कोल्हापूर ट्रायथलॉन २०१९

avichougule's picture
avichougule in जनातलं, मनातलं
2 Dec 2019 - 10:56 pm

### कोल्हापूर ट्रायथलॉन २०१९ ###

खूप दिवसानंतर लिहायचा योग आला आहे निमित्त आहे कोल्हापूर ट्रायथलॉन २०१९

मागच्या वर्षी ट्रायथलॉन झाल्या बरोबर ठरवलं होत की पुढच्या वर्षी परत नक्की करायचं, कारण तो सोहळाच एवढा अप्रतिम होता, हो हो सोहळाच. मग काय एप्रिल मध्ये ट्रायथलॉन ची तारीख आली आणि लगोलग आम्ही सगळे मित्रपरिवाराने नोंदणी केली.

झालं एकदाची नोंदणी, ट्रायथलॉनला अजुन ६-७ महिने आहेत तेवढ्यात होईल तयारी असा विचार करून शांत राहिलो.. त्यात उन्हाळा सुरू झाला म्हणून म्हटलं नंतर तयारी करू, मग काय पावसाळा. ह्या वेळचा वर्षा ऋतु जणू जो पर्यंत वर्षा बंगल्यावर कोण राहायला येतंय ते पाहिल्याशिवाय जाणारच नाही अश्या मूड मध्ये होता. दिवस कमी होत होते, हळूहळू मनात चलबिचल सुरू झाली, हाच विचार येऊ लागला की मागच्या वर्षी पूर्ण केलंय त्यावेळेत तरी ह्यावेळी पूर्ण होईल का? कारण तयारी अशी काहीच नव्हती. भरीस भर म्हणून की काय २ वेळा आजारी पडून झालं. नंतर मग क्लब २९ ला स्विमिंग साठी नोंदणी केली आणि खरा प्रवास सुरू झाला. ऑफिस नंतर जमेल तस तयारी सुरू केली, अधे मध्ये पळणे सुरू केले. मागच्या वेळी फक्त मला मदत म्हणून आलेला रवीने ह्यावेळी ट्रायथलॉन मध्ये भाग घेतला होता. त्याच्या सोबत जमेल तस प्रॅक्टिस सुरू केलं.

आता फक्त १ महिना बाकी राहिला ट्रायथलॉन ला, दिवाळी साठी कोल्हापूरला जाण झालच होत त्यामधून वेळ काढून एक दिवस मी आणि अजित राजाराम तलावावर गेलो, थोडा वेळ पोहल्यानंतर आणि ५ किमी पळून घेतल्यावर अंदाज आला आणि मनात पक्का निर्धार झाला की आपण ह्यावेळी सुद्धा ट्रायथलॉन ठरवलेल्या वेळेत पूर्ण करू शकतो. परत आल्यावर जसं इंजिनीअरिंगच्या परीक्षेची तयारी शेवट पर्यंत सुरू असते तसचं काहीतरी माझं सुरू होत. २१ अपेक्षित घेऊन जसं झटपट अभ्यास करता येतो (असा समज आहे) तसच मी अजित गोरेने दिलेल्या सल्ल्यानुसार सायकलला ३२ चा टायर काढून २८ चा टायर टाकून घेतला त्यात अविनाश अनुशे नी पण मदत केली.

शेवटी थोड थोड सरावानंतर तो दिवस उजाडला, आम्ही सगळे सहपरिवार कोल्हापूरला रवाना झालो. शनिवारी सकाळी पोहुन झाल्यानंतर मस्त गावरान मिसळ वर ताव मारून परत बिब घ्यायला गेलो. तिथे सगळी जय्यत तयारी सुरू होती, संध्याकाळी सायकल जमा करण्यासाठी गेलो त्यावेळी सगळ्यांची, विशेष म्हणजे शंकर दादा ची पॉवर पॅक of IAS यांची भेट घेऊन घरी आलो आणि आयोजकांनी दिलेल्या २ ट्रांझीशन बॅग मध्ये सगळं सामान म्हणजे लागेल तेवढंच (गेल्यावर्षी उगीच फाफट पसारा घेतला होता सोबत) सामान भरून लवकर झोपी गेलो.

