमावास्येला? विसरलीस? आज पुन्हा अमावास्या आहे. ती अशी वागली, बोलली आणि आपण नेमके फसलो तर मग आपल्यात आणि बेबी सारख्यात काय फरक? सगळी अध्यात्मिक साधना फुकटच गेला म्हणायची! चल तोंड पूस. तिला पुन्हा बोलते कर. माझ्या अंदाजाने ती ट्रान्समधे पछाडणारी व्यक्ती बोलत असावी!’
गेल्या महिन्यातली अमावास्येची रात्र आठवली. तेंव्हाही माझं मन सैरभैर झालं होतं. वाटलं होतं हॉस्पिटलात नेल्याशिवाय बरीच होणार नाही परत. पण ह्यांनी त्या दिवशी धीर दिला. अन ती वेळ मारून नेली. पुढे आपोआपच तिला बरं वाटलं. खाज कमी झाली. हाताच्या तळव्याची सालडी मात्र निघत होती बरेच दिवस!
आज पुन्हा अमावास्या. हे सकाळपासून माहिती होतं. पण ही अशी फटाफट अभद्र बोलली. तेंव्हा माझा ही तोल गेला. उगीचच मारलं मी तिला. बिचारीचा काय दोष? इतके सगळे ती सहन करतेय तेच किती आहे!
वाईट वाटलं तसं डोळ्याच पाणी खळेना. हे जवळ आले. माझ्या खांद्यावर हाताने थोपटत म्हणाले, ‘रिलॅक्स, रिलॅक्स,’ तशी मी त्यांच्या छातीवर डोकं टेकवल. ह्यांनी माझ्या केसांवरून हात फिरवला. मला एकदम आधार वाटला. स्पर्षांनं नवी धिटाई आली. नवा उत्साह आला!
तोंडावर पाणी मारून साबणाने चेहरा धुतला. केस वळवले. साडी बदलली. पुन्हा बसले बेबीजवळ जाऊन. मोठ्याने जप करू लागले. तशी ती उठून बसली. माळ पकडली. म्हणाली, ‘बोल, केंव्हा जायचय पुण्याला’? आधी जरा वेळ मी गप्प होते. तर म्हणाली, ‘सामान बांधायला घे माझं!’ हे म्हणाले, ‘जायचय पुण्याला. पण आत्ता नाही. काही दिवसांनी!’
‘नंतर जाऊन काय उपयोग? आत्ताच्या आत्ता जायला पाहिजे! तर ते भेटतील, दिसतील नाही तर नाही!’
‘अस्सं का? बरं! पण तुला कसं कळलं? आम्हाला काही पत्र बित्र नाहीये, ते आजारी असल्याचे’ हे म्हणाले.
‘मी सांगतेय म्हणजे खरच असणार! त्यांना बरं नव्हतं बरेच दिवस. पण त्यांनी नाही कळवलं तुम्हाला. तुम्ही कळवल आहेत का मी इतकी बरी नाहीये तरी? बेबीचा मुद्दा बिनतोड होता.
हे म्हणाले, ‘समजा, आत्ता पर्यंत त्यांनी कळवले नाही आणि आता ते मरायला टेकले असतील तरी तुला जाऊन तिथे काय करायचे? बरं आत्ताच्या आत्ता निघून जायचे ठरवले तरी पुण्याला पोहोचायला उद्या सकाळपर्यंत वेळ जाणार. तो पर्यंत उशीर झाला तर’?
‘कसं पोचाचय ते मी पाहीन. तुम्हाला त्याची कशाला चिंता? माझे कपडे भरा टॅक्सी बोलवा’
‘टॅक्सी कशाला? आम्ही फोन करून विचारू कशी तब्बेत आहे!’
‘फोनवर बोलायला कोण तिचा बाप येणार आहे? बऱ्या बोलानं बेबीला सोडता की नाही’? बेबीचा आवाज चढला होता!
‘हे कोण बोलतय मला दरडाऊन? बेबीला सोडा म्हणून सांगणारा तू कोण बोलतोयस? बेबी बोलत नाहीये!’
‘मी कोण आहे तुम्हाला माहित आहे. मग कशाला वाद? तिला सोडा पुण्याला’.
‘तिला पुण्याला सोडायचे की नाही हे आम्ही ठरवणार आहोत. पण कोणी धमक्या देऊन जर पाठवा म्हणत असेल तर नक्कीच नाही पाठवणार’. हे म्हणाले.
‘अस्सं. मग तुम्ही मला छळायच सोडणार नाही काय? मग मी पहा बेबीचे कसे हाल हाल करतो!’
