'सध्ध्याचा काळ मोठा कठीण आहे' हे वाक्य तुमचा सततच पाठलाग करायला लागले कि समजावे तुमची तारुण्याची गाडी उताराला लागली आहे. सहसा जगण्याची उस्तवार करताना जो संघर्ष करावा लागतो त्याचा आणि या वाक्याचा फारसा संबंध नसतो. पण जेंव्हा तुमच्या डीएनएचाच भाग बनून राहिलेल्या तुमच्या समजुतींना आता काही किंमत नाही हे कळायला लागते तेंव्हा एक वेळ अशी येते कि अगदी क्षुल्लक करणानेदेखील तुमच्या निग्रहाचा बांध फुटतो आणि ते सुरवातीचे वाक्य आपोआप तुमच्या ओठावर येते.
सुरवातीपासून सुरुवात करायची म्हटले कि प्राथमिक शाळेत विरुध्ध अर्थाचे शब्दांच्या जोड्या जेंव्हा शिकलो ते दिवस आठवतात. 'चांगले-वाईट', 'मऊ-कठीण' या शब्दांच्या बरोबरच एक जोडी येते ती म्हणजे 'सनातन-सुधारक'. यातला सनातन या शब्दाला तेंव्हा किंमत नव्हती. कर्मठ, विज्ञानाची कास न धरणारे, रोगाची साथ आल्यानंतर मरीआईचा गाडा गावाबाहेर नेऊन सोडणे वगैरे गोष्टी करणाऱ्या लोकांना उद्देशून हा शब्द वापरला जात असे. साहजिकच आगरकर, फुले, महर्षी कर्वे, वगैरे लोकांना युग पुरुषांचा मान होता.
स्वातंत्र्यनंतरच्या काळात अजून काही युग पुरुष होते पण सामाजिक बदलांमध्ये त्यांची भूमिका क्रांतिकारकांसारखी नव्हती. जसे कि रँग्लर परांजपे, डॉ. परुळेकर, शंतूनराव किर्लोस्कर, विक्रम साराभाई वगैरे. आपल्या कामाच्या निष्ठेने ते लोकांमध्ये आदरास पात्र ठरले होते. त्या काळची जनता देखील वेगळीच असावी. भिलईचा पोलाद कारखाना, भाक्रा नांगलसारखे प्रकल्प हेच आधुनिक भारताची तीर्थक्षेत्र असतील यावर त्यांचा दृढ विश्वास होता.
भाषा आणि संस्कृती या बाबत कुणालाही फारसा कळवळा नव्हता. संस्कृती हि प्रवाही असली पाहिजे आणि भाषेने आधुनिकतेचे आव्हान पेलले पाहिजे यावर व्यापक प्रमाणाव एकमत होते. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मेंदी आणि टिकली लावू दिली जात नाही हे नियम म्हणून सर्वांना मान्य होते. भाषा आणि संस्कृतीचे पाइक यांचा आवाज कोल्हेकुई पेक्षा फार मोठा नव्हता.
पण प्रत्येक कुत्र्याचे दिवस असतात या उक्तीप्रमाणे संस्कृती रक्षकांना देखील सुगीचे दिवस आले. सुधारक या शब्दाची चमक आता सनातन या शब्दाला आली आणि सुधारक मरतुकड्या कुत्र्यासारखे केविलवाणे झाले. मुलांनी भिकबाळी घालणे आणि मुलींनी नथ घालणे आता सर्वमान्य झाले. चांगल्या घरातील मुलं मुली दोन-दोन महिने चालणाऱ्या ढोल-ताश्यांच्या सरावांवर खर्च करू लागलीत. इतरत्र कालचक्राला सुसंगत बदलण्याचे आव्हान असेल. आम्ही मात्र कालचक्राची चाकं उलटी फिरवण्यात समाधानी आहोत.
प्रतिक्रिया
31 Dec 2019 - 6:44 am | सुधीर कांदळकर
अगदी खरे. आवडले. धन्यवाद.
31 Dec 2019 - 7:40 am | शा वि कु
ढोलताशा संस्कृतीचा भाग असला तरी एक आनंददायी क्रिया आहे, त्यामुळे काळाशी सुसंगत आहे.
