वडील आणि मुलाचे नाते हा एक जिव्हाळ्याचा पण तितकाच अवघड प्रश्न आहे. खास करून मुलगा 'टीनेजर' असेल तर. घड्याळांचा दवाखाना/The Watch Clinic ही अशीच एक कथा आहे वयात येणार्या मुलाची, त्याला भुरळ पाडणार्या रंगीबेरंगी जगाची आणि जगराहाटी सांभाळणार्या त्याच्या बापाची. १०-११ मिनिटांच्या छोट्या फिल्ममध्ये वडील-मुलाचे नाते, त्यांची समांतर विश्वे आणि मुलाची उमज हे सहज आणि सुंदरपणे येते.
घड्याळांचा दवाखाना (मराठी/2009) ह्या शॉर्ट-फिल्मविषयी IMDB वर माहिती मिळाली नाही. दिग्दर्शक विक्रांत पवार ह्यांच्या स्वतःच्या IMDB पेज वरही त्याविषयी माहिती उपलब्ध नाही, पण शॉर्ट-फिल्ममधल्या उल्लेखावरून ती विक्रांत पवार यांची FTII (फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) येथे द्वितीय वर्षाला शिकत असतांनाची शॉर्ट-फिल्म आहे. विक्रांत पवार हे उमेश कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'विहीर' चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक होते. तसेच Afterglow दिग्दर्शित करणार्या कौशल ओझाने घड्याळांचा दवाखानामधे सहाय्यक दिग्दर्शकाची जवाबदारी पार पाडली आहे. घड्याळांचा दवाखाना ही २०१० च्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मधे दाखवली होती आणि इतरही काही सन्मान आणि पुरस्कार ह्या FTII च्या विद्यार्थ्यांच्या शॉर्ट-फिल्मने मिळवले आहेत. हे सगळेच प्रतिभावंत फिल्ममेकर्स आपापल्या जाणिवांची झलक दाखवतात, स्ट्रगल करत राहतात - एखाद्या गाजलेल्या फिल्ममुळे मग ते लोकांपुढे येतात. विक्रांत पवारांचेही कदाचित असेच होईल. असो.
घड्याळांचा दवाखाना ही कथा आहे सदुभाऊ (दिलीप जोगळेकर) आणि त्यांच्या टीनेजर मुलाची - संजूची (आलोक राजवाडे). सदुभाऊंचे कोल्हापूरच्या फडके हौदाजवळ एक घड्याळ दुरुस्तीचे दुकान आहे, त्याला ते 'घड्याळांचा दवाखाना' म्हणतात आणि तशाच निगुतीने घड्याळांची काळजीही घेतात. कॉलेजच्या वयाच्या संजूला मित्र-मैत्रिणींबरोबर मौजमजेची आवड आहे, आणि त्यासाठी लागणारे पैसे वडीलांकडून काय थाप मारून मिळवावे ह्याच्यासाठी मित्राबरोबर विचार करतोय. बाप व्यवहाराला पक्का असल्यामुळे अशी-तशी थाप पचणार नाही याचे भान त्याला आहे. सदुभाऊ सचोटीने दुकान चालवतात, आजुबाजूच्या लोकाविषयी त्यांना आस्था आहे, लोकांच्या अडीअडचणीला मदत करायचा चांगुलपणा त्यांच्याकडे आहे. इतर दुकानदारांमधेही त्यांना मान आहे, त्यांच्या शब्दाला वजन आहे. असा हा बाप, इतर कशाला नाही तर नेमके कशाला पैसे काढेल याचा अचूक अंदाज संजूला आहे. असाच एक फर्मास प्लॅन बनवून तो दुकानात येतो.
