सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १०: एक भयाण बस प्रवास

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
10 Oct 2019 - 8:23 pm

१०: एक भयाण बस प्रवास

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ४: रामपूर बुशहर ते टापरी

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ५: टापरी ते स्पिलो

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ६: स्पिलो ते नाको

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ७: नाको ते ताबो

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ८: ताबो ते काज़ा

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ९: काज़ा ते लोसर. . .

५ ऑगस्टच्या संध्याकाळी बिकट अवस्थेमध्ये लोसरला पोहचलो. काज़ावरून सकाळी निघताना वाटलं होतं की, काज़ावरून लोसर आणि मग लोसरवरून कुंजुमला पासकडे जाईन आणि तसंच काज़ाकडे परत जाईन. पण रस्त्याची अवस्था आणि शरीराची दशा बघता ते शक्य नाही झालं. त्यामुळे लोसरवरूनच बस घेईन. आणि लोसरवरून मनालीला बस जाते. पण तरीही त्यासाठीसुद्धा चांगला आराम करावा लागेल. त्यामुळे लोसरमध्ये एक दिवस आराम करायचं ठरवलं. दुस-या दिवशी मनालीसाठी निघेन. लोसर! स्पीतिमधलं तिसरं मुख्य गाव आणि कुंजुमला पासचा बेस! इथून ४५५० मीटर उंचीवरचा कुंजुमला फक्त १९ किलोमीटरवर आहे. आणि इथून रस्ता अगदीच दुर्गम भागातून जाऊन मनालीच्या दिशेला वळतो! स्पीतितून हा रस्ता लाहौलकडे जातो. लोसरला पोहचताना बघितलं की, मोबाईल टॉवर तर आहे इथे. पण नेटवर्क नाही आहे. इथे वीज पुरवठा अगदी अनियमित असतो, त्यामुळे जेव्हा दिवे असतात, तेव्हाच मोबाईल चालतो. ह्या प्रवासाच्या सुरुवातीला वाटलं होतं की, मोबाईलच्या शिवाय काही दिवस विपश्यनेसारख्या स्थितीमध्ये जातील व त्याची मजा वाटेल. पण इथे एका प्रकारे मोबाईल आणि कनेक्टिव्हिटीची नेहमीची सवय सुटत नाही असं दिसतंय. असो. संध्याकाळी दिवे आले आणि थोडं नेटवर्कसुद्धा आलं. लोसरमधल्या हॉटेलमध्ये लिहिलेलं आहे- तुम्ही ४०७९ मीटरवर डिनर करत आहात! लोसरमध्ये संध्याकाळ तर ठीक गेली, पण रात्री फार जास्त थंडी वाटली! रात्री शेअरिंग सिस्टीम असल्यामुळे खोलीत हिमाचलमधील अन्य प्रवासीही आहेत. त्यांच्याशीही थोडं बोलणं झालं.

