चाळ तशीच आहे.
आमच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत चाळ तशीच आहे. जुनीच. तिथे तरूणपणी रहायला येऊन वयोवॄद्ध झालेल्या अनेकांनाही चाळ अशीच आठवते. तुकतुकीत, तरणीताठी दिसणारी चाळ कुणीच बघितली नाही. कधी तरी ती तशी असेलही नक्कीच.
१०० वर्ष सहज होऊन गेली चाळीला. कदचित १५० ही झाली असतील. आता त्या वयाचं चाळीशिवाय चाळीत कुणीच नसल्याने नक्की सांगता येत नाही. कधी कधी रंगरंगोटी केली जाते. पण ती म्हातारपणी कलप लावल्यासारखी वाटते. वय लपत नाही.
पण चाळ तशीच आहे. पायर्या तेव्हाही वाजायच्या, आत्ताही वाजतात. दिवे त्यांच्या मूडनुसार दिवस-रात्र न बघता हवं तेव्हाच पेटतात.
चाळीतले ते बोळ आणि जिनेही तसेच आहेत. दोन्ही हात पसरून चालता येणार नाही इतक्या अरुंद बोळात काय काय उद्योग केले आम्ही. कॅरम, क्रिकेट, गोट्या... कधी कधी सगळं एकाच वेळी. त्यावेळी आम्ही लहान होतो म्हणून त्या जागेत मावायचो. त्यावेळचे मोठेही मावायचे हे विशेष. घरात चपला नको म्हणून दरवाज्याबाहेर चपलेचा स्टँड ठेवायचा अगोचरपणा बोळासमोर दरवाजे असलेल्यांनी कधी केला नाही हे उपकारच. चपला घराबाहेर बोळात कुणीच ठेवायचं नाही कारण एखादा हौशी कलाकार जाता जाता उगाच म्हणून चपलेचा फुटबॉल करायचा. मध्यंतरी बोळातला कोबा काढून तिथे लाद्या बसवण्यात आल्या. पण जिथे उखडलंय तितकंच पॅचवर्क करून ठीक करता येण्याचा गुण लादीत नसल्याचे लक्षात आल्याने काही वर्षांनी पुन्हा कोब्याचे आगमन झाले.
चाळीत घरांची दारं सतत सताड उघडी असल्याने लोकांच्या घरात जाऊन खेळायला कुणाला कधी लाज वाटली नाही आणि लोकांनाही कधी मुलांची अडगळ वाटली नाही. दारं सतत उघडी ठेवावी लागायची कारण माणसांप्रमाणेच हवा आणि प्रकाश ह्यांनाही आत येण्याचा तो एकच मार्ग होता. खिडकीची चैन फक्त कोपर्यातल्या घरांना. पण त्या खिडकीचा मुख्य उपयोग खालच्या हाऊसगल्लीचे गार्बेज-शूट म्हणूनच जास्त व्हायचा. कारण ६ फुटावरील समोरच्या चाळीतले घर हे काही खिडकीत बसून बघण्यासारखे विहंगम दॄष्य नव्हे.
लहानपणी आवडलेल्या आणि हव्याशा वाटणार्या अनेक गोष्टी आपण सहज विसरून जातो. आमच्या चाळीत काही स्वतंत्र स्वतःची गच्ची असलेली घरं होती. म्हणून नाव 'गिरगाव टेरेसेस'. जेव्हा आम्ही स्वत:चं 'गच्चीसह' घर घेतलं तेव्हा अचानक आठवलं 'लहानपणी गिरगावात राहताना आपल्याला कायम वाटायचं आपलंही गच्ची असलेलं घर असावं'. हे तेव्हा आठवल्याने एकदम छान वाटलं आणि उगाचच एक क्लोजरचं फिलिंग आलं. गणपती बाप्पा मोरया..
चाळीच्या मालकाशिवाय अनेकजण इथे राहून गेले. इथेच जन्म होऊन इथूनच वैकुंठस निघालेलेही अनेक आहेत. सगळं आयुष्य त्या १०-१५ च्या खोलीत. आता तिथे त्यांची मुलं. ती सुद्धा रिटायरमेंटला आली. आजोबांची गॅलरीतली खुर्ची आता नातू चालवतो.