२४ नोव्हेंबर, आजचा दिवस करो और मरो असा होता, सकाळी ४:३० ला उठून आवरून, राजाराम तलाव गाठला. पोचल्या पोचल्या प्रथम जाऊन सायकल चेक अप करून घेतलं, फोटो सेशन करून, पोहण्यासाठी आम्ही सगळे जण सज्ज झालो होतो. काड सिद्धेश्वर महाराज ६:३० ला पोहचले होतेच, सगळ्यांनी जय भवानी जय शिवाजी अशी आरोळी ठोकून पाण्यात उड्या घेतल्या, ठरल्या प्रमाणे मी मध्ये लावलेल्या दोरीपासून थोड दुरून पोहायला सुरुवात केली कारण गेल्या वर्षी स्विमिंग करताना सगळ्यांच्या लाथा खाऊन झाल्या होत्या. स्विमिंग करताना मस्त वातावरणाचा आनंद घेत मी एकेकाला मागे टाकून ईकडे तिकडे ओळखीचं कोण दिसतंय का पाहत पुढे जात होतो, एक ओळखीचा चेहरा दिसला अजित पाटील मग मंदार, आमची तिकडी मग एकत्रच पुढे सरकू लागली. हळूहळू मी जिथून U टर्न घ्यायचा होता तिथं पोचलो त्यावेळी घड्याळात मला ७ वाजलेले दिसले. त्या नंतर त्याच वेगाने उरलेलं अंतर कापून ४७-४८ मिनिटात २ किलोमीटर स्विमिंग संपवून मी आणि अजित एकत्रच बाहेर पडलो. तिथं आमच्या साठी खास फोटो काढायला आलेला रवीचा भाचा विवेक होताच, मस्त पोझ मध्ये आम्ही दोघांनी फोटो काढून घेतले, निकिता, अमृता आणि माझे सासरेबुवा सगळे जण वाट बघत होते, त्यांना बाय बाय करून, सायकल एरिया कडे पळत सुटलो. मनाप्रमाणे स्विमिंग तर झालच होत.

ह्या वेळी ट्रायसुट असल्यामुळे कपडे बदलायचा त्रास नव्हता, पटकन बुट घालून हेल्मेट लावून सायकल घेऊन ५ मिनिटात बाहेर पडलो. आता एकच लक्ष होते ते म्हणजे लवकरात लवकर तवंदी घाट गाठायचा. सुरुवात तर छान झाली होती, आता एक एक रोडीवाले मित्र मला ओव्हरटेक करून पुढे जात होते, ते तर होणारच होत, त्या वेळी मी मनाशी पक्क केलं होत की एकाही हायब्रीड सायकलवाल्याला पुढे नाही जाऊ द्यायचं. मागच्या वर्षीचा मार्ग थोडा वेगळा होता पण निपाणी पर्यंत माहीत होतं सायकलिंग करून, त्यापुढे खरा कस लागणार होता. निपाणी पर्यंत ताशी २६ किमी ची सरासरी राखता आली नंतर हळूहळू तवंदीच्या घाटाची सुरुवात झाली, इथून पुढे मात्र वाऱ्याने माझ्याशी स्पर्धा करायचं ठरवलं होतं, काय केल्या सायकल पुढे जाईना, पंढरपूर राईड ची आठवण झाली. पण ही स्पर्धा वेळेत पूर्ण करायची होती म्हणून मग सगळे विचार बाजूला सोडून फक्त पुढे जायचं हाच विचार सोबत ठेवून पुढे जायला लागलो, प्रत्येक वळण ओलांडताना १-१ किमी ने सरासरी कमी व्हायला लागली. एक वळण गेलं, दुसरं गेलं तरी काय घाट संपेना, खाली मान घालून फक्त पाय चालू ठेवले इतक्यात मला पलिकडून हाजी सुसाट घाट उतरताना दिसला, मागोमाग अजित होता त्याने हाक दिली. तेवढ्यात पुढे मला "गोवा वेस" अशी पुसटशी पाटी दिसली आणि हायस झालं. घाट संपला एकदाचा आणि सरासरी २२ किमी. तिथं त्या हाइड्रेशन पॉईंटला मस्त पैकी २ मिनिट थांबून पानी भरून घेतलं, केळ खाल्लं सोबत चिक्की आणि एक जेल पॅक रिचवून सायकल उतारावर सोडून दिली. म्हणतात ना "डर के आगे जीत है" तसचं सायकलपटू साठी "चढा नंतर उतार म्हणजे संजीवनीच जणू". आता परतताना मागे राहिलेलं एक एक सहकारी दुसऱ्या बाजूला दिसत होते, त्यांना आरोळी देवून चिअर अप करत मी खाली मान घालून त्या नवीन डांबरी रोड वर सायकल दामटत होतो. एक एक मैलाचे दगड मागे जात होते तस तसा मी स्पर्धेत पुढे जात होतो, शेवटी ११:१० वाजता मी ९० किमी सायकलिंग करून माझ्या ठरवलेल्या वेळेत पोचलो.
सायकल पटकन ट्रांझीशन एरिया मध्ये लावून पटकन हेल्मेट काढून रनिंग साठी टोपी घातली आणि ४-५ मिनिट मध्ये बाहेर पडलो. आता माझ्या सोबतचे सगळेजण घरी गेले होते, निकिताला फोन करून सांगितलं मी आलोय म्हणून, तिला तर आश्चर्यच वाटलं की हा एवढ्या लवकर कसा काय आला, कारण मागच्या वर्षी मी ११:५० ला आलो होतो, म्हणजे ह्या वेळी मी ४० मिनिटे आधीच रांनिंग सुरू केलं होत. खूप बरं वाटतं होत, आता फक्त एकच काम बाकी होत आणि त्याची सुरुवात मी केली होती. मग त्या रनिंगच्या मार्गावर आधी आलेले सगळेजण भेटले, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. माझी पहिली फेरी संपायच्या आधीच रवी भेटला, खूप बर वाटलं, कारण फक्त सहाच महिन्यात स्विमिंग शिकून तो ह्या स्पर्धेचा भाग झाला होता. सगळेच जण मस्त एन्जॉय करत होते, volunteer सगळ्यांना कलिंगड, संत्रा कापून देत होते, छोटे volunteer प्रत्येकफेरी नंतर वेगवेगळ्या रंगाचे रबर बँड हातामध्ये घालत होते. आता इथं ४ वेळा त्याच मार्गावर पळायचं होत, उन वाढेल तसा वेग कमी होतं होता, एक एक फेरी संपत असताना मन मात्र आधीच त्या मस्त पैकी "लोहपुरुष" असे शब्द कोरलेल्या मेडलकडे जात होत. कधी एकदा मेडल मिळतंय अस वाटत होत, मग माझ्या सोबतीला इशान आणि निकिता नंतर अमृता सगळेच जण थोडे थोडे धावले.त्याच मार्गावर माझ्या आणि रवी साठी वेळात वेळ काढून कोल्हापूरचे २ मित्र बंटी आणि राहुल आलेले होते. सोबत फोटोग्राफर विवेक आणि अक्षय पण होतेच. शेवटी एकदाचा तो क्षण जवळ येत होता, माझे अजून ३ किमी अंतर बाकी होत आणि घड्याळात पाहिलं तर ८ तास पूर्ण व्हायला आजुन ३५ मिनिट बाकी होती, त्यावेळी मी ठरवलं चला आता ह्यावेळी ८ तासाच्या आत पूर्ण करूया. थोडा स्पीड वाढवला आणि ते राहिलेलं अंतर पूर्ण करून माझी सलग दुसरी ट्रायथलॉन स्पर्धा मी ७ तास ५० मिनिटात पूर्ण केली. आणि ते खास मेडल आणि एक खास finisher टी शर्ट मिळवलं. सगळेच खुश होते प्रत्येकानी येऊन अभिनंदन केलं, त्यानंतर मग काय सगळा जल्लोष, निकिता आणि अमृताने मागच्या वेळे सारखच ह्या वेळी सुद्धा एकदम मस्त केक बनवून घेतला होता, त्यात भरीस भर म्हणजे कोल्हापुरी फेटा, सगळ्यात रंगत भरली त्या तुतारीने, मग भरपूर फोटोग्राफी, गळाभेटी. घरी पोचल्यावर केलेलं कौतुक आणि सगळ्यांचे आशीर्वाद.

