श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य उभे केले ते चतुराई, कर्तबगारी, खंबीर नेतृत्व, विचाराची कल्पकता, लढाऊपणा, गनिमी कावा, पराकोटीचा पराक्रम, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाख मोलाची स्वराज्या साठी घाम गाळणारी, पराक्रम आणि बलिदान देणारी माणसं त्यांनी जमा केली. त्यापैकी एक होते “नरवीर तानाजी मालुसरे”. हे नाव उच्चारताच फक्त एक नाव आठवते ते म्हणजे सिंहगड. त्यासोबत महाराजांचे प्रसिद्ध विधान आठवते “गड आला पण सिंह गेला”.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कित्येक मावळे, सरदार, गनिमीकावा तंत्र, विविध आरपारच्या लढाई, किंवा त्यांच्या मोहिमे वर चित्रपट निघू शकतो. महाराजांनी आणि स्वराज्याच्या शिलेदारांनी असे कर्तृत्व आणि शौर्य त्यावेळेस गाजवले होते. अफाट कर्तृत्व, धैर्य, शौर्य, पराक्रमा मुळे “नरवीर तानाजी मालुसरे” यांचे नाव इतिहासात कोरले आहे. या चित्रपटात अजय देवगण यांनी तान्हाजी यांची भूमिका साकारली आहे. आपल्या दमदार अभिनयाने या ऐतिहासिक पात्राला योग्य न्याय दिला आहे. या भूमिकेसाठी अजय अतिशय योग्य असा अभिनेता आहे. अजयने आपल्या डोळ्यांचा, संवाद फेकीचा, अभिनयाचा उपयोग करून व्यक्तिरेखा साकारण्याचा आलेख उंचावत नेला आहे. एकदम कडकडीत, चुरचुरीत संवाद अजयने लीलया, सहजरीत्या आणि प्रभावीपणे उच्चारले आहेत. पूर्ण चित्रपट ‘तान्हाजी’ या व्यक्तिरेखे भोवती फिरतो. एक प्रेमळ पती, पिता, मित्र, सहकारी, लढवय्या सेनांनी, निष्ठावान, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात चांगल्या पद्धतीने उभारला आहे. “तान्हाजी” च्या विविध छटा टिपण्यात अजय अभिनेता म्हणून यशस्वी झाला आहे.
तान्हाजीच्या बरोबर उलट “उदयभान राठोड” आहे. निर्दयी, सूडबुद्धी, खुनशी, घातकी, दगाबाज, अक्षरश: अति दुष्ट आहे. ही व्यक्तिरेखा सैफ अली खानच्या अंगात भिनली आहे. तुम्ही या व्यक्तिरेखेचा द्वेष कराल इतका नैसर्गिक अभिनय सैफ ने साकारला आहे. मगरीचे मास खाणारा, शत्रूला चकित करणारा, पहारेकरी चुकला तर मृत्यूदंड देणारा, विधवेला पळवून आणणारा खुनशी खलनायक उत्कृष्ट उभारलेला आहे. “उदयभान” आणि “तान्हाजी” यांच्यातील संवादाची जुगलबंदी चित्रपटाला वेगळ्या उंची वर नेतात. “सैफ” ने खलनायकाची भूमिका अतिशय ताकदीने उभारलेली आहे. त्याची संवादफेक, अभिनय, वेषभूषा आणि डॉयलॉगबाजी मुळे या भूमिकेला वेगळीच उंची लाभली आहे. “दख्खन की हवा चली तो उठा देना” या वाक्यात तो भाव खाऊन जातो. भविष्यात सैफच्या या भुमिकेला विविध पुरस्कार नक्कीच मिळतील.