आज स्वखुशीने परत चाळीत रहायला जाईन का? माहिती नाही. बहुतेक तरी नाहीच. एकटाच असतो तर गेलोही असतो कदचित. आज गॄहीत धरत असलेल्या अनेक बेसिक गोष्टींची चाळीत जाणवण्याइतपत कमतरता आहे. पण चाळीत रहायची खरी मजा ही तिथल्या वैयक्तीक कमतरेत आणि सार्वजनीक मुबलकतेतच तर आहे.
अनेकांच्या चाळींविषयी अनेक आठवणी आहे, आमच्याही आहेत. हजारो चाळींसारख्याच त्याही हजारातल्या एक आहेत.
चाळही तशीच आहे.
आपला,
आदि जोशी पण तसाच आहे.
-----------------------------------
त. टी. १: लेख अर्थातच 'चाळीचे चिंतन' वरून प्रेरित आहे. पण एका महान लेखकाने लिहून ठेवलंय - 'राजहंसाचे चालणे, जगी झालीया शहाणे, म्हणोनी काय कवणे...'
त. टी. २: कुणाला लेख दुसर्याला पाठवायचा असेल तर नावासकट/नावाशिवाय/स्वतःच्या नावाने हवा तसा पाठवा. विचारायची गरज नाही. आमाला प्रॉब्लेम नाय. जिथे प्रतेक्ष ज्ञानेश्वर आणि तुकारामांनी कॉपिराईट नाही घेतला तिथे आपण कोण कवण?
प्रतिक्रिया
29 Nov 2019 - 7:15 pm | mrcoolguynice
लेख चांगला आहे, आवडला.
बाकी लेखातील वरील वाक्य,
तुमच्यात एक छुपा समाजवादी लपलेला आहे की काय ? अशी शंका मनात निर्माण करतो.
(कृपया हळु घेणे)
29 Nov 2019 - 7:23 pm | आदिजोशी
दोन हाणा पण समाजवादी नका म्हणू :-)
29 Nov 2019 - 7:38 pm | पद्मावति
मस्तंच!
त्यावेळी आम्ही लहान होतो म्हणून त्या जागेत मावायचो. त्यावेळचे मोठेही मावायचे हे विशेष.
=)) खुसखुशीत.29 Nov 2019 - 7:42 pm | मदनबाण
माझा फार कमी काळ चाळीत गेला आहे, परंतु तिचे अनुभव आजही मेंदुत कोरलेले आहेत ! संडासच्या आत चिंतनात बसलेल्याला बाहेरचा टमरेल घेउन उभ्या उभ्या प्रेशर सहन करण्याच्या प्रयत्नात दरवाजावर जोरा जोरात थापा मारुन मुखाने काय रे झोपलास का आत? असे हमखास ओरडायचा. तर कोणी विडीकाडी ओढणारे असेल तर आत त्याचेही गंध ! :))) चाळीच्या सज्ज्यावर हात टेकवुन खाली चालणारी रहदारी पाहण्या सारखा रम्य अनुभव नाही ! अगदी काल परवाच झोपेत चाळीच्या खालुन, ओ गिरीष ची आई... गिरीष आहे का ? अशी हाक मारली होती ! उपासनी, करमरकर,भंगाळे,शहा, गांधी अशी आडनावे देखील लक्षात आहेत अजुन.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आवारापन बंजारापन एक ख़ला है सीने में हर दम हर पल बेचैनी है कौन बला है सीने में... :- JISM
29 Nov 2019 - 7:50 pm | आदिजोशी
पाचवी खोली वाचलीस का?
29 Nov 2019 - 8:01 pm | मदनबाण
नाही. पण आत्ता तिकडे जाउन आलो, सवड मिळताच शांतपणे वाचेन.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आवारापन बंजारापन एक ख़ला है सीने में हर दम हर पल बेचैनी है कौन बला है सीने में... :- JISM
29 Nov 2019 - 7:59 pm | मुक्त विहारि
चाळ ती चाळच....
