कॉलेज मध्ये असताना मला अनेक भाषा फाडायला मिळाल्या. कोकाट्याच्या फाडफाड इंग्लिश बरोबरच मी फाडफाड ( तोंडात रोसोगुल्ला ठेवून फॉडफॉड) बंगाली, असामीज आत्मसात कि भस्मसात केली माहित नाही. पण ह्या माझ्या गुणांमुळे मी नॉर्थ च्या खूप मैत्रिणी जमवल्या होत्या. त्यांचे राहणीमान आपल्यापेक्षा खूप वेगळे. त्या दिसायला पण इतक्या वेगळ्या कि नेपाळी किंवा तिबेटियन ,म्हणून सहज खपतील.
बसके नाक आणि बारीक मिचमिचे डोळे. आता विचार करा ह्या डोळ्याच्या इवल्याश्या फटीतून डोळ्याचे हाव भाव कसे दिसतील? इमॅजिनेशन करून झाले असेल तर सांगते खूप छान दिसतात. अगदी जसे च्या तसे, पाहण्याची कला आपल्यात हवी. तर ह्या सगळ्या मध्ये माझे बस्तान मस्त जमवून गेले. मराठी असण्याचा बराच फायदा झाला. कानडी आणि तेलगू मुलींशी कडकड बोलायला सहज जमायचे कारण ( हि सोलापूर ची देणगी) आणि सगळ्या नॉर्थ इंडियन मुलींना प्रथम दर्शनी मी तिकडची वाटायचे. फक्त मी हिंदी बोलायला घेतले कि पार कचरा व्हायचा. ( शाळेत तिसरी भाषा संस्कृत होती) माझे हिंदी म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीत मुंबई ला जे काही कानावर पडले तेवढेच. कहां हो? ला माझे उत्तर असायचे तेरे पासीच आरेली थी. आता हे असे ऐकल्यावर ऐकणारा गारं गार!!
त्यातल्या काही जणी ग्रॅजुएशन करून आलेल्या होत्या तर काही बारावी नंतर. माझ्या सारखे १० पास अगदी २ किंवा तीनच. त्यामुळे हॉस्टेल चे शेंडेफळ च म्हणा ना. सगळ्यांचे निरोप पोस्त करण्या पासून सगळी फुटकळ कामे माझ्या खात्यावर जमा झाली. लाड हि तितकेच झाले. फर्स्ट इयर ते फोर्थ इयर पर्यंत मी फक्त जेवण (भात आणि रस्सम ) वाढून आणायचा आणि त्यावर तुपाची धार आणि उकडलेल्या भाज्या घालून माझी एक मैत्रीण तो छान कालवून द्यायची. वरून "ले मुटी खा" ( मोटी चा असामी उद्गार - तेंव्हा चे माझे वजन ४५ किलो). पहिल्या आठवड्यात सगळ्यांचे रॅगिंग झाले पण मी त्यातून सुटले कारण माझी रूम मेट खूप चांगली होती. तिने मला सांगितलेच नाही. ७. ३० ला रात्रीचे जेवण झाले कि ८ च्या ठोक्याला मी झोपून जायचे.
माझ्या खाण्यासारखी माझ्या गाण्याची प्रॅक्टिस एक कानडी मैत्रीण घ्यायची. तिचे अणे माझे छान जमायचे कारण एक ती पण माझ्या सारखी १० पस होऊन आलेली, तिला हिंदी येत होते आणि ती कर्नाटक संगीतात प्राविण्य असलेली होती. ( शेवटची २ करणे जास्त महत्वाची आहेत) गाणं हा माझा गणितासारख्या अनाकलनीय विषय होता. ( दोन्ही ला कारण शिक्षक हेच आहे) ती बिचारी सारखी आरती श्रुती मे गा म्हणायची आणि मी किधर है श्रुती? माझ्या गाण्याचं रडगाणं काही फार सांगण्यासारख नाही ते पण ते कम्पल्सरी होतं त्यामुळे शिकल्या सारखा करावं लागत होत.
डान्स प्रॅक्टिस खरंच खूप कठीण होती पण मी मुळातच काटक असल्याने मला त्याचा कधीच त्रास झाला नाही आणि थेअरी चे संस्कृत श्लोक सहज जमत होते. इथे माझ्या असामी मत्रिणीला अहो परिश्रम घडले. तिला र, स, च ट अजिबात म्हणता येत नव्हते. तुम्ही म्हणून बघा जमते का, किट्टतक धरी किट तोम असा सलग तीन वेळा..... तर ह्या माझ्या मैत्रीण परिवारामध्ये एक असामी, एक कानडी एक तेलगू एक बंगाली आणि एक मल्याळी होती.
