माझे हे परीक्षण वाचण्याआधी महत्वाची सूचना:
मी पानिपत "चित्रपटाचे" हे परीक्षण लिहिले असून खरोखर घडलेले पानिपत युद्ध आणि त्या संदर्भातील इतिहासातील खरेखोटेपणा याचे परीक्षण लिहिलेले नाही आणि त्याबद्दल लिहिण्याची माझी पात्रताही नाही, याची कृपया नोंद घ्यावी. ऐतिहासिक, पौराणिक, बायोपिक, फँटसी आणि सत्य घटनांवर आधारित, तसेच सत्य-असत्य मिश्रण (फॅक्ट-फिक्शन) असेलेले मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे चित्रपट/सिरीयल मी जरूर बघतो (असोका, 300, टायटॅनिक, सिरीयाना, पद्मावत्त, फर्जंद, फत्तेशिकस्त, बाजीराव मस्तानी, पोरस, बाहुबली, अलेक्झांडर, सूर्यपुत्र कर्ण वगैरे) आणि महत्वाचा मराठी इतिहास पडद्यावर मांडणारा हा चित्रपट असल्याने अर्थातच हा चित्रपट सुद्धा मी रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी (७ डिसेंबर) बघितला. पण वेळेअभावी चित्रपट परीक्षण लिहायला एक दिवस उशीर झाला म्हणजे 8 डिसेंबर (रविवार). तोपर्यंत बऱ्याच वाचकांनी मला विचारणा केली की माझ्याकडून परीक्षण कधी येईल, शेवटी लिहायला घेतले. आणि हो, अजून पर्यंत मी विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी वाचली नाही, पण वाचणार आहे! चित्रपट बघतांना पेशवे आणि त्यांच्या इतिहासाबद्दल थोडा तरी होमवर्क केलेला असला पाहिजे नाहीतर काही गोष्टी समजणार नाहीत!
आधी पानिपत चित्रपटाभोवती असलेले काही वादग्रस्त मुद्दे बघूया:
ट्रेलर रिलीज झाल्यापासून विविध विवादांत अडकलेला पानिपत चित्रपट अखेर 6 डिसेंबरला प्रदर्शित झाला. अर्जुन कपूरला सदाशिवराव पेशवे यांच्या भूमिकेसाठी निवडल्याबद्दल दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचेवर टीका झाली, तसेच पानिपत कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी त्यांच्यावर कथा चोरीचा आरोप केला, पानिपत नेमका कोणत्या ऐतिहासिक कालखंडावर आधारित आहे हे माहिती नसतांना काहींनी तो पद्मावत आणि बाजीराव मस्तानीचा मिक्स चित्रपट आहे अशा प्रकारच्या टीका केल्या. तसेच कुठेतरी मी बातमीत वाचले की अहमदशाह अब्दाली भारतात आला तेव्हा तो फक्त 25 वर्षांचा होता आणि त्याच्या भूमिकेत संजय दत्त खूप थोराड वाटतो त्यामुळे या गोष्टीसाठी पात्रनिवड करणाऱ्यावर टीका झाली पण याबद्दलचे नेमके सत्य असत्य काय हे मला माहिती नाही.
पानिपतबद्दल इतरांनी केलेल्या परीक्षणाबद्दल थोडेसे सांगून परीक्षणाला सुरुवात करतो:
चित्रपट बघण्याआधी मी अनेक परीक्षण वाचले आणि युट्यूबवर बघितले. काही परीक्षण हे मुद्दाम आकस बुद्धीने विरोधासाठी विरोध म्हणून केलेले दिसले जसे की तीन तास खूप बोअर होतात, एकही लक्षात राहण्यासारखा डायलॉग नाही, गाणे आणि संगीत चांगले नाही असे बोलले जाऊ लागले पण मला चित्रपट पाहिल्यावर या तिन्ही गोष्टी खोट्या असल्याच्या आढळून आल्या. संगीत (गाणे आणि पार्श्वसंगीत) अतिशय छान आहे, चित्रपट मुळीच बोअर होत नाही (उलट मला वाटत होते की एवढ्यात चित्रपट कसा संपला?) आणि लक्षात राहण्यासारखे अनेक डायलॉग आहेत. चित्रपटगृहात हर हर महादेव, सदाशिवराव पेशवा की जय अशा घोषणा ऐकू येतात तसेच एकदा नव्हे तर अनेकदा प्रेक्षकांतून शिट्ट्या आणि टाळ्या येतात. एका गाण्यात सर्वजण शिवाजी महाराजांची आठवण तबकात त्यांची पगडी ठेऊन करतात तेव्हा चित्रपटगृह शिवाजी महाराज की ज्जय या घोषणांनी दुमदुमून जाते.
काही डायलॉग सांगतो:
गोपिकाबाई पार्वतीबाईला भर लग्नात टोमणा मारतात:
"बिल्ली भी इतनी फुर्ती से सीढी नही चढती!" म्हणजे पार्वती ही एका सामान्य वैद्यांची मुलगी असून तिने सदाशिव सारख्या पेशव्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले अशा (गैर)समाजातून केलेली ही टीका असते.