शॉर्ट-फिल्मची कथा दिग्दर्शक विक्रांत पवार यांचीच आहे, पटकथा त्यांनी राधिका मूर्तींबरोबर लिहिली आहे. विशेष म्हणजे, ही शॉर्ट-फिल्म पूर्णपणे स्टुडीओत चित्रित केली आहे. तरीही घड्याळ दुरुस्तीचे दुकान अतिशय हुबेहुब साकारले आहे. तिथला पसारा, तिथली आयुधे, साधने, त्यांचा दिलीप जोगळेकर यांनी केलेला सराईत वापर ह्या सगळ्यांनी अगदी नेमकी वातावरण निर्मिती केली आहे; इतकी की खरंच तिथे काही मिनिटांपुर्वी घड्याळ दुरुस्त होत असेल याची खात्री वाटते. ह्याचे श्रेय आहे कला-दिग्दर्शक आशुतोष कविश्वर आणि सेट डिझायनर लक्ष्मी केळूसकर यांचे. तशीच दखल घ्यावी लागते ह्या शॉर्ट-फिल्ममध्ये वापरलेल्या पॅरॅलल-कट्सची (ज्यात एकाच वेळी दोन वेगवेळ्या ठिकाणी होणार्या घटना समांतरपणे दाखवल्या जातात) - ह्या संकलनाच्या तंत्राद्वारे मुलगा आणि वडील यांची समांतर आयुष्ये छान रेखाटली आहेत, संकलन आहे मोनिषा बलदावा यांचे. मुलाचे सायकलीच्या चाकाशी खेळणे आणि वडिलांचे घड्याळाच्या चक्रांमधले काम हे समांतर पाहतांना शब्दांशिवायच त्यांचे जगणे, त्यांचे विश्व मनावर ठसते. आलोक राजवाडे आणि दिलीप जोगळेकर हे दोघेही मुलगा आणि वडिलांच्या भुमिकेत फिट्ट बसतात. दोघांनीही, खास करून आलोकने भुमिका सुरेख निभावलीय. दिग्दर्शक तसेच इतर तंत्रज्ञांनीही विद्यार्थी असतांना आपापल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे.
तर सविस्तर प्लॅन बनवून संजू वडिलांच्या घड्याळ दुरुस्तीच्या दुकानात येतो, सायकलच्या किल्लीशी चाळा करत परगावच्या मित्राच्या अपघाताविषयी वडिलांना सांगून २००० रुपये मागतो. थोडी चौकशी करून वडील, सदूभाऊ दुकानात जमलेले १५०० रुपये देतात, आणि उरलेले ५०० रुपये घरातल्या कपाटातून घ्यायला सांगतात. तेवढ्यात काही कारणाने त्यांना दुकानाबाहेर जावे लागते म्हणून थोडा वेळ संजूला दुकानात थांबायला सांगून ते निघून जातात. शिवाय एक आजोबा त्यांचे दुरुस्तीला टाकलेले घड्याळ घ्यायला येतील, त्यांना ते देऊन त्यांच्याकडून पैसे घे असेही सांगून जातात. ते आजोबा येतात, आणि त्यांच्याशी बोलता-बोलता संजूला पैशाचे मोल जाणवते. अगदी रुपयासाठीही अस्वस्थ होणारे आजोबा, त्यांचा चांगुलपणा तो स्वतः अनुभवतो. बाप पै-पै करून कमवतोय, पैसे जमवतोय हेही त्याला उमगते - हे सगळे अगदी सहजपणे, शब्दबंबाळ लेक्चर न देता दिग्दर्शकानी दाखवलंय. कुठल्याही विशिष्ट रकमेची, मग ते २० रुपये असोत, २००० रुपये असोत की २ लाख, तिची नेमकी किंमत context मधेच समजून घेता येते. वडील दुकानातून घेल्यानंतरच्या थोड्या वेळात संजूला २००० रुपयांची नेमकी किंमत, त्याचं context समजून येते.