सकाळी आरामात उठलो. थंडी फारच जास्त आहे! आज काहीच करायचं नाही आहे. पण सायकल फोल्ड मात्र करावी लागेल. उद्या सकाळी मनालीची बस घेईन. सकाळी दोनदा चहाचा आस्वाद घेतला. हॉटेलमधली खोली दुस-या मजल्यावर असल्यामुळे समोर फार जबरदस्त दृश्ये दिसत आहेत! माझी दशा ठीक नाहीय, पण ही जागा किती‌ सुंदर आहे! समोरच्या डोंगरावरच लोसर गोंपाही आहे. पण तिथे जावसं वाटलं नाही. चढाची वाट आहे. सकाळी खूप वेळाने थंडी कमी झाली. हवामानही चांगलं नाहीय. ढग आले आहेत. बराच वेळ जुन्या काळातल्या नोकिया मोबाईलवर गाणे ऐकत राहिलो. ह्या छोट्या शुद्ध फोनने ह्या प्रवासात खूप चांगली सोबत केली! दुपारी जेव्हा वाटलं, तेव्हा सायकल फोल्ड केली. फोल्ड करून कॅरी केस म्हणजे पोत्यासारख्या पिशवीत ठेवली. बिचारा स्टँड मात्र तुटला आहे. सकाळच्या बसची चौकशी केली. इथून मनालीसाठी सात वाजता बस जाते. ही बस काज़ावरून लोसर- ग्राम्फू मार्गे मनाली- कुल्लू अशी आहे! ह्या बसने मनालीला जाईन आणि तिथून अंबालाला जाईन. आता ट्रेनचं नवीन तिकिटही काढावं लागेल. एक प्रकारे निराश वाटतंय, पण this is part and parcel of the game! सायकलिंग असेल किंवा अन्य कोणताही खेळ असेल, त्यामध्ये अशा गोष्टी होणारच. कधी रिटायर्ड हर्ट व्हावं लागतं, कधी इंज्युरी होते, कधी अवस्था वाईट होते. माझी मूळ योजना २०- २१ दिवस सायकल चालवण्याची होती, पण फक्त ८ दिवस चालवू शकलो. एका प्रकारे क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतली पहिली मॅच मी जिंकली, दुस-या मॅचचे पहिले तीन दिवस चांगले गेले आणि शेवटी ती मॅच ड्रॉ झाली. आणि बाकीचे दोन मॅचही रद्द झाले. म्हणजे एकूण १-० अशी ह्या मालिकेची स्कोअरलाईन! पण निराशेबरोबरच मला जवळजवळ लोसरपर्यंतच्या ह्या अविश्वसनीय प्रवासाचा अभिमानही वाटत राहील, अचिव्हमेंटची जाणीवही नेहमी राहील.

लोसरला असताना रात्री एक भितीदायक स्वप्न पडलं! असं दिसलं की, मी अशाच निर्जन आणि दरीलगतच्या चढाच्या रस्त्यावरून जातोय. आणि काही कारणामुळे मला रात्री तिथेच थांबावं लागलं! अगदी जास्त भिती वाटून दचकून जाग आली! डोळे उघडले तेव्हा दिसलं की, हॉटेलच्या खोलीत बाहेरून मंद प्रकाश येतोय आणि तो मंद प्रकाश जवळच्या डोंगरावर असलेल्या गोंपाच्या दिव्याचा आहे! पुढचे अनेक दिवस सायकलीवर चढाच्या रस्त्याचे स्वप्न पडत राहिले! ७ ऑगस्टच्या सकाळी लवकर तयार झालो. हॉटेलचं बिल पे केलं. बस ठीक सात वाजता आली. आणि येण्याच्या आधी दूरवरून येताना दिसतही होती! पण बस खचाखच भरलेली आहे. आधी वाटलं होतं की, सायकलची पिशवी बसच्या मधल्या पॅसेजमध्ये किंवा ड्रायव्हरच्या बाजूला ठेवता येईल. पण तिथे जागाच नाहीय. सगळ्या प्रवाशांचं खूप सामान आहे. त्यामुळे नाइलाजाने सायकलीची पिशवी कशीबशी बसच्या वर चढवली. ड्रायव्हर आणि कंडक्टरनेही हात लावला आणि सायकलीला वर चढवू शकलो. आधीच पिशवीला दोरी लावली होती, त्यामुळे तिथे बांधता आली. पण आता भिती ही आहे की, समोरच्या उखडलेल्या रस्त्यावर (रस्ता?) ती तिथे नीट राहील ना? लोसरवरून बस निघाली तेव्हा बसायला जागाही नाहीय. अनेक प्रवासी काज़ावरूनच उभे आलेले आहेत. वा! आता अशा भितीदायक प्रवासाचाही आनंद घेतो.