29 Nov 2019 - 8:07 pm | कंजूस
काही वर्गमित्र होते चाळीत. थोडा अनुमव आहे चाळ जीवनाचा.
29 Nov 2019 - 10:13 pm | Rajesh188
मी काही वर्ष बैठ्या चाळीत राहिलो आहे .अनुभव खूप छान होता .
सर्व सण सर्व मिळून अत्यंत उत्साहात साजरे केले जायचे
आणि त्यात सर्वांचा सहभाग असायचा
चाळी मध्ये श्रावण महिन्यात ग्रंथ वाचन होयचं.
चाळी मध्ये 1 कॉमन रूम होती त्या मध्ये.
सर्व लोक एकमेकाच्या दुःखात,सुखात सहभागी असायची
एकटेपणा कोणाला जाणवायचा नाही
भले सुविधा कमी होत्या.
संडास साठी सार्वजनिक संडास चा वापर केला जायचा.
तिथे सकाळ ची लाईन असायची.
सकाळी उठून संडास गेले की रेशन chya लाईन ल नंबर लावायला तोच डब्बा ठेवला जायचा.
समूहात राहण्याचा आनंद च काही वेगळा असतो
30 Nov 2019 - 9:41 am | सुबोध खरे
माझ्या दोन मावश्या गिरगावात चाळीत राहत असत आणि आता मावसभाऊ राहत आहेत. तेंव्हा तेथे बऱ्याच वेळेस जाणे येणे आणि राहणे होत असे.
परंतु चाळीबद्दल काहीही आकर्षण वाटले नाही. कारण आम्ही राहत होतो त्या सोसायटीत चाळीत असावा इतकाच "ओलावा आणि प्रेम होतं" एकमेकांच्या घरी कधीही जावं यावं जेवावं अशी स्थिती होती. तरीही घरं मोठी आणि वैयक्तिक जागा भरपूर असलेली होती.
चाळीचा संडास हि जितक्या ठिकाणी एक अत्यंत अस्वच्छ आणि गलिच्छ जागाच आहे असे पाहत आलो आहे. बहुतेक चाळींमध्ये संडास हा चाळीच्या एका टोकाला असतात. त्यातून एखाद्याला हगवण लागली असेल तर त्याची स्थिती फारच गंभीर असते. स्त्रियांची पाळीच्या वेळेस फारच कुचंबणा होते.
वेळी अवेळी एखादा म्हातारा घरात आगाऊपणे डोकावताना आणि नको असलेली चौकशी करताना तर अनेक वेळेस पाहिलेले आहे.
एकंदर चाळीतच कसा ओलावा आणि प्रेम होतं आणि सोसायटीत माणसे कायम बंद खोल्यात वावरतात ( हे मिथ्या आहे) असा गहिवर काढताना पाहिले तर डोक्यात जाते.
जाता जाता-- चाळीतून सोसायटीत येणारी शेकडो माणसे पाहिली आहेत पण गंगा उलटी वाहताना पाहिलेली नाही. म्हणजे कितीही कौतुक केले तरी चाळ नकोच असा एकंदर जमाखर्च येतो.
30 Nov 2019 - 2:17 pm | जॉनविक्क
200% नाही पण 101% नक्की सहमत.
अर्थात चाळीत रहाणाऱ्या लोकांबद्दल हे मत नसून चाळ नावाच्या व्यवस्थेबद्दल आहे. बाकी आम्ही नाही का जगात आमचा देश सर्वात महान म्हणतो तसेच चाळीबद्दल गहिवर असणेही चूक नाही असे स्पष्ट मत आहे
30 Nov 2019 - 11:12 am | श्वेता२४
आज स्वखुशीने परत चाळीत रहायला जाईन का? माहिती नाही. बहुतेक तरी नाहीच.
एकटाच असतो तर गेलोही असतो कदचित.
यातच सारे आले.............