माझे कॉलेज आणि हॉस्टेल हे अगदी शेजारी समुद्र किनारी आहे. रवींद्रनाथ टागोरांचे शांतिनिकेतन आणि रुक्मिणी देवींचे कलाक्षेत्र -अतिशय रम्य ठिकाणे.
संपूर्ण शाकाहारी जेवण आजी ते हि मद्रासी पद्धतीचे...आठवड्याचे ७ दिवस नाश्त्याला इडली डोसा इडली डोसा हेच. मग तिथून बाहेर पडल्यावर मी इडली कायमची बॅन केली होती ती २० वर्षांनी पुन्हा सुरु केली ( कारण फक्त एकाच, लवकर होते) संतुलित आहार आणि विहार ह्या प्रकारात मोडणारे. तर माझ्या ह्या असामी मैत्रिणीचे त्यामुळे भलतेच हाल होत होते. आम्हाला महिन्यातून एकदाच बाहेत जात येत होते. शनिवारी कॉलेज अर्धा दिवस असायचे. रूम वर आले कि सगळे जण भराभर यावरून जेवण्याचा मेस मध्ये जायचे. कारण माच्या वॉर्डन चे सगळ्यांवर बारीक लक्ष असायचे. तिच्या हिट लिस्ट वर नाव नको म्हणून जेवल्यासारखे दाखवून दुपारी १ ला बाहेर पडायचे ते थेट नेहमीचे रेस्टॉरंट गाठून हिची ऑर्डर सुटायची सिकन मटन फीस .......
आमच्या कानावर वारंवार पडणारे काही मजेशीर शब्द.....
चाई चाई सलो सलके साय पिते है - साई साई चलो, चलके चाय पिते है. ( साई हे दुसऱ्या मैत्रिणीचे नाव)
संध्याकाळी चहा च्या वेळी हमखास माझ्या चहा वर जाड साय आलेली असायची आणि साय पियो वर काय सांगावे प्रश्न पडायचा.... चाय पै साय आई है कि साई पै चाय आई है?
इडली धोशा , बरा शामबार ( वडा सांबार), लाबण्या ( लावण्या ), खुसरा है क्या म्हणजे चिल्लर आहे का?, खुसुर पुसूर म्हणजे कुजबुज.
हॉस्टेल मध्ये तर सगळ्या भाष्यांची खिचडी होती. मुख्य तामिळ अन त्या खालोखाल मल्याळम. मल्याळम शी दोन हात करायला गेले तेंव्हा तामिळ एकदम सोप्पी वाटू लागली. एन्द पेट्टी चे पट्टी चुकून व्हायचे आणि हसण्याचा महापूर यायचा. तामिळ मध्ये जेवण म्हणजे सापाड आणि आणि दूध म्हणजे पाल - हे दोन शब्ध मला कधी आवडले नाहीत ते त्याच्या मराठी अर्थांमुळे... पाल वेणूम? म्हणजे दूध हवे का ह्या प्रश्नावर अंगावर पाल पडल्यासारखे माझे तोंड व्हायचे.
माझा भाषेचा एन्काऊंटर असाच पुढे फ़्रेंच वेस्ट इंडिज मध्ये सुरु राहिला त्याबाद्दर परत नंतर कधीतरी.
प्रतिक्रिया
27 Sep 2019 - 12:20 pm | अनिंद्य
@ मृणमय
तुम्ही भाषाश्रीमंत आहात आणि तुमच्या भाषाभगिनी धमाल आहेत. :-)
लेख मात्र काहीसा घाईत आटोपल्यासारखा वाटला.
फ्रेंच वेस्ट इंडिज बद्दल जरूर लिहा पुढे.
शुभेच्छा,
अनिंद्य
27 Sep 2019 - 12:28 pm | श्वेता२४
छान आहेत आठवणी. अजुन लिहा.
27 Sep 2019 - 12:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
छान लिहिले आहे.
फ्रेंच वेस्ट इंडिज बद्दल जरूर लिहा, वाचायला आवडेल.
27 Sep 2019 - 12:34 pm | संजय पाटिल
और आंदो...
27 Sep 2019 - 6:10 pm | भंकस बाबा
छान लिहिले आहे.
लिहित रहा
27 Sep 2019 - 6:11 pm | भंकस बाबा
छान लिहिले आहे.
लिहित रहा
27 Sep 2019 - 6:41 pm | विजुभाऊ
अरे छान लिहीताय.