तसेच -
"जिस दिल्ली ने छत्रपती शिवाजी महाराज का अपमान किया था, आखिर वह दिल्ली मराठो ने जीत ली!"
दत्ताजी: "बचेंगे तो और भी लढेंगे!"
दिल्ली जिंकल्यानंतर जेव्हा दिल्लीच्या गाडीवर बसण्यासाठी पार्वतीबाई सदाशिवराव यांना आग्रह करते तेव्हा ते म्हणतात:
"मै राजनीती के लिये नही, युद्ध के लिये बना हूं!"
आणि खालील काही डायलॉग:
मल्हारराव होळकर: "यहां सब है, मराठा, पंजाबी, मुसलमान वगैरा है, लेकीन हिंदुस्तानी कोई नहीं है!"
आणि
सदाशिवराव: "अपनी संख्या बढा नही सकते पर दुश्मन की संख्या तो कम कर सकते है!"
मराठ्यांचा जोश पाहून घाबरून अब्दाली सैन्य माघारी येते तेव्हा त्या सैन्याला स्वत: अब्दाली कापतो तेव्हा तो टिपिकल संजय दत्त टाईप डायलॉग मारतो:
"अगर भाग कर वापस आओगे तो एक एक का पीछा करके मै सबको मार दूंगा, वापस जाओ और लढो!"
आणखी एक:
अर्जुन कपूर: "युद्ध से किसीका भला नही हुवा!"
संजय दत्त: "सिर्फ ये बात समझने के लिये तुम पुणे से पानिपत तक आये!"
कलाकार आणि अभिनय:
अर्जुन कपूर अभिनयात बराच कमी पडत असला तरी एकूण चित्रपटात, त्यातील कलाकारात आणि कथेत तो सहज सामावून जातो. चित्रपटात ७० टक्के मराठी कलाकार आहेत. संजय दत्त ने भूमिका चांगली वठवली आहे. या चित्रपटात अभिनयाच्या बाबतील आश्चर्याचा सुखद धक्का जर कुणी दिला असेल तर तो म्हणजे कृती सेनॉन हिने! अपेक्षा नसतांना अभिनयाची तिने कमाल केली आहे. सहज सुंदर अभिनयाने तिने मने जिंकली आहेत. शेवटी सदाशिवराव युद्धात धारातीर्थी पडत असतात तेव्हा केवळ आणि केवळ तिच्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव आणि अश्रू हे बघून आपल्याला भावनिक वाटायला लागते. असाच दमदार अभिनय ठाकरे चित्रपटात जेव्हा तुरुंगातून बाळासाहेब ठाकरे मीनाताई (अमृता राव) यांना पत्र पाठवतात आणि ते पत्र वाचतांना अमृता राव ने चेहऱ्यावर बदलत जाणारे जे भाव दाखवलेत त्याची आठवण आल्यावाचून रहात नाही. मोहनीश बहल नानासाहेब पेशवे आणि अभिषेक निगम विश्वास राव यांच्या भूमिकेत अगदी शोभून दिसतात. रवींद्र महाजनी आणि गश्मीर महाजनी हे दोघेही (पिता पुत्र) यात आहेत. मिलिंद गुणाजी आहे पण खूप छोटी भूमिका आहे. झीनत अमान आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या भूमिका छान. मस्तानीचा मुलगा समशेर, तोफ प्रमुख गारदी आणि नजीब हे पण लक्षात राहतात. शुजा-उद-दौला पण त्याच्या घोगऱ्या आवाजामुळे लक्षात राहतो.
कथेतील बेट्रायल किवा विश्वासघाताबाद्द्ल:
चित्रपटाच्या शिर्षाकाबाबत सांगायचे झाले तर: पानिपतच्या पुढे एक लाईन आहे - "द ग्रेट बेट्रायल" म्हणजे "प्रचंड विश्वासघात" हे कथेत योग्य पद्धतीने मांडले आहे. मराठ्यांना पुण्याहून दिल्लीकडे अब्दालीच्या सेन्याशी लढायला जातांना रस्त्यात त्यांच्या मांडलिक राजांकडून सैन्य, आर्थिक आणि अन्नधान्य मदत मिळत जाते पण त्यापैकी तीन राजांकडून त्यांना धोका मिळतो. दोन वेळेस मराठा सैन्याला त्याचा सुगावा लागून जातो पण तिसऱ्यांदा ऐन युद्ध सुरु असतांना विश्वासघात होतो. तिन्ही विश्वासघातांची कारणे वेगवेगळी असतात. म्हणून प्रचंड मोठा विश्वासघात असेलेली कथा! तसेच या कथेत आणखी दिल्लीतील राजकारणाचा अंतर्गत विश्वासघात पण आहे आणि अब्दालीसोबत त्याच्यात देशात होत असलेला विश्वासघात पण दाखवलेला आहे. पानिपतची कथेची पार्श्वभूमी आणि घडामोडी खूप किचकट, गुंतागुंतीच्या असूनही कथा साधी सोपी आणि सरळ करून पडद्यावर आशुतोष गोवारीकर यांनी मांडली आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन! एकूण या सिनेमात चार ते पाच वेळा आश्चर्याचे धक्के देणारे प्रसंग आहेत!