उत्तम सहकलाकाराची फौज या चित्रपटात आहे. शरद केळकर, पद्मावती राव, लुकॅ केनी, अजिंक्य देव, नेहा शर्मा, शशांक शेंडे आणि देवदत्त नागे. सगळ्यांनी आपले काम चोख बजावले आहे. पद्मावती रावचा “यशस्वी भव”, “जब तक कोढाणा पर फिर से भगवा नहीं लहराता, हम जूते नहीं पहनेंगे।” हा संवाद जबरदस्त आहे. त्यांनी डोळ्याचा, नजरेचा, अभिनयाचा उपयोग करून करारी जिजाऊ उभारली आहे. औरंगजेब बुद्धिबळ खेळतानाचा संवाद आणि दृश्य एकदम चपखल आहे. अतिशय संयत अभिनयाने शरद केळकर यांनी “छत्रपती शिवाजी महाराज” ही भूमिका पडद्यावर जिवंत केली आहे. शरद यांचे कास्टिंग अतिशय योग्य आहे. मित्र, छत्रपती, राजा अशी उत्तम भूमिका शरदने साकारली आहे. शशांक शेंडे यांनी शेलार मामा आणि देवदत्त नागे यांनी सूर्याजी मालुसरे उत्तम भूमिका साकारल्या आहेत. काजोल यांनी “सावित्रीबाई मालुसरे” ही व्यक्तिरेखा साकारली आहे. काजोल ची चित्रपटातील व्यक्तिरेखेची लांबी जरी कमी असली तरी काजोल चा वावर सुखकारक आहे. “कुत्ते की तरह जीने से बेहतर हैं... शेर की तरह मरना।” हे वाक्य परिणाम कारक उतरले आहे. अजय-काजोल ची पती- पत्नीची जोडी शोभून दिसते. त्यामुळे जोडी प्रभावी होऊन दोन्ही व्यक्तिरेखेला न्याय देते.
ओम राऊत यांनी अगोदर “लोकमान्य टिळक” हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चांगला चित्रपट होता. “तान्हाजी” या चित्रपटाची धुरा सुद्धा ओम राऊत यांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळली आहे. चित्रपटाचा पहिला भाग थोडा रेंगाळला आहे आणि संथ आहे. पण खरी कमाल दुसऱ्या भागात आहे. मध्यंतरा नंतर दुसर्या भागात दिग्दर्शकाने अतिशय उत्कंठा वर्धक, उत्तम मांडणी आणि VFX ईफेक्टची उधळण केली आहे. काही-काही ३डी ईफेक्ट अंगावर काटा आणतात. शेवटच्या लढाईचा प्रसंग जोमदार आणि एकदम करकरीत झाला आहे. लढाईचे एक्शन Sequences अतिशय उत्तम आहेत. चित्रपटात ४ श्रवणीय गाणी आहेत. ३ गाणी चित्रपटाच्या व्यवस्थित आणि उचित जागी आहेत. पण पार्श्वसंगीतात उणिवा आहेत. ऐतिहासिक कथांना दमदार पार्श्व संगीत हवेच. अश्या भव्य श्रेणीच्या चित्रपटातील प्रत्येक पात्राला, दृश्याला परिणाम कारक होण्यासाठी उत्तम पार्श्वसंगीत हवेच. पहिल्या भागाची व्यवस्थित मांडणी करून लांबी केली असती तर चित्रपट आणखी धमाकेदार झाला असता.
काही गोष्टी खटकतात. त्यातील एक साधू लाकडी कुबडी फेकून मारतो ते दृश्य काही पटले नाही. तान्हाजी उदयभान पुढे जाऊन गाणे गाऊन नृत्य करतात. ही दुसरी गोष्ट काही पटत नाही. प्रत्येक भूमिकेला स्थापित करण्या अगोदर थोडा वेळ दिला पाहिजे होता. ऐतेहासिक कथा असल्याने थोडी सिनेमॉटीक लिबर्टी घेतली आहे पण जास्त उत्कंठावर्धक दाखवण्याच्या नादात कथेत जास्त तोड मोड केली नाही हे विशेष. जशी कथा आहे तशी दाखवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे त्याबद्दल दिग्दर्शकाचे अभिनंदन.