‘आता आणखी काय हाल करणार आहेस? काय करायचं शिल्लक ठेवलयस’?
‘म्हणूनच बेबीला सोडून द्या. तिला जगू दे. मला पण राहू दे’.
आम्ही सगळे गप्प होतो. ह्यांनी तिच्या कपाळाला भस्म लावले. म्हणाले, ‘आम्ही इतके दिवस झगडतोय ते काय तुला झपाटून ठेवायला सोडून देऊ? बऱ्या बोलाने जाणार आहेस की नाही’?
‘काय माणसं आहात की जनावरं? बाप मेला हे सांगून ही बधत नाहीत!’
‘हे पहा, तू आम्हाला काहीही म्हणालास तरी आम्ही काही बेबीला सोडणार नाही, एकटी. तेंव्हा तू केंव्हा हिला सोडतोस बोल?
‘मी सोडीन? वाट बघा! कोण तो फित्तुरडा गुरूजी आणलाय? आत्ता कोलून लावीन त्याला!’
‘मग इतक्या दिवस काय झोपा काढल्या काय रे? जा मार ना गुरूजींना. पाहू तुझी काय पॉवर आहे ते! गुरूजी सोड माझ्याशीच होऊन दे ना काय करायचे ते’
‘तुला तर सोडणारच नाहीत आमची माणसं. दहा दहा बसतील पाठकुळीवर. तुला काय वाटतेय, तुला काही होणार नाही म्हणून’?
‘दहांचे सोड एक तूच येकी सुरवातीला पछाडून बघ जमतय का!’
मला ह्यांनी, ‘कपाळावर टिळे लाव भस्माचे’ म्हणून सांगितले’. तशी बेबी हातानी ढकलायला लागली म्हणून थांबले तशीच. ह्यांनी जोरात ॐ नमः शिवाय म्हटलं आणि लावला टिळा. पुन्हा ॐ नमः शिवाय म्हटलं. असे चांगले बरेच वेळा झालं. अंग ताठवून कडक लक्ष्मीसारखी, एके ठिकाणी नजर लावून बसली होती, ते कमी झाले. एकदम हात खाजवायला लागली. हळू हळू अंग खाजवायला लागली. ‘आगsss आग, भाजतय माझं सगळं अंग!’ ‘पाणी, पाणी!’ करून ओरडायला लागली. तांब्यातून पाणी आणून देत हे म्हणाले, ‘पाणी पी, बरे वाटेल!’
‘मला भस्माचं पाणी पाजताय काय? ते भस्म लावलत म्हणूनच आग होतेय!’
‘अस्स, म्हणजे आग तुझ्या अंगाची होतेय. बेबीच्या नाही? तर मग होऊ दे काय आग व्हायची आहे ती!’
हे उठून तंबाखूचा बार भरून बाहेरच्या खोलीत आरामात जाऊन बसले. मी आपली बसले समोरच बेबीच्या सोबतीला खाजवून शेवटी आपोआपच थांबली. आडवी झाली तिथेच. अंगावरून पांघरूण घातले आणि बाहेरच्या खोलीत गेले.
दादा
मंगलाला जरा पुन्हा चहा, काही खायला आणायला सांगितले. ऑफिसला जायला उशीर होऊन गेला होता. शशीला ऑफिसात पाठवला, काही इंपॉर्टंट मेल आहे का दुपारच्या डाकेला पहायला. राहिलो घरीच.
चहा घेतला. चिवड्याच्या चार फक्क्या मारल्या. ही आली. बसली समोर. म्हणाली, ‘अजून सगळी रात्र बाकी आहे अमावास्येची. रात्री डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला सांगितलंय गुरूजींनी. विशेषतः विहिरीकडे’.
‘मी घालणार आहे बाहेरून कुलूपं दारांना, म्हणजे एका दारावर लक्ष ठेवायला बरे’. मी म्हणालो.
‘अहो गुरूजी काय म्हणत होते त्या दिवशी? तुम्ही बोलत बसला होतात तेंव्हा विचारीन विचारीन म्हणता म्हणता राहून गेलं धबडग्यात’
‘मी विचारले होते की हे भूतबाधा वगैरे होते याला शास्त्रीय बाजू काय’?
‘तर म्हणाले, याला काहीच शास्त्रीय पुरावा, स्पष्टीकरण नाही. बाधा झालेली माणसं आणि इतर यात काही शारीरिक फरक पडत नाही. कुठल्याही शारीरिक परीक्षेत तुम्हाला काहीही वेगळे दिसणार नाही, म्हणून ही योनी शास्त्रीय दृष्टीकोनातून सिद्ध झालेली नाही’.