या सगळ्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्या सगळ्यांचे आभार. खास करून निकिताचे, माझी सौ, कारण तिने माझ्यासाठी दिलेला वेळ खूप महत्वाचा आहे. नोकरी, घर, मुलगा आणि नवऱ्याचे छंद सांभाळणे खूप कठीण असतं. तिची साथ सदैव अशीच राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

लेख खूपच मोठा झाला, पण एवढं तर होणारच होत.

शेवटी एकच म्हणावं वाटत, वाह वाह. काय ते क्षण, आयुष्यभर लक्षात राहील अशी ही स्पर्धा.

फोटो ईथे पहावेत Triathlon Photos

अविनाश चौगुले
२४.११.२०१९
कोल्हापूर

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

3 Dec 2019 - 4:50 am | विंजिनेर

अभिनंदन. फोटो टाका! आठवड्याला किती तास ट्रेनिंग व्हायचं? रिकव्हरी कशी होती?

avichougule's picture

3 Dec 2019 - 10:11 pm | avichougule
मालविका's picture

3 Dec 2019 - 7:49 am | मालविका

खूप खूप अभिनंदन !!!

श्वेता२४'s picture

3 Dec 2019 - 10:47 am | श्वेता२४

.

मुक्त विहारि's picture

3 Dec 2019 - 10:56 am | मुक्त विहारि

अभिनंदन

चौथा कोनाडा's picture

3 Dec 2019 - 2:32 pm | चौथा कोनाडा

वॉव ! खुप खुप अभिनंदन, अविनाश चौगुले !

थरारक अनुभव अन तेवढेच थरारक ओघवते चित्रदर्शी वर्णन !

फोटो पहायची उत्सुकता आहे !

वामन देशमुख's picture

3 Dec 2019 - 3:12 pm | वामन देशमुख

अभिनंदन. छान लिहिले आहे, फोटो हवेत.

avichougule's picture

3 Dec 2019 - 10:07 pm | avichougule
अनिरुद्ध.वैद्य's picture

6 Dec 2019 - 8:46 am | अनिरुद्ध.वैद्य

हार्दिक अभिनंदन!!!