पण अजय-सैफ चा उत्तम अभिनय, ऐतिहासिक कथेची तोडमोड न करता चांगले दिग्दर्शन, अंगावर शहारे आणणारे लढाईचे उत्कृष्ट चित्रण, पटकथेला दिलेला योग्य न्याय आणि चांगले छायाचित्रण, सिनेमॅटोग्राफी, वेषभूषा, दमदार सादरीकरण, चांगली एडिटींग, उत्तम कास्टिंग, एका स्वदेशाभिमानी लढवय्याचे दमदार चित्रीकरण, एक उत्तम कलाकृती यामुळे तुम्ही चित्रपट कमीत कमी एकदा बघाच. चित्रपट बघितल्या नंतर देश प्रेम उफाळून आल्याशिवाय राहणार नाही. मी या चित्रपटाला ३.५ स्टार देतो. १.५ स्टार कमी केले आहेत. कारण म्हणजे पहिल्या भागाच्या संथ गतीला, पार्श्वसंगीत आणखी चांगले होऊ शकले असते, इतर कलाकारांना थोडा वाव देता येऊ शकला असता आणि VFX ईफेक्ट आणखी चांगले होऊ शकले असते.
प्रतिक्रिया
15 Jan 2020 - 9:44 pm | ट्रम्प
छोट्या छोट्या चुकांकडे दुर्लक्ष केले तर एक उत्तम ऐतिहासिक चित्रपट सहकुटुंब पाहिल्याचा आनंद भेटतो .
15 / 16 वर्षांची मुले तर तान्हाजी पाहताना हरकून जातात , कारण त्यांना फक्त तान्हाजी मालुसरेचां पराक्रम दिसत असतो , सिनेमातील उणिवा नाही .
मी तर म्हणेन आपल्या भारताच्या इतिहासात अशा पराक्रमी वीरांच्या कथा भरपूर आहेत , आता कुठे त्यांना न्याय भेटायला सुरवात झाली आहे .
एक गोष्ट मात्र राहून राहून मनाला टोचत राहते शिवाजी महाराजांच्या साम्राज्या पासून इंग्रजी काळा पर्यंत च्या एकाही घटने वर खान त्रिमूर्ती ने सिनेमा काढलेला नाही , अजय देवगण ने उशिरा का होईना हिंमत केली व तान्हाजी मालुसरें वर सिनेमा काढला !!!!
16 Jan 2020 - 1:25 am | किल्लेदार
बघावा लागेल. उत्तम परीक्षण.
16 Jan 2020 - 9:11 am | गणेशा
मस्त परीक्षण.. नक्कीच पाहणार आहे..
माझी मुलगी ही कधीची ह्या शनिवार -रविवार ची वाट पाहत आहे.
दंगल picture नंतर एव्हड्या आतुरतेने picture ची वाट तिने आताच पाहिली आहे...
12 Feb 2020 - 1:03 pm | गणेशा
चित्रपट मला आवडला नाही.
मुलीला मात्र खूप आवडला.
ऐतिहासिक चित्रपटाला जायचे आणि इतिहास सोडून बाकी गोष्टी वर आनंद मानायचा असेल तर मग ऐतिहासिक चित्रपटाला का जायचे?
असो, फक्त आमचा इतिहास समोर येतो म्हणून आनंद मानण्यापेक्षा तो इतिहास योग्य खऱ्या पद्धतीने पुढे येईल हे मला जास्त योग्य वाटते.
असो.
16 Jan 2020 - 11:27 am | श्वेता२४
तानाजी अतीशय आवडला. सहकुटुंब पाहायला गेलो होतो. चित्रपटगृहातील वातावरण भारलेले होते. संवादांवर टाळ्या, शिट्ट्या, घोषणा यामुळे सिनेमा पाहण्याचा पुरेपुर आनंद मिळाला. हा ''सिनेमा'' आहे याचे भान ठेवले तर पुरता पैसैवसुल सिनेमा आहे. उत्तम मनोरंजन करतो. परिक्षणामध्ये लिहीलेल्या बहुतांशी गोष्टींशी सहमत. पण मला तर पार्श्वसंगीतही आवडलं.
16 Jan 2020 - 12:19 pm | पुणेकर भामटा
चित्रपट म्हणून पाहीलं तर ऊत्तम जमुन आलाय.
