पर्स..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
2 Dec 2019 - 10:27 am

माझी पर्स म्हणजे एक वस्तुसंग्रहालय आहे. माझ्याकडे इतक्या पर्सेस आहेत, पण अजूनही मला माझ्या गरजा पूर्ण करणारी, योग्य आकाराची, आदर्श पर्स मिळालेली नाही. माझ्याकडे वेगवेगळ्या आकाराच्या पर्सेस आहेत. त्यांत मी बॅग बनवणाऱ्याकडून, लघुउद्योजक बायकांकडून, माझ्या अपेक्षा सांगून बनवून घेतलेल्या बॅग्जही आहेत. मला गरजेनुसार पर्सेस लागतात. सकाळी फिरायला जाताना लहानशी पाण्याची बाटली, मोबाईल, एक रुमाल आणि घराची किल्ली एवढंच सामावणारी लहान पर्स मला हवी असते. तर प्रवासाला जाताना मला मोठी पर्स हवी असते. तीत पाण्याची मोठी बाटली, बिस्किटाचा पुडा, छोटा नॅपकिन, कंगवा, वाचायला एखादं पुस्तक, मोबाईल, पेनड्राईव्ह, कारवान, मनीपर्स असं सगळं मावायला हवं असतं. स्वयंपाकघर जसं कितीही मोठं असलं तरी ते अजूनही मोठं हवं असं गृहिणीला वाटतं, तसं पर्सच्याबाबतीत मला वाटतं.

पैसे ठेवण्याची माझी मनीपर्सही मोठी आणि लांबलचक असते. कारण मला नोटा दुमडायला आवडत नाही. नोटा सरळपणे आत मावल्या पाहिजेत. शिवाय चिल्लर ठेवायला आणखी एक लहान कप्पा लागतो.

पर्सला जितके अधिक कप्पे तेवढा गोंधळ अधिक. माझ्या सध्याच्या पर्सला तीन मोठे, दोन मध्यम, आणि एक चोरकप्पा असे सहा कप्पे आहेत. माझी स्मरणशक्ती म्हणजे तिला शक्ती का म्हणायचं असा प्रश्न आहे, इतकी ती अशक्त आहे. पण मी बुद्धिमान (कसचं, कसचं. असू दे, असू दे) असल्यानं माझ्या स्मरणदोषावर मात करण्यासाठी मी एक युक्ती केली. प्रत्येक कप्प्यात काय ठेवायचं हे फिक्स करुन टाकलं.

सर्वांत पुढच्या मध्यम आकाराच्या कप्प्यात घराची किल्ली, छोटा रुमाल, थोडे सुटे पैसे, एक पेन, बस्.. यांखेरीज दुसरं काहीही ठेवायचं नाही. पण मग लक्षात आलं, रुमाल काढताना किल्लीही बाहेर येऊन खाली पडू शकते. हरवू शकते. पेन, सुटे पैसे काढतानाही असं घडू शकतं, म्हणून त्या कप्प्यात फक्त किल्ली ठेवली. कुठूनही दमून आल्यावर पर्समधे हात खुपसून किल्ली शोधण्याची हतबल करणारी वेळ येऊ नये म्हणून किल्ली अँट हँड असलेल्या कप्प्यात ठेवली.

मग मधल्या कप्प्यात चेकबुक. लांबड्या मनीपर्समधे डेबिटकार्ड, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, सिनियर सिटीझन कार्ड ही कुठेही, कधीही (न) लागणारी कार्डस्, एक पेन, लहानशी वही असं ठेवलं आणि ती कडेच्या एका कप्प्यात ठेवली. हे सगळं झटक्यात सापडावं म्हणून कप्प्याला एक सेफ्टीपिन लावली. पिनही आयत्या वेळी उपयोगी पडते. मग मधल्या कप्प्यात चष्मा, गॉगल, छोटा नॅपकिन, एक कापडी पिशवी (प्लॅस्टिक बंदीचा विजय असो), पाण्याची बाटली असं ठेवलं. मनात आलं, आता आपल्याला सगळं व्यवस्थित आणि वेळेवर सापडेल. सारखं झिपा उघडा, बंद करा आणि तेच तेच कप्पे पुन्हा शोधा असं करायला नको. पण माझ्या या बुद्धिमत्तेचं वरचेवर गर्वहरण होतं.

नुकतीच घडलेली गोष्ट. मी बँकेत लाईफ सर्टिफिकेट द्यायला गेले होते. तिथली रांग बघून माझा धीरच सुटला. तिथला सर्व्हर स्लो चालत होता म्हणून प्रत्येक नागरिकाला वीस वीस मिनिटं लागत होती. माझा मुलगा मदतीला होता. त्याने मला खुर्चीत बसवले आणि स्वतः रांगेत उभा राहिला. बऱ्याच वेळाने माझा नंबर लागला. तिथल्या कंटाळलेल्या क्लार्कने मला म्हटले,"आधार कार्ड"??