कथेबद्दल अगदी थोडक्यात सांगतो:
चित्रपटाच्या सुरुवातीला सदाशिवराव आणि राघोबादादा हे दक्षिणेतील उरल्यासुरल्या निजामशाहीचा पाडाव करून येतात. नंतर पेशव्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे सदाशिवराव यांची निवड सेनापती ऐवजी धन मंत्री म्हणून होते. दिल्लीतील नजीब जंगच्या सांगण्यावरून एक लाख सैन्यासह अफगाणीस्तानहून येणाऱ्या अब्दालीच्या आक्रमणाची चाहूल जेव्हा मराठ्यांना लागते तेव्हा पुण्याहून फक्त चाळीस हजाराचे सैन्य घेऊन राघोबादादा यांना नानासाहेब जायला सांगतात तेव्हा राघोबादादा नाही म्हणतात, पण सदाशिवराव एवढ्या कमी सैन्यासह तयार होतात कारण उत्तरेतील मांडलिक राजे सैन्य-मदत देतीलच हा त्यांना विश्वास असतो. सोबत विश्वास राव तसेच पार्वतीबाई आणि इतर बायकापण जातात. इतर अनेक कुटुंब पण सोबत जातात. प्रवासादरम्यान अनेक राजांच्या भेटी घेऊन मदतीचे आश्वासन घेऊन झाल्यावर मराठा सैन्याचा आमना सामना अब्दाली आणि शुजा यांच्या एकत्रित सैन्याशी अनपेक्षितरित्या रोहिला येथे होतो पण मध्ये असते खळाळती यमुना नदी! प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे सैन्यासह आणि लवाजम्यासह यमुना पार करणे अशक्य असल्याने त्यांच्या सैन्याला चकवून मराठा सैन्य नदीपात्राच्या कडेने दिल्लीकडे कूच करून एका घटनेमुळे अस्थिर झालेली दिल्ली जिंकतात आणि आणखी पुढे कुंजपुराकडे जाण्याआधीच अब्दाली सैन्य हत्तीवरून यमुना पार करून मागोमाग आलेलं असतं. तिथे पानिपतचं मैदान असतं आणि युद्ध सुरु होण्याआधी अब्दालीचा मुलगा तैमुर अफगाणीस्तानहून बातमी आणतो की तिथे अब्दालीच्या सिंहासन बळकावण्याच्या हालचाली सुरु आहेत म्हणून अब्दाली युद्ध न करता परत जायचे ठरवतो आणि सदाशिवराव यांचेशी तह करण्यासाठी काही अटी समोर ठेवतो. मग पुढे काय होते ते पडद्यावर बघा.
शेवटच्या अर्ध्या तासाच्या पानिपत युद्धाबद्दल थोडे सांगतो:
आशुतोषने स्पेशल इफेक्टचा भरपूर वापर करण्याचे टाळले आहे आणि त्यामुळे युद्ध प्रसंग अगदी जिवंत झालेत. स्लो मोशन प्रसंग खूप वेळ दाखवण्याचा मोह त्याने टाळला आहे, हे खूप चांगले झाले. 300 या हॉलिवूड युद्धपट मध्ये तसेच बाहुबली युद्धामध्ये खूप स्लो मोशन प्रसंग आहेत. युद्धातील अनेक बारकावे आशुतोषने दाखवलेत. युद्धनीती पण यात दाखवली गेली आहे. युद्ध प्रसंग खूप थरारक आहेत, अंगावर काटा येतो. युद्धात भाग न घेतलेली कुटुंबे आणि बायका पानिपतच्या किल्ल्यावर सुरक्षित असतात तेव्हा तिथे अब्दालीचे सैन्य हल्ला करते तेव्हा पार्वतीबाई सुद्धा लढते. एकूणच शेवटचा अर्धा तास थरारक आहे!
माझे रेटिंग:
चित्रपटाची लांबी जास्त आहे म्हणून कदाचित माझे परीक्षण पण लांबले असे वाटते. चांगले संगीत, किचकट विषय असूनही पडद्यावर सरळ सोप्या पद्धतीने मांडलेली कथा, 90 टक्के कलाकारांचा चांगला अभिनय, भव्य सेट, थरारक युद्धा प्रसंग यामुळे या चित्रपटाला मी पाच पैकी चार स्टार रेटिंग देतो. चित्रपट जरूर बघा!
(लेखन दिनांक: 8 डिसेंबर 2019, रविवार)
- निमिष सोनार, पुणे
sonar.nimish@gmail.com
प्रतिक्रिया
8 Dec 2019 - 9:32 pm | ट्रम्प
चित्रपट पाहण्याचे डोक्यात होतेच पण तुमच्या नेमक्या परीक्षणामूळे कधी पहायला जातोय असे झाले आहे .