लोसरपासूनच कुंजुमलाचा चढ सुरू होतो. सायकलवर आलो असतो तर हा माझा पहिला 'ला' ठरला असता! असो! चढ इतका तीव्र असा नाहीय, पण रस्ता अगदीच बाद आहे. अशा न- रस्त्यावर कोणतंही वाहन चालवणं दिव्यच आहे! कुंजुमलाला पोहचायला दोन तास लागले! पण काय बहारदार दृश्ये! ह्या प्रवासात आत्तापर्यंत बर्फ फक्त दूरवर किंवा जवळच्या डोंगरावर बघितला होता. पण आता बर्फ अगदी जवळ आणि नंतर तर खालच्या बाजूलाही दिसतोय. ४५५० मीटर! इथे कुंजुमला माता मंदीराला प्रत्येक वाहन परिक्रमा करून पुढे जातं. बसही इथे थोडा वेळ थांबली. थोडा वेळ कुंजुमला बघितला! इथून आता ग्राम्फूपर्यंत जास्त उतार असणार. पुढे गेल्यावर चंद्रतालवरून येणा-या चंद्रा नदीचंही दर्शन झालं (चिनाब अर्थात् चंद्र- भागामधली चंद्रा नदी). पण हे काय! रस्ता इतका अरुंद आहे की, अनेक जागी वळताना ड्रायव्हरला बस रिव्हर्स घेऊन वळवावी लागतेय! तेव्हा कुठे ती त्या अरुंद जागेतून पुढे जाऊ शकतेय! मी बसच्या शेवटच्या सीटजवळ उभा आहे, त्यामुळे प्रत्येक वळणानंतर मागे वळून बघतोय! सायकलीसाठी मात्र हा रस्ता इतका विपरित वाटत नाहीय. मला जमलं असतं? पण थांब मित्रा, इतकं लवकर नको ठरवूस! उचंबळून वाहणा-या चंद्राच्या बाजूने रस्ता जातोय आता! काय नजारे, अहा हा! स्पीतिनंतर आता लाहौल येणार आहे!

एका जागी बसने छोटासा पूल ओलांडला. मागे वळून बघितल्यावर दिसलं की, त्या पुलाच्या पुढेच एक खड्डा होता आणि बस चालकाने 'तसाच' तो रस्ता ओलांडला आहे!! ... काही वेळाने बातल आलं. बातल लोसर ते ग्राम्फू ह्या ५० किलोमीटर ट्रॅकचा मध्यबिंदू आहे आणि इथूनच चंद्रतालचा ट्रॅक सुरू होतो. दोन ट्रेकर इथे उतरले आणि मला बसायला जागा मिळाली. थोडा वेळ रस्ता ठीक वाटला. म्हणजे सायकलवर जाता येईल असा! पण हळु हळु रस्त्याच्या जागी फक्त ट्रॅक उरला आणि बाजूला सर्वत्र दरी, डोंगर, धबधबे आणि ग्लॅशिअर्स सुरू झाले. तेव्हा हळु हळु इथे सायकल चालवता न आल्याची 'खंत' दूर होत गेली! आणि परिस्थिती इतकी बदलली की, चक्क आनंद वाटायला लागला की, बरं झालं, माझ्या मनाचं देव भलं करो ज्याला इथे सायकल न आणण्याचं सुचलं! एक सायकलिस्ट म्हणून असलेली अस्मिता अगदीच बाजूला राहिली आणि स्वत:ला धन्यवाद द्यावेसे वाटले, बेटा बरं झालं इथून बसनेच जातो आहेस! मध्ये मध्ये तीव्र वेगाने वाहणारे धबधबे यायला सुरुवात झाली! काही जागी ट्रॅकवर मोठे खड्डेही आहेत. त्यामुळे दोनदा बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवलं. आम्हांला पायी पायी जाऊन तो भाग पार करावा लागला. चप्पल असल्याचा फायदा झाला. एक क्षण भितीही वाटली. पण इतके लोक सोबत असल्याने ते धबधबे पार करता आले! थंड पाण्याचे तीव्र प्रवाह- त्यातूनच तो न- रस्ता जातोय. मध्ये काही खडकही आहेत. त्यावरूनच चालत जायचं आहे. इथे प्रवाशांना उतरावं लागलं कारण ह्या खड्ड्यामध्ये बसचं टायर दोन- तीन फूट आत जातं. जर प्रवासी बसलेले असतील, तर बस तिथे अडकू शकते! ह्याच दृश्याला वन्स मोअर मिळाला! कुंजुमला टॉपनंतर हा रस्ता उंच पर्वत आणि दुर्गम ग्लेशियर्सच्या मधून खाली उतरत जातो, त्यामुळे अनेकदा पाणी ह्या रस्त्यावरून वाहतं. अनेक धबधबे क्रॉस होतात! जर इथे मला सायकल चालवण्याची दुर्बुद्धी झाली असती, तर हा सर्व टप्पा पायी पायीच जावा लागला असता! कुठल्याही वाहनासाठी हा टप्पा पार करणं जोखमीचंच आहे. एका बाजूला धबधबे- ग्लेशियर्स आणि दुसरीकडे दरीत वाहणारी चंद्रा! सोबतच्या प्रवाशांनी सांगितलं की, छोटा दर्रा आणि बड़ा दर्रा अशा जागी हे धबधबे ओलांडावे लागतात. पुढेही असाच एक होता, पण तिथे प्रवाशांना खाली उतरावं नाही लागलं! बसमध्ये एका प्रवाशासोबत गप्पा झाल्या. तेव्हा कळालं की तो लेहचा आहे आणि देहरादूनला जॉब करतो. मग त्याच्यासोबत कलम ३७० आणि लदाख़चे विषय ह्याविषयी गप्पा झाल्या!