16 Jan 2020 - 11:58 am | पियुशा
नक्की पाहणार ! छान परीक्षण
16 Jan 2020 - 3:14 pm | bhagwatblog
प्रतिसादा साठी धन्यवाद ट्रम्प, किल्लेदार, गणेशा, श्वेता२४, पुणेकर भामटा, पियुशा!!
15 / 16 वर्षांची मुले तर तान्हाजी पाहताना हरकून जातात , कारण त्यांना फक्त तान्हाजी मालुसरेचां पराक्रम दिसत असतो , सिनेमातील उणिवा नाही >> कारण मुलांच्या भाषेत त्यांना तान्हाजी सुपर हिरो सारखा वाटतो.
माझी मुलगी ही कधीची ह्या शनिवार -रविवार ची वाट पाहत आहे. >> किती छान!!!
16 Jan 2020 - 3:22 pm | नरेश माने
चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हाच ठरवले होते हा चित्रपट नक्की पाहायचा. त्यामुळे रिलीज झाल्यावर शनिवारीच पाहिला. ऐतिहासिक घटनेची मांडणी या दृष्टीने पाहिल्यास चित्रपटात उणिवा दिसतील. पण चित्रपट म्हणून एक उत्कृष्ट चित्रपट बनविला आहे यात वादच नाही. चित्रपट गृहातील असे वातावरण अनेक वर्षानंतर अनुभवता आले. हा चित्रपट शक्य असल्यास थ्रीडी मध्येच पाहावा. थ्रीडी परिणामामुळे चित्रपट पाहताना वेगळाच अनुभव येतो.
16 Jan 2020 - 4:04 pm | वामन देशमुख
तान्हाजी चित्रपट नक्की पाहणार.
16 Jan 2020 - 8:58 pm | शशिकांत ओक
सिनेमा म्हणून उत्तमच आहे...
मिलिटरी कमांडरांच्या नजरेतून यातून ही लढाई मी लेखातून व व्याख्यानातून सादर करतो. म्हणून माझ्या आवडीबद्दल घरचेही उत्सुक होते. ऐतिहासिकतेला घरून काही विचार करायला लावणाऱ्या गोष्टी...
१. दिल्लीहून कोंढाण्याला गडकरी म्हणून निघणे.
२. शिरढोणकडून जाणार हे म्हटले आहे. शिरढोण हे भीमानदीच्या तीरावरील एक गाव पंढरपूरच्या जवळ आहे. उत्तरेतून पुण्यास येताना ते फार आडवळणी गाव आहे.
३. भीमा नदीचे पात्र म्हणजे समुद्रासारखे अथांग त्यात नावेवर लादलेली प्रचंड तोफ. मधेच जय एकलिंगजी म्हणणाऱ्या उदेभानाची वक्तव्ये त्याच्या मुसलमानी वेष, वर्तणूक याच्याशी मेळ
४. तानाजी गडावर पायी चढून आल्यावर एकदम आपल्या नेहमीच्या घोड्यावरून तोफेकडे जातो.
५. आधी तानाजीचा तलवारीचा म्हणजे उजवा तुटला. मग ढालीला हाताने लढताना ती ही तुटली. मग साखळीने बांधून तोफेसकट त्याचा मृत्यू वगैरे सिनेमॅटिक असल्याने भव्य व ३डीतून रोमांचकारी वाटतात.
६. महाराजांचे ऐन लढाईच्या धामधुमीनंतर सिंहगडावर आगमन...
७. तलवारी व अन्य शस्त्रे निर्मिती करताना, बनवताना दाखवलेले आवडले.
८. सुरवातीला सर्कसच्या लीलेने तारांच्या घसरणीतून दाखवलेली खिंडीतील लढाई.
९. एकट्याने उदेभानाशी भिडायला मॅकॅन्नाज् गोल्ड सारखा आंधळा सल्लागार आठवतो.
१०. भगव्यावेषात महाराजांना टरकवणारे तानाजीचे डायलॉग मारू.