विशेष म्हणजे तुमचे परीक्षण आवडण्याचे कारण की पानिपत मध्ये तुमचा आवडता कलाकार चिन्मय मांडलेकर नाहीये
: ) :)
कृ ह घ्या .
8 Dec 2019 - 9:50 pm | जॉनविक्क
१) मराठे जुलमी बनले होते, जे मुघलांनी आपल्या मुलखात केले तेच मराठ्यांनी उत्तरेत केले (स्त्रियां वरील प्रत्यक्ष अत्याचार हा गुन्हा सोडून)
२) खिशात अन्नाचा कण उरलेला नसताना नेतृत्वाने पुढे सरकायचा निर्णय घेतला ते सुध्दा दुप्पट सैन्य समोर ठाकले असताना.
३) अडचणींच्या काळात मदत करायला तयार असणाऱ्या उत्तरेतील राजांना त्यांचा मान नाकारण्यात आला म्हणून ते मागे हटले
४) शरद पवासाहेब त्यावेळी असते तर चित्र च वेगळे दिसले असते
५) आशुतोष गोवारीकर ९० च्या दशकातील नुक्कड टाईप सिरियलच बनवायच्या लायकीचा दिग्दर्शक आहे
६) गोवारीकर प्रदीर्घ व कंटाळवाणे चित्रपट बनवतो त्याच्याकडे आधुनिक व रोचक सादरीकरणाचा खडखडाट आहे, निवृत्ती घ्यावी अथवा सीरिअल्स मधे नशीब आजमावे कदाचित त्याची चलती होईलही
७) अर्जुन कपूर बंडल आहे
८) चित्रपटात हाणामारी ची दृश्ये इतकी बकवास चित्रित केली आहेत की तुलनेने लो बजेट फत्तेशिकस्त तांत्रिदृष्ट्या सरस ठरावा.
९) पानिपत स्त्री मुळे झाले नाही पण प्राभव त्यांच्यामुळेच
१०) इतके दिवस पानिपतचा अभिमान वाटत होता चित्रपट बघून मत हलके झाले
गोवारीकर बेटर यु रिअली शट अप!
8 Dec 2019 - 11:41 pm | रमेश आठवले
'जेव्हा दिल्लीच्या गाडीवर बसण्यासाठी पार्वतीबाई सदाशिवराव यांना आग्रह करते'
गाडीवर च्या ऐवजी गादीवर असे वाचावयास हवे.
9 Dec 2019 - 7:59 am | विजुभाऊ
चांगले लिहीलय परिक्षण. पिक्चर पहावा की कसे या विचारात होतो.
परिक्षण वाचून "पहावा " हे मत बळावले आहे
31 Dec 2019 - 3:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्रपट परीक्षण उत्तम झालं आहे. चित्रपट पाहावा असे वाटत आहे. आभार. चित्रपट पाहिल्यावर सांगेन की चित्रपट कसा वाटला ते.
आभार. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
9 Dec 2019 - 10:11 am | मनो
> प्रवासादरम्यान अनेक राजांच्या भेटी घेऊन मदतीचे आश्वासन घेऊन झाल्यावर मराठा सैन्याचा आमना सामना अब्दाली आणि शुजा यांच्या एकत्रित सैन्याशी अनपेक्षितरित्या रोहिला येथे होतो पण मध्ये असते खळाळती यमुना नदी!
हा यॉर्कर डोक्यावरून गेला.
>"जिस दिल्ली ने छत्रपती शिवाजी महाराज का अपमान किया था, आखिर वह दिल्ली मराठो ने जीत ली!"
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आग्ऱ्यात झाला होता, दिल्लीत नव्हे, त्यामुळं असल्या डायलॉगमधील हवाच निघून जाते.
ट्रेलरमध्ये ग्रीक सैन्याच्या धर्तीवर चिलखतवाले Phalanx मराठे पाहिल्यावर लढाई पाहण्याचा मूडच मेला.
असले खडे घासा-घासाला लागले, तर तीन तास काढणे अशक्य आहे. त्यामुळं 'फारएंड' शैलीतील परीक्षण येईपर्यंत आपला पास.
9 Dec 2019 - 2:22 pm | बबन ताम्बे
सहमत. विश्वास पाटलांच्या पानिपत मध्ये अब्दाली मराठ्यांना उघड्या पाठीचे म्हणतो. आंतरजालावर त्यावेळच्या एका मराठी सैनिकाचे चित्र आहे. हातात तलवार आणि कमरेला फक्त धोतर , वरती उघडाच. चिलखत वगैरे "लक्झरी" सामान्य सैनिकाला असेल की नाही शंकाच आहे :-)
मी अजून पानीपत पाहिला नाही.
21 Dec 2019 - 10:56 pm | खटपट्या
त्या चित्राची क्रुपया लिन्क द्या.