मी खूप ताटकळल्यामुळे माझी स्मरणशक्ती क्षीण झाली होती.
'कुठल्या कप्प्यात ठेवलंय बरं आधारकार्ड? मी आठवून पाहिलं. एवढं सगळं शिस्तीत ठेवूनही काहीच आठवेना. सर्व कप्प्यांच्या झिपा उघडल्या. बंद केल्या. क्लार्क आणखी वैतागला. पण आधारकार्ड सापडलं. क्लार्कनं त्याचा नंबर टाईप करुन घेतला. मी ते कार्ड लगेच आत टाकलं. त्या टेबलावर इतके कागद आणि प्रिंट आऊटस् पडले होते. त्यांत माझं आधारकार्ड मला ठेववेना. कुठंतरी गळबटलं, हरवलं म्हणजे? मी माझ्या प्राणांइतकंच आधारकार्डाला जपते. त्याचा नंबर तर मी स्वतःलाही सांगत नाही.

"मोबाईल नंबर?" क्लार्कनं पुन्हा विचारणा केली. एकीकडे मोबाईल नंबर सांगत सांगत मी मोबाईल शोधू लागले. मला मोबाईल कुठल्या कप्प्यात ठेवलाय ते आठवेना, एवढंच नाहीतर माझ्या दोन मोबाईल्सपैकी कोणता नंबर बँकेत रजिस्टर केलाय ते आठवेना. असू दे. नंबर तर सांगितला, असं मनाशी म्हणत मी गप्प बसले. तर क्लार्क म्हणे ओटीपी आला का बघा फोनवर. पुन्हा कप्प्यांच्या झिपांची उघडझाप. मुलगा मदतीला आला. मोबाईलही सापडला.

मग अंगठ्याचं इंप्रेशन. ते रीड होईना. म्हातारपणामुळे असं होतं म्हणे. ठसे पुसट होतात. मग दर्शिका, मधलं बोट अशी ट्रायल झाली. शेवटी झालं एकदाचं. माझी तीन लाईफ सर्टिफिकेटस् होती. एक माझ्या स्वतःच्या पेन्शनचं, एक फँमिली पेन्शनचं, आणि एक एल.आय.सी.चं.

तितक्या वेळा सर्व झिपांची उघडझाप.

पूर्वी जिवंत असल्याच्या दाखल्याच्या छापील फॉर्मवर डॉक्टर किंवा बँक मॅनेजरचा सही शिक्का मारला की झालं, अशी प्रक्रिया होती ती चांगली वाटायला लागली.

त्यात त्यांची "सिस्टीम स्लो" झाली होती. माझ्याच कामाने चाळीस मिनिटं खाल्ली. रांगेतले इतर म्हातारे चिरडीस गेले.
शेवटी कशीतरी तिथून बाहेर पडले. पर्समधे इतकं सगळं शिस्तीत ठेवूनही अशक्त स्मरणशक्तीमुळे माझी पर्स हीच एक "कनफ्यूजन बँग" बनते. मी मगाशी सांगितलेल्या वस्तूच फक्त माझ्या पर्समधे असतात असं नाही. त्यात कसली कसली बिलं, पावत्या, मुलानं, सुनेनं,"जपून ठेवा" असं सांगून दिलेले कसले कसले कागदही माझ्या पर्समधे असतात. एकदा तर पर्समधली भाजी काढताना चुकून राहिलेलं एक सुकलेलं वांगंही माझ्या पर्समधे सापडलं. घरातल्या कुणाचंही काहीही सापडेनासं झालं तरी "बघ तुझ्या पर्समधे असेल" असं म्हणून मलाच शोधायला लावतात. माझी पर्स त्यामुळं जड होते. ती वाहून माझा खांदा दुखायला लागतो.म्हणून मी गळ्यात क्रॉस करुन अडकवायचा लांब पट्टा असलेली पर्स घेते. तिचा पट्टा कधीकधी गुडघ्यापर्यंत येतो. तर कधी छातीपर्यंत. तो कमरेशी अँडजेस्ट करावा लागतो.पर्सचा असा क्रॉस पट्टा अडकवलेली मी अत्यंत गबाळी दिसते. पण काय करणार?

पर्स तर घ्यायलाच हवी.

"माझ्याच खांद्यावर, माझेच ओझे" दुसरं काय!

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

2 Dec 2019 - 10:30 am | श्वेता२४

गंमतशीर अनुभव

मुक्त विहारि's picture

2 Dec 2019 - 5:36 pm | मुक्त विहारि

हॅरी पॉटर मध्ये म्हणूनच पर्सची जबाबदारी हरमायनी कडे असते. पण त्या पर्स पेक्षा जास्त सामान माझ्या बायकोच्या पर्स मध्ये सापडू शकेल. ...

विनिता००२'s picture

3 Dec 2019 - 2:16 pm | विनिता००२

मजेशीरच :)

कौशी's picture

2 Apr 2022 - 2:38 am | कौशी

मस्त लिहिले ग आजी.

सस्नेह's picture

2 Apr 2022 - 2:03 pm | सस्नेह

अलिकडे ही पोर्टल्सची भानगड सगळीकडे झाळीय. आणि सगळ्या पोर्टल्सवर कायम कुठचीतरी बोम्बाबोंब असते. माझीही एकदोन पोर्टल ची कामे अडकली आहेत या ढेकणांमुळे (बग्ज).