मी विचारले, ‘भुते कशी असतात? ती तुम्ही पाहिली आहेत काय’?
गुरूजी म्हणाले, ‘याचे उत्तर होय आणि नाही असे आहे! एखाद्याच्या शारीरिक माध्यमातून ते जेंव्हा प्रकट होतात, दिसतात, बोलतात, व्यथा, आशा-आकांक्षा, इच्छा सांगतात. त्यांची पुर्ती केल्या तर ती गेल्याची उदाहरणे आहेत. पण चांदोबा वगैरे मासिकात चित्रे दाखवतात, तशी अतृप्त वासनांच्या रुपामधली भुते मी ही पाहिलेली नाहीत’.
‘ही भुते माणसांना कशी पकडतात? मी विचारले.
ते म्हणाले, ‘आत्ता पर्यंतच्या अनुभवावरून मी असे म्हणेन की साधारण संध्याकाळ नंतरची ते रात्री बारा पर्यंतची वेळ, एकाकी माणूस व बाधित जागा म्हणजे पुर्वीच्या काळात वापरात असलेली वास्तू, ह्या सर्वांतून बाधेला प्रारंभ होतो. शिवाय कित्येक वेळा असे ही पाहिलेय की एकाला सोडून दुसऱ्याला पकडायला, त्यांना वेळ काळ लागत नाही’.
‘ही बाधा, भुतं तुम्ही काढता म्हणजे काय करता? त्यांच्या इच्छा तुम्ही पूर्ण करता का’?
गुरूजी म्हणाले, ‘फार छान प्रश्न विचारलात. बऱ्याच जणांचा असा ग्रह होतो की मी भुते काढतो याचा अर्थ मी त्यांच्या उरावरून उठवून माझ्या उरावर घेतो. तसे नाही. मंत्र विकारी वासनांचा नाश करतो, हाच भुते नष्ट होण्याचा खरा मार्ग. तेंव्हा इच्छा पूर्ती करणे म्हणजे भुतांच्या दृष्टीने त्यांना बळकटी देणे नाही काय’?
मी म्हणालो, ‘मला हे कळत नाही की जर त्यांना इच्छा पूर्ती करायच्या असतात तर त्या ते छळ करून कशाला करतात पुर्ण?
‘आता बेबीचेच पहा, तिला ताप, खाज येणे ह्यापासून त्या बाधणाऱ्या व्यक्तीला वासनापूर्तीच्या दृष्टीने काहीच मिळाले नाही’?
गुरूजी म्हणाले, ‘असे आहे, जो पर्यंत तुम्हाला माहित नव्हते तो पर्यंत तिला त्रास नव्हता. साधे उदाहरण घ्या. असे पहा तुम्हाला तहान लागली आहे आणि ते न मागता मिळतेय. पण जर मागितलेत कोणाला, पाणी पाहिजे म्हणून आणि जर त्यानी ते दिले नाही तर तुम्ही त्यांना हाणता दोन थोबाडीत. पण त्यामुळे तुमची तहान शमली का? नाही! तसेच आहे. बाहेर काढायला लागल्यावर त्रास चालू होतो’.
आणि बरेच प्रश्न विचारावेसे वाटले, पण वेळ व्हायला लागला. शेवटी उठताना म्हणालो, ‘आता बेबीची काय काळजी घ्यायची’?
म्हणाले, ‘अमावास्या पौर्णिमा सांभाळा. बाहेर जाऊ देऊ नका. जर ती तंद्रीत गेली तर तिला बोलते करा व माहिती काढा. काही हे द्या, ते द्या, काही करा, खायला द्या वगैरे म्हटले तर मानू नका. तुमच्या घरात विहीर आहे म्हणता, तर तिला तिकडे जाऊ देऊ नका. बाकी तुमच्या विचाराप्रमाणे करा. भस्म भरपूर घ्या बरोबर. शिवाय गोमयाच्या गोवऱ्यांची राख करून तीही मंत्रून वापरा पाण्यात टाकून तिच्यावर शिंपडा कधी तंद्रीत गेली तर’.
मंगला व मी बराच वेळ होतो बसलेलो समोरासमोर न बोलता विचार करत.
रात्री बाहेरून कुलूप ठोकून मी घरात वाचत होतो, राम चरित मानसातील काही कांडे. उत्तर रात्र झाली मग मीही झोपलो कंटाळून.
रात्र काहीही न होता गेली. अँटी क्लायमॅक्स वाटला.
प्रतिक्रिया
31 Jan 2020 - 11:14 pm | सुचिता१
जबरदस्त कथानक आहे!!