मॉल संस्कृती व ऑनलाईन शॉपिंगच्या झगमगाटापुढे टिकण्यासाठी बऱ्याच दुकानांना कात टाकावी लागली. ज्यांना नाही जमलं ती तशीच दिवाळीच्या गजबजाटात जुनं अस्तित्व टिकवण्याचा क्षीण प्रयत्न करत असतात , त्यांना समर्पित...
काजळलेल्या भिंती,त्यांत लपलेला जुनसर वास.
मिणमिणती पणती, आसपास जाणवणारा जगण्याचा आभास .
खरखरीत फरशी, तिथे घुटमळणारा वावरण्याचा त्रास .
लटकत्या हिंमती ,त्यांच्यात असलेली गबाळेपणाची रास.
हरलेल्या किंमती,त्यांत मिसळलेला अजीजीचा आवाज .
मंद मंद भुवई, तिच्यात सामावलेला अनुभवाचा प्रवास .
खडखडती नाणी,त्यांत अडकलेले अर्थशास्त्रही भकास .
शून्यातली दृष्टी, तिच्यात कशी येणार सणाची मिजास?
थकलेली पाटी, तिच्यातून उडलेली चैतन्याची आरास.
श्वासांचीच विक्री, उच्छ्वासांचीच परवली,
बदललेल्या जगाला 'Happy Diwali'.
- अभिजीत
प्रतिक्रिया
20 Nov 2019 - 6:37 am | राघव
वेगळा विचार.
उगाचच, पुलंच्या आजी आजोबांचे, त्यांनी स्वतः केलेले उदास वर्णन आठवले.
21 Nov 2019 - 12:04 am | मायमराठी
मी अशी खूप दुकानं बघितली आहेत. गलबलून जायला होतं; काहीच सुचत नाही. काळाचा वरवंटा हळूहळू अशा दुकानांना व मालकांना सपाट करुन टाकतो. असो.
आपल्याला हे लिखाण वाचून पु लं च्या लेखनाची आठवण व्हावी यापरतं भाग्य काय असावं? मनोमन आभार.
21 Nov 2019 - 10:55 am | यशोधरा
काय लिहावे? प्रत्ययकारी वातावरणनिर्मिती.
जुने जाऊद्या मरणालागी, म्हणावे का?
खरं आहे. मी जाता राहील काय, काय हे सजीव, निर्जीव सर्वांसाठी त्रिकालाबाधित कटू सत्य आहे.
21 Nov 2019 - 1:53 pm | जॉनविक्क
छान!
21 Nov 2019 - 2:20 pm | जालिम लोशन
ऊदास