शाळेमध्ये टिकली आणि बांगड्या हे तर आपण पाहतोच आहोत. तुमच मत पटलं, आणि स्पष्टपणा चांगला वाटला.
31 Dec 2019 - 1:58 pm | mrcoolguynice
लेख आवडला.
31 Dec 2019 - 4:48 pm | Rajesh188
भाषा आणि संस्कृती चा
संबंध अस्तित्वाशी जोडला गेला आहे.
लोकांना अशी भीती वाटते की आपली भाषा आणि संस्कृती नष्ट झाली की आपले अस्तित्व सुद्धा नष्ट होईल.
त्या मुळेच आताची परिस्थिती ओढवली आहे.
जगात स्थित्यंतर घडत आहेत प्रत्येक संस्कृती ला आणि भाषेला दुसऱ्या संस्कृती आणि भाषेची भीती वाटते.
2 Jan 2020 - 5:09 pm | mrcoolguynice
मुळीच नाही, आंग्ल भाषा/संस्कृती बऱ्यापैकी, दुसऱ्याचे जे चांगले ते ते आपुले म्हणून फोफावत आहेत.
(डोनाल्ड ट्रम्प सारखे संकुचित मनोवृत्ती सोडल्या तर.)
बाकी, जगातील एक क्ष पोटंशिअली महान संस्कृती/भाषागट सध्या,
"जे जे माझं , ते व तेव्हडेच महान" , मनोवृत्ती असलेल्या संघटनेच्या
जाळ्यात गुरफटला आहे, हे दुर्दैवी.
2 Jan 2020 - 5:11 pm | mrcoolguynice
बाकी, जगातील एक क्ष पोटंशिअली महान संस्कृती/भाषागट सध्या,
"जे जे माझं , ते व तेव्हडेच महान" , अशी क्झेनोफोबिक मनोवृत्ती असलेल्या संघटन व तीच्या चिल्ल्या पिल्या च्या जाळ्यात गुरफटला आहे, हे सध्याचे दुर्दैव.
2 Jan 2020 - 7:44 pm | स्वोर्डफिश
कालचक्र थांबल्याचेही वाटत नाही उलटं तर दूरच
3 Jan 2020 - 8:28 am | सुखीमाणूस
ढोल ताशामुळे ध्वनि प्रदुषण होते म्हणुन त्रास होतो हे पटते. पण त्यामुळे सनातनी पणा कसा वाढतो काय माहित?
आता बुरखा सक्ती आजुबाजुला पाहिल्यावर सनातनी भिकबाळी व नथी पर्यन्तच आहेत याचा आनन्द मानायला हवा.
काळजी करायची वेळ तेव्हा येइल जेव्हा नथी घालून सती जायला लागतील.
खर म्हणजे हल्ली खुप मुलीच ढोलताशा पथकात असतात ही मोठी सुधारणाच म्हणायला हवी.
3 Jan 2020 - 2:50 pm | सर टोबी
हे समजून घेण्यासाठी आपल्याला सनातनी म्हणजे कोण हे समजून घ्यावे लागेल. या बाबतीतली माझी व्याख्या अशी (आणि तशी तुमची असायलाच हवी हा आग्रह नाही):
यातील शेवटचा मुद्दा महत्वाचा आहे. यासाठी मी गुरु नानकांचे उदाहरण देतो म्हणजे फार गदारोळ होणार नाही. गुरु नानक एकदा नदीवर स्नानासाठी गेले असताना त्यांना एक व्यक्ती अर्ध्य देताना दिसते. गुरु त्यांना विचारतात तुम्ही हे काय करता आहात. त्यावर ती व्यक्ती सांगते कि मी माझ्या स्वर्गातल्या पितरांना पाणी पाजत आहे. यावर गुरु नानक नदीचे पाणी जोरात किनाऱ्यावर ढकलतात. तो माणूस विचारतो तुम्ही हे काय करता आहेत त्यावर गुरु नानक त्याला सांगतात कि मी थोड्या दूर अंतरावर असणाऱ्या माझ्या शेताला पाणी देत आहे. तो माणूस विचारतो असे शेताला पाणी देणं कसं शक्य आहे. त्यावर गुरु नानक त्याला म्हणतात कि जर तुमचे अर्ध्य स्वर्गातल्या पितरांना पोहचत असेल तर मी ढकलतो ते पाणी शेताला मिळायलाच हवे. आपल्याकडे देखील धर्माच्या बाबतीत अधिकारी व्यक्तींनी धर्माचे स्तोम माजवू नका असे सांगितले असताना देखील आपण परंपरा जोमाने पाळतो. यातील काही परंपरांना तर धार्मिक अधिष्ठान पण नाही!!