21 Dec 2019 - 11:21 pm | बबन ताम्बे
https://www.newworldencyclopedia.org/entry/Maratha_Empire
23 Dec 2019 - 2:00 am | मनो
अजून एक
9 Dec 2019 - 12:25 pm | bhagwatblog
अतिउत्तम आणि तपशीलवार परीक्षण!!! इतिहास म्हणाला की वाद, विसंवाद आलाच. अश्या वेळेस मी कथे कडे कमी आणि मांडणी, सादरीकरण, अभिनय, चित्रपटातील संदेश हेच बघतो. मांडणी, सादरीकरण, अभिनय, चित्रपटातील संदेश उत्तम असतील तर बघायला हरकत नाही.
10 Dec 2019 - 10:07 am | प्रियाभि..
ऐतिहासिक चित्रपट फक्त मांडणी, सादरीकरण पाहायला जायचे नसतात. खरा इतिहास काय आहे आणि त्यातून (इतिहासातून.. दिग्दर्शकाच्या डोक्यातील नव्हे) संदेश काय मिळतो हे पाहणे महत्त्वाचे. सादरीकरणासाठी बाहुबली सारखे काल्पनिक चित्रपट योग्य. वाद विवाद आहेत म्हणून इतिहासाकडे कानाडोळा करणे योग्य नाही. मुळात वाद होण्याइतपत इतिहासात मोडतोड का करतात हे लोक हेच समजत नाहीय.
9 Dec 2019 - 1:10 pm | हस्तर
शेवटी एक आराधक सिन्घ दाखव्लाय पण त्याचा आन्तर जालावर सन्दर्भ कुथेच साप्दत नाहिये
9 Dec 2019 - 7:15 pm | जॉनविक्क
मोबाईल ऑटो करेक्ट वाट लावते लिखाणाची, वेगळा कीबोर्ड का ट्राय मारत नाही ? तसेही मराठी voice typing उपलब्ध आहे च मोबल्या वर
9 Dec 2019 - 9:24 pm | mrcoolguynice
कदाचित त्यांनी मराठी voice typing चाच ट्राय मारला असेल,
परंतु समजा एखाद्याच्या प्राशनात, स्ट्रॉंग द्रव पदार्थ आला, की जिभेला आलेला जडपणा, लवकर कमी होत नाही, तसं काही असावं की काय ?
10 Dec 2019 - 12:05 pm | हस्तर
आपलि पात्रता प्रशन्च्चे उत्तेर देणाय्त दख्वावि
10 Dec 2019 - 2:24 pm | mrcoolguynice
आपलया यवड्या पात्तरतेचा हा स्तर अमाला कदिचे दख्वाविता एनर णाय्त.
10 Dec 2019 - 9:58 am | प्रियाभि..
परीक्षण चित्रपटासारखेच आहे. चांगले की वाईट हे ज्याचे त्याने समजून घ्यावे. मुळात मराठ्यांचा इतिहासच इतका रोमांचक आहे की त्याला नाटकी करण्याची गरज नसते. आहे तसा इतिहास दाखवला तरी पुरे! ऐतिहासिक चित्रपटात कल्पनिकाता घुसडताना बरीच काळजी घ्यावी लागते. एका एका प्रसंगाने, वाक्याने किंवा शब्दानेही इतिहासाला धक्का लागू शकतो. आशुतोष गोवारीकरला हे तितकसं जमत नाही. भन्साळी यापेक्षा कितीतरी तयारीचा आहे.
10 Dec 2019 - 10:24 pm | जॉनविक्क
http://www.kaustubhkasture.in/2019/12/blog-post_8.html?fbclid=IwAR1dDEow...
दिग्दर्शकाने किमान या बाबी ध्यानात घ्यायला हव्या होत्या. असो.
11 Dec 2019 - 10:09 am | mrcoolguynice
ह्याट... ह्याही पेक्षा तोलामोलाचा मनुष्य मिपावर वावरत असताना, कोण हा कौ ? त्यापेक्षा
पानिपत चित्रपटाचे चे परीक्षण व कथा समजवुन सांगावी, अशी मी अ कुलकर्णी यांना विनंती करतो.
11 Dec 2019 - 11:04 am | निमिष सोनार
वाचणार आणि मग नंतर नावे ठेवणार....
असो.
सूचना अशी होती:
मी पानिपत "चित्रपटाचे" हे परीक्षण लिहिले असून खरोखर घडलेले पानिपत युद्ध आणि त्या संदर्भातील इतिहासातील खरेखोटेपणा याचे परीक्षण लिहिलेले नाही आणि त्याबद्दल लिहिण्याची माझी पात्रताही नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
11 Dec 2019 - 12:44 pm | mrcoolguynice
ओ निमिशजी तुमचा लेख छानच आहे.
कौस्तुभ म्हणून कुणाच्या तरी लिंक ऐवजी अकुजी चा लेख म्हणालो.
11 Dec 2019 - 1:06 pm | जॉनविक्क
12 Dec 2019 - 5:19 pm | ट्रम्प
जाम बोअर झाले पानिपत बघताना !!!!
त्या पेक्षा बाजीराव मस्तानी आणि पदमावत लाख पटीने भारी .