शेवटी सायकल घेऊन दुकानातून परतणार्या पाठमोर्या संजूच्या देहबोलीत त्याची उमज जाणवत राहते. टायटलच्या सुरेल सुरावटीसारखी ती जाणीव कुठेतरी आपल्या मनातही उतरते आणि रुंजी घालत राहते.
प्रतिक्रिया
4 Oct 2019 - 1:24 pm | यशोधरा
साधी, सहज सुंदर फिल्म.
इथे शेअर केल्याबद्दल आभार मनिष.
4 Oct 2019 - 4:05 pm | सुमो
In Short ही तुमची लेखमाला आगळ्या वेगळ्या लघुचित्रफितींची उत्तम ओळख करुन देत आहे.
पुभाप्र
4 Oct 2019 - 5:28 pm | खिलजि
सुंदर आहेत दोन्हीही .. पण आफ्टरग्लो एकदम जब्बरदस्त भौ.. कसले कलाकार हैत राव .. काय ती कामं केलियात .. मानलं राव त्यांना .. मेरा फुल वोट , आफ्टरग्लो को जाता है .. धन्यवाद माहित करून दिल्याबद्दल ..
4 Oct 2019 - 9:46 pm | मनिष
खरं आहे. आफ्टरग्लो कथा, ट्रीटमेंट आणि अभिनय, सर्वांगाने अतिशय सुरेख आहे.
5 Oct 2019 - 9:22 pm | अलकनंदा
फार सुरेख चित्रफीत. अतिशय आवडली.
7 Oct 2019 - 1:08 pm | मनिष
सर्वच प्रतिसाद देणर्यांना धन्यवाद.
परवा एका शॉर्ट-फिल्मच्या ग्रुपवर मीच लिहिलेल्या आफ्टरग्लो मधले २ पॅरा आले, यूट्युब लिंकसोबत - हे वाच तुला आवडेल म्हणून! :-)
7 Oct 2019 - 1:26 pm | यशोधरा
Lol! सांगितले नाहीस का मग?
7 Oct 2019 - 1:49 pm | मनिष
लिंक पाठवून दिली. फक्त थंब्स-अप आले, बहुदा लिंक उघडली नसावी! :P
10 Oct 2019 - 9:52 am | यशोधरा
कठीण आहे! LOL!
10 Oct 2019 - 7:51 am | सुधीर कांदळकर
वाचतो आहेसे वाटले. हेमू अधिकारींना पाहून काही स्मृती चाळवल्या:
प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरासमोर प्रभादेवी इंडस्ट्रीअल इस्टेट आहे. एका औषध कंपनीसाठी टॅब्लेट डीटी टेस्टींग मशीन, इन्स्पेक्षन बेल्ट, टायट्रीमीटर इ. उपकरणे खरेदीसाठी कॅम्पबेल इलेक्ट्रॉनिक्स नावाच्या कंपनीत गेलो होतो. तिथे एका मध्यमवयीन गृहस्थांनी त्या उपकरणांची माहिती, किंमती, पैसे देण्याच्या अटी वगैरे तपशील दिले. परचेस ऑर्डर आणि आगाऊ रक्कम पाठवतो असे सांगून त्यांचे नाव विचारले. नाव होते हेमू अधिकारी. नंतर ते काही नाटकात, दूरदर्शनवर दिसले होते.
धन्यवाद.
10 Oct 2019 - 3:52 pm | मनिष
अरे वा. हे नव्हते माहित हेमू अधिकारींबद्दल. मीही त्यांना इतरही काही चित्रपटात पाहिले आहे असे वाटते.
21 Oct 2019 - 1:41 pm | चौथा कोनाडा
वाह, मनिष ! अतिशय ओळख करून दिलीय ! क्लासिक रसग्रहण !
या धाग्यामुळे मी हा दवाखाना आवर्जून पहिला. खूप आवडला !
(फिल्म स्टुडीओत चित्रित केलीय हे सांगितल्यावरच कळतं हे सेट डिझायनरचं मोठं यश ! )