19 Jan 2020 - 11:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपलं तान्हाजी चित्रपटाचं परिक्षण उत्तम झालंय. आता आमचे दोन शब्द.
चित्रपट पाहतांना, मला अजय देवगण सारखा ’दृश्यम’ मधला आठवत होता त्यामुळे मला स्वत:ला तान्हाजी पोहचलाच नाही. आम्ही पुस्तकात वाचलेले ’तानाजी मालुसरे’ डोक्यात घेऊन फ़िरत असल्यामुळे एक आधुनिक चित्रपट पाहतोय असेच वाटत राहीले. आधी लगीन कोंडान्याचं, मग रायबाचं असं म्हणनारा तानाजी भिडत नाही. उदयभान मात्र फ़ूल हवा करतो. अभिनय दोघांचा उच्च असला तरी सैफ़अली मात्र मार्क घेऊन जातो. शेवटची फ़ायटींग लैच हास्यास्पद झालीय. पण चित्रपट म्हणून हे सर्व ठीकच आहे, असे म्हणावे लागते. पळणारे मराठे पाहून ’कड्यावरचे दोर केव्हाच कापून टाकले आहेत, तुमचा बाप इथे मरुन पडलाय आन तुम्ही पळून जाताय असं म्हणूण मराठ्यात जोश भरणारा शेलारमामा दिसले नाही. अर्थात छायाचित्रण चांगलं आहे. राजे शिवाजी, आऊसाहेब. मावळे, बाकी, डोंगराच्या कड्याकपारी चढतांना मावळ्यांच्या ऐवजी आजकालची पोरं ट्रेकिंग करताहेत असे वाटले.
चित्रपटाले काही दोष सोडले तर चित्रपट मनोरंजन करतो. येत्या काळात इतिहासातील घटनांवर सिनेमे येत राहतील आणि त्यांना अच्छे दिन आहेत असे म्हणावे लागेल.
-दिलीप बिरुटे
19 Jan 2020 - 11:40 am | bhagwatblog
आपलं तान्हाजी चित्रपटाचं परिक्षण उत्तम झालंय.>> धन्यवाद सर!!!
प्रतिसादा बद्दल धन्यवाद प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, शशिकांत ओक, वामन देशमुख, आणि नरेश माने.
19 Jan 2020 - 1:21 pm | मुक्त विहारि
कधीच सोडून दिले आहे....
19 Jan 2020 - 6:03 pm | चांदणे संदीप
इथे लोक म्हणतात सिनेमा/चित्रपट म्हणून बघावा, ऐतिहासिक मांडणी वगैरे नाही. असं कसं शक्य होतं नेमकं? वांग्याचं भरीत छान होतं म्हणून त्याचं वांगं पराठा, दम वांगं, मक्के दी रोटी आणि वांग्याचा साग, वांगं सिझलर, स्टफ्ड वांगं असे प्रकार चालू आहेत, मणिकर्णिका, बाजीराव मस्तानी, पद्मावत, फर्जंद, पानीपत आणि आता तान्हाजी ही उदाहरणं.
बरं कॉप्या तरी नीट करा हॉलिवूडच्या. त्यातही घाईच! घनघोर निराशा.
दोन स्टार माझ्याकडून. एक 3D इफेक्टला, दुसरा सैफच्या डॅन्सला. दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड युवर हॉन्हर्स!
सं - दी - प
20 Jan 2020 - 7:31 am | दीपा माने
युट्युबवर नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या तेराव्या पिढीतल्या सुनबाई डाॅ. सौ. मालुसरे यांच्या म्हणण्याप्रमाणे छ. शिवाजीराजे राजगडावरच होते.