3 Jan 2020 - 9:29 am | mrcoolguynice
Ref: wikipedia
आज फक्त भिकबाळी/बुरखे पर्यंत मर्यादित सनातनशीलता,
उद्या कोणाला जिवंतपणी जळत्या चितेत ढकलायला कमी करणार नाही.(आजूबाजूला ढोल ताश्यांच्या गजरात)
3 Jan 2020 - 11:11 pm | Rajesh188
विभाजन आणि भीती समाजात आहे नाकारू शकणार नाही..
गाव पातळीवरचे विभाजन धर्मा वर भाषेवर नसतं आर्थिक आणि जातीवर असते.
लहान शहरात विभाजन
आहे.
ते जातीवर ,आणि आर्थिक क्षेत्र,खेडगाव अशा पातळीवर असतं.
मोठ्या शहरात.
जात बघितली जात नाही पण धार्मिक आणि भाषिक विभाजन तीव्र आहे हे नाकारणे म्हणजे मूर्ख पणाच आहे.
आणि धर्माची आणि भाषेची भीती ही मोठ्या शहरात तीव्र आहे.
जागतिक लेवल ला खंडीय,धार्मिक,विभाजन आहेच आहे .
आणि भीती आहे त्या मुळे संघर्ष पण आहे.
भीती ही अस्तित्व नष्ट होईल ह्याची आहे त्या मुळे कडवी आहे .
तत्व ज्ञान इथे काम करणार नाही.
जगात अस्तित्व टिकवण्यासाठी भाषा,प्रांत,धर्म,जात,आर्थिक लेवल हा भेद कधीच नष्ट होणार नाही.
मुंबई मध्ये गणपती उत्सव वर बंधन म्हणजे मराठी संस्कृती नष्ट होण्याची पहिली पायरी हीच भावना असते.
मशिदी वरील भोंगा बंद म्हणजे मुस्लिम अस्तित्व धोक्यात हीच भावना असते.
हिंदी मराठी ची दुश्मन आहे ही भावना फक्त अस्तित्व नष्ट होईल ह्याच भावनेतून तीव्र होते.
4 Jan 2020 - 2:55 pm | सर टोबी
हि बऱ्याच वेळेला विशिष्ट विचारसरणी तयार करण्याच्या प्रयत्नातून तयार होते. 'बघा तुमच्याच चालीरीतींना विरोध केला जातोय, तुम्हालाच अमुक करू नका असे सांगितले जाते' या प्रकारच्या प्रचारातून अशी भूमिका तयार होते. आणि त्यातून ध्रुवीकरण होते. जेंव्हा संस्कृतीला तुम्ही प्रवाही राहू देण्याचा हक्क प्राप्त करून देता (ज्यासाठी खरं तर काहीच करावं लागत नाही) तेंव्हा संस्कृती आपोआप चांगले बदल आत्मसात करते. उदाहरणच द्यायचे झाले तर आजकाल महाराष्ट्रीयन लग्नात देखील मेहेंदी आणि संगीत या गोष्टी रुळायला लागल्या आहेत. रंगपंचमी बाजूला पडून आता आपण होळी साजरी करतोय, आपल्या खाण्यापिण्यामध्ये कुर्मा, पराठा, इडली, डोसा हे पदार्थ सहजच केले जातायत.