इथून पुढे गोवारिकर चे पिक्चर बंद .
12 Dec 2019 - 6:27 pm | अभिदेश
पण पसन्द अपनी अपनी...
14 Dec 2019 - 9:28 am | ट्रम्प
मी मुलांना फक्त ऐतिहासिक सिनेमे दाखवण्याच्या अटीवर मॉल मध्ये नेत असतो , खान गॅंग साठी आज पर्यंत गेलो नाही .
त्यातल्या त्यात अक्षय कुमार , रितीक रोशन चे आणि उरी वैगेरे .......
पण पानिपत मध्ये होत काय की पार्वती बाई ज्या एक सुराने फ्लॅशबॅक मध्ये जाऊन पानिपत ची माहिती सांगत असते ते कंटाळवाणे होते .
त्यात गोवारीकर चे सादरीकरण खूपच तकलादू , अर्जुन कपूर ने सुद्धा एकच सूर लावून संवाद म्हणून सदाशिवराव रावच्या भूमिकेचे कमी केलेले महत्व आशा अनेक गोष्टीमुळे पानिपत मनावर ठसा उमटवू शकला नाही .
पानिपत मधील शोकांतिका आपल्याला पहावणार नाही म्हणून इतक्या दिवस टाळत होतो , पण मराठी दिग्दर्शक , मराठयांच्या पराक्रमाची गाथा म्हणून 2000 रु ची फोडणी देऊन आलो ............
शिवाय किमान 200 आसन क्षमता असलेल्या स्क्रीन हॉल मध्ये मोजून 50 / 60 प्रेक्षक ते सुद्धा संध्याकाळ च्या शो ला .......
18 Dec 2019 - 12:18 pm | अभिदेश
जेव्हा तुम्ही पद्मावत आवडल्याचे म्हणता , तेव्हा मला हेच म्हणावेसे वाटते. प्रत्येक दिग्दर्शकाची एक शैली असते , जर तुम्ही आशुतोशच्या चित्रपटात रोहित शेट्टी श्टाईल फायटिन्गची अपेक्षा करत असाल तर ते नाही मिळ्णार. एक तर पानिपतचा विषय मोठ्या पडद्यावर आण्ण्याच धारिष्ट्य त्याने दाखवले हिच मोठी गोष्ट आहे. माझ्या मताप्रमाणे तो चुकला ते पात्र निवडित. जर त्याने मोठा सितारा (मझ्या मते रितिक) जर घेतला असता तर मोठा फरक पडला असता. पण मोहेन्जोदारो मुळे रितिक तयार नसेल झाला. आशुतोशच्या ह्याच शैलीचे स्वदेस , जोधा अकबर लोकानी डोक्यावर घेतले होतेच. ईथे फरक पडलाय तो मोठी स्टार कास्ट नसल्यामुळे.
19 Dec 2019 - 12:34 am | जॉनविक्क
स्टारकास्ट मुळे तरून गेला अन यावेळी तरी त्याला ते कळले असेल की तो बंडल आहे ते
19 Dec 2019 - 5:41 pm | अभिदेश
शब्द दुसर्याच्या तोन्डी घालु नका. आधिच म्हट्ले आहे पसन्द अपनी अपनी. तसही बिन्डोक साजिद खानचे चित्रपट आवडणारे लोक आहेतच.
19 Dec 2019 - 5:44 pm | जॉनविक्क
आणि मग माझी वाक्ये आणि तुमची वाक्ये लिहा, फरक स्पष्ट होईल आपोआप सगळ्यांनाच.
साजिद खान फडतूस आहे
19 Dec 2019 - 6:46 pm | अभिदेश
सगळ्याना कळ्ला आहे , तुम्हाला कळला नसेल तर तेव्हड्या खालच्या लेवलवर मला नाही येता येणार...तुम्ही तुमची लेवल वाढवा .. :-)
20 Dec 2019 - 4:46 am | जॉनविक्क
हवा येउद्या!
20 Dec 2019 - 11:58 am | अभिदेश
हवेत उडुन गेलात तर मिपावर जिथे तिथे प्रतिक्रिया कोण देणार... :-)
20 Dec 2019 - 12:07 pm | जॉनविक्क
हवा येऊ द्या
20 Dec 2019 - 12:21 pm | जॉनविक्क
साजिद खानच्या चपला उचलायची पण नाही
20 Dec 2019 - 12:24 pm | अभिदेश
एवढ्या फाटक्या चपला कोण उचलणार... तुम्ही उचलता की काय ? :-)
13 Dec 2019 - 1:50 pm | हस्तर
एवढ्या लोकांनी चित्रपट बघतील ,मला कोणी सांगेल का शेवटी जो राजा होता आराधक सिंग त्याचा इतिहासात उल्लेख कुठे सापडेल
14 Dec 2019 - 8:05 am | मनो
तुम्ही इतकं शुद्ध लिहिण्याचे कष्ट घेतले म्हणून सांगतो. मी सिनेमा पाहिलेला नाही (कारण पहावला नाही). पानिपत या विषयाबद्दल गेली ७-८ वर्षे संशोधन करतो आहे, त्या माहितीतून उत्तर देतो.
