दिवाळी जवळ आली की आमच्या मुलांच्या टोळ्या तयार व्हायच्या. वसू बारसे पासून देवांना आणि तुळशीला, गायींना ओवाळण्यासाठी अंधार पडला की घरोघरी जाऊन गाणी म्हणत पाच दिवस ओवाळायची पध्दत होती आमच्या गावाला. शेवटच्या दिवशी ज्यांच्या घरी ओवाळलं त्यांच्या कडून सकाळी सकाळी पैसे घेत असू. नंतर सारखे वाटे करून आपापसात वाटून घेत असू. हे पैसे टिकल्या, लवंगी, चिमणी फटाके, भुईचक्कर, टिकल्यांचा पट्टा, शिट्टी विकत घेण्यास खर्च करायचो. कंजूस लोकांच्या घरी मुद्दाम खट्याळ गाणी म्हणायचो. व त्या घरच्या लोकांची जिरवायचो. तर ती गाणी अजूनही तोंडपाठ आहेत.
१) दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी.
गाई कुणाच्या? लक्ष्मणाच्या.
लक्ष्मण कुणाचा? आईबापाचा.
आईबाप कुणाचे? लक्ष्मणाचे.
दे माझी खोबऱ्याची वाटी
नाहीतर घालीन तुझ्या वाघाच्या पाठीत काठी.
२) लांडा साप डोंगरी गेला वो डोंगरी गेला
लांड्या सापानं काडी आनली
काडी मी गाईला दिली
गाईनं मला दुदू दिलं
दुदू मी मोराला पाजलं
मोरानं मला पंखा दिला
पंखा मी देवाला वाहीला
देवानं मला घोडा दिला
घोडा मी चिचंला टांगला
चिचंनी मला बोटूक दिलं
बोटूक मी उखळाला दिलं
उखळानं मला भुगरा दिला
भुगरा मी नदीला दिला
नदीनं मला मासा दिला
मासा मी कुंभाराला दिला
कुंभारानं मला मडकं दिलं
मडकं मी तुळशीला वाहिलं
चिमणीनं खडा मारला फुटून गेलं
( हे गाणं चढत्या सुरात रंगत असे)
३) चिन चिन घाटी गाईच्या पोटी
नव्वद नाडा गुतला गाडा
अदंकारे बुडुक मदंकारे बुडुक
सावळेरामाची कपिली गाय
अर्धा डोंगर चरुन येई
चरचरीत पापडी
तिथं बनवली झोपडी
झोपडीत होता कोल्हा
कोल्ह्यानं मारली खेकडी
गाय बोलवली पोतोळी
पोतोळीचे शेंडेपांडे
आपण दोघे रेशीमगोंडे
रेशीमगोंड्याच्या सावल्या
अशा ठिकाणी मावल्या
पिपाणीला तीन नळ्या
मोघाड्याला चार नळ्या
हानीन बुक्की फोडीन कवाड
जाऊद्या भैरूचं खिल्लार
अजून बरीच आहेत नंतर टंकतो.
प्रतिक्रिया
18 Sep 2019 - 10:25 pm | बबन ताम्बे
आम्ही दिवाळीत पहिले गाणे म्हणायचो हे आठवते.
18 Sep 2019 - 11:05 pm | राजे १०७
धन्यवाद बबन जी.
19 Sep 2019 - 7:17 am | राजे १०७
४) माझी बवळण गाय बरी हो
दूध भरुन देते चरी
चरी चरीत भवरा फिरी हो
गाया राखितो गोयंदा हरी
माझ्या बवळण गाईचे डोळे
जसे लोण्याचे गोळे
माझी बवळण.....
माझ्या बवळण गाईचे कान
जसे नागिणीचे पान
माझी बवळण....
माझ्या बवळण गाईची शिंगं
जशी महादेवाची लिंगं
माझी बवळण...
माझ्या बवळण गाईची पाठ
जशी पंढरीची वाट
माझी बवळण....
माझ्या बवळण गाईचं पोट
जशी भरलेली मोट
माझी बवळण....
माझ्या बवळण गाईची शेप
जशी नागिण घेती झेप
माझी बवळण गाय...
माझ्या बवळण गाईच्या मांड्या
जशा पालखीच्या दांड्या
माझी बवळण गाय बरी हो
दूध भरून......
चरी = चरवी
५) एवढं दूध कोण कोण पेया रे
कोण कोण पेया
महादेवाचा गुरखा पेई रे
महादेवाचा गुरखा पेई
गुरख्याच्या हातात रंगीत काठी
गुरख्याच्या हातात रंगीत काठी
काठी अटकली शेवळाला
म्हतारी टांगली देवळाला
19 Sep 2019 - 2:03 pm | दुर्गविहारी
काही नवीन गाणी समजली. वाचायला मजा आली.
19 Sep 2019 - 3:09 pm | राजे १०७
धन्यवाद दुर्गविहारीजी.
19 Sep 2019 - 9:39 pm | वकील साहेब
राजे १०७,
बवळण शब्दाचा अर्थ काय होतो ? कारण मी बोहोळी असा शब्द ऐकला आहे.
अर्थात मला बोहोळी शब्दाचाही अर्थ माहित नाही.
नागिणीचे ऐवजी नागिलीचे पान अस हवं होत.
आणि एक कडवं आहे.
माझ्या बोहोळ्या गाईची कास
जशी मोतियाची रास
19 Sep 2019 - 9:45 pm | राजे १०७
आमच्या भागात असंच बोललं जायचं. नागिणीचं पान हेही असं म्हणतात. लिखित नसल्याने कर्णोपकर्णी अपभ्रंश होत जातो. धन्यवाद वकील साहेब.
19 Sep 2019 - 9:41 pm | वकील साहेब
आमच्या कळपात मोरी गेंदबा
आमच्या कळपात मोरी
मोरीला झालाय गोऱ्हा गेंदबा
मोरीला झालाय गोऱ्हा
हे गाण आठवतंय का कोणाला ?
19 Sep 2019 - 9:47 pm | राजे १०७
हे गाणं मी कालपासून आठवतोय पण अर्धवट आठवतंय.
दोन पाच ओळी लिहितो.
19 Sep 2019 - 9:55 pm | राजे १०७
गाया लागल्या खेळू गेणुबा
गाया लागल्या खेळू
बैल डरंतो नांद्या गेणुबा
बैल डरंतो नांद्या
नांद्या बैलाची येसन गेणुबा
नांद्या बैलाची येसन
निळ्या घोडीवर बसंन गेणुबा
निळ्या घोडीवर बसंन
निळ्या घोडीचा रवा गेणुबा
निळ्या घोडीचा रवा
सवती सवतीचा पावा गेणुबा
सवती सवतीचा पावा
पुढे आठवत नाही, कदाचित सुरुवात बरोबर नसेल ही.
गेणु हे प्रचलित नाव होते आमच्या कडे. बहुतेक ज्ञानूचा अपभ्रंश असावा. येसन = वेसन
19 Sep 2019 - 9:59 pm | राजे १०७
गाय येली मोरी गेणुबा
गाय येली मोरी
मोरीला झाला गोर्हा गेणुबा
मोरीला झाला गोर्हा
अशी सुरुवात असावी.
येली = व्याली