... ह्या धोकादायक टप्प्यावर सायकलीची खूप काळजी वाटते आहे. सुरुवातीला कुंजुमलासाठी रस्ता जेव्हा वर चढत होता, तेव्हा सायकल फेकली जाण्याची भिती होती. किंवा दोरी सुटण्याची भिती होती. जेव्हा रस्ता डोंगराला लागून नैसर्गिक बोगद्यांमधून जात होता, तेव्हा वरच्या डोंगराला ती घासणार तर नाही, अशी भिती वाटली! सायकलवर फारच अत्याचार होत आहेत! पण ती सर्व सहन करतेय आणि इतकंच म्हणतेय- कुछ ना कहो, कुछ भी ना कहो! खूप वेळाने छत्रू आलं. चंद्राच्या किनारी असलेलं हे एक छोटं ठिकाण. गाव नाही म्हणता येणार, पण एक टेंट कॉलनी आहे. अनेक कँप्स आहेत. प्रवाशांनी इथे नाश्ता केला. मनालीपर्यंतच्या पहाड़ी रोडवर उलटीची भिती असल्यामुळे मी आज अन्नाला स्पर्शही केला नाही आहे. थोडा वेळ छत्रूमध्ये पाय मोकळे केले. अगदीच अजब स्थान! वाचलो मी! जर सायकलवर आलो असतो तर म्हणावं लागलं असतं- चंद्रा तेरा गाँव बड़ा प्यारा, मै तो गया मारा, आके यहाँ रे! अनेक तास अशा रूटवर गेल्यावर हळु हळु डेस्परेशन सुरू झालं की, कधी एकदा हा पॅच पूर्ण होतो आणि मनाली- लेह हायवे सुरू होतो! छत्रूनंतर ह्या न- रस्त्याने चंद्रा ओलांदली आणि चढ सुरू झाला! मला त्याचा अंदाजच नव्हता. माझ्या मॅप आणि रूटनुसार मनाली- लेह हायवेवर असलेल्या ग्राम्फूपर्यंत उतारच असायला हवा होता! ह्या रूटवर माझा प्लॅन अगदीच फेल गेला असता. एक तर इथे दिवसामध्ये ५० काय, २५ किलोमीटरही करणं कठीण गेलं असतं. त्यामुळे सायकल चालवत लोसरवरून आलो असतो, तर बातल आणि मग बातल- चंद्रताल- बातल आणि पुढच्या दिवशी बातल- छत्रू असे छोटे टप्पे करावे लागले असते. असो! पण त्याची खंत तर नाहीच, त्यातून वाचल्याचा आनंदच वाटतोय! असो!