आला सिंग जाट असं ते नाव असावं, अराधक सिंग नव्हे. आला सिंग हा पतियाळा संस्थानचा पहिला राजा, तिथला स्थानिक जमीनदार म्हणा ना. भाऊ संकटात असताना त्याला उत्तरेकडून म्हणजे पंजाबातून रसद पुरवठा होत असे. त्यासाठी कर्नालच्याही उत्तरेस गरणाळ्यास २,००० स्वार पाठवले असा उल्लेख भाऊसाहेबांची कैफियत मध्ये आहे. तिथून हे स्वार धान्य, गवत म्हणजे कही अनंत असत, आणि अब्दाली त्यावर हल्ले करत असे. भाऊ त्याचा रोख आणि उत्तम मोबदला देत असे, म्हणून 'भाऊकी लूट' (अचानक मिळालेलं घबाड) असा वाक्प्रचार तिकडे प्रचलित होता.
लढाईनंतर भाऊ जर वाचून उत्तरेकडे गेला असेल तर पंजाबात मराठ्यांना मदत करणारा आला सिंग त्यांना जरूर आश्रय देईल, असा भरवसा नानासाहेब पेशव्यांना वाटत होतं, म्हणून तिकडे शोध करण्यासाठी लिहिलेली पत्रे आज उपलग्ध आहेत.
एक मराठा सरदार (नाव विसरलो) खरच काही स्वारांनीशी आला सिंग कडे सुखरूप राहून परत महाराष्ट्रात आला असे एक पत्र पेशवे दप्तरात आहे.
13 Dec 2019 - 2:35 pm | मुक्त विहारि
छान लिहिलंय...
14 Dec 2019 - 5:59 am | मंदार कात्रे
आपल्याकडे अनेक फालतू चित्रपटाना पब्लिक डोक्यावर घेतं आणि त्यात हिरेमाणके बाजूलाच राहतात . माझ्या मते सैफ अली खान ची मुख्य भूमिका असलेल्या " नागा साधूचा सूड " अर्थात " लाल कप्तान " हा अगदी " लगान " च्या तोडीस तोड असलेला जबरदस्त मूव्ही आहे .
अठराव्या शतकातील वातावरण आणि ब्रिटिशांविरुद्ध सुरू असलेली बंडाळी यांचे अभूतपूर्व असे चित्रण ह्या सिनेमात आहे . क्लायमॅक्स ला तर सिमेमॉटोग्राफीची कमाल आहे . यमुना तीरावरील किल्ला आणि नदीत होणारी लढाई अप्रतिम टिपली आहे .
माझ्याकडून या सिनेमाला 4.5 *
Available on Amazon Prime
17 Dec 2019 - 2:22 pm | हस्तर
तो बोर आहे पण
5 Jan 2020 - 9:46 am | भंकस बाबा
100 टक्के सहमत!
दीपक डोबरियाल (डोब्राल) ने जी भुमिका वठवली आहे ती पाहण्यासाठी मी सिनेमा अजून दोन वेळा बघिन. खरोखर काही कलावंत प्रसिद्धिच्या झोतात का येत नाही हेच समझत नाही.
18 Dec 2019 - 11:53 pm | चांदणे संदीप
पानीपत या चित्रपटाचे नाव रानीपत शोभले असते एवढा बाईने नखरा दाखवलाय. चित्रपट आजिबातच बघायचा नव्हता पण नक्की कुठे कुठे माती खाल्लीये ते प्रत्यक्ष बघावं असं नंतर वाटलं म्हणून पाहिलाच. द ग्रेट मराठा या सीरीयलची कास्टींग सारखी डोळ्यासमोर येत होती. कहां राजा भोज कहां... असंच वाटतं राहिलं शेवटपर्यंत. क्लायमॅक्सला तर अब्दाली रडायचाच बाकी होता. मल्हारराव आजिबात शोभले नाहीत. दत्ताजींचे बचेंगे तो और लढेंगे हे इतिहासातील प्रसिद्ध वाक्य अतिशय सपक करून घाईघाईने उरकून घेतलं. शुजाउद्दौलाचा आवाज आणि स्वॅग इतका खतरा आहे की खरा व्हिलन हाच तर नव्हे असा संशय येतोच. मला फक्त नजीबखान आवडला!
सं - दी - प
20 Dec 2019 - 12:17 pm | हस्तर
मुद्दाम पार्वती बाई ला युद्ध करताना दाखवले आणि ट्रेलर मध्ये पण ,त्यामुळे सो कॉल्ड woman empowerment वाले लोक चित्रपट बघायला गेले
20 Dec 2019 - 12:27 pm | जॉनविक्क
आशुतोष गोवारीकर तुमच्या बागेत गवत उपटतो काय ?
मग असल्या बंडल डायरेक्टरची तारीफ कशासाठी ?
20 Dec 2019 - 2:11 pm | अभिदेश
साजिद खान काय करतो तुमच्याकडे?
