ज्या प्रश्नांना उत्तर नसते, वा ज्यांचे ना उत्तर सुचते,
चौरस घेउन कागद काही, लिहून घ्यावे सुबक नेटके.
करून होडी त्या सा-यांची, पाण्यावरती सोडुन द्यावी.
काठावरती बसून आपण, त्या होडीची गंमत घ्यावी..
कुणी खोडकर खट्याळ मुलगा त्या होडीला उचलुन घेइल.
हसेल क्षणभर.. पान जाळिचे शीड म्हणूनी वरती ठेविल.
फुंकर घालुन हलके हलके पाण्यामध्ये लोटुन देइल ..
त्या पानाचा भार केवढा?? इवली होडी कशास साहिल?
डुबकी मारील एखादी वा लटपट लटपट पुढेहि जाइल..
नवीन पाणी नवा किनारा, दूरदूर वा-याने न्यावी ..
काठावरती बसून आपण, त्या होडीची गंमत घ्यावी..
बैरागी कुणि घाटावरचा, त्या होडीच्या घड्या उघडुनी,
ओल्या भिजल्या शब्दांनी तो भिजवुन घेइल अपुली वाणी.
वैशाखाच्या वणव्यामध्ये गाइल मग तो पाउसगाणी.
त्या गाण्यांचे मृद्गंधासम, वारा घेउन येइल अत्तर..
सूरांमध्ये, गंधामध्ये सापडेल बघ तुजला उत्तर!
नवीन होडी पुन्हा एकदा..पुन्हा एकदा सोडुन द्यावी..
काठावरती बसून आपण त्या होडीची गंमत घ्यावी..
प्रतिक्रिया
19 Oct 2019 - 6:27 pm | यशोधरा
वा, वा. कल्पना फार आवडल्या.
19 Oct 2019 - 7:28 pm | गणेशा
भावार्थ खरेच सुंदर ..
काय सुरेख कल्पना ..मस्तच ..
19 Oct 2019 - 8:01 pm | पहाटवारा
सुरेख !!
19 Oct 2019 - 8:20 pm | जव्हेरगंज
वाह. खासंच!!
19 Oct 2019 - 10:02 pm | पलाश
विनाउत्तराच्या अथवा उत्तर सुचत नसलेल्या प्रश्नांचं उत्तर गाण्याच्या सुरात आणि अत्तराच्या सुगंधात शोधू पहाणारी ही होडीची गंमतीदार कल्पना आणि या होडीचा प्रवास फारच आवडला. कविता चालीतही म्हणून पाहिली. वाह, अप्रतिम!! _/\_
19 Oct 2019 - 10:11 pm | अनन्त्_यात्री
आवडली !
19 Oct 2019 - 11:28 pm | जालिम लोशन
छान
20 Oct 2019 - 7:31 am | प्रचेतस
अप्रतिम
20 Oct 2019 - 9:20 am | प्राची अश्विनी
मनापासून धन्यवाद सर्वांनाच.
21 Oct 2019 - 7:46 am | पाषाणभेद
सुंदर कल्पना!
21 Oct 2019 - 8:53 am | माहितगार
अप्रतीम , आता प्राची अश्विनींनी आपल्या आता पर्यंतच्या लेखनावर आधारीत संग्रह प्रकाशित आवर्जून करावा असे आग्रहाने सुचवावेसे वाटते.
जेव्हा कवितेची ओळख कविने होते अशा मिपाकर कविंमध्ये प्राची अश्विनींची गणना होतेच पण त्यांच्या काव्याचा या कवितेतून सांगितलेला सुगंध त्यांचा ग्रंथप्रकाशित होऊन उर्वरीत महाराष्ट्र - आणि बृहन महाराष्ट्र आणि इतरत्र सुदूर पोहोचावा ही सदिछा.
2 Nov 2019 - 10:28 am | प्राची अश्विनी
खूप खूप धन्यवाद माहितगार...
22 Oct 2019 - 9:09 am | ज्ञानोबाचे पैजार
मस्त कल्पना..... कविता आवडली
पैजारबुवा,
22 Oct 2019 - 11:39 am | समीरसूर
अतिशय सकस आणि अर्थपूर्ण! आणि शब्दरचना, पोत, सूर, शैली...सारे उत्कृष्टच! खूप आवडली!
22 Oct 2019 - 5:34 pm | सदस्य११
छान कविता. कल्पनाही खूप सुन्दर आणी शब्द अगदी नेटके.
1 Nov 2019 - 7:10 pm | शा वि कु
फारच सुंदर कविता
ह्या ओळी तर मस्तच.
2 Nov 2019 - 10:29 am | प्राची अश्विनी
तुमच्या सर्वांच्या प्रतिसादांमुळे उत्साह वाढतो.
मनापासून thanks.