छत्रूच्या पुढेही दुर्गम वाट सुरू राहिली. अगदीच बिकट वाट आहे! परत एकदा अरुंद वाटेवर रिव्हर्स घेऊन बस जातेय पुढे. बाजूलाच ही दरी! इथे बर्फही खूप दिसतोय. स्पीति एक कोरडा वाळवंत आहे, त्यामुळे तिथे बर्फ रेषा जास्त वर आहे. पण लाहौलमध्ये हिरवाई आहे आणि पाऊसही पडतो, त्यामुळे बर्फ रेषा थोडी खाली असते. खूप वेळ ड्रायव्हरकडेच बघत राहिलो. अगदीच अशक्य रस्त्यावरून व वळणांवरून तो सहज गाडी दामततोय! अनेकदा तर तो एक हात सोडून आणि आजूबाजूला बसलेल्यांकडे बघत गाडी चालवतोय! नंतर नंतर तर रस्ता इतका काही वळतोय की, समोरचा रस्ताच दिसत नाहीय! तेव्हा वाटलं की, जणू ड्रायव्हर आकाशातच बस चालवतोय! तेव्हा मात्र डोळे मिटून घेतले! "वाट बघण्याशिवाय" दुसरं काहीच करूही तर शकत नाही! तेव्हा हे गाणं मात्र आठवलं-

अन्जाने सायों का राहों में डेरा है|
अन्देखी बाहों ने हम सबको घेरा है|
ये पल उजाला है बाक़ी अंधेरा है|

आणि हा अंधार ग्राम्फूपर्यंत सुरू राहिला. जेव्हा ग्राम्फू आलं, तेव्हा अचानक अगदी वेगाने एक ट्रक बाजूने गेला. तेव्हा कळालं की, 'हायवे' आला. तेव्हा मात्र सुटकेचा निश्वास घेतला! आता एक प्रकारे भटक्यांच्या प्रदेशातून पर्यतकांच्या प्रदेशामध्ये (सुखरूप) पुनरागमन झालं! तसं बघितलं तर स्पीतिचा रस्ताही (रिकाँग पिओकडून स्पीतिकडे येताना) मनाली- लेह हायवेपेक्षा दुर्गमच मानला जातो. स्पीतिमधले लोक तर मनाली- लेह हायवेला टूरीस्ट हायवेच म्हणतात. त्या अर्थाने मी लोसरपर्यंतसुद्धा ब-याच दुर्गम रस्त्यावरच सायकल चालवली आहे. तिथून पुढे मध्ये असलेला हा "फक्त" पन्नास किलोमीटरचा पॅचच सगळ्यांत जास्त दुर्गम आहे. मनाली- लेहपेक्षाही जास्त दुर्गम. हायवेवर आलो तेव्हा दुपारचे बारा वाजत आहेत. फक्त ५० किलोमीटरसाठी बसला पाच तास लागले. ग्राम्फूमध्ये नेटवर्कही सुरू झालं! काही प्रमाणात परत एकदा बाहेरच्या जगामध्ये पुनर्प्रवेश झाला! रोहतांगलाच्या आधीही अनेक जागी हायवे कच्चा आहे. मध्ये मध्ये बाईकर्स आणि सायकलवालेही दिसत आहेत. रोहतांगला! वाह! इथेही खूप जास्त बर्फ मिलाला. तसा कुंजुमलाच्या पुढे सतत बर्फ दिसतोच आहे. आता प्रतीक्षा आहे मनालीची. पण रोहतांग उतरल्यावर दोन तास जाम लागला. नंतर दिसलं की, तीव्र पावसामुळे रस्त्याचा भाग वाहून गेला होता! त्यामुळे अनेक किलोमीटर लांब जाम लागला! पहिल्यांदा इकडे येतो आहे! मनाली जवळ आल्यावर बियाससुद्धा भेटायला आली! वाह! संध्याकाळी पाचला मनालीला पोहचलो!