20 Dec 2019 - 7:05 pm | जॉनविक्क
संडास साफ करायची जागा रिकामी आहे आशुतोष गोवरीकरला पाठवून द्या तुमचं इकडचे उपटून झाले की
23 Dec 2019 - 12:32 pm | अभिदेश
म्हटल्यानुसार तुमच्या ईतक्या खालच्या लेवलला नाही येऊ शकत ... तेव्हा तुम्ही आणि तुमचे सन्डास तुम्हाला लखलाभ... रामराम.
23 Dec 2019 - 12:59 pm | जॉनविक्क
23 Dec 2019 - 1:04 pm | जॉनविक्क
असं आहे बाबड्या तो आहे "शीट" डायरेक्टर, त्यामुळे संडास साफ चांगला करेल, तुझा काय प्रॉब्लेम आहे ? त्याने गवत उपटताना तुला फार त्रास झाला का ?
20 Dec 2019 - 7:13 pm | जॉनविक्क
नॉप, पण तुम्हीच स्टार कास्ट नाही म्हणून चित्रपट पडला असे म्हणू झाल्यावरही त्याचे चित्रपट स्टारकास्ट चालवतात त्याचे बंडल दिग्दर्शक न नाही हे मान्य करत नाही याचे अप्रूप वाटले,
20 Dec 2019 - 7:42 pm | जॉनविक्क
मिरची सोडून दुसरेच काहीतरी लावले असण्याची शक्यताही नाकारणे का जमू नये ?
22 Dec 2019 - 7:15 pm | जॉनविक्क
अभिदेश आशुतोष ने तुम्हाला अससे काय लावलंय जे इथे सांगणे आपणा अजूनही जमत नाहिये ? ते जे काही आहे ते लई जोरात लागलंय का ?
23 Dec 2019 - 1:06 pm | जॉनविक्क
की काही फार खालच्या अथवा वरच्या लेव्हल चे असल्याने शेर करायला विनासंकोच संकोच वाटतोय ?
31 Dec 2019 - 9:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विश्वासराव पनिपतात गेले हे माहिती होतं. आज जॉनविक्क पनिपतात गेले वाटतं. आवश्यक होतं. धन्यवाद. :)
-दिलीप बिरुटे
31 Dec 2019 - 1:42 pm | संजय पाटिल
सहमत!!
2 Jan 2020 - 9:29 pm | स्वोर्डफिश
2 Jan 2020 - 9:25 pm | स्वोर्डफिश
-अंगणवाडी सेवक चिरुटे
4 Jan 2020 - 11:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जॉनविक्क नंतर स्वोर्डफिश हा आपला आयडी पानिपत युद्धात गारद झालेला दिसतो. =))
संकेतस्थळावर ताळतंत्र सोडल्यावर अजुन काय होऊ शकतं म्हणा. बाय द वे तुम्हाला व्यसन लागलय मिपाचं आता कितीवेळ दम माराल हे पाहणे रोचक ठरेल. ;)
-दिलीप बिरुटे.
16 Apr 2020 - 11:37 am | चौथा कोनाडा
मस्त, सुरेख रसग्रहण !
हा लेख वाचताना पानिपत हा सिनेमा माध्यमांतून जेव्हढा अंडररेटेड आहे तेव्हढा नसावा हे लक्षात आले,
पानिपत पाहायचा ठरावाला अन लॉक डाऊनच्या दरम्यान ही संधी चालून आली !
पानिपत आवडला. त्यातली दोन गाणी (मर्द मराठा आणि मनमन में शिवा) आवडली !
अर्जुन कपूर कुठेही सदाशिव भाऊंची भूमिका करण्यात कमी पडला आहे असे वाटले नाही.
(दुसरा अभिनेता घेतला असता तर जास्त गल्ला कमावला असता हा कमर्शियल दृष्टिकोन)
बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या सिनेमांशी पानिपतशी अकारण तुलना केली गेली
कृती सेनॉनची भूमिका उठावदार झाली आहे, सिनेमा संपताना तिचे पात्र मनावर ठसते !
संजय दत्तचा अब्दाली जेमतेम, त्याच्या संवादाच्या शैलीतून संजयदत्तच जाणवत राहतो.
बाकी इतर सर्वांचा अभिनय कथेला समर्पक !
दत्ताजीचे शौर्य आणखी तपशीलवार दाखवायला हवे होते !
सिनेमाचा फोकस मुख्यतः "पानिपत वरील युद्ध" असल्यामुळे इतर संदर्भ जेव्हढ्यास तेव्हढे दाखवले आहेत ते ठीक वाटते.
सिनेमाची प्रकाशयोजना आणि कलादिग्दर्शन सुंदर आहे !
पानिपत आवडल्यामुळे या युद्धाबद्दल उत्सुकता वाढली. इतिहासतज्ज्ञ् निनाद बेडेकर यांचे पावणे चार तासाचे पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित अभ्यासपूर्ण व्याख्यान ऐकले !
https://www.youtube.com/watch?v=grVEUGNBkNM