जेव्हा ठरल्याप्रमाणे कोंढाणा किल्ला जिंकल्याची त्यावरील होळी पाहुन राजे भेटायला आलेल्या शेलारमामा आणि इतर मावळ्यांना सामोरे गेले तेव्हा सर्वजण माना खाली घालुन उभे होते आणि सोबत एक पालखी उभी होती म्हणुन महाराजांनी पालखीचा पदर बाजुला सारून आत रक्त्ताने न्हाणेला नरवीर तान्हाजींचा मृत देह पाहिला तेव्हा महाराज दु:खाने म्हणाले ‘गड आला पण माझा सिंह गेला’असे म्हणुन स्वत:च्या गळ्यातली राजकवड्याची माळ काढुन ती नरवीरांच्या अंगावर घातली. ती राजकवड्यांची माळ अजुनही मालुसरेंच्या तेराव्या पिढीमध्ये पुजेत आहे. इथे न्युयार्कला हा चित्रपट १० जानेवारीलाच लागला आणि आम्ही उभयतांनी तो पाहीला आहे.
डाॅ.सौ. मालुसरेंच्या म्हणण्याप्रमाणे चित्रपटाचा शेवट दाखवताना दिग्दर्शकांनी प्रेककांना ध्यानात धरून स्वातंर्य घेतले आहे ते डाॅ.सौ. मालुसरेंना आधी सांगुनच. असो. जरी आपल्याला प्रायमरी शाळेत नरवीर मालुसरेंची ओळख झाली होती तरी सिनेमा हे करमणुकीचे माध्यम आहे तेव्हा जास्त उहापोह न करता त्याचा आनंद घ्यावा तसा आम्हीही घेतला. घरी आल्यावर कितीतरी वेळ आम्ही त्याकाळातच जणु वावरत होतो. अशी मनोवस्था फार क्वचितवेळा अनुभवण्यास मिळते. हा चित्रपट भरघोस यशात सर्वत्र चालला आहे त्याचा आनंद वाटतो
21 Jan 2020 - 1:46 am | सुमेरिअन
चित्रपट छानच झाला आहे. तानाजींवर एक high-बजेट हिंदी सिनेमा आला यातच खूप आनंद आहे.
खटकलेल्या गोष्टी -
१. अजय देवगणला तानाजींच्या रूपात पचवू शकलो नाही. लहानपणापासून तानाजींना एक भक्कम आणि पिळदार शरीरयष्टी असणारा नरवीर मावळा म्हणून इमॅजिन करत आलोय. अजय देवगणची शरीरयष्टी जुळली नाही. तो बाणा आणि मराठीपण पण त्याच्यात दिसलं नाही.
२. 'यशवंती' च्या ऐवजी घोरपडे बंधू??
३. साधूच्या वेषातला सीन नाही आवडला
४. उदयभानासमोर नाच??
५. शेलार मामा, सूर्याजींचा पराक्रम का गायब केला?
.
.
६. शिवाजी महाराज पहिल्यांदा पडद्यावर येतात तेव्हा जोरात ओरडावंसं वाटलं. पण इकडे अमेरिकेत ते करू शकलो नाही. नंतर पण एक दोन वेळ टाळ्या आणि शिट्ट्या वाजवाव्या वाटल्या, पण नाही वाजवू शकलो. थिएटर पूर्ण वेळ शांत होतं. :( अपूर्ण वाटलं. महाराष्ट्रात बघायला पाहिजे होता हा चित्रपट.
अजय केळकर परफेक्ट!
12 Feb 2020 - 10:59 am | चांदणे संदीप
तुम्हाला शरद देवगण म्हणायचंय का? ;)
सं - दी - प
12 Feb 2020 - 5:27 pm | विनिता००२
तुम्हाला शरद देवगण म्हणायचंय का? ;) >> हाहाहा वाचून एकदम ठ्ठो झाले :)
21 Jan 2020 - 2:59 pm | bhagwatblog
महाराष्ट्रात बघायला पाहिजे होता हा चित्रपट. >> +१
घरी आल्यावर कितीतरी वेळ आम्ही त्याकाळातच जणु वावरत होतो. अशी मनोवस्था फार क्वचितवेळा अनुभवण्यास मिळते. हा चित्रपट भरघोस यशात सर्वत्र चालला आहे त्याचा आनंद वाटतो >> +१
12 Feb 2020 - 5:42 pm | वामन देशमुख
चित्रपटाला माझ्याकडून पाच तारे *****