थोडेसे जास्त लक्षपूर्वक तुम्ही निरीक्षण केले तर कितीतरी अचंबित होणाऱ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. हिंदूंची सौभाग्य लक्षणं जसे कि कुंकू, चुडा, मुंडावळ्या, बाशिंग तयार करण्याच्या व्यवसायात बहुतांशी मुस्लिम समाज आहे, लहान गावांमध्ये काही देवस्थानांचे पुजारीपण मुस्लिम लोकांकडे आहे, स्वयंपाकच काय पण धान्यदेखील ताजं दळलं जावं असं मानणाऱ्या हिंदूंमध्ये शेवया आनंदाने खाल्ल्या जातात. राजस फळ म्हणून ज्याला मान्यता आहे ते द्राक्ष हे मूळचे भारतीय फळ नाही.
संस्कृतीची देवाण घेवाण विरुध्ध दिशेनेपण आहे. हिंदुबहुल भागात मुस्लिम हिंदूंचे उपवास करतात किंवा त्या दिवशी मांसाहार वर्ज्य करतात, ओटी भरण्याची पद्धत आणि काही दागिने परिधान करणे मुस्लिमांनी स्वीकारले आहे. तेंव्हा सनातनी असण्याची निवड आणि निकड हि सर्वस्वी वैयक्तिक आहे.
4 Jan 2020 - 7:55 pm | शा वि कु
अगदी बरोबर.
4 Jan 2020 - 10:08 pm | mrcoolguynice
सहमत, आणि अशी ही "सनातनी असण्याची वैयक्तिक
निवड / निकड , जेव्हा राजधर्म म्हणून, जनतेवर लादली जाते, त्याला फॅसिस्ट वृत्ती म्हणतात.
6 Jan 2020 - 1:09 pm | सुखीमाणूस
म्हणजे सगळे छान चालले आहे,
बुरखा सक्ती झाली तरी जशी कडवेपणा वाढायची भीती वाटत नाही त्याच चश्म्यातुन भिक्बाळी आणी नथी कडे पहायला लागा मग काही मानसिक त्रास वाटणार नाही.
बुरखे शिवुन शिम्पी पैसे मिळवतायत आणी नथी विकुन सोनार. तेवढाच अर्थव्यवस्थेला हात्भार...
6 Jan 2020 - 6:39 pm | मुक्त विहारि
एकदम चपखल.
6 Jan 2020 - 10:46 pm | सर टोबी
सहसा आपल्या हयातीपुरते जे वास्तव आहे तेच त्रिकालाबाधित सत्य आहे असे समजण्याची साहजिक प्रवृत्ती असते. तसे नसते तर काहीशे वर्षांपूर्वी ज्यांनी अस्पृश्यता पाळली आणि आता ज्यांच्या पिढ्या आरक्षणाचे चटके सहन करीत आहेत त्या पूर्वजांनी तसं करण्याचा प्रयत्न देखील केला नसता. कुणास ठाऊक, परंतु भविष्यात सनातनी आणि सुधारक यांच्यातला वाद रस्त्यावर सोडविला जाऊ शकतो. आणखी एक. सश्रद्ध असाल तर कर्माच्या सिध्दान्ताची आठवण करून देतो: गायींच्या कळपात वासरू जसे बरोब्बर आपल्या आईला शोधून काढते तसे आपली कर्म बरोब्बर आपला पाठलाग करतात. तेंव्हा सनातनी असण्याची निवड आणि निकड एकदा तपासून घ्याच.
7 Jan 2020 - 6:56 am | सुखीमाणूस
सर्वच विचारान्चा मध्य गाठायला हवा.
जर देवळातून फतवे निघाले कि नथी व भिकबाळी घालायलाच हवी तर काळजी केली ठीक आहे.
पण उत्सव प्रिय समाज जुन्या व नव्या गोष्टी एकाचवेळी स्वीकारत आहे हे कुठेही सनातनी पणा वाढत नसल्याचे प्रतिक आहे.
7 Jan 2020 - 9:50 am | mrcoolguynice
रोगाची लक्षणे प्राथमिक अवस्थेत असताना रोगावर उपचार सुरू करावयास हवे (ब्रोकन विंडो थियरी),
की रोगाने कर्करोगाप्रमाणे विळखा घातल्यावर ऍडव्हान्स स्टेज मधे उपचार सुरू करावे, हे ठरवायला हवे...