27 Sep 2019 - 7:01 pm | राजे १०७
किती सुंदर लिहिले आहे. डिटेल्स जश्या की कोणत्या शहरात, कोणता कोर्स, संस्था पाहिजे होते. थोडं सावकाश मोठा भाग लिहायला हवा होता. धन्यवाद.
27 Sep 2019 - 7:40 pm | बॅटमॅन
ते "chutia" नामक आसामी आडनावावरून मागे झालेले फेसबुक कांड माहिती असेलच आपल्याला?
त्याचा उच्चार लेखातल्या उदाहरणांप्रमाणेच "सुतिया" असा आहे.
https://www.firstpost.com/tech/news-analysis/if-your-last-name-is-chutia...
The All Assam Chutia Students' Union नामक संस्था अस्तित्वात आहे ही मोलाची माहितीही तिथूनच मिळाली. =)) =)) =)) =))
28 Sep 2019 - 9:13 am | सुधीर कांदळकर
हे ठाऊक आहे. इथे भाषाही फॅन्सी ड्रेस खेळते. मज्जाच मज्जा. आवडले. धन्यवाद. पुलेशु
28 Sep 2019 - 1:06 pm | पद्मावति
छानच लिहिलंय. अजून वाचायला आवडेल. पु.ले.प्र.
30 Sep 2019 - 5:09 am | मृणमय
धन्यवाद, हे पु. ले. प्र. काय आहे?
30 Sep 2019 - 9:45 am | मोहन
पु.ले. प्र. - पुढील लेखाच्या प्रतीक्षेत
29 Sep 2019 - 12:16 am | चांदणे संदीप
हम वाचते रहेंगे. :)
सं - दी - प
29 Sep 2019 - 5:23 pm | मुक्त विहारि
छान लिहिलंय
29 Sep 2019 - 7:31 pm | उपेक्षित
एकदम खमंग लेख बघा, मजा आली वाचायला.
1 Oct 2019 - 10:40 am | अरिंजय
सिकन मटन खुखुशीत झालंय. ते फ्रेंच आणि वेस्टइंडिज चं भरीत पण येऊ द्या लवकर.
1 Oct 2019 - 11:12 am | मृणमय
आता खरंच लिहाव लागणार दिसतंय!!
1 Oct 2019 - 5:24 pm | समीरसूर
बर्याच दिवसांनी अतिशय वेगळ्या विषयावर खुसखुशीत लेख वाचायला मिळाला! तुम्ही छान लिहिता. अगदी सहज, ओघवते, चटकन भावणारे, आणि मनोरम! आपले भाषाकौशल्य कौतुकास्पद आहे. अनेक भाषा बोलू शकणार्यांचा मला हेवा वाटतो. दैवी देणगी आहे ती! ज्यांना लोकांच्या हृदयात डोकावून त्यांची स्पंदने ऐकायला जमतं त्यांनाच विविध प्रकारच्या भाषा अवगत होऊ शकतात.
लेख मोठ्ठा असता तर अधिक चांगले वाटले असते. अजून येऊ द्या!
3 Oct 2019 - 9:02 am | नंदन
लेख अतिशय आवडला. वर अनेक प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे, फ्रेंच वेस्ट इंडिजमधल्या अनुभवांबद्दल नक्की लिहा.
अवांतरः लेख वाचून, इथे एम.एस. करायला आलेली एक रुममेटदुक्कल आठवली. त्यातला एक पंजाबी आणि दुसरा उडिया. पंजाब्याचं नाव हरमन आणि उंची, बांधा, वर्ण इ. पाच नद्यांच्या सुपीक प्रदेशातून आल्याची साक्ष देणारं. उडियाबाबूंचं नाव बिरांची आणि एकंदर अवतार पाप्याच्या पितरासारखा ('उर्वशी, उर्वशी' गाण्यातला तो काटकोळा चश्मिष पोरगा आठवावा!).
तर हरमन साहेब एकदा वर्गाबाहेर, मिश्र घोळक्यात, आपण वीकेंडला काय धमाल केली ह्या कहाण्या घोळवून, घोळवून सांगत होते. त्यांच्या दुर्दैवाने, बिरांचीने त्यांना दुरुन पाहिलं आणि 'ए, हॉर्मोऽऽऽऽन!' अशी जोरदार हाळी घातली. एखाद्या पंजाब्याला इतकं ओशाळलेलं त्यानंतर आजवर पाहिलेलं नाही! =)) =))
8 Oct 2019 - 8:42 am | मृणमय
नोर्थ चि नवे पन खूप वेगलि असतात ना, मला आठवत आहे एकिचे नाव लिकामुनि होते..