इकडे सायकल चालवली नाही, पण सायकलीच्या पिशवीला बसमधून तर आणावं लागलं. आणि नशीब चांगलं, सायकलीला काहीही झालं नाही. सायकल चढवताना ड्रायव्हर- कंडक्टर्र्सनी मदत केली होती. उतरताना जेव्हा अडचण आली, तेव्हा एका अनोळखी व्यक्तीने मदत केली आणि सायकल बसवरून खाली घेतली! त्याला धन्यवाद द्यायला गेलो तोपर्यंत तो गर्दीत निघूनही गेला! ड्रायव्हरला मात्र (कोपरापासून) नमस्कार आणि सॅल्युटच केला. हिमाचलच्या बसेस आणि तिथले ड्रायव्हर्स! बस, नाम ही काफी है!!! इथून वॉल्व्हो बस स्टँडवर रिक्षाने गेलो. सायकल पिशवी रिक्षात मावते. इथून प्रायव्हेट वॉल्व्होमध्ये सीट बूक केली. ती लगेचच जवळून निघत होती. सायकलीचं पोतं घेऊन तिकडे जायला निघालो. पण हे २१ किलोचं धूड (सायकल + थोडं सामान) घेऊन थोडंही दूर जाणं सोपं नाही! इथेही एका अनोळखी माणसाने माझी मदत केली. ज्याच्याकडे तिकिट बूक केलं होतं, तोच माझ्याकडे आला आणि जवळच असलेल्या बसपर्यंत सोबत केली. मनाली फार महाग असल्यामुळे इथे न थांबता सरळ पुढे निघालो. दिल्लीची व्हॉल्व्हो घेऊन अंबालापर्यंतचा प्रवास सुरू केला. आता हळु हळु हिमालयाचा निरोप घेईन. आज नशीब चांगलं म्हणायचं! ह्या न- रस्त्याने तितका त्रास दिला नाही. उलटीचं तर लक्षणही जाणवलं नाही आणि सायकलही सकुशल राहिली! आता लवकरच बाबा हिमालयांची आज्ञा घेऊन धरणीमातेच्या कुशीत यायचं आहे! आज मनालीपर्यंतचा भयाण बस प्रवास हासुद्धा साहसी ट्रेकपेक्षा कमी नाहीय! ह्या भागामध्ये कोणत्याही वाहनाने प्रवास करणं, फक्त वाहनामध्ये बसणं हेही बिकटच आहे. आणि कमकुवत मनाच्या लोकांसाठी तर हे नाहीच आहे! असो! हिमालयातून परतताना मनात विचार आहेत ह्या सायकल प्रवासाच्या relevance बद्दल. ही फक्त सायकल मोहीम नव्हती तर एक सामाजिक हेतु असलेली मोहीमही होती. त्या संदर्भातही ही मोहीम काही प्रमाणातच सफल राहिली. आणि बाकी जी मोहीम अर्धवत राहिली, त्यासंदर्भात त्या वेळी अंत:प्रेरणेनुसार जो निर्णय घेतला, त्याचा अर्थ दोन आठवड्यांनी कळाला- जेव्हा मनाली- लेह रस्ता पन्नास तास बंद पडला होता... त्या सगळ्यांबद्दल पुढच्या व ह्या लेखमालेच्या अंतिम भागात बोलेन.

पुढील भाग- सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ११ (अंतिम): ह्या प्रवासाविषयी विहंगावलोकन

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

समाजक्रीडाआरोग्य

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

10 Oct 2019 - 8:49 pm | यशोधरा

हा भागही आवडला.

सुधीर कांदळकर's picture

11 Oct 2019 - 11:31 am | सुधीर कांदळकर

आणि प्रत्ययकारी लेखमाला आवडली. सायकल गुंडाळून बसने जाण्याचा आपला निर्णय अचूक ठरला. खरेच थरारक असा बसप्रवास दिसतो आहे हा.

प्रवासाच्या यशापयशाचे निर्लेप मूल्यमापन पण आवडले. असेच प्रवास करीत राहा आणि इथे लेखमाला लिहीत जा. धन्यवाद.

कोमल's picture

11 Oct 2019 - 1:49 pm | कोमल

ज्जे बात.
त्या दिवसांत मनाली मधून सुखरूपपणे बाहेर पडलात हे बेहेत्तर.
पुभाप्र.

मार्गी's picture

12 Oct 2019 - 3:09 pm | मार्गी

नमस्कार आणि मनःपूर्वक धन्यवाद! :)

जॉनविक्क's picture

12 Oct 2019 - 3:41 pm | जॉनविक्क

नरेश माने's picture

17 Oct 2019 - 12:37 pm | नरेश माने

छान लेखमाला! खुप अवघड प्रवास होता आणि तुम्ही सुखरूप पोहचलात हेही नसे थोडके.